फैज़ अहमद फैज़च्या दोन कविता - खरंच शब्दांच्या खूप पलीकडचं आहे!
कला-संस्कृती - सतार ते रॉक
जयंत राळेरासकर
  • फैज़ अहमद फैज़
  • Sat , 01 September 2018
  • कला-संस्कृती सतार ते रॉक फैज़ अहमद फैज़ Faiz Ahmad Faiz

१३ फेब्रुवारीला फैज़ अहमद फैज़च्या जन्मदिवसाचे औचित्य म्हणून व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपवर त्यांची एक कविता वाचनात आली. अतिशय प्रतिभावंत आणि प्रखर डाव्या विचारसरणीचा हा मार्क्सवादी कवी अखेर पाकिस्तानात गेला होता. मनस्वी आणि हळव्या अशा या फैज़च्या कवितांची, गज़लांची अनेक पुस्तके निघाली. जगभरच्या भाषातून त्यांची भाषांतरं झाली. त्यांच्या सगळ्याच कविता किंवा नज्म, गज़ला वाचनात नाहीत. फैज़ची उर्दू भाषा तशी आकलनाला सोपी नाही. मात्र त्याचं एक गाणं ऐकलं होतं. खरं तर फैजची प्रथम ओळख झाली ती नूरजहाननं गायलेल्या एका गाण्यामुळे. विलक्षण आर्त असं ते गाणं बेचैन करणारं होतं.

हे गाणं एका पाकिस्तानी चित्रपटातलं होतं. आजही ते गाणं आठवतं. फैज़ नावाचा हा कवी कोण याचा शोध सुरू झाला तो या गाण्यामुळे. आणि आता या कवितेमुळे मला त्या गाण्याची आठवण आली होती. गतवर्षी ‘मौज’च्या (२०१७) दिवाळी अंकात प्रतिभा रानडे यांचा ‘फैज़’वरील प्रदीर्घ लेख आठवला. तो मिळवून पुन्हा वाचला. फैज़चं वैयक्तिक आयुष्य, स्थलांतरामुळे झालेली त्याची घुसमट, त्याची प्रेम-प्रकरणं हे सगळं बघितलं आणि एक अनामिक हुरहूर मनात निर्माण झाली. फैज़सारख्या कलावंतांना हा एक शापच असतो. जगतानाचा कैफ ही अंतर्मनातून आलेली उर्मी असते, तर सभोवताल हे खूप विसंगत, खूप प्रतिकूल असतं. मनात आलं, याच सगळ्याचीच तर मग कविता होत नसेल ना?

फैज़च्या दोन गज़ला संदर्भात मला जे वाटलं ते कागदावर उतरवणंदेखील तं अवघड आहे. नूरजहाननं गायलेली ती गज़ल आहे – “मुझसे पहिलीसी मुहब्बत मेरे मेहबूब ना मांग...” अनेकांनी ही गज़ल ऐकली असेल. रशीद अत्रे यांनी संगीत दिलेल्या ‘कैदी’ या चित्रपटात ती नूरजहाननं गायली आहे आणि पडद्यावरदेखील सादर केली आहे. एका खूप विचित्र वळणावरून फैज़नं ही गज़ल लिहिली आहे, असं वाटत राहतं. खूप बेचैनी निर्माण करणारे हे शब्द असे आहेत -

लौट जाती है ‘उधर’ को भी नज़र, क्या कीजे..

अब भी है दिलकश तेरा हुस्न, मगर क्या कीजे

और भी दुख है जमाने में मुहब्बत के सिवा

राहते और भी है वस्ल की राहो के सिवा

मुझसे पहिली सी मुहब्बत मेरे मेहबूब ना मांग...

(तुझे रूप, तुझा सहवास, तुझ्या अस्तित्वाच्या खुणा वागवत आयुष्य गुलज़ार करायला मलाही आवडले असतं... पण काय करू? त्यापेक्षा आयुष्यातील इतर दु:खांकडेदेखील माझी  नजर जाते आणि ‘विसरून जा ते सर्व.. आता फारच अवघड आहे सगळं’ इतकंच फक्त म्हणता येतं. तसं प्रेम, तसे ते दिवस पुन्हा येणे नाही... तेव्हढं फक्त मागू नकोस.)

‘और भी दुख है जमाने में इक मुहाब्बत के सिवा’ ही भावना तर साहिरनंदेखील व्यक्त केली होती. फैज़ काय किंवा साहीर काय, दोघंही एकाच मुशीतून तयार झालेले प्रतिभावंत. ‘दीदी’ चित्रपटातील साहिरचं ते अप्रतिम गाणं आठवून पहा. त्यातील दुसऱ्या कडव्यात साहीरच्या ओळी अशा आहेत -

जिंदगी सिर्फ मुहब्बत नहीं कुछ और भी है

जुल्फो रुख्सार की जन्नत नहीं, कुछ और भी है

भूख और प्यास की मारी हुई इस दुनिया में

इश्क ही एक हकीकत नहीं, कुछ और भी है

फैज आणि साहीर यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेमालादेखील कायमच एक विफलतेचा समान धागा आहे, हेदेखील महत्त्वाचं. वागण्यातील आदब आणि व्यक्तिमत्त्व यामुळे फैज़वर अनेक स्त्रिया फिदा होत्या. खुद्द फैज़नं त्याची जाहीर कबुलीदेखील दिली होती. साहीरनंदेखील अशीच बिनदिक्कत कबुली दिली होती. मात्र साहीरनं काही वेळा आव्हानात्मक भाषादेखील केली होती. इशरत-प्रकरण चालू होतं. त्यावेळी तो म्हणाला होता, “आता मी मशहूर झालो आहे. ती मला शोधात येईल!” मुंबईत चित्रपटसृष्टीत बस्तान बसल्यानंतर साहीरचं हे वक्तव्य आहे. फैज़चं पहिलं प्रेमदेखील शालेय आयुष्यातील. ही मुलगी देखील एका रईस, श्रीमंत माणसाची बेगम झाली. आपण आपलं प्रेम व्यक्त करून काही उपयोग नाही, हे फैजनं ओळखलं होतं.

अपने बेख्वाब किवाडों को मुकाफ्फील कर लो

अब यहां कोई नहीं, कोई नहीं आयेगा....

फैज़नं ही गज़ल कुठल्या काळात लिहिली माहिती नाही, मात्र ती एका अस्वस्थ अवस्थेत लिहिली, हे नक्की. ‘अब यहां कोई नहीं, कोई नहीं आयेगा’ या ओळी वाचल्या आणि क्षणभर प्रचंड वेचैनी जाणवली. एकांतात एखाद्या खंडहर इमारतीच्या काळोख्या सज्जात जणू फैज उभा आहे. त्याला अनेक आठवणी येत आहेत, पण तिथं आता कुणीही येणार नाही, हे भीषण वास्तव पचवणं त्याला खूप अवघड आहे. याच सगळ्या अवस्थेत त्याला त्या ओळी सुचल्या असाव्यात.

ही गज़लदेखील गाणं होऊन चित्रपटात आली. ‘बाजी’ या पाकिस्तानातील चित्रपटात. त्यातील ओळी, ही काळीज फाडणारी वेदना आहे. अखेरची किरणं लपेटून सागरात विसावणाऱ्या सूर्यास्ताच्या त्या क्षणासारखी वाटते मला ही वेदना. येणारा प्रत्येक क्षण हा फक्त आणि फक्त एकट्या अंधाराचा आहे. आता इथंदेखील एक गंमत आहे. नूरजहानच्या ‘बाजी’मधल्या गाण्यात फैज़च्या गज़लची फक्त एकच ओळ येते. फैजची मूळ गजल अशी आहे -

फिर कोई आया दिले-जार नहीं कोई नहीं

राहारौ होगा, कहीं और चला जायेगा

ढल चुकी रात, बिखरने लगा तारोंका गुबार

लडखडाने लगा एवानोमें ख्वाबिदा चिराग

सो गयी रास्ता तक तकके, हर एक राहगुजर

अजनबी खाक ने धुंदला दिये कदमोंके सुराग

गुल करो शमा, बधावो मय-ओ-मीना-ओ-अयाग

अपने बेख्वाब किवाडोंको मुकाफ्फल कर लो

अब यहां कोई नहीं, कोई नहीं आयेगा...

फैज़च्या या कवितेची भाषा अगदी अस्सल उर्दू आहे. तशी ती समजणं सोपं नाही. मात्र एकदा का तिची उकल झाली की, मात्र ती एकाकी गर्द काळोखी मन व्यापून टाकते.

नूरजहाननं ‘बाजी’ (१९६३) मध्ये ती गजल गायली, मात्र त्या गाण्यात फैज़च्या गज़लेमधील फक्त हीच ओळ आहे. मात्र ही एकच ओळ स्वतंत्रदेखील कमालीची प्रभावी वाटते आणि त्याचं श्रेय फैज़बरोबर नूरजहानचंदेखील आहे. ज्यांनी ती ऐकली त्याला तो दर्द समजू शकतो. नूरजहाननं म्हटलेल्या या गाण्यातील इतर ओळी ‘अहमद राही’ या गीतकाराच्या आहेत. सोबत फैजची ओळ जोडण्याची कल्पना त्या संगीतकाराची आहे, अशी आठवण गीतकार अहमद राही यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

फैज त्यावेळी आजारी होते. त्यामुळे हे पूर्ण करणं मला भाग पडलं असं ते म्हणतात. अगदी लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला हे जाणवेल की, अखेर फक्त याच ओळी बराच काळ आपला पाठलाग करतात. किंवा आपण त्या ओळींचा पाठलाग करतो. ‘कोई नहीं...कोई नहीं...” हे शब्द पुन्हा पुन्हा म्हणणं हे म्हणजे उपाय नसलेली वेदनाच व्यक्त करणं आहे! नूरजहाननं म्हटलेलं ते अहमद राही यांचं गाणं असं आहे -

अब यहां कोई नहीं, कोई नहीं आयेगा

दिले तनहां हमें तनहाई में ढल जायेगा...

ये हंसी चांद है या दिदार-ए-हैरान कोई

ये मेरा दिल है के महेफील-ए-वीरान कोई

जिंदगी है के जुल्फ परेशान कोई

कौन ये उलझी हुई जुल्फ को सुलझायेगा...अब यहां...

दास्तां खत्म मेरे दर्द की हो जायेगी

साथ हे तेरे,  तेरी याद भी खो जायेगी

मुन्तजीर है आंख हर हाल पे सो जायेगी

रात का आखिरी आंसू भी छलक जायेगा....अब यहा...

गाणं ऐकणं आणि कविता अनुभवणं यात तसा फरक असतोच. शब्द हे आपल्याला गुंतवून ठेवतात, क्षणभर चक्रावून टाकतात आणि शोध घेत आपण हरवून जातो. गाणं झटक्यात एक जादूई परिणाम साधतात. एक गूढ मुग्धता मनात निर्माण होते. ‘अब यहां कोई नही आयेगा’ची आर्त भावना स्पर्श करते आणि आपण नकळत काही काळापुरता परकाया प्रवेश साधतो. आपल्याला ते आवडतं.

एका अशाच अनौपचारिक बैठकीत (डॉ. अशोक देशपांडे, यांच्या लंडन येथील घरी झालेली ही मैफल मला अचानक ‘बघायला’ मिळाली)  कवी सुधीर मोघे यांनी या गाण्याचं सुरेख निरुपण केलं होतं. त्यातदेखील ते याच ओळीबद्दल बोलत राहिले आहेत.

वर्षानुवर्षं एखादं गाणं आपला सतत पाठलाग करत असतं. अचानक शब्द समोर येतात आणि सगळाच कल्लोळ माजतो. फैज़च्या दोन गज़ला, त्यांची गाणी आणि सुधीर मोघेंनी करून दिलेली आठवण हे सगळं अचानक समोर आलं. बघता बघता फैज आणि साहीर यांच्या विचारातील विलक्षण साम्यदेखील लक्षात आलं. मला आलेली ही अनुभूती शेअर करावीशी वाटली म्हणून हा लेख. अन्यथा हे सगळं खरंच शब्दांच्या खूप पलीकडचं आहे.

.............................................................................................................................................

लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

jayantraleraskar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Shrikant Umrikar

Sun , 02 September 2018

या दोन्हीही नज्म आहेत गझल नाहीत....