‘कळीकाळ’ : त्याला उलटा प्रवास करायचा नव्हता. लोक कामधंदा मिळवण्यासाठी शहरात जातात. आपण गावाकडे जाऊन काय करणार, या विचारानं तो अस्वस्थ होत होता…
ग्रंथनामा - झलक
बालाजी घारूळे
  • ‘कळीकाळ’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sun , 07 September 2025
  • ग्रंथनामा झलक कळीकाळ Kaleekal बालाजी घारूळे Balaji Gharule

तरुण लेखक प्रा. बालाजी घारूळे  यांची ‘कळीकाळ’ ही पहिलीवहिली कादंबरी नुकतीच हर्मिस प्रकाशन, पुणेतर्फे प्रकाशित झाली आहे. या कादंबरीतला हा एक संपादित अंश...

.................................................................................................................................................................

रानबा पॅरासाईट असला, तरी तो एक-एक दिवस पुढे ढकलत होता. विद्यापीठ प्रशासनानं पॅरासाईट्सवर मोठी कारवाई केली. त्यामुळे त्याला होस्टेल सोडावं लागणार होतं. त्यानं राहण्याची शोधाशोध सुरू केली. वॉकिंगला येणाऱ्या मित्रांमुळे काही दिवसांकरिता औंधमध्ये फ्लॅट मिळाला. तेथून तो सांगवीला मित्राच्या फ्लॅटवर शिफ्ट झाला. येथे राहणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. दिवसभर जे मित्र राहायचे, ते रात्री यायचे नाहीत; कारण रात्री वेगळेच मित्र यायचे. फ्लॅटमध्ये किती मित्र राहतात, ते त्याला शेवटपर्यंत लक्षात आलं नाही. मित्राचा मित्र फ्लॅटवर राहायला आला की, तो दोनएक दिवस राहून जायचा. काही तर चांगले आठ-दहा दिवस राहायचे. रिकाम्या हातांनी आल्यामुळे बाथरूममधील टुथपेस्ट, साबण सर्व वापरायचे. एकदा तर त्यानं इस्त्री करून ठेवलेले बॅगमधील कपडेच पॅरासाईट मित्रानं घातले. ज्या वेळी तो बाहेरून आला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, या महाशयांनी आपलेच कपडे घातले आहेत. मात्र त्याला लाज वाटली नाही. तोच त्या कपड्यांकडे पाहून म्हणाला, ‘काय, कपडे घातले का?’ तोही निर्लज्जपणे म्हणाला, ‘आज इंटरव्यूह आहे. आल्यानंतर काढून ठेवतो.’ तो काय बोलणार? त्याचं लक्ष दोरीवर टाकलेल्या अंडरवेयरकडे गेले. ती मात्र त्यानं घातली नव्हती. त्यानं त्यावरच समाधान मानलं. त्याला या मित्रांचा त्रास होऊ लागला, पण तो काहीच करू शकत नव्हता. इतक्या कमी रेटमध्ये दुसरीकडे जागा मिळत नव्हती. त्याचा आता एकच उद्योग झाला होता. तो आपल्या मित्रांना फोन करायचा. तो सुरुवातीला साहित्यावर गप्पा मारायचा, त्यानंतर हळूच सीएचबीच्या जागेविषयी विचारायचा.

विद्यापीठाच्या होस्टेलला त्याचा एकही मित्र राहिला नव्हता. त्यातले काही मित्र गावी गेले होते, तर काही मित्र नोकरी करीत होते. त्यामुळे त्यांचा हळूहळू काँटॅक्ट कमी होत गेला होता. आता तर त्यांचे फोनही येत नव्हते, व्हॉट्सअॅपवर कधी तरी एखादा मेसेज यायचा. त्यालाही तो उत्तर द्यायचा नाही. त्याच्या फोनची रिंगटोन बरेच दिवस वाजली नव्हती. अशीच एके दिवशी अचानक मोबाईलची रिंग वाजली. तर तो फोन नवाजचा होता. मग त्यानं त्याला विद्यापीठात बोलाविलं. त्याप्रमाणे तो विद्यापीठात नचिकेत कँटिनला गेला. तेथे नेहमीचे कर्मचारी बसले होते. त्यात जे काही संशोधक विद्यार्थी बसले होते, ते त्याच्या परिचयाचे नव्हते. त्यांच्या नेहमीच्या गप्पागोष्टी चालू होत्या. तो एकटाच एका कोपऱ्यातल्या खुर्चीत अवघडल्यासारखा बसला होता. त्या वेळी त्याला आपले पूर्वीचे दिवस आठवले. तो मनाशी म्हणाला, ‘काहीच बदललं नाही. सर्व गोष्टी आहे तिथंच आहेत. कर्मचारी आहेत. संशोधक विद्यार्थी आहेत. मग काय बदललंय, याचं उत्तर मात्र मिळालं नाही,’ असं म्हणून तो शांत बसला. आजूबाजूच्या झाडांकडे पाहू लागला. त्यात वाऱ्याची झुळूक यायची आणि वडाच्या झाडांची पानं खाली पडायचे. त्यांच्याकडे पाहून त्याला गंमत वाटायची. त्या वेळी तो मनाशी म्हणाला, ‘झाडाला पालवी काही दिवस राहते. ती गळून गेली की, पुन्हा नवीन पालवी फुटते. पुन्हा ती खाली पडते, हा निसर्गाचा नियम आहे. तसंच काही आपलं आहे,’ असा विचार मनात आला आणि तो अस्वस्थ झाला. तेवढ्यात समोरून नवाज आला. तो त्याला बऱ्याच दिवसांनी भेटत होता. त्या वेळी आपली व्यथा त्याच्याकडे मांडावी, असा एक विचार त्यांच्या मनात आला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

