‘गलिव्हरच्या सफरीं’मध्ये तो ‘लिलिपुट लँड’मध्ये प्रवेश करतो, तेव्हा सगळे छोटे सैनिक त्याला बांधून ठेवतात, हरवतात!
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
जीवन तळेगावकर
  • ‘लिलिपुट लँड’चे मुखपृष्ठ
  • Sun , 28 September 2025
  • ग्रंथनामा दखलपात्र लिलिपुट लँड LILIPUT LAND रमा बिजापूरकर RAMA BIJAPURKAR

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा -  Pay Now

.................................................................................................................................................................

व्यवस्थापनशास्त्राच्या प्रसिद्ध अभ्यासिका आणि लेखिका रमा बिजापूरकर यांचे ‘लिलिपुट लँड’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. रुक्ष विषयावरच्या या पुस्तकाचं नावच किती आकर्षक आहे!

‘भारत ही मोठी बाजारपेठ आहे’, हे सगळ्यांनाच ठाऊक असते, पण या बाजारपेठेचे भलेमोठे आकारमान छोट्या मूल्यांच्या अगणित घाऊक व्यवहारांमुळे अस्तित्वात आहे. या व्यवहारांचे अप्रकट अंतरंग नेमके कसे आहे, हे अजूनही बहुराष्ट्रीय कंपन्यांना नेमके कळलेले नाही, अशी मांडणी हे पुस्तक करते.

भारतीय बाजारपेठेत काय व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत? इथे जिंकण्यासाठी काय करावे लागते? डिजिटलायझेशनमुळे मोठ्या संधी कमी दरात कशा काय उपलब्ध होतील? शिवाय भारतीय उपभोक्ता स्वतःच आपले नियम ठरवतो, आंतरराष्ट्रीय मानके भारतीय बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी प्रयोगशील पद्धतीने वाकवावी लागतात इ. विषयांवर हे पुस्तक प्रकाश टाकते. किंबहुना खोलात जाऊन त्यावर ऊहापोह करते.

बदलत्या भू-राजकीय समीकरणांच्या गदारोळात ज्यांना अर्थशास्त्र कळते, अशा व्यक्ती भारतीय उपभोक्ता बाजारपेठेचे अवाढव्य आकारमान कसे फायद्याचे आहे, या समीकरणाची ‘री’ ओढताना दिसतात, पण प्रत्यक्षात भारतातली परिस्थिती बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी तेवढी आकर्षक आहे का? या विषयासंबंधीदेखील हे पुस्तक सडेतोड मतप्रदर्शन करते. थॉमस हक्सले यांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘अग्ली फॅक्ट्स’ मांडते.

हे पुस्तक वाचायला घेण्याआधी आकडेवारी पचवण्याची आपली क्षमता आहे का, याचा विचार करावा, हे उत्तम. ‘डेटा इन्साइट्स’ म्हणजे केवळ विधाने नव्हेत, त्यामागची आकडेवारी स्पष्ट करून सांगावी लागते, हे लेखिकेचे तात्त्विक प्रमेय ज्यांना मान्य आहे, त्यांनीच या पुस्तकाच्या वाटेला जावे.

लेखिकेच्या मते, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अजूनही भारतात मोठी गुंतवणूक केलेली नाही. त्यांना अजून असे वाटते की, भारताचा जीडीपी हा फुगवटा आहे, कारण त्यात अर्ध्याच्या वर वाटा हा घरगुती उपभोक्त्यांनी केलेल्या खर्चाचा आहे. भारतात उपभोक्त्यांची संख्या फार मोठी आहे, पण त्यामानाने कंपन्यांसाठी उरणारा महसूल (निव्वळ नफा) कमी आहे. त्यामुळे किंमत जास्त ठेवता येत नाही. त्यामुळे जर ‘स्केल’ नसेल, तर अधिक निव्वळ नफा होणार नाही. एकूण महसुलाचे आकारमान भारतात मोठे दिसते, पण निव्वळ नफा मोठा असत नाही. जेवढा तो मिळतो आहे तेवढा कायम राखण्यासाठी करावी लागणारी कसरत कंपन्यांना थकवते.

म्हणून लेखिका म्हणते, ‘स्मॉल इज ड्राइव्हिंग बिग इन इंडिया’. गंमत म्हणजे हे जे ‘छोटे उपभोक्ता’ आहेत, त्यांच्या खर्चाच्या पद्धतीतही सातत्य व समानता नाही. किंमत कमी ठेवूनही उपभोक्ता बाजारपेठ निव्वळ नफ्यानिशी वाढवण्याची किमया काही भारतीय उद्योगांनी मात्र साधली आहे. त्यांनी ‘पुरवठा खर्च’ आणि ‘प्रक्रियां’वर नियंत्रण मिळवले आहे. आज भारतात ‘डिजिटल’ आणि ‘फिजिकल’ दोन्ही मॉडेल्स ‘रिटेल’ क्षेत्रात चालू आहेत. त्याला लेखिका ‘फिजिटल’ म्हणते. यामुळे मोठ्या फॉरमॅट्सची रिटेल शो-रूम्स आल्यावर छोटे व्यवसाय बंद होतील, या भीतीला पायबंद बसला आहे.

आघात पचवण्याची आणि बदल अंगीकारायची भारतीय ग्राहकाची शक्ती जगात सहजपणे इतरत्र प्रत्ययाला येत नाही. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा गोंधळ उडतो आणि ते ‘अजून भारतीय ग्राहक तयार नाहीत’ किंवा ‘भारतीय बाजारपेठ तयार नाही’, अशा आशयाचे समर्थन करतात. मात्र भारतीयांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, आता काही नव्याने वा कुणासाठी तयार व्हायचे राहिले नाही, आपण आपला मार्ग निवडला आहे, कोणी भारतीय ग्राहकाला बदलू शकणार नाही. त्याला ‘व्हॅल्यू फॉर मनी’ व्यवस्थित कळते. ‘भारतीय ग्राहकाचे स्वतःचे तर्कशास्त्र आहे, ते समजण्यासाठी भारतीय ग्राहकाला मुळात समजून घेणे आवश्यक ठरते’, असे सी. के. प्रल्हाद यांचे मत लेखिका समर्थनार्थ देतात.

भारतीय ग्राहकाला न्याय्य किमतीत विमान प्रवास घडवला, आवश्यक तेवढी पण तत्पर सेवा दिली की, व्यवसायाचे आकारमान अवाढव्य वाढते, हे ‘इंडिगो’ने दाखवून दिले. ‘नायका’ने प्रत्येक ग्राहकाला सन्मान, उत्तम सेवा हवे तिथे उपलब्ध करून दिली आणि सौंदर्य प्रसाधनांचे मार्केट वाढवले. ‘आम्ही बनवू आणि मार्केटमध्ये ओतू, मग तुम्हाला घ्यावेच लागेल, पुरवठा मागणी निर्माण करेल’, हा आगंतुक भाव ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी दाखवला त्यांना त्यांचे औद्धत्य भोवले!

मोठ्या भारतीय कंपन्यांमध्ये ‘मास मार्केट बिझनेस’ला टार्गेट करणाऱ्या कंपन्या बोटावर मोजण्याएवढ्या आहेत. त्यांनी ‘देअर इज फॉर्च्युन एट द बॉटम ऑफ द पिरॅमिड’ हे दाखवून दिले. उदा. जिओ टेलिकॉम, आयटीसी, एचयूएल इ. त्यांनी ग्रामीण भागातील ग्राहकाला सेवा वा वस्तू पुरवल्या आहेत. 

जर आपण ग्रामीण भारताला विसरलो, तर जवजवळ अर्ध्या उपभोक्त्यांना आपण दूर केल्यासारखे होईल. आज ४०-५० कोटी मध्यमवर्गाचे आकारमान सांगितले जाते, पण ते खऱ्या अर्थाने याच्या निम्मेच आहे. हा खरा आकडा कसा वाढवायचा यावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. त्यातून नवी गुंतवणूक होईल, तो कायमस्वरूपी असेल. खऱ्या मध्यमवर्गाकडे खर्च वजा जाता पुरेसा पैसा शिल्लक उरणे अपेक्षित आहे. छोटेमोठे धक्के त्यांना पचवता आले पाहिजेत. त्यांच्या खर्चावर त्या धक्क्यांचा परिणाम होता नये, पण हे जागतिक तथ्य भारतात खरे ठरत नाही. याचा अर्थ खऱ्या अर्थाने भारतातला मध्यमवर्ग अजूनही आर्थिकदृष्ट्या बळकट नाही.   

‘सकल घरगुती कर्ज’ हे ‘जीडीपी’च्या किती टक्के आहे, यावरूनदेखील मध्यमवर्ग किती सशक्त आहे, ते ठरवता येते. भारतात हे गुणोत्तर फारच कमी आहे. खरं तर भारतात मध्यमवर्गात चार-पाच कोटी घरेच मोडतील, मात्र ही आकडेवारी शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध नाही.

दानी रॉड्रिक या हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञाच्या मतानुसार ‘उत्पादन क्षेत्र’ अर्थव्यवस्थेचा कणा असते, पण भारतात ते सबळ नाही हे आपण जाणतो. याऐवजी भारताने आयटी आणि तंत्रज्ञान 'सेवा क्षेत्रावर भर दिला, पण ‘नॅस्कॉम’च्या अहवालानुसार या क्षेत्राने केवळ साडेचार कोटी लोकांना रोजगार दिला आहे. त्यात मिळकतीच्या दृष्टीने ‘कॉल सेंटर’सारख्या पायदानाच्या खालच्या भागी असलेल्या क्षेत्राला सामावून घेतले, तरी ही एकूण आकडेवारी अपेक्षाभंगच करणारी, आणि भारतात मध्यमवर्ग सबळ नाही, हे दर्शवणारी आहे.

विकसित जगाच्या दृष्टीने भारतातील १० टक्के श्रीमंत परिवारांचे उत्पन्न हे गरिबांचे उत्पन्न आहे. ते अमेरिकेच्या दारिद्र्यरेषेच्या आसपास आहे. तेव्हा आपण उपभोक्त्यांच्या आकडेवारीवरून अर्थव्यवस्थेच्या भल्या मोठ्या आकारमानाविषयी डिंग्या हाकणे वेगळे आणि त्यातील मूल्य सिद्ध करून दाखवणे वेगळे.   

भारतात ग्राहकांचे वर्तन कसे बदलत आहे, यावर अ‍ॅडमॅन संतोष देसाईंचं मत लेखिकेने दिले आहे, “आता समरसून जगण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. ‘ठेविले अनंते...’पेक्षा मला जे हवे ते मिळवण्यासाठी काय करावे लागेल, या विचारांनी ते प्रेरित होत आहेत. त्यांना जगण्याचा अनुभव घ्यायचा आहे.”

एखाद्या सिनेमातून हिरो-हिरोईनच्या प्रसिद्धीस पावलेल्या ड्रेसेसच्या स्वस्त कॉपीज आपल्याला बाजारात का दिसतात? कर्ज घेऊन मोठी कार घेण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. ‘महत्त्वाकांक्षी भारत’ (‘अ‍ॅस्पिरेशनल इंडिया’) जन्म घेतो आहे. त्याला हवे ते योग्य दर्जाचे, योग्य किमतीत (फार महाग नाही) जे देऊ शकतात, तेच इथे टिकतात, टिकतील.

“विकसित राष्ट्र म्हणजे तो देश नव्हे जिथे गरीब लोकांकडे स्वतःची कार असेल, तर तो देश जिथे श्रीमंत देखील दर्जेदार सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्यात धन्यता मानतील”, आपला भविष्यातला भारत आपल्याला शोधायचा आहे, घडवायचा आहे. सध्या आपले प्रयत्न पहिल्या दिशेने सुरू आहेत. सर्वसमावेशकतेची जाणीव आपल्याला केवळ संकटकाळात होते - उदा. ‘करोना’ काळ - ती सर्वकाळ आपला स्थायी भाव व्हायला हवी. या पुस्तकात मध्येच एखादा असा व्यंग्यात्मक उल्लेख पण उमटतो. 

इतक्या वर्षांच्या परिश्रमानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारत ही ‘हटके’ बाजारपेठ आहे, याची जाणीव झाली आहे. त्यांना भारतासाठी नवीन व्यूहरचना बनवाव्या लागतात. त्यांना काही जण ‘इमर्जिंग मार्केट मॉडेल्स’ म्हणतात. १९९१-२०२३ या काळातील काही परदेशी कंपन्यांना भारतात किती संघर्ष करावा लागला, याची उदाहरणे लेखिकेने दिली आहेत. उदा., कॅन एनर्जी, होलसिम, फोर्ड, मेट्रो एजी, पॅनासॉनिक, फियाट, इलेक्ट्रोलक्स इत्यादी. त्याचबरोबर ज्यांनी स्वतःला बदलले त्यांच्या यशस्वीगाथा पण लेखिकेने उलगडल्या आहेत उदा. ह्युंदाई, एलजी, सुझुकी, नेस्ले, फिलिप्स, पेप्सी, कोलगेट, हनीवेल, सिमेन्स, कोकाकोला इ.

शेवटची दोन प्रकरणं सोदाहरण उलगडून दाखवली असती, तर पुस्तक अधिक वाचनीय झाले असते, असे मानायला जागा आहे, कारण पहिली पाच प्रकरणं सिद्धान्ताधारित आहेत, शेवटची दोन प्रकरणं म्हणजे प्रत्यक्ष ‘केस स्टडीज’ आहेत. त्या थोड्या सविस्तर यायला हव्या होत्या. यात केवळ कंपन्यांची नावं आणि एखाद्या यशस्वी व्यूहरचनेची झलक डोकावून जाते.

केवळ आपली जागतिक मार्केटमधली जुनी वस्तू वा सेवा विकण्याची नवी बाजारपेठ, या संकुचित दृष्टिकोनातून ज्यांनी भारतात आगमन केले, त्यांना या मार्केटने रडवले आहे. भारतात यशस्वी होण्यासाठी ‘मास मार्केट’ टार्गेट करणं आवश्यक आहे, म्हणजे ‘फुल स्केल ऑपरेशन’ हवे, ‘फ्रुगल इनोवेशन’ हवे आणि ‘डिजिटल मॉडेल्स’ हवीत. लेखिका अध्येमध्ये एखादा चिमटाही काढते. उदा., ‘भारतात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा निश्चित उत्तम आहे.’

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

भारतात ‘हॅव’ आणि ‘हॅव-नॉट’मधली दरी मोठी आहे. गीर्ट हॉफस्टेड या डच सामाजिक मानसशास्त्रज्ञाच्या शब्दांत लेखिका याचा उल्लेख ‘हाय पॉवर डिस्टन्स’ असा करते. म्हणजे भारतात बहुसंख्य लोकांना जाणीव आहे की, शक्तीच्या विभागणीत असमानता आहे, तरी ही दरी कमी करणाऱ्या सरकारच्या काही योजना आता फलद्रुप होताना दिसत आहेत. उदा. एलपीजी, मायक्रो इंश्युरन्स, आयुष्यमान भारत, जन-धन बँक अकाउंट, डिजिटल पेमेंट्स इत्यादीमुळे सामान्यांमध्ये आपल्याला मुख्य धारेत सामावून घेतले जात आहे, ही जाणीव प्रबळ होत चालली आहे, त्यांचे स्वतःचे अस्तित्व त्यांना दृगोचर होत आहे.

शिवाय भारतीय पंतप्रधानांच्या प्रत्येक जागतिक मंचावरून घेण्यात येणाऱ्या स्वावलंबन, आत्मनिर्भरता इत्यादी भूमिकेमुळे भारतीयांमध्ये ‘आपण भारतीय आहोत’, ही जाणीव आणि अभिमान दृढमूल होत चालला आहे. नेतेच इंग्रजीत बोलत नसल्यामुळे ‘आपल्याला इंग्रजी येत नाही’, म्हणून कित्येक वर्षं असलेला न्यूनगंड वितळत चालला आहे, परिणामी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर आता इंग्रजीला कमी भाव असून रिजनल कंटेंटला अधिक भाव आला आहे. ‘बॉम्बे कॅन्टीन’च्या समीर सेठ यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘वेस्टर्न क्युसीन’मध्ये देखील भारतीय इनोव्हेशन डोकावत चालले आहे. उदा. ‘१०० टक्के जेन्युईन बेल्जीयन वॉफल-एगलेस’ इ. ‘भारतीय समाज आपले रूप सर्वस्वी सोडत नाही, तो ते बदलतो’, हे मार्केटर्सना समजणे आवश्यक आहे.

जगातल्या सगळ्याच मोठ्या अर्थव्यवस्था या जगातल्या श्रीमंत अर्थव्यवस्था असतीलच असे नाही. जगात चवथ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत हेच घडत आहे. जॉनाथन स्विफ्ट यांच्या ‘गलिव्हरच्या सफरीं’मध्ये तो ‘लिलिपुट लँड’मध्ये (छोट्यांच्या नगरीत) प्रवेश करतो, तेव्हा सगळे छोटे सैनिक त्याला बांधून ठेवतात, हरवतात. नेमके हेच रूपक भारतीय उपभोक्त्यांना लागू होते. याचे वेगवेगळ्या अंगाने विवेचन करणारे हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

.................................................................................................................................................................

LILIPUT LAND : How Small is Driving India’s Mega Consumption Story – RAMA BIJAPURKAR

Edition : March 2024 | Pages : 304 | MRP : ₹699

.................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......