अजूनकाही
पारंपरिक संगीताचा वारसा घेऊन आपल्या मराठी रंगभूमीचा उगम झाला. संगीत मराठी नाटकांनी एक जमाना गाजवला. पुढे काळाच्या ओघात मराठी नाटकानं आपलं रूप बदललं आणि संगीत मागे सरकलं. वातावरणनिर्मिती आणि प्रसंगांची नाट्यात्मकता वाढवण्यासाठी पार्श्वसंगीतापुरतं संगीत मराठी रंगभूमीवर दिसू (खरं तर ऐकू येऊ) लागलं. मध्ये मध्ये ‘कट्यार काळजात घुसली’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘तीन पैशांचा तमाशा’, अगदी अलीकडच्या काळातलं ‘एका लग्नाची गोष्ट’सारखी संगीतमय नाटकं आली, लोकप्रियही झाली, पण ती अपवाद म्हणावी अशीच.
आज सोशल मिडिया आणि डिजिटल माध्यमांचा महापूर लोटला असताना प्रत्येक ‘स्टोरी’ आणि ‘स्टेट्स’ला गाणं जोडणं जणू बंधनकारक ठरत असताना, प्रयोगशील मराठी रंगभूमी गप्प कशी राहिल? ट्रेंडिंग गाण्यावर रील्स बनवायची चढाओढ आम जनतेपासून सेलिब्रेटिंपर्यंत सुरू असताना मराठी रंगभूमी थोडीच मागे राहील?
मराठी रंगभूमीच्या नित्यनवीन सर्जनशीलतेची खात्री पटवण्यासाठीच जणू लेखक विराजस कुलकर्णी, दिग्दर्शक सुरज पारसनीस-विराजस कुलकर्णी आणि नृत्य-दिग्दर्शिका फुलवा खामकर, यांनी एक नाचती गाती, हसत-खेळत जगायचं तत्त्वज्ञान सांगणारी, रंगीबेरंगी आणि उत्फुल्ल नाट्यकृती ‘एक तिची गोष्ट’ प्रेक्षकांना भेट दिली आहे.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
नाटक ही कला सामुदायिक सर्जनशीलतेचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे त्याच्या सादरीकरणाला खरं तर कसलंही बंधन नाही. नाटकाची भाषा अतिशय लवचीक असते आणि त्यामध्येच नाट्यकलेच्या प्रवाहीपणाचं रहस्य दडलेलं आहे. गडकरी-खाडीलकरांच्या नाटकाची भाषा वेगळी होती आणि तेंडुलकर- दळवी- मतकरी यांच्या नाटकांची भाषा वेगळी होती.
इथे भाषा म्हणजे केवळ शब्दसंपदा, वाक्यरचना, भाषाशैली नाही, तर नाटककाराची नाटक सांगण्याची भाषा. त्यामुळेच जेव्हा नाटककार विराजस कुलकर्णीला एक अशी लोभस कल्पना सुचते, जिची भाषाच नृत्य-संगीताची असते, तेव्हा जिला ही भाषा अवगत आहे अशी फुलवा खामकरसारखी कुशल नृत्यांगना त्या नाटकाची गरज ठरते.
दिग्दर्शक या नाटकाची ही दोन्ही वैशिष्ट्ये - त्यातील नृत्य-संगीत आणि आशय ओळखून त्यांना रंगावकाशात फुलवतो. सहभागी कलाकार उच्च दर्जाच्या ऊर्जेनं हा नाट्याविष्कार सादर करतात. प्रकाशयोजनेतील कल्पकता प्रयोगाचा परिणाम आणखी उठावदार करते. संगीत, गाणी आणि नृत्यरचना हे या नाटकातले कलाकारच आहेत, पण आपल्या भूमिकेची सीमारेषा न ओलांडता ते लेखकाचा आशय अधिक टोकदारपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. असा सगळा माहौल जमून आल्यावर मग ‘एक तिची गोष्ट’ आपोआप अवघ्या प्रेक्षकांची होऊन जाते.
घर- संसार- नोकरी- करिअर या चक्रात गरगरा फिरणाऱ्या अनयाची ही गोष्ट. खरं तर ही आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या (किंवा दिसून न दिसणाऱ्या!) अनेक जणींची गोष्ट आहे. करिअरचं ओझं वाहताना स्वत:चीच ओळख विसरलेली, रोजच्या ताण-तणावांनी त्रस्त झालेली आणि नात्यांपासून ते कामापर्यंतच्या दबावाने गुदमरलेली अनया सहज बागेत येऊन बसते आणि तिची गाठ एका हसऱ्या-नाचऱ्या मुलीशी पडते.
जरा अवखळ, जरा अल्लड, पण धीट, बिनधास्त, मनात येईल ते करणारी ती मुलगी अनयाच्या मरगळलेल्या, कोमेजलेल्या मनावर जणू ताजेपणाचं गुलाबपाणी शिंपडते. अनोळखी असूनही ओळखीच्या वाटणाऱ्या, परकी असूनही आपलेपणा दाखवणाऱ्या त्या मुलीला अनया चक्क स्वतः च्या घरी घेऊन येते. आणि मग.... मग पुढे घडते ‘एक तिची गोष्ट’.
करिअर आणि घर या दोन टोकांवर एकाच वेळी चालण्याची कसरत आजच्या महिला करताना दिसतात. मुळात पुरुषप्रधान संस्कृतीने महिलांना सोयीस्करपणे कधी ‘देवी’ म्हणून, तर कधी ‘अबला’ म्हणून एका चौकटीत अडकवलं. त्यामुळे महिलांना स्वत:चं व्यक्तिमत्त्व स्वत:च्या आवडीनुसार-विचारांनुसार विकसित करायला वावच मिळत नाही. कधी मुलगी म्हणून, कधी बायको म्हणून, कधी आई म्हणून जगताना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगायला अवकाशच मिळत नाही. मग कुटुंब आणि करिअर अशा कात्रीत सापडलेल्या त्या महिलेचा दोन्हींमधला रस संपून जातो. जे करतोय त्यात आनंद नाही आणि ज्यात आनंद आहे ते करता येत नाही, अशा कोंडीत अडकलेल्या आजच्या स्त्रीची गोष्ट लेखक विराजस कुलकर्णी यांनी सांगितली आहे.
ही गोष्ट रंगमंचावर सादर करताना तिला नृत्यनाट्याचा आकार दिला आहे. सुरज पारसनीस आणि विराजस कुलकर्णी या दोघांनी मिळून या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. अनयाची गोष्ट प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या दिग्दर्शक द्वयीने ज्याप्रमाणे रंगमंचीय युक्त्या, साधने वापरली आहेत, त्याचप्रमाणे ‘नृत्य आणि संगीताचं’ जास्तीचं, अधिक आकर्षक परिमाणही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एक म्हटलं तर नेहमीचीच गोष्ट अधिक आकर्षकपणे, अधिक रंगतदारपणे पाहायला मिळते.
नाटकातील सूत्रधाराचं काम बजावणारा फुगेवाला असो किंवा लोकलमधील गर्दी, ऑफिसमधील यंत्रवत काम करणारे लोक असोत किंवा बागेतली आम जनता, या सगळ्यांच्या कोलाजमधून आणि सुनियंत्रित गोंधळामधून दिग्दर्शकांनी आपल्या गोष्टीचा आशय अधोरेखित करण्याची एकही जागा सोडलेली नाही.
नाच आणि गाण्यांमधून उलगडणाऱ्या या गोष्टीला सुप्रसिद्ध, गुणवंत नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांचं फक्त नृत्य दिग्दर्शनच लाभलेलं नाही, तर त्या नाटकातली ‘अनया’ची प्रमुख भूमिकाही साकरतात. नृत्य सादरीकरण, कोरिओग्राफी यातील फुलवा खामकर यांचे कौशल्य या नाटकाला एक खास परिमाण देतं. समूहाचा वापर करून नाटकातील गाणी आणि नृत्ये त्यांनी अतिशय उठावदार केली आहेत.
याच समूहाकडून नाचता नाचता होणारा नेपथ्य-बदल नाटकाची गती कायम ठेवायला मदत करणारा आणि बदलेल्या स्थळाची ओळख पटवणारा आहे. सुरुवातीचे अनयाचे धावपळीचे-गडबडीचे रुटीन अधोरेखित करणारा नृत्याविष्कार असो किंवा हरवलेल्या छोट्या अनयाला शोधताना ‘रॅप’मधून सादर होणारा कथाभाग असो, प्रसंगांची नाट्यमयता, रंजकता वाढवण्यासाठी फुलवा खामकर आणि त्यांचा चमू जराही कमी पडत नाही.
नृत्याविष्काराबरोबरच अभिनयाची बाजू ही त्यांनी चोख सांभाळली आहे. सुरुवातीची घर आणि नोकरीच्या चक्रात पिचलेली, त्रासलेली, गांजलेली अनया, नंतर छोट्या अनयाबरोबरच्या संभाषणातून मोठ्या अनयाला जाणवलेलं जीवनाचं सूत्र, स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा ‘नवा नजरीया’, हे सगळं परिवर्तन त्यांनी अतिशय सहजपणे दाखवलं आहे.
त्यांना छोट्या अनयाच्या भूमिकेत ‘आस्मा खामकर’ यांनी तितकीच गोड साथ दिली आहे. छोटी अनया मोठ्या अनयासारखी दिसणं ही भूमिकेची गरज आस्माच्या निवडीने आपोआपच पूर्ण झाली आहे. छोट्या अनयाचा अल्लड, खट्याळ, चुलबुला स्वभाव, तिचं निरागसपणे (?) मोठ्या अनयाच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवणं, तिचं उत्स्फूर्त वागणं हे सगळं आस्माने अतिशय डौलदारपणे दाखवलं आहे. सफाईदार नृत्य सादरीकरणामुळे (आईची लेक शोभतेय!) तिची व्यक्तिरेखा अधिक ठळक होऊन लेखकाचा आशय नेमकेपणाने पोहोचायला त्याची मदत होते.
फुगेवाला हा म्हटलं तर या नाटकाचा सूत्रधार आहे. कधी प्रेक्षकांशी संवाद साधत, कधी पार्श्वभूमीवर निवेदन करून, तर कधी थेट नाटकाच्या कथानकात घुसून ते पुढे नेण्याचं काम करणारा फुगेवाला ओंकार गोखले यांनी झकास उभा केलाय. लेखकाच्या संवादांमधील ‘पंच’ आपल्या उच्चार आणि अभिनिवेशातून ते अचूक व्यक्त करतात. हा फुगेवाला त्याच्या सुरुवातीच्या निवेदनात फक्त नाटकाचं आशय सूत्रच सांगत नाही, तर जणू आनंदाने जगण्याचा मंत्रच प्रेक्षकांना देतो. हा मंत्र म्हणजे- ‘आपल्या एका खिशात जसा मोबाइल सांभाळता, तसं दुसऱ्या खिशात स्वतःमधलं लहान मूल जपा’.
या सगळ्या नाटकाला भरीवपणा लाभला आहे तो बारा-तेरा जणांच्या समूहामुळे. त्यांचं नृत्य जरी ‘बॅकग्राउंड’ला सुरू असलं, तरी नाटकाचा आशय ‘फोरग्राउंड’ला आणण्यात या सगळ्या सहनर्तकांचा फार मोठा वाटा आहे. कुठेही न गडबडता, जराही न चुकता प्रॉपर्टीची देवाणघेवाण करण्यापासून ते विविध आकृतीबंध लयबद्धपणे साकार करण्याचं काम ही मंडळी अतिशय उत्तम पद्धतीनं करतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या नृत्यनाट्याची कथानकाला पुढे नेणारी आणि सादरीकरणाची रंगत वाढवणारी गाणी वैभव हिवसे यांची आहेत. वेगवेगळ्या प्रकारची ही गाणी आपल्याला ठेका धरायला लावतात. त्याचं श्रेय अर्थातच संगीतकार निषाद गोलांबरे यांचं. वैशाली सामंत, हृषिकेश रानडे, आर्या आंबेकर या नामवंतांनी गायलेली ही गाणी समाजमाध्यमांवर आली, तर नव्या पिढीला त्यांचं संगीत मायबोलीत गुणगुणायला निमित्त मिळेल.
देविका काळे यांची वेशभूषा व्यक्तिरेखांना आणि प्रसंगांना साजेशी. संगीताप्रमाणेच प्रकाशयोजनाहीदेखील या नाटकाच्या गुणवैशिष्ट्यांपैकी एक आहे. प्रसंगांचा मूड, नृत्यांची रंगत आणि लेखक-दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेला माहौल तयार करण्याचं काम संकेत पारखे यांची प्रकाशयोजना अचूकपणे करते. विक्रांत पवार यांचं पार्श्वसंगीत बारीकबारीक जागा भरून नाटकाच्या परिणामकारतेत भरच घालतं.
या नृत्यनाट्याचं नेपथ्य कथानकाच्या गरजेमुळे ‘नाचतं-फिरतं’ असणं आवश्यक होतं. ही गरज अंकुर असेरकर यांच्या कल्पक आणि मोबाइल नेपथ्यामुळे पूर्ण होते. या नेपथ्याची पण एक भूमिका नाटकात आहे, असं म्हणता येईल. थिएट्रोन एन्टरटेन्मेंट, पी.एस.डी.जी. स्टुडिओ आणि मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स यांनी केलेली ही नाचती-गातीनिर्मिती मराठी नाटकांच्या दालनात एक समृद्ध भर घालणारी आहे. तेव्हा तुम्हाला आजच्या काळातलं, आजच्या जगण्याविषयीचं, आजच्या पद्धतीनं मनोरंजन करणारं आणि ‘लाइफ इज ब्युटिफुल’ हा मंत्र देणारं नाटक बघायचं असेल, तर ‘एक तिची गोष्ट’ अवश्य बघाच.
.................................................................................................................................................................
लेखक मकरंद जोशी पर्यावरण-अभ्यासक, मुक्त पत्रकार आणि प्रवास-सल्लागार आहेत.
makaranadvj@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment