‘महामुद्रा : दिल्लीतील मराठी कर्तृत्व (भाग १)’ : संसदीय लोकशाहीच्या प्रवासातील आणि दिल्लीतील महाराष्ट्रीयन मंत्र्यांचा ‘जयजयकार’ करणारा दस्तऐवज!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राहुल विद्या माने
  • ‘महामुद्रा : दिल्लीतील मराठी कर्तृत्व (भाग १)’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 13 September 2025
  • ग्रंथनामा शिफारस महामुद्रा Mahamdura

‘महामुद्रा : दिल्लीतील मराठी कर्तृत्व (भाग १)’ या पुस्तकात पत्रकार धनंजय बिजले यांनी लिहिले आहे. विशेषत: स्वातंत्र्य चळवळीशी ज्यांचा संबंध आलेला आहे त्यांच्याविषयी आणि स्वातंत्र्यानंतर ज्यांनी देश पातळीवर कर्तृत्व गाजवले त्यांच्याविषयीची माहिती सोप्या शब्दांत दिली आहे. जी नेतेमंडळी महाराष्ट्राला देशाच्या पातळीवर आपल्याला लाभली त्यांच्या कामाचा, धोरणाच्या पातळीवर आणि विकासविषयक विविध योजनांच्या अंमलबजावणीवर कसा प्रभाव पडला आणि त्यातून नवीन कोणते पायंडे पडले, याबद्दल या पुस्तकात खूप रंजक किस्से आहेत. यातील बरेचसे किस्से लोकप्रिय अर्थाने आपल्यात प्रचलित नाहीत.

या पुस्तकाने जुन्या जाडजूड ग्रंथांमध्ये किंवा स्मृतीकोशांत लपून राहिलेला माहितीचा खजिना खुला केला आहे. या नेत्यांपैकी ज्यांनी आत्मचरित्रे लिहिली आहेत किंवा इतर ठिकाणी आठवणी लिहिल्या आहेत, त्या मूळ संदर्भस्त्रोतातून लेखकाने नेमके आणि विस्तृत तपशील वाचकांना उपलब्ध करून दिले आहेत, हेसुद्धा मेहनतीने केलेले काम आहे. त्याशिवाय त्या काळात प्रसारमाध्यमांतून विशेषत: मुद्रित वर्तमानपत्रांत या नेत्यांच्या कारकिर्दीबद्दल वेळोवेळी आलेली महत्त्वाची टिपणे ठिकठिकाणी उदधृत केली आहेत.

पुस्तकाची सुरुवात डॉ. बाबासाहेव आंबेडकरांच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील ऐतिहासिक अशा कारकिर्दीचा आढावा घेऊन होते. यातील बऱ्याचशा बाबी आता ज्ञात असल्या तरी, ‘मानवतावादी सुधारक’ ही आंबेडकरांची प्रतिमा राजकारणी आणि केंद्रीय मंत्री यापेक्षाही उंच ठेवण्यास लेखकाने दिलेले प्राधान्य नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. आंबेडकरांचे राजकीय-प्रशासकीय कर्तृत्व, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ठळक लकबी आणि त्यांच्या देशव्यापी प्रभावाच्या (संविधाननिर्मितीसह) नेमका उल्लेख त्या त्या संदर्भासह आला आहे.

१९४२मध्ये जेव्हा बाबासाहेबांना व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात घेतले गेले, तेव्हाची काही मुद्रितमाध्यमे उदा. ‘टाईम्स ऑफ इंडिया’, ‘संडे स्टॅंडर्ड’ या वृत्तपत्रांत आलेल्या प्रतिक्रियांची रोचक माहिती आली आहे. कामगारांच्या वेतनासाठी, गर्भवती महिलांसाठी केलेल्या धोरणात्मक बदलांची योग्य दखल आली आहे. ‘हिंदू कोड बिल’ प्रकरणावरून जेव्हा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा डॉ. आंबेडकर देतात, तेव्हा माध्यमांत आलेल्या प्रतिक्रिया आणि टिपण्यासुद्धा महत्त्वाचा तपशील पुरवतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गणेश वासुदेव मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था, प्रांतिक विधानसभा ते केंद्रीय पातळीवरील विधीमंडळाचा मोठा अनुभव होता. त्यांनी संसदीय लोकशाहीमधील संकेत, परंपरा, आदर्श आणि पदांची स्वायत्तता स्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. विविध संसदीय समित्या आणि संकेत, नियम बनवण्यात मावळणकर जगातील विविध देशांचा अभ्यास करून आपले स्वतःचे सार्वभौम असे पायंडे पाडत. त्याची विस्तृत दखल लेखकाने घेतली आहे.

त्याचबरोबर मावळणकरांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी जे उपोषण केले होते, त्यातील त्यांच्या दुर्लक्षित योगदानाची सविस्तर दखल घेतली आहे. त्याबद्दल लेखकाचे अभिनंदन!

शिवराज पाटील लोकसभा अध्यक्ष असताना त्यांनी सुरू केलेल्या विषयनिहाय स्थायी समित्या आणि तत्कालीन खासदार राम नाईक यांच्याबरोबर संसदेच्या सत्राची सुरुवात ‘जण गन मन’ या राष्ट्रगीताने, तर शेवट ‘वंदे मातरम’ने करण्याबद्दलचा इतिहासुद्धा रोचक आहे.

पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्र प्रश्नी निर्णय होत नसल्याने आणि मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निषेधार्थ राजीनामा दिल्याचा विस्तृत वृत्तांत आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ वृत्तपत्रात आला होता. त्याचा सारांश लेखकाने दिला आहे. राजीनामा देतेवेळी देशमुख यांनी संसदेत नेहरूंच्या उपस्थितीत केलेलं भाषण त्यांच्या ‘मराठी बाण्या’ची आठवण करून देते. आज मराठी भाषा आणि महाराष्ट्राची भूषणस्थळे असलेल्या अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्य्या वारशावर हल्ले होत असताना याच ‘बाण्या’ची महाराष्ट्राला परत एकदा गरज आहे, याची प्रकर्षाने जाणीव होते.

काँग्रेसचे खासदार, मंत्री काकासाहेब गाडगीळ यांचे पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), पिंपरी येथील औषधांचा कारखाना, महात्मा गांधी यांची राजघाटावरील समाधी, संरक्षण दलासाठी कळीचा ठरलेला जम्मू-पठाणकोट रस्ता आणि भाक्रा नानगल व हिराकूड धरणांची उभारणी, यांबाबतचे योगदान दुर्लक्षित राहिले आहे. ते अतिशय बारकाव्याने त्या वेळच्या घटनाक्रमांसह लेखकाने मांडले आहे!

धोरणात्मकदृष्ट्या ज्यांनी देशाच्या वाटचालीवर अमीट छाप सोडली, पण त्याचा जास्त गवगवा झाला नाही, अशा नेत्यांचीही दखल हे पुस्तक घेतं. १९७१मधील बारामतीचे तत्कालीन खासदार आणि केंद्रीय कामगार मंत्री रघुनाथ खाडिलकर यांच्या कार्यकाळात कामगारांना त्यांच्या एका महिन्याच्या पगारासमान बोनस द्यायचा ऐतिहासिक निर्णय हा त्यापैकी एक! खाडिलकरांचं हे योगदान कायमस्वरूपी स्मरणात ठेवावं असं आहे.

संयुक्त महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण आणि गृह, संरक्षण, परराष्ट्र व अर्थ या चारही मंत्रालयांतील कामाचा इतिहास यशवंतराव चव्हाण यांच्याशिवाय पुरा होऊ शकत नाही. १९६२च्या चीनविरोधी युद्धांत भारताचे सामरिकदृष्ट्या नुकसान तर झालंच, त्याशिवाय सैन्याचे मनोधैर्यसुद्धा खचलं. त्या दोन्ही आघाड्यांवर चव्हाण यांनी समर्थपणे नेतृत्व सांभाळलं. संरक्षणाची दूरगामी अशी पंचवार्षिक योजना आखणं, शासन-प्रशासन-सैन्य यांच्यातील संबंध सुधारणे, अशी महत्त्वाची कामं त्यांनी केली.

१९६५च्या युद्धावेळी पाकिस्तानच्या कागाळीला उत्तर देऊन हवाई हल्ले करण्याचा धाडसी निर्णय मंत्रिमंडळाच्या किंवा संबंधित समितीच्या बैठकीशिवाय आणि पंतप्रधानांना माहिती नसताना, केवळ देशहितासाठी घेण्याचा नेतृत्त्वगुण चव्हाण यांच्याकडे होता. पंडित नेहरू यांच्यानंतरच्या देशाच्या इतिहासातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याचे चव्हाण साक्षीदार होते. या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी निस्वार्थीपणे, देशहिताचा उद्देश समोर ठेवून आणि स्वतःच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षांना मुरड घालून काम केलं. त्याचा समर्पक आढावा लेखकानं घेतला आहे.

‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’मध्ये लढलेले शंकरराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि प्रशासकाच्या स्वभावाचं चित्रण बारकाव्यानिशी त्यांच्याविषयीच्या प्रकरणात आलं आहे. त्यांची पारदर्शकता, सचोटी, कठोर परिश्रम आणि एका विषयाचा ध्यास घेऊन त्यावर विकासाचं राजकारण करण्याचा ध्येयवाद, याचा ठळक आढावा घेतल्यामुळे या प्रकरणाचं वेगळेपण उठून दिसतं.

तत्कालीन माहिती नभोवाणी मंत्री वसंत साठे यांनी भारतात रंगीत टी.व्ही. तंत्रज्ञान आणण्यास दिलेलं योगदान, याबाबतचा घटनाक्रमही वाचण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे म. गांधी यांच्यावरील रिचर्ड अटेनबरो या दिग्दर्शकाचा सिनेमा भारतात बनवण्यासाठी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेलं संयोजनसुद्धा मोलाचं होतं. या दोन्ही बाबींतील रंजक घटनाक्रम वाचनीय आहे.

संयुक्त महाराष्ट्र व गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादाचे कट्टर पुरस्कर्ते मधू दंडवते यांच्यावरील प्रकरणाचा खास उल्लेख करावा लागेल. गांधीवादी समाजवादप्रणित राष्ट्रवादाचं महत्त्व दंडवते यांनी वेळोवेळी आपल्या लिखाणातून, भाषणातून, कृतीतून दाखवून दिलं आणि शेवटपर्यंत ते तसे वागलेच. रेल्वेमंत्री असताना त्यांनी सुरू केलेली कोकण रेल्वे हे त्यांचं एक ऐतिहासिक काम आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकांना, प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी रेल्वेमध्ये दूरगामी व मूलभूत सुधारणा करण्यासाठी त्यांनी उचललेली पावलंही.

दंडवते यांनी लोकसभेची निवडणूक हरल्यावर राज्यसभेत जाण्याची संधी असूनसुद्धा नाकारली. असा दुर्मीळ, नि:स्वार्थी राजकारणी शोधून सापडणार नाही. त्यांच्यावरचं प्रकरण सुंदर पद्धतीनं लिहिलं आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

पुस्तकाच्या उत्तरार्धात राम नाईक, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, नितीन गडकरी यांच्याबद्दलची प्रकरणं आहेत. यांच्याविषयीची माहिती तशी परिचित असली, तरी त्यातील काही तपशिलांची उजळणी चांगल्या रितीनं करण्यात आली आहे. 

थोडक्यात, या पुस्तकाचं महत्त्व पुढील कारणांसाठी आहे :

- लोकशाही, संसदीय परंपरा, धोरणनिर्मिती, विकास कामं याबाबतीत योगदान देण्याची महाराष्ट्राची दीर्घ परंपरा आहे. त्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना उजाळा देण्याचं आणि त्यांची तरुण पिढींना ओळख करून देण्याचं काम हे पुस्तक करतं.

- देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानिक परंपरा यांची जडणघडण होण्यामध्ये राष्ट्रव्यापी दृष्टीकोन असणारी माणसं महाराष्ट्रानं दिली, याचं स्मरण या पुस्तकातून होतं. आज अशी माणसं सत्तेत, राजकारणात आहेत का, हा प्रश्नही या निमित्तानं मनात निर्माण होतो.

उत्कंठावर्धक पद्धतीनं गोष्ट सांगण्याची हातोटी लेखक धनंजय बिजले यांच्याकडे आहे. मात्र त्यांनी या पुस्तकाला वर्तमान घडामोडींपासून अलिप्त ठेवलं आहे! त्यामुळे अलीकडच्या काळात महाराष्ट्रधर्म आणि महाराष्ट्राच्या हिताच्या अनेक मुद्द्यांवर उत्तर भारतकेंद्रित राजवटींनी कसा हल्ला केला, ही संदर्भचौकट यात सापडणार नाही.

त्याचबरोबर महाराष्ट्राच्या केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीमध्ये काय काय चुका केल्या, त्याची तार्किक समीक्षाही यात सापडणार नाही. गेल्या सात दशकांतील विविध राजकीय पक्षांच्या सर्वोच्च पदावर पोचलेल्या व्यक्तींच्या उत्कर्षाचं आणि उत्तुंग यशाचं कौतुक तेवढं या पुस्तकात आहे. अर्थात ते आजच्या ढासळलेल्या ‘महाराष्ट्रधर्मा’ला संजीवनी देण्यासाठी आवश्यक असंच आहे.  

‘महामुद्रा : दिल्लीतील मराठी कर्तृत्व (भाग १)’ - धनंजय बिजले

शुभम साहित्य, पुणे | पाने – ३३६ | मूल्य – ४०० रुपये.

.................................................................................................................................................................

राहुल विद्या माने

nirvaanaindia@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......