पवारसाहेब, ‘फुले पगडी’ डोक्यावर घालणं सोपं आहे, पण त्या खालचा विचार जगण्यासाठी किंमत चुकवावी लागते!
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०व्या वर्धापन दिन मेळाव्यात शरद पवार
  • Wed , 20 June 2018
  • सदर सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस Nationalist Congress Party NCP छगन भुजबळ Chhagan Bhujbal पुणेरी पगडी Puneri pagdi फुले पगडी Phule pagdi

ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांच्याबद्दलचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. त्यांचा पुणे महानगरपालिकेनं ‘पुणेभूषण पुरस्कार’ देऊन गौरव केला, तेव्हा त्यांनी जाहीर सत्कार स्वीकारताना ‘मी ‘पुणेरी पगडी’ घालणार नाही’, अशी जाहीर भूमिका घेतली. बाबा महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचे पाईक. त्यांनी ‘जानवं’ आणि ‘पुणेरी पगडी’ ही जात-वर्ण-वर्चस्वाची प्रतीकं आहेत, जातव्यवस्था मोडायची तर अशी प्रतीकं नाकारायला हवीत, अशी भूमिका घेतली होती. त्यांनी ही भूमिका आजवर प्रामाणिकपणे जपली आहे. त्यांची भूमिका कुणाला पटो न पटो ती त्यांनी बाणेदारपणे घेतली. त्या विचारांनी आजवर व्यवहारही केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या २०व्या वर्धापन दिन मेळाव्यात पुण्यात ‘पुणेरी पगडी’ला बगल दिली आणि ‘फुले पगडी’चा स्वीकार करायच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. छगन भुजबळांच्या डोक्यावर ‘फुले पगडी’ दिली. त्यानंतर ‘पुणेरी पगडी’ विरुद्ध ‘फुले पगडी’ असा अकारण वाद पवारांनी ओढवून घेतला. खुद्द याच कार्यक्रमात सुरुवातीला पवार आणि भुजबळांनी ‘पुणेरी पगडी’ घातली आणि नंतर ‘फुले पगडी’चं माहात्म्य त्यांच्या ध्यानात आलं. ही विसंगतीही महाराष्ट्रासमोर आली.

पवारांना ‘फुले पगडी’ नंतर का आठवली? राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात ‘फुले पगडी’ आणायला पवारांना २० वर्षं लागावी? राष्ट्रवादी काँग्रेसला २० वर्षं झाली, पवार त्याआधी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात होते. काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी पवारांनी समाजवादी काँग्रेस हा पक्ष चालवून पाहिला होता. जवळपास पन्नास वर्षं महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात पवार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या प्रवासात पवारांनी पुण्यातल्या कार्यक्रमात अनेकदा ‘पुणेरी पगडी’ घातली. तेव्हा त्यांना ती खटकली नाही. मग आत्ताच असं काय झालं की, त्यांना ‘फुले पगडी’ची आठवण झाली? 

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीची सर्वच पक्ष तयारी करत आहेत. पवारही ‘फुले पगडी’च्या प्रतीकातून काही नवं सोशल इंजिनीअरिंग घडवू पाहत आहेत काय? राजकारणात प्रतीकं आणि विचारांना खूप महत्त्व असतं. पवारांसारख्या जाणत्या नेत्याला ते चांगलंच माहीत आहे. फेटा, पागोटं, मुंडासं आणि पगडी यांचा मुख्य उद्देश डोकं, मेंदू यांचं संरक्षण करणं हा असला तरी ती संस्कृती आणि विचारांची प्रतीकं आहेत. ‘फुले पगडी’ वारकरी, शेतकरी वर्षानुवर्षं घालतात. संत तुकाराम महाराजही अशी पगडी घालत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक काळी टोपी घालतात. स्वातंत्र्य चळवळीत आणि नंतरच्या काळात काँग्रेस कार्यकर्ते पांढरी गांधी टोपी घालत. अलीकडे अण्णा हजारे यांच्या आंदोलनात ‘मी अण्णा’ लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या प्रतीक बनल्या होत्या. 

हे टोप्या, पगडी यांचं सामर्थ्य, महत्त्व लक्षात घेऊन पवारांनी ‘फुले पगडी’ वापरण्याचा सल्ला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिला. पण हे ‘पगडी पॉलिटिक्स’ पवारांना झेपेल काय? पवारांचा आजपर्यंतचा राजकीय व्यवहार काय सांगतो? ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांनी पवारांच्या राजकीय चारित्र्याचं विश्लेषण ‘पवार हेच पवारांचे शत्रू’ असं अग्रलेख लिहून केलं होतं. पवार हे आर्थिक, सामाजिक भान, अभ्यास असलेले, अफाट ऊर्जा असलेले नेते आहेत. पण त्यांच्या भूमिकांवर सतत विश्वासार्हतेचं प्रश्नचिन्ह उभं राहत आलंय.

पवारांनी १९७८ साली महाराष्ट्रात पुलोदचा प्रयोग करून तरुण वयात मुख्यमंत्रीपद मिळवलं, तेव्हा त्यांच्यावर वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप झाला. पुलोद प्रयोगात जनसंघाला बरोबर घेऊन त्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजवायला संधी मिळवून दिली. बाळासाहेब ठाकरे-शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती. त्या मैत्रीचा उपयोग ठाकरेंनी शिवसेना वाढवण्यासाठी चलाखीनं करवून घेतला. अगदी चार वर्षांपूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अल्पमतावर सत्तेत आलेल्या भाजप सरकारला पहिला पाठिंबा पवारांच्या राष्ट्रवादीनंच दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर पवारांच्या बोटाला धरून त्यांना ‘गुरू’च मानलं आहे. मोदींना बारामतीत पवारांनी आणलं, तेव्हा हे गुरुमाहात्म्य देशाला कळलं!

पवारांचं हे राजकीय चारित्र्य ‘सिर सलामत तो पगडी पचास’ अशा स्वरूपाचं दिसतं. शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांनी शिक्षक, पदवीधर निवडणुकीच्या निमित्तानं नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेतली. मुंबईचे शिक्षक मतदार संघातील उमेदवार आमदार कपिल पाटील आणि पदवीधर मतदार संघातील उमेदवार जालिंदर सरोदे यांना पाठिंबा देण्यासाठी ही पत्रकार परिषद होती. त्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी म्हणाले की, ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेस या बड्या पक्षांना ते स्वतः संकटात सापडले की, पुरोगामी विचार आणि धर्मनिरपेक्षता आठवते. एरवी हे पक्ष, त्यांचे बडे नेते पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना नेस्तनाबूत करतात. भाजपविरोधी एकत्र येणाऱ्या पक्षांची व्यापक एकजूट टिकवण्यासाठी मोठ्या पक्षांनी छोट्या पक्षांना आणि संघटनांना त्यांचा रास्त वाटा दिला पाहिजे.’ राजू शेट्टी पवारांच्या राजकारणावर स्वानुभव सांगत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पुरोगामी चळवळीतील आणि छोट्या उदारमतवादी पक्षांचं नेतृत्व प्रस्थापितांनी उभं राहू दिलं नाही, अशी पवारांकडे बोट दाखवत राजू शेट्टींची तक्रार दिसतेय.                      

राजू शेट्टी यांच्यासारखाच सूर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी लावला होता. आंबेडकर यांनी पवारांचं राजकीय वर्ग-चारित्र्य कार्ल मार्क्सच्या भाषेत सांगितलं. ते म्हणाले होते, ‘पवार हे शेतकऱ्यांचे नेते नसून शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समूहाचे नेते आहेत. त्यामुळे पवारांना साखर लॉबी, दूध लॉबीचं प्रेम आहे, पण शेतकऱ्यांशी घेणंदेणं नाही.’ आंबेडकरांनी शेतकरी समूहांना सल्ला दिलाय की, ‘जातीसाठी माती खात राहाल तर वारंवार संप करत रहावं लागणार आणि शेतमालाला योग्य भाव कधीही मिळणार नाहीत. पवारांचं राजकारण शेतकरी विरोधी आहे. शेतकरी जातींनी हे लवकर ओळखावं.’ 

‘पुणेरी विरुद्ध फुले पगडी’ प्रकरणावर वाद वाढल्यानंतर पवारांनी ‘माझा कुणा वर्गाला दुखावण्याचा हेतू नव्हता. म. फुलेंचा विचार सांगण्याचा प्रयत्न होता. समता, परिवर्तनाचा पुरस्कार करणाऱ्या म. फुलेंचा विचार पुढे नेणं ही राष्ट्रीय आणि सामाजिक गरज आहे. या प्रक्रियेत मी आहे. मात्र त्याबाबतीत वैयक्तिक किंवा ठराविक वर्गाच्या विरोधात भूमिका घेतल्याचं मानणं चुकीचं आहे,’ असं सांगण्याचा प्रयत्न पुण्यातच केला. पण आजवरचा पवारांचा राजकीय व्यवहार पाहता त्याविषयी प्रश्न उभे राहणं स्वाभाविक आहे. ‘फुलेविचार’ पुढे नेणं म्हणजे उपेक्षित जातींना त्यांचा सत्तेतला हिस्सा देणं. पवारांनी पन्नास वर्षांत राजकारण करताना तो किती दिला? पवारांनी मंडल आयोगाला पूरक भूमिका घेतली जरूर, पण राज्यातल्या इतर मागासवर्गीयांनी (ओबीसींनी) भाजपचा आसरा शोधला. हे असं का झालं?

पवार काँग्रेसमध्ये होते. तेव्हाही आणि स्वतंत्र राष्ट्रवादी पक्ष चालवते झाले तेव्हाही, या बड्या पक्षांत ओबीसी आमदारांची संख्या अल्प राहिली. कोकणातले ओबीसी शिवसेनेत गेले आणि तिथं त्यांना सत्ता मिळाली. उर्वरित महाराष्ट्रातले ओबीसी आजही भाजपला मानतात. कुणबी, तेली, लेवा पाटील, धनगर, वंजारी हे जातसमूह आजही भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण करत आहेत. मराठा समाजाचे मोर्चे निघाले, तेव्हाही या परिस्थितीला काँग्रेस-राष्ट्रवादीचं राजकारण जबाबदार आहे, मराठा समाजाचे प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादी का सोडवू शकली नाही, असा आरोप केला गेला. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पवार विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. राहुल गांधींसह ते विरोधी नेत्यांना एकत्र करत आहेत. ‘मोदी हटाव’साठी हा खटाटोप आहे. पण ‘मोदी का नको?’ हे लोकांना पटवण्यासाठी पवार-गांधी यांच्याकडे अजेंडा काय आहे? मोदींनी लोकांना ‘न्यू इंडिया’चं स्वप्न दाखवलंय. ते स्वप्न खोटं आहे, हे सांगताना पवारांना त्यांचा ‘न्यू इंडिया’ कसा असेल हे सांगावं लागेल. मोदींनी संस्था खिळखिळ्या केल्या, सामाजिक ऐक्याचं वस्त्र फाडलं आणि लोकशाही, संविधान धोक्यात आणलं, म्हणून ‘मोदी हटवा’ आणि ‘आम्हाला सत्ता द्या’ हे म्हणताना, नवं काय घडेल, हा अजेंडा पवारांजवळ आज तरी दिसत नाही.

मग केवळ ‘फुले पगडी’ छगन भुजबळांच्या डोक्यावर बघून लोकांनी विश्वास कसा ठेवायचा?

‘फुले पगडी’ डोक्यावर घालणं सोपं आहे. पण तिच्या खालचा विचार जगण्यासाठी किंमत चुकवावी लागते. डॉ. बाबा आढावांनी ती चुकवली आहे. शरद पवारांनी ती आजपर्यंत चुकवल्याचं दिसत नाही. मग यापुढे ती चुकवणं त्यांना परवडेल काय? 

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 20 June 2018

राजा कांदळकर, समर्पक व समयोचित लेख आहे. पगडी राजकारणाचे तेच तेच पैलू वाचून कंटाळा आला होता. पण तुमच्या लेखात थोडा वेगळा दृष्टीकोन आहे. शरद पवारांच्या भूमिकेविषयी विचारलेले प्रश्न समर्पक आहेत. त्याच अनुषंगाने पुढे जाऊ पाहता, फुल्यांची पगडी म्हणजे तरी काय ? दुखावलेल्या भुजबळांना चुचकारण्यासाठी घेतलेला मुखवटा आहे. २०१९ च्या निवडणुकांत भुजबळांनी मदत करावी हा हेतू. त्यासाठी माळी जात ही भुजबळांची ओळख पवारांनी निश्चित करून ठेवली आहे, हा त्यामागचा मथितार्थ. भुजबळांनी इतर कोणतीही ओळख (उदा. : ओबीसी) सांगण्यापूर्वी पवारांचा सल्ला घ्यायला हवा, ही गर्भित धमकी आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......