नवाजनं आपल्या खांद्याची बॅग काढून टेबलावर ठेवली आणि म्हणाला, “चल, काहीतरी खाऊ. तुला काय घ्यायचं?”

तो, “काही चालेल.”

नवाज, “ठीक आहे. आपण मिसळ घेऊ,” असं म्हणून तो कँटिनच्या काउंटरला गेला आणि दोन मिसळची ऑर्डर देऊन आला.

नवाज बाजूची खुर्ची ओढत म्हणाला, “तुझी मला रोज आठवण होते, तू सांगवीत बसून किती बोअर होत असशील, याचा विचार करून मी परेशान होतो. तुला रोज भेटायला यावं म्हणतो, पण कॉलेजमधून वेळ मिळत नाही. आज दुपारनंतर काही काम नव्हतं, म्हणून तुला लगेच फोन केला. माझा दिवस कसातरी कामात जातो. दोन कॉलेजमध्ये सीएचबीची नोकरी करतोय. मध्येच छोटी-मोठी कामे येतात. ती रात्री जागून पूर्ण करतो. तेही अगोदरसारखे पैसे देत नाहीत. त्यांना लिहून देणारे अनेक भेटू लागले आहेत. त्यात आता कॉपी-पेस्टचा जमाना. कोणाला संशोधनाचं पडलं नाही. मला वाटतं, सगळ्या संशोधकांनी माझ्याकडूनच मार्गदर्शन घेतलंय. मी एखादी गोष्ट सांगायला गेलो की, ते त्याच्या पुढच्या गोष्ट सांगतात. आताचे संशोधक लय बाराचे आहेत.” असं म्हणून तो हसायला लागला.

तोही हसत म्हणाला, “असली कामं किती काळ करणार?”

नवाज निराश होत म्हणाला, “माहिती नाही. जोपर्यंत नोकरी लागत नाही, तोपर्यंत तरी अशीच कामं करावी लागणार. बेकारांची संख्या वाढत जात आहे. आपल्याला नोकरी मिळणार नाही. आमच्या महाविद्यालयात जागा निघाली होती. एका जागेसाठी तीनशे-चारशे उमेदवार आले होते. सगळीकडे असंच आहे. बाकीच्या गोष्टी तुला माहितीच आहेत. या नोकरीशिवाय आपल्याला दुसरा काहीच कामधंदा जमत नाही. अम्मी तर रोज फोन करतीय, ‘शादी कर, नहीं तो मै मर जाऊंगी।’ तिच्या या बोलण्याचा कंटाळा आलाय. तिचं काय, ती आज-उद्या मरेल. मला तर ती जिवंतपणी मारायला लागलीय. आता या गोष्टी कोणाला सांगताही येत नाहीत.”

त्यावर त्यानं कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. होस्टेलला असताना तो याच मित्रांबरोबर तासनतास गप्पा मारायचा. सरकारच्या ध्येयधोरणांविरुद्ध आपले परखडपणे मत मांडायचा. सरकारचा विकासाचा आराखडा तयार करायचा, तो मित्रांबरोबर शेअर करायचा. आता ते सगळं संपत जात होतं. त्याच्यासारखे अनेक मित्र बेकार होते. त्यांना या शहरात कामधंदा मिळवता येत नव्हता. विद्यापीठ सोडल्यावर बाहेर राहायला कोठून पैसे आणावेत, असे विचार डोक्यात आले की, तो अस्वस्थ व्हायचा.

ही निराशा त्याच्या चेहऱ्यावर नवाजला दिसत होती, म्हणून तो म्हणाला, “काय विचार करतोस?”

तो, “काही नाही. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. आपण होस्टेलमध्ये असताना सगळ्या व्यवस्थेविषयी बोललो, पण आपण आपल्याविषयी कधी बोललो नाही. माझी तर दोन्ही मनं अपयशी ठरली आहेत. त्यातून कोणताच निष्कर्ष निघत नाही. विद्यापीठात शिकायला आल्याचा अभिमान वाटायचा, आता तर त्याचं थोडंही भूषण राहिलं नाही. बदलत्या शैक्षणिक धोरणातून काही मिळालं नाही.”

नवाज आपलं नेहमीप्रमाणे अर्थशास्त्राचं आकलन मांडू लागला, “या सगळ्या गोष्टींना कारणीभूत सरकारची चुकीची धोरणं आहेत. त्याचा फटका आपल्याला जसा बसला आहे, तसाच साऱ्या देशाला बसत आहे. मी पहिल्यापासून म्हणतोय, नोटबंदी व जीएसटीसारख्या निर्णयांमुळे देशातील अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत, तुम्हाला वाटतं, मी तर या सरकारवर टीकाच करणार, कारण मी मुसलमान आहे. मला कुठं ‘राष्ट्रीय अस्मिता’ आहे. देशाविषयी थोडेच प्रेम आहे. अशा वातावरणामुळे अनेक बुद्धिवंत बोलायचे बंद झाले आहेत. तुला माहिती आहे, आज देशात कोणती चर्चा आहे? नोकरीची नाही, उद्योगधंद्यांची नाही, तर चर्चा नको त्या विषयाची आहे. त्यात एक बरं झालं, राममंदिराचा मुद्दा न्यायदेवतेनं निकाली काढला. मंदिराच्या नावाखाली एक दशकाचं राजकारण संपलं, आता त्यांना दुसरा मुद्दा धुंडाळावा लागेल, तोपर्यंत त्यांना काही काळ तरी नेत्यांच्या बेताल वक्तव्यांवर भागवावे लागेल. त्यांची संख्या त्यांच्याकडे कमी नाही. ते त्याचा खुबीनं वापर करीत आहेत. आपला प्रवास उलट्या दिशेने सुरू झाला आहे.”

वेटर नाश्ता घेऊन आला आणि तो रानबाकडे पाहत म्हणाला, “कुठं हाय, सर? दिसत नाही.”

तो, “कुठं जाणार? इथंच आहे.”

दोघेही खाली मान घालून नाश्ता संपेपर्यंत बोललेच नाहीत.

मग रानबाच म्हणाला, “देशाच्या राजकारणावर बोलायला तुझ्याकडे इतकी एनर्जी येते कोठून? होस्टेलला आपण अशा चर्चेत सहा वर्षं घालवले. लोकांच्या मनात काय चालूय, हे काही आपल्याला घंटा कळत नाही. मला वाटतं, आपलं काहीतरी चुकतंय. लोकांना काय हवं, ते आपण पहिलं ओळखलं पाहिजे. लोक कोणत्या गोष्टीला त्रस्त होते, देशात त्यांना परिवर्तन का घडवावंसं वाटलं? तू म्हणतोस तसे इतके ज्वलंत मुद्दे देशात असतील, तरी लोक पेटून उठतील, अशी अपेक्षा करीत राहायचं? संधी मिळेल तेथे आपली भूमिका परखडपणे मांडत राहायचं. कोणत्याही पक्षाचं समर्थन करायचं नाही, कोणत्या पक्षाला विरोध करायचा नाही, तरच आपण चांगले अभ्यासक होऊ. देशात इतकी बेकारी वाढत आहे, तरी लोक खपवून घेतात. याचं मला आजही उत्तर मिळालं नाही. शेवटी समाज म्हणून असणारी लोकांची एक जबाबदारी असते. ती जर ते विसरले असतील, तर तुम्ही आणि मी काय करणार? हे सगळे समाज म्हणून लोकांना मान्य असेल, तर तू आणि मी विनाकारण खडे फोडण्यात काहीच अर्थ नाही. लईच खाज असेल, तर एक लेख लिहून आपली खाज पुरी करून घ्यावी. लोक त्यावर काय प्रतिक्रिया देतील ते देतील. समज, त्यात त्यांना काही चुकीचं वाटलं, तर त्यावर चर्चा करतील. मग त्या पटल्या, तर आपण त्यात दुरुस्त्या कराव्यात.”

नवाज, “आपला देश गरीब आहे. उच्चशिक्षित लोक आहेत तरी किती?”

रानबा हसत म्हणाला, “तरी आपण शिक्षण महागडं करून टाकलं, शाळा-महाविद्यालयांची दुकानं झालीत. प्रत्येक दुकानाची फी वेगळी. अशा दुकानाला सरकार बळ देतं. बघ, आपण यांचं काहीच वाकडं करू शकलो नाही. महाविद्यालय स्वायत्त झालीत. ‘स्किल’च्या नावाखाली आधुनिक बलुतेदारी आलीय. यात ज्ञानाशी देणंघेणं नाही. वेठबिगार तरुणांना बनविण्याकडे वाटचाल चालू आहे. त्यांना थोडेच विचारवंत, विद्वान बनवायचे आहेत. ‘पंतप्रधान कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम’ त्यांचा भाग आहे. यूजीसी त्याला भरघोस अनुदान देत आहे. त्यातून काय साध्य होणार माहीत नाही. कुणाचा पायपोस कुणाला नाही.”

नवाज “एकटं राहिलं की, लय विचार करतो माणूस. जास्त विचार करू नकोस, नाहीतर मूळ विचारांपासून फारकत घेशील,” असं म्हणून हसायला लागला. तो जुन्या स्टाईलने हातावरचा केस उपटत म्हणाला, “तू बरोबर ओळखलेस. अशा शिक्षणातून समाज प्रगल्भ होत नाही, तर नेभळट होतो. शिक्षणतज्ज्ञ तर कधीच विकले गेले आहेत. ते स्वायत्ततेचे समर्थन करून पाकिटे गोळा करायला लागले आहेत. एखाद्या विद्वानानं स्वायत्ततेच्या विरोधी मत मांडलं, असं पाहिलं आहेस का? समज त्यांनी विरोधी मत मांडलं, तर त्यांचं दुकान कायमचं बंद होईल, हे त्यांना माहीत आहे. म्हणून ते गोलमाल उत्तरे देतात.”

रानबा, “तुला काय वाटतं, हे मला समजत नाही का? तू एक विचार कर, स्वायत्त महाविद्यालये इंग्रजी शाळेसारखी आहेत. एका जिल्हात चार महाविद्यालये स्वायत्त असतील, तर काय होईल? प्रत्येक महाविद्यालयाची फी वेगळी असेल; कारण जे महाविद्यालय इन्फ्रास्ट्रक्चर जास्त देईल, ते फी जास्त घेणार. म्हणजे, एक महाविद्यालय श्रीमंत विद्यार्थ्यांचं, दुसरं महाविद्यालय मध्यमवर्गाचं, तिसरं महाविद्यालय गरीब विद्यार्थ्यांचं. बघ तू, अशी वर्गवारी येत्या काळात होणार आहे. आज काय परिस्थिती झालीय? इंग्रजी शाळांमध्ये क्वालिफाईड स्टाफ नसताना शाळा चालू आहेत. तसंच महाविद्यालयांचं होणार आहे. त्यावर तज्ज्ञ म्हणायला मोकळे, शिक्षणासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करायला नको. सरकार निवडणुका जिंकण्यासाठी म्हणेल, ‘आम्ही गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू देणार नाही.’ काही म्हण, सगळं संपत चाललं आहे.”

नवाज, “नोकरीची वाट पाहत पस्तिसावं वर्षं ओलांडलं, अजून किती वर्षं नोकरीची वाट पाहत बसायचं? मला तर अजून कळत नाही. तू पाठीमागे लातूरच्या कापड दुकानातला झाडू मारायचा किस्सा ऐकविला होतास, तसंच काही काम आपल्यालाही करावं लागेल. तेही न लाजता. नाहीतर व्यवस्थेशी दोन हात करीत जगावं लागेल. मला राहत इंदौरींचा एक शेर आठवतो, ‘मुझे खबर है के दुश्मन भी कम नहीं। लेकिन हमारी तरह हथेली पे जान थोडी हैं।’. असं लंगाट राहायला शिकलं पाहिजे, नाहीतर अशा विचारांत जीवन संपून घ्यावयाची वेळ येईल.” असं म्हणून तो उठला आणि म्हणाला, “चल, मला कोंढव्याला जायचं आहे. ट्रॅफिक सुटण्याच्या अगोदर पोहोचलं पाहिजे.”

तो उठत म्हणाला, “ठीक आहे. मी जातो सांगवीला.” मग दोघेही गोल मार्केटकडे पायी चालत निघाले.

नवाज, “किती जण राहतात फ्लॅटवर?”.

तो हसत म्हणाला, “तू दिवसाचं विचारतोस की रात्रीचं?”

नवाज, “मला समजलं नाही, तू काय म्हणतोस?”

तो, “आमचा फ्लॅट फार चमत्कारिक आहे. फ्लॅटचा दरवाजा कधीच लावलेला नसतो. दिवसा आराम करायला येणारी वेगळीच मंडळी असतात, रात्री तर उशिरापर्यंत कोणीही झोपायला येत राहतं. येणारे मित्रांचे मित्र असतात. अजून मला कळलं नाही, फ्लॅटवर किती जण राहतात.”

नवाज म्हणाला, “बरं झालं. तू रूमवर एकटा राहत नाहीस. या गर्दीमुळे तुझा मनाशी होणारा संवाद तरी थांबला असेल.”

तो, “एका समस्येवर विचार करता येतो, पण इथं समस्याच समस्या आहेत. मग कोणकोणत्या गोष्टींवर विचार करायचा, हे पहिलं मला ठरवावं लागेल. जाहिरात यायची, त्या वेळी नोकरीवर विचार करायचो. आता जाहिरात येत नाही, मग त्याची तक्रार करायची कोणाकडे? संवाद करण्यासाठी समोर व्यक्ती तर असली पाहिजे, तर त्यातून काहीतरी निष्कर्ष काढता आला असता. आता तसं राहिलंच नाही. सगळे प्रश्नच प्रश्न. त्याला उत्तरच नाही. निरुद्देश संवादाचा काय उपयोग?”

तो हसत चालत होता. दोघंही मुख्य रस्त्यावरच्या वेगानं जाणाऱ्या वाहनांकडं पाहत उभे होते. तेथून जाणारी वाहने खूप वेगाने जात होती. त्या वेळी तो त्यांच्याकडे पाहत म्हणाला, “लोकांना घरी जायची किती घाई झालीय. सर्व गाड्या ऐंशी-शंभरच्या स्पीडनं जात आहेत. आपलं एक बरं आहे, आपल्याला कसली स्पीडच राहिली नाही.”

नवाज हसत म्हणाला, “आपल्याला काही घाई नाही.” त्यात नवाजची पीएमटी आली. तो घाईघाईत आपली बॅग सांभाळत पीएमटीत चढला. त्या गर्दीत त्याला पाठीमागे फिरून पाहता आलं नाही. तो मात्र त्याच्याकडे पाहतच राहिला.

 

जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जात होता. त्याचे पडसाद देशभर पडू लागले होते, सरकारकडून लॉकडाऊन लावले जाणाऱ्या बातम्या येऊ लागल्या, तशी पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांनी गावची वाट धरली. त्या वेळी त्यालाही गावी जावं लागणार होतं; पण त्याच्या मनाची तयारी होत नव्हती. तो येथेच राहून नोकरीची शोधाशोध करायचा विचार करीत होता. गावाकडे जाऊन तात्यांच्या शिव्या खाण्यापेक्षा इथंच राहिलेलं काय वाईट? त्याला घरापासून दूर राहायचं होतं. त्यासाठी त्यानं मिळेल ते काम करायची तयारी ठेवली होती. तसं त्यानं मित्रांना सांगून ठेवलं होतं. त्यांच्याकडून काहीतरी काम मिळेल, अशी अपेक्षा होती.

तो हा विचार करीत बसला असताना, त्याला तेजस्वीचा फोन आला. त्यानं त्याला पुणे सोडण्याचा सल्ला दिला, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जाणार आहे, तो काही कमी होणार नाही, सर्व जगाची अर्थव्यवस्था ठप्प होणार असल्याचं, त्यानं भाकित केलं. तरी त्याचं मन गावाकडे जाण्यासाठी तयार होत नव्हतं. त्याला उलटा प्रवास करायचा नव्हता. लोक कामधंदा मिळवण्यासाठी शहरात जातात. आपण गावाकडे जाऊन काय करणार, या विचारानं तो अस्वस्थ होत होता. त्याला त्याचं मन स्वस्थ बसू देत नव्हतं. इथं तर खाण्यापिण्याचे वांधे झालेत, असा विचार त्याच्या मनात आला. त्यानंतर त्यानं गावाकडे जाण्याची तयारी केली. त्यानं पहिला मोबाईलमध्ये वेळ पाहिला. रात्रीचे आठ वाजले होते. त्यानं घाईघाईने बॅग भरली. त्या वेळी फ्लॅटवरचे इतर मित्रही आपापल्या बॅगा भरत होते. प्रत्येक जण जड मनाने पुणं सोडत होता. ही सगळी मंडळी बॅग भरताना एकमेकांकडे पाहत होते, पण काही बोलत नव्हती. नोकरीच्या अपेक्षेनं आलेल्या या तरुणांची घोर निराशा झाली होती. ते अनेक कंपन्यांत इंटरव्यूह देऊन आले होते. तेथे त्यांचं सिलेक्शन होईल, अशी अपेक्षा होती. त्यात ही महामारी आल्यामुळे, त्यात ‘कोणत्या तोंडानं गावी जावं?’, असं म्हणत त्यांची सारखी बडबड चालू होती. त्यानं त्यांच्या बडबडीकडे लक्ष दिलं नाही. होस्टेल सोडताना त्याची जी अवस्था झाली होती, तिच अवस्था पुणे सोडताना होत होती. तो आपल्या कपाळावरचा घाम पुसत होता. तो मुळापासून हादरून गेला होता. त्यात एका मित्रानं त्याला थांबण्याचा आग्रह केला. त्यावर सावध प्रतिक्रिया देत तो म्हणाला, ‘काही दिवस गावी राहून येतो.’ त्यानं बाहेरच्या ओळणीवरचे अंडरपँट-बनियान बॅगमध्ये टाकले.

तो आपल्या मित्रांना, ‘येतो’, असं म्हणून बॅग खांद्यावर अडकवून फ्लॅटच्या बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ काही मित्रमंडळीही बाहेर पडली. तो चालत सांगवीच्या शितोळे चौकात आला. तेथील पीएमटीच्या बस स्टॉपवर थांबला. त्या वेळी त्याला हे शहर अनोळखी वाटू लागलं. तो आजूबाजूच्या गर्दीकडे पाहात मनाशी म्हणाला, ‘तू मला लवकर विसरलास?’ समोरून पीएमटी आली. तो बॅग घेऊन आत चढला. त्याच्या रूमवरचे मित्र बाजूला येऊन थांबले होते, तरी ते एकमेकांशी बोलत नव्हते. ते सर्व जण अनोळखी झाले होते. आतली गर्दी कमी होत जायची, तसे ते सीटवर बसायचे. त्यातील काही मित्रांनी स्वारगेटचे तिकीट काढले. मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगरचे एसटी स्टँड बंद होते. त्याला वाकडला जावे लागले.

तेथे तर अभूतपूर्व गर्दी होती. लातूरची एसटी जायच्या ठिकाणी पॅसेंजर जमा होत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर भीती होती. त्यातील अनेक लोक आपल्या फॅमिलीसोबत होते. त्यांच्या मनात तर वेगळीच भीती; कारण त्यांना आपले काम अर्धवट टाकून जावे लागत होते. गावी त्यांच्यासाठी काही काम नव्हते.

सर्व लोकांच्या तोंडाला फडके बांधले होते. त्यामुळे ते आपल्या लोकांपासूनही अनोळखी झाले होते. लातूरला जाणारी एसटी आली, सर्वांनी एकच घाई केली. तो आपली बॅग घेऊन त्या गर्दीतून घुसला आणि एक सीट पकडून बसला.  या एसटीला काही रिझर्वेशन नव्हतं, त्यामुळे मिळेल त्या जागी लोक बसत होते. ज्या लोकांना जागा मिळाली नाही, अशांनी एसटीमधल्या दोन सीटच्या मोकळ्या जागेत गप्पांचा फड भरविला.

बसमध्ये बसलेला प्रत्येक पॅसेंजर कोरोना व्हायरसविषयी बोलत होता.

एक गृहस्थ म्हणाले, “चीनचं राजकारण हाय. सगळ्या जगाची जिरवायचीय त्याला.”

दुसरे गृहस्थ, “अशीच माणसं मरणार. तिसरे महायुद्धच हाय. युरोपसारख्या संपन्न राष्ट्राचा माज उतरविला. अमेरिकेला थंड करण्याकरिता व्हायरस सोडून दिला. असले मोठे देश हतबल झालेत, मी तर चीनला धन्यवाद देतो.”

त्याच्या या म्हणण्याला सर्वांनी दुजोरा दिला. त्यामुळे चर्चेला चांगलीच रंगत आली होती. त्यातील कपाळी गंध लावलेले एक गृहस्थ म्हणाले, “अशा व्हायरसनं जग बुडणार आहे, हे अगोदरच आपल्या धर्मग्रंथात सांगून ठेवलंय. कलियुग हाय. जास्त काळ लबाडी चालत नाही. वर बसलेले लोक तरी किती सहन करणार? कधीतरी त्यांची उतराई करावीच लागेल. आपला पापाचा घडा भरलाय. कोणीच वाचणार नाही. पृथ्वीवर जीवजंतू तेव्हढं राहतील.”

यावर सर्व जण हसले. त्यातील एक सुशिक्षित गृहस्थ पुढे सरसावत म्हणाले, “तुम्ही काहीही बोलू नका. कोणी मरणार नाही. ते चीनचे लोक साप खातात. वटवाघळाचं सूप करून पितात. त्यातून कोरोना व्हायरस पसरला हाय.”

बाजूचे गृहस्थ तरी कशाला शांत बसतील. ते आपल्या सीटवरून उठले आणि उभे राहून बोलू लागले, “आपला समाज संपविण्यासाठी हा व्हायरस चिनी लोकांनी पसरविला. त्यांचा डाव लय मोठा आहे. त्याचा प्लॅन काही हे सरकार यशस्वी होऊ देणार नाही. त्यांना हे सरकार सळो की पळो करून टाकेल, याचा त्यांना अंदाज नाही.” त्यानं व्हॉट्सअॅपवरचा एक मेसेज वाचून दाखवला.

त्यातील एक गृहस्थ तंबाखू चोळत म्हणाले, “तुम्हाला कायबी कळत नाही. हा व्हायरस श्रीमंत लोकांनी पसरविला आहे. तो विमानातून आपल्याकडे आला आहे. आपण गरीब लोकांनी काळजी करायचं कारण नाही. तो आपल्यापर्यंत येणार नाही. तो त्यांच्यातच राहणार आहे.”

एक गृहस्थ बसून कंटाळले होते, ते कंडक्टरकडे पाहत म्हणाले, “कंडक्टरसाहेब, गाडी लवकर हलवा.”

त्यावर तो म्हणाला, “गाडीचा टाईमिंग दहाचा आहे. त्या वेळेस गाडी हलणार.” मग एसटीतील पॅसेंजरचे कंडक्टर तिकीट काढायला लागला.

त्यात एक वयोवृद्ध म्हणाला, “हा व्हायरस लवकर जाणार नाही. साहेब, एसटी बंद होणार, असं ऐकण्यात आलंय. खराय का?”

कंडक्टर हसून म्हणाला, “म्हणत्यात, उद्या-परवापासून बंद होणारंय. सरकारचे आदेश निघाले की, एसट्या थांबल्या.”

तो, “मग काय, तुमची मजाच हाय. घरी बसून पगार घ्यायचा.”

यावर कंडक्टर त्या गृहस्थाकडे तिरस्काराने पाहत म्हणाला, “मामा, कोणत्या गावचं? लयच बोलायला लागलाय. बसा की गप्प.”

तो गृहस्थ रागात म्हणाला, “आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय माहीत नाही. एकदाच सगळ्यांना मारून टाकावं. लोक लय माजल्यावानी करत्यात.” सगळ्यांकडे पाहून घेत त्यानं तोंडाला फडकं बांधून घेतलं.

त्याच्या पायाशी एक कुटुंब बसलं होतं. ते सर्वांच्या चर्चा ऐकत होतं, त्यातील गृहस्थ आपल्या बायकोला म्हणाला, “गावी मिळेल ते काम करूत. शहरात कशाला मरायला यायचं?” त्यावर त्याची बायको काहीच बोलली नाही. ती आपल्या दोन्ही मुलांच्या डोक्यांवरून हात फिरवित बसली. तिला आपली नाही, तर मुलांची काळजी होती.

गप्पांचा फड बंद झाला. रानबा विचार करू लागला, हे किती दिवस चालेल, याचा अंदाज नाही; पण या व्हायरसनं सरकारची कामं वाढली. आता त्यांना भांडवलदार वर्गाकडे हात पसरावे लागतील. शेवटी आपत्तीच्या काळात हीच तर लोक मदत करणार. अशा काळात सरकारी यंत्रणा पैसे खर्च करायला थोडीच मागे-पुढे पाहते? आपत्तीच्या नावाखाली सरकारची सगळी विकासकामं ठप्प होणार. सगळ्यात अगोदर नोकरभरती बंद करणार, याची त्याला काळजी वाटली. मात्र त्यातून काहीतरी मार्ग निघेल, असं म्हणून तो डोकं शांत करायचा प्रयत्न करू लागला, तरी त्याचं मन नदीच्या प्रवाहासारखं झालं होतं. ही महामारी अशा वेळी का आली? तो आपल्या नशिबाला दोष देऊ लागला. त्यात तो नास्तिक होता. त्याचा नशिबावर विश्वास नव्हता. मग तो कोणाला दोष देणार? कुणाकडे गाऱ्हाणं मांडावं, याचा शोध त्याचं मन घेऊ लागलं. त्यावर तो विचार करू लागला. त्याला काही उत्तर मिळत नव्हतं.

आपत्तीच्या काळात सरकारच्या विरोधात बोलता येत नव्हतं. समजा त्यांच्याविरुद्ध तक्रार केलीच, तर गांडीवर दंडुक्यांचा मार देतील आणि म्हणतील, ‘घरात शांत बसून रहा. हाताला काम मागू नका. मनात कोणता विचार आणू नका. तुमच्या पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डवर भरपूर धान्य देऊ. दिलेलं धान्य खात मुकाटपणे घरी बसा. त्यातच कुटुंब सुखी ठेवा. तसेच काही जगायला शिका. न्याय्य हक्कांची भाषा बोलू नका. त्याची सवय करा.’

खरंच असं होईल का, असा एक विचार त्याच्या मनात आला. त्या वेळी त्याच्या दुसऱ्या मनानं त्याला दुजोरा दिला. या वेळी त्याची तक्रार त्याच्या दुसऱ्या मनानं ऐकून घेतली नाही. शेवटी तो थोडा शांत बसून राहिला आणि मनात पुटपुटला, ‘या आपत्तीत सगळेच लोक याचकाच्या भूमिकेत जाणार, हे मात्र निश्चित.’

ड्रायव्हरनं एसटी सुरू केली. कंडक्टरनं प्रवाशांचे तिकीट काढून घेतले होते. काढलेल्या तिकिटांची व प्रवाशांची त्यानं मोजदाद केली. जेव्हा त्याला त्याचा हिशोब लागला, त्या वेळी तो आपल्या जागेवर बसला.

चांगलाच उकाडा वाढला होता. एसटी सुरू झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बाहेरची मोकळी हवा येऊ लागली. बहुतेकांनी तोंडाला बांधलेलं फडकं काढलं. त्यानं आपला तोंडावरचा घाम पुसून घेतला. मग जागेवर उठून वर ठेवलेली बॅग विनाकारण पाहून घेतली, बाजूची व्यक्ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, ‘माझी बॅग तुमच्या बाजूला ठेवलीय.’ तो त्याच्याकडे पाहून घेत म्हणाला, ‘आहे जागेवर’. यानंतर त्यानं डोळे झाकले. एसटी पुण्याच्या प्रत्येक सिग्नलला थांबत थांबत जात होती. तो खिडकीच्या बाहेर पुण्यातील ट्रॅफिक पाहत होता. त्याचं मन त्याला वारंवार विचारात होतं, ‘गावाकडे जाऊन काय करशील? कशाला गावाकडे जातोस?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दोन्ही मनांचा संवाद घडविण्याचा त्यानं प्रयत्न केला; पण तो या वेळी अशस्वी झाला.

त्या वेळी त्याला आपल्या मनांचा संवाद संपला, असं वाटून गेलं. त्यानं उठून आपल्या सॅकमधील पाण्याची बॉटल घेतली आणि पाणी पित खिडकीच्या बाहेर पाहू लागला. त्या वेळी त्याच्या लक्षात आलं की, माणसाला मन-भावना असू नये. रोजच्या जगण्याचे प्रश्न सोडवताना त्याचा जीव इतका मेटाकुटीला का येतो? त्यावर त्याला एकच गोष्ट लक्षात आली, या व्यवस्थेत टिकण्यासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी, प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी किती धडपड करावी लागेल, यातलं आपल्याला जमेल का? अशा अनेक शंका व्यक्त केल्या. त्यानंतर त्यानं मानेला झटका दिला व खिडकीतून बाहेर पाहू लागला. या वेळी त्याला रस्त्यानं चालणारे लोक किडामुंगीसारखे वाटले. तो त्यांच्याकडे पाहून पुन्हा अस्वस्थ झाला.

एसटी पुण्याच्या रोडवरून जोरात जात होती. खिडकीवाटे तितक्याच जोरात वारा आत येत होता. त्या सुसाट वाऱ्यामुळे तो भानावर आला आणि गावाकडल्या मंडळींना नोकरीचं कोणतं कारण सांगायचं, यावर विचार करायला लागला. त्या वेळी त्यानं ठरवलं, आपण महामारीचं उत्तर द्यायचं. येथील भ्रष्ट व्यवस्थेमुळे नोकरीपासून दूर राहिलो, असं म्हटलं, तर लोक मूर्खात काढतील, पहिलंच उत्तर बरोबर आहे. आता पुढं काय? तर त्यावर एक उत्तर द्यावं लागेल- ‘सरकारनं कोरोना महामारीबरोबर लढायला सांगितलं आहे. या लढाईत सगळ्यांनी सहभागी व्हायचं.’

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या वेळी तात्या थोडंच शांत बसणार, ते म्हणतील, ‘तुला मी यशाचा राजमार्ग दाखविलेला होता. तो तू स्वीकारला नाहीस. ही वेळ तूच ओढवून घेतली आहेस. त्याचं प्रायश्चित्त तुलाच करावं लागेल.’ यावर मात्र आपण काहीच बोलायचं नाही. तो निर्णय स्वतःचा होता. त्यासाठी काही दोष द्यायचा असेल, तर तो स्वतःला द्यावा लागेल, हे आपल्याला कळायला कितीतरी वर्षं गेली. असे विचार करत तो आपल्या बाजूच्या व्यक्तीकडे पाहत होता. तो त्याच्या खांद्यावर मान टाकून झोपला होता. त्यानं मान सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी तो आपली मान खांद्यावर टाकू लागला. शेवटी कंटाळून त्यानं त्याला झोपेतून उठवलं आणि त्याला सरळ झोपण्याची सूचना केली. त्यावर त्यानं होकार दिला आणि काही वेळात पुन्हा मान त्यांच्या खांद्यावर पडली. त्या वेळी मात्र त्याला त्याचा राग आला नाही, उलट त्याला हसायला आलं... ‘आपल्या चालत आलेल्या रूढी-परंपरा येथील भांडवलदारी लोक नाकारू देणार आहेत का?’ शेवटी त्यानं त्याच्या मानेला सरळ करून खांद्याचा टेकू दिला व एसटीच्या बाहेर पाहू लागला. एसटी पुण्याच्या गर्दीतून बाहेर पडली होती.

तो खिडकीच्या बाहेर पाहत राहिला. त्याची दोन्ही मनं शांत नव्हती. ती त्याच्याशी बोलायला लागली, ‘‘पुण्यात तर मोठ्या अपेक्षेनं आला होतास, उच्चशिक्षणानं तुला काय दिलं?’ पांढरपेशी जीवन जगण्याचं स्वप्न दाखविलं. त्यासाठी नको तितक्या तडजोडी करायला लावल्या. आपण गावातील तरुणांना कोणत्या तोंडानं सांगणार, तुम्ही उच्चशिक्षण घ्या. तुम्हाला नोकरी लागेल.”

“मी तर म्हणतो, तुम्ही जे काही करायचं, ते मनापासून करा. उच्चशिक्षणात आलात, तर तुम्ही नक्कीच बुद्धीला भगदाड पाडून घेणार. तुमच्या मताला इथं किंमत नाही. मग गावी गेल्यावर आपल्या हाती एकच गोष्ट राहते, दिवसभर पानटपरीवर थांबून सुपारी खायची. सगळ्या व्यवस्थेच्या नावानं थुंकत बसायचं. रात्री मात्र टीव्हीवरच्या प्राईम-टाईम शोमध्ये सहभागी व्हायचं. हरलेल्या मानसिकतेतून उच्चशिक्षित पिढीचं प्रतिनिधित्व करायचं, आणि भ्रष्ट सिस्टिमच्या विरोधात बोलत राहायचं. मनाची दारं-खिडक्या बंद करून आपल्याच कुटुंबातील मंडळींबरोबर भांडण करीत राहायचं; कारण इथूनच तर आपल्या वैचारिक जडणघडणीला सुरुवात झाली होती. ती नीट झाली नाही, म्हणून स्वतः पश्चात्ताप करायचा आणि स्वतःला दोष द्यायचा. असं किती दिवस करायचं. हे मात्र निश्चित सांगता यायचं नाही; पण जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत असंच चालत राहणार... हार मानायची नाही...”

‘कळीकाळ’ : बालाजी घारूळे | हर्मिस प्रकाशन, पुणे | पाने – ४३४ | मूल्य – ६०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......