बांगला देशने रक्तरंजित इतिहास आणि दीर्घकाळ लष्करी राजवट अनुभवली आहे. अनेकदा या देशातील राजवटीने भारताकडेही संशयी नजरेने पाहिले आहे
पडघम - विदेशनामा
कामिल पारखे
  • बांगला देशचा ध्वज आणि बांगला देशच्या पन्नाशीनिमित्त तयार करण्यात आलेले एक पोस्टर
  • Wed , 05 January 2022
  • पडघम विदेशनामा बांगला देश Bangladesh पाकिस्तान Pakistan भारत India शेख मुजीबूर रहमान Sheikh Mujibur Rahman मुक्ती बाहिनी Mukti Bahini

श्रीरामपूर नगरपालिकेचा भोंगा दिवसातून दोनदा वाजायचा. त्यातला सकाळी सहाचा भोंगा बहुसंख्यांच्या ध्यानीमनी नसायचा. रात्री साडेआठचा भोंगा मात्र सगळ्यांच्या कानी पडायचा आणि त्यानुसार ते त्यांचा त्या दिवसाचा दिनक्रम आटपून घेण्याच्या तयारीला लागत असत. आमच्या घरापासून अर्ध्या किलोमीटरवर बाजारतळापाशी असलेल्या नगरपालिकेच्या संगमनेर रोडवरच्या ओपन थिएटरच्या आवारातून हा भोंगा वाजत असे. त्या काळी म्हणजे साठ-सत्तरच्या दशकांत मर्यादित सीमाहद्दी असलेल्या आणि ध्वनीप्रदूषण ही चीज ठाऊक नसलेल्या शहराच्या बहुतेक सर्व भागांत त्याचा आवाज व्यवस्थितपणे ऐकू यायचा.

कुठल्याही प्रकारची फार मोठी स्थानिक उद्योगकंपनी नसलेल्या आणि अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या श्रीरामपुरात या भोंग्याचे नक्की प्रायोजन काय होते, ते मला कधीच कळाले नाही. शहराच्या आसपास हरेगावची ब्रिटिशकालीन ‘बेलापूर शुगर फॅक्टरी’ आणि टिळकनगरची ‘महाराष्ट्र शुगर फॅक्टरी’ हे दोन खाजगी साखर कारखाने आणि अशोकनगरचा सहकारी साखर कारखाना होता. पण या तिन्ही साखर कारखान्यांचा आणि या भोंग्याचा काहीएक संबंध नव्हता. पण आम्हा शहरवासियांच्या दैनंदिन जीवनात या भोंग्याला निश्चितच काहीतरी महत्त्वाचे स्थान होते, हे नक्की.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

इतर रहिवाश्यांप्रमाणेच सकाळच्या भोंग्याकडे माझेही कधी फार लक्ष गेले नाही, पण रात्रीच्या भोंग्याची गोष्ट वेगळी होती. त्या दिवसांत मी शाळकरी विद्यार्थी होतो. संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटल्यावर घरी येऊन दफ्तर ठेवून तडक मेनरोडपाशी असलेल्या सोनार गल्लीतल्या आमच्या पारखे टेलर्स या दुकानात यायचो. तिथे करण्यासारखे, मन रमवण्यासारखे खूप काही असायचे. टेलरिंगची कामे करणाऱ्या दादांभोवती वावरताना, तेथून रस्त्यावरच्या लोकांची ये-जा न्याहाळताना कंटाळा यायचा नाही. रात्री साडेआठ वाजता भोंगा वाजला की, दादा लगेच दुकान आवरायला लागायचे. आजूबाजूची दुकानेसुद्धा बंद व्हायला लागायची.

गंमत म्हणजे या काळात आमच्या आणि इतर सर्व दुकानांत भिंतीवर टांगलेली घड्याळे असायची, बहुतेकांकडे मनगटी घड्याळ असायचे. तरी रात्री दुकाने बंद होण्यासाठी त्या भोंग्याचाच आदेश पाळला जायचा. हा, एक अपवाद असायचा. दर बुधवारी अनेक दुकाने रात्री आठ वाजण्याआधीच बंद व्हायची. कारण त्या दिवशी आठ ते नऊ दरम्यान रेडिओ सिलोनवरून अमीन सयानी यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा नवनवीन ‘हिट’ हिंदी चित्रपट गाण्यांचा लोकप्रिय कार्यक्रम प्रसारित व्हायचा. तो घराघरांत लहानथोर मंडळी कान देऊन ऐकायची.

