‘भारतीय विरागिनी’ : अखिल भारतीय संतकवयित्रींच्या जीवनगाथा, कथा आणि व्यथा यांची ओळख करून देणारे ‘वजनदार’ पुस्तक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
जीवन तळेगावकर   
  • ‘भारतीय विरागिनी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 29 November 2025
  • ग्रंथनामा शिफारस भारतीय विरागिनी Bhartiya Viragini अरुणा ढेरे Aruna Dhere

‘भारतीय विरागिनी’ हे अरुणाताई ढेरे यांचे नवीन पुस्तक अखिल भारतातील संतकवयित्रींविषयी आहे. या संतकवयित्रींच्या रचनांचाही लेखिकेने थोडक्यात परामर्श घेतला आहेच. स्वतः उत्कृष्ट कवयित्री असल्यामुळे लेखिकेने या संतकवयित्रींच्या काही रचनांचा हृदयस्पर्शी भावानुवाद केला आहे. पण तो या पुस्तकाचा विषय नाही, तर या स्त्रीसंतांची ओळख हा मूळ उद्देश आहे. म्हणून हे सामान्यतः ‘अज्ञात’, ज्यांना आपण इंग्रजीत ‘अन्संग’ म्हणतो, त्यांच्या जीवनगाथा आणि व्यथांविषयीचे पुस्तक आहे.

लौकिकाला अलौकिकापुढे तृणवत मानणाऱ्या निभ्रांत ‘जैन साध्वी आणि बौद्ध स्थविरी’ यांच्यावरील प्रकरणापासून पुस्तकाची सुरुवात होते. “जैन साध्वींनी धर्मप्रसार केला, तरी एखादा अपवाद वगळता साहित्यनिर्मिती केलेली आढळत नाही… एका ‘मल्ली’चा अपवाद वगळता स्त्रिया तीर्थकरांच्या पदाला पोहोचलेल्या नाहीत.” ‘स्त्री म्हणजे दुःख’, हे बुद्धाचे उद्गारही प्रसिद्ध आहेत. आनंदाने बुद्धाचे मन वळवले ते मुख्यतः महाप्रजावती गौतमीसाठी… नाराजीने का होईना बुद्धाने स्त्रियांसाठी मुक्तीची वाट खुली केली आणि बौद्धांनी गाथांचा समावेश बौद्ध साहित्य सग्रहात केला.”,  “थेरीगाथा हा बौद्ध भिक्षुणींच्या वचनांचा - उद्गारांचा संग्रह आहे... स्त्रियांचे पहिले काव्य आपल्याला ऋग्वेदात सापडते. पण स्त्रियांच्या पारमार्थिक कवितांचा पहिला मोठा संग्रह म्हणजे थेरीगाथा,” असे लेखिका लिहितात.

त्यानंतर भक्तिमार्गातील कवयित्रींचा प्रांत-निहाय दर्शनपट लेखिकेने मांडला आहे. त्यात काश्मीर, राजस्थान, गुजरात, उत्तर व मध्य भारत आणि ओरिसा, पूर्व बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक व शेवटी महाराष्ट्र असा विस्तीर्ण पट त्यांनी साकारला आहे. 

चौदाव्या शतकात जन्मलेल्या काश्मिरातल्या लल्लेश्वरीवर तर ‘लल्ला’ नावाचे लेखिकेचे स्वतंत्र पुस्तकही आहे. “लल्ला ही फिरस्ती जोगीण होती.. आजही मंदिरांमधून आणि मशिदी दर्ग्यांमधूनही तिची वचने ऐकवली जात आहेत... जवळजवळ पाचशे वर्ष त्या रचना मौखिक परंपरेने जपल्या.” तिचे लहान वयात झालेले लग्न, सासरी झालेला छळ, तांत्रिक वामाचारी संशयी नवरा, कंटाळून संसाराबाहेर टाकलेलं पाऊल, ती उन्मन अवस्थेत फिरत राहिली, ‘वाक्’ गात राहिली, इ. या प्रकरणात आहे.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

लेखिकेने, “काश्मिरी शैवागमाचा एक अत्यंत उदार आणि प्रभावी आविष्कार म्हणजे लल्लेचे वाक्!”, असं म्हटलंय. उत्तम संस्कृत जाणत असूनही लल्ला जनसामान्यांची बोलीच बोलत राहिली, हे लेखिकेने नोंदवले आहे. तसेच लेखिका इतर संतकवयित्रींशी होणाऱ्या लल्लेश्वरीच्या तुलनेवर प्रकाश टाकतात. लल्लेनंतर तीन शतकांनी झालेली रूपा भवानी तिला गुरुस्थानी मानते. या प्रकरणांतून काश्मीरचा इतिहासही उलगडत जातो हे विशेष.

त्यानंतर राजस्थानातल्या मीरेसंबंधी स्वतंत्र प्रकरण येते. तिचे चरित्र आपल्याला सामान्यतः ठाऊक असते, पण ते लेखिकेने वेगवेगळ्या अंगाने तिच्या नावाच्या व्युत्पत्तीसंबंधी असलेल्या विद्वानांच्या मतमतांतरांसकट उलगडून दाखवले आहे. “मीरेने रैदासांना गुरु मानले.. तिच्या सासरच्या मंडळींना ते सहन होण्यासारखे नव्हते... पण तिच्या पदांना धोब्यांच्या, विणकरांच्या, कुंभारांच्या आणि चांभारांच्या वस्त्यांमधून आश्रय मिळाला...तिला वाटलं वृंदावनात पुरुष फक्त एकच आहे. गिरीधर गोपालकृष्ण! बाकी सगळ्या तर गोपीचं आहेत.”  

लेखिका म्हणतात, “तिचे कोणतेही पद अगदी कोणतेही पद ऐकले, तर त्यातले संगीत - अंतःसंगीतही सहज जाणवते... संत नव्हती मीरा. ती निःसंशय भक्त होती. तिची साधना ही कृष्णानुरुक्तीची साधना होती... रवींद्रनाथ टागोरांनी 'स्त्रीर पत्र' या आपल्या कथेतल्या नायिकेच्या निमित्ताने मीरेला पुन्हा जागवले… गांधीजींनीही मीरेला पुनर्जीवित केले. सामंतशाहीविरोधी राजसत्तेविरोधी उभी राहणारी ती तेजस्विनी होती. पहिली सत्याग्रही होती.”

तद्नंतर गुजरातमधील गौरीबाई आणि गंगासती यांचे थोडक्यात चरित्र येते. उत्तर व मध्य भारत आणि ओरिसा मधील चंद्रसखी, सहजोबाई, दयाबाई आणि माधवी दासी व अन्य विरागिनींविषयी माहिती येते, त्यांच्या काव्यरचनेसंबंधीचा ऊहापोह होतो. त्यानंतर ‘रामायणा’चे पुनःकथन करणारी बंगालची चंद्रावती येते.    

नंतर आंध्रातली रामायणकर्ती मोल्ला येते, तिने शुद्ध तेलुगूतून स्वतंत्र रचना केली. “त्यानंतर झालेल्या वेगमम्बेने सौभाग्यलेणी उतरवली नाहीत, जवळजवळ शंभर वर्ष नंतर तिने मीरेचे अनुसरण केले, दक्षिणेची मीरा झाली... तेलुगू साहित्यात परमार्थ क्षेत्रात यक्षगान रचनेची लक्षणीय नोंद तिच्या नावाने करावी लागते.”

तमिळ रचनाकारांचा सर्वांगीण इतिहास लेखिकेने दीर्घपणे उलगडला आहे. कराइक्कल अम्मैयार -पिशाचिनी, सहाव्या शतकाच्या मध्यात शिवस्तुतीची पदे रचणारी पहिली तमिळ संतकवयित्री. तमिळ भूमीवरही चमत्कारांसह चरित्रगायन केले गेले म्हणून त्यांचा प्रभाव जनमानसावर आजतागायत राहिला, असे लेखिका मानते. या कवयित्रीने तिच्या काव्यातला शिव हा विलयाचा देव मानला, स्मशानभूमी हाच नृत्यमंच बनवला.

त्यानंतर झाली अव्वैयार, म्हणजे आदरणीय स्त्री, ती एक व्यक्ती नव्हे, तीन स्त्रियांना हे बिरुद असावे, असे लेखिकेचे मत आहे. “अव्वैयारच्या रचना साध्या, गोड आहेत. सहसुगमता आणि सुभाषितांसारखी सूत्रबद्धता हे तिच्या रचनांचे विशेष.”

आंदाळ ही तमिळनाडूची सर्वाधिक लोकप्रिय संतकवयित्री. बारा आळवार संतांमधली एकमेव संत स्त्री. तिच्या पदांमधून बाराशे-चौदाशे वर्षांपूर्वीचे तमिळ ग्रामजीवन रसरशीतपणे जिवंत झाले आहे, आजही तमिळ वैष्णव कुटुंबांमधल्या विवाहप्रसंगी आंदाळची पदे गायली जातात. त्यानंतर अठराव्या शतकाच्या प्रारंभी झालेल्या अवुदई अक्कल चे चरित्र आले आहे, तिच्या रचना मौखिक पद्धतीने गायल्या गेल्या, पण तिच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेतली गेली नाही.   

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

केरळच्या कवयित्रींचे प्रकरण छोटेसे आहे, त्यांच्या रचना पण आज अनुपलब्ध आहेत, त्यात चंगक्रोत्तुअम्मा, नंगापेन्नु, करूरअम्मा यांचा उल्लेख आहे. कर्नाटकातल्या अक्कमहादेवी या वीरशैव संत, त्यांनी महात्मा बसवेश्वरांचे स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्वज्ञान अंगिकारले, त्यामुळे त्यांना मुक्तपणे व्यक्त होता आले, तिच्या वचनांना अग्रमानाचे स्थान लाभले. 'वचन', हा वाङ्मयीन घाट त्यांनी वापरला. 

“वीरशैव संत स्त्रियांना शिवशरणी अशी संज्ञा आहे. सर्व भारतभरात बौद्ध भिक्षुणींनंतर मध्ययुगात मोठ्या संख्येने स्त्री समुदाय सार्वजनिकरित्या परमार्थ मार्गावर आल्याची घटना फक्त याच संप्रदायात घडलेली दिसते.”   

सर्वांत शेवटी या पुस्तकात महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती दिली आहे, त्यात महदाइसा, मुक्ताबाई, जानाबाई, बहिणाबाई, वेणाबाई यांची माहिती आली आहे, तसेच काही अन्य विरागिनी पण आल्या आहेत. एकूणच या सर्वांच्या कर्तृत्वाचा तौलनिक चिकित्सक विचार पण यात मांडला आहे. या पुस्तकात प्रांताप्रांतील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय घडामोडींचे पण स्वच्छ प्रतिबिंब आहे. 

लेखिकेने आपले ‘मनोगत’ पुस्तकाच्या शेवटी मांडले आहे, ते थोडक्यात असले तरी छान आहे. पुस्तकाची दीर्घ प्रस्तावना अभ्यासपूर्ण आहे. या संतकवयित्रींना मराठी वाचकांसमोर आणण्याचे फार मोठे काम लेखिकेने श्रमपूर्वक केले आहे. एकेक शब्द जो लेखिकेने या पुस्तकात स्वतःच्या व्यासंगाच्या बळावर तोलून धरला आहे, किंवा आपल्या वाङ्मयीन चिकित्सेनंतर जे प्रतिपादन केले आहे, त्याचे वजन या पुस्तकाला ‘वजनदार’ बनवते!

‘भारतीय विरागिनी’ - अरुणा ढेरे | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई | पाने – ४६४ | मूल्य – २३२ रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......