जुनं जाण्याचं वाटतं तितकं दु:ख उरत नाही; नव्या गोष्टी येऊ दिल्या तर!
दिवाळी २०२१ - विशेष लेख
सोनाली नवांगुळ
  • लेखिका सोनाली नवांगुळ कोयनानगरमध्ये
  • Tue , 26 October 2021
  • दिवाळी २०२१ विशेष लेख सोनाली नवांगुळ Sonali Navangul कोयनानगर Koyananagar करोना Corona वाईल्ड Wild शेरिल स्ट्रेड Cheryl Strayed

मला वाटायचं, घर इतकं सोयीचं आहे, आवडीचं आहे... मला बाहेर जावंसंच वाटत नाहीये. कामापासून मनोरंजनापर्यंत सगळं काही तर आहे इथं. तसंही शारीरिक मर्यादांमुळे माझ्या बाहेर येण्या-जाण्यावर बर्‍यापैकी अडथळे होते, असणारच आहेत कायम. कधी ते अडथळे पायाभूत सुविधांचे, तर कधी समोरच्या माणसांना स्वाभिमान नावाची चीज असते, याची माणसांना समजूत नसण्याचे, तर कधी खिसा गरम नसण्याचे. आता हा करोना काही अचानक येऊन माणसांचा समंजसपणा वाढवणार नाहीये, उगीच फिक्शन कशाला लिहायचं? तरी आपली ताकद वाढवत राहायचे मार्ग शोधत राहायला हवेत, हे मात्र जाणवलंच.

माझे डॉक्टर अजित कुलकर्णी करोनातून बरे होण्याच्या स्टेजला पोहोचले, तेव्हा मला फोनवर म्हणाले होते, “आता आपण संपतोय ही जाणीव होते, तेव्हा वेगळंच वाटायला लागतं. आहे तो क्षण आपला हेच सत्य. शरीराची काळजी घ्यायची. व्यायाम आपण घरी करतो हे बरोबर, पण करोनाविषयीचे सगळे संकेत पाळून जरा प्रतल बदलून पाहायचं. शरीराला नवी तरतरी येते.”

असं प्रतल बदलायचीच मला भीती वाटायची. हळूहळू पॉवरचेअरने रंकाळ्यापर्यंत जाऊन, संपूर्ण काळजी घेऊन भीती कमी करत आणली. आणि जवळपास वर्षभरानं परवा एक मैत्रीण नि माझी सहकारी मंदा अशा दोघींना घेऊन चक्क एक ट्रीपच ठरवली- कोयनानगरला. हे काही टुरिस्ट डेस्टिनेशन नाही, पण वाटत होतं, कुठंतरी शांत जाऊन बसावं... माझी आत्या तिथं राहत असताना व मला चालता येत होतं, तेव्हा मी या रस्त्यावर चालले होते... त्यातलं काही उसवता येतं का ते बघावं...

पॅराप्लेजिक माणसाला प्रवास, त्यातून येणारा आत्मविश्‍वास याची सतत प्रॅक्टिस करावी लागते, नाहीतर उंबर्‍याबाहेर पडताना भीती वाटते. ती भीती किती साठून बसलेय नि मोडता येते का हेही बघावं... असं सगळं करून आम्ही बाहेर पडलो. सतत वाटत होतं, महत्त्वाचं काही घ्यायचं विसरलेय मी. औषधांपैकी काही राहिलंय का? कॅथेटरमधून युरिन तर नीट जातेय ना? पोटात कळ येतेय का? अखेर लाऊडस्पीकरवरून धडधड ऐकू येतेय की, काय असंही वाटलं, पण त्याकडं रॉकबँडचा ठेका म्हणून बघत गाणं गुणगुणत प्रवासाला सुरुवात केली... एकेक चिंता ‘धूसर’ व्हायला लागल्या.

अचानक ‘वाईल्ड’ कादंबरीतली पॅसिफिक क्रेस्ट ट्रेलला जाणारी शेरिल स्ट्रेड आठवली. ‘काही गोष्टींमुळे आपण जगतो, तरतो, खडे राहतो आणि काही गोष्टींनी आपण मोडून पडतो. या सगळ्यांसह जे रसायन बनतं, ते आपण असतो’ याची जाणीव झालेली! खाजगी नात्यांची पडझड, प्रिय व्यक्तीला गमावणं, दुखावणं, दुखावून घेणं, सगळ्यांचंच टोक गाठलं जाऊन भिरभिरल्यासारखं होणं, अशी अवस्था झालेली शेरिल एका अवघड प्रवासाला निघते. जय्यत तयारी करते. या एकटीच्या प्रवासात तिला ‘ती’ सापडते. दु:ख संपत नाही, पण समजुतीची सुरुवात होते. आपल्या आतल्या निरनिराळ्या भुतांना सामोरं जाणं, जमलंच तर काही घरं रिकामी करणं, काहींशी बोलणी करून घेणं नि रांग सुरळीत करण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच तर प्रवास. आपली इच्छा असेल तर त्यात खूप काही बदलतं... नसली तरी काही बदल अपरिहार्यपणे घडतात. डॉक्टर म्हणतात तसं प्रतल बदलण्याचा परिणाम होतोच.

वेळेवर निघालो. एक टप्पा पार पडला. न्याहारीसाठी ठरवलेलं हॉटेल मागं पडलं तरी चिडचिड नाही केली. भलतीच समजूत आली फार काळ प्रवास हुकल्यामुळे. कहर म्हणजे ज्या मोठ्या हॉटेलात न्याहारी केली, ती अगदीच बेचव असूनही मूड हलका विनोदी राहिला. खराब रस्त्याची कटकट झाली नाही. एका मित्रानं, विनायकनं सुचवल्यामुळे पाटणच्या अलीकडच्या नदीकिनाऱ्यावरच्या ‘देवराई’त अलवार चविष्ट बटाटाभजी नि कडक कॉफी पिण्याच्या सुखामुळे शत्रूंच्याही चुका माफ कराव्यात, अशी दयार्द्र भावना जागी झाली. ऊन बरंच होतं, पण व्हीलचेअरला सोयीची नदी न्याहाळण्याची जागा मिळाली. कुत्र्याचं एक पिलू गोल गोल डोळ्यांनी निरखून लाड करायला भाग पाडत होतं. मन सैल होत होतं.

आत्तेबहिणीचा, वृषालीचा मित्र विक्रम घड्याळे कोयनानगरच्या एसटीस्टँडवर आमची वाट बघत होता. त्याच्या गाडीचा मागोवा घेत त्याच्या ‘वृंदावन हॉलिडे होम’वर पोहोचलो. झाडीझाडीतून नि लाल मातीच्या बारक्याशा पण पक्क्या रस्त्यावरून जाताना मजा वाटत राहिली. हॉलिडे होमचा परिसर राखलेल्या बागेनं तजेलदार दिसत होता. आत उतरायला चार पायर्‍या होत्या, पण विक्रम आणि त्याचे मित्र अगदी सहजपणानं पुढे आले नि त्यांनी मला आमच्या खोलीपर्यंत पोहोचवलं. विक्रमनी सांगितल्याप्रमाणे बाथरूममध्ये व्हीलचेअर नेता येत होती. एक मोठं टेन्शन सरलं!

फ्रेश होऊन मी, माझी बालमैत्रीण तायडी उर्फ वैदेही आणि मंदा तिघी गाणी म्हणत बसलो. जुनी जुनी. हादग्याची. दहावीपर्यंतच्या काही कविता आठवून म्हटल्या. भूषण कोरगावकर, सावित्री मेधातुल आणि आकांक्षा कदम या धमाल मित्रांनी शिकवलेली बैठकीची लावणी मी साभिनय म्हटली. गमतीजमतीत जेवलो. दुपार संपता संपता विक्रम नि त्यांचे पक्षीवेडे मित्र आम्हाला एका जागी घेऊन गेले. रस्ता जवळपास निर्मनुष्य नि कमाल शांतता असणार्‍या त्या जागी खालून वाहणार्‍या कोयना नदीच्या पात्राकडं बघत मी एकदम शांत झाले. कुठल्याही तर्‍हेचा कचरा नसणारा तो भवताल जणू या जगातला नव्हताच. त्या शांततेत आमची कुजबूजही आवाजी वाटत होती.

नदी खालून वाहत होती नि वरून आम्ही समोरच्या किनार्‍यावरच्या झाडांतली हालचाल बघत होतो. माकडांचा खेळ चालू होता. नदीच्या प्रवाहाला अगदी चाटून काही पक्षी उडत होते. मासा सापडला की, सूर मारून आत प्रवाहात घुसत होते. काही मिनिटांनी बाहेर पडत होते. कितीतरी रंगांचे कितीतरी लहानमोठे पक्षी. कितीतरी आवाज. त्यांच्या नावांचे, सवयींचे, विशिष्ट जातींचे तपशील विक्रमचा मित्र देत होता. ते सगळं काही डोक्यांत ठरत नव्हतं, कारण अशा तर्‍हेनं एकाग्रपणे झाडं नि पक्षी बघण्याची संधीच मुळात माझ्यासारख्यांना किती असते? इतकंच खरं की, त्या शांततेत काहीतरी विलक्षण होतं.

..................................................................................................................................................................

कधीतरी स्वत:च्या पायांनी चालता येण्याच्या लहानपणाच्या काळाबद्दल वाटलं होतं, तसं काहीच नाही आठवलं. मनात ती गोष्ट किंचितही तरळून गेली नाही. चालता येत असताना या ठिकाणी मी शेवटची चालले ते कुठून तरी दिसेल, जाणवेल वाटलं होतं, पण तसं झालं नाही. जगण्याच्या प्रवासात खूप महत्त्वाच्या आहेत, अशा वाटणार्‍या गोष्टी आपण सहजच पाण्यात दिवा सोडून द्यावा तशा सोडून दिलेल्या असतात. 

.................................................................................................................................................................

संध्याकाळ हळूहळू मुरत चालली होती. सावकाशीनं उजेडात अंधार मिसळत गेला. पाण्याचा रंग बदलत गेला. गारवा कसा टप्प्याटप्प्यानं वाढतोय ते कानाच्या पाळीपाशी, नाकाच्या शेंड्याजवळ जाणवत होतं. साकुराची आठवण करून देणारं समोरचं गडद गुलाबी मोठाल्या फुलांनी भरलेलं झाड धूसर धूसर होत गेलं. पक्ष्यांच्या आवाजात बदल होत गेला. जुने आवाज विरले, नवे उगवले, तेही निवळत गेले. उठवत नव्हतं तिथून. काहीच न करता निव्वळ शांत बसून नदी निरखणं नि पक्ष्यांच्या आवाजाची बारकाईनं कानातून मेंदूत साठवण करणं हा अनुभवच वेगळा होता. उद्या सकाळी सूर्योदय बघायला वेगळ्याच ठिकाणी जायचं होतं.

सकाळी सहालाच पठारवजा जमिनीच्या तुकड्याच्या टोकाशी जाऊन स्थिरावल्यावर बघितलं, तर खोलवर समोर धरणाच्या मागच्या भागातला पसरलेला पाणीसाठा. दक्षिण भारतासारखा आकार आलेल्या पात्राकडं बघत वरवर नजर लावली, तर तिसरी-चौथीत चित्रकलेच्या तासाला काढलेल्या डोंगररांगा आठवल्या. अगदी तशाच गडद कडून फिकट होत गेलेल्या काळपट राखाडी रंगाकडं बघताना त्यामध्ये साठलेला फिकट केशरी रंग उजळत जाताना दिसला. हळूहळू. पक्ष्यांचे तर्‍हतर्‍हेचे आवाज. बाकी कसलाच कोलाहल नाही. सनराईज पॉइंट म्हणून कसलीच दिखावू योजना नाही. सूर्य वर येण्याचं कसलंच चिन्हं दिसेना, पण गारठ्यामुळे अंगाला गुंडाळलेल्या गरम कपड्यात नि त्याला बिलगून असलेल्या नैसर्गिक शांततेत एक तंद्री लागली होती. म्हटलं, बरं वाटतंय पण सूर्य आज उगवण्याच्या मन:स्थितीत नाही की काय!

तितक्यात विक्रमने बोट दाखवून म्हटलं, तिकडे बघा. डोंगररांगात केशरी रंगांच्या विविध छटांचा तो गोलाकार जणू चित्र वाटत होता. काही मिनिटांत तो गडद होत गेला. चित्र पूर्ण करावं म्हणून की काय, चार पक्षी इकडून तिकडे उडाले. एका वेळी तर तो गोळा इतका केशरीबुंद नि चकाकता झाला की, मटकावून टाकावा ही इच्छा झाली. एरवी सृष्टीत रोजच घडणारी ही गोष्ट एकाग्रतेनं बघितल्यावर किती निराळी भासली!

पुन्हा एकदा शेरिल स्ट्रेड आठवली. ट्रेलच्या अखेरच्या टप्प्यात असताना दमून गेलेली, पाय सोलवटून गेलेली शेरिल मनाच्या उलथापालथीतून स्थिरावलेली असते. अशाच ट्रेलला आलेली तिच्या आईच्या वयाची बाई तिथंच पोहोचलेली असते. दोघी मिळून स्तब्ध बसलेल्या असतात. नुकत्याच वारलेल्या आईची स्मृती शेरिलच्या मनात जागी होते. ती जागी असतेच, पण आता ती शब्दात बोलते. संभाषण सुरू करताना स्टेसी विचारते, “एकटं वाटतं का?” शेरिल म्हणते, “माझ्या रोजच्या आयुष्यात जितका एकटेपणा जाणवतो, त्यापेक्षा इथं फिरताना तसा कमीच वाटतो. मित्रमैत्रिणींची आठवण येते, पण घरी माझी वाट बघणारं कुणी नाही.” पुढं स्टेसीला ती हाच प्रश्‍न विचारते. स्टेसी म्हणते, “माझ्यातलं काहीतरी शोधायला मी इथंवर आलेय. या हवेत तुमच्या आतली पोकळी भरून तुम्हाला ताजं करणारं काहीतरी सापडतंच. फक्त ते तुम्ही स्वत:च्या आत येऊ दिलं पाहिजे.” यावर शेरिल सहजपणानं स्वत:च्या आईबद्दल बोलायला लागते. म्हणते, “आई हे असलं काही बोलायला लागली की, मला खुळ्यागत व्हायचं. रागच यायचा. ती सूर्योदय नि सूर्यास्ताबद्दल बोलत राहायची. म्हणायची, मुद्दाम वेळ काढून आपण त्या क्षणाचे साक्षीदार व्हायला हवं. सृष्टीच्या सौंदर्याचा तुम्ही एक भाग बनता अशानं.”

मला नदीकाठी नि सूर्य उगवते वेळी तेच आठवत होतं. रक्ताचा शांत वाहणारा उबदार प्रवाह जाणवत होता. जणू काहीतरी नवीन घडत होतं शरीरात, सूर्योदयासारखं, अदभुत!

वृषालीनं आणि पाटबंधारे खात्यात कार्यकारी अभियंता असणार्‍या तिच्या नवर्‍यानं, सचिन चव्हाण यांनी आणखी एक चकित करणारं नियोजन आखून ठेवलं होतं. आनंद मोरे या आपल्या अधिकारी मित्राला नि सहकार्‍यांना सांगून त्यांनी कोयना धरण बघता यावं म्हणून कागदपत्रं मागवून माझा व माझ्यासोबत असणार्‍यांचा पास काढायला घेतला होता. दरम्यान ‘नेहरू स्मृती उद्याना’च्या शंभरभर पायर्‍यांवर व्हीलचेअर चढवून विक्रम नि आमचे चालक सुनील परीट यांनी मला हेलावून टाकलं होतं. मदत देणार्‍यामध्ये मदत घ्यावी लागते, त्यांना लहान करत नेणारा भाव नसेल तर दोघांमध्ये एक छान अनुबंध तयार होतो. तसाच काही अनुभव त्या वेळी आला. उद्यानाच्या टोकावर असणार्‍या छोट्याशा सिनेमाघरात कोयना धरणाच्या पाच टप्प्यांची छोटी फिल्म बघितल्यावर रोमांचक वाटायला लागलं. तिथल्या किरण जाधव नावाच्या व्यवस्थापकानं आपणहून सांगितलं, “मी खालपर्यंत तुम्हाला सोडायला येतो.” वाटलं, आणखी काय हवं! इतकं सहजसोपं, कुणाच्याही गरजेसाठी न सांगता उभं राहॉता आलं पाहिजे...

नुकतीच कोयना धरणावरची फिल्म पाहून आल्यामुळे धरणाच्या भिंतीवरून चेअर चालवताना विशेष वाटत होतं. केवढी प्रचंड बुद्धिमत्ता नि उत्कटता यांचा संगम आहे हे काम! तांत्रिक माहिती जाऊ दे, ती मिळते गुगलवर... पण पाण्याचा तो महासाठा, ती भक्कम बांधणी, ते अजस्त्र दरवाजे, आशियातला पहिला लेक टॅपिंगचा प्रयोग... विहंगम हा एकच शब्द सुचत होता समोरचा नजारा बघून. काही वेळाने सुरक्षेची सगळी काळजी घेऊन लिफ्टमधून २८० मीटर खोल उतरत आम्ही चिंचोळ्या गल्लीत प्रवेश केला. धरणाच्या भिंतीत मुरणारं पाणी तिथल्या बांधीव गटारांमधून वाहत होतं. भिंतीला हात लावून ती अगम्यता अनुभवली... थंडगार भिंत नि तिच्यामुळे, तिच्या पोटाशी अडून असलेला पलीकडचा महाप्रचंड पाणीसाठा. मी पुन्हा पुन्हा तो गारवा अनुभवत होते. आश्‍चर्य मनात साठवत होते. तिथल्या रचनेबद्दल तंत्रज्ञ सांगत होते, तेव्हा त्याचं मनातल्या मनात भावनिक निरूपण करत होते.

पुन्हा धरणाच्या भिंतीवर आल्यावर तिथं चालता चालता तिथले सपकाळ साहेब म्हणाले, “खूप मोठमोठ्या इंजिनिअर्सनी या प्रकल्पावर मनापासून काम केलंय. प्रत्येकाच्या हकीकती आहेत भरपूर. तुम्ही स्वच्छतेचा उल्लेख केलात म्हणून आमच्या देऊसकर साहेबांविषयी सांगतो. या प्रकल्पाविषयी इतकी टोकाची आस्था की, इथल्या कामकाजाचं निरीक्षण करताना फिरणं व्हायचं तेव्हा ते कुठल्यातरी कोपर्‍यात पडलेला कागदाचा कपटाही उचलून घ्यायचे. कचरा गोळा करत कामावर लक्ष ठेवायचे. त्यांच्यासाठी हे काम कुठल्या पूजेपेक्षा कमी नव्हतं. असे मन अर्पण करणारे अधिकारी या प्रकल्पाला लाभलेत.”

..................................................................................................................................................................

पॅराप्लेजिक माणसाला प्रवास, त्यातून येणारा आत्मविश्‍वास याची सतत प्रॅक्टिस करावी लागते, नाहीतर उंबर्‍याबाहेर पडताना भीती वाटते. ती भीती किती साठून बसलेय नि मोडता येते का हेही बघावं... असं सगळं करून आम्ही बाहेर पडलो. सतत वाटत होतं, महत्त्वाचं काही घ्यायचं विसरलेय मी. औषधांपैकी काही राहिलंय का? कॅथेटरमधून युरिन तर नीट जातेय ना? पोटात कळ येतेय का? अखेर लाऊडस्पीकरवरून धडधड ऐकू येतेय की, काय असंही वाटलं, पण त्याकडं रॉकबँडचा ठेका म्हणून बघत गाणं गुणगुणत प्रवासाला सुरुवात केली... एकेक चिंता ‘धूसर’ व्हायला लागल्या.

.................................................................................................................................................................

आधुनिक तीर्थस्थळ का म्हटलं जातं, अशा प्रकल्पांना त्याचा असा भावनिक संदर्भ अचानकच लागला. तितक्यात कोपर्‍यातून एक जाडजूड साप सळसळत नाहीसा झाला. आम्ही दचकलो. सपकाळसाहेब म्हणाले, “शेवटी हे जंगल आहे. तिथं असतंच असं काही. या भिंतीवर वाघही आलेला पाहिलाय आम्ही.”

दुपार टळून गेलेली. परतायचे वेध सुरू झालेले. जे सापडावं वाटत होतं इवलुश्या प्रवासात त्याहून निराळंच गाठी आलं होतं. त्याचा ताजेपणा हुरूप आणणार होता... परतीच्या प्रवासात लक्षात आलं, कधीतरी स्वत:च्या पायांनी चालता येण्याच्या लहानपणाच्या काळाबद्दल वाटलं होतं, तसं काहीच नाही आठवलं. मनात ती गोष्ट किंचितही तरळून गेली नाही. चालता येत असताना या ठिकाणी मी शेवटची चालले ते कुठून तरी दिसेल, जाणवेल वाटलं होतं, पण तसं झालं नाही. जगण्याच्या प्रवासात खूप महत्त्वाच्या आहेत, अशा वाटणार्‍या गोष्टी आपण सहजच पाण्यात दिवा सोडून द्यावा तशा सोडून दिलेल्या असतात. जुनं जाण्याचं वाटतं तितकं दु:ख उरत नाही; नव्या गोष्टी येऊ दिल्या तर!

शेरिल स्ट्रेडच्या शब्दांत सांगायचं तर - “डोक्यावर टोपी किंवा मुंडासं असण्याशी, पायात बर्‍या चपला असण्याशी किंवा अगदी तुमच्या पाठीवरची सॅक, त्या त्या विशिष्ट काळाचं तत्त्वज्ञान किंवा अमुक बिंदूपासून तमुकपर्यंत जाण्याची महत्त्वाकांक्षा अशा कशाशीच या गोष्टीचा संबंध नाही. अनावर असताना कसं वाटतं, याचा मात्र या सगळ्याशी संबंध नक्की आहे. कुठलाही विशिष्ट उद्देश मनात न ठेवता तासनतास मैलोनमैल चालत झाडं, कुरणं, डोंगर, वाळवंट, नाले-ओढे, दगडधोंडे, गवतांची पाती, सूर्योदय नि सूर्यास्त या सगळ्यांसह भवताल बघत पुढं पुढं सरकणं व्हायला हवं...हा अनुभव कमाल असतो... ताकद देतो, मुळातून पाहायची नजर देतो. या सगळ्या जंगलातून, जटिलतेतून फिरताना जाणवतं आपण माणूस असण्याबद्दल. जोवर हे जंगल शिल्लक आहे, तोवर माणूस असणार आहे. त्यातून मूलभूताकडे जाता येणार आहे.”

कुठलाही प्रवास शेवटी काय असतो? सखोल शिरता येण्याची आसच... सखोलतेत खोलवर दु:ख आहे नि अमाप सुख. जे येऊ द्याल ते आत येईल. म्हणून तर नेहरू पार्कमध्ये फिरताना खाली पडलेल्या पांढर्‍या चाफ्याची अंगठी करून मी बोटात घातली. उन्हाची तिरीप हातावर झेलली. त्या तिरीपेचं बोट धरून मी बरंच चालेन म्हणते...

..................................................................................................................................................................

‘मध्यरात्रीनंतरचे तास’ - सलमा, अनुवाद - सोनाली नवांगुळ

मनोविकास प्रकाशन, पुणे, मूल्य - ५०० रुपये.

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4187/Madhyaratrinanantarche-Tas

..................................................................................................................................................................

लेखिका सोनाली नवांगुळ स्तंभलेखिका, अनुवादक, मुलाखतकार आणि गप्पिष्ट आहेत.

sonali.navangul@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा