टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, मनमोहनसिंग, नरेंद्र मोदी आणि रामदास आठवले
  • Thu , 09 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उद्धव ठाकरे Uddhav Thackeray नरेंद्र मोदी Narendra Modi मनमोहनसिंग Manmohan Singh रामदास आठवले Ramdas Athawale

१. पारदर्शकता आणि स्वच्छ कारभाराच्या केंद्राच्या अहवालात मुंबई महापालिकेला बिहार महापालिकेइतके गुण मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेने मुंबईला पाटणा शहराच्या बरोबरीला आणून दाखवले आहे. राज्य सरकारमुळे मुंबई किमान तिसऱ्या स्थानावर आहे. अन्यथा, मुंबई महापालिका केंद्राच्या सर्वेक्षणात तळाला असती, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

फडणवीसनांना दोन सवाल : १. ज्या मुंबई महापालिकेने शहराचा कारभार पाटण्याच्या बरोबरीला नेला, तिथे शिवसेनेबरोबर भाजप सत्तेत नाही का? २. ज्या राज्य सरकारच्या थोर कामगिरीमुळे मुंबईची इभ्रत वाचली, त्यात भाजपबरोबर शिवसेना सत्तेत नाही का?

…………………………………..

२. “अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतरही मनमोहन सिंग यांच्या चारित्र्यावर एकही डाग लागलेला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला केवळ डॉ. मनमोहन सिंग यांनाच अवगत आहे,” अशी बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना केली. मोदींची ही टीका जिव्हारी लागल्याने काँग्रेस सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालत सभात्याग केला.

काँग्रेस सदस्यांनी सभात्याग करण्याची गरज काय होती? खुद्द मोदी यांच्यावरही डाग (म्हणजे ते आणि त्यांचे भक्तगण ज्यांना सोयीनुसार डाग म्हणतात, ते) नाहीच्चैत की! त्यांना बहुधा लाखालाखांचे सूट घालून अंघोळ करण्याची सवय असावी. अर्थात, सगळं काही झाकायला एवढे विराट अमित शाह असताना त्यांना कोटांचीही गरज नाही म्हणा. 

…………………………………..

३. एअर इंडियाचे काही कर्मचारी ब्युफे भोजनासाठी आले असताना सोबत आणलेल्या डब्यांमधून जेवण घेऊन गेले, असा आरोप लंडनच्या एका हॉटेलने केला आहे. यानंतर एअर इंडियाने ‘ब्युफे जेवण घेऊन जाण्यासाठी नाही,’ अशी आशयाची एक नोटीसच सर्व कर्मचाऱ्यांना दिली आहे.

अहो, नोटीस कसली देताय, सत्कार करा, सत्कार. अन्न वाया जाऊ नये, ही आपली संस्कृती आहे. शिवाय, जेवणाचे पैसे पुरेपूर वसूल करण्याचीही. लग्नात जेवायला माणसं किती जाणार, या हिशोबात आपण अहेर करतो, तर ब्युफेमध्ये प्रत्येकी किती पैसे मोजले असतील, ते वसूल नाही करणार? ब्रिटिशांना आपल्या परंपरेचं प्रखर दर्शन घडवल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार करायला नको?

…………………………………..

४. अमेरिकेनंतर कुवेत सरकारने पाकिस्तानसह पाच मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली असताना आता सौदी अरेबियातून गेल्या चार महिन्यांत तब्बल ३९ हजार पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी केली गेली आहे. सध्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची कसून चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वाहवा, आता अखंड हिंदुराष्ट्राच्या सीमा कुवेत आणि सौदीपर्यंत विस्तारणार म्हणा की! एकदा हे तत्त्वत: मान्य केलं आणि त्याने उकळ्या फुटल्या की अमेरिकेसह जगात कुठेही भारतीय वंशाच्या नागरिकांवर कोणत्याही कारणाने अशीच बंदी आली की तेव्हाही टाळ्या पिटायच्या बरं का! तत्त्व म्हणजे तत्त्व.

…………………………………..

५. भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी एकत्र आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत शिवसेना निवडून येणार नाही, असे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) अध्यक्ष खासदार रामदास आठवले म्हणाले. 

मुलुंडमध्ये या प्रचारसभेत आठवलेंनी केलेलं कवन पुढीलप्रमाणे :

मुंबई में हार जायेगी शिवसेना,

क्योंकि भाजप के साथ आयी हे भीम सेना,

हम गा रहे बाबासाहेब और छत्रपतीजी का गाना,

इस लिए मुंबईकर बोल रहे भाजपा और आरपीआय को साथ लाना...

आता सांगा, यांना दुसऱ्या कोणी टपली मारण्याची काही गरज आहे का?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......