जे लोक केवळ बाह्य रूपावरून आपल्याला ओळखतात, ते खरंच आपले हितचिंतक आहेत का, हे प्रश्न स्वत:ला आपल्या व समाजाच्या हितासाठी विचारणं गरजेचं आहे
पडघम - तंत्रनामा
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 27 January 2022
  • पडघम तंत्रनामा टायगर वूड्स लैंगिक व्यसन sex addiction

“Sex is an emotion in motion.”
― Mae West

टायगर वूड्स हा जगातील सर्वांत श्रीमंत व प्रसिद्ध गोल्फ खेळाडू. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. विवाहित वूड्सच्या लैंगिक साहसकथा अचंबित करणाऱ्या आहेत. २००९मध्ये या सर्व सुरसकथा बाहेर पडल्या, तेव्हा त्यांनी त्याच्या वैवाहिक व व्यावसायिक आयुष्यात अनेक वादळं उठवली. त्यातून सावरायला वूड्सला पुढची १० वर्षं लागली.

अविश्वसनीय नैसर्गिक प्रतिभेचा धनी असलेल्या वूड्सने चालता यायच्या आधीपासून गोल्फ खेळायला सुरुवात केली होती. सुरुवातीपासून सतत जिंकण्याची सवय असल्यानं भावना कशा सांभाळाव्या, हे त्याला बहुधा कळलं नाही. त्याचबरोबर त्याने व्यावसायिक ताण, दबाव आणि कदाचित लग्नातून न मिळू शकलेली पण गरजेची असलेली भावनिक जवळीक शोधण्याच्या आणि आणखी ‘हाय’ (high) मिळवण्याच्या नादात अनेक स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवले. एवढं यश, पैसा व सर्व प्रकारचं सुख असताना वूड्सला दुर्बुद्धी का झाली असावी? माझ्यापाशी जे होतं, ते मला पूर्णपणे उपभोगायचं होतं, असं त्याने त्याच्या माफीनाम्यात सांगितलं आहे.

टायगर वूड्समुळे ‘लैंगिक व्यसना’ (sex addiction)ची जगभर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

लैंगिक सुखाच्या व्यसनासोबत वूड्सला दारू व झोपेच्या गोळ्यांचंसुद्धा व्यसन होतं. परिणामी त्याचं लग्न तुटलं, बदनामी झाली आणि मनस्ताप भोगावा लागला. या सगळ्यामुळे त्याच्या आयुष्याची महत्त्वाची वर्षंही वाया गेली.

हे सर्व कशामुळे झालं, तर ‘फ्यार’मुळे!

अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जीयाँ’ या सिनेमानमुळे ‘फ्यार’ हा नवीन शब्द आपल्या शब्दकोशात दाखल झाला आहे. हुशार लोकांना ‘फ्यार’ म्हणजे काय हे सांगायची गरज नाही. ‘प्यार ते फ्यार’ हा स्त्री-पुरुष नात्याचा प्रवास रोचक, पण काहीसा भीतीदायक आहे.

कॅज्युअल-सेक्स (casual sex), वन-नाईट स्टँड (one-night stand), फ्रेंडस विथ बेनिफिटस (friends with benefits), एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअर्स (extra-marital affairs), गिगलोज (gigolos), हे शब्द आता मध्यमवर्गासाठी नवे राहिलेले नाहीत. पडद्यावर व आपल्या आजूबाजूला नर-मादी हे आदिम नातं भेसूर व ओंगळवाण्या स्वरूपात दिसू लागलं आहे. आपल्या सगळ्यांच्या मेंदूवर जाणूनबुजून अशा गोष्टींचा मारा केला जात आहे की, त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडे केवळ (स्त्री वापुरुष) उपभोगाची वस्तू म्हणूनच बघण्याची आपली नजर तयार होतेय. यालाच ‘ब्रेन कन्झुमॅरिझम’ किंवा ‘चंगळवादासाठी तयार होणं’ असं म्हणता येईल.

अशी नजर घेऊन भेटणाऱ्या व आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपलं नातं, हे आदिम गरजांवर आधारित म्हणजे लैंगिक गरजांवर आधारित तयार होतं, ज्यात भावनिक ओलावा राहत नाही.

असं शक्य आहे का? असं झालं तर काय होईल?

मेंदूवरचा ताबा गेलेल्या आणि sexual fantasyमध्ये रममाण झालेल्या कितीतरी व्यक्ती भारतात दिसू लागल्या आहेत. लैंगिक हिंसाचार, लैंगिक संबंधातून होणारे गुन्हे, बलात्कार, लैंगिक शोषण या संदर्भातल्या बातम्या भारतातल्या जवळपास सगळ्या राज्यांतून ऐकायला\वाचायला मिळतात.

लैंगिक गरज ही तशी मूलभूत गरजांपैकी आहे. अन्न, पाणी व हवा या मूलभूत गरजांप्रमाणे तिची तृप्ती आवश्यक आहे, परंतु दुर्दैवाने लैंगिक गरजेची एकंदर नैसर्गिक रचना अशी आहे की, अन्नाप्रमाणे मानवी मेंदूचा ताण कमी करण्यासाठी तिचा उपयोग होतो. म्हणून बरेच जण दारू, तंबाखू व अन्न याप्रमाणे लैंगिक सुखाकडेही ‘coping mechanism’ म्हणूनच पाहतात. coping mechanism म्हणजे एखाद्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी शोधलेला सोयीचा मार्ग. त्यामुळे तात्पुरता आराम वाटतो, पण भावनिक पोकळी भरून येत नाही. परिणामी समस्या कमी होण्याऐवजी वाढतात.

खालीपन ते सूना सूनापन हैं

बड़ी बेचैनी ते कालापन हैं

तन रूह काँप रही

मौत कहीं आलाप रही

गल्ला सुख दा, साह रुक दा

परान मेरे खिचदा, खिचदा

कित्ते गेम ख़तम ना हो जावे

मैं ख़ुद से ही अब लुकता छिपता हाँ..

‘उड़ता पंजाब’ या सिनेमातल्या एका गाण्यातली ही कैफियत कोणत्याही व्यसनी व्यक्तीची मदतीची याचना वाटते. दारू, तंबाखू, अन्न, व्हिडिओ गेम, पॉर्न, सोशल मीडिया ते वेदनाशामक गोळ्या, असं कशाचंही व्यसन असू शकतं. सर्व व्यसनात मेंदूचं कार्य एकाच प्रकारे चालतं. कोणत्याही व्यसनाचा हेतू भावनिक दुःख बधिर करणं व शरीर सुरू ठेवणं हाच असतो.

सेक्सच्या व्यसनात पॉर्नचं व्यसनही येतं. अनेकदा व्यसनं समूहानं येतात. दारू व इतर अंमली पदार्थांच्या सेवनानं लैंगिक उत्तेजना कैक पटीनं वाढते. त्यामुळे दारू किंवा इतर अंमली पदार्थांचं व्यसन करणारे लोक ‘अतिलैगिंकता’ (hypersexuality) अनुभवतात. त्यातून बऱ्याचदा सक्तीच्या लैंगिक सुखाची चटक लागते.

लैंगिक सुखाचं व्यसन असलेली व्यक्ती ते सुख वारंवार अनुभवूनदेखील दु:ख, पश्चाताप, भीती व एकटेपणा या भावना अनुभवते. अशांच्या ‘स्व’च्या कल्पना केवळ लैंगिक सुख अनुभवणं आणि त्या संबंधित गोष्टींशीच निगडित असतात. उदा. ‘मी इतक्या स्त्रियांशी संग केला तर मी ‘पुरुष’ आहे’, ‘पुरुषत्व सिद्ध करायला मी एका स्त्रीशी निष्ठावान राहण्याची गरज नाही’, अशा व यांसारख्या भ्रामक कल्पना सेक्सच्या व्यसनासाठी कारणीभूत ठरतात. bipolar disorderमध्ये दोन अवस्था असतात, त्यातील अति-उर्जिता या अवस्थेत ती व्यक्ती अति प्रमाणात लैंगिक उत्तेजना अनुभवते.

वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्यावर सेक्सचा होणारा भडिमार हासुद्धा त्याचं व्यसन वाढवायला कारणीभूत ठरत आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये लैंगिकता किंवा कामुकता शोधणं ही मेंदूची विकृत अवस्था आणायला माध्यमं मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होत आहेत. जाहिरातींतून खुबीनं वेगवेगळे आकार लैंगिक अवयवाशी मिळतेजुळते दाखवत लोकांना लैंगिक अवयव, कामुकतेशी संबंधित खुणा दिसतील, अशी स्थिती मुद्दाम निर्माण केली जात आहे. (‘Where is your stick’वाली मॅग्नम आईस्क्रिमची जाहिरात आठवा.) ‘पॉर्न उद्योग’ एक ट्रिलियन डॉलर्सच्या वर जाऊन पोहचला आहे!

या जाणूनबुजून एखादी गोष्ट सतत निर्माण करण्याचा किंवा तिचा भास तयार करत राहण्याचा सर्वांत मोठा परिणाम वाढत्या वयातील मुला-मुलींवर होत आहे. गेल्या दोन वर्षांत करोनामुळे घरून मोबाईल/कॉम्प्युटरचा वापर करत शिकणारी कितीतरी मुलं-मुली पॉर्न उद्योगाचं सगळ्यात मोठं टार्गेट ठरली आहेत. सिगमंड फ्राईडच्या म्हणण्यानुसार हिंसा व लैंगिकता या आदिम प्रेरणेवर मानवी वर्तणूक आधारित आहे. या तत्त्वाचा वापर करून फ्राईडच्या भाच्यानं, Edward Bernaysने अमेरिकेत अगदी सिगरेटपासून न्याहारीची कल्पना विकली. त्याला प्रपोगंडाचा जनक मानलं जातं. त्याच्यापासून सुरू झालेली ‘sex sells’ची कल्पना संपूर्ण जगात वेगानं पसरली. ‘प्ले-बॉय’ या नियतकालिकाचा कर्ता-करविता Huge Hefnerसारख्या लोकांनी अमेरिकेत मुक्त लैंगिक-क्रांतीची सुरुवात केली. त्यामुळे आज पॉर्न उद्योगानं अक्राळविक्राळ रूप धारण केलं आहे. परिणामी लैंगिक संबंध शरीरापुरते व शारीरिक गरज शमवण्यासाठी असून त्यात भावना नकोत, हा समज दृढ होत गेला.

दारू, अंमली पदार्थ व जुगार यांमुळे मेंदूत स्रवणारं डोपामिन हे आनंदाचं रसायन लैंगिक अनुभूतीतूनही मिळतं, पण मानवी नात्यांना जोडायला व टिकायला आवश्यक असणारी ओढ, सुरक्षितता, निष्ठा व प्रेम, या भावना अशा नात्यांतून अनुभवता येत नाहीत. काही विशिष्ट आकार बघून एखाद्याला जोडीदाराचे ‘केवळ’ लैंगिक अवयव आठवत असतील, तर त्या नात्याचा शेवट हिंसेतच होतो.

आपल्याकडे अमेरिकेप्रमाणे लैंगिक अनुभव घेण्याचं वयसुद्धा खूप खाली आलं आहे. हल्ली १२-१३ या वयोगटातील मुला-मुलींचं लैंगिक ज्ञान प्रौढांपेक्षा जास्त असतं. त्यांच्यातलं गरोदर राहण्याचं, एड्स व इतर लैंगिक संसर्गजन्य आजाराचं प्रमाणही चिंताजनक होत चाललं आहे. सोशल मीडिया व इतर माध्यमांतून होणारं मेंदूचं नियंत्रण भीतीदायक म्हणावं असंच आहे. सिनेमा व टीव्ही यामध्ये सावळा रंग दिसत नाही. रेखा, स्मिता पाटील, काजोल, राणी मुखर्जी, सुश्मिता सेन, बिपाशा बसू, अशा यशस्वी अभिनेत्री पडद्यावर लोकप्रिय असल्यानं सावळ्या रंगाला मान्यता होती, पण गेल्या काही वर्षांत पॉर्नमुळे विशिष्ट पद्धतीचा त्वचेचा रंग, आकार व मेकअप यांचा आपल्या मेंदूवर मारा केला जात असल्यानं अनैसर्गिकरित्या त्वचेचा रंग पांढरा करून घेणं, शरीराच्या अवयवांचा आकार बदलणं, वेगवेगळ्या पद्धतीची कॅमेरा फिल्टर वापरून sexually desirable प्रतिमा तयार करणं, यांसारख्या गोष्टींमुळे सामान्य मुली व स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. काजोलसारख्या प्रतिभावान अभिनेत्रीनेसुद्धा त्वचेचा रंग बदलून घेतला आहे, मग इतर सामान्य स्त्रियांचं काय होत असावं?

समाज म्हणून आपण गेल्या १० हजार वर्षांत जे मिळवलं आहे, ते गेल्या काही वर्षांपासून केवळ लैंगिक सुख, हिंसा व सहसंवेदनेचा अभाव या आदिम भावनांच्या आहारी जाऊन आपण घालवत आहोत. भारतीय समाजातील ठरवून जाती-धर्मांत झालेली लग्नं ही याच सूत्राला धरून असतात. त्यात वंश चालवण्यासाठी स्त्री-पुरुष एकत्र येतात… शरीराची गरज कायदेशीररित्या शमवणं हा भाग सगळ्यात मोठा असतो. अशा कोंडलेल्या नात्यात असणारे लोक मग मजा म्हणून, बदल म्हणून लैंगिक सुखासाठी दुसरे मार्ग शोधतात. जे लोक जिमला नेहमी जात असतील त्यांच्या हे लक्षात येत असेल की, बरेच पुरुष व स्त्रिया जिममध्ये निव्वळ ‘टाईमपास नाती’ शोधतात. जवळीक/सलगी (Intimacy) नसणारी नाती व शारीरिक संबंध यंत्रवत असतात, त्यांचा शेवटही सहसा चांगला नसतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

एकातून दुसऱ्या, दुसर्‍यातून तिसर्‍या नात्यात आनंद शोधणारी मंडळी मनातील पोकळी भरून निघावी, यासाठी सगळा आटापिटा करतात. लैंगिक सुख विकत घेणाऱ्या लोकांना अनेक वेळा मन मोकळं करण्यासाठी, बोलण्यासाठी कुणीतरी हवं असतं. अनेक वेळा चुकीची किंवा खालावलेली स्वप्रतिमा असणारे लोक स्वीकृती मिळवण्यासाठीसुद्धा अशा संबंधांचा वापर करतात.

या सगळ्यातून असं लक्षात येतं की, सेक्स या विषयावर मोकळेपणानं बोलायची गरज आहे. भावना म्हणजे काय व त्यांचं आयुष्यात काय स्थान आहे, याचं प्रशिक्षण आवश्यक आहे. भावना ही मानवी ऊर्जा असून, त्या बाहेर पडण्यासाठी जर योग्य प्रकारे मोकळी वाट मिळाली नाही, तर ती ऊर्जा आतमध्ये दाबली जाऊन त्या व्यक्तीला उदध्वस्त करते.

आपण केवळ आपल्या शरीराचा आकार, अवयवाचा आकार, त्वचेचा रंग व आपली लैंगिक क्षमता यापुरते मर्यादित आहोत का? जे लोक केवळ बाह्य रूपावरून आपल्याला ओळखतात, ते खरंच आपले हितचिंतक आहेत का, हे प्रश्न स्वत:ला आपल्या व समाजाच्या हितासाठी विचारणं गरजेचं आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख