टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • उद्धव ठाकरे, अजित पवार, जे.बी. परडीवाला, सामना अग्रलेख, मोहन भागवत आणि मनमोहनसिंग
  • Fri , 10 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या उद्धव ठाकरे Uddhav Thackeray अजित पवार Ajit Pawar मनमोहनसिंग Manmohan Singh जे.बी. परडीवाला J. B. Paridwala मोहन भागवत Mohan Bhagwat

१. राज्यातील फडणवीस सरकार नोटीस पिरियडवर आहे, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेने पाठिंबा काढला तर सरकार कोसळेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यामुळे राज्यातील भाजप सरकारच्या स्थिरतेविषयी शंका निर्माण झाली आहे. त्याचवेळी राजीनामा खिशात घेऊन फिरतो आहोत, हे शिवसेनेच्या मंत्र्यांचे दावे म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

अजितदादा म्हणतात शिवसेनेने पाठिंबा काढला तर सरकार कोसळेल, याचा सरळसरळ अर्थ होतो की, राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही. आता अजितदादांनी हे वक्तव्य केलं म्हणजे शरद पवार त्याविरोधात निर्णय घेतील, हे उघडच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देऊही शकते. पण, इतकं दोन अधिक दोन बरोबर चारचं गणित पवार करणार नाहीत. शिवाय, उद्धव ठाकरेंनी कितीही गर्जना केल्या, तरी मुंबई महापालिकेच्या निकालानंतर ते कमळाबाईच्या दारात नाक घासत जाणार नाहीत, असंही नाही… म्हणजे थोडक्यात, काँग्रेसला सत्तेच्या राजकारणात काहीच स्थान उरलेलं नाही, ही एक गोष्ट वगळता काहीही स्थिर नाही तर.

…………………………………………..

२. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रेनकोट घालून अंघोळ करण्याची कला अवगत होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बिनसाबणाचे फुगे सोडण्याची कला आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान केले आहे.

पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या पुरुषांनी एकट्याने, दुकट्याने वा समूहाने आपापल्या बाथरूममध्ये काहीही करावं, त्याला कोणाची काही हरकत असणार नाही; पण, त्यांनी दुसऱ्याच्या बाथरूमवर असं चोरून लक्ष ठेवणं मात्र फारच रोगट आणि आंबट मनोवृत्तीचं लक्षण आहे, नाही का?

…………………………………………..

३. गुजरातमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षाही गंभीर आहे. त्यातही सौराष्ट्रातील कोडिनार येथील परिस्थिती बिकट आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या कोडिनार हिंसेच्या घटनेच्या व्हिडीओत पोलीस पीडितांऐवजी दंगेखोरांना मदत करत असल्याचे पाहून न्यायाधीशही स्तब्ध झाले. या घटनेतील आरोपी भाजप खासदार दीनू सोलंकी यांच्याविरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यावरून न्यायाधीश जे. बी. परडीवाला यांनी पोलिसांना धारेवर धरलं.

हे परडीवाला कुठून प्रतिनियुक्तीवर आलेत काय गुजरातमध्ये? त्यांना गुजरातच्या, खासकरून पोलिसांच्या उज्वल अर्वाचीन परंपरांविषयी मूलभूत माहितीही नाही, तर अभिमान, गर्व आणि आदर कुठून असणार? आज हे पोलिसांना त्यांचं कर्तव्य शिकवतायत, उद्या राज्यकर्त्यांना राजधर्म शिकवतील. त्यांना विचारतो कोण? 

…………………………………………..

३. भारतीय मुस्लिम हे हिंदुस्तानात राहतात आणि येथील परंपरांचा सन्मान करतात. तेव्हा भारतीय मुसलमान हे राष्ट्रीयत्वाने हिंदूच आहेत, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. संपूर्ण जगभरात भारतीय समाज हा हिंदू समाज म्हणून गणला जातो तेव्हा आपण सारे भारतीय हे हिंदूच आहोत, अशी भावना आपल्या मनात असायला हवी असे भागवत म्हणाले.

दरम्यानच्या काळात भारत स्वतंत्र झाला तेव्हा हे पुण्यभू इटलीत गणवेष शिवायला गेले होते की कवायत शिकायला? हा तिकडून आयात केलेला राष्ट्रवाद भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेला नाही. या देशाचं राष्ट्रीयत्व हे फक्त आणि फक्त भारतीयत्व आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतीलच म्हणा त्यांना समजावून.

…………………………………………..

४. आजचा देश हा आधीच्या राज्यकर्त्यांनीच उभा केला. त्यांनी कदाचित काही चुका किंवा घोटाळे केले असतील, नव्हे ते केले आहेतच; पण असे अनेक ‘सुखराम’ नंतर भाजपच्या गंगेत पावन करून घेतले गेलेच ना? काँग्रेसने चोऱ्यामाऱ्या करूनच राज्य कारभार केला हे मान्य केले तरी ज्या देशात स्वातंत्र्याच्या वेळी सुईदेखील बनत नव्हती, तो देश आज आर्थिक व औद्योगिक बाबतीत खूपच पुढे गेला आहे. २८० खासदारांचे बहुमत असलेल्या भाजप सरकारने गेल्या अडीच वर्षांत देशात नक्की कोणते परिवर्तन घडवून आणले? :  'सामना'चा अग्रलेख

चला, आता काँग्रेसला निदान काही दिवस तरी वेगळं वर्तमानपत्र काढायला नको! सध्या परवडणारही नाही. सेनेच्या मुखपत्रात छापून आलेल्या या मजकुराची माहिती स्व. यशवंतराव चव्हाणांनी दिल्यानंतर तिकडे स्वर्गात गांधी-नेहरू आणि पटेल सद्गतित होऊन डोळे पुसत असल्याची बातमी खरीच मानायला हवी.

…………………………………………..

५. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने जाहिरात आणि प्रसिद्धीवर ९९२ कोटी रुपये खर्च केले आहेत, असे माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी राज्यसभेत लिखित उत्तरामध्ये सांगितले. 

बापरे, एका माणसाच्या प्रसिद्धीवर एवढा खर्च? काय सांगताय? इतरही कोणी आहे काय या सरकारमध्ये? ओहोहो, एक नाव तर या बातमीतच आहे की. लक्षातच नाही येत पटकन्.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......