‘शिकवण्या’पेक्षा ‘शिकणं’ अधिक फलदायी, आनंददायी असतं, पण तो केवळ शब्दांचा खेळ इतकंच महत्त्व आपण त्याला देतो. तो विचार वास्तवदर्शी आहे, हे समजण्यासाठी पायपरच्या नजरेनं जग पाहता यायला हवं!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
मंदार काळे
  • ‘पायपर’चं पोस्टर आणि त्यातील काही दृश्यं
  • Thu , 22 April 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र पायपर Piper

दृश्य माध्यमांमध्ये चलच्चित्रांचं अर्थात Animationचं माध्यम हे प्रामुख्यानं लहान मुलांच्या करमणुकीसाठी आहे, असा एक व्यापक गैरसमज आहे. सतत करमणूकप्रधान, ‘विचार करायला लावू नका ब्वा’ म्हणत उथळ करमणुकीच्या शोधात असणार्‍यांना तेवढी एकच बाजू दिसते, यात आश्चर्य नाही. परदेशी चित्रपट म्हणजे केवळ हॉलिवुड, आणि हॉलिवुड म्हणजे कृतक-हिरोंचे अशक्य, अतर्क्य कारनामे दाखवणारे किंवा भीती वा लैंगिकता विकून चार-चव्वल कमवू पाहणारे चित्रपट, हा समज जितका संकुचित, तितकाच हाही. या माध्यमांतही अनेक उत्तम आशयघन चित्रपट आणि लघुपट निर्माण केले जात आहेत. अनेक सकस, आशयघन आणि गंभीर विषयांवरील चित्रपटही यात समाविष्ट आहेत. ‘ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईज’सारख्या विषण्ण करणार्‍या चित्रपटापासून ‘रॅटटुई’सारखी पंचतंत्राच्या कुळीतील मॉडर्न कथा सांगणारे चित्रपट याच माध्यमात तयार झाले आहेत.

जन्मदात्री आई आणि मूल यांच्यातील नात्याबद्दल कवींपासून लेखकांपर्यंत आणि अतिभावनिक मराठी चित्रपट तसंच मालिकांपासून व्यक्तिस्वातंत्र्यवादी अमेरिकेतील ‘सिंगल मदर’ या वास्तवाभोवती फिरणार्‍या चित्रपट आणि मालिकांपर्यंत... इतकं लिहिलं, बोललं आणि साकारलं जात आहे की, त्या भाऊगर्दीमध्ये त्या नात्याचं सकस चित्र शोधणं कोळशाच्या खाणीत हिरा शोधण्यासारखं होऊन बसलं आहे. मराठी भावकवितेच्या तेजीच्या काळात तर ‘ ‘आई’ या विषयावर भावनेनं थबथबलेली एखादी कविता समाविष्ट नसेल तर प्रकाशक काव्यसंग्रह छापायला नकार देत’ असं आम्ही गंमतीनं म्हणत असू! चलच्चित्रांच्या माध्यमातही- निदान लघुपटांच्या, मला असे काही चित्रपट सापडले, पण त्यात काही उल्लेखनीय आहेत. यापैकी ‘बाओ’ या ऑस्करविजेत्या लघुपटाची ओळख ‘बाओ’ या लेखामध्ये करून दिली आहे.

‘पायपर’ची कथा आहे त्याच नावाच्या (आपल्याकडील टिटवीच्या जातीच्या) पक्ष्याची, एका माय-लेकांची. हा पक्षी पाणथळ जागी वस्ती करणारा. पाण्यातील आणि लगतच्या गवतामधील किडे-मकोडे नि लहान जीव हे त्याचं अन्न. हे पायपर समुद्रकिनारी वस्ती असणारे. समुद्राच्या लाटा किनार्‍यावर येऊन आदळतात नि ओसरून परत जातात. त्या माघार घेत असताना किनार्‍यावरून पायपर पक्ष्यांची झुंड लगबगीनं धावत सुटते आणि त्या लाटांच्या मार्‍यानं किनार्‍यावर आणून टाकलेली कालवं, छोटे जीव गट्ट करते. दुसरी लाट येताना दिसली की, पाठ फिरवून किनार्‍याकडे धूम ठोकते. ती लाट ओसरू लागली की, पुन्हा समुद्राकडे धाव घेते. अन्नापाठी होणारी त्यांची ही पळापळ, तिची आवर्तनं हेच त्यांचं आयुष्य; खळ्याच्या खांबाला बांधलेल्या एखाद्या बैलाच्या गतीसारखं एका कक्षेत फिरणारं, पुनरावृत्त होत राहणारं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

माणसाच्या पोराच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की, आईबापांनी दिलेलं आयतं अन्न गिळण्याची सवय सोडून पोराला स्वत:च्या हातानं खाण्याची सुरुवात करावी लागते. ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ करत पोराच्या नाकदुर्‍या काढत त्याला भरवणार्‍या आईलाही ‘मेल्या दोन हात दिले आहेत ते वापर नि गीळ’ असं एकदाचं म्हणावं लागतं! पण ते पोर तरीही अन्न कमावण्यासाठी आणि शिजवण्यासाठी आईबापांवर अवलंबून राहतं. ‘मला बाहेरच्या खोलीतच वाढून दे, कार्टून बघता बघता जेवेन’ म्हणत आणखी काही वर्षं काढतं नि मगच स्वत:चं अन्न स्वत: कमावून खाण्यास सुरुवात करतं.

प्राण्या-पक्ष्यांच्या पिलांना इतकं ‘आयतोबा’ होऊ देणं आईबापांना परवडत नाही. चालतं-फिरतं-उडतं झालं की, आईबाप त्याला अन्न कमावण्याच्या तंत्राची शिकवणी चालू करतात नि लवकरात लवकर त्यानं स्वतंत्र व्हावं याची खटपट करतात. पायपरमधली आईदेखील आता ही वेळ आली आहे, हे पिलाला समजावू पाहते आहे. समुद्राच्या लाटेबरोबर येणारं अन्न, ती लाट चुकवून, खाण्याचं तंत्र शिकवू पाहते आहे.

पण पहिल्याच लाटेच्या तडाख्यानं घाबरगुंडी होऊन घरट्याकडे पिलोबा धूम ठोकतात. टरकून थरथरत बसलेल्या या पिलाला आई पुन्हा पुन्हा टोचून बाहेर काढते. गवताआड लपू पाहणार्‍या पिलाला मान वाकडी करून शोधणारी आई पाहून, ‘लपंडाव’ खेळताना किंवा शाळेत जायचं नाही म्हणून लपून बसलेल्या मुलाला शोधणारी माणसाच्या पिलाची आई आठवते. 

दुसर्‍या प्रयत्नात कसाबसा त्या पिलाला एक शिंपला सापडतो. पण तो शिंपल्याला जेमतेम चोच लावतो न लावतो तोच पुढची लाट येते आणि त्याला पुन्हा किनार्‍याकडे धूम ठोकावी लागते. अर्थात तसं करतानाही त्याने किनार्‍यावरचा एक खडक आधी पाहून ठेवलेला असतो, त्याच्याआड लपतं. इतर पूर्ण वाढ झालेल्या पायपर्सना हे सुचलेलं नाही. ते लाटेला चुकवत थेट किनार्‍याकडच्या वाळूकडेच धावत जात असतात. पिलू सामान्यांहून थोड्या तल्लख बुद्धीचं दिसतं आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

इतक्यात पायाखालून जाणारी शंखांची जोडी त्याला दिसते. आता हेही हलणारं काही दिसतं आहे, म्हणजे खाणं असावं, असा त्याचा ग्रह झाला असावा. पण शंखातला प्राणी पिलाहून दहापट लहान असूनही भलताच आक्रमक असतो. खेकड्यासारख्या इवल्याशा नांग्यांनी तो पिलाच्या चोचीवर दोन फटकारे ठेवून देतो. कोणता सजीव आपलं खाणं आहे आणि कोणता नाही, हे ओळखण्याचं पिलाचं शिक्षण इथून सुरू होतं.

बालसुलभ कुतूहलानं हा नवा प्राणी कोण म्हणून पिलू त्या शंखाचा पाठलाग करत समुद्राकडे जातं. अचानक तो शंख घाईघाईनं स्वत:ला वाळूत बुडवून घेतो. आश्चर्यचकित झालेल्या त्या पिलाला विचार करण्यास उसंतच मिळत नाही. समोरून येणारी लाट त्याला धोक्याची जाणीव करून देते आणि प्रतिक्षिप्त क्रियेनेच तोही स्वत:ला वाळूत खुपसून घेतो. अंगावरून जाणारी लाट त्याला पाण्याखालच्या जगाचं ओझरतं दर्शन घडवते. एक खेकडा त्याला हलवून डोळे उघडायला लावतो. पाण्याच्या लाटेनं वाळूवर आलेले असंख्य शिंपले त्याला दिसतात. त्या पाण्याखाली धोकादायक काहीच नाही, उलट कालवांचे शिंपलेच शिंपले दिसल्यानं त्याची भीती चेपते. लाट ओसरून जाताच सुटकेच्या आणि नवं काही गवसल्याच्या आनंदानं ते पिलू नाचरं होतं.

पाण्याखाली राहिलो तर कालवांची नेमकी जागा आधीच हेरून ठेवता येते आणि लाट ओसरल्यावर नेमक्या जागी खोदून ते गट्ट करता येतात, हे पिलाच्या तल्लख बुद्धीला समजतं. त्यातून दोन लाटांमध्ये मिळणारी उसंत अधिक अन्न जमा करून देऊ शकते, याची त्याला जाणीव होते.

वय वाढून बसलेल्या त्याच्या मागच्या पिढीला खडकामागे लपून लाटेपासून बचाव करता येतो, याची समज नव्हती, तशीच लाटांना न घाबरता अंगावर घेतलं तर भरपूर अन्न कमी श्रमात जमा करता येतं याचीही. साहजिकच पिलाच्या ‘संस्कारा’त ती असण्याचं कारण नव्हतं. खडकाआडची सुरक्षितता ही त्याच्या भीतीच्या प्रेरणेची प्रतिक्रिया म्हणून लागलेला शोध होता, तर लाटेखाली दडून अन्नाचा वेध घेण्याचं कौशल्य त्याच्या समाजाच्या बाहेरच्या कुणाकडून त्यानं आत्मसात केलेलं आहे. ‘ज्ञान अथवा कौशल्य हे केवळ वारशानंच मिळतं असं नव्हे, तर ते निरीक्षणानं, आपल्या नात्यांचा पैस विस्तारल्यानंही मिळू शकतं’ हे ज्ञान ते पिलू आपल्याला देऊन जातं.

याआधी ओळख करून दिलेल्या ‘बाओ’मधील आई आणि पायपरमधील आई यांच्यात फरक आहे. ती आई सतत मुलाला आपल्या पंखाखाली ठेवू इच्छिते, तर पायपरची आई पिलाला स्वावलंबी बनवू पाहते. माणसांमध्ये आणि पक्ष्या-प्राण्यांमध्ये हा महत्त्वाचा फरक राहतोच.

बाओची पार्श्वभूमी असलेल्या आशियाई- विशेषत: भारतीय समाजामध्ये मुलांना चटकन स्वतंत्र होण्याची पद्धत नाही. ‘दहा पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती मिळवण्याचा’ किंवा ‘मुलासाठी घर बांधून ठेवण्याचा’ प्रयत्न बाप करत असतो. स्वत: बाप झालेलं पोरगं अजूनही या ना त्या प्रकारे आपल्यावर अवलंबून आहे ही जाणीव, आशियाई आईबापांना आपल्या पालकत्वाचा पराभव न वाटता उलट त्यांच्या अहंकाराला सुखावत असते. याशिवाय प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाढत्या वयाबरोबर येणारी असुरक्षिततेची जाणीव मुलांच्या आधारानं दूर करण्याचा हेतूही साध्य होत असतो. ‘तुला जमेल तितकं शिकवलं. आता इथून पुढे तू शिक, रोजगार कर, जोडीदार शोध, स्थलांतर करायचं की कसं... याचा विचार तुझा तू कर,’ म्हणत पुढचे निर्णय घेण्यास आपल्या मुलांना उद्युक्त करणं, हे या संस्कृतीचा भागच नाही.

उलट दिशेनं मुलांमध्येही आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आईबापांना सोबत घेण्याची, त्यातून आपल्या निर्णयांना एकप्रकारे बाह्य आधार शोधण्याची वृत्ती दिसते. माझ्या मते यात एकप्रकारे आत्मविश्वासाचा अभाव दिसतो आणि संभाव्य अपयशात सोबती शोधून ठेवण्याची प्रवृत्ती. (खरं तर शोधायची गरज नाही, घरचेच असतात ते!) अगदी व्यक्तिस्वातंत्र्याचे डिंडिम वाजवत अमेरिकेत सेटल झालेले भारतीय तरुण दाम्पत्यही मूल होण्याच्या वेळेस दोघांपैकी एकाच्या आईला मदतीस बोलावून घेतं. एखाद्या मूळच्याच अमेरिकन दाम्पत्याप्रमाणे बाळंतपण आणि अपत्यसंगोपन याची पद्धतशीर माहिती करून घेऊन आपली जबाबदारी आपणच पार पाडत नाही. त्या तुलनेत नुसतं स्वावलंबीच नव्हे, तर मागल्या पिढीचा पोशिंदा होणारं, त्यासाठी वारशावर किंवा संस्कारावर अवलंबून न राहता आपल्या नजरेचा पैस विस्तारून नवं तंत्र शोधणारं पायपरचं हे पोरटं माणसांच्या पिलांपेक्षा बरंच कर्तृत्ववान म्हणायचं!

या लघुपटाचं वैशिष्ट्य म्हणजे आई आणि मूल (आणि तो लहान शंखधारी खेकडाही) यांच्या डोळ्यात दिसून येणारे नेमके भाव. पोरगं पाण्याला न घाबरता नाचरं होऊन खाण्याचा ढीग जमा करतानाचे त्याचे ते उद्योग किनार्‍यावरून पाहणारी आई कृतकृत्य होऊन त्याच्याकडे पाहताना दिसते. त्या आईच्या डोळ्यांतली ती भावना तुम्हाला स्पष्ट वाचता येते, इतकं ते चित्र प्रत्ययकारी आहे. याशिवाय पहिल्या लाटेचा तडाखा खाऊन घरट्यात धूम ठोकलेल्या त्या पिलाच्या डोळ्यातील भीती, जमिनीतून हे काय वर येत आहे म्हणून नजरेत उमटलेलं कुतूहल, खडकामागून किंवा लाट ओसरून गेल्यावर घरट्यातून डोकावताना दिसणारा सावधपणा... हे सारं त्या डोळ्यांत पाहता येतं. 

एकुणातच संगणकाच्या उदयानंतर चलच्चित्रांसाठी अतिशय प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होत असताना त्याचा इतका सुरेख वापर क्वचितच पाहायला मिळतो. सुरुवातीला किनार्‍यावर धडकून जाणारी लाट मागे जे बुडबुडे सोडते, त्यात वाळूतील कालव्यांच्या वा खेकड्यांच्या घरात पाणी जाताना निर्माण झालेले बुडबुडे आणि लाटांनी निर्माण केलेल्या फेसातील बुडबुडे यांचा वेगवेगळा पोत पाहता येतो. येणार्‍या लाटेपासून बचाव करण्यासाठी धावत सुटलेल्या थव्यात मागे राहिल्यानं पुढे पळणार्‍या गर्दीचा अडथळा होऊन आपला वेग कमी राहील, आणि त्यामुळे लाटेचा फटकारा खाण्याचा धोका आहे, असं दिसताच एक पायपर - जणू नाईलाजानं - उडून थव्याच्या डोक्यावरून पुढे जाऊन उतरतो. हा गोष्टीचा पूर्वरंग, अथवा नांदीही आहे. पायपर या उडू शकणार्‍या, पण न उडणार्‍या पक्ष्याची निवड समर्पक कशी, हे या सेकंदभराच्या चित्रानं स्पष्ट होतं. कारण पुढे ते पिलू ‘चालणार्‍या’ पक्ष्यांच्या थव्यात आपली ‘उडण्याची’ कुवत ओळखून उडण्याचं धाडस करणार असतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

यासोबतच आवाजांच्या वापराकडेही लक्ष द्यायला हवं. वेगवेगळ्या संदर्भात त्या आईच्या तोंडून येणारे आवाज ऐका. सुरुवातीला त्याला घरट्याबाहेर बोलावताना ऐकलेला आवाज आणि पहिल्या लाटेचा तडाखा खाऊन धास्तावून बसलेल्या पिलाला बोलावताना काढलेल्या आवाजातील सूक्ष्म फरक सापडतो का पाहा. दोन्ही वेळा ती त्याला खाण्याकडे, समुद्राकडे बोलावते आहे, पण दुसर्‍या प्रसंगी बोलावण्यासोबत ‘काही होत नाही. मी आहे सोबत’ असा धीर देण्याचा हेतूही जाणवतो का पाहा. खाणं तिथं मिळणार नाही, इकडे ये सांगतानाचा आवाज, पोरं स्वतंत्र झालं, तेव्हा तिच्या तृप्त नजरेला सोबत करणारा वरून खाली नेणार्‍या स्वरांतून उमटलेला आवाज ऐका. शेवटी ते बारकं येणार्‍या लाटेकडे धावत जातं, तेव्हा किंचित मान वाकडी करून घशातून हलकासा नापसंतीचा सूर काढणारी आई पहा. इतकेच नव्हे तर पहिल्या लाटेचा तडाखा खाऊन घरट्यात जीव मुठीत धरून बसलेलं पोरगं, जेव्हा पुढच्या लाटेची गर्जना ऐकून घरट्यात गुडूप होताना त्याच्या तोंडून उमटलेला चित्कार ऐका, लाटेच्या भीतीनं घरट्यात गडप झालेल्या आणि अन्न आयतं मिळणार नाही, हे ध्यानात आलेल्या पिलाच्या पोटात भुकेनं ‘कोकलणारे कावळे’ ऐका...

‘शिकवण्या’पेक्षा (teaching) ‘शिकणं’ (learning) अधिक फलदायी, आनंददायी असतं, असं म्हटलं जातं,  पण तो केवळ शब्दांचा खेळ, इतरांच्या तोंडावर फेकण्याजोगा एक सुविचार इतकंच महत्त्व आपण त्याला देत असतो. तो विचार वास्तवदर्शी आहे, हे समजण्यासाठी या छोट्याच्या नजरेनं जग पाहता यायला हवं.

..................................................................................................................................................................

लेखक मंदार काळे राजकीय अभ्यासक, ब्लॉगर आहेत.

ramataram@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......