फायबरायझेशनची अंमलबजावणी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी ‘नेट न्युट्रॅलिटी’च्या तत्त्वाचे पालन झाले पाहिजे
पडघम - तंत्रनामा
मिलिंद बेंबळकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 24 February 2022
  • पडघम तंत्रनामा मोबाईल फोन Mobile Phone फाइव्ह जी 5G वायर्ड सेवा Wired Service वायरलेस सेवा Wireless service फायबर ऑप्टिक केबल Fiber Optic Cable नेट न्युट्रॅलिटी Net Neutrality

संपूर्ण देशात प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत सरकारने फायबर ऑप्टिक केबलचे जाळे पसरवणे गरजेचे आहे. त्यावर नियंत्रण आणि मालकी हक्क सरकारचाच पर्यायाने जनतेचाच असला पाहिजे. त्याची देखभाल करण्यासाठी खाजगी कंपन्यांची नेमणूक करण्यास हरकत नाही.

सरकारने इंटरनेट, ब्रॉडबॅंडविषयक सेवा वाजवी दरात जनतेस उपलब्ध करून द्याव्यात. या फायबर ऑप्टिक केबलच्या सेवेची दैनंदिन देखभाल खाजगी कंपन्यांनी करावी, परंतु त्यावर आर्थिक व्यवहारासंबंधीचे नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांचेच असले पाहिजे.

फायबरायझेशनसंबंधी एक पथ्य कायम लक्षात घेतले पाहिजे, प्रत्येक घराच्या, इमारतीच्या, कार्यालयाच्या जास्तीत जास्त जवळ फायबर/कॉपर केबलनेच जोडणी द्यावी. प्राथमिकता ही फायबर केबलचीच असली पाहिजे. वायरलेस सेवा ही सहायक सेवा असावी. त्यास दुय्यम स्थान असावे.

संपूर्ण भारतात जे फायबरायझेशन करणे आहे, त्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांनीच केला पाहिजे. त्यांनी विविध मार्गांनी पैसे उभे करावेत. उदा. कर्ज घेणे, रोखे विक्री करणे इ. परंतु खाजगी कंपन्यांशी कधीही भागीदारी (public-private partnership) करू नये. कारण सार्वजनिक सेवा देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि नफा मिळवणे, हा मूलभूत उद्देश असणाऱ्या. खाजगी कंपन्या यांच्या हितसंबंधांमध्ये संघर्ष निर्माण होतो.  आणि ही भागीदारी अयशस्वी होते.

तात्पर्य, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते,  वीज, रेल्वे, इ. पायाभूत सुविधांवर मालकी हक्क शासनाचा, पर्यायाने जनतेचा असतो, त्याचप्रमाणे फायबर केबल, इंटरनेट, ब्रॉडबॅंड सेवांवर अधिकार सर्व सामान्य जनतेचाच असला पाहिजे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

फायबर ऑप्टिक केबलच्या साहाय्याने देण्यात येणाऱ्या सेवा या चिरंतन आणि शाश्वत आहेत. 1G, 2G, 3G, 4G, 5G वायरलेस सेवेसारखी सतत तंत्रज्ञान बदलणारी, स्वतःचेच तंत्रज्ञान सतत कालबाह्य ठरवणारी दुसरी सेवा नाही.

फायबर ऑप्टिक केबलने देण्यात येणाऱ्या इंटरनेट सेवा या अतिशय वेगवान, विश्वसनीय,  सुरक्षित, स्थिर, खाजगीपण जपणाऱ्या, सक्षम आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सहजपणे नियंत्रित करता येण्यासारख्या आहेत. 

वायरलेस सेवा (3G, 4G, 5G इ.) काही ठिकाणी सहजपणे वापरात येऊ शकतात, परंतु त्यामध्ये जोखीम असते, ती सेवा धोकादायक आहे, त्याला तांत्रिक मर्यादा आहेत. ती सेवा विसंबून राहण्यायोग्य नाही. वायरलेस सेवेमध्ये वीज वापर खूप होतो, तुलनात्मकदृष्ट्या ही सेवा अकार्यक्षम आहे. म्हणून केवळ अत्यावश्यक ठिकाणी साहायक सेवा घेण्यासाठी याचा वापर करावा.

बाजारात विक्रीयोग्य वस्तू उत्पादित करणे अथवा सेवा देण्यात खाजगी कंपन्या (ज्यांचे अंतिम उद्दिष्ट केवळ नफा मिळवणे हेच असते) नेहमीच अग्रेसर असतात. त्यामध्ये त्या यशस्वीही होतात. परंतु सार्वजनिक वापरात येणारे प्रकल्प बनवण्यात अथवा सार्वजनिक हिताच्या सेवा देण्यात  खाजगी कंपन्या नेहमीच कमी पडतात. उदा. रस्ते, पूल, सार्वजनिक वाहतूक सेवा, दूरसंचार सेवा, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य सेवा, ग्रंथालये इ. कारण नफ्याचे प्रमाण कमी असते आणि परतावाही दीर्घ काळाने मिळतो. 

खाजगी कंपन्या तांत्रिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात, परंतु असे निदर्शनास आलेले आहे,  दूरसंचार क्षेत्र अथवा इतर पायाभूत सुविधा आणि त्या अनुषंगाने दिल्या जाणाऱ्या सेवा प्रदान करताना खाजगी कंपन्या जनतेची दिशाभूल करतात. अधिक नफा मिळवण्यासाठी स्वतःचे कौशल्य चुकीच्या पद्धतीने वापरतात.

उत्तम दर्जाच्या पायाभूत सेवा आणि सुविधा जनतेस उपलब्ध करून देण्यास शासन, प्रशासकीय व्यवस्था नेहमीच अकार्यक्षम आणि वादग्रस्त ठरलेली आहे. त्यांच्या निर्णयप्रक्रियेवर नेहमीच खाजगी कंपन्यांचा प्रभाव आढळून येतो.

विकेंद्रित स्वरूपाची, खुल्या पद्धतीने वापरली जाणारी, लोकशाही पद्धतीचा, समतावादी विचारांचा पुरस्कार करणारी व्यवस्था, ज्याद्वारे सर्व सामान्य जनतेला माहिती आणि ज्ञानाचे आदानप्रदान करणे सहज शक्य होईल, ही वर्ल्ड वाईड वेब (WWW)च्या संस्थापक (टिम बर्नर्स-ली, संशोधन- १९८९, जिनेव्हा, स्विटझर्लंड) आणि वापरकर्त्यांची २० वर्षांपूर्वीची संकल्पना होती. ही व्यवस्था नवीन कॉर्पोरेट जगताने बिघडवून टाकलेली आहे. ती असुरक्षित आणि अकार्यक्षम बनवलेली आहे.  

आता त्याची जागा अतिरेकी व्यापारीकरण झालेल्या आणि प्रचंड जाहिरातींचा मारा करणाऱ्या  कॉर्पोरेट कंपन्यांच्या संपूर्णपणे प्रभावाखाली आणि नियंत्रणाखाली असणाऱ्या इंटरनेटने घेतलेली आहे.

खाजगी टेलिकॉम कंपन्या आणि त्यांचे राजकीय पाठीराखे नेहमीच कॉपर वायरने जोडलेल्या लँडलाइन टेलिफोन विरोधात बोलत असतात. त्यांना कालबाह्य ठरवण्यासाठी आग्रही असतात. परंतु त्याद्वारे व्हीडीएसएल, जी.फास्ट, इथरनेट इ. चा वापर अतिशय उत्तम रीतीने अजूनही केला जातो.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

वायरलेस सेवा देणाऱ्या कंपन्या वायर्ड सेवांच्या विरोधात आहेत, कारण त्या अजूनही अतिशय वाजवी दरात सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सेवा देत आहेत. या सेवांवर वायरलेस कंपन्यांना नियंत्रण आणि मक्तेदारी मिळवता येत नाही. नागरिकांवर आपल्या अटी आणि नियम या वायरलेस कंपन्यांना लादता येत नाहीत.

जनतेसाठी आणि बाजारासाठी 5G वायरलेस सेवा ही अकाली आणि अनावश्यक आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने बाजारात 5Gचा प्रचार सुरू आहे. त्यामध्ये जुनी उत्पादने कालबाह्य ठरवणे आणि तीव्र वेगाने नवीन चीप्स, ॲप्स, मोबाइल फोन्स बाजारात आणणे, हे सगळे अशा वेळेस जेव्हा 4G LTE सेवा पुरेशा प्रमाणात, उत्तम दर्जाची उपलब्ध नाही. इंटरनेट वापरामुळे वीजेचा प्रचंड प्रमाणात वापर होत आहे. मुख्यतः वायरलेस व्हिडिओसाठी सर्वाधिक वीजेचा वापर होतो. सेल्युलर सेवांपेक्षा वाय-फाय अधिक कार्यक्षम आहे. तरीही 4G, 5G सेल्युलर सेवांसाठी आग्रह धरला जातो. इंटरनेटचा निम्म्यापेक्षा अधिक वापर हा अनावश्यक आणि फसवा आहे.

उद्योगजगत, धोरणकर्ते नेहमीच इंटरनेट सेवांमधील गोपनीयता आणि सुरक्षितता याविषयी बोलत असतात, परंतु हे लोक त्या संबंधी आवश्यक आर्थिक गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी  करत नाहीत. याचे महत्त्वाचे कारण असे आहे, यासाठी किती खर्च येईल याचा अंदाज येत नाही. आणि सर्वांत महत्त्वाचे कारण सेवा देणाऱ्या कंपन्या, आराखडे बनवऱ्या कंपन्या या खर्चाचा बोजा उचलण्यास तयार नसतात.

वायरलेस उपकरणांमुळे होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल असंख्य पुरावे समोर आलेले आहेत. नियंत्रण आणि नियामक मंडळे, उद्योग जगताने नवीन वायरलेस तंत्रज्ञान बाजारात आणताना, त्यासंबंधी आरोग्यविषयक हमी घेण्याची गरज आहे.

वायरलेस क्षेत्रासंबंधी नवीन कायदे बनवणे, त्याचे नियमन करणे, निधी उभा करणे, यासाठी राज्यकर्ते, धोरणकर्ते यांच्याकडून अपेक्षा 

१) संपूर्ण भारतात फायबर ऑप्टिक केबलचे जाळे अंथरण्यात यावे. 

प्रत्येक घरापर्यंत, इमारतीपर्यंत, कार्यालयापर्यंत फायबर केबलचीच जोडणी द्यावी. घरामध्ये कॉपरवायर आणि इंटरनेटची जोडणी करावी. सर्वांत शेवटी, आवश्यक असेल, तरच वायरलेस उपकरणांनी जोडणी करावी.

दूरसंचार क्षेत्रातील पायाभूत सेवांसाठीची आर्थिक गुंतवणूक आणि त्यावरील नियंत्रण हे खाजगी कंपन्यांचे असू नये. आर्थिक गुंतवणूक आणि त्यावरील नियंत्रण हे जनतेचेच पर्यायाने सरकारचेच असले पाहिजे. त्यामुळे सरकार आणि खाजगी कंपन्या यांच्या परस्परविरोधी हितसंबंधातील संघर्ष टाळता येईल.

‘सर्व नागरिकांना नेटवर्क उपलब्ध असण्याची, ते वापरण्याची समान संधी. त्यामधील सामग्री वापरण्याची समान संधी आणि समानसेवांसाठी समान दर’ हे नेटवर्क न्युट्रॅलिटीचे मूलभूत तत्त्व आहे. नेटवर्क न्युट्रॅलिटी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि तो कायमस्वरूपी अबाधित राखावा त्याची अंमलबजावणी आणि पालन करावे.

२) घरांमध्ये, कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त युएसबी (युनिव्हर्सल सीरियल बस) केबल आणि इथरनेट केबलचाच वापर करावा. जेथे वायरने जोडणी अजिबातच शक्य नाही, फक्त त्या ठिकाणीच वायरलेस उपकरणांनी जोडणी करावी. सेल्युलर तंत्राचा वापर (3G/4G) वापर टाळावा. त्याऐवजी वाय-फाय तंत्राचा वापर करावा. 5G वायरलेस तंत्रामध्ये अजिबात पैसे गुंतवू नयेत (त्यामध्ये आर्थिक आणि आरोग्यविषयक जोखीम आहे, तसेच ही उत्पादने सातत्याने कालबाह्य केली जातात. सतत नवीन उत्पादने विकत घ्यावी लागतात. त्याचा आर्थिक बोजा पडतो).

३) नागरिकांनी लँडलाईन टेलिफोनची जोडणी घरी, कार्यालयात कायम ठेवावी. काढू वा तोडू नये.

४) सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरणविषयी स्थानिक पातळीवर नियंत्रण ठेवण्याचा भारतीय समाजाचा, जनतेचा मूलभूत अधिकार आहे. तसेच, स्वतःसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा सुद्धा जनतेस अधिकार आहे. सुनियोजित, सुशासित स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचा भंग करणारे ब्रॉडबँड नेटवर्कसंबंधीचे सर्व कायदे तातडीने रद्द करण्यात यावेत.

५) शक्य असेल तेथे फायबर केबल्स या बीएसएनएलच्या पोलवरून नेणे, वीजेच्या पोलवरून नेणे (स्थानिक विद्युत वितरण मंडळ, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इ.), रेल्वेलाईनच्या (रेलटेल) इलेक्ट्रिक पोलवरून नेण्यास परवानगी देण्यात यावी.

६) दूरसंचार व्यवस्थेमध्ये ऊर्जेचा अत्यंत कार्यक्षमतेने वापर झाला पाहिजे. डेटा सेंटर हे विकेंद्रित स्वरूपात असावेत. जेथे शक्य असेल तेथे फायबर केबलचाच वापर करावा. वायरलेस यंत्रणेचा कमीत कमी वापर करावा आणि सेल्युलर 3G/4Gऐवजी वाय-फाय यंत्रणेचा वापर करावा. प्रचंड ऊर्जेचा वापर करणाऱ्या 5G वायरलेस यंत्रणेचा अजिबात वापर करू नये.

सर्व घरे, इमारती, कार्यालये रुग्णालये यांना वीज वापरासंबंधी ब्युरो ऑफ एनर्जी इफिशिअन्सी (BEE), नवी दिल्ली यांचा एनर्जी कॉन्झर्वेशन बिल्डिंग कोड २०१७ (ECBC 2017) लागू करावा. याचे एकक आहे, KWh/sq mtr/year. प्रति चौरस मीटर वीजेचा वापर जेवढा कमी, तेवढे ऊर्जा दक्षता मानांकन अधिक असे सूत्र आहे.

७) गोपनीयता आणि सुरक्षा याविषयी सुस्पष्ट मानके तयार करावीत. आंतरराष्ट्रीय पातळीवर गोपनीयता आणि सुरक्षाविषयीच्या मानकांची अंमलबजावणी करणे आणि या अंमलबजावणीचे पालन करण्यासंबंधी सुनिश्चित नियमावली बनवणे. उत्पादित वस्तू अथवा सेवांसाठी कोणत्या दर्जाची गोपनीयता आणि सुरक्षा आवश्यक आहे, त्याची  मानके कोणती असावीत, यासंबंधीची सुस्पष्ट कल्पना ग्राहकांना असणे आवश्यक आहे.

८) सजीवांच्या आरोग्यावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रीक्वेन्सी रेडिएशनच्या होणाऱ्या दुष्परिणामविषयक अभ्यासाची गती आणि व्याप्ती तातडीने वाढवण्याची गरज आहे. आयएआरसी, जागतिक आरोग्य संघटनेचा एक विभाग (International Agency for Research on Cancer) यांनी सेल्युलर/मोबाइल वायरलेस यंत्रणेमुळे होणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे Class 2B Carcinogenic आहे, असे ३१ मे २०११ रोजी जाहीर केलेले आहे. Class 2B Carcinogenic अंतर्गत येणारे इतर पदार्थ आहेत, ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, तंबाखू, ॲस्बेस्टॉस, शिसे, वाहनांचा धूर, इ.

सबब, कॅन्सर या आजाराच्या समाजामध्ये सतत वाढत असलेल्या प्रमाणाबद्दल गंभीरपणे कार्यवाही करण्याची गरज आहे. या आजारास सार्वजनिक आपत्तीचा दर्जा देण्याची आवश्यकता  आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

डिजिटल समाजमाध्यमांचा (उदा. इ.बुक, वेबसाईटस, ब्लॉग, समाजमाध्यमे (फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम, व्हॉट्सअ‍ॅप इ.), मोबाइल फोन ॲप, डिजिटल फोटोग्राफ, होलोग्राम इ.) जनता आणि समाजाच्या वर्तनावर नेमका किती आणि कसा परिणाम होतो, त्या परिणामांची परिणिती कशामध्ये होते, याचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. तसेच या डिजिटल समाजमाध्यमांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये, त्यांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांबद्दल अधिक अभ्यासाची गरज आहे. 

सेल्युलर/मोबाइल वायरलेस यंत्रणा वापरताना ‘सावधानता तत्त्वा’चा (Precautionary Principle) वापर करण्यात यावा. सावधानता तत्व याचा अर्थ, एखाद्या कृतीमुळे अथवा निर्णयामुळे जर अपरिवर्तनीय हानी होण्याची शक्यता असेल तर शास्त्रीय पुराव्यांच्या आधाराच्या पार्श्वभूमीवर पुरावे देण्याची जबाबदारी ती कृती अथवा निर्णय घेणार्यांवर असेल. कृती करणाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय करायला हवेत आणि जो प्रदूषण करतो (रेडिएशन, इ-स्मॉग, रेडिओ फ्रीक्वेन्सी रेडिएशन, मायक्रोवेव्ह रेडिएशन इ.) त्यांनी नुकसान भरपाई द्यायला हवी. म्हणून सर्वोच्च प्राधान्य हे फायबर केबलच्याच वापरास द्यायला हवे. 

९) इंटरनेट आणि डब्ल्युडब्ल्युडब्ल्यु (WWW- World Wide Web)साठी नवीन व्यावसायिक कल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे. सध्याचे जाहिरातींचा अतिरेकी मारा होत असलेले आणि अति व्यापारीकरण झालेले इंटरनेट आणि डब्ल्युडब्ल्युडब्ल्यु पूर्णपणे मोडकळीला आलेले आहे. निष्फळ झालेले आहे. डेटा गोळा करण्यासाठीची इंटरनेट आधारित अर्थव्यवस्था फार काळ टिकणारी नाही. अति केंद्रीकरण आणि उद्योगजगताचा प्रभाव टाळावा.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

डब्ल्युडब्ल्युडब्ल्युचे व्यासपीठ हे जनतेच्या भावनिक आणि मानसिक गुंतवणुकीचे आणि सहभागाचे असावे. अति आक्रमक जाहिरातबाजी करणाऱ्यांचे, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांचे, डेटाची चोरी करणाऱ्यांचे (हॅकर्स), बॉटनेटसचे व्यासपीठ असू नये.

१०) लोकशाही शासन प्रणालीमध्ये डिजिटल प्रणालीचा वापर हा तटस्थ, वेगवान आणि स्वस्त असायला हवा. लोकशाही शासनव्यवस्था ही वैचारिक आदानप्रदान, माध्यमांचे स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य यावर टिकून असते. सध्या मोठ्या प्रमाणात माध्यमांच्या मालकीचे केंद्रीकरण होत आहे. इंटरनेटवरील प्रकाशने (वृत्तपत्रे, नियतकालिके, पुस्तके इ.), समाजमाध्यमे, त्या माध्यामातून होणाऱ्या चर्चा, विचारांचे आदानप्रदान, याचे प्रमाण अतोनात वाढले आहे. इंटरनेट हे एक असे महत्त्वाचे  साधन  आहे, ज्याद्वारे नागरिकांना सहजपणे माध्यमांमध्ये व्यक्त होता येते. 

म्हणून लोकशाही शासनव्यवस्थेमध्ये, डिजिटल प्रणालीचा वापर (उदा. इंटरनेट) हा तटस्थ, गतिमान, सहजसुलभ आणि स्वस्त हवा. तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी नेट न्युट्रॅलिटीच्या तत्त्वाचे पालन झाले पाहिजे.

.......................................................................................................

संदर्भ -

१) Reinventing Wires : The Future of Landlines and Networks, by Timothy Schoechle, PhD, Sr. Research Fellow, National Institute for Science, Law and Public Policy, May 2018.

२) Reclaiming Public Services: How cities and citizens are turning back privatization by The Amsterdam-based Transnational Institute (TNI, 2017).

३) Reinventing Wires : The Future of Landlines and Networks, by Timothy Schoechle, PhD, Sr. Research Fellow, National Institute for Science, Law and Public Policy, May 2018.

४) Reclaiming Public Services: How cities and citizens are turning back privatization by The Amsterdam-based Transnational Institute (TNI, 2017).

५) ‘मोबाइल फोन व टॉवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि उपाय’ ले. सुरेश कर्वे / मिलिंद बेंबळकर

६) जगातील विविध देशातील न्यायालये पर्यावरणविषयक खटल्यांच्या संदर्भात याच ‘सावधानता तत्त्वा’चा अवलंब करताना दिसून येतात. न्यायालये व वैज्ञानिक संशोधक दोघेही सातत्याने सत्यशोधन करत असतात. फरक एवढाच आहे की, वैज्ञानिक निष्कर्षांमध्ये सातत्याने बदल होऊ शकतात, निष्कर्षाचे स्वरूप अनिश्चित असू शकते, कारण उपलब्ध माहिती अपुरी असू शकते, अजाणतेपणी त्याचे विश्लेषण व्यवस्थित करणे शक्य होत नाही अथवा त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते, तर न्यायालयांना मात्र व्यापक सार्वजनिक जनहिताचा विचार करून तातडीने निर्णय देऊन वाद मिटवावे लागतात.

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

भारतातील फायबर ऑप्टिक केबलचे जाळे उद्दिष्ट आणि वस्तुस्थिती

वास्तविक वायर्ड सेवांना वायरलेस सेवा पूरक असल्या पाहिजेत. पण प्रत्यक्षात त्यांच्यात स्पर्धात्मक वातावरण निर्माण केले गेले. त्याचे दूरगामी दुष्परिणाम दिसून येत आहेत...

फायबर केबलमार्फत देण्यात येणार्‍या इंटरनेट सेवेवर नियंत्रण समाजाचेच असले पाहिजे

‘रेडिओ फ्रीक्वेन्सी रेडिएशनसंबंधीची १९९६मधील मानके कोणतेही बदल न करता सध्याच्या काळात, २०२१मध्ये कशी लागू होऊ शकतात?’ 

युनायटेड किंगडममध्ये 5Gसंबंधीचे कोणतेही निर्णय नागरिकांच्या संमतीने घेण्यात आलेले नाहीत. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे

.................................................................................................................................................................

लेखक मिलिंद बेंबळकर यांनी महाराष्ट्रात ‘मोबाईल टॉवर ग्रीव्हन्स फोरम’ची स्थापना केली आहे. तसेच ते ‘मोबाइल फोन व टॉवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि उपाय’ या पुस्तकाचे सहलेखकही आहेत.

milind.bembalkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा