ऑस्कर वाइल्ड जीवनदृष्टीच्या आणि विनोदाच्या जोरावर इंग्रजीतील ‘अफॉरिझम्स’चा अनभिषिक्त सम्राट बनला!
दिवाळी २०२१ - विशेष लेख
श्रीनिवास जोशी
  • डब्लिन येथील ऑस्कर वाईल्ड संस्मरणीय शिल्पाकृतीची छायाचित्रं Oscar Wilde Memorial Sculpture in Dublinऑस्कर वाइल्ड
  • Tue , 26 October 2021
  • दिवाळी २०२१ विशेष लेख ऑस्कर वाईल्ड Oscar Wilde मार्क ट्वेन Mark Twain जॉर्ज बर्नार्ड शॉ George Bernard Shaw विन्स्टन चर्चिल Winston Churchill

सन अठराशे चौपन्न ते एकोणीसशे एवढ्या छोट्या आयुष्यात ऑस्कर वाइल्डने श्रेष्ठ अशी विनोदनिर्मिती केली. आकाशगंगेत ज्याप्रमाणे आपल्या तेजाने चमकणारे असंख्य तारे असतात, त्याप्रमाणे ऑस्कर वाइल्डच्या साहित्याचे तारांगण त्याच्या बुद्धीच्या तेजाने चमचमणाऱ्या विनोदांनी खचाखच भरून गेलेले दिसते.

ऑस्कर वाइल्ड असो किंवा मार्क ट्वेन असो, अथवा जॉर्ज बर्नार्ड शॉ असो किंवा चर्चिलसारखा पहिल्या दर्जाच्या विनोद निर्मितीसाठी प्रसिद्ध लेखक असो; त्यांच्या विनोदनिर्मितीमागे आपल्याला एक तत्त्वज्ञ सापडतो. अतिशय गंभीर जीवनदृष्टी असल्याशिवाय विनोदनिर्मिती शक्य होत नाही. मानवी जीवन आणि साहित्याची अखंड परंपरा यांचे सखोल भान असल्याशिवाय श्रेष्ठ स्वरूपाची विनोदनिर्मिती होत नाही. न्यायनिष्ठा, तत्त्वनिष्ठा, सत्यनिष्ठा आणि एक दुर्दम्य आदर्शवाद उराशी जपलेला असेल तरच वरच्या दर्जाची विनोदनिर्मिती शक्य होते. विनोदाचे स्वरूपच असे असते की, या गंभीर व्यक्तिमत्त्वांना उथळपणाचा मुखवटा चढवावा लागतो. उथळपणाच्या मुखवट्याच्या मागूनच आपल्या गंभीर जीवनदृष्टीला साहित्यस्वरूप द्यावे लागते.

ट्वेन, शॉ आणि चर्चिल या सगळ्यांना भरपूर आयुष्य प्राप्त झाले. ट्वेन पंचाहत्तर वर्षे जगला, शॉ आणि चर्चिल यांनी तर नव्वदी पार केली. वाइल्डला जेमतेम पंचेचाळीस वर्षांचे आयुष्य मिळाले. एवढ्या छोट्या आयुष्यात त्याने विलक्षण जीवनदृष्टी प्राप्त केलेली दिसून येते.

या जीवनदृष्टीच्या आणि त्याला प्राप्त झालेल्या विनोदाच्या जोरावर तो इंग्रजी भाषेतील ‘अफॉरिझम्स’चा अनभिषिक्त सम्राट बनला. ‘अफॉरिझम्स’ म्हणजे जीवनविषयक सत्ये प्रतीत करणारी चपखल निरीक्षणे.

विनोदी लेखक ज्याप्रमाणे उथळ मुखवटा घेऊन विनोदाद्वारे गंभीर जीवनदृष्टी मांडतात, त्याचप्रमाणे ते कधीकधी गंभीर चेहरा ठेवूनही विनोदनिर्मिती करताना दिसतात. मार्क ट्वेनने लिहिले आहे – ‘I believe that our Heavenly Father invented man because he was disappointed in the monkey.’ साधे वाक्य. मार्क ट्वेनचा मिष्किल अर्थ लक्षात यायला दोन सेकंद लागतात आणि मग हास्याचा स्फोट होतो. उत्क्रांतीवादाच्या उफराटी अधोक्रान्त जीवनदृष्टी!

..................................................................................................................................................................

मार्क ट्वेन, ऑस्कर वाइल्ड, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि विन्स्टन् चर्चिल ही माझ्या मते तात्त्विक विनोदाची चार तीर्थक्षेत्रे आहे. बाकीच्या तिघांना त्यांच्या हयातीतच जगभर प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळाली. लवकर गेल्यामुळे ऑस्कर वाइल्ड या सर्वांपासून वंचित राहिला. नुसताच वंचित राहिला नाही तर - तुरुंगवास, दिवाळखोरी आणि लोकोपवाद हे सारे त्याच्या नशिबाला आले.

.................................................................................................................................................................

वाइल्ड उथळपणाचा मुखवटा घेऊन विनोद करत राहिला. समाजातल्या भोंगळ आदर्शवादाची आणि दांभिक जीवनदृष्टीची टर उडवत राहिला. पण, त्याने आपला मुखवटा कधीही काढला नाही. हे जग जसे आहे, तसे बघण्याचे वरदान विनोदी लेखकांना असते. त्यांना हा शाप असतो असेही म्हणता येईल. त्यामुळेच कित्येकदा, अनेक लोकांना, विनोदी लेखक सिनिक वाटतात. वाइल्ड लिहितो - “Cynicism is merely the art of seeing things as they are instead of as they ought to be.” पण, सिनिकल जीवनदृष्टीमधील त्रुटी वाइल्डला दिसते. सिनिसिझमकडेसुद्धा तटस्थपणे पाहायला हवे ना! त्याचा लॉर्ड डार्लिंग्टन म्हणालेला आहे की – ‘Cynic is  ‘a man who knows the price of everything and the value of nothing.’ ’

वाइल्ड इतक्या लहान वयात आपला सर्व काळ आणि समाज अतिशय तटस्थपणे बघू शकत होता. लेखकाने तटस्थ राहण्याची गरज त्याला माहीत होती. ऑक्सफर्डच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांसमोर दिलेल्या व्याख्यानात वाइल्ड म्हणतो – ‘He who stands most remote from his age is he who mirrors it best.’

आपण जसे आहोत, त्यापेक्षा फार फार भारी आहोत, हे समाजाला दाखवण्याच्या वृत्तीतून दांभिकतेचा उगम होतो. बहुतांश लोकांकडे स्वतःचे विचार नसतात, मग ते दुय्यम दर्जाच्या कलेकडून जगण्याचे पॅटर्न्स उधार घेतात. त्यातून दांभिकता जन्माला येते. सारा समाज कृत्रिम उपचारांमध्ये - कृत्रिम मॅनर्समध्ये - बुडून जातो. त्याचमुळे वाइल्डने लिहिले आहे – ‘Life imitates art far more than art imitates Life.’

सत्य आणि समाज यांचे फारसे बरे नसते. त्याचमुळे त्याचा जॅक आपल्या मित्राला सांगतो – ‘The truth isn't quite the sort of thing that one tells to a nice, sweet, refined girl.’ संस्कारक्षम वयात सत्य काय आहे, हे तरुण मुलीला सांगितले गेले, तर या दांभिक जगात तिचे काय होणार? लग्नाच्या बाजारात तिचे काय होणार? आणि मुख्य म्हणजे कुठल्या अस्सल स्त्रीला सत्य सांगितलेले आवडते? आयुष्यातला रस कायम राहिला पाहिजे. भावना महत्त्वाची सत्य नाही.

पैशाविषयी वाइल्ड लिहितो – ‘When I was young I thought that money was the most important thing in life; now that I am old I know that it is.’ या वाक्यातल्या शेवटच्या फिरकीनंतर हास्याचा स्फोट होतो. हा विनोद सिनिकल जीवनदृष्टीमधून आला आहे असे वाटते, पण तसे नाही. वाइल्ड आत कुठेतरी आदर्शवादीसुद्धा आहे, स्वप्नीलसुद्धा आहे. त्याच्या ‘क्रिटिक् अॅज आर्टिस्ट’ या निबंधात तो लिहितो –‘Yes, I am a dreamer. For a dreamer is one who can only find his way by moonlight, and his punishment is that he sees the dawn before the rest of the world.’ हे वाक्य वाचल्यावर चंद्रप्रकाशात रस्ते शोधण्याची क्षमता असलेल्या आणि इतरांपेक्षा अधिक लवकर पहाट बघण्याची शिक्षा झालेल्या या कवीस, पैशावरचा वरील विनोद करताना किती वेदना झाल्या असतील, असा विचार आपल्या मनात येतो.

‘ड्रीमर’ असण्याची शिक्षा वाइल्डने भरपूर भोगली, त्या अनुभवातूनच तो पुढे लिहितो – ‘Society often forgives the criminal, it never forgives the dreamer.’ पण त्याचा मानवजातीवर राग नाही. मानव वाईट आहे असे तो म्हणत नाही. तो म्हणतो – ‘It is absurd to divide people into good and bad. People are either charming or tedious.’

लोक संपूर्णपणे चांगले किंवा वाईट नसतात. लोक चार्मिंग किंवा बोअरिंग असतात इतकेच! विनोदी लेखक नुसतेच जीवन पाहत नाही. जीवन कसे आहे, हे सांगण्याची एक तिरकी पद्धत त्याला प्राप्त झालेली असते.

स्वतःच्या दिसण्याबद्दल स्त्री कधीच समाधानी नसते, हे सांगताना वाइल्ड म्हणतो – ‘As long as a woman can look ten years younger than her own daughter she is perfectly satisfied.’

वाइल्डच्या विनोदात विखार नाही. कारण त्याला मनुष्याची असहाय्यता आणि त्या असाहय्यतेचे मुख्य तात्त्विक कारण पूर्णपणे माहीत आहे. मनुष्याच्या असहाय्यतेवर तो लिहितो – ‘Life is not governed by will or intention. Life is a question of nerves and fibres and slowly built-up cells, in which thought hides itself and passion has its dreams.’

माणसाला वर वर वाटत असते की, आपल्या जवळ निश्चयाची शक्ती आहे. त्यामुळे तो स्वतःला आणि दुसऱ्यांना जबाबदार धरत असतो. पण वाइल्डला जाणीव आहे की, माणूस म्हणावा तेवढा स्वतंत्र नाहिये. मज्जांच्या आणि मज्जापेशींच्या समूहात मनुष्याचे विचार आत आत खोलवर दडलेले असतात आणि त्या जंजाळातच आत आत कुठेतरी मनुष्याच्या इच्छांतून जन्मलेली त्याची स्वप्नेसुद्धा लपलेली असतात. त्यामुळे वाइल्ड मनुष्याला आणि अशा मनुष्याच्या समाजाला त्याच्या उणीवांसाठी संपूर्णपणे जबाबदार धरत नाही.

मनुष्य खोटे बोलत असतो आणि खोटे बोलण्यात आपण यशस्वी झालो आहोत, असे त्याला वाटत असते. त्याच्यापासून लपलेल्या त्याच्या स्वतःच्या भावना आणि त्याची स्वप्ने, पिकलेल्या फणसाच्या वासाप्रमाणे त्याच्या नकळत सर्वदूर पसरत असतात. माणूस कितीही खोटे बोलत राहिला तरी त्याला खरे काय म्हणायचे आहे, हे इतरांना पूर्णपणे कळत असते. वाइल्ड गालातल्या गालात हसत लिहून जातो – ‘It is a terrible thing for a man to find out suddenly that all his life he has been speaking nothing but the truth.’ या वाक्याचे हसूही येते आणि मन उदासही होते. पण तरीही खोटे बोलण्याचे मानवाच्या आयुष्यातील स्थान वाइल्डला माहिती आहे. सामाजिक जीवनाचा डोलारा मुख्यतः खोटे बोलण्यावर आणि दांभिकतेवरच उभारला गेलेला असतो. तो मिष्किलपणे लिहितो – ‘One should never trust a woman who tells one her real age. A woman who would tell one that would tell one anything.’

नैसर्गिक भावना जेवढ्या दाबाल तेवढी तुमची पत समाजात वाढते. हे असे का होते, हे सांगताना वाइल्ड लिहितो – ‘To be natural is to be obvious, and to be obvious is to be inartistic.’

मानवी आयुष्याचा उफराटा न्याय वाइल्डला चांगलाच परिचित आहे. तो लिहितो – ‘Anyone can sympathise with the sufferings of a friend, but it requires a very fine nature to sympathise with a friend's success.’ मित्राच्या दुःखाकडे कुणीही सहानुभूतीने बघेल, त्याच्या यशाकडे सहानुभूतीने बघण्याचे कुणालाही सुचत नाही. यशसुद्धा माणसापुढे अनेक प्रश्न तयार करते. यशाचा उन्माद येऊन माणूस दुःखी बनतो, यशामुळे माणूस एकटा पडतो, स्वतःविषयी जास्त अपेक्षा तयार होउन यशाच्या मागे धावू लागतो, किंवा पुढचे कार्य करण्यासाठी घाबरू लागतो. या सर्वाविषयी कोण सहानुभूती दाखवणार?

यश हीसुद्धा एक ट्रॅजडीच आहे. ‘There are only two tragedies in life: one is not getting what one wants, and the other is getting it.’

सहानुभूतीचा विषय सुरू आहे म्हणून आठवले, वाइल्ड लिहितो – ‘It is so easy for people to have sympathy with suffering. It is so difficult for them to have sympathy with thought.’ किती खरं वाक्य! विचारांवरून किती खून पडले आहेत या जगात, किती हत्या झाल्या आहेत, किती वध झाले आहेत!

मला सतत वाटत राहते की, वाइल्ड त्याच्या विनोदातून आयुष्यावर गंभीर टिप्पणी करत राहिला आहे. मार्क ट्वेनने लिहिलेला छोटा हकलबरी फिन अनेक किस्से घडवत राहतो. त्या छोट्या जिवाचा कॉन्फिडन्स आपल्याला हसवत राहतो, त्याच्या जीवनावरच्या कॉमेंट्स आपल्याला हसवून लोळवतात, पण हे सर्व करताना हक फिन सातत्याने लहान मुलामधली उपजत नैतिकता प्रतीत करत राहतो. मानवात उपजतपणे असलेल्या नैतिकतेची जाणीव आपल्याला करून देत राहतो. त्याचमुळे हेमिंग्वे म्हणाला की, ट्वेनच्या ‘हकलबरी फिन’ या कादंबरीने किमान दीडशे तरी कादंबऱ्यांना जन्म दिला आहे. वाइल्डने हक फिनसारखे पात्र तयार केलेले नाही. त्यामुळे त्याच्यावर टीकाही होते. त्याने हक फिनसारखे पात्र तयार करून अनेक कादंबऱ्यांना प्रेरणा दिली नाही, हे खरे आहे, पण त्याचा चार्म त्याच्या बुद्धिमत्तेत आहे. त्याची बुद्धिमत्ता इतकी तीव्र होती की, प्रत्येक लेखकाला असे वाटत राहते की, वाइल्डने जे विनोद केले, त्या प्रतीचा एक तरी विनोद आपल्या हातून केला जायला हवा. या अर्थाने वाइल्डने कित्येकांना प्रेरणा दिलेली आहे.

..................................................................................................................................................................

वाइल्ड उथळपणाचा मुखवटा घेऊन विनोद करत राहिला. समाजातल्या भोंगळ आदर्शवादाची आणि दांभिक जीवनदृष्टीची टर उडवत राहिला. पण, त्याने आपला मुखवटा कधीही काढला नाही. हे जग जसे आहे, तसे बघण्याचे वरदान विनोदी लेखकांना असते. त्यांना हा शाप असतो असेही म्हणता येईल. त्यामुळेच कित्येकदा, अनेक लोकांना, विनोदी लेखक सिनिक वाटतात. वाइल्ड लिहितो - “Cynicism is merely the art of seeing things as they are instead of as they ought to be.” पण, सिनिकल जीवनदृष्टीमधील त्रुटी वाइल्डला दिसते. सिनिसिझमकडेसुद्धा तटस्थपणे पाहायला हवे ना!

.................................................................................................................................................................

एका स्फूर्तीच्या क्षणी वाइल्ड लिहून जातो – ‘Some cause happiness wherever they go; others whenever they go.’ त्याच झोकात वाइल्ड लिहून जातो- ‘One can resist everything except temptation.’

माणूस त्याने फार बारकाईने पाहिला होता, मानवी मनाचे विविध खेळ त्याला पाठ होते – ‘There is always something ridiculous about the emotions of people whom one has ceased to love.’ हे वाक्य वाचल्यावर आपण खुश होऊन जातो, हे वाक्य लिहिल्यावर वाइल्ड किती खुश झाला असेल! “l like men who have a future and women who have a past.” पैसा असल्याशिवाय पुरुष चार्मिंग आहे असे वाटत नाही आणि चारित्र्यावर डाग असल्याशिवाय स्त्री चार्मिंग आहे, असे वाटत नाही. हा खरा फुल फॉर्ममधला वाइल्ड!

समाज काय आहे, हे त्याला चांगलेच माहिती होते, पण हा समाज कुठे चालला आहे, याचीसुद्धा त्याला चांगलीच जाण होती. “We live in an age when unnecessary things are our only necessities.” हे वाक्य वाइल्डने आपल्याच सद्य समाजाविषयी नुकतेच लिहिले आहे, असे वाटत राहते. खरा लेखक सार्वकालिक असतो. तो कालबाह्य झाला आहे असे कधीच वाटत नाही.

वाइल्डच्या नाटकांमध्ये भावनेचे खेळ पाहायला मिळत नाहीत. जॉर्ज बर्नार्ड शॉने लिहिल्याप्रमाणे त्याची स्वतःची आणि वाइल्डची नाटके खोट्या भावनांपासून दूर होती. हे विनोदी नाटकांचे ‘आयरिश स्कूल’! शॉ लिहितो की, वाइल्डने इंग्लंडला ‘प्ले ऑफ आयडियाज’ म्हणजे काय ते शिकवले.

नाटकात विचारांचे आणि तत्त्वज्ञानाचे द्वंद्व पाहिजे. भावना-भावना काय खेळत बसायचं? शॉ लिहितो – ‘Wilde taught that ‘a play’ may be a playing with ideas instead of a feast of sham emotions….’ वाइल्ड हा संपूर्ण नाटककार होता. शॉ त्याच्याविषयी लिहितो – ‘In a certain sense Mr Wilde is our only thorough playwright. He plays with everything: with wit, with philosophy, with drama, with actors and audience, with the whole theatre.’

विनोद, विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा, तत्त्वज्ञान, नाट्य, कलाकार आणि प्रेक्षक या सर्वांशी तो संपूर्ण नाटकभर खेळत राहताना दिसतो. स्त्री-पुरुष नात्याविषयी लिहिताना तर वाइल्ड बहार आणतो. स्त्री आणि पुरुषांच्या जीवनदृष्टीतील फरक तो फार मार्मिकपणे दाखवून देतो. “Men always want to be a woman's first love. That is their clumsy vanity. Women have a more subtle instinct about things. What they like is to be a man's last romance.” स्त्रीला आणि पुरुषाला किती ओळखलं होतं वाइल्डनं!

वाइल्डचे स्त्रीविषयीचे अजून एक अमर वाक्य म्हणजे – ‘Women are made to be loved, not understood.’ हे सुद्धा किती खरं. स्त्रीवर प्रेम करता येईल तुम्हाला, तीसुद्धा तुमच्यावर प्रेम करेल. पण ती कळणार आहे का कधी तुम्हाला?

वाइल्ड पुरुषांनासुद्धा सोडत नाही. ‘You should never try to understand women. Women are pictures, men are problems.’ हे वाक्य म्हणजे तर निर्मळ सत्य आहे, हे कोणीही प्रामाणिक पुरुष कबूल करेल. “The Book of Life begins with a man and a woman in a garden. It ends with Revelations.”

तात्त्विक विनोदाची चार तीर्थक्षेत्रे : मार्क ट्वेन, ऑस्कर वाइल्ड, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि विन्स्टन् चर्चिल

आयुष्याचे पुस्तक बागेतल्या रोमान्समध्ये रमलेल्या स्त्री-पुरुषांपासून सुरू होते. त्याचा अंत दोघांनाही दुसरा नक्की काय आहे ते कळून चुकण्यात होतो. प्रणयाचा किती दुःखदायक अंत! दोघांनाही दुसरा काय आहे ते कळून चुकल्यावर दोघांनाही एकमेक बोअर होतात. या गोचीवर वाइल्ड लिहितो – ‘In married life three is company and two is none.’

लग्नावर वाइल्डचे अजून एक अनमोल रत्न म्हणजे – ‘Men marry because they are tired, women because they are curious. Both are disappointed.’ लग्नसंस्थेची चेष्टा करताना वाइल्ड अक्षरशः धमाल उडवतो. ‘The happiness of a married man depends on the people he has not married.’ पण त्याला लग्नसंस्थेचा बळकट पायासुद्धा माहीत आहे. “There's nothing in the world like the devotion of a married woman. It's a thing no married man knows anything about.”

विवाहित स्त्रीसारखी अमर्याद निष्ठा कुणापाशीही असू शकत नाही. तिच्या प्रेमाच्या माणसांसाठी ती कितीही आणि काहीही करायला तयार असते. या निष्ठेच्या पायावर लग्नसंस्था उभी आहे, याचे भान वाइल्डकडे होते. पण या निष्ठेमुळेच एक अनपेक्षित प्रश्न तयार होतो – ‘Women spoil every romance by trying to make it last for ever.’

पहिल्या रोमान्समधली तरलता स्त्रीला शेवटपर्यंत हवी असते! काहीतरी काय? तरंग कायम कसा राहणार? तो पाण्याच्या स्तब्धतेत विलीन होणारच! तरंगाने पाण्यात विलीन व्हायचे नाही, असा स्त्रीचा हट्ट असतो. परंतु, स्त्रीची चेष्टा करतानाच वाईल्डला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचेसुद्धा त्याला भान आहे. ‘The history of woman is the history of the worst form of tyranny the world has ever known; the tyranny of the weak over the strong. It is the only tyranny that lasts.’

पण तरीही वाइल्ड फार वेळ स्त्रीची चेष्टा केल्याशिवाय राहू शकत नाही. ‘Women love us for our defects. If we have enough of them they will forgive us everything, even our gigantic intellects.’ इथे वाइल्ड स्त्रीची चेष्टा करत नाहीये? पुरुषांना वाटणाऱ्या ज्ञानाच्या महतीची चेष्टा तो इथे करतो आहे का? स्त्रीची जीवनविषयक निष्ठा मोठी की, पुरुषाला वाटणारी ज्ञानाची महती? कुणी द्यावे ह्या प्रश्नाचे उत्तर?

वाइल्डच्या ‘ब्रिलियंट’ विनोदाने एक उच्च दीपस्तंभ निर्माण केला. कुठलाही विनोदी लेखक वाइल्ड वाचल्याशिवाय पूर्णत्वास जात नाही. शॉ आणि चर्चिल त्याच्या विनोदाचा आणि त्याच्या जीवनदृष्टीचा प्रभाव टाळू शकले नाहीत, इतरांची काय कथा! वाइल्डचे एक वाक्य आहे -  ‘We are all in the gutter, but some of us are looking at the stars.’

चर्चिल आपली मैत्रीण पॉलीन अॅस्क्विथ हिच्याशी गप्पा मारताना म्हणाला होता – ‘We are all worms, but I do believe that I am a glow-worm.’ चर्चिलचा हा विनोद वाइल्डच्या वरील विनोदापेक्षा वरच्या दर्जाचा आहे, पण बीज नक्की वाईल्डच्या विनोदाचे आहे.

लोकशाहीवर वाइल्ड लिहितो – ‘Democracy is two wolves and a lamb voting on what to have for lunch. Liberty is a well-armed lamb contesting the vote!’

..................................................................................................................................................................

ऑस्कर वाइल्ड असो किंवा मार्क ट्वेन असो, अथवा जॉर्ज बर्नार्ड शॉ असो किंवा चर्चिलसारखा पहिल्या दर्जाच्या विनोद निर्मितीसाठी प्रसिद्ध लेखक असो; त्यांच्या विनोदनिर्मितीमागे आपल्याला एक तत्त्वज्ञ सापडतो. अतिशय गंभीर जीवनदृष्टी असल्याशिवाय विनोदनिर्मिती शक्य होत नाही. मानवी जीवन आणि साहित्याची अखंड परंपरा यांचे सखोल भान असल्याशिवाय श्रेष्ठ स्वरूपाची विनोदनिर्मिती होत नाही. न्यायनिष्ठा, तत्त्वनिष्ठा, सत्यनिष्ठा आणि एक दुर्दम्य आदर्शवाद उराशी जपलेला असेल तरच वरच्या दर्जाची विनोदनिर्मिती शक्य होते.

.................................................................................................................................................................

लोकशाहीच्या संदर्भात शॉ लिहितो – ‘Democracy substitutes election by the incompetent many for appointment by the corrupt few.’ या उदाहरणांवरून दिसून येते की - वाईल्डचा किती प्रभाव कळत नकळतपणे चर्चिल आणि शॉसारख्या स्वयंभू विचारवंतांवर आणि विनोदकारांवर पडला होता.

जी गोष्टं चर्चिलची आणि शॉची, तीच विसाव्या शतकातल्या अनेक विनोदकारांची! लोकशाहीत विचारस्वातंत्र्य किती महत्त्वाचे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. त्या संदर्भात वाइल्ड लिहितो – ‘I may not agree with you, but I will defend to the death your right to make an ass of yourself.’

विचारस्वातंत्र्य जपायचे म्हणजे गाढवांचेही विचारस्वातंत्र्य जपणे आले! जपायलाच पाहिजे, तेसुद्धा प्राणपणाने लढून.

असा हा वाइल्ड! खरं तर इतकी लोकविलक्षण प्रतिभा असल्यावर फार सुंदर आयुष्य वाटयाला यायला हवे. पण तसे व्हायचे नव्हते. त्याचे वाक्य आहे – ‘I thought life was going to be a brilliant comedy...I found it to be a revolting and repellent tragedy…’ त्याला समलिंगी संभोगाच्या आरोपामुळे तुरुंगात जावे लागले. त्यानंतर वाइल्डची मजा संपली. आपल्यातील प्रतिभाशाली कलावंताला समाजाला संभाळता येतेच असे नाही. समाज त्याला सुखावणाऱ्या दुय्यम कलावंतांची काळजी घेतो, आणि त्यांना डोक्यावर बसवून ठेवतो.

प्रथम दर्जाच्या कलावंताला सांभाळण्याचे आणि त्याचे लाड करण्याचे काम इतिहास करतो, आणि येणाऱ्या पिढ्या करतात. इतिहास आणि पुढील पिढ्या या दोघांनीही ऑस्कर वाइल्डला निश्चितपणे डोक्यावर घेतले आहे.

मार्क ट्वेन, ऑस्कर वाइल्ड, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि विन्स्टन् चर्चिल ही माझ्या मते तात्त्विक विनोदाची चार तीर्थक्षेत्रे आहेत. बाकीच्या तिघांना त्यांच्या हयातीतच जगभर प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळाली. लवकर गेल्यामुळे ऑस्कर वाइल्ड या सर्वांपासून वंचित राहिला. नुसताच वंचित राहिला नाही तर - तुरुंगवास, दिवाळखोरी आणि लोकोपवाद हे सारे त्याच्या नशिबाला आले. त्याला लिहावेसे वाटले – ‘Circumstances are the lashes laid on to us by life. Some of us have to receive them with bared ivory backs, and others are permitted to keep on a coat—that is the only difference.’ त्याला उघड्या पाठीवर जीवनाच्या आसुडाचे रट्टे स्वीकारावे लागले. पण आपण जगलो ह्याचा त्याला आनंद होता. ‘To live is the rarest thing in the world. Most people exist—that is all.’

त्याने मृत्यूवर लिहिले आहे- ‘Death must be so beautiful. To lie in the soft brown earth, with the grasses waving above one’s head, and listen to silence. To have no yesterday, and no tomorrow. To forget time, to forgive life, to be at peace.’

वाइल्ड त्याच्या मृत्यूनंतर काळाला विसरून गेला असेल, पण काळ त्याला विसरायला तयार नाही!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा