कथा : ल्युसिफर (देवदूतांपैकी ल्युसिफर ईश्वराचा सर्वांत लाडका होता, कारण तो इतरांपेक्षा अधिक सुंदर आणि बुद्धिमान होता. परंतु…)
दिवाळी २०२१ - विशेष लेख
श्याम पाखरे
  • बॅ. मोहम्मद अली जीना ‘ल्युसिफर’च्या वेशात...
  • Tue , 26 October 2021
  • दिवाळी २०२१ विशेष लेख ल्युसिफर Lucifer मोहम्मद अली जीना Muhammad Ali Jinnah फातिमा जीना Fatima Jinnah रतनबाई जीना Rattanbai Jinnah दीना वाडिया Dina Wadia

रात्रभर कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरला होता, तरी रिमझिम अजून चालूच होती. सकाळी सहा वाजता माझगावमधील आरामबाग मुस्लीम दफनभूमीसमोर काळ्या रंगाची कॅडिलॅक कार येऊन थांबली. शोफरने कारचा दरवाजा उघडला. ‘जीन मी देखील...’ हे फातिमाचे वाक्य जिनांच्या हाताच्या नकारात्मक इशाऱ्यामुळे अर्ध्यावरच राहिले. राखाडी रंगाचा सेव्हिल रो सूट घातलेले जीना एका हातात पुष्पगुच्छ घेऊन संथपणे पावले टाकत दफनभूमीच्या प्रवेशद्वारातून आत गेले. सत्तरी ओलांडलेल्या आपल्या मोठ्या भावाच्या उंच आणि कृश पाठमोऱ्या आकृतीकडे कारच्या खिडकीतून फातिमा पाहत राहिल्या. वडील पुंजाभाईंचे निधन झाले, तेव्हा त्या केवळ नऊ वर्षांच्या होत्या. तेव्हा जिनांनी वडिलांची जागा घेतली. इस्माईली खोजा समाजाच्या कट्टर रूढी-परंपरांची पर्वा न करता त्यांनी फातिमाला बँड्रा कॉन्व्हेंटमध्ये घातले. पुढे कलकत्त्याच्या डॉ. अहमद डेंटल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवले. तिने पदवी मिळवल्यानंतर त्यांनी मोठ्या हौशीने तिच्यासाठी मुंबईमध्ये क्लिनिक थाटून दिले. फातिमा भावासोबत मलबार हिलमधील साऊथ कोर्ट बंगल्यात राहू लागल्या. जिना यशाची एकेक पायरी चढत कीर्तीच्या शिखराकडे चालले होते. एकाकी असले तरी दोघे आपले जीवन आनंदाने व्यतीत करत होते. आणि मग एक दिवस रत्ती जिनांच्या आयुष्यात आली...

सकाळी त्या वेळी कब्रस्थानात कोणीही नसे. पक्ष्यांच्या किलबिलाटाशिवाय तेथे जीवनाची आणखी कोणतीही खूण नव्हती. थडग्यांमधून मार्ग काढत जिना रतनबाईंच्या कबरीजवळ पोहोचले. त्यावर जमा झालेल्या पालापाचोळ्याला आपल्या हातांनी बाजूला करून त्यांनी त्यावर पुष्पगुच्छ ठेवला. कबरीच्या संगमरवरी लादीवर आपला उजवा हात ठेवून जिना भूतकाळातील स्मृतींमध्ये हरवून गेले.

‘‘मनुष्य जेव्हा वास्तवाच्या म्हणजे मृत्यूच्या जवळ पोहोचतो, तेव्हा त्याच्या स्मृतीपटलावर केवळ भूतकाळातील सुंदर आणि हळुवार क्षण शिल्लक राहतात आणि इतर सर्व आठवणी अवास्तवाच्या धुक्यामागे अंतर्धान पावतात. माझी आठवण तू वेलीवरून तोडलेल्या एका फुलाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न कर, ना की पायाखाली तुडवलेल्या फुलाप्रमाणे. मी तुझ्यावर निरतिशय प्रेम करते. जर माझ्या प्रेमामध्ये काकणभर कमतरता असती तर कदाचित मी तुझ्यासोबत राहिली असती. पण वेलींवर निर्माण केलेल्या सुंदर बहराला चिखलातून ओढायचे नसते ना...’’

रत्तीने घर सोडून जाताना लिहिलेल्या पत्रातील ओळी त्यांच्या डोळ्यांसमोर तरळू लागल्या. डोळ्यांत अश्रूबिंदू उभे राहिले. आज त्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. नेहमीप्रमाणे रुमालाने ते झटकन पुसून आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून घेण्याची इच्छा त्यांना झाली नाही. कदाचित ते आपल्या प्रिय रत्तीला शेवटचा निरोप देत होते. काही क्षण गेल्यानंतर त्यांनी स्वतःला सावरले. तेथून दूर जाण्यापूर्वी ते म्हणाले, ‘गुडबाय रत्ती!’

..................................................................................................................................................................

भाषण संपले तेव्हा आपल्याला प्रचंड थकवा आल्याचे जिनांना जाणवले. त्यांना खोकल्याची उबळ आली. त्यांनी आधारासाठी डेस्कवर हात टेकवले आणि वर पाहिले. समोर दादाभाई, फिरोजशाह आणि गोखले नव्हते. प्रेक्षक गॅलरीत रत्तीदेखील नव्हती. त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी सभागृहात सर्वत्र पाहिले, पण ते कोठेही दिसले नाही. त्यांच्याऐवजी लीगचे प्रतिनिधी असलेले मुल्ला, पीर, नवाब, जमीनदार त्यांच्याकडे साशंक नजरेने पाहत असल्याचे त्यांना दिसले. आपण कोठे येऊन पोहोचलो आहोत, याची जाणीव जिनांना झाली…

.................................................................................................................................................................

तो जिनांचा मुंबईमधील शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी त्यांना दिल्लीला जायचे होते आणि मग पाकिस्तानात. कायमचे. कोटच्या खिशातून कॅव्हर्न ए चे पाकीट काढून त्यांनी सिगरेट शिलगावली आणि शोफरला गाडी मुंबई उच्च न्यायालयमार्गे टाऊन हॉलच्या दिशेने घेण्यास सांगितली. जिना अशा उलट दिशेने गाडी घेऊन का जात आहेत, हे फातिमाला समजेना. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव पाहून त्यांची प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही. उच्च न्यायालयाचे गोथिक आर्किटेक्चर दृष्टीस पडले तेव्हा जिनांनी गाडी कडेला थांबवण्यास सांगितली. खिडकीतून उच्च न्यायालयाच्या इमारतीकडे दृष्टीक्षेप टाकून ते सिगरेटची धूम्रवलये निर्माण करत विचारांत हरवून गेले. लंडनहून पदवी घेऊन आल्यानंतर त्यांनी या उच्च न्यायालयामध्ये बॅरिस्टर म्हणून नोंदणी केली होती. मुंबईमधील कायद्याच्या क्षेत्रातील तारांगणामध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना फार संघर्ष करावा लागला. सलग तीन वर्षे त्यांना कोणतीही ब्रीफ मिळाली नाही. वडिलांवर कर्जाचा डोंगर होता. पाठीमागे सहा भावंडे होती. परंतु जिनांनी हिम्मत हरली नाही. शेवटी तेही दिवस पालटले. जिना मुंबईतील आघाडीच्या वकिलांमध्ये गणले जाऊ लागले. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान अनेकांनी आपली बॅरिस्टरी लाथाडली. परंतु जिनांनी आपली पदवी मानाने जपली. उच्च न्यायालयामधील त्यांचा अनुभव त्यांना एके काळी काँग्रेसच्या उच्च नेत्यांच्या वर्तुळात आणि नंतर ऑल इंडिया मुस्लीम लीगच्या शीर्षस्थानी घेऊन गेला. आज त्यांच्या मनात त्या वास्तूबद्दल कृतज्ञतेचे भाव उचंबळून येत होते. संपत आलेल्या सिगरेटची उष्णता बोटांना जाणवू लागली, तसे ते विचारचक्रातून बाहेर आले आणि त्यांनी गाडी पुढे घेण्यास सांगितली. हॉर्निमन सर्कलला वळण घेऊन कार टाऊन हॉलसमोर येऊन उभी राहिली.

आपल्या भावाच्या मनात काय चालले आहे, असा विचार फातिमा करत असताना जिना कारचा दरवाजा उघडून बाहेर गेले. नवीन सिगरेट शिलगावून टाऊन हॉलच्या इमारतीकडे पाहत राहिले. टाऊन हॉलच्या प्रशस्त पायऱ्या चढून वरती जाण्याची त्यांच्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली. परंतु आज ते शक्य नव्हते. पायऱ्या चढणे हे आता त्यांच्यासाठी एक दिव्य करण्यासमान होते. तीस वर्षांपूर्वी ती संध्याकाळची वेळ होती, जेव्हा जिनांनी आपल्या लांब पायांनी जवळ जवळ धावतच काही क्षणांत टाऊन हॉलच्या पायऱ्या ओलांडून आत प्रवेश केला होता. भारतीयांना कस्पटाप्रमाणे समजणाऱ्या मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांचा निरोपसमारंभ त्यांच्या काही पारशी मित्रांनी आयोजित केला होता. त्यास विरोध करण्याचा निर्णय जिना आणि त्यांच्या होमरूल लीगच्या सहकाऱ्यांनी घेतला होता. काही वेळात रत्तीदेखील तेथे येऊन पोहोचली. सर जमशेटजी जीजीभॉय उपस्थितांना संबोधित करण्यास उभे राहताच, जिना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

काही वेळातच पोलिसांनी बळाचा वापर करत रत्तीसह सर्व आंदोलनकर्त्यांना हॉलबाहेर घालवून दिले. त्या रात्री शांतारामाच्या चाळीत प्रचंड जनसभेचे आयोजन करण्यात आले आणि थोड्याच वेळेत लोकांनी वर्गणीद्वारे पासष्ट हजार रुपये जमवले. त्यातून काँग्रेस कार्यालयाच्या प्रांगणात जिनांच्या सन्मानार्थ पिपल्स जिना मेमोरियल हॉल बांधण्यात आला. त्या जुन्या आठवणींनी त्यांचे मन अस्वस्थ झाले. ते आत येऊन बसले आणि कार मलबार हिलच्या दिशेने निघाली. मरीन ड्राइव्हवरून जाताना उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांकडे पाहत ते म्हणाले, ‘फाति, आय लव्ह बॉम्बे अँड आय विल मिस हर.’

बॅ. जीनांच्या पत्नी - रतनबाई जीना

जिना साऊथ कोर्टला पोहोचले तेव्हा डॉ. जल पटेल त्यांची वाट पाहत बसले होते. जिना त्यांना घेऊन आपल्या स्टडीत गेले. फातिमाने स्टडीचा दरवाजा आतून बंद करून घेतला. कोट काढून सदऱ्याची बाही वर करत जिना खुर्चीत बसले. डॉक्टर पटेलांनी त्यांच्या दंडावर इंजेक्शन दिले. ‘आणखी किती दिवस शिल्लक आहेत डॉक्टर?’ जिनांनी डॉ. पटेलांकडे रोखून पाहत प्रश्न विचारला. टेबलावरील ऍश ट्रे मधे साचलेल्या सिगरेट्सच्या थोटुकांकडे पाहत डॉक्टर म्हणाले, ‘ह्या ट्रे मधील थोटुकांची संख्या जितकी कमी होईल तितके दिवस वाढत जातील.’ जीनांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेखा उमटली. ते म्हणाले, ‘पुढचे पंधरा दिवस निघून जावे. त्यानंतर काय होईल याची पर्वा मला नाही. डॉक्टर, आय आम रियली ग्रेटफूल टू यु फॉर किपिंग मी अलाइव्ह सो फार.’

फातिमा डॉक्टर पटेलांना घेऊन बाहेर गेल्या. जिनांनी बेल वाजवली. ऑर्डरली सीताराम क्षणात हजर झाला. जिनांनी त्याला खुर्शीदला बोलावण्यास सांगितले. जिनांचे खाजगी सचिव खुर्शीद हातामध्ये आलेल्या पत्रांच्या फाईल्स घेऊन त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले. त्यांनी फाईल्स टेबलवर ठेवल्या. ‘दिना मॅडमचे पत्र आले आहे,’ असे म्हणत त्यांनी हातातील पत्राचा लिफाफा जिनांना दिला. जिना त्यावरील दिना वाडिया ही अक्षरे न्याहाळून बघत असताना खुर्शीद म्हणाले, ‘कानजीभाई द्वारकादासांचा नोकर निरोप घेऊन आला आहे. त्यांनी आपल्याला भेटायची वेळ मागितली आहे.’ काही क्षण विचार करून ते म्हणाले, ‘त्यांना संध्याकाळी पाच वाजता बोलावून घे.’ जिनांनी लिफाफा उघडून पत्र वाचले आणि खुर्शीदला म्हणाले, ‘मिसेस वाडियांना उत्तर पाठवा की, कामाच्या व्यस्ततेमुळे भेट घेणे शक्य नाही.’ खुर्शीदला अपेक्षित होते की, मुंबईमधील वास्तव्याच्या शेवटच्या दिवशी तरी जिना राग बाजूला ठेवून आपल्या मुलीला भेटतील. त्यामुळे जीनांचे वाक्य ऐकून ते जरा चपापले. परंतु आता त्यात काही बदल होणार नाही, हे माहीत असल्याने ते मुकाट्याने बाहेर गेले. जिना ते पत्र हातात घेऊन रॉकिंग चेअरमध्ये जाऊन बसले. त्यांच्या ओठांवर शब्द उमटले ‘ग्रे वूल्फ’. दिना लहान असताना याच नावाने त्यांना हाक मारत असे. ‘भारतात करोडो मुसलमान तरुण आहेत. त्यापैकी एकाची तू पती म्हणून निवड का करत नाहीस?’ दिनाने उद्योगपती नेव्हिल वाडियाशी प्रेमविवाह करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा जिना रागाच्या भरात म्हणाले होते. दिनाने स्वभाव आपल्या वडिलांचाच घेतला होता. ती उलटून म्हणाली, ‘भारतात करोडो मुस्लीम मुली असताना, तुम्ही त्यांच्यापैकी एकीशी लग्न का केले नाही?’ दिना घर सोडून गेली. त्यानंतर जिना तिला कधीही भेटले नाही. ते मृत्यूच्या दारात उभे होते, याची पुसटशीदेखील कल्पना दिनाला नव्हती. तिला आपल्या मृत्यूची चाहूल लागू नये, असे जिनांना वाटत होते.

दुपारी जेवणाच्या वेळी जिनांना डायनिंग टेबलवर हॅम्लेटची प्रत दिसली. ‘हे पुस्तक इकडे कसे?’ जिनांनी पुस्तकाची पाने चाळत विचारले. ‘पुस्तकांची बांधाबांध करताना, हे चुकून बाजूला राहिले,’ फातिमा म्हणाल्या. जिनांनी उजव्या डोळ्यावर मोनोकल चढवला आणि हॅम्लेटचा प्रसिद्ध संवाद एका सराईत नाट्य कलाकाराप्रमाणे म्हणण्यास सुरुवात केली,

“To be, or not to be: that is the question:

Whether ’tis nobler in the mind to suffer

The slings and arrows of outrageous fortune,

Or to take arms against a sea of troubles,

And by opposing end them. To die: to sleep;”

फातिमा नेहमीप्रमाणे भारावून ऐकत होती.

‘कधी कधी मी विचार करते जिन की, लंडनमध्ये जर तू त्या नाटक कंपनीची ऑफर स्वीकारली असती आणि एक नट झाला असता तर?’ फातिमाने मिस्किलपणे विचारले.

‘तर मी जगातील सर्वश्रेष्ठ नट झालो असतो,’ मोनोकल काढत जिना आत्मविश्वासपूर्वक म्हणाले.

‘नाटक कंपनीची ऑफर नाकारून भारतात परत येण्याचा निर्णय घेतलास, तेव्हा दुःख झाले होते का?’

‘नाही फाति, आयुष्यात घेतलेल्या निर्णयांचा पश्चाताप मी कधी केला नाही.’

काही क्षण निःशब्दतेत गेल्यानंतर जिना म्हणाले, ‘To be or not to be या हॅम्लेटला पडलेल्या प्रश्नाचा स्पर्श मी स्वतःला कधी होऊ दिला नाही. I am a tenacious fighter. मी माझे निर्णय निर्धाराने घेतले आहेत आणि एकदा निर्णय घेतल्यानंतर मी कधीही माघार घेतलेली नाही.’

संध्याकाळी जिना बिलियर्ड्स रूममध्ये क्यु स्टिकने बॉलवर निशाणा लावत होते, तेव्हा कानजींचा तेथे प्रवेश झाला. बॉलवरून नजर न हटवता ओठांमधील सिगरेट सांभाळत जिना म्हणाले, ‘माय डिअर कानजी, तुझ्या येथे येण्यामुळे मला मनापासून आनंद झाला आहे.’

बॉल टोलावून झाल्यानंतर जिनांनी कानजींकडे हलकेसे स्मित करत पाहिले. ‘तर मग कायदे आझम आपण उद्या मुंबईला खुदा हाफिज करणार,’ कानजी म्हणाले.

‘कानजी, मला कायदे आझम म्हणू नकोस. तुझ्यासाठी मी तोच पूर्वीचा जिना आहे. ही गोष्ट वेगळी आहे की, आजकाल आरशात जेव्हा मी स्वतःला पाहतो तेव्हा कधी कधी मी स्वतःला ओळखू शकत नाही.’ दोघेही शेजारील खुर्चीत स्थानापन्न झाले.

‘पाकिस्तानबद्दल माझे आक्षेप तुम्हाला माहीत आहेत तरी लीगने मोठ्या प्रयासाने अखेर पाकिस्तान निर्माण केला याबद्दल कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.’

कानजींच्या डोळ्यांत रोखून पाहत जिना म्हणाले, ‘कानजी, लेट मी करेक्ट यु. पाकिस्तान लीगने नव्हे तर मी, माझ्या स्टेनोच्या मदतीने निर्माण केला आहे.’

‘नक्कीच,  गेल्या दहा वर्षांत तुम्ही जे साध्य केले आहे ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. तुम्ही आता खुश असाल.’

‘हुं. मला खूष असायला हवे जरी मिळालेला पाकिस्तान हा वाळवणे पोखरलेला आहे. देशाची फाळणी होणार हे वास्तव मी स्वीकारले आहे, पण माझ्या व्यक्तित्वातल्या दुभंगाचा स्वीकार अजूनही माझे मन करत नाही. त्या दुभंगाचा स्वीकार करू शकलो तर कदाचित मला आनंदाची अनुभूती मिळेल.’

काही क्षण शांततेत गेले आणि मग जिना म्हणाले, ‘देशाच्या फाळणीला गांधी आणि काँग्रेस जबाबदार आहेत. त्यांनी मला पाकिस्तान निर्माण करण्यास भाग पाडले.’

‘तुम्ही काँग्रेसला फाळणीसाठी जबाबदार धरतात, हे कदाचित एक वेळेस मी मान्य करेल पण गांधींना त्यासाठी दोषी ठरवणे, हे अन्यायकारक नाही काय?’

‘कानजी, अन्याय माझ्यावर झाला आहे. ते करणारे गांधी आहेत. काँग्रेस कोणी उभी केली? काँग्रेससाठी त्याग कोणी केला? आणि गांधी आमच्या डोक्यांवर पाय ठेवून सिंहासनावर जाऊन बसले.”

बॅ. जीना आपली एकुलती एक मुलगी दीनासह... उजवीकडे त्यांचीच उतारवयातली दोन छायाचित्रं

बोलता बोलता जिनांना खोकल्याची जोरदार उबळ आली. छातीला चोळत त्यांनी त्यावर नियंत्रण मिळवले आणि म्हणाले, ‘मी दादाभाई, फिरोजशाह आणि गोखलेंचा शिष्य आहे. सांप्रदायिकता मला स्पर्श करू शकत नाही. टिळकांनंतर काँग्रेसचे नेतृत्व करण्यास मीच सर्वयोग्य होतो. पण ज्या काँग्रेससाठी मी कष्ट उपसले ती काँग्रेस गांधी आल्यानंतर माझ्या त्यागाला विसरून गेली. गांधींना केवळ अनुयायी हवे होते सहकारी नव्हे. मी त्यांचे अनुयायीत्व नाकारले, तेव्हा मला अपमानित करण्यात आहे. मला लाथाडले गेले, तेव्हा केवळ माझी कौम माझ्या पाठीशी उभी राहिली. जेव्हा मी अवहेलनेच्या अंधकारात चाचपडत होतो, तेव्हा माझ्या कौमने मला उभारी दिली. मुसलमानांच्या न्याय्य मागण्या काँग्रेसने नाकारल्या. गांधींनी आपल्या प्रभावाचा उपयोग केला असता तर काँग्रेसला त्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या असत्या. गांधी आणि काँग्रेसचे सामाईक राष्ट्रीयत्व हा छुपा बहुसंख्यावाद आहे. मी हे चांगलेच ओळखतो. त्यामुळे माझ्या कौमच्या हितासाठी मला पाकिस्तान निर्माण करावा लागला.’

शेवटचे वाक्य पूर्ण करता करता जिनांना धाप लागली. ते जरा शांत झाले तेव्हा कानजी म्हणाले, ‘जिना, मी तुम्हाला नेहमी माझा एक चांगला मित्र समजत आलो आहे. तुमचा धर्म कधी माझ्या या भावनेच्या आड आला नाही. असा विचार करणारे अनेक लोक आहेत. उद्या तुम्ही मुंबई सोडून जाणार म्हणून तुमचा निरोप घेण्यासाठी आलो. जाताना केवळ एक प्रश्न विचारतो. हा प्रश्न मी माझ्या मित्राला विचारतो आहे ना की, कायदे आझमला. तुम्हाला खरोखर वाटते की, पाकिस्तान निर्माण होणे मुसलमानांच्या हिताचे आहे?’

बिलिअर्डस रूममध्ये अंधार पसरला होता. जिनांच्या चेहरा अंधारामुळे झाकोळला गेला होता. जिनांनी उत्तर दिले नाही. कानजी उठून उभे राहिले व म्हणाले, ‘तुम्हाला भावी वाटचालीसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. आपली काळजी घ्या.’

आपल्या मित्राची अशी अवस्था पाहून कानजींना अतिशय दुःख वाटत होते. साऊथ कोर्टमधून बाहेर पडताना कानजीभाईंना सरोजिनी नायडूंचे शब्द आठवले. त्या जिनांबद्दल एकदा म्हणाल्या होत्या, ‘तो ल्युसिफर आहे...’ देवलोकात राहणाऱ्या अनेक देवदूतांपैकी ल्युसिफर ईश्वराचा सर्वांत लाडका होता, कारण तो इतरांपेक्षा अधिक सुंदर आणि बुद्धिमान होता. परंतु एके दिवशी त्याच्या मनात आपल्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेबद्दल अहंकार निर्माण झाला. त्याचा निरागसपणा आणि विवेक लोप पावला. तो स्वतःला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ समजू लागला. ईश्वराने त्याला अपमानित करून देवलोकातून निष्कासित केले आणि शाप देऊन त्याच्या शरीरात अग्नीरूपी दाह निर्माण झाला. त्याच्या मनात ईश्वराविरुद्ध भडकलेला सूडाचा अग्नी त्याच्या शापित शरीरात धुमसणाऱ्या अग्नीपेक्षा अधिक दाहक होता. अस्वस्थ मन आणि शरीरामुळे तो नरक यातना भोगत राहिला.

१ ऑगस्ट १९४७ रोजी, दिल्लीतील १० औरंगझेब रोड या जीनांच्या बंगल्यात फाळणीनंतर भारतीय संविधान सभेचे सदस्य राहणाऱ्या लीगच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. काही दिवसांत जिना पाकिस्तानला जाणार होते. बंगल्याच्या दिवाणखाण्यात बसलेल्या प्रतिनिधींमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण पसरले होते. जिनांचा प्रवेश होताच सर्व सदस्य उठून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे भाव जिनांच्या नजरेतून सुटले नाहीत. फाळणीची रॅडक्लिफ योजना जाहीर होण्यापूर्वीच देशभर विशेषतः पंजाब, बंगालमध्ये दंगलींचा वणवा पसरला. मार्चमध्ये रावळपिंडी, मुल्तानमध्ये झालेल्या शीख-हिंदूविरोधी दंगलींचा प्रतिशोध पूर्व पंजाबमध्ये घेतला जात होता. कलकत्त्यामधील परिस्थिती स्फोटक बनली होती. लाहोर अधिवेशनानंतर कविकल्पनेप्रमाणे रम्य भासणारी पाकिस्तानची संकल्पना भारतीय मुसलमानांना फाळणी जवळ येता येता अधिकाधिक भेसूर वाटू लागली होती. चौधरी खलीकुझमान यांनी प्रास्ताविकाचे भाषण केले आणि कायदेआझमांना काही प्रश्न असतील तर ते विचारण्याचे आवाहन प्रतिनिधींना केले. हिम्मत करून रझिअनुल्लाह यांनी जिनांना विचारले, ‘कायदेआझम, फाळणीनंतर भारतात मागे राहणाऱ्या चार कोटी मुसलमानांनी पाकिस्तानात स्थलांतर करावे का?’

‘नाही. इतक्या मोठ्या संख्येने भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानात स्थलांतर केले तर  निर्वासितांच्या भाराने पाकिस्तान उभा राहण्यापूर्वीच कोलमडून पडेल,’ जिना म्हणाले.

‘पण कायदेआझम फाळणीनंतर भारतीय मुसलमानांची स्थिती फार बिकट होणार आहे. त्यांनी काय करावे?’ जिनांनी इतक्या थेट प्रश्नाची अपेक्षा केली नव्हती. पूर्वी जिना भाषणात भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानसाठी स्वतःला कुर्बान करावे, असे म्हणत. परंतु आज ते वाक्य उच्चारण्याची हिम्मत त्यांना होत नव्हती. पाच कोटी पाकिस्तानी मुसलमानांसाठी चार कोटी भारतीय मुसलमानांनी स्वतःचा बळी द्यावा, असे मी कसे म्हणू शकतो, असा विचार जिना करत होते. रझिअनुल्लाह जिनांकडे अपेक्षेने पाहत होते. सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले जिना आयुष्यात प्रथमतः अडखळत म्हणाले, ‘भारतीय मुसलमानांनी भारताप्रती एकनिष्ठ राहावे. भारताला येथील मुसलमानांना समानतेने वागवावेच लागेल कारण पाकिस्तानदेखील अप्लसंख्यांकांना त्याच पद्धतीने वागवणार आहे.’

रझिअनुल्लाह यांनी परत प्रश्न केला, ‘आपण जे म्हणतात ते तात्त्विकदृष्ट्या मान्य केले तरी वास्तवात सांप्रदायिक उन्मादाच्या धुंदीत पाकिस्तानमधील मुसलमान आणि भारतातील हिंदू आपल्या कृतीचे शेजारील देशातील आपल्या धर्मबांधवांवर काय परिणाम होतील, याची पर्वा करत नाही. पोलीस आणि लष्करदेखील त्यांच्यापुढे हतबल ठरतात. सध्या उसळलेल्या दंगलींवरून हेच स्पष्ट होत नाही का? अशा परिस्थितीत भारतीय मुसलमानांनी काय करावे?’

बॅ. जीनांच्या भगिनी - फातिमा जीना

दिवाणखाण्यात स्मशानशांतता पसरली. जिनांकडे त्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. ते ओळखून खलीकुझमान यांनी जिनांकडे वेळ कमी असल्याचे कारण सांगून बैठक संपवली आणि त्या लाजिरवाण्या परिस्थितीतून जिनांची सुटका केली. त्या प्रसंगाने सुन्न झालेले जिना कितीतरी वेळ स्टडीमध्ये एकाकी बसून राहिले.

७ ऑगस्ट रोजी सकाळी जिना पालम विमानतळावरून कराचीला जाण्यासाठी निघाले. त्या दिवशी त्यांनी सूटऐवजी पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. डोक्यावर पर्शिअन करकूल कॅप घातली होती आणि डोळ्यांवर काळा गॉगल लावला होता. व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांनी त्यांच्या प्रवासासाठी दिलेले सिल्वर DC३ विमान उड्डाणासाठी सज्ज होते. एस्कॉर्ट करत असलेल्या ADC सईद एहसानसह जिना आणि फातिमा विमानाच्या पायऱ्या चढत होते. विमानाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचेपर्यंत जिनांना धाप लागली. आपला हात छातीवर दाबत त्यांनी मागे वळून बघितले. दूरवर पसरलेल्या क्षितिजाकडे पाहत ते म्हणाले, ‘फाति, कदाचित मी अखेरचे दिल्लीला पाहत आहे.’

हळूहळू पावले टाकत ते आपल्या सीटवर जाऊन बसले आणि मोठ्याने श्वास घेऊ लागले. विमानाने आकाशात झेप घेतली तेव्हा ते स्वतःशीच म्हणाले, ‘That's the end of that’. संपूर्ण प्रवासात ते कोणाशी एक शब्ददेखील  बोलले नाही. जेथे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतित केले होते, ती भूमी आता त्यांना परकी झाली होती. ते जे गमावून बसले होते त्याचे वैषम्य त्यांना वाटत होते का? मागे राहिले होते अनेक मित्र आणि अनेक शत्रू. आयुष्यात असेही काही क्षण येतात, जेव्हा आपल्या शत्रूंबद्दलदेखील आपल्याला जिव्हाळा वाटतो.

विमान कराची विमानतळाच्या आसमंतात आले, तेव्हा फातिमाने पोर्ट होलमधून खाली पाहिले आणि त्या उत्साहाने म्हणाल्या, ‘जिन, इकडे खाली बघ.’ जिनांनी खिडकीतून खाली पाहिले. त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड जनसमुदाय लोटला होता. ‘हुं. बरेच लोक आले आहेत,’ ते शांतपणे म्हणाले. विमान खाली उतरले, तेव्हा त्यांच्या शरीरात त्राण उरला नव्हता. एहसानने आधारासाठी पुढे केलेला हात त्यांनी स्वीकारला नाही. ते सर्व बळ एकवटून उभे राहिले आणि समोरील जनसागराला सामोरे गेले. ‘पाकिस्तान जिंदाबाद! कायदे आझम जिंदाबाद!’ या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. विमानतळापासून गव्हर्नर हाऊसपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा लोक त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. जिना गव्हर्नर हाऊसच्या पायऱ्या हळूहळू चढत वर पोहोचले. तेथे श्वास घेण्यासाठी काही क्षण थांबले आणि एहसानकडे पाहून मंदपणे हसत म्हणाले, ‘माझ्या हयातीत पाकिस्तानचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा मी कधीही केली नव्हती.’ त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा गंभीर भाव पसरले.

..................................................................................................................................................................

जिना साऊथ कोर्टला पोहोचले तेव्हा डॉ. जल पटेल त्यांची वाट पाहत बसले होते. जिना त्यांना घेऊन आपल्या स्टडीत गेले. फातिमाने स्टडीचा दरवाजा आतून बंद करून घेतला. कोट काढून सदऱ्याची बाही वर करत जिना खुर्चीत बसले. डॉक्टर पटेलांनी त्यांच्या दंडावर इंजेक्शन दिले. ‘आणखी किती दिवस शिल्लक आहेत डॉक्टर?’ जिनांनी डॉ. पटेलांकडे रोखून पाहत प्रश्न विचारला. टेबलावरील ऍश ट्रे मधे साचलेल्या सिगरेट्सच्या थोटुकांकडे पाहत डॉक्टर म्हणाले, ‘ह्या ट्रे मधील थोटुकांची संख्या जितकी कमी होईल तितके दिवस वाढत जातील.’

.................................................................................................................................................................

११ ऑगस्ट हा पाकिस्तानच्या संविधान सभेच्या उदघाटनाचा दिवस होता. जिनांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत संवैधानिक चौकटीची मर्यादा नेहमी पाळली होती.  त्यांच्यासाठी तो फार महत्त्वाचा दिवस होता. उपस्थित प्रतिनिधींच्या टाळ्यांच्या कडकडाटात जिनांनी संविधान सभेचे अध्यक्षपद स्वीकारले. सभेला संबोधित करण्यासाठी ते उभे राहिले. सभागृहात उपस्थित प्रतिनिधींवर, प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या फातिमा आणि इतर अभ्यागतांवर त्यांनी नजर फिरवली. उजव्या डोळ्यावर मोनोकल चढवला आणि भाषणाचा कागद डोळ्यांसमोर धरला. त्या क्षणी अचानक त्यांचे  स्थान आणि काळाचे भान हरपले. कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर दिल्लीचे केंद्रीय कायदेमंडळ उभे राहिले. त्यांनी मोनोकल काढून पुन्हा एकदा उपस्थितांकडे पाहिले. या वेळी त्यांना पहिल्या रांगेत मधल्या आसनांवर दादाभाई, फिरोजशाह आणि गोपालकृष्ण गोखले बसलेले दिसले. ते आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत, असे त्यांना वाटले. प्रेक्षक गॅलरीकडे त्यांनी पुन्हा एकदा पाहिले. तेथे त्यांना रत्ती बसलेली दिसली. ती त्यांच्याकडे कौतुक आणि अभिमानाने पाहत होती. जिनांनी हातातील भाषणाचा कागद घडी करून शेरवाणीच्या खिशात ठेवला आणि उत्स्फूर्तपणे भाषणाला सुरुवात केली-

“माझ्या मते अविभक्त भारताची संकल्पना कधीही यशस्वी झाली नसती. त्यामुळे केवळ भयंकर विनाश ओढवला असता. कदाचित माझे मत बरोबर असेल किंवा ते चुकीचे असेल. ते भविष्यकाळ ठरवेल. झालेल्या फाळणीद्वारे निर्माण होऊ शकणारा अल्पसंख्याकांचा प्रश्न समाधानकारकरित्या सोडवणे भारत आणि पाकिस्तान दोघांनाही अशक्य होते. जे झाले ते झाले. त्यावर इतर कोणताही उपाय नाही. आता पुढे आपण काय केले पाहिजे? जर तुम्ही भूतकाळ विसरून आपसांतील भांडणांना मूठमाती देऊन एकमेकांना सहकार्य केले, तर तुम्हाला यश अवश्य मिळेल. जर तुम्ही एकमेकांच्या रंग, जाती आणि धर्माची पर्वा न करता समान हक्क आणि कर्तव्य असलेले पाकिस्तानचे समान नागरिक म्हणून परस्पर सहकार्याने काम करू लागलात, तर तुमच्या प्रगतीला कोणतीही सीमा राहणार नाही. हिंदूंमध्ये ज्याप्रमाणे ब्राह्मण, वैष्णव, खत्री, बंगाली, मद्रासी आदी भेद आहेत, त्याप्रमाणे मुसलमानांमध्येदेखील पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी आदी भेद आहेत. काळासोबत बहुसंख्य आणि अल्पसंख्य समुदाय, हिंदू आणि मुसलमान, हे भेददेखील लुप्त होतील. मी ठामपणे सांगतो की, हे भेदच स्वातंत्र्यप्राप्तीच्या मार्गांमध्ये सर्वांत मोठा अडथळा ठरले होते. ते नसते तर आपण फार पूर्वी स्वतंत्र झालो असतो. या पाकिस्तान राष्ट्रात तुम्ही आपल्या मंदिरांमध्ये, मशिदींमध्ये किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळी जाण्यास स्वतंत्र आहात. तुम्ही कोणत्या धर्म, जाती किंवा पंथाचे आहात, याच्याशी राज्याचा काही संबंध नाही. आपण सर्व एका राष्ट्राचे समान नागरीक आहोत, या मूलभूत तत्त्वाच्या आधारावर आपण पहिले पाऊल पुढे टाकत आहोत. कालप्रवाहात राजकीयदृष्ट्या हिंदू हे हिंदू राहणार नाहीत आणि मुसलमान हे मुसलमान राहणार नाहीत. न्याय आणि संपूर्ण निष्पक्षता हीच माझी मार्गदर्शक तत्त्वे राहणार आहेत. माझा विश्वास आहे की, तुमच्या सहकार्य आणि समर्थनाच्या आधारावर, एक दिवस पाकिस्तान जगातील सर्वात महान राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसेल.”

भाषण संपले तेव्हा आपल्याला प्रचंड थकवा आल्याचे जिनांना जाणवले. त्यांना खोकल्याची उबळ आली. त्यांनी आधारासाठी डेस्कवर हात टेकवले आणि वर पाहिले. समोर दादाभाई, फिरोजशाह आणि गोखले नव्हते. प्रेक्षक गॅलरीत रत्तीदेखील नव्हती. त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी सभागृहात सर्वत्र पाहिले, पण ते कोठेही दिसले नाही. त्यांच्याऐवजी लीगचे प्रतिनिधी असलेले मुल्ला, पीर, नवाब, जमीनदार त्यांच्याकडे साशंक नजरेने पाहत असल्याचे त्यांना दिसले. आपण कोठे येऊन पोहोचलो आहोत, याची जाणीव जिनांना झाली…

(जिनांच्या ११ ऑगस्टच्या ऐतिहासिक भाषणातील परिच्छेद कोणताही बदल न करता कथेत समाविष्ट केला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)

..................................................................................................................................................................

लेखक श्याम पाखरे के. सी. महाविद्यालयामध्ये (चर्चगेट, मुंबई) इतिहास विभागात सहायक प्राध्यापक आहेत.

shyam.pakhare111@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा