अजूनकाही
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
नाटकं पुनरुज्जीवित केली जातात. पुन्हा पुन्हा. कारण इतर कुठल्याही माध्यमातून त्या नाटकाची ताकद तुम्हाला कळू शकत नाही. नाटकं कोणाला पुनरुज्जीवित करावीशी वाटतात? अत्रे, पुलं, कानेटकर यांची बरीचशी नाटकं हमखास गल्ला जमवणारी म्हणून निर्मात्यांना करावीशी वाटतात. तर तेंडुलकर, दळवी, एलकुंचवार यांची नाटकं आजच्या दिग्दर्शकांना इंटरप्रिट करावीशी वाटतात, तर काही नाटकातल्या व्यक्तिरेखा आजच्या अभिनेत्यांना आव्हान देत असतात.
असंच एक नाटक ‘सुमुख चित्र’ने नुकतंच रंगभूमीवर पुनरुज्जीवित केलं आहे – ‘सखाराम बाईंडर’. याला ही वरची तिन्ही कारणं लागू होतात. हे नाटक पहिल्यांदा १९७२ साली आलं होतं. म्हणजे माझ्या वयाच्या अकराव्या वर्षी. आमच्या घरात ब्राह्मणी वातावरण. त्या वेळी या नाटकावर मोठा वाद निर्माण होऊन तो न्यायालयात गेला होता. नाटकाचा आणि वादाचा विषय पाहता त्या वेळी मला हे नाटक दाखवण्याची शक्यता शून्य. आम्हाला त्या वेळी ‘प्रीतीसंगम’ किंवा ‘शाब्बास बिरबल शाब्बास’ अशी नाटकं दाखवली जात. (मी चुकत नसेन तर ‘शाब्बास बिरबल शाब्बास’ या नाटकात शेवटी खराखुरा हत्ती रंगमंचावर येत आणि त्या हत्तीचे सगळे स्वागत करत. तर तेंडुलकरांची नाटकं नेहमी इंग्रजीतल्या ‘Elephant in the room’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय देणारी. ते काय ते शेवटी पाहू)
तेव्हा आज ‘सखाराम बाईंडर’ बघायची कारणं तीन. एक – लेखक विजय तेंडुलकर, दोन – दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव, तीन - अभिनेता सयाजी शिंदे
विजय तेंडुलकरांची बरीच नाटकं बघण्यापेक्षा वाचनातच आलेली. ‘घाशीराम…’ खूप उशिरा, ‘कन्यादान’, ‘कमला’, ‘विठ्ठला’ बास इतकीच नाटकं मूळ संचात पाहिलेली. नंतर आयुष्यात तेंडुलकर फक्त नाटकापुरते नाही राहिले. त्यांच्या अनेक लिखाणातून आणि प्रत्यक्ष भेटीतून ते एका भारदस्त संदर्भ-कोषासारखे आयुष्यात सोबत राहिले.
विजय तेंडुलकर आणि ‘सखाराम बाईंडर’ यांच्याविषयी इथे मी फार काही लिहीत नाही. कारण त्यांच्या प्रत्येक नाटकावर अनेक अभ्यासकांनी पीएच.डी. केल्या आहेत. माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
माणसाला आरपार पाहण्याची एमआरआय स्कॅनर दृष्टी तेंडुलकरांना लाभलेली. त्यातून त्यांचा हा सखाराम पैदा झालेला. ‘ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला म्हारडा’ असं वर्णन त्याच्या घरचेच करायचे. आपला जन्म या शरीरासाठीच झालेला आहे, हे कुठलाही आडपडदा न ठेवता जगाला टिच्चून सांगणारा. ‘खोटं बोलणं हे सगळ्यात मोठं पाप आहे’ असं मानणारा. आपल्या शरीराची भूक भागवायला आत्तापर्यंत सहा स्त्रिया त्याच्या आयुष्यात आलेल्या. या नाटकात सातवी आणि आठवी येतात. त्यांना तो ‘लिव इन रिलेशनशिप’मध्ये ठेवतो. ‘बायको जे करते ते सगळं तू करायचं’ असं तो त्यांना निक्षून सांगतो. तो रंडीबाजी निषिद्ध मानतो. पण त्याच वेळी त्याचा लग्नसंस्थेवर विश्वास नाही. रांगडा रासवट देहाचा आणि प्रसंगी एका क्षणी थिजून कोलमडून पडलेला.
एखाद्या व्यक्तिरेखेचं असं वर्णन म्हणजे कुठल्याही नटाला आव्हानच. पहिलं ते निळू फुले यांनी पेललेलं. त्यांची खूप प्रशंसा झाली. (त्याची थोडीफार झलक त्यांनी कुठल्यातरी कार्यक्रमात सादर केलेल्या व्हिडिओ क्लिपरूपी मिळते.) त्यांचा त्यातला तो अभिनय पाहून पुढे अनेकांनी ते पेलायचे धारिष्ट्य दाखवलं नाही. काशीनाथ घाणेकरांनी ती आधीच नाकारली होती आणि डॉ. श्रीराम लागूंनी ती निळूभाऊंकडे वळवली होती, अशी एक माहिती.
या प्रयोगात ती भूमिका सयाजी शिंदे यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या या भूमिकेविषयी फक्त इतकंच सांगता येईल की, त्यात कुठेही सयाजी दिसत नाही. तिथे तुम्हाला फक्त सखारामच दिसतो. त्याने हा सामना तिथेच अर्धा जिंकला आहे. सखारामची रांगडी रासवट देहबोली त्याने नेमकी उचलली. सखाराम म्हणजे फक्त शरीर हे तो तुम्हाला सतत जाणवून देत राहतो. सांगत असलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे तो वागत नाही, तर त्याच्या वागण्यावर त्याने आपले तत्वज्ञान बेतलेले असते. नेमका हाच समज सयाजी आपल्या अभिनयातून आणि संवादफेकीतून तुम्हाला करून देत राहतो. सखारामचा राग आणि त्याची उसनी जरब सयाजीने नेमकी पकडली आहे. आमचे काही ज्येष्ठ मित्र म्हणाले की, ‘निळूभाऊंचा सखाराम तू पहिला नाहीस. नाहीतर...’ हे म्हणजे, ‘नानासाहेब फाटकांचा ‘हॅम्लेट’ तुम्ही पहिला नाही, म्हणून तुम्ही ह्यांना नट म्हणता’ असं बापाने आपल्या मुलाला सांगण्यासारखं आहे. जे कधीच पटण्यासारखे नाही. तुम्ही निळूभाऊंचा सखाराम पाहिला असो नसो सयाजी शिंदे यांचा सखाराम नक्की पहा. (कृपया यूट्यूबवर जे ‘सखाराम बाईंडर’ दिसतं, त्यावर जाऊ नका.)
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
हे नाटक पाहायचं आणखी एक कारण आजचा तरुण दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव. म्हटलं तर आजचा आघाडीचा, पण त्याचं हे पहिलंच व्यवसायिक नाटक असावं. नाटकाच्या पुस्तकाच्या ब्लर्बवर तेंडुलकरांनी लिहिलेलं निवेदन अभिजीतने नाटकाच्या सुरवातीलाच देऊन एक चलाखी (चांगल्या अर्थाने) दाखवली आहे. तेंडुलकरांचं नाटक, मग ते कळायला सोपं असलं, तरी पचायला जड असणार, ह्याची कुणकुण प्रेक्षकांना अभिजीत सुरुवातीलाच करून देतो आणि त्यांना सावध करतो. तेंडुलकरांनी वर्णन केलेलं सखारामचं घर जसंच्या तसं न दाखवता त्याने ते ग्राउंड लेवलच्या खाली असल्यासारखं दाखवलं. ते पाहून काही वर्षांपूर्वी ऑस्कर मिळालेल्या द. कोरियाच्या ‘पॅरासाईट’ सिनेमात बेसमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबाची आठवण येते. हे कसब नेपथ्यकाराचं असू शकतं, पण अभिजीतने त्याला मान्यता दिली, हे त्याचं श्रेय.
मूळ नाटक तीन अंकी आहे. त्यात अनेक प्रवेश आहेत. त्याची दोन अंकी रंगावृती करणं हे तसं फार कठीण. अभिजीतने त्यातलं नाट्य वा आशय न गमवता ते बेमालूमपणे साधलेलं आहे. नाटकातला ठेहराव कायम ठेवून त्याने त्याला एक गतीही दिली आहे. जी आजच्या प्रेक्षकाला अपेक्षित असते. आजूबाजूचा समाज आणि परिसर निव्वळ ध्वनिसंयोजनातून त्याने तो तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. अनेकदा त्याचा वापर त्याने पार्श्वसंगीत म्हणूनही प्रभावीपणे केला आहे. मुलांचे खेळण्याचे आवाज, कोंबडा आरवणं, कावळा (याला मूळ नाटकात एक वेगळा संदर्भही आहे.) भजन, प्रसंगानुरूप त्या भजनातली विविधता. या सगळ्यांचा तो उपयोग करतो. कधी कधी सखाराम वाजवत असलेला ढोल, प्रसंग संपताच पुढे भजनातून ताल बदलून वेगळ्या उंचीवर नेतो. असे असंख्य बारकावे तुमच्या नकळत (sub-consciencely) दिग्दर्शक अधोरेखित करत राहतो.
अभिजीतचं सगळ्यांत महत्वाचं यश प्रत्येक प्रसंगांच्या बांधणीत आहे. छोटे छोटे प्रसंग. प्रत्येक प्रसंगाला सुरुवात, मध्य आणि शेवट. तरी ते तुकड्या तुकड्याने आल्यासारखे वाटत नाहीत. ते एकसंध वाटून, अपेक्षित परिणाम साधतात.
आता, प्रयोगाचं सगळ्यात मोठं सरप्राइज एलिमेंट. तेंडुलकरांच्या नाटकातली हिंसा ही जशी अभ्यासली गेली, तसंच त्यांच्या नाटकातल्या ठळक आणि सक्षम स्त्री व्यक्तिरेखाही अभ्यासल्या गेल्या. अगदी ‘माणूस नावाचं बेट’ ‘बेबी’ ते ‘शांतता कोर्ट चालू आहे’ आणि ‘कमला’.
या नाटकाचं नाव ‘सखाराम बाईंडर’ असूनही यातल्या दोन स्त्री व्यक्तिरेखा खूपच जोरदारपणे उभ्या राहिल्या आहेत. त्या कशा आणि का? यावर एक प्रबंध होऊ शकतो. तो कोणीतरी लिहिलाही असेल. पण ह्या प्रयोगाबद्दलच बोलायचं झालं तर त्या व्यक्तिरेखा सादर करणाऱ्या नेहा जोशी आणि अनुष्का विश्वास यांच्याविषयी इतकंच बोलेन की, ‘तंतोतंत तेंडुलकरांची लक्ष्मी आणि साक्षात तेंडुलकरांची चंपा’.
नेहा जोशी ही अभिनेत्री तुम्हाला अनेकदा चकित करून सोडते. ‘वाडा चिरेबंदी’मधली तिची भूमिका आजही कोणी विसरू शकलं नसेल. मला आश्चर्य ह्याच गोष्टीचं वाटतं की, तरीही आज तिचं नाव उत्कृष्ट अभिनेत्रीच्या यादीत का घेतलं जात नाही. लक्ष्मीचं ब्राह्मणी नम्र (submissive) देखणं रूप आणि धाडसी, पाताळयंत्री मन नेहाने मोठ्या खुबीने पेश केलं आहे. चंपा झालेली अनुष्का विश्वास ही आधी मंगेश सातपुतेनी दिग्दर्शित केलेल्या ‘मॅड सखाराम’ या नाटकात चंपाच्याच भूमिकेत दिसली होती. त्यामुळे ती सर्प्राइज नाही वाटली. पण दीर्घांकामध्ये एखादी भूमिका करणं आणि तीच भूमिका पूर्ण लांबीच्या नाटकात करणं ह्यात खूप फरक असतो. अनेकदा स्किटमधले कलाकार पूर्ण लांबीच्या सादरीकरणात कमी पडताना आपण पाहिलेले आहेत. अनुष्का मात्र चंपा पूर्ण ताकदीनिशी पेश करते. देह हा नटाचा ऐवज (asset) असतो. त्या ऐवजाचं नेमकं भान अनुष्काला आहे, हे तिच्या मोकळ्या अभिनयातून ती दाखवते. अभिजीतच्या दिग्दर्शनाची किमया अशी की, लक्ष्मी आणि चंपा दुसऱ्या अंकात सखाराम या पात्राला पुरतं निष्प्रभ करून टाकतात आणि नाटकाला अपेक्षित तो परिणाम साधला जातो. विशेष म्हणजे प्रयोग संपल्यावर कर्टन कॉल न घेतल्याबद्दल अभिजीतला धन्यवाद. त्यामुळे प्रयोगाचा प्रभाव प्रेक्षकांना स्वत:बरोबर नेता येतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
नाही म्हणायला या प्रयोगात एक कमतरता जाणवते. सेक्स तीन प्रकारे होत असतो. एक शृंगारिक, दुसरा बलात्कार, तिसरा आगतिक (vulnerable). सखाराममधला सेक्स आगतिक अपेक्षित आहे. पण या प्रयोगातला सेक्स आगतिक न वाटता बलात्कारी वाटतो. त्याला बऱ्याच प्रमाणात प्रेक्षकांनी दिलेला चुकीचा प्रतिसाद कारणीभूत असू शकतो. ‘परिंदा’ चित्रपटानंतर नाना पाटेकरांनी त्यांचे ‘पुरुष’ हे नाटक पुन्हा सुरू केलं होतं. पण त्या नाटकाला (‘परिंदा’च्या प्रेक्षकांकडून) मिळत असलेल्या चुकीच्या प्रतिसादामुळे त्यांना त्यांचे हाऊसफुल्ल प्रयोग थांबवावे लागले होते. इथेही दोष प्रयोगाचा नसून प्रेक्षकांचा आहे असं वाटत राहतं. पण पुन्हा त्याचा दोष नट आणि दिग्दर्शकाकडे जातो, कारण असं काही इथेही अपेक्षित होतं, तर ते कसं टाळता येईल, याची खबरदारी त्यांनी घ्यायला हवी होती.
तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो. खोलीत शिरलेल्या या हत्तीचं काय करायचं?
मराठी नाटकाचा मोठा प्रेक्षकवर्ग हा ढोंगी मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा आहे. वास्तवाकडे पाठ करून ‘लाफ्टर थेरपी’ घेऊन मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न करणारा आहे. खोलीत शिरलेल्या हत्तीच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करून जगण्याच्या मानसिकतेतला तो आहे. आज त्याची वाढ दुपट्टीने झाली आहे. तेंडुलकरांनी नेहमी त्यांनाच टार्गेट केलं आहे. म्हणून त्यांनीही तेंडुलकरांना नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पण तेंडुलकर शेवटपर्यंत सर्वांना पुरून उरले. आज पुन्हा पुन्हा होणारी त्यांची नाटकं हीच त्याची साक्ष आहे.
तुम्हाला जर तुमच्या खोलीत शिरलेल्या हत्तीची भीती वाटत नसेल, जर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल. अन्यथा हास्य मनोरंजनासाठी इतर अनेक नाटकं आहेतच.
.................................................................................................................................................................
लेखक महेंद्र तेरेदेसाई चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.
mahendrateredesai@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment