टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • एन. श्रीप्रकाश, विजय रुपानी, रमण सिंह, प्रशांत भूषण आणि ओमर अब्दुल्ला
  • Mon , 03 April 2017
  • विनोदनामा टपल्या विजय रुपानी Vijay Rupani रमण सिंह Raman Singh प्रशांत भूषण Prashant Bhushan ओमर अब्दुल्ला Omar Abdullah एन. श्रीप्रकाश N Sreeprakash

१. गुजरातमधील भाजप सरकारने गोहत्या करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा करणारा कायदा मंजूर केला असताना आणि उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखान्यांविरोधातील कारवाई सुरू असताना केरळमधील पोटनिवणुकीत भाजप उमेदवार एन. श्रीप्रकाश यांनी निवडून आल्यास मतदारसंघात गोमांसाचा पुरवठा व्यवस्थित राहील, याची काळजी घेऊ, असे आश्वासन मतदारांना दिले आहे.

अहो निवडणूक जिंकायचीये त्यांना. दारुड्यांच्या प्रांतात नळातून दारू पुरवू आणि चरसींना लांब जायला नको म्हणून गल्लोगल्ली स्वस्त दरांत अंमली पदार्थवाटप करू असंही आश्वासन देतील ते. होलसेल गाजराची शेती आहे ही. एकदा सत्ता ताब्यात आली की बरोब्बर आपल्या औकातीवर कसे जातात, याची उदाहरणं गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये दिसताहेत. ईशान्येत आणि केरळात गाय निवडणुकीपुरतीच यम्मी आहे, ती कायमस्वरूपी मम्मीच आहे... यांची.

.................................................................................................................................

२. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ हे कोणत्याही मशिदीच्या आत मंदिर बांधू शकतात. देशात अराजक निर्माण करण्याची त्यांची क्षमता आहे, अशी घणाघाती टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. आदित्यनाथ कधीच देशाला एकत्र आणू शकत नाही. याऊलट ते देशात दुही निर्माण करतील, असा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी अशा भाजपशी हातमिळवणी का केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ओमरसाहेबांची उमर झाली का? याच भाजपच्या एनडीएच्या मंत्रिमंडळात आपले पिताश्री आणि आपण मंत्री होतो, याचा विसर कसा पडला त्यांना? आदित्यनाथ उत्तर प्रदेशात जे करतायत, तेच तुम्ही काश्मीरमध्ये करताहात की अनेक वर्षं. तुमची आणि त्यांची उद्दिष्टं काही फारशी वेगळी नाहीत. उलट त्या प्रक्रियेला वेग दिल्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानायला हवेत.

.................................................................................................................................

३. उत्तर प्रदेशातील अँटी रोमिओ पथकावरुन सुरू झालेल्या वादात कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी रविवारी ट्विट करून उडी घेतली आणि या पथकाचे नाव ‘अँटि कृष्णा पथक’ का नाही, अशी विचारणा केली. रोमिओने तर एकाच स्त्रीवर प्रेम केलं, कृष्ण मात्र स्त्रियांची छेड काढण्यासाठी प्रसिद्ध होता, असं त्यांनी म्हटलं आहे.

आता कोणी संस्कृतीरक्षक चेवात येऊन प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला चढवतील आणि तमाशातली गणगवळण चवीने पाहणारे, राधाकृष्णाचं मंदिर बांधणारे संस्कारी लोक्स ‘बरा झाला चेचला त्याला’ म्हणून टाळ्या पिटतील. बाकी कृष्ण कळायला तुम्हाला अमुक इतके जन्म घ्यावे लागतील वगैरे संबित आदी संभावित ‘पात्रां’ची टकळी सुरू झालीच आहे. जणू, हे जन्माला आले तेच रामायण-महाभारत वाचत!!

.................................................................................................................................

४. गोहत्या करणाऱ्यास गुजरातने जन्मठेपेची तरतूद केली असताना गोहत्या करणाऱ्यास आम्ही फासावर लटकवू, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी म्हटले आहे. मी कुणाच्या खाण्याच्या सवयीच्या विरोधात नाही, परंतु आपणास गुजरातला शाकाहारी बनवायचे आहे, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी म्हटले होते.

देशातला एक भाग गोप्रदेश म्हणून आरक्षित ठेवून तिथे यांच्या आवडीच्या सगळ्या देशी गायी नेऊन सोडाव्यात आणि यांना तिथले मुख्यमंत्री करावं. हे शेण गोळा करत आणि गोमूत्र गोळा करत फिरतील आणि बाकीच्या देशाला जरा रोजच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींकडे वळता येईल. रूपानी महोदयांचा आपल्या राज्यातल्या मुस्लिम समुदायाशी परिचय नसणार, हे स्वाभाविक आहे; राज्यातल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या कोळी बांधवांची आणि त्यांच्या खानपानाचीही त्यांना ओळख नाही, ही कुपमंडुकतेची कमाल आहे. कोळ्यांच्या हातातल्या कोयतीशी गाठ पडली की समजेल लवकरच.

.................................................................................................................................

५. केवळ प्रेम केल्यामुळे गेल्या १५ वर्षांत देशात ३८ हजार ५८५ प्रेमी युगुलांच्या हत्या करण्यात आल्या असून दहशतवादी हल्ल्यात होणाऱ्या मृत्यूंपेक्षा प्रेमात बळी जाणाऱ्यांचा हा आकडा सहापट अधिक असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तर प्रेमभंग झाल्याने आणि त्याच्याशी संबंधित विविध कारणांनी ७९ हजार १८९ तरुण-तरुणींनी आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे.

आता तरी अँटिरोमिओ स्क्वॉड, व्हॅलेंटाइन डेला विरोध, प्रेमी युगुलांना मारहाण वगैरेंच्या माध्यमातून भगवे तालिबान किती मोठं देशकार्य करताहेत, हे आपल्या लक्षात यायला हरकत नाही. समाजात जोवर प्रेमभावना राहील, तोवर इतक्या प्रमाणावर माणसं मरत राहतील, हे लक्षात घेऊन समाजातला परस्परसद्भाव संपूर्णपणे नष्ट करण्याला गत्यंतर नाही. हे कटु औषध देण्यासाठीच काही महात्म्यांचा पृथ्वीतलावर अवतार झाला आहे!

.................................................................................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......