अजूनकाही
ललितलेखक, संपादक आणि प्रकाशक स्वानंद बेदरकर यांचा ‘पावसाच्या गर्भतळी’ हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झालाय. त्याला समीक्षक-प्राध्यापक रणधीर शिंदे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
स्वानंद बेदरकर यांच्या ‘पावसाच्या गर्भतळी’ या कवितासंग्रहात मानवी जगण्याशी निगडित पाऊसरूपे आविष्कृत झाली आहेत. त्यांच्या कवितेत पावसाच्या निर्मितीविषयी कृतज्ञताभाव तर आहेच; परंतु त्याबरोबर पाऊस थेंबांविषयी कुतूहल, पाऊसकल्पिते, पावसाची क्षणभावचित्रे; तसेच पावसाशी निगडित कुटुंबभावचित्रेही आहेत. म्हणूनच वरकरणी ही कविता सोपी, काही वेळा गद्यप्राय वाटावी अशी आहे; मात्र कविमनातील पाऊसरूपांना साद घालण्याचा हा प्रयत्न अनोखा आहे. कवीचे पावसाविषयीचे निरंतर बोलणे वैविध्याने भरलेले अन् भारलेले असल्याने हा पाऊससंवाद विविध प्रकारचा आहे. तो कधी प्रत्यक्षातल्या जगाशी आहे, तर कधी सृष्टीविषयी, तर कधी मनकल्पिताचा. तसाच हा पाऊस स्नेहभावाचा आहे. या पाऊसरूपात पती-पत्नीमधील संवाद आहे. स्वप्नात ‘तो’ पाऊसगावात जाऊन येतो. झोपेतून जागा झाल्यावर ‘तो’ पत्नीसोबत असतो. या जाणीवरूपात कुटुंबवत्सलपणाची भावना आहे.
ओलेचिंबपणाचा प्रकाशसोहळा
बेदरकर यांच्या कवितेत पावसाविषयीची उन्नत आणि उदात्त रूपे आहेत. पाऊस ओंजळीत धरणे जमत नाही आणि आपण पाऊस होऊ शकत नसल्याची भावना यामागे आहे. या पाऊसरूपात आनंदमयता, सुफळता आहे. ओलेचिंबपणाचा हा प्रकाशसोहळा आहे. अंगभर शोभणारी चांदणी गोंदण आहे. नद्यांभोवतीच्या फेरात सजीवलेपणाची जाण आहे. सृष्टी आणि मी एकरूप होण्याची जाण आहे. ‘पाणी-पाणी’ यात सामावलेपण आणि मिसळणीचे तत्त्व आहे. ‘असा अवेळीच कुणी-आळवला गे मल्हार, तिच्या ओलेत्या देहाचा, झाला पाऊस पाऊस’ अशा अवेळी पावसाची ही कविता आहे. पाऊसरूपात विविध भावनांची पडसादरूपे आहेत.
या पाऊसस्मृतीत ज्ञानेश्वरांच्या रुसून बसण्याची व मुक्ताईच्या विश्वासाची आठवण आहे. मुक्ताईच्या डोळ्यांतला पाऊस आणि अमृताचा वर्षाव करणारा ज्ञानेश्वर विराट होत जाण्याचे दर्शन आहे. रुसलेल्या पावसाला ज्ञानेश्वरांच्या विराटत्वाची आठवण करून दिली आहे. पावसाच्या आगमन चाहुलीत गडगडाट आहे, कडाडणे आहे, तृप्त होण्याची भावना आहे. या पाऊसक्रियेत राधा-कृष्णाच्या रासक्रीडेची संभव भावना आहे.
पावसाची ही एकरंगी रूपे नाहीत वा निव्वळ रोमँटिकही. त्यात मानवी जगण्यातील अनेक भावनांची सरमिसळ आहे. तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची पाऊसपाहणी आहे आणि अपराधभावामुळे जीवन संपवल्याची जाणीवदेखील.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पाऊसरूपातील दैवी दर्शन
या पाऊसरूपात अद्वैती भान आहे. जन्म, मृत्यू आणि सर्जनाची रूपे आहेत. कवी, कविता आणि पाऊस रूपातील नाते ‘कवी वळवाचा पाऊस’ या कवितेतून व्यक्त झाले आहे. बेदरकर यांच्या कवितेत संगीत, चित्रानुभव आणि पाऊसरूपे यात एक नाते कल्पिले आहे. मेघमल्हार, रिषभ, षड्जरूपात पाऊस झरतो. चित्रात रेघांनी दाखवलेल्या कलाकृतीतील पाऊस डोळ्यांत साठत जातो. मग यात खरे कोण? चित्र, मल्हार, शिल्प, डोळे की पाऊस असा मूलभूत प्रश्न कवीला पडला आहे. पावसाच्या भरगच्च रूपाच्या पसाऱ्यामुळे पाऊसचित्र आणि गाणं यात काही नाते आहे का, असाही प्रश्न कवी उपस्थित करतो. एका अर्थाने ही पावसाची कुतूहल रूपेच होत.
पावसानंतरचा भवताल कवीला दुष्काळासारखा वाटतो. पावसात ‘हरफनमौला’ मनुष्याकृतीचे त्याला चित्र दिसते. या साऱ्या प्रकटीकरणामागे पाऊसरूपाविषयी गूढता आहे. या गूढतेचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. ‘आकाशाला रंग देण्याचं काम घेईन’ किंवा आकाशा-आकाशातला पाऊस शोधण्याची रूपे या कवितेत आहेत. पावसाच्या निर्मितीविषयी, सर्जनाविषयीची उत्कट आस हा या कवितेचा स्वभाव आहे. पावसाच्या अंकुरण्याविषयी व रुजवण्याविषयीची ही भावना आहे; तसेच या निर्मितीमधील अडथळ्यांची जाणदेखील.
कवितेतील ‘मी’ पाऊस शोधायला देवालयात, गुरुद्वारात, मशिदीत व चर्चमध्ये जातो. तिथल्या उत्सवी वातावरणात तो त्याला तिथे दिसत नाही. तो खिन्न, उदास होऊन बाहेर पडतो, त्या वेळी त्याला तिथे एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे पाऊस भेटतो. या पाऊसरूपात त्याला ईश्वर, साहिब, अल्ला व गॉडचे दर्शन होते. एका अर्थाने हे पाऊसरूपातील दैवी दर्शन आहे.
पाऊस अन् स्त्रीत्वाचे नाते
स्त्रीत्व आणि पाऊस यांच्यात समांतर नाते आहे. ते आहे निर्मितीचे. या नात्याची जाण लोकजीवन व लोकपरंपरेतून वाहत आलेली आहे. पावसाची नवनिर्मिती आणि स्त्रीमधील मातृत्व यांच्यातील हे नाते आहे. ते सुफलनीकरणाचे आहे. ‘पाऊस एकदा शिरला’ या कवितेतून ते साकार झाले आहे. मातृत्व आणि पावसाचे अंकुरणे यात नवनिर्मिती आहे.
‘मोहक फुलासारखा दिसणारा’ या कवितेत पाऊस आणि ‘ती’ या रूपातली जाणीव आहे; कारण पाऊस आणि ‘तिच्या’ निर्मितीत साम्य आहे. ‘तिला’ रुजवण्यासाठी सृष्टीचाच उपहार दिला आहे. ‘ढगांचा इवला तुकडा’ तिच्या केसामध्ये माळावा, असे त्याला वाटते. ‘कोवळ्या उन्हाला कुरवाळत, कुशीत घेत तिच्या गर्भार पोटावर ठेवण्याचा त्याला मोह होतो.’ ही एका अर्थाने सर्जनाची पूजा आहे. तिच्यामधील निर्मितीची उपासना आहे. तिच्या झरणाऱ्या डोळ्यांतला पाऊस पाहून, तिच्या डोळ्यांत जोंधळे होऊन तरारून येण्याची भावना आहे. या कल्पित मनोगतात निर्मितीची पूजा आणि सुफळतेची आस आहे.
या कवितेत पावसाविषयी एक चिंतनशील रूप आहे. पाऊस आणि स्त्रीत्व यात एक नाते कल्पिले आहे. सर्जनशीलता हा दोहोंचा गुणधर्म. या लोकतत्त्वीय धारणांचा आविष्कार या कवितेत आहे; तसेच ‘तो’ आणि ‘ती’मध्ये अंतरदेखील आहे. ‘ती’ निर्मितीशील आहे आणि ‘तो’ मिरवणारा आहे. त्यामुळे या रूपात फरक पडलेला आहे. पाऊस आणि स्त्रीरूपात एकमेळीचे तत्त्व आहे.
मिथकांचे स्मरण अन् चिंतनाचे संदर्भ
चिंतनाचे विविध आविष्कार पाऊसरूपात साधणारी बेदरकर यांची कविता लोकधारणांच्या अंगाने उमलत गेल्याचे दिसते. हा लोकबंध फारच आकर्षकपणे आल्याचे दिसते. पाऊस हे आकाशाचे निर्मितीशील रूप. त्यामुळेच ‘पिकलेला पाऊस प्रकाश देतो. पिकलेला पाऊस मातीत मिसळून जातो’ असा अद्वैती भाव त्यामध्ये आहे; तसेच निर्मिती, विलय आणि पुनर्निर्मितीचे तत्त्व आहे. पाऊससरी आणि मानवी बंधांविषयीच्या जाणिवा काही कवितांमध्ये आहेत. या पाऊससरी आणि मुलीचे बांधलेपण, कष्ट यात वाहतेपणाची जाणीव आहे. पाऊस आणि मुलगी यात एकसारखा गुण कल्पिला आहे. ‘पाऊस काय अन् मुलगी यांचा जन्म घरदार ओलावण्यासाठी’ असे गुणसाधर्म्य कल्पिले आहे.
या पाऊसरूपांत मिथकांचे स्मरण आहे. सरीच्या विणण्यातून गोफ होतो. यात वर्तुळ पूर्ण होण्याची धारणा आहे, तर ‘विठ्ठलाच्या शेजेसाठी शालू रखमाबाईचा’ असा भाव आहे. त्यामुळे बेदरकर यांच्या या पाऊसकवितांना चिंतनाचे विविध संदर्भ प्राप्त झाले आहेत.
द्वंदभावाचे उत्तम चित्रण
या पाऊसरूपात आनंद, भय, निर्मितीची जाण जशी आहे तशीच मृत्यूचीदेखील. यात एक प्रकारची द्वंदरूपकात्मता आहे. ‘पावसाच्या गर्भतळी, अस्तनीच्या गारा’ आहेत. वाऱ्याविना पक्ष्यांनी मान टाकली आहे. ‘सनईच्या दारामध्ये स्मशानाचे गाणे’ आहे. अशी ही द्वंदभावाची जाणीव आहे किंवा ‘ती’ उदात्त, उन्नत, गतिशील, चैतन्यशील आहे. तिचा देह वादळाचा आहे. चालताना तिचे मौन सांडते. तिचे सामर्थ्य अफाट आहे. तिच्या रोमारोमांतून जलनृत्यधारा वाहतात. एक प्रकारे तिच्या सामर्थ्याचे व चैतन्याचे हे चित्र आहे. यामध्ये जन्म-मृत्यू व निर्मितीचे भान आहे.
सर जेव्हा झडते, तेव्हा तिचे आकाशाशी नाते तुटते. ‘घरघर लागलेली, तिचे अडले गं जाते’ यात अंतिम क्षणाचे चित्र आहे. ही सर खुडल्यानंतर तिचे नष्ट होणे आहे. तिचे गंगाजळ होते. त्याच्या दृष्टीने आणि ‘देह सोडताना पान तुळशीचे ओले’, असा हा जन्म-निर्मिती, अस्त, उगम-लय-निर्मिती आस्थाभाव या कवितारूपात आहे.
या प्रकारच्या कविताजाणिवेत एक ताण आहे. तो असा, हा पाऊस मुक्त आणि हरफनमौला आहे. या पाऊसरूपात मानवी चौकटींना स्थान नाही; मात्र दुसऱ्या बाजूला मानवी चौकटी आणि नियंत्रणे आहेत. मुक्त पाऊस आणि विविध चौकटीतले काच यांमुळे त्यात विविध प्रकारचे ताण निर्माण होतात. ‘रांगा लावून आपापल्या भांड्यात, घेता येत नाही पाऊस’ अशा शब्दांत तो व्यक्त झाला आहे.
पाऊस उदात्त आणि उन्नत आहे. त्याला शास्त्रकाट्याचे नियम लावता येत नाहीत. पाऊस आणि सृष्टीरूपे यात स्वतंत्रता आहे. पक्षी, फुलांचे बहरणे, पिसाऱ्यांचे मनमोर फुलतात. तो मनमौजी, बंधमुक्त आहे आणि मानवी जीवन मात्र बंदिस्त आणि जोखडांनी बांधलेले आहे. त्याला कोरडेपणाचा शाप आहे. पाऊस आणि माणूस यात अंतर आहे. माणसे जगत राहतात. हाती अंती काहीच लागत नाही. ‘गच्च मिठीचा पाऊस साजण, आम्हाला सापडत नाही’, अशी ही खंत आहे. पावसाला बदलत्या जगाने शबलित केले आहे. हे जग व्यवहाराचे आहे. ते चौकटींचे आहे. त्यामुळे या तकलादू गती जगात एका रविवारी पाऊस विकला गेल्याची त्याला खंत आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
मर्ढेकरांच्या काव्यजाणिवेशी नाते
जीवनातील रितेपण, एकटेपण व निरर्थकता याची जाण या संग्रहातील काही कवितांमध्ये आहे. अभंगासारख्या रचनाप्रकारातून ती अभिव्यक्त झाली आहे. या निरर्थकतेचे व दिशाहीनतेचे नाते मर्ढेकरांच्या काव्यजाणिवेशी आहे. या रितेपण व रिकामपणाच्या जाणिवेत पाऊसरूपाची प्रतीक्षा आहे. भेगाळल्या भुईची तृष्णापाहणी आहे. ‘फळता फळेना मेघुटाचा गर्भ’ असा हा ‘तहानेचा सर्ग’ आहे.
या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायला हवी, पाऊस हा आहे त्या ठिकाणी एकच आहे; मात्र या पाऊसरूपावर मानवी संज्ञेने जे संस्कार केले, माणसाने पाऊस जसा वाचला तसा रचला. इतरांप्रमाणेच या पाऊसरचिताची ही वेगवेगळी रूपे बेदरकर यांच्या कवितेतून प्रकटली आहेत. त्यामुळे बेदरकर यांच्या कवितेत पाऊसरूप हा केंद्रीय बंध आहे. ‘पावसाच्या गर्भतळा’विषयी व पाऊसरूपांविषयी माणसाला जाणवलेल्या भावरूपाची ही कविता आहे. या कवितेत पहिलटपणाच्या खुणा असल्या, तरी भविष्यात त्यास विविध रंगांचे धुमारे फुटतील असे कविता आश्वासन बेदरकर यांच्या कवितेत आहे.
एकाच विषयाला हजार डोळ्यांनी पाहता येणे हे खरे कविपणाचे लक्षण आहे. ‘पाऊस’ आजवर अनेक भाषांत अनेक कवींनी रेखाटला. अगदी संपूर्ण संग्रहच त्या विषयावरचा असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पाऊसरूपाचा बंध होऊन तो कवितेतून कोसळतो आणि त्याचे नाव ‘पावसाच्या गर्भतळी’ असे सर्जनाशी जोडलेले असते. ही बाब नवा आनंद देणारी आहे.
‘पावसाच्या गर्भतळी’ – स्वानंद बेदरकर । शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक
पाने – ७४ । मूल्य – २०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment