टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • टॉयलेट लोकेटर, गाड्या, अर्णब गोस्वामी, हरविंदर सिंग आणि अनुराग ठाकूर
  • Sat , 24 December 2016
  • विनोदनामा टपल्या टॉयलेट लोकेटर Toilet Locator अर्णब गोस्वामी Arnab Goswami हरविंदर सिंग Harvinder Singh अनुराग ठाकूर Anurag Thakur

१. मोदी सरकारकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत आता सार्वजनिक ठिकाणी शौचालय शोधण्यासाठी टॉयलेट लोकेटर आणण्यात येणार आहे. देशात सार्वजनिक ठिकाणी लोकांना विशेषत: महिलांना शौचालय शोधताना येणाऱ्या अडचणी येतात. हीच गरज लक्षात घेऊन ‘गुगल टॉयलट लोकेटर’ सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

'असतील तर दिसतील' ही म्हण मोदी सरकारला ठाऊक असेल काय? पेटीएमवर व्यवहार सुरू झाले की भ्रष्टाचार जसा आपोआप गायब होत नाही, त्याचप्रमाणे गुगलच्या टॉयलेट लोकेटरमध्ये टॉयलेट तयार होत नाहीत; ती बांधावी लागतात. तशी ती बांधली जात असतील, तर टॉयलेट लोकेटरचा उपयोग. अन्यथा, घाईच्या वेळी टॉयलेट लोकेटरबरोबर पाच मिनिटं झटापट केल्यावर जवळपास एकही टॉयलेट नाही, हीच माहिती मिळणार असेल, तर लोक संतापून फोन फेकून देतील टॉयलेटमध्ये!

………………………………………………….

२. रोज नवनवे नियम घोषित करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने आता वाहनांच्या वाढत्या संख्येला ‘लगाम’ घालण्याचे संकेत दिले आहेत. नवीन गाड्यांच्या नोंदणीसाठी पार्किंगच्या जागेचा पुरावा सादर करणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. पार्किंग असेल, तरच नवी गाडी मिळेल.

भाड्याने राहणाऱ्या लोकांनी कसला पुरावा द्यायचा? पार्किंगसकट जागा भाड्याने घेतली आहे, असं दाखवून गाडी घेतली आणि ११ महिन्यांनी बिनापार्किंगच्या जागेत स्थलांतर केलं तर काय? आज सगळ्या प्रमुख शहरांमधले रस्ते आधीच बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांनी व्यापले आहेत, बिल्डर लॉबी वाट्टेल त्या किंमतीला पार्किंग स्पेस विकण्याचे अधिकार राखण्यात यशस्वी ठरलेली आहे. आता हे वरातीमागून घोडे काय उपयोगाचे?

………………………………………………….

३. नोटाबंदीमुळे बॅंकिंग क्षेत्राचे रोजचे ३,००० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. : अखिल भारतीय बॅंक अधिकारी संघटनेचे सरचिटणीस हरविंदर सिंग

अहो, आजचं वास्तव नुकसान पाहू नका, उदयाचा काल्पनिक कॅशलेस, भ्रष्टाचारलेस भारत पाहा. तेवढी किंमत मोजायलाच हवी. मुळात नोटाबंदीच्या विरोधात कोणी कसलंही मत नोंदवता कामा नये, असा अंतर्गत आदेश निघाला असताना हे गृहस्थ असं देशद्रोही विधान करतातच कसे?

………………………………………………….

४. मी राष्ट्रवादी असल्याचा मला अभिमान आहे. भारतीय माध्यमे राष्ट्रवाद आणि देशद्रोहामध्ये अडकली आहेत. देशद्रोह्यांना माध्यमांमध्ये कोणतीही जागा नाही. मी भारत-पाकिस्तानच्या मुद्यावर तटस्थ राहू शकत नाही. मला कोणी विकत घेऊ शकत नाही. : अर्णब गोस्वामी

कोणी 'फुकटच गेला' असेल, तर त्याला विकत घेण्याची गरज काय? या सद्गृहस्थांची (आपण सभ्यता पाळावी म्हणून हा शब्दप्रयोग अन्यथा यांच्यासाठी तो भारतरत्नइतकाच मोठा सन्मान आहे) एकंदर भाषा, आपला राष्ट्रवाद तेवढा जाज्वल्य आणि आपला विरोधक तो थेट देशद्रोही, ही मांडणी पाहता यांची 'रिपब्लिक' वाहिनी 'कमलदला'वरच विराजमान होणार आहे, असं दिसतंय.

………………………………………………….

५. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सध्या ज्या संकाटांचा सामना करावा लागत असल्याचे पाहता सध्याचे वातावरण हे क्रिकेटपटूंसाठी हिताचे नाही. : ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष अनुराग ठाकूर

ठाकूर यांच्यासारख्या राजकारण्यांच्या छत्रछायेला क्रिकेटपटू वंचित झाले की त्यांच्यावर आभाळ कोसळेल, यात शंका नाही. क्रिकेटपटूंच्या माध्यमातून या राजकारण्यांनी पैसानिर्मितीची एक अजस्त्र यंत्रणा उभी केली आहे आणि विविध पातळ्यांवर क्रिकेटपटूंनाही लाभधारक बनवून आपल्या अंकित करून घेतलं आहे. सर्वोच्च न्यायालयामुळे राजकारण्यांची पकड सैल झाली तर क्रिकेटपटूंना भविष्यात खरोखरच निव्वळ क्रिकेट खेळून गुजराण करावी लागू शकते… दिवस वाईट आहे खरं.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......