‘एंडगेम’: अतिशय प्रभावी व मानवी अस्तित्वावर वेगळं भाष्य करणारी कलाकृती!
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘एंडगेम’मधील एक प्रसंग
  • Tue , 18 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe एंडगेम Endgame सॅम्युएल बेकेट Samuel Beckett

जागतिक दर्जाच्या कलाकृतींचं वैशिष्ट्य म्हणजे त्या स्थलकाळाच्या मर्यादा ओलांडून रसिकांशी संवाद साधू शकतात. सॅम्युएल बेकेट (१९०६-१९८९) हा आयरिश नाटककार त्यापैकीच एक. त्याची नाटकं आजही जगभर सादर केली जातात. बेकेट जन्मानं आयरिश होता, पण त्याच्या जीवनाचा मोठा काळ फ्रान्समध्ये व्यतीत झाला. त्यानं बरंचसं महत्त्वाचं लेखनही फ्रेंच भाषेत केलं. त्याच्या नाटकांना ‘असंगताची रंगभूमी’ (‘थिएटर ऑफ अ‍ॅब्सर्ड’) म्हणतात!

सप्टेंबर १९३९ मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४० साली हिटलरनं फ्रान्सवर आक्रमण केलं होतं. यात फ्रान्सचा दारुण पराभव झाला होता. सर्व फ्रान्स नाझींच्या ताब्यात गेला होता. याविरुद्ध गुप्तपणे उठाव सुरू होता. यालाच आधुनिक इतिहासात ‘फ्रेंच रेझिस्टंस’ म्हणतात. यात ज्याँ पॉल सार्त्र ‘कॉम्बट’ नावाचं भूमिगत क्रांतिकारकांसाठी मासिक चालवत असे. त्यात काम्युनं भरपूर लेखन केलं. यात बेकेटनं भरीव कामगिरी केली. जर्मनीचं इतर देशांशी भांडण सुरू असताना आपल्या देशानं त्यात पडावं, यातील अतार्किकता काही कलाकारांना सहन झाली नाही. या असंगत घटनेतून ‘असंगताची रंगभूमी’ जन्माला आली.

बेकेटचं सर्वांत गाजलेलं नाटक म्हणजे ‘वेटिंग फॉर गोदो’. हे त्यानं १९५३ साली लिहिलं. या नाटकानं बेकेट जागतिक दर्जाचा नाटककार म्हणून प्रस्थापित झाला. त्यानं १९५७ साली ‘एंडगेम’ हे नाटक लिहिलं. नंतर तर त्यानं काही नाटकांचं दिग्दर्शनसुद्धा केलं. बेकेटला १९६९ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.

अलीकडेच मुंबर्इत बेकेटच्या ‘एंडगेम’चा प्रयोग बघायला मिळाला. ‘जेफ गोल्डबर्ग स्टुडिओ’ या मुंबर्इस्थित नाट्यसंस्थेतर्फे हा प्रयोग सादर करण्यात आला होता. सुमारे ७० मिनिटं चालणारं हे इंग्रजी नाटक जेफ गोल्डबर्ग यांनी दिग्दर्शित केलं. हे नाटक म्हणजे एक दीर्घांक आहे.

बेकेटच्या या नाटकाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना समजतं की, पृथ्वीवर असं काहीतरी भयानक घडलं आहे, ज्यामुळे पृथ्वीवर जगणं अशक्य होऊन बसलं आहे. म्हणून तीन पात्रं जमिनीखाली खोल भुयारात राहतात. माणसांना असा काही रोग झाला आहे की, ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती संपली असून त्यांच्या जीवनावर आता यंत्रांचा ताबा आहे. या रोगातून वाचलेल्यांपैकी फक्त एकाची स्मरणशक्ती शाबूत आहे. पण तो आंधळा व अपंग झालेला आहे. आताच्या संदर्भात त्याची स्मरणशक्ती त्याची शत्रू झाली आहे. त्यामुळे तो आजुबाजूच्या यंत्रवत असलेल्या माणसांसाठी त्रासदायक झालेला आहे.

बेकेटच्या नाटकांना पारंपरिक पद्धतीचा प्लॉट नसतो. त्यात एक परिस्थिती असते, एक प्रकारचं वातावरण असतं. नाटककारानं काही पात्रं निर्माण केलेली असतात. या पात्रांच्या माध्यमातून नाटककार प्रेक्षकांशी बोलतो. ‘एंडगेम’मध्ये दोन अशी पात्रं रंगमंचावर दिसतात, ज्यांना स्मरणशक्ती नाही. म्हणजेच त्यांना इतिहास नाही. माणसाचा इतिहास गौरवशाली असू शकतो, तसाच लाजीरवाणासुद्धा असू शकतो. कसा का असेना, प्रत्येकाला इतिहास असतो, त्याच्या कडूगोड आठवणी असतात. जेव्हा या आठवणीच गायब होतात, तेव्हा माणसाच्या अस्तित्वाला काही अर्थ असतो का, असू शकतो का वगैरे प्रश्न या निमित्तानं बेकेट उपस्थित करतो. काही अभ्यासकांच्या मते बेकेटचं हे नाटक शेक्सपियरच्या ‘life is a tale / told by an idiot, full of sound and fury / signifying nothing.’ याचं विधानाचं एक प्रकारे नाट्यरूपांतर आहे. ‘एंडगेम’ बघताना या वाक्याची तीव्र प्रचिती येते.

नाटकाच्या सुरुवातीला क्लोव हा नोकर घराची साफसफार्इ करत असतो. त्याच्या कामाला भाग म्हणजे हॅम या अपंग आणि आंधळ्या माणसाची सेवा करणं. हॅम सतत क्लोवचा अपमान करत असतो, त्याला घालूनपाडून बोलत असतो. अशा स्थितीत सॉसीयन हे पात्र कचऱ्याच्या डब्यातून बाहेर येतं. त्यांच्या बोलण्यात सतत जुन्या आठवणी असतात. ते मध्येच काही तरी गोड खायला मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतात. त्यांच्या आजुबाजूचं जग रसातळाला चाललं आहे. आजुबाजुची माणसंसुद्धा बहुधा मरणार आहेत. नाटकाच्या शेवटी एकाचा मृत्यू होतो, तर दुसरा निघून जातो. नाटक संपतं तेव्हा कथानकात काहीही घडलेलं नसतं. हीच नाटकाची खरी गोष्ट.

बेकेटच्या अशा नाटकांत तसा काही ठसठशीत प्लॉट नसणं हेच या नाटकांचं वैशिष्ट्य असतं. याचाच दुसरा अर्थ असा की, बेकेटनं शब्दबंबाळ रंगभूमी नाकारली होती. नेमक्या याच कारणांसाठी बेकेटची नाटकं सादर करणं हे दिग्दर्शकांपुढे एक वेगळं आव्हान असतं. या नाटकात दिग्दर्शक जेफ गोल्डबर्ग यांनी रंगमंचाच्या मागच्या बाजूला एक टीव्ही लावून ठेवला होता. त्यावर कधी कार्टुन नेटवर्क दिसतं, तर कधी दुसऱ्या महायुद्धावरचा एखादा माहितीपट, तर कधी अलिकडच्या काळात गाजलेला एखादा हिंदी सिनेमा. ही सर्व दृश्यं मिळून बेकेटला अभिप्रेत असलेला आधुनिक जीवनातील असंगतीचा परिणाम साधला जातो.

रंगमंचाच्या उजव्या बाजूला रुग्णवाहिका किंवा पोलिसांच्या गाडीवर असतो, तसा फिरता दिवा सतत सुरू होता. काही तरी अशुभाचं सूचन करणारा. रंगमंचावर सर्वत्र प्रचंड प्रमाणात एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. रंगमंचावर एक प्रकारचा गोंधळ निर्माण केला होता आणि तर्कसंगत काहीही नसेल याची खबरदारी घेतली होती. परिणामी ‘एंडगेम’ सुरू होतं, तेव्हा पहिल्या सेकंदापासून प्रेक्षकांना काहीतरी अतिशय असंगत बघायला मिळेल याचा अंदाज येतो. हा दीर्घांक संपेपर्यंत हीच भावना प्रेक्षकांच्या मनात असते. रंगमंचावरच्या पात्रांसाठी व नंतर प्रेक्षकांसाठीसुद्धा. जगणं ही एक शिक्षा होऊन बसते.

विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात सुरू झालेलं दुसरं महायुद्ध ही एक अशी घटना होती, जिचा प्रभाव पाश्चात्य लेखक/ कलाकारांवर पडला. पहिलं महायुद्ध व दुसरं महायुद्ध यात अनेक प्रकारचा गुणात्मक फरक होता. पहिलं महायुद्ध ढोबळ मानानं वसाहतींवरून सुरू झालेलं होतं, तर दुसरं महायुद्ध हिटलरच्या वंशवादी धोरणांमुळे सुरू झालं होतं. दुसरा अतिशय महत्त्वाचा फरक म्हणजे दोन्ही महायुद्धांत मोठ्या प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झाली. मात्र दुसरं महायुद्ध संपलं ते जगाला अणुशक्तीची संहारक ताकद दाखवून.

तेव्हापासून एका अणुबॉम्बच्या मदतीनं एक देश हजारो लाखो निरपराध लोकांना मारून टाकू शकतो, ही भावना लेखक-कवींच्या मनात खोलवर रुजली. शिवाय हिटलरनं मारलेले साठ लाख ज्यू. या दोन घटनांनी युरोपियन लेखक/ कलाकारांना अंतर्मुख केलं. पिकासोचं ‘गर्निका’ हे चित्र या संदर्भात बघावं लागतं. इंगमार बर्गमनच्या ‘विंटर लार्इट’ या चित्रपटात एका युरोपियन शेतकऱ्याला जेव्हा कळतं की, चीननं असा एक अणुबॉम्ब बनवला आहे, ज्याच्या मदतीनं करोडो लोकांना क्षणार्धात मारून टाकता येर्इल. तेव्हा तो शेतकरी सर्व सोडून दिवसेदिवस नदीकाठी बसून विचार करतो की, एखादा देश असं कसं करू शकतो?

१९६२ साली जेव्हा अमेरिका व रशिया क्यूबातील मिसार्इलच्या निमित्तानं एकमेकांसमोर उभे ठाकले होते आणि कोणत्याही क्षणी तिसरं महायुद्ध सुरू होर्इल असं वातावरण निर्माण झालं होतं, तेव्हा बॉब डिलननं गाणं लिहिलं होतं- ‘it is hard/ it is hard/ it is hard rain going to fall’.

जीवनात काही मंगल असतं, जीवन जगण्यासाठी असतं वगैरे पारंपरिक नीतीमूल्यांना सुरूंग लागलेल्या काळात बेकेटचं लिखाण झालं. ‘एंडगेम’ याला अपवाद नाही.

या नाटकाचं दिग्दर्शन जेफ गोल्डबर्ग यांनी केलं तर राहुल साहू (क्लोव), विजेंदर चौबे (हॅम) यांनी आपापल्या भूमिका समजून सादर केल्या. अशा प्रकारच्या नाटकात ध्वनीसंयोजन आणि प्रकाशयोजनेला फार महत्त्व असतं. नाटककाराला काय सांगायचं आहे हे दिग्दर्शक या दोन नाट्यघटकांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. ‘एंडगेम’मध्ये ध्वनीसंयोजन आणि प्रकाशयोजना अमित पाटील यांची आहे. त्यांनी अनेक प्रसंग कल्पक प्रकाशयोजना आणि ध्वनीसंयोजनाच्या जोरावर प्रभावी केलेले आहेत.

या नाटकात नेपथ्याला तितकंच महत्त्व आहे. ही जबाबदारी राज छाब्रारीया यांनी पेलली आहे. एक अतिशय प्रभावी व मानवी अस्तित्वावर वेगळं भाष्य करणारी कलाकृती म्हणून ‘एंडगेम’चं महत्त्वाचं स्थान आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................