१६ रुपये ५० पैशांचं आज काय ‘मूल्य’ आहे? भाजीमंडईत पाव किलो भाजीसाठी किंवा एक वडापाव-कटिंग चहासाठी यापेक्षा नक्कीच जास्त ‘दाम’ मोजावे लागतात
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 05 December 2022
  • संपादकीय Editorial अक्षरनामा Aksharnama

नमस्कार,

तुम्ही ‘अक्षरनामा’चे वाचक आहात?

तुम्हाला ‘अक्षरनामा’ आवडतो?

असाल तर तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.

नसाल तर वाचून पहा, तुम्हाला कदाचित आवडेल.

१.

‘अक्षरनामा’ हे मराठीतलं एक आघाडीचं फीचर्स पोर्टल आहे. म्हणजे, आम्ही फक्त लेख छापतो, बातम्या अजिबात छापत नाही.

का?

तर सोशल मीडियाच्या प्रस्फोटामुळे प्रसारमाध्यमांची बातम्यांतली मक्तेदारी एके प्रकारे संपुष्टात आलेली आहे. वर्तमानपत्रंच काय, पण टीव्हीपेक्षाही कितीतरी वेगानं बातम्या सोशल मीडियावर येतात, ‘व्हायरल’ होतात. आणि या बातम्यांची संख्या वर्तमानपत्रं-वृत्तवाहिन्यांपेक्षाही कैकपट जास्त असते. त्यामुळे खरं तर आता बातम्यांसाठी वर्तमानपत्रं-वृत्तवाहिन्या पाहण्याची गरजच राहिलेली नाही. पण हा बातम्यांचा प्रपात नुसताच आपल्या डोक्यावर दणादणा आदळत राहतो. काही वेळा आपला जीव गुदमरवून टाकतो, आपल्या मनात उलटसुलट आंदोलनं निर्माण करतो. कधी कधी आपल्याला अस्थिरही करतो. कारण कुठलीही बातमी ही ‘डेव्हलपिंग स्टोरी’ असते. कारण बातमी ही ‘हिमनगाच्या टोका’सारखी असते. हेच दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, काही वकीलमंडळी अभिमानानं असं सांगतात की, पुराव्यासाठी केवळ हत्तीचं शेपूट जरी मला दिलं, तरी मी त्यावरून अख्खा हत्ती उपसून काढतो. काहीसं तसंच पत्रकारालाही करावं लागतं. त्यालाच पत्रकारितेत ‘फॉलोअप’ म्हणतात.

मात्र हल्ली होतं काय की, बातमीचा ‘फॉलोअप’ फारसा घेतला जातोच असं नाही. सोशल मीडियावरच्या बातम्यांच्या बाबतीत तसं होणं शक्यच नसतं, पण वर्तमानपत्रं-वृत्तवाहिन्याही एखाद्या बातमीचा शेवटपर्यंत पिच्छा पुरवतात, असं हल्ली फारसं घडताना दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक बातमीमागची ‘अनटोल्ड रिअलिटी’ आणि ‘अनटोल्ड ट्रुथ’ आपल्या सहसा समोरच येत नाही.

आणि वास्तव आणि सत्यापर्यंत पोहचू न शकलेली प्रत्येक बातमी ही ज्वालाग्राही पदार्थासारखी असते. ‘काट्याचा नायटा’ वा ‘बात का बातंगड’ कधी होईल सांगता येत नाही. अशा वेळी प्रत्येक बातमीमागचं ‘वास्तव’ आणि ‘सत्य’ समजून घेण्याची, त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करण्याची नितांत निकडीची गरज असते.

त्यासाठी आम्ही मोठे आणि सविस्तर असे दीड-दोनपासून पाच हजार शब्दांपर्यंतचे लेख छापतो. आणि ते मोठ्या प्रमाणावर वाचले जातात, असाच आमचा गेल्या सहा वर्षांचा अनुभव आहे. ‘अक्षरनामा’चा वाचकही बातमीच्या पलीकडे जाऊन सविस्तर विश्लेषणात स्वारस्य असलेला वाचक आहे. महत्त्वाचं म्हणजे एवढे मोठे लेख हल्ली वर्तमानपत्रांतही येत नाहीत. इतकंच नव्हे तर मराठीतील अनेक साप्ताहिकं-मासिकांमध्येही एवढ्या सविस्तर लेखांची संख्या खूपच कमी दिसेल. आम्ही मात्र रोज तीन-चार विषयांवर सविस्तर लेख प्रकाशित करतो. आठवड्याला, पंधरवड्याला, महिन्याला सविस्तर लेख प्रकाशित करणं आणि रोज करणं, या दोन्हींत खूप म्हणजे खूपच फरक आहे. काळ-काम-वेगाचा आहे आणि संसाधनांचाही.

लेख जेवढा सविस्तर, तेवढा तो संबंधित विषयाबाबत सर्व बाजूंनी माहिती देतो. एखाद्या घटनेमागचं वास्तव आणि सत्य नेमकं काय आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. अर्थात या सगळ्या लेखांचा अनुषंग हा चालू घटना-घडामोडी हाच असतो.

.

सत्याचा पुरस्कार आणि, ‘Against The Current’ (प्रवाहाविरुद्ध) हा पत्रकारितेचा धर्म असतो, तत्त्वज्ञान असतं आणि व्यवहारही असतो. आपलं वर्तमान जग हे आदर्श संकल्पनांचं मूर्तीमंत उदाहरण नसतंच. आणि तो त्या आदर्श संकल्पनांचा भावानुवादही नसतो. हे जग तुम्हीआम्हीआपणसगळ्यांच्या कृती, सवयी, जीवनशैली, आवडीनिवडी, प्राधान्यक्रम, राजकारण, अशा अनेक गोष्टींनी बनतं. त्यातले काही या बाजूला असतील, काही त्या बाजूला असतील, काही मधोमध असतील, काही या बाजूकडून त्या बाजूकडे जाण्याच्या प्रयत्नात असतील, काही त्या बाजूकडून या बाजूला येण्याच्या प्रयत्नात असतील, मधल्यांतलेही काही या बाजूला झुकण्याच्या बेतात असतील, काही त्या बाजूला… या सर्वांपर्यंत एक तारतम्यपूर्ण, सम्यक, तटस्थ दृष्टीकोन पोहोचवण्याचं काम पत्रकारिता आपल्यापरीनं करत असते; यात आम्हीही आमचा ‘खारीचा वाटा’ अदा करतो आहोत. गेल्या सहा वर्षांपासून आम्ही जबाबदारीनं आणि गांभीर्यानं पत्रकारिता करतो आहोत.

फेक न्यूज, व्हायरल न्यूज, बॉटस, ट्रोलिंग, अपप्रचार, गैरवापर अशा सध्याच्या उबवण काळात सगळ्यांचंच जगणं चक्रव्यूहात अडकलेल्या ‘अभिमन्यू’सारखं झालेलं आहे. अशा काळात ‘अक्षरनामा’च्या रूपानं आम्ही गंभीर, प्रामाणिक आणि जबाबदार पत्रकारिता करण्याचं काम करतो आहोत!

.

अडचण एवढीच आहे की, ‘अक्षरनामा’च्या वाचकांपैकी एक टक्का वाचकही वर्गणी भरत नाहीत. काही वाचकांची तक्रार अशी असते की, तुमची वर्गणी जास्त आहे.

‘वर्गणी जास्त आहे’ हा ‘फिनॉमिना’ खूप जुना आहे… निदान मराठीत तरी.

‘अक्षरनामा’ची वर्गणी आहे, महिना ५०० रुपये.

महिन्याला ५०० रुपये तर दिवसाला किती? १६ रुपये ५० पैसे.

मराठीतल्या आघाडीच्या वर्तमानपत्रांचा निर्मितीखर्चही यापेक्षा जास्त असतो. तो साधारण १८-२० रुपये असतो. पण वर्तमानपत्रे विक्री किंमत साधारणपणे ४-५ रुपये ठेवून बाकीची रक्कम जाहिराती, जाहिरातपुरस्कृत मजकूर, प्रायोजित मजकूर, राजकीयदृष्ट्या सोयीचा मजकूर, अशा अनेक गोष्टी आपल्या माथी मारून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वसूल करतात.

२००० साली मराठीतली आघाडीची वर्तमानपत्रं ज्या आकारात येत आणि जेवढ्या पानांची असत, त्या आकारात आणि तेवढ्या पानांची आहेत का? नाही, ‘फ्रेंडली’, ‘ट्रेंडी’ वगैरे गोंडस नावांखाली ती लांबी-रुंदीनं कमी झाली. त्यानंतरच्या काळात त्यांच्या किमती दोन-अडीच रुपयांवरून पाच रुपयांवर आल्या.

करोनाकाळानंतर काय झालं? वर्तमानपत्रांची पानं पुन्हा एकदा लक्षणीय म्हणावी अशा प्रकारे कमी झाली आहेत. रविवार पुरवण्यांची पानेही निम्म्यावर आली आहेत. पण वर्तमानपत्रांच्या किमती कमी झालेल्या नाहीत. त्या त्याच आहेत. उलट त्यांच्या ऑनलाईन आवृत्त्या हळूहळू ‘Pay subscription’कडे जात आहेत, ‘म.टा.’सारखी काही वर्तमानपत्रं आधीपासूनच गेली आहेत.

मध्यमवर्गीय ‘रास्त कामाची रास्त किंमत’ याबाबत जसा आग्रही असतो, तसे त्याने ‘रास्त दर्जाचे रास्त दाम’ याबाबतही का असू नये? खरं तर तो असतो, पण कुठे? ब्रँडेड वस्तू-कपडे-सेवा घेताना. का? तर ब्रँड, दर्जा आणि तिथं मिळणारी सर्व्हिस! त्यामुळे विनाकारण आपला खिसा कापला जातोय, अशी भावना तेव्हा येत नाही. आणि ते रास्तही आहे. कारण ‘रास्त गोष्टींसाठी रास्त किंमत’ मोजणे (प्रसंगी थोडी जास्त वाटली तरी), हे मध्यमवर्गीयांचंच वैशिष्ट्य आहे.

करोनाकाळानंतर हॉटेलमधील जेवण पुष्कळ महाग झालंय. पण त्यामुळे मध्यमवर्गीय हॉटेलिंग करत नाही? तो वीकेंडला बाहेर जात नाही? हे सगळं तो का करतो? तर रिलीफ, मनोरंजन, क्वालिटी टाइम यांसाठी. या सगळ्या गोष्टी एक प्रकारे त्याच्या जीवनशैलीच्या अविभाज्य भाग झालेल्या आहेत.

निखळ वास्तव किंवा सत्य समजावून घेणं, हाही सध्याच्या अहमहमिकेच्या, सत्योत्तर सत्याच्या काळात एक प्रकारचा रिलीफ किंवा ‘क्वालिटी टाइम’ स्पेंड करण्यासारखंच आहे. चुकीची वा दिशाभूल करणारी माहिती, सतत कुणाचा तरी द्वेष किंवा अकारण भीती, यांपासून लांब राहणं आणि बॅलन्स्ड अ‍ॅप्रोच देणं म्हणजे आणखी वेगळं काय असतं?

गेल्या पाच वर्षांत ‘अक्षरनामा’च्या माध्यमातून हेच आम्ही करत आहोत. त्यामुळे कुठल्याही छापील माध्यमापेक्षा जास्त ‘लोकशाहीकरण’ झालेल्या आणि सेलफोन असलेल्या कुणालाही सहज अ‍ॅक्सिसेबल असलेल्या पोर्टलसाठीही रास्त किंमत मोजायला काय हरकत आहे?

आम्ही गंभीर, प्रामाणिक आणि जबाबदार पत्रकारिता करतो आहोत!

…आणि त्या कामाचं ‘रास्त मूल्य’ मिळण्याची अपेक्षा करत आहोत.

महिन्याला ५०० रुपये, तर दिवसाला किती? १६ रुपये ५० पैसे.

१६ रुपये ५० पैशांचं आज काय ‘मूल्य’ आहे? भाजीमंडईत पाव किलो भाजीसाठी किंवा एक वडापाव-कटिंग चहासाठी यापेक्षा नक्कीच जास्त ‘दाम’ मोजावे लागतात.

.

जबाबदारीनं पत्रकारिता करण्यासाठी बराच खर्च येतो. ऑनलाईन पत्रकारिता नि:शुल्क असल्यानं हा खर्च भरून येतो, तो केवळ वाचकांनी दिलेल्या वर्गणीतून. ‘प्रायोगिक नाटक’ किंवा ‘समांतर सिनेमा’ यांसारखी ‘समांतर पत्रकारिते’लाही वाचकांच्या सक्रिय पाठबळाची नितांत गरज आहे.

असं म्हणतात की, तुम्ही आधी स्वत:ला पणाला लावल्याशिवाय समाज तुमची दखल घेत नाही. गेली सहा वर्षं आम्ही रोज स्वत:ला पणाला लावतो आहोत. या काळात ‘मसाप’चा उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचा, अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानचा उत्कृष्ट ऑनलाईन मीडियाचा आणि महाराष्ट्र फाउंडेशनचा उत्कृष्ट ऑनलाईन पोर्टलचा, असे तीन पुरस्कारही ‘अक्षरनामा’ला मिळाले आहेत.

वाचकहो, आता तुमची पाळी आहे… ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरून आम्हाला सहकार्य करावे, ही विनंती.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वर्गणी भरण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

Pay Now

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख