टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे, विनोद तावडे, आशिष शेलार आणि उबर टॅक्सी
  • Thu , 16 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal अण्णा हजारे Anna Hazare विनोद तावडे Vinod Tawde आशिष शेलार Ashish Shelar उबर टॅक्सी Uber Taxi

१. निवडणुकांमध्ये भाजपच्या यशानंतर मतदानयंत्रांमध्ये (व्होटींग मशीन) फेरफार केल्याचा आरोप करून बॅलेट पेपरद्वारे (मतपत्रिकेद्वारे) मतदान घेण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मायावती यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते करत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांना कडक शब्दांत सुनावले आहे. जग झपाट्याने प्रगती करत आहे आणि आपण मात्र बॅलेट पेपरची चर्चा करून मागे जाण्याचा विचार करत आहोत, असे हजारे म्हणाले.

अण्णांची अधूनमधून जागृती ही आजकाल पूर्वीपेक्षा अधिक संशयास्पद होऊ लागली आहे. ते ज्या प्रगतीची चर्चा करताहेत, त्या प्रगतीत आपल्यापेक्षा खूप पुढे असलेल्या देशांनीही ईव्हीएमवरून पुन्हा मतपत्रिकेवर जाणं पसंत केलं आहे. ज्या यंत्राचं वापराआधी प्रोग्रामिंग करता येतं, असं कोणतंही यंत्र या देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या राजवटीत अविश्वासार्ह आणि धोकादायकच ठरणार, हे अण्णांना समजत नाही की समजून उमजत नाही?

................................................................................................

२. एकीकडे मुंबईकरांना दैनंदिन जीवनात पुरेशा सुविधांअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना पालिकेची तब्बल ६१ हजार कोटींची रक्कम बँकेत पडून आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत. पालिकेने तब्बल ३१ बँकांमध्ये ही रक्कम मुदत ठेवींच्या स्वरूपात ठेवली असून त्यासाठी पालिकेला वर्षाकाठी मिळणाऱ्या व्याजाचा आकडा तब्बल ४५०० कोटींच्या घरात जातो. मुंबईत अनेक सुविधांची वानवा असताना पालिकेने इतके पैसे बँकेत का अडकवून ठेवले आहेत, असा सवाल शेलारांनी विचारला आहे. मुंबईतील १ कोटी २० लाख लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक करदात्याचे ५१,२५० रूपये बँकेत फ्रीझ झाले आहेत. त्यामुळेच भाजपला पारदर्शी कारभार हवाय, असे शेलार यांनी म्हटले आहे.

सर्वप्रथम शेलार यांचं अभिनंदन. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने कुंभकर्णावर मात करून दाखवल्याचं प्रमाणपत्र युनेस्कोकडून येऊ घातलंच असेल. त्यावर नासाचं शिक्कामोर्तब ही निव्वळ औपचारिकताच आहे आता. महानगरपालिकेच्या ठेवी शिवसेनेने काल ठेवल्या का बँकेत? गेली कित्येक वर्षं युतीच्या छताखाली शिवसेनेबरोबर सत्ता ओरपत होतात, तेव्हा ही पारदर्शकता सुचली नव्हती? तेव्हा गाढ झोप लागली असणार ना यांना!!!

................................................................................................

३. आरामदायी, वातानुकूलित कॅबमधून प्रवास करताना सहवासाचे ‘चोरटे’ क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यापुढे उबरमध्ये तसे करता येणार नाही. उबर कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उबरच्या गाड्यांमधून प्रवास करताना सहप्रवाशाला किंवा चालकाला स्पर्श करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ‘नो सेक्स, नो फ्लर्ट’ अशी भूमिका घेत उबरने प्रवासादरम्यान अशी वर्तणूक करणाऱ्या प्रवाशांना अर्ध्या वाटेत उतरवले जाईल, असा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने सगळ्या फ्लीट टॅक्सींवर भगवा रंग लावायचा रंग काय घेतला, उबरने तर श्रीराम सेनेचाच अवतार धारण केला. अहो, तुमचं काम समोर रस्त्यावर पाहून टॅक्सी चालवण्याचं आहे. जोवर तुमच्या टॅक्सीत कोणी हनीमूनच साजरा करायला घेत नाही, तोवर कोणी कोणाशी परस्परसंमतीने जवळीक साधली, तर तुमचं काय जातं? अशाने कालीपिलीवाल्यांकडे वळतील हां लोक परत; ते कधीच असल्या संस्कृतीरक्षक अटीफिटी घालत नाहीत. आरसा अॅडजस्ट करतात बस थोडासा!!!

................................................................................................

४. मुंबईच्या महापालिकेत सत्ता अथवा विरोधात बसणार नाही. भाजपचे नगरसेवक पारदर्शक कारभाराचे पहारेकरी म्हणून काम करतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी भाजपच्या ‘पहारेकऱ्यां’ची सत्तेच्या बाकांबद्दलची ओढ कायम आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या निवडणुकीच्या वेळी भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या नगरसेवकांसह सत्ताधारी बाकांवरच बसल्याचे आढळून आले. त्यांच्या मागून आलेल्या सेनेच्या नगरसेवकांना ‘आता आपण कुठे बसायचे’ असा प्रश्न पडला होता.

आता हा प्रश्न घेऊनच पाच वर्षं ढकलायची आहेत मावळ्यांना. या पहारेकऱ्यांना अशीही मालकावरच दमदाटी करण्याची सुसंस्कृत सवय आहे पहिल्यापासून. त्यात आता तर शिवसेनेच्या महापौरपदाचा आणि सत्तेचा सगळा डोलारा आपल्याच मेहेरबानीवर उभा आहे, हे त्यांना माहिती आहे. शिवाय, योग्य वेळी तो खाली खेचून सत्तेवर स्वारही व्हायचं आहे. आता ते लवकरच फुटबॉलमध्ये करतात तसं एकाला एक मार्किंग करून शेजारी बसू लागतील सत्ताधाऱ्यांच्या.

................................................................................................

५. ऐतिहासिक विषयाशी संबंधित असणाऱ्या चित्रपटांच्या निर्मिती करण्याआधी संबंधित घटकांशी बसून चर्चा करायला हवी, त्याशिवाय चित्रपट हे तथ्यांवर आधारित असायला हवे, असं मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

ऐतिहासिक विषयांच्या संदर्भात ‘तथ्यं’ हा शब्द इतका सैलपणे वापरू नये, मंत्रिमहोदय. कोणत्याही विषयासंदर्भात फार फार तर तज्ज्ञांशी चर्चा होऊ शकते. त्यापलीकडचे कोणतेही स्टेकहोल्डर, मग त्या विविध नावांच्या सेना असोत की, राजकीय पक्ष असोत की नुसतेच रिकामटेकडे अभिमानी असोत- त्यांच्याशी चर्चा करण्याचा संबंध काय?‌ आईनस्टाईनवर दूधवाल्याबरोबर चर्चा करून नंतरच विश्वनिर्मितीचा सिद्धान्त मांडायला सांगितल्यासारखं आहे ते. शिवाय ज्या पद्मावती सिनेमाच्या अनुषंगाने तावडे यांनी हे बोधामृत पाजलंय, त्या पद्मावतीची आख्यायिका आहे, इतिहास नव्हे, याची कल्पना दिसत नाहीये त्यांना. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण देण्याच्या जबाबदारीपासून पळ काढण्याचाच हा प्रकार आहे.

................................................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......