माझा लेखनप्रवास, प्रेरणा इत्यादी इत्यादी...
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
प्रवीण बर्दापूरकर
  • ‘मोहोळ’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 20 March 2026
  • ग्रंथनामा शिफारस प्रवीण बर्दापूरकर Praveen Bardapurkar मोहोळ Mohol

ज्येष्ठ संपादक, लेखक प्रवीण बर्दापूरकर यांचं ‘मोहोळ’ हे व्यक्तिचित्रणाचं नवंकोरं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्यानिमित्तानं त्यांनी लिहिलेलं हे मनोगत -

.................................................................................................................................................................

तुमच्या लिहिण्याच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या, लिहिता कोणासाठी, का लिहिता, असे काही नेहमीचेच प्रश्न नव्याने पुन्हा एकदा ‘मोहोळ’ या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने पत्रकारितेचे विद्यार्थी आणि काही वाचकांनी उपस्थित केले आहेत. खरं तर, या प्रश्नांची उत्तरं यापूर्वी एकदा दिली आहेत,  पण त्याला आता सात-आठ वर्षं उलटल्यामुळे बहुदा ते कथन वाचकांच्या विस्मरणात गेलं असावं. पत्रकारिता शिकू इच्छिणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांना ते माहीत नसणार, कारण तो मजकूर प्रकाशित झाला किंवा त्या संदर्भात जेव्हा मी बोललो, तेव्हा हे विद्यार्थी शालेय स्तरावर असतील आणि शालेय स्तरावर असलेल्या विद्यार्थ्यांकडून इतकं अवांतर वाचन अपेक्षितही नसतं. त्यामुळे ‘नव्या बाटलीत जुनी दारू’ या म्हणीनुसार पुन्हा एकदा या प्रश्नांची उत्तरं देतो आहे.

कोणत्याही लेखक/संपादकाचं कोणत्याही प्रकारचं कसदार, बिनचूक लेखन एका दिवसात साध्य होत नसतं. कोणत्याही लेखकाचं वाचन, लेखन आणि घेतलेल्या अनुभवांचा प्रवास कायमच अविश्रांत श्रमाचा असतो. महत्त्वाचं म्हणजे लेखनात नियती, प्रारब्ध, ललाट, भाग्य असं काहीच  नसतं.  आपल्यावर नेहमी असा एक संस्कार होतो की, प्रत्येकाच्या तळहातावर असणाऱ्या किंवा ललाट रेषा प्रत्येकाचं भवितव्य घडवत असतात, पण ते साफ खोटं आहे. एक शेर सांगतो-

‘हाथों की लकीरों पे गुमान न करना,

किस्मत तो उनकी भी अच्छी होती हैं,

जिनके हाथ नहीं होते’

सांगायचं तात्पर्य हे की, यात ‘किस्मत’ शब्द असला तरी ही किस्मत म्हणजे अविश्रांत श्रम असा घ्यायचा. लेखन पत्रकारितेतील असो की नसो, प्रत्येक लेखन हा एक सराव असतो. जसा एखादा गायक भरपूर  रियाज करून एखादा राग बांधतो, तशी लेखनसाधना असते. समाजमाध्यमांवर पोस्ट टाकणं किंवा काही तरी ‘खरडणं’ (यात ‘टाईप’णंही आलं!) म्हणजे जर्नालिस्टीक किंवा साहित्यलेखन नव्हे! बाय द वे, पत्रकारितेत प्रदीर्घ काळ राहिल्यानं माझा हा लेखन सराव आपसूक घडत गेला.

आता मुद्दा लेखनामागील भूमिकेचा. ती भूमिका सांगायची झाली, तर ते कथन काहीसं आत्मपर आहे, पण सांगतोच. मुळात पत्रकार/संपादक जे काही लेखन करतात ते साहित्य आहे, हा बहुसंख्य पत्रकार/संपादकांचा असतो, तसा माझा (गोड) गैरसमज मुळीच नाही. पत्रकार/संपादकाचं लेखन हे, इंग्रजीत ज्याला ‘लेजिटीमेट प्रोफेशनल वुईकनेस’ म्हणतात, तशी वेळेचं कांटेकोर बंधन असणारी व्यावसायिक गरज असते. त्यात सृजन असतंच असं नाही किंवा सृजन फार-फारच क्वचित असतं, हे मला प्रामाणिकपणे मान्य आहे. पत्रकार म्हणून आलं लेखन सृजन आहे आणि आपल्यामुळेच एखादा लेखक लिहिता झाला किंवा घडला असाही बहुसंख्य पत्रकार/संपादकांचा असतो, तसा माझा गोड गैरसमज कधीच नव्हता आणि आजही नाही.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

मी लिहितो, कारण मला केवळ लिहिता, वाचता आणि बोलता येतं. मला गाता येत नाही, मूर्ती कोरता येत नाही की चित्र करता येत नाही. मग काय करावं? तर जे येतं ते, म्हणजे मी लिहितो. कारण माझ्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे. माझी त्याबाबतची भावना आरती प्रभू यांच्या ओळीत थोडा बदल करून सांगायची तर-

‘आलो इथे रिकामा,

भरूनी गेलो आहे’

अशी आहे .

एक पत्रकार/संपादक म्हणून डोळे आणि कान टक्क उघडे ठेवून वावरल्यानं अनेक घटनांचा साक्षीदार झालो. त्या हकिकती आहेत; किस्से नाहीत. प्रेषिताचा आव न आणता त्यावर आधारित मी जे लिहीत गेलो अनेकांना आवडतं तर काहींना नाही असा अनुभव आहे. महत्त्वाचं म्हणजे, लेखनातून मला आनंद मिळतो. गेली साडेचार दशकं मी पत्रकारितेत आहे.

अलीकडच्या पाच वर्षांचा अपवाद वगळता पत्रकारितेच्या निमित्तानं संपूर्ण राज्य अनेकदा पालथं घातलं आहे. देश आणि अनेक परदेशातही माझी भटकंती सतत सुरू होती. निवासी संपादक झाल्यावर आणि साल्झबर्गची आंतरराष्ट्रीय अभ्यासवृत्ती मिळाल्यावर तर परदेश दौरे जास्तच वाढले. पत्रकारितेच्या निमित्तानं सर्वाधिक परदेश दौरे करणारा मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मी कदाचित एकमेव मराठी पत्रकार असेन. शिवाय नागपूर, मुंबई, दिल्ली अशा महत्त्वांच्या शहरांत प्रदीर्घ काळ दै. ‘लोकसत्ता’ म्हणजे एक्स्प्रेस वृत्तपत्रसमूह आणि अगदी अखेरच्या टप्प्यात ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहासाठी पत्रकारिता करण्याची संधी मला मिळाली.

महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारण, समाजकारण, प्रशासन आणि सांस्कृतिक जगतात या काळात केवळ पत्रकार असल्यामुळेच मुक्त संचार करता आला. विधीमंडळ आणि संसदेच्या कामाचं प्रदीर्घ काळ वृत्तसंकलन करता आलं. महत्त्वाचं म्हणजे मराठीसोबतच हिन्दी आणि इंग्रजी या भाषांतही लेखन करता आलं. प्रकाश दुबे या संपादक मित्रामुळे हिन्दीत ‘भास्कर’ या दैनिकासाठी नियमित लेखन केलं. तरी मी जास्त रमलो ते मराठीतच. आधी वार्ताहर आणि नंतर संपादक म्हणून काम करताना दररोज किमान एका तरी नवीन माणसाला भेटायचा माझा रिवाज जवळजवळ तीनपेक्षा जास्त दशकं होता. त्यामुळे मुद्रित वाचनासोबतच मला माणसं वाचायचीही सवय लागली.

मला खरं तर व्हायचं होतं कथालेखक. चाळीस-पंचेचाळीस वर्षापूर्वी मी काही कथा लिहिल्या आणि त्याचं कौतुकही झालं.  माझ्या तेव्हाच्या अक्षरावर तेव्हा ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात असणारी मंगलाही फिदा होती, तेव्हा आमची ओळख नव्हती. कथालेखनाच्या प्रसिद्धीला पूरक ठरेल या आशेनं मी पत्रकारितेत आलो, पण गडकरीसाहेबांच्या रेट्यामुळे राजकीय वृत्तसंकलनाच्या बीटमध्ये काम करू लागलो. मी म्हणतोय ते गडकरी म्हणजे विद्यमान काळात गाजणारे नितीन गडकरी नव्हे, तर ज्येष्ठतम संपादक माधवराव गडकरी यांच्याबद्दल हा उल्लेख मी कृतज्ञतापूर्वक करतो आहे.

राजकीय वृत्तसंकलनाच्या बीटमध्ये प्रदीर्घ काळ काम करताना सत्तेच्या दालनात वावरता आलं. ते अनुभव मोठे विलक्षण आणि माझ्या मध्यमवर्गीय धारणांना हादरवून सोडणारे आहेत. त्यामुळे समज वैपुल्यानं विकसित आणि टोकदार झाली; आकलन आणि भान विस्तारलं; अनुभवाची पोतडी गच्च भरत गेली. राजकारणी म्हणजे मग्रूर, रगेल आणि रंगेल, कायम कट-कारस्थानं करणारा, भ्रष्टच; हा माध्यमं, लेखक आणि हिन्दी व मराठी चित्रपटांनी करून दिलेला गैरसमजहीत्यामुळे दूर झाला. अनेक राजकारण्यातला माणूस मला दिसला. या अनुभवांचं वैविध्य विशाल आणि बहुपेडी आहे. या संपत्तीच्या त्या दृष्टिकोनातून मी श्रीमंत आहे आणि कृतज्ञही आहे.

पत्रकारितेत काम करताना अनेकांना कमी अधिक प्रमाणात विविधांगी आणि वगळे अनुभव येतात, पण आलेले अनुभव लिहिले पाहिजे असं मला वाटलं. पत्रकारीतेत आलेल्या अनुभवांवर आधारित तुरळक लेखन आधीही झालेलं आहे. तरी माझं लेखन थोडसं वेगळं म्हणजे त्याला असलेला ललित शैलीचा बाज आणि काहींशी पाल्हाळीक कथन शैली हे असावं. हे मला जमलं कारण माझ्यावर वाचनाचा संस्कार बालपणीच माई-म्हणजे माझ्या आईकडून झाला.

पुढे मंगलाच्या प्रेमात पडल्यावर आणि आमचा विवाह झाल्यावर शब्दकोडी सोडवण्याचा छंद आणि लळा लागला. लहानपणी भजन कीर्तन ऐकण्याचा आणि वाचत्या वयात अनंतराव भालेराव यांच्या प्रासादिक रसाळ लेखनाचा झालेला एकत्रित परिणाम म्हणजे माझी शैली असावी. मंगला मराठीची स्नातक, मराठी आणि इंग्रजीवर तिची छान पकड, त्यामुळे माझ्या भाषेला पैलू पडले.

याच काळात भरपूर दर्जेदार ललित, राजकीय आणि वैचारिक वाचन झालं. त्या काळात मी म्हणजे वाचत सुटलेला माणूस बनलेलो होतो. असंख्य भाषाप्रभुंचा स्नेह लाभला; परिणामी मराठी भाषा अधिकाधिक उमजत गेली. तरी लेखन सुरू केलेलं नव्हतं, कारण मी राजकीय वृत्तसंकलनाच्या दालनात आकंठ बुडालेलो होतो. गप्पांच्या मैफिलीत मी हे अनुभव सांगत असे, पण लिहीत नसे. त्यासाठी माझ्यामागे लकडा लावला तो मंगला आणि ज्यांचा उल्लेख मी स्वामी असा करतो त्या (आता दिवंगत) श्याम देशपांडे याने. अखेर मंगला आणि श्यामच्या तगाद्याला कंटाळून बातम्या व फुटकळ लेखनासोबतच साप्ताहिक ‘लोकप्रभा’साठी १९९९मध्ये काही वृत्तकथा लिहिल्या; त्या संपादक प्रदीप वर्माने आवर्जून प्रसिद्ध केल्या. त्या कथांना मिळालेला प्रतिसाद स्तिमित करणारा होता. आपण लिहिलेलं वाचकांना आवडतं, याची ती जाणीव सुखद होती.

दरम्यान माझी बदली नागपूरला निवासी संपादक म्हणून झाली. नंतर ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा संपादक झालो. बातमी सोडून अन्य लेखनात मग्न झालो. ‘डायरी’, ‘नोंदी डायरी नंतरच्या’, ‘क्लोज-अप’, ‘मागोवा’, ‘भाष्य’ असे ‘लोकसत्ता’ आणि ‘लोकप्रभा’तील स्तंभ वाचकप्रिय झाले. महेश एलकुंचवार यांना नागभूषण सन्मान मिळाला, तेव्हा ‘क्लोज-अप’चा पहिला दीर्घ लेख लिहिला. तो वाचकांना आवडला. तेव्हा व्यक्तिचित्रण लेखनाची लय सापडली आहे असं वाटलं. मग त्याच नावानं व्यक्तिचित्र लेखनाचा स्तंभ सुरू केला. ते लेखन वृत्तपत्रीय शब्दमर्यादा सांभाळून केलेलं होतं आणि फारच टुकार दर्जाचं होतं तरी त्याचं पुस्तक निघालं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची विक्रीही चांगली झाली. सुधारित आवृत्तीच्या निमित्ताना त्याचं पुनर्लेखन केलेलं आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

आधी वार्ताहर आणि नंतर संपादक असताना अनंतराव भालेराव, माधवराव गडकरी (या ‘गडकरी स्कूल’चा मी विद्यार्थी आहे), गोविंदराव तळवलकर, निशिकांत जोशी, मुकुंदराव किर्लोस्कर, मामासाहेब घुमरे, कुमार केतकर, अरविंद गोखले, ह. मो. मराठे, अरुण साधू, सुरेश द्वादशीवार अशा दिग्गजांचा एक तर सहवास तरी लाभला किंवा त्यांच्यासोबत सोबत काम करता आलं. या प्रत्येकाकडून काही ना काही शिकता आलं. ऐकीव माहितीवर लेख वगैरे तर सोडाच, पण अगदी चार ओळींचीही बातमी लिहायची नाही याचं काटेकोर भान आलं. समोरच्यालाही मतं असतात, त्याला प्रतिवादाचा हक्क असतो, हे मी मामासाहेब घुमरे आणि कुमार केतकर यांच्याकडून शिकलो.

हळूहळू माझ्या लेखनाची एक स्वतंत्र शैली निर्माण झाली. कुणावरही टीका करतांना त्याचे दोन गुण आधी सांगायचे आणि मग हल्ला करायचा, आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे, हे पक्कं होत गेलं आणि माझ्यातला विवेक जागरुक झाला. राजकीय भूमिका, मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकातलं चांगुलपण मनावर ठसू लागलं. त्यामुळे मी आणि माझं लेखन एकारलं कर्कश्श झालं नाही. माझ्या वर्तन आणि लेखनातही सुसंस्कृतपणा डोकावू लागला. याचा परिणाम म्हणून दूषित ग्रह बाजूला पडून मोठ्ठा गोतावळा निर्माण झाला.

माझ्या लेखन प्रवासाची कथा इतकी छोटी आहे. ज्या भूमीत तुकाराम, ज्ञानेश्वर जन्मले असताना, माझं लेखन सृजन आहे असं माझं कधीच म्हणणं नव्हतं आणि यापुढेही असणार नाही. हे लेखन ‘अक्षर’ नाही आणि जे काही मी लिहितो आहे ते साहित्य आहे, असाही माझा मुळीच समज म्हणा की दावा नाही. आपण बर्‍या दर्जाचं लेखन करतो याची मला ठाम जाणीव आहे.

जाता जाता, एक सांगितलं पाहिजे, ते म्हणजे वाचकांना माझं राजकीय लेखन जास्त आवडतं. त्यात संदर्भ असतात म्हणून असं बहुदा घडत असावं.

माझ्या लेखन प्रेरणा आणि प्रवासाची गोष्ट इतकी छोटी आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......