डॉ. जयंत नारळीकर यांची ‘धोंडू’ ही ‘हार्ड सायन्स फिक्शन’ प्रकारची कथा आजही तितकीच ताजी, कालातीत ठरते! कारण…
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
मेघश्री दळवी
  • ‘यक्षांची देणगी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि डॉ. जयंत नारळीकर
  • Sun , 06 July 2025
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो जयंत नारळीकर Jayant Narlikar यक्षांची देणगी Yakshanchi Denagi

जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ (कै.) डॉ. जयंत नारळीकर यांचा १९ जुलै हा जन्मदिवस गेल्या काही वर्षांपासून ‘राष्ट्रीय विज्ञानकथा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने डॉ. नारळीकरांच्या ‘धोंडू’ या विज्ञानकथेचे आजच्या काळाच्या संदर्भात आस्वादात्मक रसग्रहण करणारा हा विशेष लेख...

.................................................................................................................................................................

एलियन्सवरच्या विज्ञानकथा वाचताना त्यांचं रंगरूप, बोलणं, वागणं कसं असेल याची एक उत्सुकता असते. ‘ईटी’ चित्रपटात लांबट मानेचा, मोठ्या गरगरीत डोळ्यांचा एलियन आहे. मंगळावरच्या कथांमध्ये हिरवे, विचित्र आकाराचे एलियन्स वारंवार भेटतात. बहुतांश वेळा लांब बारीक हात, दोन-तीन लांब बोटं, मोठे डोळे, डोक्यावर अँटेना, असा एक ठराविक साचा दिसतो. या पार्श्वभूमीवर डॉ. जयंत नारळीकर यांची ‘धोंडू’ ही कथा विशेष उठून दिसते. याचं कारण त्यातल्या एलियनला कुठलाही आकार, रंग, किंवा बाह्य वैशिष्ट्य दिलेलं नाही. उलट एक वरवर सामान्य दिसणार्‍या अशनीखंडातली एलियन बुद्धिमत्ता कथेच्या केंद्रस्थानी आहे. एलियनचं अस्तित्व केवळ बाह्यरूपामधूनच जाणवायला हवं असं नाही, तर बुद्धी किंवा प्रज्ञेतून आपल्याला त्याची ओळख पटू शकते, ही कल्पना नारळीकर ‘धोंडू’मधून अत्यंत प्रभावीपणे मांडतात.

कथेची सुरुवात होते ती एक अशनीचा तुकडा मिळण्यापासून. ही गोष्ट तशी परिचित वाटते, पण त्या अशनीच्या तुकड्याचा पुढचा प्रवास मात्र अचंबित करून टाकणारा आहे. तो पटण्यासारख्या प्रसंगातून उलगडत जातो, याचं श्रेय नारळीकरांच्या सुगम आणि प्रवाही लेखनाचं आहे. त्यांच्या कथांमध्ये जागतिक पातळीवरच्या संशोधकांच्या सहकार्याची झलक नेहमीच दिसून येते, तशी इथंही आहे. सोबत मुख्य भारतीय वैज्ञानिक डॉ. राव असल्यानं कथा मराठी आणि भारतीय वाचकांना जवळची वाटते.

चित्रपटांमध्ये अनेकदा एलियन्स वाजतगाजत येतात. मोठमोठ्या शहरांचा विध्वंस करतात, आणि राष्ट्राध्यक्ष किंवा लष्करी अधिकार्‍यांशी संवाद साधतात. पण ही एकच शक्यता असते का? कार्ल सेगन यांनी एकदा गमतीनं म्हटलं होतं की, एलियन्स आलेच तर ते वॉशिंग्टनमध्ये न उतरता एखाद्या ग्रामीण भागात उतरतील आणि एखाद्या शेतकऱ्यालाच भेटतील. त्या दृष्टीनं मला धोंडूचं आगमन आणि तो खेडूतांना भेटणं खास वाटतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अवकाशात सजीवांचं अस्तित्व आहे आणि तिथूनच पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती झाली, असा पॅन्स्पर्मिया सिद्धान्त आहे. डॉ. नारळीकर यांनी फ्रेड हॉयल आणि चंद्रा विक्रमसिंघे यांच्यासोबत अशनी किंवा अवकाशातील सूक्ष्म धूलिकणांबरोबर जीवसृष्टीचा प्रसार होऊ शकतो, याचा अभ्यास केला होता. त्यांनी यासंदर्भात काही प्रयोगही केले होते. पृथ्वीच्या वातावरणाच्या स्ट्रॅटोस्फिअर थरामध्ये सुमारे ४० किलोमीटर उंचीवर सूक्ष्मजीव आढळल्याची नोंद त्यांनी आपल्या संशोधनातून केली होती. हे जीव पृथ्वीवरून तिथं पोहोचणं शक्य नसल्यानं ते अवकाशातून आले असावेत, असा या प्रयोगांचा निष्कर्ष होता.

म्हणूनच धोंडू अवचित पृथ्वीवर पडतो आणि त्यात सजीवाच्या अस्तित्वाच्या खुणा आढळतात तेव्हा ती केवळ काल्पनिक गोष्ट राहत नाही. त्यामागे वैज्ञानिक अभ्यास, सिद्धान्त, आणि स्वत: केलेल्या प्रयोगांची पार्श्वभूमी असते, हे लक्षात घेण्यासारखं आहे. डॉ. नारळीकरांसारखे वैज्ञानिक जेव्हा विज्ञानकथा लिहितात, तेव्हा अशा वैज्ञानिक तपशीलांचा अर्थ अधिक प्रकर्षानं जाणवतो.

धोंडूचा बदलता रंग आणि त्यातून निघालेल्या लहरींमुळे कथा हळूहळू आकार घेत जाते. आपण पुढे काय होईल या उत्कंठेनं वाचत जातो. धोंडूसारख्या एका अशनीच्या तुकड्यात बुद्धिमत्ता असू शकते, या जाणीवेनं थरारून जातो. एलियन मेंदूचा अभ्यास करण्याची संधी आणि अभ्यास करताना संशोधकांच्या मनात उमटणाऱ्या शंका त्यात फार नेमकेपणानं मांडलेल्या आहेत.

धोंडू अंक आणि गणित आत्मसात करतो. पुढचा स्वाभाविक टप्पा म्हणजे त्याला विज्ञान शिकवूया असं डॉ गुप्ता सुचवतात. मात्र याच टप्प्यावर डेव्हिड त्यांना रोखतात. मानवी प्रगतीचा पाया म्हणजे विज्ञान, आणि ते असं परग्रहवासीयाच्या हातात आपण होऊन द्यायचं का, हा गंभीर प्रश्न उपस्थित करतात. तेव्हा संशोधनात विवेकाचं भान कसं गरजेचं आहे, हे नारळीकर सहज दाखवून जातात. आज आपण एआय, माहितीयुग सोशल मिडिया यांच्या फायदेतोटयांवर कडाडून चर्चा करतो. त्या वेळी संयमशील, सुजाण विचारांचं मोल खरोखरीच जाणवतं, आणि त्या दृष्टीनं कथेतील संशोधकांच्या सावध भूमिकेची अधिकच छाप पडते.

मग धोंडूला बुद्धिबळ शिकवण्याचा प्रस्ताव येतो. त्याचे वेळी ग्रँडमास्टर नोव्हिकॉटव्ह यांचे सामने सुरू असणं हा सोयीचा योगायोग असला, तरी बुद्धिबळाचा वापर बुद्धिमत्तेची कसोटी म्हणून केला जाणं नवी कल्पना नाही. संगणकांनी माणसांशी बुद्धिबळ खेळण्याचे प्रयोग अॅलन ट्यूरिंगपासून सुरू झाले होते, आणि १९५०नंतर असे अनेक प्रयोग झालेले आहेत. ही कथा १९७०च्या दशकात लिहिलेली असली, तरी नंतरच्या एआय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये बुद्धिबळ, पोकर, गो सारख्या खेळांची भूमिका आपल्याला ठळकपणे दिसलेली आहे. त्यामुळे आज ही कथा वाचताना धोंडूचा त्याच धर्तीवरचा बौद्धिक प्रगतीचा प्रवास खोलवर ठसा उमटवून जातो.

आपल्या अपेक्षेप्रमाणे धोंडू बुद्धिबळ लगेच आत्मसात करतो, पण त्याच वेळी संशोधकांची  चलबिचल सुरू होते. आपण इतक्या उच्च दर्जाच्या बुद्धिमत्तेचं स्वागत करायला तयार आहोत का? की वसाहतवाद्यांनी मूळ जमातींवर लगेच वर्चस्व प्रस्थापित केलं तशा घटनेला आपण आमंत्रण देतो आहोत? धोंडूवरील प्रयोग आणि त्याची प्रगती रोमांचक आणि संशोधनासाठी अभूतपूर्व आहे खरी, पण त्याने आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला तर? अखेरीस धोंडूचं काय करावं, याचा निर्णय घेताना संशोधकांची तडफड, द्विधा मनस्थिती अतिशय परिणामकारकतेनं टिपली आहे.  

कथेचा शेवट संदिग्ध ठेवून नारळीकरांनी वाचकांच्या मनात कुतूहल निर्माण केलं आहे. धोंडूचं पुढे काय झालं, हे थेट सांगितलं जात नाही. तर अर्सा मेजर तारासमूहाकडे सोडलेल्या संदेशानं एलियन कुठून आला, याची एक शक्यता पुढे येते, आणि ती बर्‍यापैकी विश्वासार्ह आहे. डॉ. नारळीकरांच्या कथांमध्ये तर्कसंगती सहसा चुकत नसल्याने अर्सा मेजरकडून एलियन्स येऊ शकतात यावर निश्चितच विश्वास बसतो.

मी ‘धोंडू’ पहिल्यांदा वाचली, तेव्हा मला तरी तिथं जीवसृष्टी असू शकते असं खात्रीनं वाटलं होतं, इतकी ही कथा प्रभावी झाली आहे. पुढे अधिक माहिती मिळाली, अनेक तर्क आणि तथाकथित एलियन थिअरीज वाचल्या. इतर काही विज्ञान चित्रपट, कथा-कादंबर्‍यांमध्येदेखील अर्सा मेजरचा उल्लेख मिळाला. त्यामुळे आजदेखील ही कथा वाचताना शक्य कोटीतली वाटते. पृथ्वीपलीकडील अज्ञात जीवसृष्टी आणि आपल्या भविष्याबद्दल विचार करायला प्रवृत्त करते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘धोंडू’ ही ‘हार्ड सायन्स फिक्शन’ प्रकारची कथा आहे. अशा कथांमध्ये भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, अशा ठोस, सुस्पष्ट  विज्ञानावर आधारित संकल्पनांचं प्रक्षेपण असतं आणि त्याचं तपशीलवार वर्णन असतं. ‘धोंडू’मध्येही मेंदूतील विद्युतलहरी, गणित शिकवण्याच्या पायर्‍या विस्तारानं आलेल्या आहेत. सोबत आकृत्याही आहेत. हार्ड विज्ञानकथांमध्ये साधारणपणे पात्ररेखाटन प्रातिनिधिक असतं, विज्ञान संकल्पना समजावून सांगण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी म्हणून पात्रांची रचना असते.

या कथेतही भडकमकर, गुप्ता यांचं पात्ररेखाटन प्राथमिक स्वरूपाचं आहे, अर्थात कथेच्या मर्यादित परिघात ते सखोल करणं कठीणही आहे. तुलनेत डॉ. राव ही व्यक्तिरेखा मात्र धोंडूइतकीच सशक्त आहे. धोंडूच्या प्रवासाला समांतर अशी डॉ. राव यांची वाटचाल, धोंडूच्या गुणधर्माची त्यांना एक एक करून होणारी जाणीव, सोबत त्यांचं विचारविश्व विस्तारत जाणं हे सहजतेने रंगवलेलं आहे. शेवटी डॉ. राव यांची हताश स्थितीही उत्तमरित्या प्रकट होते.

वैज्ञानिक आणि प्रशासकीय यंत्रणांमधला तणाव हा डॉ. नारळीकरांच्या कथांमध्ये वेळोवेळी जाणवतो. सरकारी संस्था किंवा शासकीय अनुदानावर चालणाऱ्या वैज्ञानिक संस्थांमध्ये या बाबतीत काही तडजोड अपरिहार्य असते. त्यामुळे वैज्ञानिक स्वातंत्र्याच्या सीमाही स्पष्ट होतात. ‘धोंडू’मध्ये हा संदर्भ वास्तवदर्शी प्रकारे येतो. त्यामुळे संशोधनातल्या अडचणींचा एक वेगळा पैलू समोर येतो.

आजच्या घडीला आपण एआय, जनरेटिव टेक्नॉलॉजी, बायोटेक अशा विज्ञानाच्या नव्या वाटा धुंडाळत आहोत. त्यामुळे आज ‘धोंडू’ वाचताना वाटतं की, कथेतील दुविधा केवळ एलियनपुरती नाही. ती एका प्रकारे कोणत्याही नव्यानं उदयास येणार्‍या तंत्रज्ञानाचा उपयोग, दुरुपयोग आणि विवेकपूर्ण नियंत्रण याचं रूपक आहे.

आपण तंत्रज्ञानाला शिरजोर व्हायला वाव देतो आहोत का? त्याविषयक जागतिक पातळीवर निर्णय घेताना संयमी, विचारी शास्त्रज्ञ सहभागी होतात का? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, त्यात मानवजात किंवा पृथ्वीच्या भवितव्याची चिंता असते का? या दृष्टीनं ‘धोंडू’ ही कथा आजही तितकीच ताजी वाटते, कालातीत ठरते.

(‘धोंडू’ ही कथा ‘यक्षांची देणगी’ या मौज प्रकाशन गृहाने १९७९मध्ये प्रकाशित केलेल्या डॉ. नारळीकरांच्या कथासंग्रहात समाविष्ट आहे.)

............................................................................................................................................................

लेखिका मेघश्री दळवी विज्ञानकथालेखक व समीक्षक असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.

meghashri@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......