सुनील तांबेंनी ‘मान्सून : जनगणमन’ या अभ्यासपूर्ण आणि प्रगल्भ ग्रंथातून केवळ ‘मान्सून’चाच नव्हे, तर एकूणच ‌‘सिव्हिलायझेशनल मार्च‌’ कसा होत होता, याचे दर्शन घडवले आहे!
ग्रंथनामा - आगामी
कुमार केतकर
  • ‘मान्सून : जनगणमन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 10 October 2025
  • ग्रंथनामा आगामी मान्सून Monsoon मान्सून : जनगणमन Monsoon - JanGanMan सुनील तांबे Suneel Tambe

पत्रकार सुनील तांबे यांचे ‘मान्सून : जनगणमन’ हे पुस्तक परवा,  रविवार, १२ ऑक्टोबर रोजी पुण्यात मनोविकास प्रकाशनातर्फे समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

मान्सून म्हणजे फक्त मौसम नव्हे. केवळ पर्जन्याचा प्रवास नव्हे. भूगोल आणि हवामानशास्त्राच्या पलीकडे त्याला वैश्विक संस्कृतीचे विलक्षण वेधक परिमाण आहे. सामाजिकच नव्हे, तर कृषी अर्थशास्त्राबरोबर अगदी राजकीय संदर्भही आहेत. शिवाय इतिहास आणि मानववंशविज्ञानाचे हजारो वर्षांचे संदर्भही आहेत. ज्याला ‌‘सिव्हिलायझेशनल स्टडीज‌’ म्हणतात. त्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे मान्सून. त्याचा सांस्कृतिक आविष्कार बॉलीवूडच्या हिंदी चित्रपटांतील गीत-संगीतात, साहित्यात आणि संतसाहित्यात, कविता आणि पेंटिग्ज तसेच वेशभूषेतही. मान्सूनचे असे सर्वंकष, अवघ्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारे हे बौद्धिक-भावनिक-आध्यात्मिक वैभव वाचून मी अक्षरश: भारावून गेलो होतो.

सुनील तांबेंनी इतका प्रकांड आणि बहुसंदर्भीय अभ्यास कधी आणि कसा केला याचे आश्चर्य आहेच, पण त्यापेक्षाही त्यांनी केलेली शैलीदार आणि चित्तवेधक मांडणी वाचकाला मान्सूनची एक वेगळीच अनुभूती देते.

शाळेत असताना भूगोलात ‘व्यापारी वारे’, ‘मतलई वारे’ असे बरेच काही वाचायला मिळाले होते. पण या आणि इतर वाऱ्यांचा मान्सूनशी असलेला संबंध मला पुढे बऱ्याच वर्षांनी अवगत होऊ लागला, तोसुद्धा ‌‘क्लायमेट ॲन्ड कॉलनीयलीसम्‌‍‌’ या वा तत्सम आणि ‌‘पॉलिटिक्स ऑफ क्लायमेट चेंज‌’ असे विषय वाचनात येऊ लागले तेव्हा. परंतु त्यातील गूढ आणि रहस्यभेद होऊ लागले, जेव्हा जगाचा शोध घेणारे धाडसी खलाशी आणि त्यांचे थरारक सामुद्री प्रवास वाचनात आले तेव्हा. हिंदुस्थानच्या शोधात निघालेला वास्को-द-गामा असेल वा पंधराव्या-सोळाव्या शतकातील अनेक साहसी समुद्रवीर यांनी वारे, दिशा, ऊन, पाऊस, वादळे, समुद्राचे उग्र आणि प्रशांत रूप पाहिले आणि लिहून ठेवले. त्यामुळे आपले भूगोल आणि हवामानाचे आकलन समृद्ध झाले. मला त्यातूनही वारे आणि ऋतूंचे बरेच ज्ञान प्राप्त झाले. पण त्या सर्व वाचनाला एक सुस्पष्ट अर्थ-अन्वयार्थ सापडत नव्हता. त्यामुळे कुतूहल आणि गूढ तसेच होते.

सुनील तांबेंनी या अभ्यासपूर्ण आणि प्रगल्भ ग्रंथातून केवळ मान्सूनचाच नव्हे, तर एकूणच ‌‘सिव्हिलायझेशनल मार्च‌’ कसा होत होता, याचे दर्शन दिले आहे. भारताचे आणि भारतीयत्वाचे इतके सखोल विवेचन आणि विश्लेषण आणि तेही मान्सूनचा वेध घेण्याच्या अभ्यासातून माझ्या वाचनात आजवर आले नव्हते. या ग्रंथांमुळे तांबे आता रा. चिं. ढेरे, दुर्गा भागवत, माधव गाडगीळ, वसंत गोवारीकर, ‘गावगाडा’चे लेखक आत्रे, अनिल अवचट आणि अशा सृजनशील संशोधकांच्या मांदियाळीत सामील झाले आहेत. हे विधान काहींना अवास्तव वा अतिप्रशंसा करणारे वाटेलही, पण हा ग्रंथ-प्रबंध नीट वाचल्यानंतर त्यातील सत्यता त्यांना लक्षात येईल.

.................................................................................................................................................................

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा -  Pay Now

.................................................................................................................................................................

सुनील तांबेंना हिंदी चित्रपटगीत-संगीतामधून ते अगदी बहिणाबाईंच्या कवितांपर्यंत, गालिबपासून शैलेंद्रपर्यंत आणि पु. ल. देशपांडेंपासून दक्षिण अमेरिकेतील प्रतिभासंपन्न लेखकांपर्यंत सर्व जण त्यांच्या वैचारिक-सांस्कृतिक परिवारातील वाटत आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांना भारतीय समाजातील जातीपातींचा अचाट आणि अफाट गुंतागुंतही समजून घेण्याचे आव्हान अंगावर घ्यायचे असते. तांबे वैचारिकदृष्ट्या ‌‘डावे‌’ (म्हणजे समाजवादी पठडीतले), विचार व वृत्तीने धर्मवाद (धर्मांधता) व त्याची विविध रूपे (उग्र ते शहाजोग मवाळ) यांच्या पूर्ण विरोधात, ‌‘सेक्युलर माईंडसेट‌’ असलेले आणि विविध मतप्रवाहांच्या सहवासात (आणि वाद-वितंडवादात) वावर असल्याने ‘आधुनिक लोकशाहीवादी’ आहेत.

मान्सून हा विषय फक्त हवामानशास्त्र, भूगोल आणि पर्यावरण यापुरताच मर्यादित नाही, तर या ‌मोसमांचे एक विज्ञान आहे आणि रोमान्सही! माझ्या वाचनात इतके प्रगल्भ वैज्ञानिक आणि रोमँटिकही असे मान्सूनचे वर्णन-विवेचन-विलेषण आले नव्हते. त्यामुळेच या पुस्तकाला एक शैलीदार लय मिळाली असून ज्यांना या विषयांमध्ये आस्था वा गोडी नाही, त्यांनाही त्यातील वाचनीयता व रसिकता जाणवेल.

मान्सूनचे असे विहंगम दृश्य आणि वर्णन वाचकाला एक सहज जाणीव करून देतो की, आपण या भूतलावर असो वा नसो, हे निसर्ग वैभव गेली हजारो वर्षे पृथ्वीला सजवत आले आहे. एकूणच या अथांग विश्वात आणि विशेषत: मान्सूनने भारलेल्या भारतीय उपखंडात आपण किती नगण्यासारखे वा लहान आहोत, याची जाणीव करून देतानाच मान्सूनचे सौंदर्य आणि सांस्कृतिकता आपल्याला प्रगल्भ आणि प्रबुद्ध करते.

कुमार गंधर्वांच्या गीतवर्षात जो रस प्रगट होतो, त्या रागाचे नाव ‌‘मान्सून राग‌’ दिले तरी चालेल. कुमारांच्या स्वरातून मान्सूनचे सर्व मूड्स, रंगरूप, सौंदर्य, कधी काहीसे लोभस उग्र तर कधी पूर्ण रोमँटिक आपल्याला धुंद करते. राज कपूरला ‌‘बरसात में हमसे मिले तुम‌’ या गाण्याचे (गीत शैलेंद्र) चित्रीकरण करताना जो मूड दाखवायचा आहे, तो या मान्सूनचा मूड आहे.

येथे एक उतारा उदधृत करतो. त्यातून तांबेंचा एक प्रकारचा ‌‘वर्ल्डव्ह्यू‌’ किंवा एक विशाल दृष्टीकोन दिसून येतो. “पावसाळ्यात पडणारा पाऊस आणि भू-रचना यानुसार त्या त्या प्रदेशातील जलचक्र निश्चित होतं. त्यानुसार पिकं आणि पीक पद्धती ठरते. पेरणी आणि काढणीच्या तारखा ठरतात. पशुपालकांची कुरणं आणि स्थलांतरांचे मार्ग निश्चित होतात, मासेमारीचं चक्र निश्चित होतं आणि त्यानुसार खाद्यसंस्कृती ठरते. सारांशाने सांगायचं तर विशिष्ट प्रदेशाचं आर्थिक-सामाजिक जीवन मान्सून आणि भू-रचना निश्चित करतात. साहजिकच सांस्कृतिक जीवन आणि राजकीच विचारही.”

हजारो वर्षे विविध ओळखी असणाऱ्या जनसमूहांचे संमीलन, संघर्ष आणि स्पर्धेतून साकारलेले सहजीवन हा मान्सूनचा परिणाम आहे. दक्षिण आशिया म्हणजे पाकिस्तान, भारत, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका हे सर्व देश मिळून एक राष्ट्र बनतं असं मान्सून सांगतो. राष्ट्र-राज्यं वेगळी असतीलही, परंतु दक्षिण आशिया हेच सर्वांचे राष्ट्र आहे, असं मान्सून सांगतो.

दक्षिण आशिया हाच मान्सूनश्रेणीत ‌‘राष्ट्र‌’ असला, तरी युरोप-अमेरिका ते चीन-जपान या सर्वांना या प्रदेशाबद्दल आकर्षण वाटण्याचे कारण, हे मान्सून निर्मित निसर्गसंपन्न, वैविध्यतेने नटलेले निसर्गाचे रूप आहे. असा मान्सून नसता, तो केरळमधून विस्तारत सर्वत्र पसरला नसता, तर वास्को-द-गामाला केरळमधील मसाल्यांची चव कळली असती का? युरोपला मसाल्यांची, अन्नाची आणि जिभेची चव समजली नसती, तर त्यांचा विस्तारवाद, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद हे त्याचे आविष्कार झालेच नसते. जगाची नवी मांडणी झालीच नसती.

तसे पाहिले तर प्रत्येक देशात पाऊस पडतो. अमेरिकेतला पाऊस आफ्रिका खंडातल्या देशांपेक्षा वेगळा असतो, पण युरोप अमेरिका वा आफ्रिकेत ‌‘मान्सून‌’चा पाऊस नाही. भारतीय उपखंड किंवा दक्षिण आशिया, त्या अर्थाने भाग्यवान म्हणायला हवा.

तांबेंना या इतिहासाचे आणि भौगोलिकाचे भान नसते, तर मान्सूनवरती ग्रंथ लिहावा असे वाटलेच नसते. शिवाय फक्त भौगोलिक इतिहास इतकाच मान्सूनचा परिप्रेक्ष्य ठेवला असता, तर हा ग्रंथ माहितीपूर्ण पण तांत्रिक आणि क्लिष्टही झाला असता. शाळा-कॉलेजांमधून विषय शिकवण्यासाठी तो उपयोगी पडला असता. पण त्याचे सांस्कृतिक स्थान आणि रसाळ, जीवनरसयुक्त सौंदर्य अधोरेखित झाले नसते. उदाहरणार्थ, हे मान्सून आणि चातक यांचे तांबेंनी केलेले वर्णन पहा-

“चोली पक्षी म्हणजे चातक. लहानपणी वडिलांनी शिकवलेलं सुभाषित आठवलं,

‘एक एव खगो मानी चिरंजीवतु चातकम्‌‍|

म्रियते वा पिपासार्तो याचते वा पुरंदरम्‌‍॥’

चातकासारखा स्वाभिमानी पक्षी नाही, तहानेने व्याकूळ झाला, अगदी मरायची वेळ आली, तरीही तो इंद्राकडे पाणी मागतो. अन्य कोणत्याही पाण्याला तो शिवतही नाही. गोस्वामी तुलसीदासजी लिखते हैं -

‌‘तुलसी के मत चातकही केवल प्रेमपिआस,

पिअत स्वाति जल जान जग जाँचत बारह मास‌’

म्हणजे चातकालाच प्रेमाची तहान असते. तो केवळ स्वाती नक्षत्रात पडणारे पावसाचे थेंब पितो आणि वर्षभर ढगांचा आतुर बनून राहतो. (आपण ‌‘चातकासारखी वाट पाहणे‌’ असे शब्दप्रयोग सहज वापरतो, पण त्यामागील काव्य तांबे देतात.) २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर सूर्य स्वाती नक्षत्रात असतो, त्या वेळी परतीचा म्हणजे ईशान्य मान्सून सक्रिय असतो आणि चातक तो पावेतो निघून गेलेला असतो उत्तर भारतातून!”

तांबे काव्यत्व थोंबाळत बसत नाहीत. ते थेट विज्ञान आणि पक्षी निरीक्षणाकडे वळतात.

“चातक पक्ष्याच्या दोन जाती आहेत. एक जात वर्षभर दक्षिण भारतात असते, तर दुसरी जात पूर्व आफ्रिका-भारत-पूर्व आफ्रिका असे स्थलांतर करते. चातकाचं आगमन मान्सूनच्या वाऱ्यांसोबत होतं. अरबी समुद्र ओलांडून तो उत्तर भारतात येतो की, किनारपट्टीने म्हणजे पूर्व आफ्रिका-येमेन-ओमान-बलुचिस्तान-सिंध या मार्गाने! ‌‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग‌’ आणि ‌‘वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांनी इंडियन बायोरीसोर्स नेटवर्क प्रकल्प हाती घेतला आहे. दोन चातक पक्ष्यांचा माग काढणं सुकर होण्यासाठी त्यांच्या पायात ‌‘प्लॅटफॉर्म ट्रान्समीटर टर्मिनल' बसवण्यात आले आहेत.”

तांबेंनी मान्सूनचा अभ्यास करताना सिंधू संस्कृती, मोहेंजोदारोतील उत्खननात सापडलेल्या अवशेषांमार्फत मिळणारे तत्कालीन जीवन, त्यावेळची खरीप आणि रब्बी पिके, शेती व्यवस्था स्थिर करण्यासाठी गायी, बैल यांचा सांभाळ, नांगरणी, मळणी, शेतमालाची वाहतूक, त्या वेळची लोकसंख्या आणि त्यांचा उदरनिर्वाह, या सर्व बाबतींत इतिहास संशोधनातील इरफान हबीब यांसारख्या तज्ज्ञांच्या आधारे उदबोधन केले आहे. तत्कालीन स्त्रीजीवनही त्यात येते. या सर्वांचे मान्सूनशी काय नाते?

पंडित नेहरूंनी हिंदुस्थानचे वैशिष्ट्य म्हणजे ‌‘बहुसांस्कृतिकतेतील एकत्र‌’ असे म्हटले होते. खरोखरच इतके प्रदेश, इतक्या भाषा, इतक्या जाती-जमाती आहेत की, ज्यातून जीवनशैलीतही विविधता दिसते. ती जेवणशैलीतही आहे. कारण प्रत्येक राज्यातील आहार वैविध्य, त्या त्या भागातील शेती व तिथे पिकणारे धान्य (वा भाज्याही) मान्सूनमुळे समृद्ध झाले आहे. पावसावर जगभर संशोधन चालू आहे, पण मान्सूनवर संशोधन करायलाही युरोप-अमेरिकेतील तज्ज्ञ येत असतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

“सिंधू संस्कृतीतले लोक ज्या प्रकारे धान्याची मळणी करायचे, त्याच पद्धतीने हिंदुस्थानातले हजारो शेतकरी आजही मळणी करतात. पिंपळाचं झाड आणि मातृदेवता आजही पूजल्या जातात. सिंधू संस्कृतीत काल्पनिक प्राणी होते. त्यामध्ये नंतर भर पडत गेली. अनेक काल्पनिक प्राण्यांना देव, राक्षस, दैत्य वगैरे मानलं गेलं आणि आजही जातं! या सर्व बाबी जतन करणारे लोकसमूह आजही मान्सूनवर अवलंबून आहेत. युरोपातील कोणत्याही देशात संस्कृतीचं हे सातत्य आढळणार नाही. मान्सूनमुळे भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांचे सातत्य आहे. विस्थापन, संघर्ष, संमीलन आणि सहजीवन यांचंही सातत्य आहे.”

म्हणजेच मान्सूनचा आपल्या जीवनावरचा संस्कार आणि प्रभाव सर्वंकष आहे. आर्यांच्या टोळ्या भारतात येण्याची प्रक्रिया असो वा इंडो-आर्यन भाषांची निर्मिती वा विकास असो, मान्सूनशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निगडीत आहेत. हिमालयाची पर्वतरांग मोसमी वाऱ्यांना रोखणारी एक भिंत आहे. वायव्येला पोचेपर्यंत मोसमी वारे कमजोर व्हायचे. त्यामुळे अफगाणिस्तान, तिबेट या भागात मान्सून नाही. हिंदुकुश आणि काराकोरम पर्वतारांगावरील बर्फ वितळला की, तेथील नद्या-नाल्यांना पाणी येतं. वसंत ऋतूत या प्रदेशात थोडा फार पाऊस पडतो.

या ऐतिहासिक भूगोलाचा परिणाम राष्ट्र-राज्य निर्माण होण्यात कसा झाला, जातीव्यवस्थांचे समाजशास्त्र कसे निर्माण झाले, यावरही तांबेंनी प्रबंधात्मक मांडणी केली आहे. काही तज्ज्ञ वा विचारवंत त्याबद्दल वादही उपस्थित करू शकतील. मी त्या वादात पडू इच्छित नाही. तांबेंचे हे पुस्तक सर्वार्थाने चिंतनाला सर्वांगीण उत्तेजन देणारे आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......