अजूनकाही
साधारण १९८० ते २०१५ या काळात देशात (किंवा काही वेळा परदेशातही) असलो, तरी ‘बसोली’च्या वार्षिक शिबिरात आवर्जून एक दिवस तरी सहभागी होऊन किमान चार-सहा तास घालवणे मला मनापासून आवडत असे. खरं तर अजूनही आवडेल. मधली काही वर्षं पत्रकारितेच्या निमित्तानं मुंबई आणि तेव्हाच्या औरंगाबाद (आताच्या छत्रपती संभाजीनगरला) होतो, तेव्हाही एकदा खामगाव आणि नंतर नागपूरला झालेल्या शिबिरात हजेरी लावली होतीच. एकूण काय तर ‘बसोली’चे वार्षिक शिबीर ही माझ्यासाठी एक वार्षिक सवय झालेली होती.
‘बसोली’ची या वर्षीच्या शिबिराची सृजनशीलतेची संकल्पना ‘from me to we’ ही आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘बसोली’चं हे पन्नासावं वर्षं. या सुवर्णमहोत्सवी वर्षांची सुरुवात गेल्या वर्षी झाली, तेव्हा नागपूरच्या लक्ष्मीनगरच्या आठ रस्ता चौकातील सायंटिफिक सभागृहात ‘बसोली’ला साजेशा झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. ‘बसोलीयन्स’च्या त्या मांदियाळीत सहभागी होताना झालेला आनंद अवर्णनीय होता, कारण ते इवलंसं रोप आता वृक्ष झालंय. आठवणींचे अनेक पक्षी जागे झाले, अनेक वर्षांपासून न भेटलेले दोस्तयार त्या दिवशी नीळाईच्या छायेत भेटले.
‘बसोली’शी माझं नातं काय, या प्रश्नाचं उत्तर ‘खूप काही’आणि तरी ‘काहीच नाही’ असं दोन्ही बाजूंनी देता येईल. रूढार्थानं मी काही बसोलीचा कलावंत नाही; तिथं राबणारा कार्यकर्ताही नाही आणि आयोजकांपैकी एक किंवा मार्गदर्शक वगैरे तर मुळीच नाही, तरीही माझं एक घनिष्ठ नातं बसोलीशी आहे. पहिली विलोभनीय गुंतागुंत चंद्रकांत आहे. आमच्यातलं नातं दोस्तीचं आहे. दोस्तीच्या वृत्ती आणि धर्माला जागून आम्ही परस्परांना कधीही सरळ आणि आदरारार्थी संबोधत नाही. त्याच दोस्तीला जागून चंदूतल्या गुण आणि अवगुणांविषयीही मी यापूर्वी लिहिलेलं आहे. आमची ही दोस्ती आता चाळीशीत आलेली आहे. म्हणजे भावनांच्या बहराचा काळ उलटून बऱ्यापैकी पक्व झालेली आहे.
आमच्यातल्या मैत्रीच्या आणि बसोलीच्या पुलाखालून या काळात बरंच पाणी वाहून गेलंय, तरी आमच्यातला अवखळ तिरकसपणा कायम आहे! चंद्रकांत चन्ने म्हणजे ‘बसोली’ असं घट्ट समीकरण आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं, तर ‘बसोली’ मार्गे चंद्रकांत चन्ने म्हणजे मी असा त्याचा एक अर्थ आहे.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पुनरुक्ती होणार असली, तरी अगदी काटेकोरपणे सांगायचं, तर २८ जानेवारी १९८४ ला दुपारी साडेचार वाजता पंचशील चौकातल्या नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात, नागपूर-विदर्भात रंगभान निर्माण करणार्या आणि चित्र जागृतीला चेतना देणार्या चंद्रकांत चन्नेंची ओळख झाली. प्रकाश देशपांडेनी ती करून दिली. दहा-पंधरा मिनिटातच आम्ही ‘अरे-तुरे...’वर आलो. तिघांनीही समोरच्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन सिगारेटी फुंकत, दोन कॉफी तिघांत शेअर केली आणि एका दीर्घकाळ चालत राहणार्या दोस्तीचा उगम झाला. तेव्हापासून आजपर्यंत तो नाद अव्याहत खळाळतो आहे.
आमच्यातल्या मैत्रीच्या आणि बसोलीच्या पुलाखालून या काळात बरंच पाणी वाहून गेलंय. अतिशय नियमित गाठीभेटी नाहीत, रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसल्याचे प्रसंगही खूप अपवादाने आलेले, एकमेकाला भेटवस्तू देणंघेणं नाही, परस्परांत कुठलाही व्यवहार नाही, एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यात आजवर दोघांपैकी कुणीही, कधीही, कुठेही, केव्हाही डोकावूनही पाहिलेलं नाही, तरीही हा नाद आहे- निर्व्याज्य मैत्रीचा.
दुसरं म्हणजे, ‘बसोली’च्या अनेक शिबीर/कार्यक्रमात माझा सहभाग प्रमुख पाहुणा, नियोजित न आल्यानं ऐनवेळचा पाहुणा, वक्ता ते सतरंजी उचलणारा कार्यकर्ता थोडक्यात चंद्रकांतचा ‘हरकाम्या’ असा आहे. ‘बसोली’च्या सत्कारास पात्र ठरणारा आणि ‘बसोली’चे सत्कारार्थी ठरवणारा अशा दोन्ही भूमिकांत अनेकदा वावरलो आहे. ‘बसोली’च्या निवासी शिबिराची ‘रसद’ जमा करताना उन्हातान्हात चंद्रकांत चन्नेसोबत एक सहकारी म्हणून अनेकदा वणवण फिरलो आहे. तेव्हा चंदू नावाच्या दोस्ताची या चळवळीविषयी असणारी अव्यभिचारी तळमळ मनावर कायमची बिंबलेली आहे.
याशिवाय एक पत्रकार म्हणून अनेक वर्षं ‘बसोली’च्या कार्यक्रमाचं वृत्तसंकलन करणं, ‘बसोली’च्या उपक्रमावर लेख लिहिणं, कार्यक्रम किंवा शिबिराचे पाहुणे इकडून तिकडे पोहोचवणं आणि हे किंवा यापैकी एकही काम असेल/नसेल तरी एक श्रोता म्हणून तरी आनंदानं सहभागी होणं, अशा विविध भूमिकात वावरलो आहे. म्हणजे, कोणतंही नाव नसलेलं तरी घट्ट असलेलं एक नातं ‘बसोली’ आणि माझ्यात या काळात निर्माण झालेलं आहे.
‘बसोली’ म्हणजे चंदू असं समीकरण मांडायचं कारण ‘बसोली’ हा चंद्रकांतचा श्वास आहे. चंदूची माणसं जोडण्याची कला विलक्षण तर्हेवाईक आहे. म्हणजे कसं तर, चंदूची मैत्री आधी एखाद्या घरातल्या मुलाशी होते, मग मुलाच्या आईवडिलांशी होते, मग त्या मुलाच्या आजी-आजोबांशी होते आणि चंदू एकेकाशी मग जोडत जातो. आजूबाजूला दीडशे-दोनशे मुलं वावरत, खेळत असली, खेळता खेळता भरपूर गोंगाट करत असली, तरीही त्याचा चंदूला काहीही त्रास होत नाही. उलट ही मुले हा गोंगाट आपल्यासाठीच करताहेत आणि तोच आपला प्राणवायू आहे, असा चंदूचा भाव असतो.
या गोंगाटात चंदू जितका रमतो, तितका मोठ्या माणसात प्रत्येक वेळी रमतोच असं नव्हे. मुलांचा गोंगाट जर सलग दोन-चार दिवस ऐकू आला नाही, तर चंदूला डिप्रेशन आल्याशिवाय राहणार नाही, असं आम्ही जे म्हणतो ते काही उगाच नाही!
सहज बोलत चित्रकार चंदू ‘बसोली’चे बालकलावंत साथीला घेऊन अनेक वेगळे, विस्मयचकित करणारे उपक्रम राबवतो. नागपूर जवळचं मोवाड हे गाव अतिअति वृष्टी आणि पुरामुळे मोडून पडलं. तेव्हा मदतीचा ओघ सुरू झाला. ‘लोकसत्ता’त या संदर्भातली एक आठवण खासच आहे. ती बातमी वाचून मदतीचा हात चंदूने समोर केला, तो ‘बसोली’च्या माध्यमातून. ‘बसोली’चे बालकलावंत भर पावसात ८-१० ट्रक्समध्ये मराठी कवींच्या कवितांवर आधारत चित्र काढत नागपुरात फिरली. त्यातून जो निधी जमा झाला, तो मोवाडच्या पुनर्निर्माणासाठी ‘लोकसत्ता’च्या फंडात जमा करण्यात आला.
नागपूरच्या पत्रकार सहनिवासचं बांधकाम नुकतंच सुरू झालं होतं. त्या साईटवर एक दिवस संध्याकाळी चंदू, प्रकाश (देशपांडे) आणि मी गप्पा मारत बसलो होतो. समोर लांsssबलचक पसरलेली आणि शुष्क भासणारी कंपाऊंड वॉल चंदूला अस्वस्थ करत होती. ‘आपण या भिंतीवर म्युरल करूयात’, अशी कल्पना चंदूनं मांडली. प्रकाश पत्रकार गृहनिर्माण संस्थेचा सचिवही होता, त्यामुळे प्रकल्प मार्गी लागला. संस्थेच्या कार्यालयासमोर ‘बसोली’च्या बाल कलावंतांनी १२० फूट लांब आणि १० फुट उंचीचं म्युरल शंभर दिवस काम करून साकारलं. या काळात आम्हा सर्वांचा मुक्काम याच साईटवर असायचा. लोक तेव्हा म्हणाले, ‘हे आशियातील सर्वांत मोठं म्युरल आहे’, पण काम संपल्यावर चंदूला त्यात काही रस उरलेला नव्हता. काम संपलं आणि निर्लेप मनानं तो आणि ‘बसोली’चे कलावंत बाजूला झाले.
सगळ्या मुलांना असते तशी रंगांची ओढ लहानपणी मलाही होती. कळत्या वयात मुलं कविता आणि चित्रांच्या प्रेमात पडतात तसा मीही पडलो. रेखाचित्रं हा माझा प्रांत होता आणि त्यात बऱ्यापैकी गती होती. चित्रकलेचा विद्यार्थी नसलो, तरी चित्रकला महाविद्यालयातील मित्रांसोबत भटकत रेघा ओढत राहण्याचा नाद लागलेला होता. त्यासाठी अनेक रात्री बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर चहाचे कप फस्त करत कशा जागवल्या, हे आजही लख्खपणे आठवतं. पुढे पत्रकारितेत आलो आणि विशेषत: बातमीदारीच्या धबडग्यात गुरफटून गेल्यावर रंगाच्या बाटल्या, ब्रश केव्हा अडगळीत गेलं हे कळलंच नाही.
मात्र असं असलं तरी, रविवार पुरवणी करताना सहकारी जागा भरण्याच्या समस्येत सापडला किंवा ऐनवेळी आर्टिस्टने दांडी मारली तर एखाद-दुसरं रेखाटन काढून सहकाऱ्याची अडचण भागवायला हिरिरीनं पुढे सरसावणं माझा आवडता उद्योग असे. अनेकदा तर रिपोर्टिंग करताना भाषण किंवा कार्यक्रम अपेक्षेबाहेर कंटाळवाणा झाला, तरी जागा न सोडता कार्यक्रमाची टिपणं घेण्यासाठी असलेल्या स्पायरल बाईंडिंगच्या नोंदवहीत रेखाटणं करत त्या कंटाळवाणेपणावर मात करण्याच्या कलेत मी अवगत झालेलो होतो.
२००३मध्ये‘लोकसत्ता’चा निवासी संपादक झाल्यावर एकदा या नोंदवह्या निकालात काढण्याआधी चाळल्या तेव्हा लक्षात आलं की, आपल्या नोंदवहीत टिपणं कमी आणि रेघोट्याच जास्त आहेत. पत्रकारांच्या वाट्याला कंटाळवाणे कार्यक्रम जास्तच आलेले असतात, याची साक्षच जणू ती रेखाचित्रं देत होती! हे सांगायचं कारण माझ्यातला बालपणीचा पुढे हरवलेला चित्रकार मला ‘बसोली’त कायमच दिसत असतो.
माझ्या पिढीनं १९८०च्या दशकाच्या अगदी सुरुवातीला म्हणजे ८०-८१ साली माझ्या पिढीनं पत्रकारितेला सुरुवात केली. तेव्हा पत्रकारितेला फारसं काही सांस्कृतिक भान नव्हतं. सांस्कृतिक कार्यक्रमाचे वृत्तसंकलन म्हणजे फार फार तर पुस्तक प्रकाशनाच्या बातम्या आणि धनवटे नाट्यमंदिरात (त्या जागेवर विदर्भ साहित्य संघाची नवी अर्धवट वास्तू आता उभी आहे) सादर होणाऱ्या राज्य नाट्यस्पर्धेत सादर होणाऱ्या प्रयोगांचं परीक्षण; असा समज दृढ आणि सार्वत्रिक होता. सांस्कृतिकता म्हणजे यापेक्षा इतर काही कला असतात आणि त्या कशासोबत खायच्या असतात, याबद्दल पत्रकार जमात फारशी काही जागरूक नव्हती.
शिवाय माध्यमं म्हणजे केवळ आकाशवाणी व मुद्रित माध्यमं, म्हणजे वृत्तपत्रे होती. त्यात बातम्या, राजकीय लेख , पुस्तक समीक्षण , कथा-कविता यांना अग्रहक्काचं तसंच प्रभावशाली स्थान होते. त्यात मुद्रित माध्यम रंगीत नव्हते, त्यामुळे रंगभान असणं मुळीच गरजेचं नव्हतं. विजय फणशीकर, वामन तेलंग असा एखाद-दुसरा पत्रकार वगळता कला वृत्तसंकलन हे स्पेशलायझेशन आहे, हे माहिती नव्हतं. अन्य कला हे कलाविषयक नियतकालिकांचे आणि त्यांच्या मर्यादित वाचकांपुरते हे उपक्रम आहेत, समज तेव्हा होता.
त्यात महत्त्वाचं म्हणजे, ही काही केवळ मुद्रित माध्यमांचीच धारणा नव्हती, तर बहुसंख्य समाजालाही तसंच वाटायचं. अशा प्रतिकूल वातावरणात चंद्रकांत चन्ने नावाचा कोणी तरी शिक्षक नागपूर-विदर्भाच्या बालकांत असलेले रंगभान शोधण्याचा प्रयत्न करतो आहे, हा बहुतेकांसाठी वेडेपणाच होता! त्या काळात श्रीकांत दाभाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी (आता त्यांची नावं आठवत नाहीत, सॉरी) भरवलेली छायाचित्र प्रदर्शनं किंवा प्रकाश बिसने याची छायाचित्रं किंवा बसोलीच्या उपक्रमांचं वृत्तसंकलन करणं हा, आमच्या मुख्य वार्ताहराच्या दृष्टीकोनातून वेळ आणि जागा अडवण्याचा 'आदर्श उद्योग' होता.
नामवंत छायाचित्रकार प्रकाश बिसने याचं एक स्त्री एका कडेवर हाताच्या टेकूवर मान कलती पेलत कलंडून निवांत पहुडलेली आहे हे कृष्णधवल छायाचित्र आम्ही (म्हणजे मी आणि रविवार पुरवणीची सहकारी, माझी तत्कालिन भावी पत्नी मंगला विंचुर्णे ) ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या रविवार पुरवणीच्या मास्टहेडवर घेतलं, तेव्हा आमच्या वरिष्ठांना बसलेला शॉक आणि त्यानंतर न्यूजरूममध्ये आम्हा दोघांच्या विरोधात उसळलेली ‘दंगल’ अजूनही आठवते. वरिष्ठांनी त्या वेळी दिलेला मेमो आठवला की, हसू येते. पत्रकार आणि समाज अशा दोन्ही पातळ्यावर कलाविषयक भान असे टोकाचे विपरीत असल्याच्या पार्श्वभूमीवर कलाविषयक जाणीव आणि रंगभान ओंजळीत घेऊन चंद्रकांत चन्ने नावाचा एक ‘वेडा’ कलावंत दौडत निघालेला होता.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
चंद्रकांत चन्ने हा चित्रकार आहे, त्याने चित्रकलेचे रीतसर-शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे, रवींद्रनाथ टागोरांच्या कर्मभूमीत; शांतिनिकेतनमध्ये जाऊन तो त्याच्यातल्या सर्जनशीलतेचा झेंडा रोवून आला आहे, वगैरे वगैरे काहीही तोपर्यंत नागपूरकरांना माहिती नव्हतं. उन्हाळ्याच्या सुटीत लहान मुलांना जमवून रंग, मातीशी हवं तसं खेळू देणारा ‘चित्रकलेचा एक शिक्षक’ असंच ‘अदखल’पात्र काहीसं चंदकांतबद्दल पत्रकारांसकट बहुतेकांना वाटायचं. मुलं रंगून जातात त्या ‘बसोली’ नावाच्या खेळात, म्हणून अनेक पालक मुलांना पाठवून द्यायचे; अशीच तेव्हाची सर्वसाधारण मानसिकता होती. मी मात्र त्याच्या ‘बसोली’ नावाच्या रंगवेडात नकळत सहभागी झालो, ते माझ्यात असलेल्या चित्रकलेच्या ओढीनं. त्यात नंतर प्रकाश देशपांडे, विजय फणशीकर, सिद्धार्थ सोनटक्के असे आणखी काही जण ओढले गेले आणि आता पाहता पाहता ‘बसोली’ नावाचं रंगभान केवळ नागपूरच नाही, तर संपूर्ण विदर्भात पसरलं आहे.
‘बसोलीयन्स’नी मिळवलेली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची हजारो पारितोषिके, रंगाच्या माध्यमातून राबवलेले विविध उपक्रम यातून बसोलीची मुलं, हा एक नंतरच्या काळात नागपूर शहरात कौतुकाचा विषय ठरला, हे तर महत्वाचे आहेच, पण त्याहीपेक्षा मोलाचं आहे ते, हे कौतुक पुढे कलेच्या क्षेत्रात नागपूरची ओळख ठरलं. मीडिया आणि समाजातही रंगभान, रंगजाणीव आणि रंगजागृती निर्माण करणारी अव्याहत पन्नास वर्षं सुरू असलेली बालकलावंतांची अशी चळवळ देशात आणखी कुठे एवढ्या मोठ्या प्रतिसादात सुरू असल्याचं माझ्या तरी वाचनात आणि पाहण्यात नाही.
‘ज्ञानेश्वरी’तील दोन ओळींचा आधार घेत सांगायचं तर- चांगली वाटते, आपल्या मनात मावत नाही आणि ती मग ती इतर अनेकांना सांगावीशी वाटते’, अशी चळवळ म्हणून स्थान मिळवण्याचा लौकिक ‘बसोली’ने मिळवला.
धर्म-जात-उपजात-पोटजात-पंथ असा कोणताही भेद करता, न बाळगता बसोली आज नागपूर-विदर्भाच्या हज्जारो घरातल्या बैठकीच्या खोलीत मोठ्या डौलदारपणे विराजमान झालेली आहे. असं ऐटीत विराजमान होतानाच या हज्जारो घरात आणि लाख्खो मनात या चळवळीनं रंगजागृती निर्माण केली आहे, समाजात रंगभान पसरवलं आहे. बसोलीचे हे रंगभान यापुढेही असंच उधळत आणि उजळतही राहो…
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment