टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • हार्दिक पटेलचा शिवसेनेला पाठिंबा. (चित्र - सतीश सोनवणे)
  • Tue , 07 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Govind Pansare Samir Gaikwad डोनाल्ड ट्रम्प Donald Trump अनुभव मित्तल Anubhav Mittal मायली सायरस Miley Cyrus

१. भारतीय लष्करातील काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून लष्कराकडून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील जमिनीसाठी भाडे वसूल केल्याच्या प्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयची चौकशी सुरू आहे. या अधिकाऱ्यांनी तब्बल १६ वर्षे या जमिनीसाठी भाडं द्यायला लावलं आहे. २००० सालापासून लाखो रुपये या जमिनीच्या भाड्यापोटी देण्यात आले आहेत. या जमिनीचा तथाकथित मालक खरोखरच अस्तित्त्वात आहे की फक्त कागदोपत्री दाखवण्यात आला आहे, याचा तपास सीबीआय करणार आहे.

हे अधिकारी चुकून लष्करात गेले म्हणायचे. सिव्हिलियन राहिले असते तर राजकारणात, व्यापारात, व्यवसायात, उदयोगात चांगलं करिअर करू शकले असते. लष्कराला पवित्र गाय मानणाऱ्या देशभक्तांनाही आता लक्षात आलं असेल की, बेईमानीचा डीएनए गणवेषाने बदलतही नाही आणि झाकलाही जात नाही.

…………………………………………..

२. ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याने ‘सनातन’चे गोमूत्र आणि अगरबत्ती मागितली आहे. त्याला सध्या फक्त जपमाळ देण्याचीच परवानगी न्यायालयाने दिली आहे.

अगरबत्तीचा आग्रह समजू शकतो, पण गोमूत्र सनातनचंच हवं, याचं कारण काय असेल? सनातनमध्ये अभिमंत्रित गायींचं गोरज वेळेला, मुहूर्त वगैरे पाहून मूत्र गोळा करत असतील काय? या गायी देशी वाणाच्याच असतील काय? अतिशुद्ध गोमूत्र मिळवण्यासाठी या गायींना सात्त्विक चारा खाऊ घातला जात असेल काय? बिस्लरीचं पाणी पाजलं  जात असेल काय? सनातनचे परमगुरू गोमूत्राच्या शुद्धतेत काही व्यक्तिगत योगदान देत असतील काय?

…………………………………………..

३. सात मुस्लिम देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा तुघलकी निर्णय रद्द केल्याबद्दल त्यांनी अमेरिकेतील न्यायालयांवर आगपाखड केली आहे. एखादा न्यायाधीश देशाची सुरक्षा अशा प्रकारे धोक्यामध्ये टाकू शकतो यावर विश्वास बसत नाही. काही विपरीत घडलं तर त्यासाठी न्यायव्यवस्थेला दोषी धरलं जावं, बाहेरून लोक देशात येतच आहेत, हे वाईट आहे, असं ट्रम्प म्हणाले.

एखादा माणूस देशालाच काय, सगळ्या जगाला असुरक्षिततेच्या खाईत कसा ढकलू शकतो, हे ट्रम्पमहोदयांच्या कारकीर्दीच्या १३ दिवसांतच सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. त्यांच्याशी क्षुद्र न्यायाधिशाची काय तुलना होणार? ट्रम्पतात्यांचे पूर्वजही मातीत उगवलेले नाहीत, 'बाहेरून'च आलेले आहेत, हे त्यांना कोणी सांगेल का? ते स्वत: बाहेर निघून गेले, तरी अमेरिकेचं आणि जगाचं भलं होईल.

…………………………………………….

४. फेसबुकवर पोस्ट लाइक करा आणि प्रत्येक लाइकमागे पाच रुपये मिळवा अशी बनावट स्कीम सुरू करून सात लाख लोकांना तीन हजार ७०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या कंपनीचा मालक अनुभव मित्तल याला अटक झाली आहे. नोएडामधून लोकांना गंडा घालण्याचा हा प्रकार चालू होता. आपण फसवले गेलो असल्याची माहिती मिळाल्यानंतर हजारो लोकांनी कंपनीच्या बाहेर जमा होऊन गोंधळ घातला. अवघ्या २६ वर्षांच्या मित्तलने दोन सहकारी आणि पत्नीच्या मदतीने ही कंपनी स्थापन केली होती. पाच हजारापासून ५७ हजार रुपयांपर्यंत डिपॉझिट जमा करून घेऊन ही कंपनी सदस्यांना फेसबुकच्या लिंक्स पाठवायची. त्या लिंकवर लाइक केल्याबद्दल पाच रुपये जमा व्हायचे. काही दिवसांनी हे पैसे देणं बंद व्हायचं.

फेसबुकवर लोकांना कामाला लावून त्यांच्या कंटेंटवर झकरबर्ग पैसे कमावतो, असं गमतीने म्हटलं जातं. मित्तलने फेसबुकला कामाला लावून पैसे कमावून दाखवले. फेसबुकवर पोस्टी लाइक करण्याचे खरोखरच पैसे पडले असते, तर आजपर्यंत इथे कितीजण अब्जाधीश होऊन बसले असते.

…………………………………………..

५. सोशल मीडियावर बोल्ड फोटो अपडेट करण्यासाठी प्रसिद्ध असलेली अमेरिकन पॉप स्टार मायली सायरस हिने इन्स्टाग्रामवर चक्क लक्ष्मीपूजेचे फोटो शेअर केले आहेत. तिने आपल्या घरी विधिवत लक्ष्मीपूजन केल्याचं या फोटोंमधून स्पष्ट झालं आहे.

पोरगी जरा वांड आहे, पण सश्रद्ध आहे हो, म्हणून अलाबला काढून कानसुलावर बोटंच मोडून घेतील संस्कृतीरक्षक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाल्यामुळे आपण हिंदू धर्माकडे ओढले गेलो, असं एक वक्तव्य प्रसिद्ध झालं की समजून जायचं, हिची पुढची कॉन्सर्ट भारतात होणार आहे. आपल्या सनी लिओनीनेही हा फंडा वापरून पाहायला हरकत नाही- तीही पावन करून घेतली जाईल.

………………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......