रात्री साडेआठचा भोंगा वाजला नाही, असे कधी व्हायचे नाही. तो आमच्या जीवनाचा, दिनक्रमाचा एक भाग झाला होता. मात्र अचानक काही काळ हा भोंगा दिवसा-अपरात्री, वेळी-अवेळी वाजू लागला. त्याच्या अशा वाजण्याने सुरुवातीला लोकांमध्ये घबराट व्हायला लागली. पण लवकरच हे भोंगे असे का वाजतायेत, हे लोकांना माहीत झाले. 

१९७१ सालच्या डिसेंबर महिन्याचे ते दिवस होते आणि भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानात प्रवेश केला होता. भारताचे पाकिस्तानविरुद्ध युद्ध सुरू झाले होते. त्यामुळे शत्रूपक्षाकडून कुठल्याही भारतीय मुलखावर कधीही हल्ला होऊ शकतो. त्याला लोकांनी कसे तोंड द्यायचे, याची रंगीत तालीम म्हणून हे भोंगे अचानक वाजवले जात असत.

‘युद्धस्य कथा रम्य’ असे एक सुभाषित असले तरी युद्धाच्या छायेत राहणे तितके सोपे नसते. तीन डिसेंबरपासून सुरू झालेल्या या युद्धाच्या काळात सीमाहद्द वगळता भारताच्या कुठल्याही मध्यवर्ती प्रदेशांत सैनिकी किंवा बॉम्बहल्ले झाले नाहीत. श्रीरामपूर हे आमचे शहर काही सीमेवर नाही. त्यामुळे या भागात विमान-हल्ला होण्याची शक्यता फार धूसर होती. तरीदेखील खबरदारी म्हणून देशाच्या विविध प्रदेशांत अशी काळजी घेतली जात असावी.

त्या वर्षी मी सहावीत होतो. जिल्हा परिषदेच्या आमच्या जीवन शिक्षण मंदिर (खटोड) शाळेत दररोज सकाळी प्रार्थनेच्या वेळी वृत्तपत्रांतील महत्त्वाच्या बातम्यांचे मथळे वाचले जायचे. त्यामुळे सकाळीच वृत्तपत्राचे पहिले पान नजरेखालून घालावे लागे. भारताच्या पूर्व सीमेवर अचानक भारतीय सेनेच्या मोठ्या कारवाया सुरू झाल्या होत्या. त्यासंबंधीच्या बातम्या, विशेषतः भारतीय लष्कराच्या मदतीने आगेकूच करणाऱ्या बांगला ‘मुक्ती  बाहिनी’च्या फौजेला मिळणारे यश, याबाबतच्या बातम्या वाचणे खूपच रोमांचकारी असायचे.

सत्तरच्या दशकात तंत्रज्ञान आणि युद्धशास्त्र आजच्या इतके प्रगत नव्हते. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे परस्परांच्या हद्दीत खूप आत जाऊन बॉम्बहल्ला करू शकत नव्हती. विमानाच्या हालचाली अचूक टिपणारी रडार यंत्रणा तोपर्यंत विकसित झाली होती, मात्र ती भेदून शत्रूची विमाने मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरांवर हल्ला करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तसे झाल्यास काय खबरदारी घ्यायची आणि बॉम्बवर्षाव झाल्यास काय करावे, याचे मार्गदर्शन दररोज केले जात होते.

त्यापैकीच आणखी एक खबरदारीचा उपाय म्हणून शहरात रोज रात्री ‘ब्लॅकआऊट’ असायचा. शत्रूच्या विमानांना ही शहर लोकवस्ती आहे, हे कळू नये म्हणून रात्री अंधार केला जायचा. रस्त्यावरचा, दुकानांतला आणि घरांतला वीजपुरवठा पूर्णतः बंद असायचा.

तेव्हा देशात आणि महाराष्ट्रात वीजेचा फारसा वापर वाढलेला नव्हता. विद्युतीकरण केवळ काही श्रीमंत लोकांची घरे आणि दुकानांपर्यंत पोहोचले होते. आमच्या टेलरिंगच्या आणि सोनार गल्लीतल्या बहुतेक दुकानांत वीजेचे कनेक्शन आलेले नव्हते. त्यामुळे सूर्यास्ताआधी सगळे दुकानदार आपापल्या पेट्रोमॅक्स बत्त्या साफसूफ करून पेटवत असत. आमच्या बोरावके चाळीत एकाही घरात वीज आलेली नव्हती. त्यामुळे रॉकेलच्या छोट्या-मोठ्या बत्त्या, एक-दोन कंदील यांच्या उजेडात घराघरांत स्वयंपाक व्हायचा, इतर कामे उरकली जायची. अभ्यास त्या वेळी केवळ मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असायचा. त्यामुळे फक्त तीच मुले-मुली रॉकेलच्या बत्त्यांच्या आणि कंदिलाच्या उजेडात संध्याकाळी आणि रात्री किंवा पहाटे अभ्यास करायची. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या खूप कमी होती. अशा विविध कारणांमुळे शत्रूपक्षाच्या विमानांना मानववस्तीची कल्पना येईल, अशी शक्यता फार कमी होती.

तरी लोकांनी काडीपेटीचाही वापर करू नये, अशी सक्त ताकीद होती. फारच तलफ आली तर दोन्ही हातांनी झाकून विडी शिलगावी, ओढावी असा आदेश होता. त्या दिवसांत शहरात अनेकदा हेलिकॉप्टर आणि विमानांची घरघर कानावर यायची. बॉम्बहल्ला झाल्यास लगेच घराबाहेर पडावे, कुठलीही हालचाल न करता जमिनीवर झोपून राहावे, अशा सूचना दिल्या जात. 

पूर्व पाकिस्तानात स्थानिक ‘मुक्ती बाहिनी’चे लोक भारतीय फौजेसह डाक्क्याच्या दिशेने आगेकूच करताना तेथील लोक त्यांचे आनंदाने, उत्स्फूर्त स्वागत करत होते, अशा बातम्या दररोज वाचायला मिळायच्या. ते वाचून अंगावर रोमांच उभे राहायचे. युद्ध होते, तरी भारतीय फौजेने या वेळी फारशी मनुष्यहानी अनुभवली नाही किंवा भारतीय मुलखात मालमत्तेची मोठी नुकसानी झाली नव्हती. उलट दररोज भारतीय सैन्याच्या नव्यानव्या शौर्यकथा वृत्तपत्रांतून वाचायला मिळायच्या.

या घटनेनंतर २० वर्षांनी माझे जवळचे मित्र आणि ‘फिल्म डिव्हिजन ऑफ इंडिया’मध्ये १९७१ साली डॉक्युमेंटरी प्रोड्युसर असलेले प्रेम वैद्य यांनी या युद्धातील त्यांचे अनुभव मला सांगितले होते. माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या ‘फिल्म डिव्हिजन ऑफ इंडिया’तर्फे भारत सरकारतर्फे विविध घटनांचे आणि कार्यक्रमांचे दृकश्राव्य डॉक्युमेन्टेन्शन केले जाई. सिनेमा थिएटर्समधून चित्रपटांच्या दरम्यान या डॉक्युमेंटरींज दाखवल्या जायच्या.

प्रेम वैद्य (महाराष्ट्रातील इंग्रजी पत्रकारितेतील एक ज्येष्ठ पत्रकार अभय वैद्य यांचे वडील) त्या वेळी ‘फिल्म डिव्हिजन ऑफ इंडिया’च्या नवी दिल्लीतील कार्यालयात होते. त्यांचे त्या वेळचे काम मुख्यत: कार्यालयीन होते. त्यामुळे फिल्डवर त्यांची पोस्टिंग नसायची. मात्र १९७१च्या युद्धाला तोंड फुटले, तेव्हा प्रेम वैद्य यांनी या युद्धाचे वार्तांकन करण्यासाठी आपल्याला फिल्डवर पाठवावे, अशी विनंती त्यांच्या वरिष्ठांना केली. अशी जोखमीची असाईनमेंट सहसा कुणी स्वतःहून मागून घेत नाही. मात्र वैद्य आपल्या मागणीवर ठाम राहिले आणि त्यांना परवानगी मिळाली. 

भारतीय लष्कराचे प्रतिनिधी जनरल जगजित सिंग अरोरा यांच्या उपस्थितीत पाकिस्तानी अधिकारी लेफ्टनंट जनरल अमिर अब्दुल्ला खान नियाझी यांनी शरणागतीच्या करारावर सह्या केल्या, तेव्हा तो ऐतिहासिक क्षण आपल्या व्हिडिओ कॅमेऱ्यात टिपण्याची संधी प्रेम वैद्य यांना मिळाली. आपल्या ‘मेमोरेबल असाईनमेंटस ऑन मुव्हिंग इमेजेस’ या पुस्तकात (प्रकाशन वर्ष २००९) प्रेम वैद्य यांनी हा रोमांचकारी अनुभव लिहिला आहे. 

विशेष म्हणजे त्याआधी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या सोव्हिएत रशियाच्या दौऱ्यात सहभागी होण्याची संधी वैद्य यांना लाभली होती. ज्या काळरात्री शास्त्रीजींचा मृत्यु झाला, त्याआधी त्यांचे अखेरचे कृष्णधवल छायाचित्र ताश्कंद येथे वैद्य यांनी घेतले होते. 

बांगलादेश युद्धाच्या आधी भारताने आणि सगळ्या जगाने पंतप्रधान इंदिरा गांधींचा खंबीरपणा, राजकीय मुत्सद्दीपणा आणि त्यामुळे अमेरिकेने केलेली आदळआपट अनुभवली होती. या वेळी कम्युनिस्ट सोव्हिएत रशियाने भारताची केलेल्या पाठराखणीमुळे अमेरिकेला निमूटपणाने घेतलेली माघार घ्यावी लागली होती. पाकिस्तानी लष्कराधिकाऱ्यांच्या शरणागतीमुळे युद्ध तहकुबी झाली. शरण आलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना युद्धकैदी म्हणून घोषित करण्यात आले आणि बांगलादेश हे नवे राष्ट्र जगाच्या भूगोलावर अस्तित्वात आले. 

१९४७ साली अखंड भारताची धर्माच्या आधारावर फाळणी करण्यात आली होती. भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर अंतरांवर असलेले दोन वेगवेगळे भूखंड केवळ एक समान धर्म या आधारावर एक राष्ट्र म्हणून फार काळ राहू शकत नाहीत, हे पूर्व पाकिस्तान हा प्रदेश पश्चिम पाकिस्तानपासून वेगळे झाल्याने सिद्ध झाले. १६ डिसेंबर १९७१ रोजी या युद्धाची अखेर झाली, तरी कितीतरी घटना वेगाने घडत होत्या. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे पूर्व पाकिस्तानचे नेते शेख मुजिबर रेहमान यांची पाकिस्तानमधील तुरुंगातून सुटका आणि बांगलादेशात जाण्याआधी नवी दिल्लीत झालेले आगमन.

शेख मुजिबर रेहमान यांना पाकिस्तानी कोर्टाने देहदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र पाकिस्तानचा या युद्धात पराभव झाल्यानंतर लष्करशहा जनरल याह्या खान यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पाकिस्तानचे सत्ताधारी म्हणून नव्यानेच सूत्रे घेणाऱ्या झुल्फिकार अली भुट्टो यांनी मृत्युदंडाची शिक्षा रद्द करून मुजिबर रेहमान यांची सुटकाही केली. (दुदैवाने पाकिस्तानचे पंतप्रधान झालेल्या याच भुट्टो यांना नंतर काही वर्षांनी पाकिस्तानात फाशी देण्यात आले!)  

दुसऱ्या दिवशी दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शेख मुजीबर रेहमान यांची छायाचित्रे अनेक दैनिकांत पान एकवर ठळकपणे झळकली होती. त्या दोघांचे हसरे चेहरे सर्व भारतीयांच्या भावनेचे प्रतिनिधित्व करणारे होते. बांगला देशप्रमाणेच भारताच्या इतिहासात ही एक महत्त्वाची घटना होती. याच्या शिल्पकार अर्थातच पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशा होते. भारताप्रमाणेच बांगलादेशातही जल्लोषाचे वातावरण होते. 

पूर्व पाकिस्तानातील नेत्यांनी पश्चिम पाकिस्तानविरोधी लढा सुरू केल्यावर कराचीतल्या सत्ताधारी नेत्यांनी आणि लष्कराने पूर्व पाकिस्तानात दडपशाही आणि अत्याचार सुरू केले होते. त्यामुळे या देशातील पीडित लोकांचा लोंढा भारतात येऊ लागला. दररोज असंख्य लोक पूर्व सीमा ओलांडून भारतात आश्रयासाठी येत होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मानवतावादी दृष्टीकोन स्वीकारून निर्वासितांचा हा लोंढा थोपवला नाही, मात्र दीर्घकालीन खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना भारतात इतरत्र फिरू न देता या निर्वासितांसाठी स्वतंत्र छावण्या उभारल्या. तेथे त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची आणि जेवण्याची सोय करण्यात आली. युद्ध तहकुबीनंतर आणि स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतर या लाखो निर्वासितांची त्यांच्या मायदेशी रवानगी करण्यात आली.

तीच बाब युद्धकैद्यांची. या युद्धात एक लाखाच्या आसपास पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय कायद्याचे पुरेपूर पालन करत या कैद्यांचा खर्च भारताने काही महिने सोसला आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्याशी काही महिन्यांनी झालेल्या सिमला करारानुसार या युद्धकैद्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले.

.................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा

स्वतंत्र बांगला देशची पन्नाशी : भारतानेच घातले बारसे, पण आता संबंध बरे नाहीत फारसे!

‘विप्लवी बांगला सोनार बांगला’ : हे पुस्तक बांगला देशच्या निर्मितीच्या काळातला आणि त्यानंतरच्या मोठ्या स्थित्यंतरांचा आलेख आहे

बांगला देश मुक्तिसंग्रामाची धगधगती कहाणी

…तुला शिकवीन चांगलाच धडा

शेख हसीना यांचा विजय ही भारतासाठी नववर्षातील नवी भेट!

.................................................................................................................................................................

भारताने पाकिस्तानविरुद्धचे हे युद्ध जिंकले खरे, पण या युद्धात ‘जे काही कमावले, ते सिमला करारात गमावले’ असे म्हटले जाते. हरलेल्या पाकिस्तानच्या नांग्या पुरत्या ठेचून त्याच वेळी पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न कायमचा सोडवण्याची संधी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गमावली असे म्हटले जाते. त्यामुळेच या सिमला कराराबद्दल फारसे अभिमानाने बोलले जात नाही.

दुदैवाने शेख मुजिबर रेहमान यांना त्यांच्या देशातील जनतेचे प्रेम फार काळ लाभले नाही. काही वर्षांतच मुजिबर यांच्याबाबत बांगला देशातील आणि भारतातील जनतेचाही भ्रमनिरास झाला. जनाधार गमावत चाललेल्या मुजिबर यांनी एकपक्षीय राजवट लागू करून स्वतःकडे सर्व अधिकार एकवटून लोकशाही व्यवस्थेलाच सुरुंग लावला. १५ ऑगस्ट १९७५ रोजी बांगलादेशातील काही लष्करी अधिकाऱ्यांनी उठाव करून शेख मुजिबर रेहमान आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांची हत्या केली. मात्र त्यांची एक मुलगी त्या वेळी देशाबाहेर असल्याने या हल्ल्यातून सुदैवाने वाचली. ही मुलगी म्हणजे शेख हसिना. त्या आज बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत.

बांगला देशने रक्तरंजित इतिहास आणि दीर्घकाळ लष्करी राजवट अनुभवली आहे. अनेकदा या देशातील राजवटीने भारताकडेही संशयी नजरेने पाहिले आहे. बांगला देशच्या दुसऱ्या एका रक्तरंजित लष्करी उठावात लष्करशहा झियाऊर रेहमान यांची हत्या झाली. त्यांची पत्नी बेगम खलिदा झिया यांनी आणि शेख हसिना यांनी बांगला देशचे पंतप्रधानपद आलटूनपालटून भूषवले आहे. एका लोकशाहीप्रधान देशात गेल्या तीन दशकांच्या काळात केवळ दोनच महिला पंतप्रधानपदी आणि प्रमुख राजकारणी असण्याचे जगातील हे एकमेव उदाहरण आहे.  

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

बांगला देशने आता सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या काही वर्षांत बांगला देशात पुन्हा लोकशाही व्यवस्था प्रस्थापित झाल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी बांगला देशी नागरिक भारतात मोठ्या संख्येने घुसखोरी करत असत, कारण त्या देशातील बेरोजगारी, गरिबी आणि अराजकता असे. गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र बदलताना दिसत आहे. अलीकडच्या काळात तर दरडोई उत्पन्न आणि इतर काही बाबतींत बांगला देश भारताच्या तुलनेत अधिक प्रगती करताना आंतरराष्ट्रीय मानदंडावरून दिसत आहे. त्यासंदर्भात बदलत्या परिस्थितीत भविष्यात भारतीय नागरीक बांगलादेशात घुसखोरी करतील, अशा आशयाचे एक व्यंगचित्रही छापून आले होते.

शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध असणे, हे दोन्ही राष्ट्रांच्या हिताचे असते. परस्परांचे शेकडो वर्षे हाडवैरी असलेल्या पाश्चिमात्य जगातील अनेक विकसित राष्ट्रांनी आता ही बाब ओळखून संघर्ष टाळलेला आहे. परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी एकमात्र व्हिसा आणि त्याशिवाय शंगेन हे एकच चलन स्वीकारून युरोपियन युनियनमधल्या राष्ट्रांनी हा प्रयोग गेली अनेक वर्षे यशस्वीरित्या राबवला आहे.

भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि आणि बांगला देश राष्ट्रगीत ‘अमार सोनार बांगला’ या रचना एकाच कवीच्या - नोबेल पारितोषक विजेते महाकवी रविंद्रनाथ टागोर - आहेत. समान संस्कृती, भाषा, पेहराव आणि इतिहास असणाऱ्या भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी चांगले परस्परसंबंध राखून परस्परांचे हित साधले तर उभयपक्षांना मदतच होईल.  

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......