अजूनकाही
आजूबाजूला मी माणसे पाहतो. घरात पाहतो. स्वतःही अनेकदा डोकावतो. आणि मग लक्षात येते की, आपण सारेच जखमी आहोत. जखमा मनावरच्या आहेत. काही आपण जपलेल्या. काही आपणहून झालेल्या. काही घाव दुसऱ्यांनी केलेले. काही वार तर असे की, ते का, कुणी, कसे हेच समजत नाही. अखेर राहते ते फक्त सोसणे.
अनेकदा हे सोसणे अडाणी, आंधळे असते. काय झाले आहे हेच समजत नसते. मुळात आपल्याला काही झाले आहे, हीच समज नसते. तेव्हा मग त्यावर काही उपाय असू शकतात, याची जाण असणे दूरची गोष्ट. हे अधिक वेदनादायी. अशा वेळी मेंदूचे यातनाघर होते. माणसे कोलमडतात, मोडून पडतात. आज अशी अनेक माणसे आपल्याभोवती आहेत. त्रासलेली, सुन्नावलेली, दबलेली, कोलमडलेली. काही त्या मार्गावरची. त्या मार्गावरचे टप्पे वेगवेगळे असतील. तीव्रता वेगवेगळी असेल, पण मानसिक व्यथा-वेदना, दुःख सोबतीला घेऊनच बहुसंख्य लोक जगत आहेत.
डॉ. वृषाली राऊत यांचे असेच झाले होते. कॉलेजात असताना, पुढे नोकरी करताना झालेल्या आघातांनी कोलमडून पडल्या होत्या त्या. पण मग सावरल्या. त्यांच्या शिक्षणाने, ज्ञानाने त्यांना सावरले. उभे केले. मोठे केले. आणि मग त्यातून आकारास आले त्यांचे ताजे पुस्तक - ‘मानसिक आघात समजून घेताना’.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आघात, इंग्रजीत ‘ट्रॉमा’. महामार्गांच्या कडेला दिसतात ती ‘ट्रॉमा केअर इस्पितळे’. अपघातात झालेल्या जखमांवर इलाज होतात तेथे. पण त्या असतात शारिरीक जखमा. मनावर झालेल्या जखमांचे काय? जीवनाच्या वाढलेल्या द्रुतगतीने मानसिक अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे. ताणतणाव तर पाचवीला पुजलेले. साधे कामावर जायचे म्हटले तरी रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, बस-रेल्वेतील मरणाची गर्दी यांचा ताण.
अशात झालेली एखादी मानसिक जखमही जगण्याचा तोल बिघडवून टाकू शकते. एखादा धक्का मन-मेंदूची शतशः शकले करू शकतो. आणि सध्याच्या नकारात्मकतेने पछाडलेल्या वातावरणात या अशा धक्क्यांच्या, आघातांच्या शक्यता अधिक वाढलेल्या आहेत. तशा घटना आपल्याबाबत घडू शकतात, आपल्या प्रिय व्यक्तींबाबत घडू शकतात. अखेर आपल्या साऱ्यांचेच जगणे आज युद्धग्रस्त आहे.
युद्ध कोणतेही असो. त्यात समोर शत्रू कोण हे माहीत असणे आवश्यक असते.
सहाव्या शतकात सन त्सू नावाचा एक चिनी युद्धनितीज्ञ होऊन गेला. तो सांगतो, ‘‘आपण कोण आहोत आणि आपला शत्रू कोण आहे, याची ओळख तुम्हाला असेल; तर शंभर लढाया झाल्या, तरी त्याच्या परिणामांची चिंता करण्याचे कारण नाही. पण तुम्ही ना स्वतःला ओळखत असाल, ना शत्रूला जाणत असाल, तर मात्र प्रत्येक युद्धात तुमचा पराजय ठरलेलाच.’’
डॉ. वृषाली राऊत यांचे ‘मानसिक आघात समजून घेताना’ हे पुस्तक आजच्या काळात महत्त्वाचे ठरते, कारण ते आपल्याला आपल्या या ‘शत्रूं’ची ओळख करून देते.
मानसिक आघात म्हणजे नेमके काय, त्यांची कारणे, त्यांचे प्रकार, त्या-त्या आघातांना आपला मेंदू देत असलेला प्रतिसाद, त्याचे मन आणि देहावर होणारे परिणाम यांची तपशीलवार शास्त्रीय माहिती हे पुस्तक आपणांस देते. आघाताप्रमाणेच शोक - ग्रीफ - हा मन कुरतडणारा मोठा रिपू. त्यापासून कोण वाचले आहे? सर्वांनीच कधी ना कधी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि तरीही ‘शोकांतिका’ ही की, हा शोकही आपल्याला नीट माहीत नाही.
गमावलेपणाच्या भावनेतून निर्माण होतो तो. त्या गमावलेपणाचे कलंकित (स्टिग्मटाईज्ड), धूसर वा अस्पष्ट (अँबिग्युअस), पूर्वानुमानी वा आगाऊ (अँटिसिपेटरी), वंचित (डिसएन्फ्रॅंचाईज्ड) असे प्रकार. या प्रत्येक प्रकाराची कारणे भिन्न आहेत. दुःख, राग, भीती, चिंता, गोंधळ, बधिरता, कृतज्ञता, आशा, ईर्ष्या, संताप, चीड, निराशा अशा विविध भावना त्यातून निर्माण होतात.
डॉ. राऊत सांगतात, शोक हा केवळ भावनिक नसून, तो शारीरिकसुद्धा असतो, हे आता सिद्ध झाले आहे. झोपेतील बदल, मायग्रेन, डोकेदुखी, अपचन, पाठदुखी, ऊर्जेतील बदल, सांधेदुखी, स्नायुदुखी अशा तक्रारी शोक असणारी व्यक्ती अनुभवते. थकवा, वजन वाढणे वा कमी होणे, मानसिक तणाव इथपासून विसरभोळेपणा, चित्र एकाग्र न होणे, अशा विविध समस्या शोकग्रस्त व्यक्तीस ग्रासतात. त्यांची तीव्रता वेगवेगळी असेल. त्यास दिला जाणारा प्रतिसाद वेगवेगळा असेल, पण तो असतो.
आपली माणसे आपली न राहणे वा आपल्यात न राहणे, या गोष्टी कोणास टळल्या आहेत? कधी आपल्या माणसांना मृत्यू ओढून नेतो, कधी परिस्थिती. कधी विरहाची व्यथा, कधी व्यभिचाराने दूरता. ज्यांच्या छातीतले हृदय धडधडत नसते, त्यांची गोष्ट निराळी. एरवी शोकाचा भोग प्रत्येकाच्याच वाट्याला येतो. त्याचा सामना तर करावाच लागतो. तो कसा करायचा, हे या पुस्तकातून समजते. विशेष म्हणजे हे केवळ पुस्तकी ज्ञान-विज्ञान नाही. ते ‘आधी सोसले, मग सांगितले’ अशा प्रकारचे आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
डॉ. वृषाली राऊत या मान्यवर समुपदेशक आहेत. अनेकांना त्या आधार देतात, त्यांच्या जगण्याला उभारी देतात. त्यांचे यापूर्वीचे ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ हे पुस्तक, त्यांचे ‘अक्षरनामा’वरील विविध लेख यांतून त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. पण काही वर्षांपूर्वी त्यांनाही मानसिक आघातांनी जखमी केले होते. शोकाने कोलमडून पाडले होते. हे सारे त्यांनी अत्यंत मोकळेपणाने या पुस्तकातून मांडले आहे.
वयाच्या विशीत होत्या त्या तेव्हा. त्या काळात वडिलांची नोकरी तडकाफडकी जाणे, अत्यंत प्रिय अशा लहान मामाचा अकस्मात मृत्यू, अशा काही घटनांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. मायग्रेनचा त्रास सुरू झाला. त्यातून शिक्षणावर परिणाम झाला. आत्मविश्वास हरपला. हसणे हरवले. आनंद संपला. ‘आयटी’ क्षेत्रातल्या नोकरीवर परिणाम झाला. वैयक्तिक आयुष्यात काही धक्के बसले… घसरवाटा अनेक होत्या. त्यावरून अवघ्या जीवनाची ‘चित्तरकथा’च व्हायची त्यांची, पण न घसरता त्या सावरल्या.
त्या काळात त्या मानसशास्त्राच्या विद्यार्थी होत्या. पुढे त्यातच त्यांनी पीएच.डी. केली. पण तेव्हा त्यांना मानसिक आघाताचा, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर - पीटीडीएस-चा जो त्रास होत आहे, तो कशामुळे, हे नीट समजावून सांगण्यासाठी कोणी नव्हते. तो त्रास त्यांचा त्यांनाच भोगावा लागला.
ती सारी कहाणी त्यांनी या पुस्तकात मांडली आहे. असे म्हणतात की, तुम्ही जितके ‘वैयक्तिक’ सांगाल, तितके ते ‘वैश्विक’ होत जाते. त्यांची ही वैयक्तिक कहाणी ही आज अनेकांची कहाणी आहे. तपशील वेगळे असतील. असणारच. पण आशयाच्या अंगाने ती अनेकांना आपली कहाणी वाटू शकते. त्या आघातांवर, शोकावर त्यांनी केलेली मात अनेकांना दिशादर्शक ठरू शकते.
शास्त्रीय माहितीला रुक्षतेचा शाप असतो. या पुस्तकाने त्यावर मात केली आहे ती लेखिकेच्या वैयक्तिक कहाणीने. ती वाचल्यानंतर वाचक जेव्हा पुढच्या पानांवर जातो. तेथे आघात आणि शोक हे सारे समजावून घेतो, तेव्हा ते मेंदूला भिडते.
कोविडोत्तर काळातील आजचे जग प्रचंड बदललेले आहे. वेग, तणाव, संघर्ष, मानवी संबंधांतील उसवलेपण हे सारेच वाढले आहे. या काळात आपणच आपले मन जपायला हवे. त्यासाठी या पुस्तकातील माहिती नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.
‘मानसिक आघात समजून घेताना’ : डॉ. वृषाली रामदास राऊत
न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे | पाने – १०८ | मूल्य - २०० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांची ‘परकीय हात’ आणि ‘प्रोपगंडा’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
ravi.amale@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment