टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • औषधे, हिवाळी अधिवेशन, राहुल गांधी, वेंकय्या नायडू आणि रामदेव बाबा
  • Sat , 10 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या बाबा रामदेव Baba Ramdev राहुल गांधी Rahul Gandhi वेंकय्या नायडू Venkaiah Naidu

१. मूल्याधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांना ‘देव निर्माता आहे’ हे शिकवण्याचा प्रकार संविधानाच्या तरतुदीचे उल्लंघन करणारा ठरतो काय, अशी विचारणा पंतप्रधान कार्यालयाने मनुष्यबळ विकास खात्याला केली आहे. सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेतील न्यायवैद्यक औषध केंद्राचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी याविषयी सविस्तर अहवाल सादर करून माहितीच्या अधिकाराअंतर्गत थेट पंतप्रधान कार्यालयास विचारणा केली होती.

यावर विद्यमान मनुष्यबळ विकास खात्याकडून अपेक्षित दिलगिरी येणेप्रमाणे : साक्षात पंतप्रधान महोदय भूतलावर असताना सर्व गोष्टींचा निर्माता परमेश्वर आहे, असे सांगण्याची अक्षम्य आगळीक काही शाळांमध्ये सुरू आहे. त्याची गंभीरपणे दखल घेऊन ताबडतोब योग्य ती दुरुस्ती करून घेतली जाईल, याची खात्री बाळगून एकडाव माफी करावी.

…………………………………….

२. सनातन संस्थेत साधकांना छिन्नमनस्कता व इतर मानसिक रोगावरची औषधे दिली जात होती : पानसरे-दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या पत्नीच्या जबानीतून खुलासा

यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? डोक्यावर परिणाम झालेला नसेल आणि व्यक्तिमत्त्व दुभंग-त्रिभंगलेलं नसेल, तर कोण जाईल अशा आश्रमांमध्ये?

…………………………………….

३. पतंजली आयुर्वेद कंपनीचा उत्तराधिकारी कोणी व्यापारी असणार नाही. संन्यासी पुरुष आणि महिलाच हा विशाल कारभार सांभाळतील : रामदेव बाबा

हेही विधान पतंजली कंपनीच्या एकंदर जाहिरातबाजीला साजेसंच आहे. आधी मुळात संन्यासी ही कल्पनाच त्यांनी मोडीत काढलेली आहे. घटकाभर त्यांना संन्यासी मानलं तरी ते कंपनीच्या माध्यमातून व्यापारच करणार आहेत, म्हणजे फारफारतर व्यापारी संन्यासी म्हणता येईल त्यांना. काही दिवसांनी बाबा ‘संसारी संन्यासी’ अशीही एक वेगळी ब्रँच काढतील बहुतेक.

…………………………………….

४. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नोटाबंदीवरून सुरू असलेल्या गोंधळात सत्ताधारी आणि विरोधकांत कशाच्याही बाबतीत एकमत झालं नाही. मात्र, सोमवारी ईद ए मिलादची सुटी घ्यायची का, या विषयावर मात्र 'सुटी घ्यायची' यावर शून्य मिनिटांत सर्वपक्षीय एकमत झालं.

सदनाची पातळी इतकी शाळकरी असल्यावर तिथे फार गंभीर चर्चांची अपेक्षा ठेवण्यात मतलब काय? सदन सुटल्यानंतर सदस्य 'शाळा सुटली, पाटी फुटली' म्हणून ओरडत बाहेर येतात का, हे एकदा पाहिलं पाहिजे.

…………………………………….

५. नोटाबंदीचा निर्णय हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून मला याबाबत संसदेत बोलायंच आहे. मी तिथं सर्व बोलणार आहे. संसदेत मला बोलण्याची परवानगी दिल्यास राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. : राहुल गांधी

अहो, मग आपल्या खासदारांना आरडाओरडा बंद करायला सांगा. संसदेचं कामकाज चालूद्यात आणि हवा तेवढा वेळ बोला मनात जे काही असेल ते. तुम्ही राजकीय भूकंप घडवून आणू शकलात, तर बिचाऱ्या देवांचीही सुटका होईल… काँग्रेसजनांनी कधीपासून पाण्यात बुडवून ठेवलंय त्यांना.

…………………………………….

६. काँग्रेसच्या सत्ताकाळात लाखो लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, हे ते विसरत आहेत. त्यांना आम्हाला उपदेश करण्याचा अधिकार काय? : वेंकय्या नायडू

अण्णा, तुमच्या सत्ताकाळात जवानांच्या शवपेट्यांचाही भ्रष्टाचार झाला. तुम्ही लष्करावर बोलणं सोडलंत का?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......