‘महामानवाची गौरवगाथा’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनसंघर्षाला न्याय देणारी महामालिका
कला-संस्कृती - टीव्ही मालिका
अरुण खोरे
  • ‘महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेची पोस्टर्स
  • Sat , 17 October 2020
  • कला-संस्कृती टीव्ही मालिका महामानवाची गौरवगाथा Mahamanvachi Gauravgatha

विसाव्या शतकातील मानवी हक्कांचे अग्रणी नेते आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील ‘महामानवाची गौरवगाथा’ ही ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील टीव्ही मालिका आज, शनिवार १७ ऑक्टोबर २०२०रोजी ३४३व्या भागाबरोबर संपणार आहे. मे २०१९मध्ये ही मालिका सुरू झाली. या वर्षी लॉकडाऊनचा काही काळ वगळता ती नियमितपणे सुरू होती.

आंबेडकरांच्या बालपणातील आणि विद्यार्थिदशेतील त्यांना बसलेल्या अस्पृश्यतेच्या जातीय चटक्यांची तपशीलवार कहाणी या मालिकेतून महाराष्ट्राला आणि मराठी भाषिक असलेल्या जगातील सर्वच लोकांना ज्ञात झाली असेल यात शंका नाही.

आंबेडकरांची शिक्षणासाठीची ओढ, ज्ञानर्जनाचे त्यांचे विलक्षण भान आणि त्यानंतर या देशातील अस्पृश्य समाजाला सामाजिक न्याय देण्याची त्यांची राजकीय भूमिका, या सगळ्यांचा अतिशय सुंदर असा पट या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर उलगडला गेला.

ही मालिका निर्माण करणारे दशमी क्रिएशनचे सर्व निर्माते-दिग्दर्शक, मालिकेचे लेखन करणारा लेखक वर्ग, सर्व कलावंत या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आपण केले पाहिजे.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

टीव्ही वाहिन्यांच्या अलीकडच्या काळात एखाद्या महापुरुषाची इतकी तपशीलवार चित्रण करणारी मालिका या निमित्ताने पहिल्यांदाच बघायला मिळाली. त्यासाठीदेखील निर्माता-दिग्दर्शक- यांचे अभिनंदन!

आपल्याकडे प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासातील अनेक महान व्यक्तींवर मालिका निर्माण झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी संपलेली संभाजीमहाराजांवरील मालिका ही एक अशीच विशेष महत्त्वाची होती. त्यापूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीमहाराजांवरही अशीच एक महान मालिका निर्माण केली गेली होती.

दरम्यानच्या काळात संत तुकारामचरित्रावरही एक मालिका आपण पाहिली. अर्वाचीन काळातील महान व्यक्तिमत्त्वावर चित्रपट किंवा अशा दीर्घ टीव्ही मालिका निर्माण करणे तसे सोपे नाही. तरीही आपल्याकडे काही चित्रपट निर्माण झाले आहेत.

महात्मा गांधी यांच्यावरील रिचर्ड अटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरला. नंतरच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधीही असा एखादा पूर्ण लांबीचा चित्रपट निर्माण झाला पाहिजे, अशी मागणी केली गेली. त्यातून डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा (हिंदी आणि इंग्रजी) चित्रपट निर्माण झाला. त्यात डॉ. आंबेडकरांची भूमिका करणाऱ्या मामुटी या दाक्षिणात्य अभिनेत्याचे विशेष कौतुक झाले. ते यथायोग्यही होते. डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेचे आव्हान स्वीकारणे आणि त्या भूमिकेत शिरून त्यांची व्यक्तिरेखा साकारणे हे खरोखर अवघड काम होते. मामुटीने आपल्या कामातून तो ठसा निश्चितपणे उमटवला.

.................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

काही वर्षांपूर्वी राज्यसभा टीव्हीने विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याकडून ‘संविधान’ ही मालिका तयार करून घेतली होती. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची एकूण प्रक्रियेचा लेखाजोखा मांडणारी ही एकूण दहा भागांतील मालिका राज्यसभा टीव्हीवरून प्रसारित झाली. या मालिकेत बेनेगल यांचे दिग्दर्शकीय कौशल्य अतिशय वेगळेपणाने आपल्यासमोर आले. ही मालिका हिंदी आणि इंग्रजीमध्ये होती. त्यात डॉ. आंबेडकरांची भूमिका सचिन खेडेकर यांनी केली होती. माझ्या दृष्टीने एखाद्या सक्षम अभिनेत्याने डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाला इतका सुंदर न्याय त्यापूर्वी कधी दिला, असे म्हणता येत नाही. या मालिकेतील सगळीच व्यक्तिमत्त्वे भारताचा इतिहास घडवणारी होती. त्यात राजेंद्रप्रसाद होते, नेहरू होते, पटेल होते आणि गांधीजी तर होतेच होते! शिवाय के. एम. मुन्शी होते, राजकुमारी अमृत कौर होत्या, दुर्गाबाई देशमुख होत्या. अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाने ही संविधानसभा भरलेली होती.

या संविधानसभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जो ठसा ही मालिका पाहताना आपल्या मनावर उमटतो, तो केवळ अपूर्व आणि असाधारण असाच होता! सचिन खेडेकरने अप्रतिम अशी भूमिका साकार करून डॉ. आंबेडकरांच्या बौद्धिक कौशल्याचे सगळे तेज या व्यक्तिरेखेत ओतले होते.

या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकरांचे चरित्रकार असलेले चांगदेव भवानराव खैरमोडे यांच्या बारा खंडीय आंबेडकर-चरित्राच्या आधारे साकार होणारी ‘महामानवाची गौरवगाथा’ ही मालिका पाहण्याची उत्सुकता होती. फुले-आंबेडकर चरित्राचे संशोधक-अभ्यासक हरी नरके यांच्या संशोधनाच्या आधारे या मालिकेला आणखी एक परिमाण लाभले. डॉ. आंबेडकरांच्या लेखन आणि भाषणांच्या विविध खंडातील अनेक संदर्भ त्यांच्यामुळे या मालिकेच्या तपशिलात जोडले गेले.

अपर्णा पाडगावकर, शिल्पा कांबळे यांचे लेखन, आनंद शिंदे यांचा बाबासाहेबांचा गौरव करणारा पहाडी स्वर, अतिशय सुंदर अशी नेपथ्य रचना, वेशभूषा आणि या सर्वांना उत्कृष्ट न्याय देणाऱ्या व्यक्तिरेखा साकारणारे सर्व कलावंत, यांच्यामुळे अतिशय सुंदर अशी ही मालिका निर्माण होऊ शकली.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................   

चांगदेव खैरमोडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या चरित्राचे काही खंड ते हयात असतानाच तयार केले होते, लिहिले होते. त्यासंबंधी ते डॉ. आंबेडकरांशी बोललेही होते. या बारा खंडांतून त्यांच्या स्वभावांची वेगळे वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात. पण त्यांच्या हयातीत सुरुवातीचे दोनच खंड प्रकाशित झाले. त्यानंतरच्या काळात त्यांच्या पत्नी द्वारकाबाई यांनी उर्वरित खंड प्रकाशित केले. डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी, त्यांच्या ज्ञानसाधनेचा पैस समजण्यासाठी समजण्यासाठी खैरमोडे यांचे हे चरित्र खंड वाचायला पाहिजे.

ही मालिका निर्माण करताना निर्माता-दिग्दर्शकांनी या खंडांचा आधार घेऊन आंबेडकरांच्या जीवनसंघर्षाला अतिशय सुयोग्य असा न्याय दिला आहे, असे मी म्हणेन.

या मालिकेच्या निमित्ताने काही ठळक गोष्टी सांगायला पाहिजेत. एक म्हणजे, डॉ. आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांचे डॉ. आंबेडकरांच्या जडणघडणीतील योगदान. त्याबरोबरच रामजीच्या भगिनी मीराताई यांनी छोट्या भिवाला वाढवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्याच्या शिक्षणासाठी असलेली त्यांची ओढ, हे पैलू प्रकर्षाने अधोरेखित झाले. रामजी सुभेदाराची भूमिका करणारे मिलिंद अधिकारी आणि मीरा आत्याची भूमिका करणाऱ्या पूजा नायक या दोन्ही कलावंतांनी अनेक प्रसंगात आपले डोळे ओले केले आहेत. अतिशय समर्थपणे भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या अंत:करणात घर केले आहे.

डॉ. आंबेडकरांचे लग्न रमाबाईंशी झाले. या रमाबाईंची भूमिका शिवानी रांगोळ या अभिनेत्रीने अतिशय सक्षमपणे साकार केली. डॉ. आंबेडकरांच्या ज्ञानसाधनेच्या काळात ते अमेरिकेला शिक्षणासाठी तीन वर्षे वास्तव्याला असताना रमाबाईंनी जे सोसले, त्याची किंचितही तमा न बाळगता आपल्या बाबासाहेबांसाठी त्या काम करत राहिल्या. त्याचे मोल हे खूप मोठे आहे आणि आणि शब्दांच्या पलीकडचे! रमाबाईंच्या जीवनातील ताणतणाव आणि कुचंबणा यांचे अतिशय संयमित आणि बोलके असे भावदर्शन शिवानीने ही व्यक्तिरेखा साकारताना घडवले. त्याबाबतीत तिचे विशेष कौतुक केले पाहिजे.

या मालिकेचे ‘माझा भीमराया’ हे शीर्षक गीत देणारे आनंद शिंदे-उत्कर्ष शिंदे या दोन्ही प्रतिभावान बंधूंचे मुद्दाम अभिनंदन करायला हवे. आनंद शिंदे यांचा पहाडी सूर डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तित्वाची उंची आपल्यासमोर जणू उभी करतो. या मालिकेचे संवादलेखक अनेक असले तरी एकूण लेखन आणि संवाद यांचे धागेदोरे जोडलेले राहतील, याची दक्षता घेतली गेली आहे.

डॉ. आंबेडकरांचे जीवन हे कोलंबिया विद्यापीठातून भारतात परतल्यावर सार्वजनिक स्वरूपाचे झालेले होते. त्यामुळे त्यांच्या भाषणातील विविध संदर्भ, विविध समित्यासमोर त्यांनी मांडलेले मुद्दे, गांधीजी आणि नेहरू यांच्याशी त्यांची होणारी चर्चा आणि वादविवाद या सर्व गोष्टी कंटाळवाण्या न होता, त्याला संवादी सूर असला पाहिजे, ही काळजी या मालिकेच्या लेखकांनी खूप चांगली घेतली आहे. भारताच्या विसाव्या शतकातील सामाजिक क्रांती घडवणारा एक महापुरुष म्हणजे डॉ. आंबेडकर. त्यामुळे या मालिकेलाही एका सामाजिक संदर्भाचे मोल आपोआप प्राप्त झाले आहे. त्याचे खरे बळ या संवादलेखन आणि मालिकेच्या एकूण सादरीकरणातही आपल्याला जाणवते.

डॉ. आंबेडकरांची व्यक्तिरेखा साकारणारे तरुण अभिनेते सागर देशमुख यांनी मात्र या मालिकेतील भावपूर्ण अभिनयाचा उत्तुंग बिंदू गाठून साऱ्या प्रेक्षकांच्या मनात बाबासाहेबांची एक प्रतिमा निर्माण केली आहे.

सर्वांना ठाऊकच आहे की, याच सागर देशमुखने दोन वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा ‘भाई’ या चरित्रपटात साकार केली होती. ‘तोच का हा सागर देशमुख!’ असे वाटावे इतके भूमिकेचे परकाया प्रवेशाचे रूप या मालिकेत त्याच्या भूमिकेत दिसते. अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात अखंड अभ्यास करणारे डॉ. आंबेडकर, त्यानंतर सयाजीराव गायकवाड यांच्याबरोबर संस्थानात अपमान सोसून आपले जीवन जगणारे डॉ. आंबेडकर आणि नंतर शोषित वंचितांच्या लढाईत मूकनायक, माणगाव परिषद या माध्यमातून आपले जीवितकार्य शेवटपर्यंत पुढे नेणारे डॉ. बाबासाहेब… असेच सगळे टप्पे आपल्या भूमिकेतून आणि विशेषत: मुद्राभिनयाच्या समर्थ आविष्कारातून सागर देशमुख यांनी सादर केले. खरोखर काळजाला पीळ पडावा असेच त्यांचे या मालिकेतील अखेरच्या काही भागातील व्यक्तित्वदर्शन घडत होते.

अलीकडच्या काही वर्षात आपल्या अंत:करणात ठसा उमटेल अशी डॉ. आंबेडकर यांची भूमिका सागर देशमुखने सादर करून मोठे योगदान दिले आहे. ही मालिका संपत असताना आपल्या अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या या मालिकेतील विविध अभिनेत्यांच्या, विविध प्रसंगातील भूमिका आपल्याला डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणादायी गौरवगाथेची नेहमीच आठवण करून देत राहतील.

या मालिकेची निर्मिती करणे हे खरोखर अवघड आणि आव्हानात्मक असेच काम होते. दशमी क्रिएशन्सचे नितीन वैद्य आणि त्यांचे सहकारी, विविध भागांचे दिग्दर्शक, लेखक, संगीतकार आणि अर्थातच कलावंत या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

सागर देशमुखला डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी नजीकच्या काळात विविध पुरस्कारांनी गौरवले गेले तर नवल नाही. डॉ. आंबेडकरांचे या मालिकेतील संदर्भ आता डिजिटल स्वरूपात आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी कायम राहतील, हा याचा फार मोठा सामाजिक असा लाभ आहे, असे मला वाटते.

..................................................................................................................................................................

लेखक अरुण खोरे हे दलित चळवळींचे अभ्यासक, लेखक आणि ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ या मासिकाचे संपादक आहेत.

arunkhore@hotmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......