टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • साक्षी महाराज, नारायण राणे आणि ‘अब की बार मोदी सरकार’ जाहिरात कॅम्पेन
  • Fri , 22 September 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi नारायण राणे Narayan Rane साक्षी महाराज Sakshi Maharaj अब की बार मोदी सरकार Ab Ki Baar Modi Sarkar

१. सातत्यानं वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहणारे भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी सार्वजनिकपणे प्रेमाचं प्रदर्शन करणाऱ्या प्रेमी जोडप्यांना तुरुंगात टाकावं असं विधान करून आपला बदलौकिक कायम ठेवला आहे. मोटारसायकल असो, कार असो किंवा गार्डनप्रेमी जोडपे सर्वत्र प्रेमाचं प्रदर्शन करताना दिसतात. प्रेमी जोडपी एकमेकांची अशी गळाभेट घेतात जणू ती तरुणी किंवा तरुण एकमेकांना खाऊन टाकतील. काही चुकीचं घडण्याआधी अशा जोडप्यांवर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकायला पाहिजे, असं ते म्हणाले. प्रेमी जोडप्यांच्या अशा कृत्यांकडे सर्वजण दुर्लक्ष करतात; पण, बलात्कार झाल्यावर पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली जाते. यापूर्वी साक्षी महाराजांनी बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगचा बचाव केला होता.   

प्रेमी जोडपी राहू द्या, आधी या इकडेतिकडे हुंगत फिरणाऱ्या साक्षीबुवांसारख्या जोगड्यांची लग्नं लावून दिली पाहिजेत. त्यानंतर त्यांना स्त्री-पुरुष प्रेम, प्रणय, जबरदस्ती, बलात्कार या सगळ्यांमधला फरक समजेल. या नादान इसमानं रामरहीमच्या बचावासाठी धाव घेतली होती. त्याला तिथला, न्यायालयात सिद्ध झालेला बलात्कारही करोडो मूढांच्या श्रद्धेपुढे खोटा वाटला होता. दोन प्रेमिकांमधल्या परस्परसंमतीनं झालेल्या शरीरसंबंधाला ‘बलात्कार’ म्हणत नाहीत, हे याला कोणीतरी समजावून सांगायला हवं.

.............................................................................................................................................

२. अखेर नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह पक्षातील सर्वच नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची कोणतीही पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नसतानाही ते प्रदेशाध्यक्ष आहेत, महाराष्ट्रातील काँग्रेसचं दुकान लवकरच बंद होणार आहे, उद्धव ठाकरे भाजपपुढे नाक घासतात. ज्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे, त्यांनी मला शिकवू नये, माझ्या घरात दोन आमदार आहेत, अशी चौफेर टीका त्यांनी केली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला त्यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेससोबत घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं.

अशोक चव्हाणांची बाकी पात्रता काही असो नसो, सिंधुदुर्गातल्या पक्षसंघटना बरखास्त करून त्यांनी राणे यांना निर्णय घ्यायला भाग पाडलं, हे मानायलाच हवं. नाहीतर भाजपकडून ग्रीन सिग्नल येईपर्यंत राणे यांनी काँग्रेसमध्येच राहून पक्षावर टीका आणि पक्षविरोधी कारवायांचं सत्र चालूच ठेवलं असतं. ज्या पक्षात आपण एवढी वर्षं काढली, सत्तापदं भूषवली, त्या पक्षावर राणे एका दिवसात टीका करू लागले आहेत. उद्धव यांच्याबरोबरच राज यांनाही त्यांनी दुखावलं आहे. भाजपमध्येही ते वेगळं काही करणार नाहीत. या आततायीपणामुळे स्वतंत्र वाटचालीचीच पाळी त्यांच्यावर येऊ शकते.

.............................................................................................................................................

३. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरिया नष्ट करण्याच्या दिलेल्या धमकीला उत्तर कोरियानं बिल्कुल जुमानलेलं नाही. याउलट अमेरिकेच्या धमकीची म्हणजे 'कुत्र्याचं भुंकणं' अशा शब्दांत हेटाळणी केली आहे. प्योंगयागकडून सतत क्षेपणास्त्र आणि अणुबॉम्बची चाचणी केल्यानंतर उत्तर कोरिया आणि अमेरिका या दोन्ही देशांदरम्यान तणाव आहे. सर्वांत शक्तीशाली सहाव्या अणुबॉम्बची (हायड्रोजन बॉम्बची) चाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्रानं उत्तर कोरियावरचे निर्बंध आणखी कठोर केले. त्यानंतरही उत्तर कोरियानं प्रशांत महासागरात क्षेपणास्त्र डागलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला सर्वनाशाची धमकी दिली. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचलेले उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री री योंग हो यांनी या भाषणाची तुलना अप्रत्यक्षपणे कुत्र्याच्या भुंकण्याशी केली. आक्रमक अमेरिकेपासून संरक्षण करण्यासाठी आम्हाला आण्विक शस्त्रास्त्रांची गरज आहे, असं उत्तर कोरियाचं म्हणणं आहे.

यांनी त्याला ‘रॉकेटमॅन’ म्हणायचं, त्यांनी याला ‘कुत्रा’ म्हणायचं... हे दोन देशांचे शक्तिमान प्रमुख आहेत की, भारताच्या पंतप्रधानांच्या ट्विटर फॉलोइंगच्या यादीतले विखारी ट्रोल? अमेरिकेसारख्या तथाकथित महासत्तेनं ‘त्याने माझ्या वडिलांचा अपमान केला’ म्हणून सद्दामवर हल्ला चढवणारा अध्यक्ष पाहिला आहेच. आता ‘तो मला कुत्रा म्हणतो,’ म्हणून आणखी एक देश नेस्तनाबूत केला जाईल आणि दहशतवादविरोधी लढ्यात लाखो नागरिक मारले जातील. 

.............................................................................................................................................

४. महारेरा प्राधिकरणाचे नवे नियम आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयानं नवीन बांधकामांना परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या उभारणीत तब्बल ३६ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी घरांची विक्री आठ टक्क्यांनी कमी आहे. महारेराकडे नोंदणी होईपर्यंत प्रकल्पाची जाहिरात करण्यास महारेरानं बंदी घातली आहे. साहजिकच जोपर्यंत रेराच्या निकषास पात्र होण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत नवीन प्रकल्प हाती घेण्यास अनेक विकासक तयार नाहीत. त्यामुळे नवा प्रकल्प कुठे सुरू होत आहे, घरांच्या किमती किती, याचं आकलन होण्यात ग्राहकाला अडचण निर्माण झाली आहे.

मुळात मुंबई आणि परिसरात लाखो घरं आताही पडूनच आहेत. अवाच्या सवा किमती आणि बिल्डरांचे अपारदर्शक, अन्याय्य व्यवहार हे त्याचं मुख्य कारण आहे. यापुढचे प्रकल्पही रिकामेच राहणार आहेत. त्यांना रेराची परवानगी मिळाल्यानं काय फरक पडणार? बिल्डर, राजकारणी आणि अन्य धनदांडग्यांनी मिळून केलेल्या संगनमताचा फुगा फुटून जेव्हा परवडणाऱ्या दरांची घरं उपलब्ध होतील आणि मुंबईतल्या पायाभूत सुविधांचा स्तर किमान तालुका पातळीपर्यंत उंचावेल, तेव्हाच इथल्या घरांना घरपण देणारी माणसं लाभतील. तोवर नव्या इमारती बांधूच नका. त्यांची कुणालाच गरज नाही, आताच्या भावांत.

.............................................................................................................................................

५. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमागे तेल कंपन्यांचा तोटा भरून काढण्याचं सरकारकडून देण्यात येणारं कारण ही धूळफेक असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या तीन वर्षांत तेल कंपन्यांच्या नफ्यात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ होत आहे, तसंच त्यांनी विविध करांपोटी तब्बल एक लाख १५ हजार कोटी रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत भरले आहेत. त्यामुळेच सर्वसामान्यांचा खिसा हलका होत असताना या कंपन्या आणि सरकारचे खिसे मात्र भरले असल्याचे माहिती अधिकारातून समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं सर्वसामान्यांमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. देशातील इंधनाचे दर हे आशिया खंडात सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना ग्राहकांना मात्र महाग दरानंच इंधन खरेदी करावं लागत आहे. तेल कंपन्यांना तोटा होत नसून, हजारो कोटी रुपयांचा फायदाच होत असल्याचं आढळून आलं आहे. इतकंच नव्हे, तर या कंपन्यांनी सरकारच्या तिजोरीतही लाभांशापोटी मोठी रक्कम भरल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणात सरकारनं चक्क एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे नफेबाजी चालवली आहे आणि त्याला विकासकामांचा मुलामा देण्याचा उद्योग सुरू आहे, हे इतकं वेगाने स्पष्ट झालं आहे की सरकारच्या प्रचारकांना जुन्या मोहिमा उकरून काढून त्यांचा हास्यास्पद प्रचार करण्याची वेळ आली आहे. ‘मी स्वस्ताईसाठी मोदींना मतच दिलं नव्हतं’ ही अशीच एक विनोदी आणि मानभावी जाहिरात मोहीम समाजमाध्यमांमध्ये पुन्हा एकदा प्रसृत केली जात आहे. मात्र, त्यावर ‘बस हो गयी महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ अशा जाहिराती का केल्या गेल्या होत्या, असा प्रतिप्रश्नही तेवढ्याच वेगानं केला जात आहे. या वेगानं मी मोदींना मतच दिलं नव्हतं, अशा कबुलीपर्यंत पोहोचतील मोदी समर्थक.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......