‘जय भीम’ हा ‘समांतर सिनेमा’ प्रवाहाला मजबूत करणारा आणि ‘समांतर सिनेमा’ चळवळीतला ‘माईलस्टोन सिनेमा’ म्हणून ओळखला जाईल…
कला-संस्कृती - चलत्-चित्र
चंद्रकांत कांबळे
  • ‘ब्लॅक सिनेमा’चं एक प्रातिनिधिक चित्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ‘जय भीम’ या सिनेमाचं एक पोस्टर
  • Tue , 30 November 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र हॉलिवुड Bollywood ब्लॅक सिनेमा Black Cinema डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar बॉलिवुड Bollywood जय भीम Jai Bhim टी. जे. ज्ञानवेल T. J. Gnanavel सूर्याSuriya प्रकाश राज Prakash Raj

हॉलिवुडमध्ये जेव्हा आफ्रिकन-अमेरिकन निग्रोंचं अचूक प्रतिनिधित्व होत नव्हतं, तेव्हा आफ्रिकन-अमेरिकन कलावंतांनी वेगळा मार्ग निवडला, आणि ‘समांतर सिनेमा-संस्कृती’ची सुरुवात झाली. बाहेर फेकल्या गेलेल्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात सामील होणं तितकं सहज शक्य नसतं. हॉलिवुडमध्ये वंचितांचं चित्रण पूर्वग्रहदूषित आणि संकुचित पद्धतीनं केलं जात होतं. निग्रो पुरुष म्हणजे कोणाचा तरी गुलाम, चाकर, नोकर, रखवालदार, माळी, ड्रायव्हर, सफाई कामगार आदी आणि निग्रो स्त्री म्हणजे घरकाम, साफसफाई, शेतीची कामं, सामाजिक गुलाम, लैंगिक शोषणाची बळी, सतत राबणारी अबला स्त्री, असा समज होता.

चित्रपटावर समाजाचा प्रभाव असतो आणि समाजाचाही चित्रपटावर प्रभाव असतो. त्यामुळे आपल्याला तत्कालीन समाजव्यवस्थेचा हॉलिवुडवर झालेला परिणाम म्हणून वरील वास्तवाकडे पाहता येईल. मात्र महत्त्वाची गोष्ट ही की, समाज परिवर्तनशील असल्यानं तो बदलत जातो, मात्र वर्चस्ववादी सत्तारूढ वर्ग आपल्या मक्तेदारीला धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत असतो. आणि ही काळजी म्हणजे एका विशिष्ट वर्गाला, जातीला, लिंगाला एका निश्चित दृष्टीकोनातून मांडण्याचा हेतू अबाधित ठेवून आपलं वर्चस्व टिकवून ठेवणं. त्यासाठी मुख्य प्रवाहातील शक्तिशाली वर्ग बदलांना नाकारतो. आणि म्हणून निग्रो स्त्री-पुरुष गोऱ्यांच्या चित्रपटाचा नायिका-नायक होऊ शकत नव्हते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

एका अर्थानं या मागास वर्गांच्या प्रश्नाकडे चित्रपटासारखं झगमगीत क्षेत्र वळत नाही. कोणी प्रयत्न केला तर त्याला या वर्गाच्या समस्यांचा अभ्यास करून स्वतःच्या काल्पनिक दृष्टीकोनातून त्यांना चित्रित करावं लागतं. म्हणजे स्वयं अनुभवाचा अभाव अशा कलाकृतीला गुणात्मकरित्या निकृष्ट ठरवतो. याचा अर्थ असा नाही की, निर्मात्यांना वा दिग्दर्शकांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव असला पाहिजे. मात्र ऐतिहासिकदृष्ट्या मागास समाजाचं जेव्हा तो प्रतिनिधित्व करतो, तेव्हा तो पूर्वग्रहदूषित असता कामा नये अथवा त्या समाजाचं थेट प्रतिनिधित्व करणारे लोक त्या निर्मितीत असले पाहिजेत. त्यामुळे तो चित्रपट बराचसा निकोप व पूर्वग्रहविरहित होण्यास मदत होते.

पण असं होत नसल्यामुळे आफ्रिकन-अमेरिकन कलावंतांना ‘समांतर सिनेमा-संस्कृती’ची गरज निर्माण झाली. त्यातून या लोकांची संस्कृती, पर्यावरण, सामाजिक जीवन सिनेमामध्ये यशस्वीरित्या येऊ लागलं. इतकंच नाही तर आज अनेक नीग्रो पुरुष कलावंत- उदा. मॉर्गन फ्रीमन, डेन्झेल वॉशिंग्टन, सॅम्युएल जॅक्सन, विल स्मिथ आदी - हॉलिवूड स्टार आहेत; तर वियोला डेव्हिस, हाल बेरी, अँगेला बसेट्ट, केरी वॉशिंग्टन आदी महिला कलावंत ‘लोकप्रिय अभिनेत्री’ आहेत. हे या ‘समांतर चित्रपट निर्मात्यां’चं श्रेय आहे.

‘समांतर सिनेमा’चं एकच ध्येय होतं- निग्रोंचे अचूक, प्रामाणिक आणि सकारात्मक प्रतिनिधित्व निर्माण करणं आणि आपली संस्कृती, जीवन, व्यथा, आपल्या चित्रपटातून लोकांपर्यंत पोचवणं.

२०१४ साली प्रदर्शित झालेला सिनेमा ‘12 इयर्स स्लेव’ हा सिनेमा सॉलोमन नॉर्थऊप यांच्या आत्मकथेवर आधारित असलेला पूर्ण ब्लॅक कलावंतांनी/निर्मात्यांनी बनवला होता. त्याने ‘द अकादमी अवॉर्ड फॉर बेस्ट  पिक्चर’चा ‘ऑस्कर अवॉर्ड’ मिळवला. या चित्रपटानं ऑस्करच्या ८६ वर्षांत चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान जिंकणारा कृष्णवर्णीय दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट म्हणून इतिहास रचला आहे. दुसरा एक महत्त्वपूर्ण सिनेमा म्हणजे ‘ब्लॅक पँथर’. २०१८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिट तर झालाच, त्याचबरोबर अनेक पुरस्कारांचा मानकरीही ठरला. सुपरमॅन अँड सुपर वूमन फक्त हँडसम/गोरीच असू शकते, हा भ्रम या सिनेमानं पूर्ण खोडून काढला. हॉलिवुडमध्ये आज ‘ब्लॅक सिनेमा’चं वेगळं महत्त्व निर्माण झालं आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

हॉलिवुडप्रमाणे भारतातही विशिष्ट जातीच्या लोकांचं कायम वर्चस्व बॉलिवुड सिनेमा आणि प्रादेशिक सिनेजगतावर राहिलं आहे. त्याची कारणंही काहीशी वर नमूद केल्यासारखीच आहेत. भारतीय सिनेमाच्या इतिहासामध्ये अगदी थोडे सिनेमे वंचित समूहावर आधारलेले आहेत. प्रामुख्याने ‘समांतर सिनेमा’च्या माध्यमातून असे सिनेमे आणि शाम बेनेगल, गोविंद निहलानी, गौतम घोष यांसारखे खूप कमी चित्रपटनिर्माते व दिग्दर्शक झाले. समांतर सिनेमाचा उद्देश मात्र ‘वंचितांचा सिनेमा’ निर्माण करणं असा नव्हता. तरी उच्चजातीय डाव्या सिनेमा निर्मात्यांनी बॉलिवुडला दिलेला तो एक पर्याय होता. ओघानंच त्या सिनेमानं स्त्री प्रश्न, सामाजिक अन्यायग्रहस्त लोकांचं जीवन पडद्यावर आपल्या, विशेषतः गांधीवादी-नेहरूवादी दृष्टीकोनातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

मागील एका दशकापासून मात्र भारतीय सिनेमा अधिकाधिक वास्तववादी बनत गेला आणि मुख्य प्रवाहातील सिनेमासहित प्रादेशिक सिनेमा वंचितांच्या प्रश्नाकडे सिनेमाचा विषय म्हणून पाहू लागला. मराठीमध्ये अनेक प्रयोग दुर्लक्षित विषयांना घेऊन झाले. नागराज मंजुळेसारखा दलित कलावंत मराठी सिनेजगतात आला. त्याचा पहिला लघुपट ‘पिस्तुल्या’ (२००९) अतिशय संवेदनशील विषयावर बेतलेला होता. भटक्या विमुक्त जातीजमाती यांचा जीवनसंघर्ष त्यात पहिल्यांदा आला आहे. या सिनेमानं राष्ट्रीय पारितोषिक मिळवलं. त्यानंतरचा ‘फॅन्ड्री’ (२०१३) हा नागराजची पूर्ण लांबीचा पहिला चित्रपट. त्यात त्यानं दलित जीवन विदारकपणे चितारलं आहे. या सिनेमानं मराठी सिनेमाला ‘परिवर्तनीय वळण’ दिलं. आणि ‘सैराट’नं तर मराठी सिनेमाची सगळी रेकार्डस मोडीत काढली. इतकंच नव्हे तर तो हिंदीसह अनेक भाषांत डब झाला. नागराजच्या ‘पावसाचा निबंध’ (२०२०) या लघुपटानंसुद्धा राष्ट्रीय पारितोषिक मिळवलं आहे.

थोडक्यात जेव्हा वंचित समूहाचा कलावंत स्वतःच्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो, तेव्हा ते अधिकृत, अचूक आणि सकारात्मकच करतो, हे सिद्ध होताना दिसतं. भाऊराव खराडे यांचा ‘ख्वाडा’ (२०१५) हा भटक्या जमातीच्या जीवनावर आधारित सिनेमासुद्धा वंचित कलाकारांकडूनच निर्माण व्हावा लागला. आणि विशेष म्हणजे या सगळ्या वंचितांच्या सिनेमात ‘ब्लॅक सिनेमा’सारखं वंचित कलाकारांनीच काम केलं आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

दक्षिण भारतीय सिनेजगत सुरुवातीपासूनच आपलं वेगळेपण जपत आलं आहे. तिथं कन्नड, तेलगू, तामिळ आणि मल्याळम या चार भाषांत सिनेमे निर्माण होतात. मुख्यतः तामिळ सिनेजगत आत्ता दलित-वंचितांचे प्रश्न मोठ्या ताकदीनं सिनेमाच्या माध्यमातून मांडत आहे. त्यालाही कारण आहे- ते म्हणजे दलित कलावंतांचं सिनेजगतातलं आगमन. पा. रंजितसारखा आंबेडकरवादी दिग्दर्शक आज मोठ्या ताकदीनं वंचितांचं प्रतिनिधित्व करतो आहे. तो ‘अब्राह्मणी सौंदर्यशास्त्रा’नुसार अतिशय प्रगल्भ ‘सिम्बोलिझम’चा वापर आंबेडकरवादी दृष्टीकोनातून दलितांचं चित्रण करत आहे. त्याचा ‘कबाली’ (२०१५) स्थलांतरित लोकांचं जगणं चितारतो. भारतीय सिनेमात पहिल्यांदाच बाबासाहेबांची विधानं एखाद्या सिनेमातील पात्राच्या तोंडून ऐकायला मिळाली. इतकंच नाही तर त्याचाच ‘काला’ (२०१८) मुंबईतील धारावीतल्या लोकांचे प्रश्न आणि संघर्ष अधोरेखित करतो.

‘काला’सारखं नाव सिनेमाच्या नायकाचं असू शकतं, यावर एका दशकापूर्वी विचारही करणं शक्य नव्हतं. मात्र द्राविडी संस्कृतीचा प्रभाव या सिनेमावर असल्याचं दिसून येतं. त्यासोबतच पेरियार यांचा परिवर्तनवादी, विवेकवादी दृष्टीकोनही सिनेमा निर्मितीसाठी सहयोगी ठरला आहे. ‘सरपट्टा परंबराई’ (२०२१) हा सिनेमाही वंचित समूहाचं जीवन चित्रित करतो. बुद्ध, पेरियार, आंबेडकर आदी सिनेमाच्या फ्रेममध्ये आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात. पा. रंजित यांनी वंचित लोकांचे प्रश्न, जीवन, समस्या, संस्कृती वंचितांच्याच दृष्टीकोनातून सांगण्यासाठी ‘नीलम प्रोडक्शन हाऊस’ची स्थापना केली आहे. इतकंच नाही तर त्यामार्फत दलित-बहुजन आणि आदिवासी कलावंतांसाठी कार्यशाळेचं आयोजन करून त्यांना चित्रपट निर्मितीचं प्रशिक्षणही दिलं जातं.

नीलम प्रोडक्शन हाऊसने निर्माण केलेल्या ‘पेरियारम पेरीमल’ (२०१८) या सिनेमाद्वारे मारी सेल्वराज हा तरुण दिग्दर्शक नावारूपाला आला आहे. त्याने दिगदर्शित केलेला ‘कर्णन’ (२०२१) लोकप्रियतेचं शिखर गाठतो आहे. या सिनेमातील वंचित नायकाची भूमिका करणाऱ्या धनुषला नुकतंच राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं आहे. मारी सेल्वराजने ‘कर्णन’मध्ये वंचितांची संस्कृती, मूल्यं आणि आदर्श प्रभावीपणे चित्रित केले आहेत. वंचितांचा नायक न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यासाठी लढतो, आपल्या आदर्शांना घेऊन त्यांच्या विचारावर चालतो. या वंचितांच्या जीवन-जाणिवा, संस्कृती आणि त्यांची जीवनमूल्यं मुख्य प्रवाहात यापूर्वी आलेली नव्हती.

वेंट्रीमारन हे आणखी एक तामिळ सिनेजगतातलं महत्त्वाचं नाव. त्याने ‘असूरन’ (२०१९) हा सिनेमा दिग्दर्शित केला. तो सामाजिक व जातीव्यस्थेचा बळी ठरलेल्या एका कुटुंबाची गोष्ट सांगतो.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

थोडक्यात दाक्षिणात्य सिनेनिर्माते व दिग्दर्शकांनी वंचितांच्या नायक-नायिकांचं चित्रण ब्राह्मण्यवादी वर्चस्व व सौंदर्यशास्त्र डावलून वंचितांच्या, दलितांच्या, बहुजनांच्या सांस्कृतिक आदर्शवादी आणि समतावादी परिप्रेक्ष्यातून केलं आहे.

मागील काही वर्षांत भारतात हा ‘समांतर सिनेमा’चा प्रवाह निर्माण झाला आहे. त्याची सुरुवात प्रादेशिक सिनेमानं केली आहे, हे विशेष. बॉलिवुड सिनेजगत या बहुजन कलावंतांच्या सिनेमाला एक दिवस नक्कीच स्वीकारेल. बॉलिवुडमध्येही आंबेडकरवादी सिनेनिर्माते-दिग्दर्शक आपला सिनेमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नीरज घायवानने ‘मसान’ (२०१५) निर्माण केला, जो मृत मानवी शरीरांना अग्नी देऊन त्याची विल्हेवाट लावण्याचं काम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या जातीच्या लोकांची गोष्ट सांगतो. त्याचा ‘गिली पुच्ची’ (Geeli Pucchi, २०२१) हा दुसरा सिनेमा शहरी दलित विधवा तरुण महिलेच्या दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकतो. तिला दलित आणि त्यातही स्त्री असल्यामुळे करावा लागलेला संघर्ष नीरज घायवानने या सिनेमात रेखाटला आहे.

दलित कलावंत दलित अभिनेते आणि दलित-बहुजन कथा नायक असलेला सिनेमा मुख्य प्रवाहामध्ये हिट-सुपरहिट होतो आहे. या समांतर सिनेमानं ‘दलित जॉनर’ निर्माण केला आहे. पा. रंजित, नागराज मंजुळे, निहारिका सिंग आणि दलित बहुजन सिनेमा निर्मात्या-दिग्दर्शकांची न्यूयार्कमध्ये ‘दलित सिनेमा’वर परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात त्यांनी ‘दलित सिनेमा’ या संकल्पनेवर भर दिला होता. म्हणजे, ‘ब्लॅक सिनेमा’ हा ‘समांतर सिनेमा’ म्हणून पुढे आला आणि मुख्य प्रवाहातील सिनेमा झाला, अगदी त्याच पद्धतीनं ‘दलित सिनेमा’ या जॉनरवर भर देण्यात आला होता.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा 

या सिनेमाचं ‘जय भीम’ हे शीर्षक अनेक क्रांतिकारक विचारांचं सिन्थेसिस म्हणून वापरलं आहे!

‘जय भीम’चा घोष न करताही ‘जय भीम’ म्हणता येतं, जो सिनेमाचा नायक सूर्यानं सगळ्या व्यवस्थेला केला आहे

‘जय भीम’ हा तुमचा आवाज आहे, तुमचा उच्चार आहे, हा विश्वास हा चित्रपट आपल्या मनात आणि दलित, पीडित वर्गाच्या अंतकरणात निर्माण करतो

‘जय श्रीराम’ची जागा घेण्यासाठी ‘जय भीम’ आला आहे…

‘जय भीम’ : भारतीय समाजामध्ये व्यक्तीच्या आणि समाजसमूहांच्या सामाजिक व न्यायिक प्रतिष्ठेकरता लढले जाणारे विविधांगी विचारांचे लढे अंतिमतः आंबेडकरांच्या विचारमार्गानेच परिपूर्ण होऊ शकतात, हा विधायक मूल्यसंदेश या चित्रपटाने भारतीय समाजापुढे ठेवला आहे

..................................................................................................................................................................

मागील दशकापासून दलित कलावंत सिनेजगतामध्ये येत आहेत. आपल्या कथा, जात-जाणिवा, संस्कृती आपल्या दृष्टिकोनातून मांडत आहेत. त्यालाच आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ‘भारतीय समांतर सिनेमा’ असं म्हणू शकतो. कारण हा सिनेमा आणि ब्लॅक सिनेमा निर्माण होण्याची कारणं अगदी समसमान आहेत. म्हणून ‘हा’ सिनेमा म्हणजे ‘दलित सिनेमा’ असं आपण नि:संकोचपणे म्हणू शकतो.

नुकताच ‘अमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ हा ‘समांतर सिनेमा’ प्रवाहाला मजबूत करणारा ठरला आहे. तो सगळ्या अंगानं सर्वोत्तम सिनेमा असल्याचं समीक्षकांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर या सिनेमानं IMDbवरील ‘द गॉडफादर’ आणि ‘शॉशंक रेडेम्पशन’ यांचं रेकॉर्ड मोडीत काढत ९.६ हा उच्चांकी रेट मिळवला आहे.  

‘जय भीम’ हा ‘समांतर सिनेमा’ चळवळीतील ‘माईलस्टोन’ म्हणून ओळखला जाईल. दाक्षिणात्य सिनेजगताचा सुपरस्टार सूर्या हा या सिनेमाचा निर्माता आणि अभिनेता आहे. ‘जय भीम’ या अभिवादनपर उच्चाराला सूर्यानं विशिष्ट लोकांपुरतं मर्यादित न ठेवता ‘वैश्विक’ केलं आहे. सिनेमात हा जयघोष कुठेही न उच्चारता खऱ्या अर्थानं त्याचा अर्थ या सिनेमानं सांगितला आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही संवैधानिक मूल्यं या सिनेमात पेरली गेली आहेत. अहिंसेच्या मार्गानं संवैधानिक अधिकार वापरून लढलेला न्यायिक लढा म्हणजे ‘जय भीम’. नागरी जीवनापासून हजारो मैल दूर असणाऱ्या आदिवासी समाजाच्या संघर्षाची ही कहाणी आहे. कायदा आणि सुव्यस्थेतेचं पालन करणारी व्यवस्थाच जेव्हा कायद्याचा दुरुपयोग करते, तेव्हा वंचितांनी अन्यायाच्या विरोधात उभं राहून दंड ठोकून ‘जय भीम’ केला पाहिजे, असं हा सिनेमा सांगतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘जय भीम’ प्रतीकांनी भरलेला आहे. ही अशी प्रतीकं आहेत, जी अन्यायाविरोधात लढायला शिकवणारी, आपल्या अधिकाराची जाणीव करून देणारी, विवेकवादी बनवणारी, समतेची शिकवण देणारी आणि अहिंसा व शांतीचा मार्ग दाखवणारी, बुद्ध-मार्क्स-पेरियार-आंबेडकर यांचा वारसा सांगणारी आहेत. हा सिनेमा जे जे अन्यायग्रस्त समूह मुख्य धारेपासून दूर फेकले गेले आहेत, त्यांचा मुक्तीचा नारा ‘जय भीम’ हाच असल्याचं निर्णायकरित्या स्पष्ट करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतामूलक समाजाच्या रचनेसाठी आशावादी होते. त्यांचा ‘जय’ म्हणजे न्याय, समता, स्वातंत्र्याचा ‘जय’ आहे. लोकशाही मूल्य वृद्धिंगत करणाऱ्या सामान्य माणसाच्या आशा म्हणजे ‘जय भीम’. अनुसूचित जातीजमाती आणि इतर मागासवर्गीयांना एकाच आशावादी ध्येयानं प्रेरित करणारा हा सिनेमा आहे.

संदर्भ

Chauhan, V. (2019). From Sujata to Kachra : Decoding Dalit representation in popular Hindi cinema. South Asian Popular Culture, 17(3), 327-336.

Edachira, M. (2020). Anti-caste aesthetics and Dalit interventions in Indian cinema. Economic and Political Weekly, 55(38).

Herrero, D. (2021). Anti-caste Aesthet (h) ics in Contemporary Dalit Cinema : The Case of Asuran (2019).

Manoharan, K. R. (2020). Being Dalit, being Tamil : The politics of Kabali and Kaala. In Tamil Cinema in the Twenty-First Century (pp. 52-66). Routledge.

Margolis, H. (1999). Stereotypical Strategies: Black Film Aesthetics, Spectator Positioning, and Self-Directed Stereotypes in" Hollywood Shuffle" and" I'm Gonna Git You Sucka". Cinema Journal, 50-66.

Patton, T. O. (2006). Hey girl, am I more than my hair? : African American women and their struggles with beauty, body image, and hair. NWSA journal, 24-51.

Wankhede, H. S. (2013). Dalit representation in Bollywood. Mainstream Weekly, 4 May 2013, www. mainstreamweekly. net/article4161. html.

Yengde, S. (2018). Dalit cinema. South Asia : Journal of South Asian Studies, 41 (3), 503-518.

https://indianexpress.com/article/opinion/columns/jai-bhim-movie-justice-chandru-ambedkar-7617286/

https://theprint.in/opinion/bollywood-has-miles-to-go-before-it-can-produce-kaala-asuran-karnan-or-even-a-jai-bhim/768579/

https://www.bbc.com/news/world-asia-india-59219595

https://www.hindustantimes.com/opinion/jai-bhim-captures-the-essence-of-our-constitutional-duties-and-rights-101636734347515.html

https://www.koimoi.com/south-indian-cinema/suriyas-jai-bhim-beats-top-rated-shawshank-redemption-on-imdb-becoming-the-first-tamil-film-to-achieve-this-spot/

https://www.thequint.com/entertainment/indian-cinema/jai-bhim-suriya-film-irular-community-caste-justice-chandru-real-case-tamil-cinema

..................................................................................................................................................................

लेखक चंद्रकांत कांबळे ‘सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’ (पुणे) येथे सिनिअर रिसर्च स्कॉलर आहेत.

chandrakant.kamble@simc.edu

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......