‘बाओ’ या जेमतेम तीन मिनिटांच्या चलच्चित्रपटाने मातृत्वाचा प्रवास मर्यादित अवधीमध्ये बसवून दाखवला आहे!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
मंदार काळे
  • ‘बाओ’ या लघुपटाचे एक पोस्टर
  • Tue , 20 April 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र बाओ Bao डोमी शी Domee Shi

काही दशकांपूर्वी ‘२००१ अ स्पेस ओडिसी’ म्हणून चित्रपट येऊन गेला. त्यातील सुरुवातीच्या एका प्रसंगामध्ये मानवी उत्क्रांतीच्या आद्यकाळातील एक चिंपांझी नुकतेच हत्याराप्रमाणे वापरण्यास शिकलेले एक हाड विजयोन्मादाने हवेत उंच भिरकावतो; ते इतके उंच जाते की, थेट अंतराळात पोहोचते आणि हळूहळू एका अंतराळयानात परिवर्तित होते. मानवी प्रगतीची झेप दहा सेकंदाहून कमी अवधीत दाखवणारा तो प्रसंग चित्रपट इतिहासातील एक संस्मरणीय मानला जातो. त्याला चित्रपट इतिहासातील ‘सर्वांत दीर्घ जम्प-कट’ असे म्हटले जाते.

२०१८मध्ये आलेल्या जेमतेम तीन मिनिटांच्या ‘बाओ’ या चलच्चित्रपटाने मातृत्वाचा प्रवास असाच मर्यादित अवधीमध्ये बसवून दाखवला आहे. या लघुपटाला भक्कम सांस्कृतिक संदर्भ आहे. तो वगळून तो पाहणे शक्य नाही. विशेष म्हणजे या लघुपटाला शाब्दिक भाषेची जोड नाही. तो संपूर्ण दृश्यभाषेने बोलणारा आहे. तसे चलच्चित्र प्रकारातील बरेच लघुपट शाब्दिक भाषेशिवाय तयार केले जातात हे खरे, पण त्यांच्या कथानकाचा आवाकाही मर्यादित असतो. ‘बाओ’मध्ये एका चिनीवंशीय स्त्रीचा मातृत्वाचा प्रवास तीन मिनिटांत बसवतानाही प्रसंग आणि संवाद यांच्यापेक्षा घटनाक्रमाचा पट वापरला आहे. आणि तो लेखिका-दिग्दर्शिकेला अपेक्षित असलेले बहुतेक सारे सहज तोलून धरतो आहे.

‘बाओ’ या शब्दाचे उच्चारानुसार दोन अर्थ आहेत. (आपल्याकडे ‘पुण्याची’ या शब्दाचे संदर्भानुसार वेगळे उच्चार होतात आणि अर्थही बदलतो. ‘नाही पुण्याची मोजणी’ या प्रसिद्ध गाण्यात पाप-पुण्य यातील पुण्य अपेक्षित आहे आणि ते उच्चारी पुण्ण्य असे दोन ‘ण’ उच्चारते. उलट ‘पुण्याची खाद्यसंस्कृती’ यात पुणे या शहराचा उल्लेख आहे आणि उच्चारात एकच“ण’ आहे.) एक आहे तो खाद्यपदार्थ. हा आपल्या मोदकासारखा किंवा तिबेटी ‘मोमो’ सारखा. ज्याला अमेरिकन सरसकट वर्गीकरणात्मक (पॅनकेक, सॉस, ग्रेव्ही, सँडविच, पाय वगैरे) पद्धतीमध्ये ‘डम्पलिंग’ या वर्गात बसवता येते. दुसरा अर्थ ‘मूल्यवान’, ‘जिवाभावाचे’ म्हणजे इंग्रजीतील precious, close to heart असा आहे. दोन अर्थांचे एका शब्दातले अद्वैत या लघुपटाचे सार सांगून जाते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

इंग्रजी भाषिकांमध्ये, विशेषत: अमेरिकेमध्ये कुटुंबातील लहान मुलांचे कौतुक, ‘apple to my eyes' ‘sweet pea’, ‘sugar bean’, ‘my little dumpling’ अशा विशेषणांनी केले जाते. ही बहुतेक विशेषणं खाद्यपदार्थांशी संबंधित असतात असे दिसते. त्या अर्थी चिनी कुटुंबाच्या या कहाणीला अमेरिकन भाषावैशिष्ट्याचा संदर्भही सहज चिकटतो.

एक चिनी आई नाश्त्यासाठी बाओ बनवते. नवरा आपल्या वाट्याचे बाओ भराभर खाऊन कामाला चालता होतो. साचेबद्ध आशियाई नवरा! तिला पुरेसे शिल्लक आहे की नाही हे न पाहता, तिचे खाऊन होईतो तिला निदान गप्पांची सोबत करण्याची तसदी न घेता निघून जाणारा.

नवरा कामावर गेल्यानंतर रिकामे घर खायला उठत असल्याने कंटाळलेली (याला Empty Nest Syndrome अशी संज्ञा आहे) ती आई तिच्या वाट्याचे बाओ पोटात ढकलते आहे. त्यातला एक बाओ तोंडात टाकत असतानाच तो अचानक किंचाळतो आणि त्याला नाक-डोळे दिसू लागतात. दचकलेली आई त्याला समोरच्या पात्रात खाली ठेवते. आता एकटेपणाला कंटाळलेल्या त्या आईच्या जगण्याला पुन्हा गती येते. हे नवे पोर ती आत्मीयतेने वाढवू लागते.

त्याला खायला-प्यायला घालणे, त्याच्या शारीरिक प्रगतीबाबत जागरूक असणे, बाहेरील धोक्यांपासून त्याचे संरक्षण करणे, यात तिच्या जगण्याला नवा अर्थ गवसतो. (‘मातृत्व हाच स्त्रीच्या जगण्याचा खरा अर्थ’ हा पुन्हा आशियाई संस्कृतीचा ‘संस्कार’) पण अपरिहार्यपणे एके दिवशी त्या बाओच्या खोलीच्या दारावर ‘प्रवेश बंद’ची पाटी लागते... पोरगं वयात येतं. आई-बाप आशियाई असले तरी पोरगं अमेरिकन वळणाचं आहे! आई-बापापासूनही प्रायव्हसी वगैरे अपेक्षित ठेवणारं. आणि आई आता दाराला कान लावून त्याचे फोनवरून चाललेले संभाषण ऐकू पाहते.

वयात आलेलं हे पोरगं अर्थातच प्रेमात पडतं. या मुलाची गर्लफ्रेंड गोरी, कॉकेशन वंशाची दिसते. यामुळे त्याच्या आईला धक्का बसतो. एकतर आशियाई संस्कृतीमध्ये मुलांची लग्ने लावून देण्याची जबाबदारी आणि अधिकार आई-वडिलांचा, पालकांचा असतो. त्यामुळे मुलाने आपली जोडीदारीण स्वत:च निवडली इतकेच नव्हे तर ती अन्य सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेली निवडली याचा धक्का आईला अधिक बसला आहे. आपला मुलगा आपल्यापासूनच नव्हे तर आपल्या संस्कृतीपासूनही दुरावण्याची शक्यता तिला दिसते आहे. आईला डावलून एका प्रसंगी तिच्याबरोबर जाणार्‍या त्या मुलाच्या आयुष्यातले आपले स्थान घसरले असल्याची तिला जाणीव होते. यशावकाश पोरगं जोडीदारणीबरोबर सहजीवन सुरू करण्यासाठी घराबाहेर पडण्याचा मनोदय जाहीर करते आणि तिच्या निराशेचा कडेलोट होतो. त्याची परिणती टोकाच्या निर्णयात होऊन ती दारापाशी त्याला अडवून उचलते... आणि गट्ट करते.

हा शेवट अनेकांना धक्कादायक वाटला. आई असे मुलाला गट्ट करते म्हणजे काय? अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. थिएटरमध्ये जेव्हा दाखवला जाई तेव्हा काही मातांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. पण मुळात असा प्रश्न पडला याचाच अर्थ इतक्या कमी कालावधीमध्ये तो एक बाओ आहे, तिचा मुलगा नाही हे विसरून तुम्ही त्याला तिचे मूल समजू लागला आहात. हे गारुड दिग्दर्शिकेने यशस्वी केले आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या कृतीचा मला अर्थ लागतो तो असा. प्रत्येक आई आयुष्यात एकदा तरी, ‘यापेक्षा या मेल्याला जन्मच दिला नसता तर बरं झालं असतं,’ असा त्रागा, वैताग व्यक्त करते. लव्ह-मॅरेज- त्यातही आंतरजातीय, आंतरधर्मीय, करणार्‍या पोराच्या लग्नाच्या संदर्भात तर ती शक्यता अधिक असते. त्याच धर्तीवर, ‘याला तेव्हाच खाऊन टाकला असता तर हा पुढचा सगळा त्रास झाला नसता’ अशा तिच्या मनोऽवस्थेचा तो आविष्कार म्हणून पाहावे लागेल.

निराश अवस्थेत ती झोपली असताना तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडतो आणि त्यातून आलेल्या प्रकाशाच्या झोतामुळे तिच्या पाठीमागच्या भिंतीवर एका बाओचे अर्कचित्र उमटते. आपण पुन्हा दाराकडे पाहतो, तेव्हा हळूहळू त्या बाओसारखाच चेहरामोहरा असलेला तरुण मुलगा दिसतो, हा त्या आईचा खरा मुलगा. तो आपल्या आईला स्वत: बनवलेला एक बाओ देतो आणि आईला ‘तिचा बाओ’ परत मिळतो.

चिनी भाषेमध्ये बाओ हे युनिसेक्स नाव आहे, आपल्याकडील शीतल किंवा किरणसारखे. त्यामुळे बाओ हा मुलगा नसून मुलगी असता तरी फरक पडला नसता. आशियाई संस्कृतीमध्ये मुलगी लग्न करून नवर्‍याच्या घरी जात असते. त्याअर्थीही हे रूपक चपखल बसले असते.

अगदी शेवटी तिची अमेरिकन सूनबाई बाओ बनवून तिला खाऊ घालते. कौटुंबिक बंध आणि बंधने या दोन्हीला महत्त्व देणारी आशियाई संस्कृती आणि एक प्रकारे संस्कृतीहीन, वारसाहीन अमेरिकेतील व्यक्तिस्वातंत्र्यवादी संस्कृती यांचे प्रतीकात्मक संमीलन होते.

लघुपट सुरू होतो, तेव्हा नवरोबा किचनच्या विरुद्ध दिशेला असलेल्या खिडकीतून बाहेर बघत बसलेले असतात. लघुपटाच्या अखेरीस नव्या सुनेने बनवलेल्या बाओला क्षणभरच दाद देऊन मान वळवून पुन्हा खिडकीबाहेर बघत बसलेले दिसतात. आशियाई नवरोबा घरातील बाबींना कितपत महत्त्व देतात, याचे हे सूचक आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

लेखिका-दिग्दर्शिका डोमी शी (Domee Shi) स्वत: चिनी वंशाची आहे. तिचा जन्म चीनमधील चुंगकिंगमधला. एका मुलाखतीमध्ये डोमी म्हणते, “चिनी संस्कृतीमध्ये खाणे आणि कुटुंब यांचे अतूट नाते आहे. एखाद्याबद्दल आपल्या मनात प्रेम, आपुलकी असेल तर ती ‘आय लव्ह यू’ म्हणत थेट व्यक्त केले जात नाही. ‘जेवलास/लीस का?’ असा प्रश्न विचारला जातो. (प्रेमात असलेली, किंवा पडू/पाडू पाहणारी तरुण मंडळी आज मोबाईल/फेसबुक/इन्स्टाच्या जमान्यात ‘J1 झालं का?’ असा मॅसेज पाठवतात. त्याचा उगम असा चिनी संस्कृतीत आहे असे सांगितले तर ‘चिनी मालावर बहिष्कार’वाले प्रेमी आपले प्रेम ‘गोमूत्रसेवन केलेस का?’ असे बदलून घेतील काय?’ असा वात्रट प्रश्न डोक्यात डोकावून गेला.) ही कथा काहीशी तिच्या आईचीही आहे. आणि ती बाओच्या माध्यमातून सांगणे हे त्याअर्थी औचित्यपूर्णही आहे. डिस्नेच्या ‘पिक्सर स्टुडिओ’ज मधील पहिली स्त्री दिग्दर्शिका म्हणून डोमीने या छोट्या फिल्मद्वारा पदार्पण केले होते. या लघुपटाला २०१९मधील ‘सर्वोत्कृष्ट चलच्चित्र’म्हणून ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

एकतर लघुपट त्यात चलच्चित्र म्हणजे करमणुकीपुरते, त्यातही लहान मुलांनीच पाहायचे असा समज रूढ आहे. मागे एकदा ‘द बिग बॅंग थिअरी’मधील पिक्शनरी खेळताना साफ उताणा पडलेल्या शेल्डनच्या त्यातील चुकांचा त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या आधारे वेध घेतला होता. त्यावरचे विश्लेषण वाचून एक फेसबुक-मैत्रीण वैतागून म्हणाली होती, ‘अरे साधा विनोदी प्रसंग आहे तो, त्यात इतका विचार कशाला करायचा.’ खरं आहे. पण असा एखादा बाओ, एखादा precious little dumpling सापडला तर त्याचे कौतुक केले नाही, तर मग आमचे आरती प्रभू म्हणतील ना, ‘ही निकामी आढ्यता का, दाद द्या अन् शुद्ध व्हा.’

..................................................................................................................................................................

लेखक मंदार काळे राजकीय अभ्यासक, ब्लॉगर आहेत.

ramataram@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......