इस्मत चुगताई : रूढी-परंपरांच्या ‘सरळ रेषे’पुढे ‘तिरकी रेष’ काढणारी बंडखोर लेखिका
दिवाळी २०२१ - विशेष लेख
नानासाहेब गव्हाणे
  • इस्मत चुगताई
  • Thu , 28 October 2021
  • दिवाळी २०२१ विशेष लेख इस्मत चुगताई Ismat Chugtai टेढ़ी लकीर Tedhi Lakeer लिहाफ Lihaaf

इस्मत चुगताई या भारतातील ख्यातनाम उर्दू लेखिका. त्यांना ‘इस्मतआपा’ म्हणून ओळखलं जातं. उर्दू साहित्यात सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई, कृष्ण चंदर आणि राजेंद्र सिंग बेदी हे कथेचे चार स्तंभ मानले जातात. त्यातही समीक्षकांनी मंटो आणि इस्मत यांना उच्च स्थान दिलं आहे. कारण त्यांची भाषा, पात्रे, समस्या आणि परिस्थिती यांनी उर्दू साहित्याला एक नवी ओळख आणि बळ दिलं.

इस्मतआपांना जाऊन कालच्या २४ ऑक्टोबर रोजी ३० वर्षं पूर्ण झाली. त्यांचं साहित्य आजही केवळ समकालीनच नव्हे, तर जिवंत आणि टवटवीत आहे. इस्मतआपांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच लेखनाला सुरुवात केली आणि आपली अनोख्या जीवनदृष्टी व कथनाच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे त्या उर्दू साहित्याच्या शीर्षस्थानावर विराजमान झाल्या.

महिलांचे प्रश्न नव्या जाणीवेनं मांडणाऱ्या त्या उर्दू साहित्यातील सर्वांत वादग्रस्त आणि प्रमुख लेखिका होत्या. उर्दू कथा-कादंबऱ्यांमध्ये त्यांनी खालच्या म्हणजेच निम्न मध्यमवर्गीय मुस्लीम वर्गाची अत्याचारी आणि निराशाजनक स्थिती, विशेषत: तरुण मुलींच्या मनःस्थितीचं विदारक सत्य मांडलं आहे.

इस्मतआपांचा जन्म २१ ऑगस्ट १९१५ रोजी उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये नुसरत-कासिम बेग चुगताई या दाम्पत्याच्या पोटी झाला. अरेबिकमध्ये ‘इस्मत’ या शब्दाचा अर्थ शालीन, नम्र, पवित्र असा होतो. वडील न्यायाधीश असल्यानं त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे इस्मत यांचं बालपण अलीगढ, आग्रा, जोधपूरसह अशा अनेक शहरांमध्ये गेलं. त्या वेळी त्यांनी जी भारतीय संस्कृती पाहिली, अनुभवली त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात काही प्रमाणात पाहायला मिळतं. लहानपणापासूनच वाचनाचे संस्कार त्यांच्यावर झालेले होते. लोकांना जे आवडतं ते मी कधीच लिहिणार नाही, मला जे वाटतं तेच मी लिहीन, हा त्यांनी केलेला निश्चय आयुष्याच्या अखेरपर्यंत प्राणपणानं जपला.

..................................................................................................................................................................

लेखणीबरोबरच इस्मतआपांची जीभही फटकळ, तिखट आणि हजरजबाबी होती. त्यांच्यासंदर्भात हे जगजाहीर आणि रूढ मानलं जात असे की, त्या मैफलीत विजेप्रमाणे तुटून पडतात आणि ज्याच्यावर कोसळत त्याला भस्मसात करून टाकत. मात्र दुर्दैवानं अखेरच्या दिवसांमध्ये गप्पा मारता मारता मध्येच त्यांची तार तुटत असे, त्या अचानक बहकून जात. त्यांची स्मृती विस्कळीत होत असे.

.................................................................................................................................................................

त्यांची ‘गेंदा’ ही पहिली कथा त्या काळातील ‘साकी’ या सर्वोत्कृष्ट साहित्यिक मासिकात १९४९मध्ये प्रकाशित झाली आणि १९४१मध्ये ‘जिद्दी’ ही पहिली कादंबरी. इस्मत चुगताई यांचा कॅनव्हास खूपच विस्तृत होता. त्यात अनुभवाचे विविध रंग कोरले गेले आहेत. ‘टेढी लकीर’ या कादंबरीत त्यांनी स्वत:चं जीवन मुख्य कथानक बनवून स्त्रीच्या जीवनात तिला भेडसावणाऱ्या समस्या आणि समाजाचं चित्र स्त्रीच्याच दृष्टिकोनातून मांडलं आहे. त्या खऱ्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या ‘लिहाफ’ या कथेमुळे. १९४१मध्ये लिहिलेल्या या कथेत त्यांनी महिलांमधील समलैंगिकतेचा मुद्दा मांडला होता. त्या काळात अशी कथा, तीही एका स्त्रीलेखिकेनं लिहिणं हे मोठं धाडसाचं काम होतं. अर्थात इस्मतआपांना त्याची किंमत अश्लीलतेचे आरोप आणि खटल्यांच्या रूपात चुकवावी लागली. या वादग्रस्त ठरलेल्या कथेसाठी त्यांच्यावर लाहोर उच्च न्यायालयात खटला चालवला गेला. जो नंतर काढून टाकण्यात आला.

७० वर्षांपूर्वी पुरुषप्रधान समाजात स्त्रियांच्या प्रश्नांना स्त्रियांच्या दृष्टिकोनातून आणि प्रस्थापित समाजव्यवस्थेला झळ लागेल, अशा पद्धतीनं मांडण्याची जोखीम त्यांनी पत्करली. त्यांच्या कथांमध्ये स्त्री, तिच्या अस्तित्वाच्या लढ्याशी संबंधित मुद्दे हिरीरीनं मांडलेले दिसतात. साहित्य आणि समाजात सुरू असलेल्या महिलांच्या चर्चेला त्यांनी महत्त्व दिलं. यावरून त्यांचं साहित्य आणि त्यांचा विचार काळाच्या किती पुढचा होता, हे स्पष्टपणे दिसून येतं. आपल्या कथांमध्ये त्यांनी स्त्रीपात्रांना अतिशय गांभीर्यानं उभं केलं. त्यामुळे त्यांची पात्रं जीवनाला अगदी जवळून भिडताना पाहायला मिळतात. महिलांच्या प्रश्नांसोबतच त्यांनी समाजातील कुप्रथा, व्यवस्था आणि इतर व्यक्तिरेखाही अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडल्या. त्यांच्या बोलण्यात कमालीचा उपहास, उपरोध आणि विडंबनाची झालर पाहायला मिळत असे.

हिंदी आणि उर्दूच्या मर्यादेत पकडता येत नसलेली गंगाजमनी भाषा त्यांनी आपल्या लेखनात वापरली. त्यांची भाषा, तिचा ओघ आश्चर्यकारक आहे. त्यांच्या साहित्यकृती लोकप्रिय होण्यामागे याच गंगाजमनी भाषेनं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या लेखनामधील सर्वांत आकर्षक गोष्ट म्हणजे त्यांची निर्भीड शैली. त्यांनी स्वत:च्या तिखट, धारदार जिभेनं महिलांची ओळख आपल्या साहित्यात करून दिली. त्यांच्या शैलीत प्रत्ययकारिता दिसते. त्यांनी अत्यंत परखड आणि निर्भीडपणे लेखन केलं.

इस्मतआपा एके ठिकाणी म्हणतात, “मुझे रोती बिसूरती, हराम के बच्चे जनती, मातम करती स्त्रीत्व से नफ़रत थी। वफ़ा और जुमला खूबियां जो औरत का ज़ेवर समझी जाती हैं, मुझे लानत महसूस होती हैं। भावनाओं से मुझे सख़्त कोफ़्त होती है। इश्क़ मज़बूत दिल-ओ-दिमाग़ है न कि जी का रोग। ये सब मैंने रशीद आपा से सीखा।”

इस्मतआपांच्या कथांचं केंद्र निम्न मध्यमवर्गीय मुस्लीम समाजाचं चरित्रचित्रण आहे. या वर्गातल्या महिला अनेक कारणांनी शोषणाला बळी पडतात, कायम एका विशिष्ट स्वरूपाच्या मानसिक दबावात वावरताना दिसतात, वरकरणी त्या आनंदी दिसतात, परंतु त्यांच्या अंतर्मनाची स्थिती अत्यंत त्रासदायक असते. इस्मतआपांनी बुरख्यामध्ये राहणाऱ्या महिलांची कामवासना आणि मानसिक कोंडी यावर अतिशय खुलेपणानं लिहिलं. जीवनाच्या प्रत्येक वळणावर इस्मतआपा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या. त्यांच्या प्रत्येक पावलावर, हालचालीवर लोकांच्या नजरा खिळलेल्या असत.

जेव्हा इस्मतआपा यशोशिखरावर होत्या, तेव्हा त्यांनाही मंटोप्रमाणेच विवादास्पद ठरवण्यात आलं. उर्दू साहित्य-समीक्षेनं त्यांच्या कथालेखनातलं मर्म जाणलं नव्हतं. परंतु काळाच्या प्रवाहात त्यांच्या कलाकृतींचं तेज वाढत गेलं आणि बघता बघता त्या साहित्याच्या केंद्रवर्ती स्थानी पोहोचल्या.

इस्मतआपा स्त्रियांच्या दुरवस्थेसाठी त्यांच्या ठायी असलेल्या निरक्षरतेलाच कारणीभूत मानत. त्यांनी विपुल लेखन केलं. गर्भवती आणि आजारी असताना त्यांनी सात-आठ दिवसांत ‘टेढी लकीर’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिली. तीत त्यांनी त्यांच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतचे अनुभव आणि निरीक्षणं अतिशय सुंदरपणे मांडली आहेत. त्यातून समाजातील धार्मिक, सामाजिक आणि वैचारिक अशा सर्व पैलूंवर कठोर टीका आहे.

या कादंबरीला त्यांच्या आठ कादंबऱ्यांमध्ये - प्रेमचंदांच्या कादंबऱ्यात जसं ‘गोदान’ला स्थान आहे तसंच - महत्त्वाचं स्थान आहे. ‘जिद्दी’, ‘मासुमा’, ‘दिल की दुनिया’, ‘एक कतरा खून’, ‘बहरूप’, ‘सौदाई’, ‘जंगली कबूतर’, ‘अजीब आदमी’ आणि ‘बंदी’ या त्यांच्या इतर कादंबऱ्या. त्यांना स्वतःला ‘दिल की दुनिया’ ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी वाटते. ‘लिहाफ़’, ‘चौथी का जोड़ा’, ‘जवानी’, ‘बिच्छू फूफी’, ‘हिन्दुस्तान छोड़ दो’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या. ‘जुगनू’ या चित्रपटामध्ये अभिनयही केला होता. १९४३मध्ये आलेला ‘छेडछाड’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्या एकूण १३ चित्रपटांशी जोडल्या गेल्या. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘गर्म हवा’ला (१९७३) अनेक पुरस्कार मिळाले.

याशिवाय त्यांना १९७४ साली ‘टेढ़ी लकीर’साठी गालिब अवार्ड, १९७६ साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, ‘इक़बाल सम्मान’, मखदूम अवार्ड, नेहरू अवार्ड इत्यादी महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

त्यांचे हिंदीत ‘कुंवारी’ आणि इतर अनेक कथासंग्रह प्रकाशित झाले. इंग्रजीत त्यांच्या तीन कथासंग्रहांचा अनुवादही झाला आहे. त्यापैकी ‘कलियां’ हा कथासंग्रह खूप लोकप्रिय ठरला. कथालेखिका शबनम रिझवी यांनी इस्मत चुगताई यांच्या डझनभर कथांचं हिंदी भाषांतर आणि ‘टेढी लकीर’ या कादंबरीचं लिप्यंतरण केलं आहे. त्यांचं उर्दूतील ‘इस्मत चुगताई की नोवेलनगरी’ हे पुस्तक १९९२मध्ये प्रकाशित झालं. त्या आता हिंदीत ‘इस्मत चुगताई ग्रंथावली’ची तयारी करत आहेत.

लेखणीबरोबरच इस्मतआपांची जीभही फटकळ, तिखट आणि हजरजबाबी होती. त्यांच्यासंदर्भात हे जगजाहीर आणि रूढ मानलं जात असे की, त्या मैफलीत विजेप्रमाणे तुटून पडतात आणि ज्याच्यावर कोसळत त्याला भस्मसात करून टाकत. मात्र दुर्दैवानं अखेरच्या दिवसांमध्ये गप्पा मारता मारता मध्येच त्यांची तार तुटत असे, त्या अचानक बहकून जात. त्यांची स्मृती विस्कळीत होत असे. जलश्यांमधील जुने दिवस व त्यांच्या अपूर्ण आठवणी त्या ऐकवत. त्यांच्या स्मरणशक्तीवर वाढत्या वयाचा अंमल आणि ताबा पाहायला मिळत होता. त्या वारंवार भूतकाळातील भुलभुलैय्यामध्ये हरवून जात असत.

अशा या सशक्त, वादळी लेखन करणाऱ्या लेखिकेनं मृत्युनंतरही खळबळ माजवलीच! २४ ऑक्टोबर १९९१ रोजी त्यांचं निधन झालं आणि उर्दू साहित्याच्या आकाशात लखलखणारा एक देदीप्यमान तारा निखळला. निधनानंतर त्यांचं मृत्युपत्र समोर आलं. त्यामध्ये त्यांनी आपल्याला दफन करण्याऐवजी दहन करण्यात यावं, असं लिहून ठेवलं होतं. त्यावरून पुढे उर्दू साहित्यजगतात अनेक दिवस वाद-विवाद झडत राहिले.

त्यांनी असं का केलं असावं? कारण त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही, कोणत्याच धर्माचं आचरण आणि अंगीकार केला नाही. त्या मुस्लीम कुटुंबात जन्माला जरूर, मात्र समज आल्यापासून त्यांनी कधीच त्या धर्माचं पालन केलं नाही. ना कधी नमाज अदा केली, ना रोजा (उपवास) ठेवला, ना कोणताही इस्लामी सण-उत्सव हर्षोल्हासात साजरा केला. मात्र याचा अर्थ असा नाही की, त्यांनी कधी कुणाच्या भावनांचा अनादर केला. वास्तविक पाहता त्यांच्यासाठी सगळे धर्म एकसारखेच होते. हिंदुस्तानातील सगळे सण-उत्सव त्या आनंदानं साजरे करत असत. त्या कोणत्याच सण-समारंभाविषयी उदासीन नसत. त्यांना दोन मुली. दोन्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकल्या. दोघींनीही आपल्या मर्जीप्रमाणे हिंदू मुलांशी लग्न केलं. दहनाच्या निर्णयामागे हे कारण होतं का? तर तसंही नाही. त्याकडे त्यांच्या जिद्दी आणि तिरकस स्वभावाचा एक पैलू म्हणूनच पाहावं लागतं.  

इस्मतआपांनी आयुष्यभर सांप्रदायिक आणि सामाजिक, धार्मिक रूढी-प्रथा-परंपरांच्या विरोधात आपली लेखणी चालवली. त्या नेहमी रूढी-परंपरेच्या सरळ रेषेच्या पुढे एक तिरकी रेष तत्परतेनं ओढत असत. त्या जगभरातील माणसांना केवळ ‘माणूस’च समजत-मानत आणि कोणत्याही धर्माच्या चक्रात त्याला अडकवत नसत. याच कारणांमुळे उर्दूच्या रूढीप्रिय लेखकांमध्ये त्यांच्याबद्दल नापसंतीचा सूर होता. नाराज नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं जात असे.

उत्तरकाळात त्यांनी एके ठिकाणी मोठ्या उपहासात्मक आणि विनोदी शैलीत लिहून ठेवलेलं आहे- ‘‘मरने के बाद मुझे समंदर में फेंक दिया जाए, ताकि मछलियों के पेट में जाकर कांटा बनू और किसी बहुत ज्यादा भाषण देनेवाले के गले में फंसकर किसी नेकी का सबब बनू!”

..................................................................................................................................................................

इस्मतआपा एके ठिकाणी म्हणतात, “मुझे रोती बिसूरती, हराम के बच्चे जनती, मातम करती स्त्रीत्व से नफ़रत थी। वफ़ा और जुमला खूबियां जो औरत का ज़ेवर समझी जाती हैं, मुझे लानत महसूस होती हैं। भावनाओं से मुझे सख़्त कोफ़्त होती है। इश्क़ मज़बूत दिल-ओ-दिमाग़ है न कि जी का रोग। ये सब मैंने रशीद आपा से सीखा।”

.................................................................................................................................................................

अंत्ययात्रेसाठी इस्मतआपांच्या मुलींकडचे आप्तस्वकीय, नातेवाईक आले होते. मात्र त्यांच्या अंत्ययात्रेत उर्दूतील कोणताही नामवंत लेखक सामील झाला नव्हता. अली सरदार जाफरी आले होते, पण केवळ अंत्यदर्शन घेऊन अंत्ययात्रा निघण्यापूर्वीच निघून गेले. नंतर इतर अनेक मोठ्या लेखकांनी अंत्ययात्रेला पोहोचू न शकल्याबद्दल रडगाणी गात वेगवेगळी कारणं दिली. इतक्या मोठ्या व महत्त्वपूर्ण लेखिकेच्या अंतिम दर्शनासाठी हिंदीतील काही लेखक व चित्रपटसृष्टीतील काही व्यक्तींशिवाय कोणीही उपस्थित नव्हतं.

इस्मतआपांच्या निधनाची वार्ता वृत्तपत्रांना मिळाली होती आणि त्यांना त्यांच्या अखेरच्या इच्छेविषयीही समजलं होतं. परंतु ते त्यांच्या कुटुंबातील कुणा सदस्यानं जाहीर केलेलं नव्हतं. त्यामुळे काही काळ संभ्रम आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा एक सद्गृहस्थ एका तरुणाचा हात पकडून वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींसमोर आले. त्याने आपला परिचय इस्मतआपांच्या मुलीचा मुलगा असा करून दिला, आणि सांगितलं की, आजीच्या मृत्युपत्रानुसार त्यांना अग्निडाग देण्यासाठी स्मशानात घेऊन जाण्यात येईल. स्थिती स्पष्ट झाली. मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांना अग्नीला समर्पित करण्यात आलं.

उर्दूतील लेखक मंडळी त्यांच्या अंतिम विदाईच्या वेळी त्यांना खांदा देण्यासाठी का आले नाहीत? विशेषत: प्रगतिशील लेखकांनाही कट्टरपंथियांची भीती वाटत होती की, त्यांनी जोपासलेली प्रगतीशीलता केवळ ढोंग होतं?    

..................................................................................................................................................................

लेखक नानासाहेब गव्हाणे साहित्याचे अभ्यासक आहेत.

gavhanenanasahebcritics@gmail.com 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा