लिऑर झ्मिग्रॉड या संशोधिकेचे ‘आयडिऑलॉजिकल ब्रेन’ हे पुस्तक सध्या युरोप-अमेरिकेत ‘२०२५मध्ये प्रसिद्ध झालेले सगळ्यात महत्त्वाचे पुस्तक’ म्हणून गाजत आहे. ‘द गार्डियन’ आणि ‘द टेलिग्राफ’ या ख्यातनाम वर्तमानपत्रांनी ‘बेस्ट बुक ऑफ द इयर’ असा त्याचा गौरव केलाय. मानवी मेंदू आणि आयडिऑलॉजी याविषयी अतिशय मूलभूत संशोधन असलेल्या या पुस्तकाचा परिचय करून देणारा पहिला लेख २१ जुलै २०२५ रोजी ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झाला होता. हा त्याचा तिसरा आणि शेवटचा भाग...
.................................................................................................................................................................
लिऑर झ्मिग्रॉडच्या ‘आयडिऑलॉजिकल ब्रेन’ या पुस्तकावरील लेखमालिकेमधील हा तिसरा आणि शेवटचा लेख. पहिल्या लेखात आपण कुठलीही आयडिऑलॉजी आपला मेंदू शोषून घेतो. आयडिऑलॉजीचा आपल्या मेंदूमध्ये पेशींच्या पातळीवर परिणाम होतो, हे पाहिले. दुसऱ्यात ‘आयडिऑलॉजी’ या शब्दाचा इतिहास पाहिला.
अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील विचारवंत आन्त्वान ट्रेसी यांनी ‘ ‘आयडियांचे शास्त्र’ म्हणजे आयडिऑलॉजी’ अशी व्याख्या केली. पुढे मार्क्स आणि एंगल्स यांनी ‘माणसाने आपल्या समाजामधून आपल्या आत शोषून घेतलेले विचार, श्रद्धा आणि विश्वास म्हणजे आयडिऑलॉजी’ अशी व्याख्या केली. ट्रेसीसाठी ‘आयडिऑलॉजी’ म्हणजे सत्याचा शोध होता. मार्क्स आणि एंगल्स म्हणाले की, कुठलीही आयडिऑलॉजी म्हणजे तद्दन खोटेपणा असतो. आपले आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी समाजामधील तालेवार वर्गाने खालच्या वर्गांवर लादलेला खोटेपणा म्हणजे आयडिऑलॉजी’!
नेपोलियननेसुद्धा ट्रेसीच्या ‘सत्याच्या शोधाला’ विरोध केल्याचे आपण पाहिले. आपलेच राष्ट्र श्रेष्ठ, आपलाच नेता सर्वश्रेष्ठ, आपलीच संस्कृती सर्वश्रेष्ठ अशी ‘इल्युजन्स’ महत्त्वाची असतात. प्रत्येक नागरिकाने विचार करायला सुरुवात केली आणि सत्याचा शोध घ्यायला सुरुवात केली, तर राष्ट्राच्या जीवनामधील ‘मॅजिक’ निघून जाईल, असे नेपोलियनचे म्हणणे होते.
आता ‘सत्याचा शोध’ या अर्थाने कोणीही ‘आयडिऑलॉजी’ या शब्दाचा अर्थ घेत नाही. मार्क्स आणि एंगल्स यांनी ‘आयडिऑलॉजी’ या शब्दाला दिलेला अर्थ आपण स्वीकारला आहे. धर्मनिरपेक्षतावाद, लोकशाहीवाद, उदारमतवाद, कॅपिटॅलिझम, सोशालिझम, कम्युनिझम, नाझीझम, फॅसिझम आणि अॅनार्कीझम अशा अनेक आयडिऑलॉजी आपल्या अवतीभवती आहेत. या शिवाय आंबेडकरवाद, लोहियावाद, गांधीवाद आणि विविध धर्मांच्या उत्थापनासाठी सुरू झालेल्या विचारधारादेखील आहेतच.
या सगळ्याच ‘आयडिऑलॉजी’ आपणच एकटे मानवी जीवनाबद्दलचे अंतिम सत्य सांगत आहोत, असे म्हणत असतात. थोडक्यात, आपल्यावर अनेक ‘सत्ये’ भिरकावली जातात.
कुठल्याही एका ‘आयडिऑलॉजी’कडे संपूर्ण सत्य असू शकत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे, असे झ्मिग्रॉड आपल्या पुस्तकामधून आपल्याला सतत सुचवत राहिलेली आहे. तिच्या पुस्तकामधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ‘विचारांमधील लवचीकता’ (‘फ्लेक्झिबल थिंकिंग’) हा आहे. माणूस आयडिऑलॉजी शोषून घेतो आणि मग नंतर हळूहळू ती एक सवय बनून जाते, माणूस कट्टर बनत जातो. ही कट्टरता माणसाच्या विचारामधील लवचीकता घालवून टाकते. माणसाने जे विचार आपल्या उराशी घट्ट धरून ठेवले आहेत, त्यांच्या विरोधात अत्यंत सबळ पुरावे दिले, तरी आयडिऑलॉजीच्या आहारी जाऊन कट्टर झालेला माणूस ते पुरावे मानत नाही. कट्टरतेपासून स्वतःला वाचवायचे असेल, तर आपण ‘फ्लेक्झिबल थिंकर’ व्हावे लागते.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आजकाल प्रत्येक आयडिऑलॉजीने राजकीय रंग पकडलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही आयडिऑलॉजीमध्ये विचारांच्या बरोबरच राजकीय हितसंबंधसुद्धा महत्त्वाचे झालेले आहेत. या परिस्थितीमध्ये कुठल्याही व्यक्तीने स्वतः विचार करणे आवश्यक ठरते. खोटेपणाची राळ सगळ्याच आयडिऑलॉजी उडवत असतात.
झ्मिग्रॉड म्हणते की, प्रत्येक आयडिऑलॉजीकडे कट्टर समर्थक असतात. ‘लिबरल आयडिऑलॉजी’ मानणारे मवाळ आणि उजव्या आयडिऑलॉजी मानणारे कट्टर असा समज साधारणपणे असतो. झ्मिग्रॉड म्हणते की, लिबरल आयडिऑलॉजी मानणाऱ्या लोकांमध्येसुद्धा विचारांमध्ये लवचीकता असलेले आणि विचारांची कट्टरता असलेले लोक असतात. उजव्यांमध्येही हे दोन्ही प्रकार असतात.
आपण कट्टर झालेलो आहोत का, हे स्वतःपुरते जाणण्याची एक ‘टेस्ट’ झ्मिग्रॉड सुचवते. आपली आयडिऑलॉजी न मानणाऱ्या लोकांबद्दल हिंसेचे विचार आपल्या मनात येत आहेत का, हे ज्याने त्याने आपल्या स्वतःशी ताडून पाहावे. असे विचार तुमच्या मनात येत असतील, तर तुम्ही आपल्या आयडिऑलॉजीच्या आहारी गेला आहात आणि कट्टरतेचा रस्ता चालू लागला आहात! थोडक्यात, कोणत्याही आयडिऑलॉजीतून येणारी कट्टरता तुमचे वैचारिक स्वातंत्र्य हिरावून घेते.
यावर झ्मिग्रॉड ‘वैचारिक लवचीकता’ हा उपाय सुचवते. आपल्या मनाच्या अनेक क्षमतांमधून ‘वैचारिक लवचीकता’ आकाराला येत असते. नवीन माहिती ग्रहण करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता, मानवी आयुष्यामधली अनिश्चितता समजून घेण्याची क्षमता, वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेण्याची क्षमता, आपल्या श्रद्धा व आपले विश्वास यांचे पुन्हा पुन्हा परीक्षण करण्याची क्षमता, समोर आलेले पुरावे सारासार विचार करून स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची क्षमता, मानवी जीवनामधील अस्पष्टता स्वीकारण्याची क्षमता.
याबरोबरच अजून एक क्षमता अतिशय महत्त्वाची ठरते. कट्टरतेच्या विचारांची आवर्तने आपल्या मनात घोंगावत असतात. या विचारांचे नीट निरीक्षण करून त्यांना आवर घालण्याची क्षमता आपल्याकडे असणे अत्यंत महत्त्वाचे असते. या क्षमता आपल्याकडे असतील, तरच आपण आपले वैचारिक स्वातंत्र्य टिकवून धरू शकतो.
कित्येक लोकांना सगळे ‘ब्लॅक अँड व्हाईट’मध्ये लागते. यांना मानवी आयुष्यामधली अनिश्चितता अजिबात सहन होत नाही. आपल्या देशामधील अल्पसंख्याकांविषयी अनेकांना असुरक्षित वाटत असते. हा संपूर्ण जगभरातला हा प्रश्न आहे. भारतात मुसलमान आणि ख्रिश्चन अल्पसंख्य असतात, तर अमेरिकेत हिंदू. या अशा अल्पसंख्य लोकांविषयी अनेकांना असुरक्षित वाटत असते. या असुरक्षित वाटणाऱ्या लोकांचा प्रश्न असतो की, आमच्या देशात असलेले अल्पसंख्याक लोक निश्चितपणे कसे आहेत, हे आम्हाला सांगा.
यावर कुठलाही मानवी समाज चांगल्या आणि वाईट माणसांचा असतो, हे विवेकाचे उत्तर आहे. पण हे उत्तर या असुरक्षित लोकांना मान्य होत नाही. त्यांना पूर्ण समाज कसा आहे याबाबत ‘सत्य’ काय आहे ते हवे असते. चांगला आहे किंवा वाईट हे सांगा. ‘ब्लॅक अँड व्हाईट’मध्ये सांगा अशी या लोकांची ‘मागणी’ असते. यांना गुंतागुंतीची उत्तरं आवडत नाहीत. त्यात त्यांना सुरक्षित वाटत नाही. अशांच्या असुरक्षिततेचा राजकीय फायदा उठवण्यासाठी काही लबाड ‘आयडिऑलॉजी’ पुढे येतात. त्यांच्याकडून या असुरक्षितांना ‘हवी’ असलेली सोपी म्हणजेच ‘ब्लॅक अँड व्हाईट’ प्रश्नांना ‘ब्लॅक अँड व्हाईट’ उत्तरं दिली जातात. ही उत्तरं सोपी आणि खोटी असतात. तरीही या लोकांना ती आवडतात. ते या आयडिऑलॉजीच्या मागे जात राहतात. परिणामी या लोकांमधली कट्टरता हळूहळू वाढत जाते. जग सोपे करून हवे असलेले लोक हुकूमशाही आयडिऑलॉजींच्या मागे जातात. अशांना पूर्वी मानसशास्त्रात ‘ऑथॉरिटेरियन टाईप’ असे म्हटले जाई.
आयडिऑलॉजी हा विषय समजून घेताना आन्त्वान ट्रेसीच्या विचारापासून लिऑर झ्मिग्रॉडने सुरुवात केली होती. या प्रवासात तिला जाणवले होते की, वैचारिक स्वातंत्र्य टिकवायचे असेल, तर आपल्याला ‘फ्लेक्झिबल थिंकर’ व्हावे लागते. आता लोकांमधील कट्टरतेवर विचार करताना तिला या ‘ऑथॉरिटेरियन टाईप’च्या लोकांवर संशोधन करणे आवश्यक वाटले.
इथे एक प्रश्न उभा राहिला की, लोकांमध्ये कट्टरतेची लक्षणे जन्मतःच असतात की, हळूहळू संस्कारांनी तयार होत जातात? या संशोधनाचा पाया झ्मिग्रॉडला एल्सी फ्रेन्केल-ब्रन्सविकच्या संशोधनात मिळाला. एल्सी फ्रेन्केल-ब्रन्सविक ही ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ धर्माने ज्यू होती. नाझी जर्मनीमधील ज्यू अत्याचारांमुळे तिला देश सोडावा लागला. आपल्या संशोधक मित्राबरोबर ती अमेरिकेत निघून गेली. नाझी जर्मनीमधील अतिरेकी हुकूमशाही आणि अतिरेकी राष्ट्रवाद हे तिच्यासाठी अर्थातच महत्त्वाचे विषय बनून गेले होते. तिच्या मनात प्रश्न घोळत राहिला, हुकूमशाहीचे आकर्षण काही लोकांना जन्मतःच असते का? अमेरिकेत तिने यावर संशोधन सुरू केले.
१९४०च्या दशकात तिने हजारो लहान मुलांमुलींचा अभ्यास केला. त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांची मते आजमावली, त्यांच्यावर अनेक मानसशास्त्रीय टेस्ट केल्या. तुमच्या भागातल्या अल्पसंख्याक लोकांविषयी तुम्हाला काय वाटते? तुम्हाला कडक आणि शिक्षा करणारे वडील आवडतात का तुमच्या चुका समजून घेणारे सौम्य वडील आवडतात? अशा प्रकारचे अनेक प्रश्न असलेली प्रश्नावली तिने तयार केल्या. तिने मुलांची ‘मेमरी टेस्ट’ तयार केल्या. या मुलामुलींची आकलनशक्ती कशी आहे हे तपासण्यासाठी टेस्ट तयार केल्या. त्यात कित्येक हजार मुलामुलींचा अभ्यास झाला.
समाजामधील अल्पसंख्याक लोकांना हाकलून दिले पाहिजे असे म्हणणारी मुलं-मुली. अल्पसंख्याक लोकांची घरं घाण असतात, असा समज असलेली मुलं-मुली. त्या उलट, हीसुद्धा माणसंच आहेत, यांना आपल्या देशात सामावून घेतले पाहिजे असं म्हणणारी मुलं-मुली. अगदी लहान असताना म्हणजे चौदा-पंधरा वर्षांची असताना परदेशामधून आलेल्या अल्पसंख्याक लोकांचा द्वेष करणारी मुलं-मुली! चौदा-पंधरा वर्षांची असताना जागतिक शांतता प्रेमामुळे कशी येईल हे सांगणारी मुलं-मुली! तिला मोठ्या लोकांमधले सगळे प्रकार या मुला-मुलींमध्ये दिसले. म्हणून मग काही प्रश्न उभे राहिले. या मतांना डीएनए जबाबदार की संस्कार? या मुलांची ‘मेमरी’ कशी काम करते? यांच्या आकलनशक्तीमध्ये काही फरक असतो का? वैचारिक आणि भावनिक कोतेपण हे कमी प्रतीच्या आकलनशक्तीमुळे तयार होते का? याचा कमी-जास्त स्मृतीशी काही संबंध असतो का?
सतरा-अठरा वर्षं अभ्यास केल्यावर एल्सीच्या लक्षात आले की, अल्पसंख्याक समाजाविषयीचा कोतेपणा, जीवनाच्या इतर विषयांमध्येसुद्धा पसरत गेलेला दिसतो. एल्सीने त्यासाठी ‘रिजिडीटीज’ हा शब्द वापरला आहे. जे अल्पसंख्याकांबद्दल ‘रिजिड’ असतात, ते जीवनाच्या इतर भागांमध्येसुद्धा ‘रिजिड’ असतात!
अल्पसंख्याक समाजाला माणूस म्हणून कमी प्रतीचे समजणारी मुलं-मुली साधारणपणे स्त्रीने फक्त घर सांभाळावे असे म्हणत होती, वडील अतिशय कडक असावेत अशी त्यांची धारणा होती. आपली चूक झाल्यावर आपल्या वडिलांना आपल्याला मारले तर ते योग्य आहे असे त्यांना वाटत होते. किंबहुना त्यांनी मारलेच पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा होती. कोत्या मुलांची आणि मुलींची जीवने एकमेकांपासून वेगवेगळी होती. त्यांच्या आकांक्षा वेगवेगळ्या होत्या. विचाराने मुक्त असलेलेया मुलामुलींची जीवने आणि आकांक्षा एकमेकांत मिसळून गेलेल्या होत्या. हा मुलगा आहे, याने असेच वागले पाहिजे, ही मुलगी आहे हिने असेच वागले पाहिजे, असे त्यांना वाटत नव्हते.
‘रिजिड’ मुलामुलींना वडिलांनी शिक्षा केलेली चालत होती. म्हणजे, न्याय आणि शिक्षा या दोन संकल्पनांमध्ये त्यांची गल्लत होत होती. न्याय आणि वेदना या त्यांच्यासाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. एल्सीने या मुलामुलींबद्दल लिहिलेले एक हृदयद्रावक वाक्य झ्मिग्रॉड आपल्या पुस्तकाच्या नवव्या प्रकरणात देते- ‘These children asked - even begged and cried - for restrictions!’ या मुलामुलींना बंधने आवडत होती. या मुलामुलींना आपल्यावर बंधने घालणारी कुणीतरी अधिकारी व्यक्ती हवी होती. पुढच्या आयुष्यात या मुलामुलींना कुणा एका आयडिऑलॉजीने आपले मन आणि आयुष्य बांधून टाकलेले आवश्यक वाटणार होते. सगळे जगच एखाद्या ‘अधिकारी’ व्यक्तीने आणि आयडिऑलॉजीने बांधून टाकलेले यांना आवडणार होते. आपण आहोत तसेच सगळ्या जगाने जखडलेले असायालाच हवे अशी यांची अपेक्षा असणार होती.
यात गंमत अशी होती की, या सगळ्या कट्टर व्यक्तिमत्त्वाच्या मुलामुलींमध्ये कट्टर उजवे असणार होते यात काही शंका नव्हतीच, परंतु यात पोथीनिष्ठ डावेसुद्धा असणार होते. यात फक्त परंपरावादी असणार नव्हते, यात कट्टरपणे परंपरा न आवडणारे पुरोगामीसुद्धा असणार होते. कट्टरता ही काही कुठल्याही एका प्रकारच्या आयडिऑलॉजीची मिरास नाही!
एल्सी, नाझी जर्मनीमधून आली होती. ती ज्यू होती. विषारी वंशवादाची धार काय असते, हे तिला माहीत होते. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तित्व कसेही असो, तिचे ब्रेनवॉशिंग कसे होते, हे तिने पाहिले होते. परंतु मूलतः व्यक्तिमत्व महत्त्वाचे असतेच, असा तिच्या अभ्यासाचा निष्कर्ष होता.
यासाठी तिने तीन सहकाऱ्यांच्या साहाय्याने ‘द अथॉरिटेरियन पर्सनॅलिटी’ हे पुस्तक लिहिले. तो सामाजिक मानसशास्त्रामधील एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. यात तिने ‘F-Scale’ म्हणजे ‘फॅसिझम स्केल’ तयार केले. म्हणजे एखाद्या व्यक्तित्वामधील फॅसिस्ट प्रवृत्ती मोजण्याची मोजपट्टी! ही प्रवृत्ती कशी मोजायची, तर त्या व्यक्तीचे विविध दृष्टिकोन समजून घेऊन. तिचा अधिकारी व्यक्ती आणि सत्तास्थानांबद्दल काय दृष्टिकोन आहे? त्या व्यक्तीला परंपरेबद्दल काय वाटते? तिला आज्ञाधारक असण्याची किती गरज आहे? तिच्यामध्ये सत्तेसमोर लोटांगण घालण्याची वृत्ती कितपत आहे? आपल्या विरोधी लोकांबद्दल ती व्यक्ती किती आक्रमक होते आहे? सामाजिक गैरसमजांना त्या व्यक्तीच्या मनात किती स्थान आहे? इत्यादी इत्यादी. या प्रश्नांची उत्तरं बघितली की, आपल्या लक्षात येतं की, ही व्यक्ती पुढे जाऊन हुकूमशाहीला बळी पडणार आहे की नाही!
आज आपल्या समाजामधील विविध विचारांचे भक्तगण आपण पाहिले, तर आपल्या लक्षात येते की, या लोकांची फारसा विचार न करता आज्ञा पाळण्याची एक तीव्र अशी मानसिक गरज आहे. हे हुकूमशाहीला शरण गेलेले लोक मुक्त विचार करणाऱ्या लोकांना ‘बंडखोर’ मानतात. यांना विरोधी विचार अजिबात आवडत नाहीत. विरोधी विचार ऐकले की, त्यांचा संताप संताप होतो. आपले वैचारिक विरोधक ‘देशद्रोही’ आहेत, असे यांचे म्हणणे असते. विरोधक म्हटले की, हे लोक विनाकारण आक्रमक होतात. अचानक शिवीगाळ, चारित्र्यहनन आणि अगदी मानसिक-शारीरिक हिंसेवरवरसुद्धा उतरतात.
अल्पसंख्याक समाजांविषयी आणि विविध जातीसमूहांविषयी या लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. आपल्या नेत्यावर टीका झालेली या लोकांना अजिबात सहन होत नाही. ‘F-Scale’वर अतिशय ‘वरच्या दर्जाचे’ गुण प्राप्त करणारे हे लोक असतात. यात उजवे आणि डावे असे दोन्ही ध्रुवावरचे लोक असतात. कट्टरता उजवीकडे कमी आहे की डावीकडे, हा आपण स्वतःच्या अनुभवावर ठरवायचा विषय आहे.
मात्र एल्सीच्या अभ्यासाला एक मर्यादा होती. तिचा हा अभ्यास महत्त्वाचा असला, तरी प्रश्नोत्तरांवर अवलंबून होता. अनेक प्रश्न विचारले गेले होते, त्यांची उत्तरं नोंदवली गेली होती. त्यानंतर ही उत्तरं आणि ती देणाऱ्या लोकांचे राजकीय विचार यांचा मिलाफ घालण्याचा हा प्रयत्न होता. उदा. मला आज्ञाधरकता आवडते असे म्हणणाऱ्या नव्वद टक्क्यांपैकी नव्वद टक्के पुढे जाऊन कट्टर बनले, असे लक्षात आले तर; लहानपणामधील आज्ञाधरकता आणि मोठेपणी दिसून येणारी कट्टरता यांच्यात नाते आहे, असा निष्कर्ष काढायचा! याला शास्त्र म्हणता आले, तरी पूर्ण शास्त्र म्हणता येणार नाही.
एल्सी फ्रेन्केल-ब्रन्सविक १९५८ साली मृत्यू पावली. तिचा अभ्यास पुढच्या संशोधकांच्या वाचनात राहिला, तरी त्याचा पाठपुरावा फारसा कोणी केला नाही. त्यानंतर सुमारे साठ वर्षांनी लिऑर झ्मिग्रॉडला जाणवले की, आपण ‘ब्रेन इमेजिंग’ आणि ‘ब्रेन स्कॅन’ करून जे निष्कर्ष काढतो आहे त्यात आणि एल्सी फ्रेन्केल-ब्रन्सविकने काढलेल्या निष्कर्षांत खूप साम्यं आहेत. झ्मिग्रॉडला काम करायला एक नवे क्षेत्र मिळाले. आता एल्सीच्या काळाच्या मानाने ‘सायकॉलॉजीकल टेस्ट्स’ खूप पुढे गेल्या होत्या, कॉम्प्युटर्समुळे संख्याशास्त्र जास्त जास्त अचूकपणे वापरता येऊ लागले होते, आणि मुख्य म्हणजे टेस्टमध्ये भाग घेणाऱ्या लोकांचे मेंदू विविध तंत्रे वापरून ‘पाहता’ येणार होते.
हुकूमशाही वृत्ती असणाऱ्या लोकांच्या मेंदूमधील अमिग्डाला हा भाग आकारानं छोटा आहे की मोठा, हे आता विविध इमेजिंग तंत्रे वापरून मोजता येणार होते. अमिग्डाला हा भाग भीती वगैरे भावना स्मृती म्हणून साठवतो. हा अमिग्डाला हुकूमशाही वृत्ती असणाऱ्या लोकांमध्ये छोटा असतो की मोठा, हे आता बघता येणार होते. या कट्टर लोकांमध्ये अमिग्डाला गरजेपेक्षा जास्त काम करणारा असतो की कमी, हे अचूकपणे मोजता येणार होते. म्हणजेच, जास्त भित्रे लोक आज्ञापालनाच्या आहारी जातात, की जास्त भित्रे लोक विचारांची जबाबदारी स्वतःवर नको म्हणून कुणा ‘मी अवतार आहे’ असे सांगणाऱ्या नेत्याच्या आहारी जातात? की जास्त भित्र्या लोकांना आपल्या देशामधले अल्पसंख्याक लोक आपला रोजगार, आपला देश आणि आपल्या बायका-पोरी पळवून नेतील, असे वाटत असते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जास्त आक्रमकपणे आणि निश्चितततेनं शोधता येणार होती.
याचबरोबर मेंदूमधील डोपामाईनसारख्या जैवरसायनांचे मेंदूमधील विविध भागांत कसे वितरण आहे आणि किती प्रमाणात आहे, हेसुद्धा आता निश्चितपणे मोजता येणार होते. डोपामाईनच्या या वितरणाचा आणि लोकांच्या कट्टर असण्याचा काही संबंध आहे का, हे बघता येणार होते.
थोडक्यात, एल्सी फ्रेन्केल-ब्रन्सविकचा ‘स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग’वर अवलंबून असणारा अभ्यास लिऑर झ्मिग्रॉडने आता शरीरशास्त्राच्या अभ्यासाच्या संपूर्णपणे शास्त्रीय जगात आणला. प्रश्न तेच होते, परंतु निष्कर्ष काढण्याची साधने अत्यंत आधुनिक होती! Cutting edge techniques!!!
झ्मिग्रॉडचे पुस्तक इथून पुढे हळूहळू खूप तांत्रिक होत जाते. तिने खूप काळजी घेतली आहे, परंतु मेंदूचे संशोधन हा भागच असा आहे की, त्यात तांत्रिक शब्द डोकावत राहतातच! त्यातले तंत्र थोडे दूर ठेवून संशोधन काय आहे आणि त्याच्या मर्यादा काय आहेत हे बघायचे आहे. खरं तर, हे पुस्तक प्रत्येकाने अगदी खोलात जाऊन वाचावे असेच आहे.
सोपेपणासाठी आपण म्हणू शकतो की, झ्मिग्रॉडचे मेंदूचे संशोधन मुख्यतः तीन गोष्टींवर आधारलेले आहे. १) अमिग्डालाच्याबद्दलचे संशोधन, २) प्री-फ्रॉन्टल कॉर्टेक्सबद्दलचे संशोधन आणि ३) डोपामाईन या न्युरोट्रान्समिटरबद्दलचे संशोधन.
झ्मिग्रॉडने नोंदवलेली काही निरीक्षणे पुढीलप्रमाणे आहेत -
१) ज्यांचे विचार कोते, रिजिड आहेत, त्या लोकांचे अमिग्डाला थोडे मोठे आहेत आणि त्या मोठ्या अमिग्डालांमध्ये डोपामाईनचे चलनवलन जास्त आहे, असे दिसून आले.
२) ज्यांच्या प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्समध्ये म्हणजे, पुढच्या मेंदूमध्ये, डोपामाईन जास्त आढळले, त्या लोकांच्या विचारांत लवचीकता दिसून आली.
३) ज्या लोकांच्या मेंदूच्या ‘स्ट्राएटम’ या भागामध्ये डोपामाईन जास्त दिसून आले, ते कोते विचार आणि कोत्या आयडिऑलॉजीमध्ये अडकलेले दिसून आले. (स्ट्राएटम म्हणजे पुढचा मेंदू आणि मध्य मेंदू यांना जोडणारा भाग.)
झ्मिग्रॉड आणि सध्याचे न्युरोसायंटिस्ट कुठल्या दिशेने अभ्यास करत आहेत, हे समजून घेण्यापुरती ही काही उदाहरणं. हे पूर्णपणे शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध झालेले निष्कर्ष नाहीत. एकूण दिशा ही आहे एवढेच!
१७९६ साली आन्त्वान ट्रेसीने आयडिऑलॉजी म्हणजे विचारांचे शास्त्र ही संकल्पना मांडली. मधल्या काळात आयडिऑलॉजी म्हणजे सामाजिक, सांकृतिक आणि राजकीयकरण श्रद्धा हा विचार पुढे आला. याचा परिणाम म्हणून साम्यवादी, फॅसिस्ट आणि नाझी वगैरे हुकूमशाहांची हुल्लडबाजी सुरू झाली. व्यक्तीला वैचारिक आणि भावनिक पातळीवर दाबून टाकण्याचे प्रयत्न झाले. यातून आयडिऑलॉजी म्हणजे फक्त झुंडशाहीच असते की काय असे अनेक विचारवंतांना वाटू लागले. त्यातूनच एल्सी फ्रेन्केल-ब्रन्सविकने १९४०च्या दशकात मुक्त आणि कोत्या व्यक्तिमत्त्वांवर काम केले. आता ट्रेसी आणि एल्सी यांच्या विचारातली शेवटची कडी म्हणून झ्मिग्रॉड काम करत आहे.
तुम्ही उजवे आहात की डावे, यामुळे समाजामधील शांततेचे आणि सौहार्दाचे भविष्य ठरणार नसते. तुम्ही आपल्या विचारांबद्दल किती कट्टर होत जाता आहात, यावर समाजामधील शांततेचे आणि सौहार्दाचे भविष्य ठरणार असते.
तसं बघायला गेलं तर, ट्रेसी, एल्सी आणि झ्मिग्रॉड या तिघांनाही जगाबद्दल तक्रार करायला जागा होती.
आन्त्वान ट्रेसीला रोबेस्पिअरने तुरुंगात टाकले होते. फ्रेंच राज्यक्रांती झाली, तेव्हा रोबेस्पिअर लोकशाहीवादी होता. त्याच्या हातात सत्ता गेल्यावर तो हुकूमशहा झाला. त्याला पराकोटीचा लोकशाहीवादी ट्रेसी आवडेनासा झाला. ट्रेसी गिलोटिन खाली जाणार हे निश्चित होते. त्या परिस्थितीत ट्रेसी लोकशाहीवादी, व्यक्तिवादी राहिला. ट्रेसी गिलोटिन खाली जाण्याआधी रोबेस्पिअरविरुद्ध बंड झाले आणि तोच गिलोटिनखाली गेला. ट्रेसी आपली आयडिऑलॉजी सांगण्यासाठी वाचला. एल्सीने तर स्वतः नाझी अत्याचार पाहिले होते. तिला आपले घर-दार सोडून परागंदा व्हावे लागले होते.
झ्मिग्रॉड स्वतः ज्यू आहे. तिच्या कुटुंबानेसुद्धा नाझी अत्याचार भोगले आहेत, परंतु आपल्याला त्रास झाला म्हणून या तिघांमधले कोणीही सूडाच्या रस्त्यावर गेले नाहीत. तिघेही व्यक्तिवादाच्या, सौम्यतेच्या, व्यक्तिवादी विचारांच्या आणि व्यक्तिवादी विवेकाच्या रस्त्यावर राहिले. आमच्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही आता ‘डोळ्याला डोळा’ आणि ‘दातासाठी दात’ या राक्षसी न्यायाच्या मार्गाने चालणार. अशी भूमिका यातल्या कुणीच घेतली नाही.
हुकूमशाहीच्या आणि सूडाच्या मार्गाने गेले की काय होते, हे इतिहासाने अनेक वेळा दाखवलेले आहे. विवेकी व्यक्तिवादासारखे माणसाचे कल्याण कोणीही करत नाही, हा दाखलासुद्धा इतिहासाने अनेकदा दिलेला आहे. आता इतिहासाने घालून दिलेल्या या धड्यावर संशोधन आणि शास्त्र आपली मोहर उमटवू लागले आहे. न्यूरोसायन्स अजून बाल्यावस्थेत आहे. ते प्रगत होत आहे. आज ज्या गोष्टी संदिग्ध आहेत, त्या हळूहळू सुस्पष्ट होत जाणार आहेत! एक मात्र नक्की की, ही दिशा लोकशाहीसाठी आणि व्यक्तिवादासाठी आश्वासक आहे!!!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
लिऑर झ्मिग्रॉड म्हणते, अतिरेकी विचारांची आणि अतिरेकी वर्तनाची ‘सायकॉलॉजीकल सिग्नेचर’ ओळखता आली पाहिजे. विचारांमधील कोतेपणा, विचारांमधील ‘रिजिडीटी’ ही या अतिरेकी वर्तनाची ‘सायकॉलॉजीकल सिग्नेचर’ असते.
‘रिजिड थिंकर’ कसा असतो, त्याची लक्षणे का,य हे झ्मिग्रॉडच्या पुस्तकामधून परत परत स्पष्ट होत जाते. आपण शेवटी पुन्हा एकदा ‘रिजिड थिंकर’ची लक्षणे पाहू.
१) रिजिड थिंकर कुठलाही बदल मोकळेपणाने स्वीकरू शकत नाही.
२) मानवी आयुष्यामधील अनिश्चितता आणि अस्पष्टता तो झेलू शकत नाही. जेव्हा प्रश्न समोर येईल, तेव्हा बघून घेऊ अशी वृत्ती नसते.
३) रिजिड थिंकर कुठल्या ना कुठल्या आयडिऑलॉजीचा कट्टर समर्थक बनलेला असतो.
४) रिजिड थिंकिंग असलेल्या लोकांमध्ये भावनिक चढउतार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. हे लोक इम्पल्सिव्ह असतात.
५) या लोकांचे सामाजिक विचार आणि यांची सामाजिक मूल्ये प्रतिगामी म्हणावीत इतकी काळाच्या मागे असतात.
इथे एक प्रश्न उभा राहतो. जे लोक ‘रिजिड थिंकर’ आहेत, त्यांना काही आशाच नाहिये का? इथे झ्मिग्रॉड म्हणते की, मेंदूमधील भाग आणि रसायने तुमच्या विरोधात गेले असतील, तरी निराश व्हायचे कारण नाही. ‘फ्लेक्झिबल थिंकिंग’ ही एक सवयसुद्धा आहे. थोडक्यात, ‘रिजिड’ विचार करणारा मेंदू ‘रिजिड’ विचारांएवढा ‘रिजिड’ नसतो. मानवी मेंदू नवनवीन विचार शिकणारा असतो. त्याला ते वातावरण मात्र द्यावे लागते. हळूहळू मुक्तता येत जाते.
असो, इथे ही लेखमाला संपली. झ्मिग्रॉडच्या पुस्तकाला पूर्ण न्याय दिला गेलाय असे म्हणता येणार नाही. तिचे विवेचन खूप विस्तृत, सर्वंकष, शास्त्रीय आहे आणि शास्त्रीय शिस्त पाळणारे आहे. त्याचा सविस्तर परिचय करून देणे अवघड आहे. इच्छुकांनी मूळ पुस्तक वाचावे, असे मी सुचवेन.
एवढे नक्की की, झ्मिग्रॉडचे ‘आयडिऑलॉजीकल ब्रेन’ हे पुस्तक आजच्या हैराण जगात एक आशा जागवत आहे. वैराण दुष्काळानंतर आकाशात पावसाचा एखादा ढग यावा तसे. येत्या पन्नास वर्षांत ‘पोलिटिकल न्युरोसायन्स’चे क्षेत्र अजून अजून प्रगत होत जाईल. ‘नभ मेघांनी आक्रमिले’ अशी अवस्था येईल. त्यानंतरच्या काळात व्यक्तिवादी विवेकशक्तीला आणि मानवी सहिष्णुतेला आव्हान देणे अवघड होऊन बसेल. ना उजवे, ना डावे, ना अतिरेकी राष्ट्रवादी, ना अतिरेकी वंशवादी, कोणीही व्यक्तिवादी विवेकाचा गळा घोटण्याची स्वप्नं बघू शकणार नाही. कोणीही सामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून बनवलेल्या संविधानांचा गळा घोटू शकणार नाही. व्यक्तिवादी संविधानांना तत्त्वज्ञानाने आशीर्वाद दिलेले आहेतच, आता शात्रसुद्धा आशीर्वाद देऊ लागले आहे. लक्षणे तर अतीव सुंदर दिसू लागली आहेत.
..................................................................................................................................................................
या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी पहा -
या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी पहा -
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment