नीतिशकुमार भाजपसोबत गेले, त्यामागच्या गोष्टीची संभाव्य कारणे
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • नीतिशकुमार
  • Thu , 27 July 2017
  • संपादकीय Editorial अक्षरनामा Aksharnama नीतिशकुमार Nitish Kumar

नीतिशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याबरोबरची युती तोडून भाजपशी युती केली, आणि पुन्हा बिहारचं मुख्यमंत्रीपद स्वत:कडे राखलं, याविषयी मुद्रित माध्यमं, इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि सोशल मीडियावर काल दुपारपासून जोरदार घमासान चालू आहे.

काल आणि आजची काही इंग्रजी-मराठी दैनिकं आणि काही वेब पोर्टल्स बारकारईनं वाचल्यानंतर नीतिशकुमारांच्या ‘यू-टर्न’ राजकारणामागे तीन कारणं असल्याची शक्यता दिसते.

१) दै. ‘लोकसत्ता’मध्ये असं म्हटलं आहे की, नीतिशकुमार भाजपसोबत असतानाच्या १० वर्षांच्या काळात नीतिशकुमारांनी भाजपला बिहारच्या सत्तेत फारसा हस्तक्षेप करू दिला नाही. याउलट लालूप्रसाद यांचा हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार यांना आवर घालणं नीतिशकुमार यांना दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं. त्यामुळे नीतिशकुमार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं होतं.

२) २०१९च्या निवडणुकीत नीतिशकुमार यांना राष्ट्रीय पातळीवर जाणं, म्हणजे पंतप्रधानपदाचा उमेदवार वगैरे हे शक्य नाही, हे एव्हाना स्पष्ट झालं आहे. प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदावरून पायउतार झाले आहेत. त्यांनी अजून कुठलेच संकेत दिले नसले तरी ते काँग्रेसमध्ये पुन्हा परतू शकतात. दोनेक दिवसांपूर्वी मणिशंकर अय्यर यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये लेख लिहून त्यांचं काँग्रेसमध्ये परत स्वागत असल्याचं लिहिलं होतं. आजच्या ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये राजश्री सेन यांनी प्रणबदा काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. असं झालं तर काँग्रेसमध्ये पुन्हा थोडंफार चैतन्य येऊ शकतं. इतिहासकार रामचंद्र गुहा काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, ‘राहुल गांधींनी राजकारणातून बाहेर पडावं आणि नीतिशकुमार यांना काँग्रेसचं अध्यक्ष करावं.’ पण ही शक्यता दुरापास्त आहे, तशीच नीतिशकुमार यांची २०१९च्या निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निवड होणं, ही शक्यताही आता दुरापास्तच आहे. हे चांगल्या प्रकारे ओळखून असलेल्या नीतिशकुमार यांनी किमान राज्याच्या पातळीवर आपली सत्ता आणि विश्वासार्हता जाऊ नये, यासाठी ही खेळी खेळली नसेल ना?

३) लालूप्रसाद यांच्या भ्रष्टाचाराची हाव नीतिशकुमार यांनाच काय, कुणालाच रोखता न येण्यासारखी आहे. मग त्यांच्यासोबत राहून स्वत:चं सामर्थ्य दुर्बल करायचं की, भाजपला राज्यात फार लुडबूड करू न देण्याच्या अटीवर सत्तेत सहभागी करून घ्यायचं, यापैकी कोणता पर्याय अधिक चांगला आहे, हे स्पष्ट आहे.

त्यामुळे नीतिशकुमार यांच्यावर ‘समाजवादी साथी खाती फॅसिझमची माती’ अशा प्रकारची वा इतर तत्सम टीका करणं सोपं आहे. पण नीतिशकुमार यांनी इतर कुठल्याही वा आजवरच्या कुठल्याही समाजवादी राजकारण्याला जमली नाही, अशी चमकदार खेळी खेळली (असण्याची शक्यता) आहे हे नक्की. अर्थात यात मोठी जोखीम आहे. खाच-खळगे आहेत आणि आव्हानंही. पण राजकारण शेवटी असाच तर खेळ असतो ना!

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख