माणसांना विचारांपेक्षा भावनांच्या प्रवाहात तरंगत जगायला अधिक आवडते. वेगवेगळ्या भावनिक प्रवाहांचे प्रवासी होऊन राहणे त्यांना अधिक आरामाचे वाटत असावे

विवेक-विचार-विश्लेषणातून सद्यस्थितीचा आलेख मांडणे, त्यातील न्यूनांची कारणमीमांसा, त्यावर ठोस उपाय, त्यातून कृतींचा वा व्यवस्थेचा भविष्यकालीन आराखडा मांडणे म्हणजे ‘काहीच न करणे’ असा यांचा समज दिसतो. कृतीला अवास्तव महत्व देत असताना तिच्या मागे भानावर असलेला विचार हवा, हे डाव्या-उजव्या-मधल्या म्हणवणार्‍या सार्‍यांनाच ठाऊक नाही; असले तरी त्या मार्गाने जाण्याइतकी चिकाटी त्यांच्यात नाही.......

‘हनुमानाचे जन्मस्थान कोणते?’ : अंजनेरी, किष्किंधा आणि कुगाव यांच्यापैकी कोणाही एका बाजूने निवाडा गेला, तर इतर दोन ठिकाणी असलेल्या भक्तांची श्रद्धा खोटी म्हणायची का?

मुळात पुराणकथांना पुरावे मानण्याची चूक आपण करत आहोत, तोवर वादंगांना तोटा नाही आणि त्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणार्‍यांनाही. सप्तचिरंजीवांपैकी एक असलेल्या त्या वज्रांगानेच प्रकट होऊन, या सार्‍यांची टाळकी आपल्या गदेने शेकून काढली, तरच कदाचित हे शहाणे होतील. कदाचित यासाठी की, आपल्या सोयीचा नसलेला दावा करणारा हा एक तोतया आहे, म्हणून त्याच्यावरही खटले भरायला कमी करणार नाहीत.......

‘कुराणा’च्या संस्कृत अनुवादाच्या निमित्ताने : भाषांना राष्ट्रवादाचे वा जातीयवादाचे हत्यार समजणे, हा मानवी मनाचा मोठा आजार आहे आणि तो फारच सार्वत्रिक आहे

प्राणिसृष्टीचा भाग म्हणून विचार केला, तर बांधीलकीपेक्षा वाळीत टाकणे अधिक आवडणारा माणूस हा एका बाजूने कळपप्रधान शेळ्यांसारखा असतो आणि त्याचवेळी आपण सिंहासारखे आहोत, इतर नरांना माझ्या कळपात जागा नाही, हे त्या कळपात सुरक्षित राहूनच तो गर्जून सांगत असतो. त्यामुळे त्याचे शौर्य हे केवळ कळपाबाहेरच्यांबाबतचा द्वेष इतकेच शिल्लक राहते. आणि ते ही शिल्लक राहावे म्हणून कळपाबाहेरचे लोकही शिल्लक राहावे लागतात.......

अधेमध्ये बातम्या छापते ते ‘वृत्तपत्र’, जाहिरातींच्या अधेमध्ये बातम्या देणारी ती ‘न्यूज-चॅनेल्स’ आणि जाहिरातींच्या अधेमध्ये मनोरंजन करणारी ती ‘मनोरंजन माध्यमे’…

चॅनेल-माध्यमे ही मूर्तिमंत धंदेवाईकता आहे. कुस्त्यांची दंगल लावावी, तशा चर्चांचे फड लावून, अनेक राजकीय, सामाजिक, क्वचित बौद्धिक मंडळींमध्ये टकरीच्या सांडांप्रमाणे झुंजवून अनेक मार्गांनी त्याचे दाम ते वसूल करत असतात. याव्यतिरिक्त विशिष्ट भूमिकेला झुकते माप देण्यासाठी त्या त्या बाजूच्या मंडळींकडून थेट अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात देणग्या स्वीकारतात... धंदा चोख करतात आणि ‘प्रामाणिकपणाच्या बैलाला ढोल’ म्हणतात.......

‘आपले गिर्‍हाईक कोण?’ हे अचूक माहीत असणे हेच धंद्यातील आणि राजकारणातील यशाचे ‘इंगित’ असते. हातचे सोडून पळत्या पाठी न धावण्याचे ‘शहाणपण’ यश देऊन जाते!

‘आपले गिर्‍हाईक कोण?’ हे व्यावसायिकाने ओळखणे आणि त्या गटाच्या दिशेने तोंड करून व्यवसाय सुरू करणे हा यशस्वी व्यवसायाचा पाया आहे. आपले उत्पादन कुठले आहे, त्याची गरज कुणाला आहे, तो गट त्या उत्पादनविक्रीतून पुरेसा नफा मिळवून देऊ शकतो का, याचा अदमासही व्यवसायाच्या सुरुवातीलाच उत्पादकाला घ्यावा लागतो. पण केवळ व्यवसायांसाठीच हे आडाखे कामात येतात असे नव्हे. गैरव्यावसायिक क्षेत्रातही अर्थकारणाचे हे पैलू दिसतात.......

वाईट रिव्ह्यू लिहिण्यासाठी पेन परजून बसलेला ईगो आपला पराभव खुल्या मनाने मान्य करतो. हे करत असताना आपली पत गमावतो, प्रामाणिकपणाची किंमत मोजतो...

‘रॅटटुई’ हा चित्रपट आपल्याकडील पंचतंत्राच्या कुळीतली कथा घेऊन आला आहे. गुणवत्ता नसून केवळ वारसा म्हणून मालकी/सत्ता हाती आलेले, गुणवत्ता असूनही हलक्या कुळातील असल्याने हक्काचे स्थान नाकारले गेलेले, त्यांना ते मिळते आहे, असे दिसताच ते हिरावून घेण्याचा आटापिटा करणारे अनुक्रमे लिंग्विनी, रेमी (उंदीर) आणि स्किनर ही तीन पात्रे मानवी प्रवृत्तींची प्रतीके आहेत. यापलीकडे चौथे महत्त्वाचे पात्र आहे अंतोन ईगो.......

‘शिकवण्या’पेक्षा ‘शिकणं’ अधिक फलदायी, आनंददायी असतं, पण तो केवळ शब्दांचा खेळ इतकंच महत्त्व आपण त्याला देतो. तो विचार वास्तवदर्शी आहे, हे समजण्यासाठी पायपरच्या नजरेनं जग पाहता यायला हवं!

वय वाढून बसलेल्या त्याच्या मागच्या पिढीला खडकामागे लपून लाटेपासून बचाव करता येतो, याची समज नव्हती, तशीच लाटांना न घाबरता अंगावर घेतलं तर भरपूर अन्न कमी श्रमात जमा करता येतं याचीही. साहजिकच पिलाच्या ‘संस्कारा’त ती असण्याचं कारण नव्हतं. खडकाआडची सुरक्षितता ही त्याच्या भीतीच्या प्रेरणेची प्रतिक्रिया म्हणून लागलेला शोध होता, तर अन्नाचा वेध घेण्याचं कौशल्य बाहेरच्या कुणाकडून त्यानं आत्मसात केलं .......

राजकारणातील ‘सोबतीच्या करारा’ची निश्चित ‘एक्स्पायरी डेट’ नसली, तरी ती आपल्या सोयीनुसार ‘एक्स्पायर’ व्हावी, ही इच्छा सर्वच जोडीदारांची असते!

युती-आघाड्यांचे राजकारण हे सत्तासमतोलाच्या, पक्षवाढीच्या आणि नेत्यांच्या नेतृत्वाचे बस्तान बसणे, या विविध कारणांभोवती फिरत असते. तिथे सत्तासंपादन हेच प्रमुख उद्दिष्ट असते. राजकीय अस्तित्व टिकले तरच विचारांची रुजवणूक करण्यास भूमी मिळते, हे बहुतेक राजकीय पक्षांना ठाऊक असते. त्या सत्तेसाठी विजोड आघाड्यांच्या तडजोडी केल्या जातात, त्यातून विरोधकांबरोबरच सोबत्यावरही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो.......