एक नवी सुरुवात
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 02 November 2016
  • संपादकीय अक्षरनामा

सुरुवातीपासून सुरुवात करायला कधीच उशीर झालेला नसतो. त्यामुळे २३ ऑक्टोबरपासून आम्ही ‘अक्षरनामा’ हे ‘मराठी ऑनलाईन फीचर्स’ पोर्टल सुरू केले. पहिल्याच दिवशी पोर्टल आणि अॅप दोन्हीही सुरू झाले. या दोन्हींना महाराष्ट्रभरातून, देशातून आणि देशाबाहेरूनही चांगला प्रतिसाद मिळाला. वाचकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. पहिल्या दिवशी आम्ही राजकारणापासून साहित्य-संस्कृतीपर्यंत अनेक विषयांचा आढावा घेणारे ५० लेख पोर्टल व अॅपवर उपलब्ध करून दिले होते. मराठा समाजाच्या मोर्चाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या प्रश्नांचा आढावा घेणारा टीव्ही पत्रकार अमेय तिरोडकर यांचा सविस्तर लेख, भारताने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’विषयीचे दोन लेख, याशिवाय भारतीय राजकारण, साहित्य, कला, संस्कृती, पुस्तक परीक्षणे या विषयांवरील लेखांचा समावेश होता. त्यामुळे मजकुराची वैविध्यता, मांडणी यांचे वाचकांनी स्वागत केले. २५ ऑक्टोबरपासून ‘अक्षरनामा’ दिवाळी अंकाला सुरुवात झाली. १ नोव्हेंबरपर्यंत रोज तीन लेख या प्रमाणे दिवाळी अंकांचे लेख प्रकाशित केले गेले. त्यालाही वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवाळी अंकाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले.

आठवड्याभरात वाचकांच्या मिळालेल्या या प्रतिसादाने आम्ही आनंदून गेलो आहोत. अनेक वाचकांनी फोन, मेसेजस, मेल याद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत. काहींनी ‘अक्षरनामा’ची तुलना इंग्रजीतील ‘scroll.in’, ‘firstpost’ यांच्याशीही केली आहे. ही दोन्ही इंग्रजीतील डिजिटल डेली भारतभर लोकप्रिय आहेत. ‘अक्षरनामा’ हेही मराठीतील डिजिटल डेली म्हणूनच आम्ही सुरू केले आहे. अशा प्रकारचे दुसरे पोर्टल मराठीमध्ये नसल्याने तशी तुलना होणे काही प्रमाणात साहजिकही आहे. मात्र इंग्रजीतील दोन्ही पोर्टल्स ही प्राधान्याने बातम्यांची आहेत. ‘अक्षरनामा’ हे मात्र ‘मराठी ऑनलाईन फीचर्स’ पोर्टल आहे. घटना, घडामोडी यांचे यथायोग्य प्रकारे विश्लेषण करून त्यातील वास्तव आणि सत्य यांची विभागणी करणारे लेख हे आमचे उद्दिष्ट असेल.

निव्वळ बातम्या देणारी अनेक पोर्टल्स, अॅप मराठी आणि इंग्रजीमध्ये आहेत. मात्र त्या बातम्यांचे विश्लेषण करून त्यांची घटना, वास्तव आणि सत्य या आधारावर मांडणी करणारे निदान मराठीमध्ये तरी एकही पोर्टल नाही. आणि त्याचीच सध्या जास्त गरज आहे असे आम्हाला वाटते. हल्ली बातमी आपल्यापर्यंत पोहचायला फार वेळ लागत नाही. वर्तमानपत्रांपासून ते टीव्हीपर्यंत आणि सोशल मीडियापासून ते स्मार्टफोनपर्यंत कुठल्याही प्रकारे ती आपल्यापर्यंत पोहचते. परंतु एखादी घटना सुरुवातीला घडते, तिथेच ती थांबून राहत नाही. त्यात सतत नवनव्या गोष्टींची भर पडत असते. त्यामुळे कुठल्याही विषयावरील बातमी ही तशी अपूर्ण असते. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. म्हणूनच नंतरच्या घडामोडींचा समावेश करण्यासाठी वर्तमानपत्रांना तब्बल एक दिवस लागतो आणि वृत्तवाहिन्यांना पाच-सहा तास लागतात. अनेकदा घटना वेगाने घडत असतात आणि विश्वासार्ह माहिती देणारे लोक जागेवर नसतात. अशा वेळी काही तर्ककुतर्कही पसरवले जातात. हल्ली बऱ्याच बातम्या या ट्विटर, फेसबुक, ब्लॉग यांसारख्या सोशल मीडियावरही घडतात, घडवल्या जातात. कधी कधी हे प्रकार जाणीवपूर्वक केले जातात, तर कधी या ठिकाणच्या मजकुराच्या बातम्या करून मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमे त्यावर चवितचर्वण करतात.

या साऱ्या गदारोळात घटना नेमकी काय आहे, त्यातले वास्तव काय आहे आणि सत्य काय आहे, याबाबत काहीच समजत नाही. उलट घटना हेच वास्तव आणि वास्तव हेच सत्य म्हणून अनेकदा पुढे केले जाते. त्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमे सर्वांत पुढे असतात. या माध्यमामध्ये मुद्रितमाध्यमांपेक्षा जास्त चांगल्या क्षमतेची, अभ्यासू आणि त्वरित विश्लेषण करू शकतील, अशा पत्रकारांची गरज असते. मात्र दुर्दैवाने इतरांशी स्पर्धा करण्याच्या नादात अनेकदा तारतम्य राखले जात नाही.

पहिल्या संपादकीयात म्हटल्याप्रमाणे ‘अक्षरनामा’ची कुणाशीही स्पर्धा नाही. राहता राहिला प्रश्न ‘scroll.in’, ‘firstpost’ यांच्याशी केल्या जाणाऱ्या तुलनेचा. तर ही दोन्ही इंग्रजीमध्ये प्रकाशित होणारी ‘ऑनलाईन वर्तमानपत्रे’ (डि़जिटल डेली) आहेत. ‘अक्षरनामा’ हे मराठीसारख्या एका प्रादेशिक भाषेतले ‘ऑनलाईन फीचर्स पोर्टल’ आहे. त्यामुळे या दोन्हींची तुलना होऊ शकत नाही असे आम्हाला वाटते. त्यामुळे या प्रतिक्रिया आम्ही कॉम्पिलमेंट म्हणूनच घेतल्या आहेत. एक मात्र खरे की, त्यातून आमच्याकडून असलेल्या अपेक्षा ध्वनित होतात. ‘अक्षरनामा’ दिवाळी अंकाला जो प्रतिसाद मिळाला, त्यातून वाचकांच्या दर्जेदार मजकुराविषयीच्या अपेक्षाच पुढे येतात. ऑनलाईन माध्यमामध्ये फार मोठे लेख वाचले जात नाहीत, अशी सर्वसाधारण समजूत असते. त्यात फार तथ्य नसते, हे या माध्यमात वावरणाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत असते. ‘अक्षरनामा’च्या दिवाळी अंकातले बहुतांश लेख हे २००० ते ३००० इतक्या शब्दांचे होते. मात्र तरीही ते वाचले गेले. त्याचे एक कारण ते चांगल्या प्रकारे लिहिले गेलेले होते. लेख मुद्देसूद, सुसंगत मांडणी करणारा असेल, शक्य तेवढा तटस्थपणे पाहणारा असेल तर तो वाचला जातो, शब्दसंख्या त्या आड येत नाही, हा आपलाही नेहमीचा अनुभव असतो. मात्र चांगले लेखन मिळवणे ही काहीशी कठीण गोष्ट असते. अनेकदा चांगला विषय आणि चांगला लेखक यांची मोट बांधता येत नाही. चांगला विषय मिळाला तर त्यासाठी ऐनवेळी चांगला लेखक सुचत नाही आणि चांगला लेखक माहीत असेल तर त्यासाठी चांगला विषय सुचत नाही. पण हे समीकरण जुळले तर तुम्ही चांगला मजकूर देण्यात यशस्वी होता येते. ‘अक्षरनामा’चा हाच प्रयत्न असणार आहे. मराठीतील मान्यवर लेखकांच्या बळावर हे आव्हान आम्ही पेलू शकू असा विश्वास वाटतो. आमची टीम पक्षपातीपणा, एकांगीपणा, पूर्वग्रहदूषितता यांपासून कटाक्षाने दूर राहण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या संपादकीयात म्हटल्याप्रमाणे कुणाचीही बाजू आम्ही घेणार नाही, तसेच कुणाच्या विरोधातही उभे राहणार नाही. निवाडे करण्याचे काम न्यायालयाचे आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांसारखा त्या वाटेला जाण्याचा प्रश्नच येत नाही. स्वातंत्र्य, समता आणि न्याय या भारतीय राज्यघटनेमधील सर्वश्रेष्ठ मूल्यांची आपल्यापरीने पाठराखण करणे, हे आमचे ध्येय असेल. त्या दिशेचा प्रवास आम्ही आमच्या लेखककांच्या पाठबळावरच करू शकू.

आजपासून ‘अक्षरनामा’वर संपादकीय, सदरे आणि नैमित्तिक लेख असा स्वरूपाचा मजकूर असेल. त्यातून चालू घटना-घडामोडींची दखल घेतली जाईल. दिवाळी अंकाप्रमाणेच हाही मजकूर आम्ही चांगला देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. वाचकांनी जेमतेम आठवड्याभरात आमच्याविषयी जो विश्वास दाखवला आणि ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्यापरीने नक्की करू. मात्र या आमच्या धडपडीला तुमच्यासारख्या सुजाण वाचकांच्याही सहकार्याची गरज आहे. तुम्ही ‘अक्षरनामा’ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आम्हाला मदत केली तर आम्हाला आव्हांनाचा सामना करणे अधिक सोपे जाईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख