संशोधन सांगतं की, सतत ऑनलाइन व्यवहार/देवाणघेवाण करणारे लोक हळूहळू प्रत्यक्ष व्यवहार करण्यात असमर्थ ठरतात. त्यांच्या ‘सामाजिक क्षमतां’चा ऱ्हास होत जातो!
पडघम - तंत्रनामा
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 15 August 2023
  • पडघम तंत्रनामा सोशल मीडिया Social Media फेसबुक Facebook ट्विटर Twitter इन्स्टाग्राम Instagram

मार्वलच्या सिनेमातील सर्वांत लोकप्रिय पात्र टोनी स्टार्क/आयर्न मॅन हे एका काल्पनिक अमेरिकन व्यावसायिकाचं पात्र आहे. ते स्वतःच्या अतोनात प्रेमात असतं. अर्थात त्याला कारणंही असतात. तो अब्जाधीशाचा एकुलता एक, विलक्षण बुद्धिमत्ता लाभलेला मुलगा असतो. त्याचे आई-वडील त्याच्या लहान वयात अपघातात जातात. टोनी वडिलांचं साम्राज्य स्वत:च्या जोरावर वाढवतो. कमालीचा अहंकारी, स्त्रियांनी वेढलेला, मात्र प्रेमात न अडकणारा टोनी ‘मार्वल अव्हेंजर्स’च्या शेवटच्या सिनेमात जग वाचावं म्हणून स्वत:च्या आयुष्याचं बलिदान करतो.

या पात्राचा हा संपूर्ण प्रवास (आत्मकेंद्रित व्यावसायिक ते समाजासाठी शहीद होणारा) रॉबर्ट डाऊनी जुनिअर या अभिनेत्यानं खूप छान दाखवला आहे.

२०२३मध्ये आपल्यापैकी बहुतेक जण या टोनीप्रमाणे आत्मकेंद्री आयुष्य जगत आहेत. त्याला अर्थात आपण ज्या अर्थव्यवस्थेत राहतो, ती जबाबदार आहे. ‘ECONOMICS ARE THE METHOD : THE OBJECT IS TO CHANGE THE SOUL’ असं ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थेचर यांनी ८०च्या दशकात म्हटलं होतं. ते एकप्रकारे ८०९०च्या दशकांतून २१व्या शतकात आल्यावर जो सामाजिक बदल झाला, त्याचंही चपखल वर्णन आहे. २०००च्या सुरुवातीपासून तंत्रज्ञान वायूच्या वेगानं बदलत आहे, प्रगत होत आहे. हे तंत्रज्ञान जग जवळ आणेल, असं वाटत असताना प्रत्यक्षा त्यामुळे मानवी समाज दुभंगतच चालला आहे.

१९९८मध्ये गुगल, २००४मध्ये फेसबुक आणि २०१०मध्ये इन्स्टाग्राम हे २१व्या शतकातील संवादाचे मैलाचे दगड मानवी विसंवाद वाढवायला कारणीभूत ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत वाढलेला द्वेष, हिंसा, नात्यांतील विसंवाद आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न, यासाठी आपल्या सर्वांचा वाढलेला आत्मकेंद्रितपणा आणि संपलेलं सामाजिक भान कारणीभूत आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

विरोधाभास वाटेल, पण याच काळात ‘भावनिक साक्षरता’ हा विषय खूप लोकप्रिय झाला. त्यावर बरंच संशोधनही झालं. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तर यावर खूप कार्यशाळा घेतल्या जातात. ‘भावनिक बुद्धिमत्ता’ या विषयात डॅनियल गोलमान यांचं काम फार मोठं आहे. त्यांच्या मते भावनिक बुद्धिमत्तेचे दोन पैलू आहेत-

१) आत्मभान व स्व-व्यवस्थापन : आत्मभान म्हणजे स्वतःची बलस्थान ओळखणं, त्यानुसार प्रयत्न करणं, आत्मविश्वासानं काम करणं आणि स्वत:च्या भावना समजून वागणं.

२) समाज भान व नातेसंबंध-व्यवस्थापन : यात समाज मान्य गोष्टी करणं, नातेसंबंध जोडणं-निभावणं आणि सहसंवेदना बाळगणं.

या दोन पैकी ‘स्व’चा विकास हा आजच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. एडवर्ड बर्नेस या ‘प्रोपगंडा’च्या किमयागारानं अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धांनंतर औद्योगिक वाढीसाठी जी शक्कल लढवली होती, ती आज भारतात वापरली जात आहे. आपण ‘माणूस’ नसून ‘ग्राहक’ आहोत, हे अमेरिकेच्या मनावर ठसवणाऱ्या बर्नेसमुळे ‘work hard, party harder’ची संस्कृती रुजली. ती अमेरिकन माध्यमांनी गेल्या १०० वर्षांत विविध माध्यमांतून जगभरात नेली.

ग्राहक हा देव आहे, कारण त्याच्या खिशातून पैसा काढायचा आहे. त्यामुळे आपण ‘देव’च आहोत, या भ्रमात त्याला सतत ठेवायचं, म्हणजे तो पैसे कमवणार व खर्च करत राहणार. हा भ्रम कसा वाढवायचा, यावर ‘ग्राहक मानसशास्त्र’ काम करतं. या शास्त्राचा उपयोग करत अमेरिकेनं जगाला ‘प्लेबॉय’ मासिक ते पॉर्न साईट्स, असं सर्व विकून गडगंज नफा कमावला.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

सर्वच वयोगटांत आक्रमकता व हिंसा याचं प्रमाण वाढलं आहे. परंतु वाढत्या वयातील मुलं-मुली यांच्यातलं गुन्ह्यांचं प्रमाण चिंताजनक आहे

२०००च्या सुरुवातीला आयटीमध्ये काम सुरू केलेल्या पिढीने आयुष्यात नक्की काय मिळवले? गुलामगिरी!

भारतात कामाच्या ठिकाणच्या मानसिक आरोग्यावर अजूनही पुरेसं शास्त्रोक्त पद्धतीचं काम झालेलं नाही. भारतीयांच्या अ-वैज्ञानिक दृष्टीकोनसुद्धा यासाठी कारणीभूत आहे

लोक खूप आहेत, पण नाती नाहीत, ही भारतीयांची शोकांतिका आहे. तुम्हाला लाखो-करोडो रुपये किंवा सोशल मीडियावरचे लाखो-करोडो Followers आनंद देऊ शकत नाहीत!

.................................................................................................................................................................

गुगल व इतर अनेक साईट्समुळे आपला डेटा - ज्यात आपल्या आवडीनिवडी, प्राधान्य असतात - वापरून आपल्याला लुभावणाऱ्या असंख्य गोष्टी आपल्या स्क्रिनवर नाचत असतात. या सर्व ‘customized’ असतात, म्हणजे माझ्या फेसबुकची टाइमलाईन अगदी माझ्यासारख्याच आवडीनिवडी असणाऱ्या इतर अनेकांच्या टाइमलाईनपेक्षा नेहमीच वेगळी असते. ती मला व आपल्यापैकी प्रत्येकाला ‘आपण काहीतरी विशेष आहोत’ची अनुभूती 24x7 देते. त्याला कोणीच ‘स्पेशल’ म्हणत नाही. ज्यांचे दोन वेळच्या खायचे वांधे आहेत, ज्यांना मुलींकडून नकार येतो, अशा पुरुषाला हवं ते शोधून देणारं गुगल/फेसबुक/इन्स्टाग्रामचं व्यसन लागेलच, कारण या साईट्ससाठी तो ‘विशेष’ आहे. सोशल मीडियाचे ‘अल्गोरिथम’ लोकांच्या इगो/अहंकाराला मसाज करत राहतात. त्यामुळे त्यावर ‘सनसनीखेज’, पण टुकार कन्टेन्ट टाकत फॉलोअर्स मिळवणं आणि इन्फ्ल्युएन्सर होणं, हे मानवी मेंदूला कोकेनसारख्या अंमली पदार्थाची नशा देतं.

यावर तुम्ही म्हणाल की, आपण तर लोकांशी कनेक्ट होतो, त्याचं काय?

मानवी मेंदू समोरासमोरच्या, प्रत्यक्ष शाब्दिक व अशाब्दिक देवाणघेवाणीसाठी तयार झाला आहे. उत्क्रांतीमुळे आपली रचनाच अशी आहे की, समोर दिसणाऱ्या व्यक्ती आपल्या मेंदूत रजिस्टर होतात. मेंदूला अजूनही ऑनलाईन संवाद कळत नाही. oxytocin नावाचं मेंदूतील रसायन प्रत्यक्ष व्यक्तीच्या देवाणघेवाणीत स्त्रवतं. त्यामुळे सामाजिक बांधीलकी व संलग्नता विकसित होते.

हीच पद्धत गेली हजारो वर्षं चालू आहे. यातूनच जोडीदार निवडणं, आर्थिक देवाणघेवाण, असे अनेक मानवी व्यवहार आकाराला आले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर होत असलेली देवाणघेवाण ही आभासी असून, त्यातून आपल्या मेंदूला ‘डोपामीन’ मिळतं, oxytocin नाही. म्हणून ऑनलाईन नात्यांना प्रचंड मर्यादा आहेत. त्यावर विश्वास ठेवत असंख्य लोक फसली आहेत, फसत आहेत.

ऑनलाईन ओळख होऊ शकते, पण त्यावर विश्वास ठेवत लगेच कोणताही मोठा निर्णय घेणं जीवघेणं ठरतं. या डोपामिन अर्थव्यवस्थेचा आपण सर्वच अविभाज्य अंग आहोत. ही अर्थव्यवस्था आपल्याला इतरांच्या जवळ आणायचं आमिष दाखवत आपल्यातील ईर्ष्या, मत्सर भावना तेवत ठेवते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

इतरांचं यश बघत आपल्याला किती वेळा आनंद होतो? किती वेळा आपण मनापासून दाद देतो? माझी पोस्ट लाईक केली, तर मी त्याची/तिची पोस्ट लाईक करणार; माझं काम होत असेल, तरच मी ते कन्टेन्ट ‘प्रमोट’ करणार… या भावनेतून सोशल मीडियाचे व्यवहार चालतात. आपलं सामाजिक भान किती कमी झालं आहे, याचं उदाहरण म्हणून मणिपूरच्या घटनेकडे पाहता येईल. एका निर्भयासोबत जे झालं, त्यासाठी २०१२मध्ये रस्त्यावर उतरणारा आपला देश मणिपूरमधील अनेक स्त्रियांसोबत झालेल्या अत्याचारावर कसा आणि किती व्यक्त झाला?

वाढणारे घटस्फोट, अविवाहीत, एकटी राहणारे लोक हीदेखील या डोपामिन अर्थव्यवस्थेची देणगी आहे. या अर्थव्यवस्थेमुळे जगातील बहुतेक संपत्ती एक टक्का श्रीमंतांकडे जमा झाली आहे आणि उरलेले ९९ टक्के लोक डोपामिनच्या आधारे आयुष्य जगत आहेत. हेच कारण आहे की, जगात व्यसनांचं प्रमाणदेखील चिंताजनक आहे. संशोधन सांगतं की, कोणतीही व्यक्ती जितकी एकटी असेल, तितक्या लवकर ती व्यसनाला जवळ करते. पोर्तुगाल व स्वित्झर्लंड या देशांत व्यसनमुक्तीसाठी औषधांसोबत व्यसनाधीन व्यक्तीला जोडीदार व उत्पन्नाचं साधन मिळेल, याची सरकारने व्यवस्था केली आहे. त्यामुळे हे देश व्यसनांच्या विळख्यातून बाहेर पडलेत. हे पहा -

https://www.cbc.ca/news2/interactives/portugal-heroin-decriminalization/

अशा व्यसनाधीन एकलकोंड्या समाजात सामाजिक चळवळीदेखील कमी असतात. म्हणून गेल्या वीस वर्षांत भारतात कामगार संघटना, वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांसाठी लढणारे गट, साम्राज्यवादावर लिहिणारे लोक नाहीसे होत गेलेले दिसतात. याला जबाबदार आहे- आपलं नाहीसं होत असलेलं सामाजिक भान.

‘What's in it for me?’ हे सगळ्या अमेरिकन धर्तीच्या व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातून शिकवलं जातं. त्यामुळे आपल्याला काही मिळत असेल, तरच आपण दुसऱ्यासाठी काही करायचं, अन्यथा नाही, हे २१व्या शतकातील तत्त्वज्ञान मानवी नैसर्गिक उर्मीच्या विरुद्ध आहे. महात्मा गांधींना सहसंवेदना होती, म्हणून त्यांनी भारताच्या बहुसंख्य गरीब जनतेसारखं राहणं पसंत केलं. आज भारतात कोणी रस्त्यावर वेदनेनं तडफडत असेल, तर लोक त्याचा व्हिडिओ काढतात, पण मदत करत नाहीत, हे भीतीदायक आहे.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

जे लोक केवळ बाह्य रूपावरून आपल्याला ओळखतात, ते खरंच आपले हितचिंतक आहेत का, हे प्रश्न स्वत:ला आपल्या व समाजाच्या हितासाठी विचारणं गरजेचं आहे

लोकांना जवळ आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सोशल मीडिया’ने आपल्यातील नकारात्मक भावनाच चेतवल्या व वाढवल्या आहेत...

आभासी युगातील सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे, तिथं आपलं शरीर व मन कुणालाही दिसत नाही. जे दिसतं, ते फक्त ‘curated profile’!

सामाजिक वीण जोडणं आवश्यक आहे. नाहीतर ब्रिटन, जपान यांच्या धर्तीवर आपल्या देशातही जनतेतला एकटेपणा घालवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आणि मंत्री नियुक्त करावे लागतील!

.................................................................................................................................................................

अशा आत्मकेंद्रित समाजाला स्वतःच्या तालावर नाचवणं, हे सत्ताधारी राजकारण्यांसाठी सोपं आणि सोयीचं ठरतं. कारण अशी जनता आपल्याविरुद्ध एकत्र येणं शक्य नाही, याची काळजी सरकार घेतं. सोशल मीडियावर निषेध नोंदवणारे बहुतेक जण डोपामिनच्या नशेत असतात आणि ती कधी रस्त्यावर उतरणार नाही, हे सत्तेला माहिती असतं. कारण समोरासमोर बोलायला हिंमत लागते, अगदी फोनवर बोलायलादेखील.

स्क्रीनवर अत्यंत अभ्यासू वगैरे वाटणारे लोक प्रत्यक्षात अत्यंत वेगळे असू शकतात, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. सोशल मीडिया हा अनेक वेळा भावनिक विरेचनासाठी सोपा मार्ग ठरतो. जे लिहिलं जातं, ते त्या व्यक्तीच्या अनुभवाचा भाग असेलच असं जरुरीचं नाही. ते बऱ्याच वेळा ‘कॉपी-पेस्ट’ केलेलं असतं.

परदेशात राहणारी पण सोशल मीडियावरून द्वेष पसरवणारी मंडळी कोणत्याही पक्षाची असू शकतात. त्यांच्यासाठी हा एक विरंगुळा असतो, कारण ते भारतात परत येणार नाहीत, पण त्यांनी पसरवलेल्या द्वेषाच्या आगीत जळणारी आपलीच घरं व शेजारी असतात. सरसकट एका समाजाला (जात/धर्म) एकाच रंगात रंगवून सोशल मीडियावर भांडणाऱ्या लोकांच्या आयुष्यात कधीच दुसऱ्या जातीची/धर्माची मंडळी येत नसतील?

परदेशातील जी मंडळी सतत ऑनलाईन देशभक्तीचे धडे देतात, त्यांनी गांधी-नेहरू यांच्यासारखं परदेश सोडून भारतात परत यावं आणि देश उभारणीस हातभार लावावा, किंवा किमान तिथंच भारतीयांमध्ये जाऊन काम करावं. पण ते होताना दिसत नाही, कारण त्यातून पुरेसं डोपामिन मिळत नाही.

यामध्ये पैसे घेऊन काम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर आहेत. एका सोशल मीडिया पोस्टमुळे लिहिणाऱ्याचं चारित्र्य व कुळाचा उद्धार करणार्‍यांची विचारशक्ती किती असेल, पण दुर्दैवानं अशीच अविचारी जनता बहुसंख्य आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

सोशल मीडियाचा अल्गोरिथमदेखील या दुभाजनास कारणीभूत आहे. अमेरिकन सोशल मीडिया कंपन्यांनी ‘बहुजन अल्गोरिथम’, ‘ब्राह्मण अल्गोरिथम’ असं प्रोग्रॅमिंग तयार केलं असावं, अशी शंका यायला वाव आहे. आपण ज्या जातीचे/विचारसरणीचे आहोत, त्याविषयीचाच कन्टेन्ट आपल्या टाइमलाईनवर दिसण्याची सोय या तंत्रज्ञान कंपन्यांनी केली आहे. अशा परिस्थितीत सामाजिक एकी कशी होणार? सोशल मीडियावर ‘पुरोगामी’ म्हणून मिरवणारे बहुतेक जण जात पाळतात, जातीत लग्न करतात आणि जातीच्या अल्गोरिथममध्ये राहतात.

सामाजिक बदल हा ऑनलाईन घडून येऊन शकत नाही, त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं, असं जगाचा इतिहास सांगतो. सोशल मीडियावर एरवी काहीही कुवत नसलेले, मात्र राजकीय पोस्ट, सनसनीखेज पोस्ट करत ५-१० हजारांवर फॉलोअर्स गेलेल्या बहुतेकांमध्ये अहंकार येतो. अशा मंडळींना पत्रकार, सिनेमा, खेळ व राजकारण अशा क्षेत्रातील दिग्गज मंडळी फॉलो करतात, कौतुक करतात. त्यामुळे ‘स्व’बद्दल गैरसमज आणखी वाढतात. एकंदरीत आभासी जगातील हा जीवघेणा खेळ आहे. तो अशा मंडळींच्या प्रत्यक्ष आयुष्याला धोक्यात टाकतो आणि ही मंडळी एका लूपमध्ये फिरत राहतात. ज्यातून बाहेर येणं अशक्य होतं. आणि भानावर आल्यावर आपण कोण आहोत, याची बोचरी जाणीव होते… ती हाताळायला अवघड जाते.

प्रत्यक्ष आयुष्यात काही करून, ते सोशल मीडियावर टाकणं, त्यावर एखाद्या चांगल्या हेतूसाठी काम करणं, अंगी असलेली कला सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत नेणं आणि कुवत नसताना सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर होणं, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सोशल मीडियावर होणार्‍या टोकाच्या कौतुकामुळे व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. त्यात दोष असल्यास, ‘स्व’ची नीट जाणीव नसल्यास स्वत:ला श्रेष्ठ समजणं आणि इतरांना तुच्छ लेखणं, हे फोलोअर्स व लाइकमुळे होतं. मात्र अशांची प्रत्यक्ष काम करायच्या वेळी पंचाईत होते.

संशोधन सांगतं की, सतत ऑनलाइन व्यवहार/देवाणघेवाण करणारे लोक हळूहळू प्रत्यक्ष व्यवहार करण्यात असमर्थ ठरतात. त्यांच्या ‘सामाजिक क्षमतां’चा ऱ्हास होत जातो. नैसर्गिक प्रवृत्तीच्या विरुद्ध गेल्यानं नैराश्य, चिंता, आत्महत्या अशा मानसिक आरोग्यासंबंधीचे विकार भारतीय समाजात वाढत चालले आहेत. हे पहा - 

https://thelogicalindian.com/mentalhealth/mindless-scrolling-how-social-media-overdose-leads-to-depression-stress-and-anxiety-among-adolescents-31542

सोशल मीडिया हा वाढत्या वयातील मुला-मुलींसाठी जास्त धोकादायक असतो, कारण ‘स्व’ची वाढ, सामाजिक संबंध आणि नव्या ओळखी, याच काळात निर्माण होतात. सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे गेल्या काही वर्षांत या वयातील मुला-मुलींचे मानसिक आरोग्याचे प्रश्न प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. ‘टायटॅनिक’मधील केट विन्सलेट या अभिनेत्रीने सोशल मीडियाचा वाढत्या वयातील मुलामुलींवर होणार्‍या परिणामावरील एका डॉक्युमेंटरीमध्ये काम केलं आहे.

ऑनलाईन संवादात एखाद्या व्यक्तीबद्दल एक टक्का माहिती मिळू शकते, कारण प्रत्यक्ष बोलल्याशिवाय/बघितल्याशिवाय आपण काहीच निष्कर्ष काढू शकत नाही. पण हे अनेकदा मोठ्यांनासुद्धा कळत नाही, मग वाढत्या वयातील मुला-मुलींचं काय होत असेल?

भावनिक साक्षरतेतील ‘स्व’ हा समाज या घटकाशिवाय रुजणं, वाढणं व टिकणं अशक्य आहे. मानवी समाज प्रत्यक्ष देवाणघेवाणीतून आकारास आला आहे. त्याला नैसर्गिकरित्या पुढे जायचं असेल, विकसित व्हायचं असेल, तर सोशल मीडियाच्या भुलभुलैयात न रमता, प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करावं लागेल.

आपलं कुटुंब, आपली वसाहत, आपलं ऑफिस, आपली शाळा/विद्यापीठ, आपलं शहर, आपलं राज्य, आपला देश आणि आपण जिच्या हवेत श्वास घेतो, ती पृथ्वी, हा आपला समाज आहे. या सर्वांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे, तरच ‘वसुधैव कुटुम्बकम्‌’ला अर्थ आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख