टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • शरद पवार, जशोदाबेन, शिवाजी पार्क, प्रिन्सिपिआ मॅथेमॅटिका, नोटा
  • Tue , 20 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi शरद पवार Sharad Pawar सर्वोच्च न्यायालय Supreme Court

१. केंद्र सरकारने घेतलेल्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी समर्थन केले असून त्यामुळे काळा पैसा व भ्रष्टाचार दोन्हीचे उच्चाटन होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार आगामी काळात देशाच्या प्रगती आणि विकासासाठी अशाच प्रकारे कार्यरत राहील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

आई आणि पत्नी यांची कर्तव्यं भारतीय स्त्रिया, पुरुषांना जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा, किती निष्ठेने निभावतात नाही? शिवाय बहुतेक वेळा त्या जगरहाटीबद्दल अतिशय भाबड्याही असतात.

………………………….

२. शेतात दावणीला बांधलेल्या बैलाला कधीतरी सुट्टी देतात. बैलपोळ्याला पूजा करून गोडधोड खायला दिले जाते, मिरवणुकाही काढल्या जातात; मात्र, राजकीय जीवनाला ५० वर्षे पूर्ण होत असताना आपण कधीही सुट्टी घेतली नाही आणि कामात कधी खाडा केला नाही. जनतेने सुट्टी दिली नसली, तरी मिरवणुका मात्र खूप काढल्या. : शरद पवार

नादिरशहाला खूप झोप यायची, तेव्हा त्याने एका ज्योतिष्याला विचारलं की, हे चांगलं की वाईट? तो ज्योतिषी म्हणाला, तुमच्यासारख्या लोकांनी जास्तीत जास्त काळ झोपून राहणं समाजासाठी नक्कीच चांगलं आहे. तुम्हीही अधूनमधून सुट्टी घ्यायला काय हरकत होती, पवारसाहेब?

………………………….

३. आयझॅक न्यूटन यांच्या गतिविषयक तीन नियमांची माहिती देणाऱ्या पुस्तकाची बांधणीची प्रत (बाऊंड कॉपी) लिलावात ३.७ अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या प्रचंड रकमेला विकली गेली आहे. आजवर कुठल्याही लिलावात विकण्यात आलेले शास्त्रीय विषयावरील हे सगळ्यात महागडे छापील पुस्तक आहे. १६८७ साली लिहिण्यात आलेल्या ‘प्रिन्सिपिआ मॅथेमॅटिका’ या पुस्तकाचे वर्णन शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी ‘बहुधा आजवर कुठल्याही माणसाने केलेली सगळ्यात मोठी बौद्धिक प्रगती’, असे केले होते.

करा, करा; गमजा करून घ्या आत्ताच जेवढ्या हव्या तेवढ्या. आमचा 'नरेंद्रचालिसा' बाजारात येईल, तेव्हा त्याच्या प्रतींच्या विक्रीचाही जागतिक विक्रम होईल आणि त्याचं हस्तलिखित याच्या दुप्पट किंमतीला विकलं जाईल, तेव्हा कळेल.

………………………….

४. आता आपल्याच खात्यात पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम जुन्या नोटांच्या स्वरूपात भरताना उशीर का झाला, याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.

या स्पष्टीकरणाचा एक सार्वजनिक तर्जुमा येणेप्रमाणे :- आपल्या खात्यात जुन्या नोटांच्या स्वरूपात वाट्टेल तेवढी रक्कम भरायला ३० डिसेंबरपर्यंत मुदत आहे, असं मान्यवर पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर रोजी जाहीर केलं होतं. सगळ्यांनी धास्तावून पैसे भरण्याची घाई करू नये, शेवटच्या टप्प्यात बँकांसमोरच्या रांगा कमी होतील, तेव्हा पैसे भरावेत, असा सल्ला माननीय अर्थमंत्र्यांनी ११ नोव्हेंबर रोजी दिला होता. हे दोघे जबाबदारीने, नशापाणी न करता, संपूर्ण शुद्धीत बोलत असतात, अशा गैरसमजुतीने त्यांच्याच सल्ल्यानुसार पैसे भरायचो थांबलो होतो. त्यामुळे तेव्हा पैसे भरलेले नाहीत.

………………………….

५. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत शिवाजी पार्क मैदानावर नाताळ आणि नववर्ष साजरं करण्याची परनावगी दिली आहे. शिवाजी जिमखान्याने यानिमित्ताने शिवाजी पार्कवर खेळ व करमणूक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले होते. मात्र शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्रा’त येत असल्याने उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावत अर्ज फेटाळला होता.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन शिवाजी पार्कावर सगळे सणवार, कार्यक्रम रथयात्रा, दुर्गापूजा, गणेशोत्सव, नवीन वर्ष, दांडिया, छटपूजा, सत्यनारायण, साई भंडारे, प्रवचनं, नागपंचमी, हळदीकुंकू, मंगळागौरी, फुगड्या स्पर्धा, चमचा लिंबू वगैरे सगळ्याच जीवनावश्यक सार्वजनिक उपक्रमांना ब्लँकेट परवानगी देऊन टाका. शांतता क्षेत्र नावाच्या विनोदी संकल्पनेतून पार्काला मुक्ती द्या. आसपासच्या सगळ्या रहिवाशांना वर्षभर पुरतील एवढे कापूसबोळे पुरवा म्हणजे झालं.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......