टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • दिग्विजय सिंह, विश्वनाथ महाडेश्वर, नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी
  • Thu , 09 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या दिग्विजय सिंह Digvijay Singh विश्वनाथ महाडेश्वर Vishwanath Mahadeshwar नरेंद्र मोदी Narendra Modi लालकृष्ण अडवाणी Lal Krishna Advani

१. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी लखनऊ येथील दहशतवाद्यांबरोबरील पोलिसांच्या चकमकीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीची घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादी संपुष्टात येणार असल्याचे म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात असं झालंय का असा सवाल त्यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला पाकिस्तानच्या आयएसआयकडून निधी मिळत असल्याचा आरोप संघाचे कार्यकर्ते आणि पुणे बॉम्बस्फोट प्रकरणाचे आरोपी कर्नल पुरोहित आणि आपटे यांनी मोहन भागवत आणि इंद्रेश यांच्यावर केला होता. याचे उत्तर संघाने द्यावी, अशी मागणीही केली.

दिग्गीराजा, नोटबंदीचा पूर्ण फियास्को झाला आहे, हे कोंबडं आता आरवून आरवूनही थकलं आहे. पण, अतिशय अविश्वसनीय दावे करून, लोकांना नोटबंदीच्या जाचक अनावश्यक उपक्रमात ढकलून, त्यांचे शिव्याशाप घेऊनही मोदींनाच लोक का निवडून देत आहेत, यावर तुम्ही विचार करणं अधिक श्रेयस्कर राहणार नाही का? उत्तर प्रदेशात एकही मुस्लिम उमेदवार न देणारे मोदी आणि आयसिसच्या दहशतवाद्याच्या वडिलांनी त्याचा मृतदेह स्वीकारायलाही नकार दिलेला असताना, कसलीही माहिती न घेता त्याच्या बाजूने शड्डू ठोकून उतरणारे तुमच्या पक्षासारखे पक्ष यांच्यात गुणात्मक फरक काय?

…………………………….…………………………….…………………………….

२. २२७ सदस्य असलेल्या मुंबई महानगर पालिकेमध्ये १७१ इतकी भरघोस मते पडून शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर महापौर झाले. शिवसेनेचे ८४ नगरसेवक असताना त्यांना १७१  सदस्यांनी मतदान केले. भारतीय जनता पक्षाच्या ८२ नगरसेवकांनी त्यांना मत दिले. भाजपचे भगवे फेटे घातलेले नगरसेवक इतके उत्साहात होते की, महाडेश्वर यांचा सत्कार सुरू असताना नगरसेवकांनी ‘मोदी मोदी’ असा जयघोष सुरू केला.

‘मान न मान मै तेरा मेहमान’, या म्हणीचा अर्थ आता शिवसेनेला कळू लागेल. शिवसेनेचा महापौर भाजपच्या 'दिलखुलास' मेहेरबानीवर झाला आहे आणि त्याची वाटचाल ही भाजपच्या अदृश्य वेसणीने निश्चित केली जाणार आहे, हेच मोदींच्या जयघोषातून स्पष्ट झालेलं आहे. आपलं संख्याबळ घटलेलं असताना बलाढ्य 'मित्रा'समोर शक्तिप्रदर्शन करायला जाण्याचा अगोचरपणा शिवसेनेने केला खरा; पण, पुढे काय वाढून ठेवलंय याची चुणूक त्यांना आता मिळाली असेल. त्यातून ते काहीच शिकणार नाहीत, हा भाग अलाहिदा.

…………………………….…………………………….…………………………….

३. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातील बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केलं, परंतु त्यांना गरिबांचे दुःख काही कमी करता आलं नाही; गरीब हे गरीबच राहिले. भारतीय जनता पक्षाने गरिबांच्या घरोघर जाऊन बँक खाती काढून गरिबांचं खरोखरचं कल्याण केलं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

बरोबरच आहे पंतप्रधानांचं. इंदिरा गांधींनी फक्त राष्ट्रीयीकरण केलं, त्याने काय होतं. भाईयो और बहनों, आधार कार्ड कुणी आणलं? मोदींनी आणलं. जनधन खात्यांची कल्पना कुणाची? मोदींची. नोटाबंदीतून गरिबांचा फायदा झाला, असं कुणाला वाटतं? मोदींना वाटतं. सगळी खाती काढली कोणी? मोदींनी. सगळ्या खात्यात १५-१५ लाख रुपये भरले कोणी? मोदींनी. रोजगार नसलेला आणि कॅशलेस व्यवहार करू न शकणारा गरीब वर्गच नामशेष कोण करून दाखवणार? मोदी. गरिबांना हटवल्याशिवाय गरिबी हटणार नाही, हा क्रांतिकारक विचार सुचला कुणाला? मोदींना. बोला, मोदी, मोदी, मोदी.

…………………………….…………………………….…………………………….

४. बाबरी मशीद खटल्याबाबत मला कोणतीही माहिती मिळालेली नाही. फक्त वर्तमानपत्रात कुठेतरी मी याविषयी थोडेसे वाचलं होतं, असं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बाबरीपतनाच्या खटल्यातले एक आरोपी लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे.

तुमचं वय आणि सोय लक्षात घेता तुम्हाला बाबरी मशीद आठवते आहे, हेच फार मोठं आश्चर्य आहे. तुम्ही तिला बाबरी मशीद म्हणूनच ओळखता, हे तर त्याहून आश्चर्यजनक आहे. या खटल्यातून तुमची फार सहज सुटका झाली; आता तुम्हाला अडचणीत आणणारी काही वळणं हा खटला घेतो आहे. लवकरच स्मरणशक्तीला ताण द्यावा लागण्याची वेळ येणार आहे, असं काही त्याच वर्तमानपत्रांतल्या राशीभविष्यात लिहिलंय का हे तपासून घेतलंत तर बरं.

…………………………….…………………………….…………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......