‘आऱ्या’ हे आत्मकथन मुंबई शहराच्या संक्रमणावस्थेचेदेखील कथन आहे… आर्थिक इतिहासात, स्वातंत्र्यानंतर झालेल्या औद्योगिकीकरणाच्या कालखंडाचे कथन आहे...
ग्रंथनामा - झलक
संजीव चांदोरकर
  • ‘आऱ्या’चे मुखपृष्ठ
  • Sun , 07 September 2025
  • ग्रंथनामा झलक आऱ्या Aarya गिरणगाव Girangaon शांताराम पंदेरे Shantaram Pandere

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे यांनी ‘आऱ्या’मध्ये मुंबईतील १९६० ते २०१० या काळातील गिरणगाव, कामगार चाळी आणि कामगारजीवन यांचे कथन केले आहे. या आत्मकथनातून त्यांच्या विलक्षण आत्मकथनाला अभ्यासक प्रा. संजीव चांदोरकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

शांताराम पंदेरे जगन्मित्र आहेत. महाराष्ट्रातील त्यांच्या शेकडो मित्रांप्रमाणेच मीदेखील त्यांचा कॉलेजच्या दिवसांपासूनचा मित्र, चळवळीतील कॉम्रेड राहिलो आहे. ‘आऱ्या’ शांताराम यांच्या कोकणातील गावातून मुंबईत आल्यापासून ‘सातवी’पर्यंतची शाळा, चाळीतील २५ वर्षांतील वास्तव्य आणि प्रत्यक्ष ५० वर्षांतील अनुभव या कालखंडातील त्यांच्या स्वतःच्या आठवणींचा एक ‘ओला’ आणि ‘श्रीमंत’ पट आहे.

शांताराम यांचे मुंबईतील दादर भागातील कोहिनूर मिल चाळीतील घर, त्यांनी उल्लेख केलेली त्या भागातील जवळपास सर्व ठिकाणे आम्ही त्या काळात पालथी घातलेली आहेत. शांताराम यांनी उल्लेख केलेल्या अनेक मित्रांपैकी बरेच जण माझेदेखील त्या काळात मित्र होते. साहजिकच ‘आऱ्या’ वाचताना मीदेखील त्या काळातील आठवणींच्या छोट्या-मोठ्या गल्ल्यांतून फिरत गेलो. वाचताना नॉस्टॅल्जिक झालो. त्यातील पानापानातील ओलाव्याने ओथंबूनदेखील गेलो.

शांताराम यांचे हे आत्मकथन मी दोन वेळा वाचले. पहिल्यांदा, अर्थातच, शांताराम यांचा जवळचा मित्र म्हणून. दुसऱ्यांदा वाचले ते मात्र स्वतःला पूर्णपणे ‘सुकवून’ घेऊन. एक तटस्थ सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थेचा निरीक्षक/ अभ्यासक म्हणून. मी आता जे काही लिहीत आहे, ते या दुसऱ्या भूमिकेतून.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मी स्वतः जन्मापासून मुंबईकर. कॉलेजच्या दिवसांपासून मुंबई शहरातील स्थित्यंतरे पाहत/ अनुभवत आलो आहे. त्यामुळे ‘आऱ्या’मधील, कपड्याच्या आत लावलेल्या, सहजपणे दृष्टीस न पडणाऱ्या अस्तरासारख्या, त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थित्यंतरांचा पुनर्प्रत्यय येत गेला. मनातील बंद झालेल्या जुन्या खिडक्या पुन्हा किलकिल्या झाल्या.

ग्रामीण/ शहरी अनेक प्रौढ स्त्री-पुरुष आपल्या आयुष्यातील असंख्य किंवा मोजक्या आठवणी, तुकड्यातुकड्यांत किंवा एकसंध सांगतात किंवा लिहितात. अलीकडच्या काळात तर, काही दोष नसताना ज्यांना शेकडो वर्षे साधी अक्षरओळख इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारली होती, अशा समाजघटकांतील तरुण-तरुणी, प्रौढ स्त्री-पुरुष स्वत:च्या आयुष्याबद्दल, आत्मकथनच नाही तर विविध प्रकारांतून व्यक्त होऊ लागले आहेत. ही एक प्रकारची ‘ग्रासरूट नॅनो साहित्यिक, सांस्कृतिक क्रांती’ सुरू आहे. त्याचे स्वागत करत पुढे जाऊ या.

एका बाजूला लेखक त्यांच्या आठवणीतून त्यांच्या जीवनात घडलेले प्रसंग/ घटना, त्यातून त्यांच्या मनात उठलेले भावनातरंग, विचारशृंखला वाचकांशी शेअर करत असतात. तर त्याच वेळी ते प्रसंग/घटना ज्या काळात घडलेल्या असतात, त्या काळातील कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रक्रियांनादेखील स्पर्श करत असतात. कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष, कधी जाणीवपूर्वक कधी अजाणतेपणी. लेखकाच्या स्वतःच्या जीवनाच्या पलीकडे जाणारी ती व्यापक फ्रेम प्रत्येक आत्मकथनाला नेहमीच असते. व्यक्तीचे आत्मकथन आणि ती फ्रेम कधीच वेगळे काढता येणारे नसतात. या फ्रेमचे वैशिष्ट्य हे की, ती व्यक्तिनिरपेक्ष असते. आत्मकथन करणाऱ्यापुरती मर्यादित नसते. त्या काळातील अगणित व्यक्ती/ कुटुंबांना आपल्यात सामावून घेत असते.

‘आऱ्या’ला अस्तराप्रमाणे अलगद चिकटलेली, त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय फ्रेम वाचकांसमोर ठेवण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे. या फ्रेममुळे ‘आऱ्या’ आत्मकथन फक्त शांताराम या केंद्रीय पात्राची गोष्ट न राहता, त्या ‘काळा’ची गोष्ट आहे, हे वाचकांना कळेल. तो काळ अनेक अर्थांनी ‘ब्रेक-आउट’ काळ होता.

* * *

दरवर्षी घरात जुने कॅलेंडर काढून नवीन लावताना, नवीन वर्षाचा आकडा डोळ्यासमोर येतो. हा नवीन वर्षाचा आकडा नेहमीच पुढचा आकडा असतो. प्रत्येक वेळी पुढचाच. मागचा कधीच नाही. त्यातून असे भासते की, काळ एका सरळ रेषेत पुढे पुढे सरकत आहे, पण तसे ते नसते. त्याच कालपट्टीवर एखादा दोन-चार, पाच-दहा वर्षांचा कालखंड येतो. जो सरळ रेषेत संथपणे वाहणाऱ्या त्या कालपट्टीला ‘आचके’ देतो. कालपट्टी वेडीवाकडी करून टाकतो. त्या काळात जगणाऱ्यांच्या जीवनाचे आधीचे सारे संदर्भ बदलून टाकतो. जे घडते ते अनेक व्यक्तींच्या, अनेक कुटुंबांच्या आयुष्यात प्रथमच घडत असते.

एका रेषेत सरळ चालतानादेखील पृथ्वीच्या अक्षांश-रेखांशावरील आपले स्थान बदलत असतेच, पण कितीही म्हटले तरी आपण समतल वाट पकडूनच चालत असतो. कालपट्टीला ‘आचके’ देणारे बदल पायाखालच्या वाटेलाच भलत्याच, नवीन समतलावर फेकून देतात. पावलांखालील मळलेली वाट निसटू पाहत असते, तर नवीन वाट धूसर दिसत असते. एक अवस्था कालबाह्य होण्याची आणि त्याच्याच पोटात दुसरी अवस्था विकसित होण्याची ती संक्रमणावस्था असते.

‘आऱ्या’ आत्मकथन अशाच एका संक्रमणावस्थेचेदेखील कथन आहे. मुंबई शहराच्या आर्थिक इतिहासात, स्वातंत्र्यानंतर झालेल्या औद्योगिकीकरणाच्या कालखंडाचे कथन. मुंबई तर भारतीय औद्योगिकीकरणाची ‘कटिंग एज’ होती. अर्थातच हा भारताच्या आर्थिक इतिहासाचादेखील एक अविभाज्य ‘काळ-तुकडा’ आहे.

***

‘आऱ्या’चा गुंता या संक्रमणावस्थेतील बदलांच्या पार्श्वभूमीवर चांगला समजून घेता येईल असे वाटते. खाली अशा बदलांची छोटी यादी केली आहे. यात लक्षात घ्यायचा भाग हा की, लिहिण्या-समजण्यासाठी या बदलांना सुटे सुटे वागवले असले, तरी प्रत्यक्षात या साऱ्या बदलांचे पेड परस्परांत गुंफलेले होते. इतके की, ते वेगळे काढता येणार नाहीत.

शेतीप्रधान देश औद्योगिकीकरणाकडे वाटचाल करू लागला होता; खेडेगावातून महानगरात कुटुंबासह स्थलांतरण केले जात होते; शेतकरी-शेतमजुरांचे कौशल्य आत्मसात केलेले प्रौढ स्त्री-पुरुष औद्योगिक कामगार बनू लागले होते; बैल-जोडी आणि शेतीची अवजारे हाताळणारे हात विजेवर चालणारी महाकाय मशिन्स चालवायला शिकत होते; नवीन औद्योगिक भांडवली मूल्ये रुजत होती; मिलमधून शिफ्ट करून परत येताना, मिलचा एक छोटा मळका कपडा खिशातून चुकून घरी आल्यावर कामगार अस्वस्थ होऊन जेवण टाकून, तो कपडा मिलमध्ये जमा करायला जात असत.

काळ, काम, वेग आणि वेतन यांची औद्योगिक भांडवलाने घातलेली सांगड; वेतन प्रत्येक दिवसाप्रमाणे, दिवसाला कामाचे तास ठरलेले, वेतनाची सांगड उत्पादकतेशी, कामाच्या गुणवत्तेशी घातलेली, त्यासाठी लागणारी कौशल्ये शिकणे, मोठ्या संघात उतरंडीप्रमाणे काम करणे, खालच्या स्तरावर चांगले काम केल्यानंतर त्याच व्यक्तीला सुपरवायझर म्हणून बढती मिळणे, ही ‘कार्यसंस्कृती’ (वर्क कल्चर) रुजवली जात होती; बदली कामगार, म्हणजे फक्त काम असेल आणि बोलावणे आले तरच कामावर जायची कामगारांची - जे सध्याच्या ‘गिग वर्कर्स’चे पूर्वज म्हणता येतील - नवीन कॅटेगरी जन्माला घातली जात होती; उत्पादक-सेवा क्षेत्रातील कामगार वर्गात न सामावून घेतलेल्या तरुणांचा ‘लुम्पेन वर्ग’ तयार झाला होता, जो महानगरातील भाईलोक, त्यांच्या गँग्ज आणि ‘राडा-संस्कृती’ला जन्माला घालत होता; हाताला काम मिळेल की नाही किंवा शेतातून या हंगामात नक्की किती उत्पन्न मिळेल या अनिश्चिततेतून, दर महिन्याला ठराविक तारखेला ठरलेली रक्कम मिळणार आहे, या निश्चिततेपर्यंत कुटुंबाचा आर्थिक प्रवास सुरू झाला होता; पैसे कमी पडत असल्यामुळे कुटुंबातील लहान मुलांना, शाळा शिकतानाच रस्त्यावर गजरे, चिक्की विकायला लागत होती, आयांना कोणतीही लाज न बाळगता वरातीत डोक्यावर बत्ती घेऊन चालावे लागत होते, वडिलांना शिफ्ट संपल्यावर कापड विकण्याचा छोटासा जोडधंदा करावा लागत होता.

ग्रामीण भागातील प्रामुख्याने जातनिहाय वस्त्यांमधून आलेले आता बहुजातीय, बहुधार्मिक कामगार वर्गीय वस्त्यांमध्ये कौटुंबिक आयुष्य जगू लागले होते; एक प्रकारच्या बंदिस्त एकसाची सांस्कृतिक अवकाशातून आलेले स्त्री-पुरुष, मुले अधिक बहुभाषिक, बहुसांस्कृतिक अवकाशात स्थिरावू लागले होते.

गावात मोकळ्या जागांचा तुलनेने तुटवडा नसतो; सार्वजनिक जागांचा प्रचंड तुटवडा असणाऱ्या महानगरात स्त्री-पुरुष मार्ग काढत होते; चाळीतील बैठकीच्या खोल्या, माळ्यावरच्या स्त्री-पुरुषांच्या सामुदायिक बैठका आणि जवळच्या सार्वजनिक बागांमध्ये गाववाल्यांच्या बैठका होत असत. जातीच्या उभ्या उतरंडीतील आत्मभानातून ‘अरे, आपली सुखदुःखे, प्रश्न, मागण्या एकच आहेत’ अशी जाणीव करून देणाऱ्या ‘आडव्या’ वर्गीय भानाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला होता; जातपंचायतीच्या सभासदत्वापासून ते आता सेक्युलर ट्रेड युनियनचे सभासद होऊ लागले होते; समाजवादी, साम्यवादी विचारधारेने भारलेले तरुण कामगारांना ट्रेड युनियनमध्ये संघटित करू लागले होते. या कामगारांची आधुनिक राजकीय विचारधारांशी ओळख होऊ लागली होती. नवरा मेल्यावर त्याच्याजागी गिरणीत काम मिळण्याचा हक्क आणि असे अनेक हक्क कामगारांना, मिलमालक कनवाळू होते म्हणून नाही तर आपण संघटित आहोत म्हणूनच मिळत आहेत, याची जाणीव रुजू लागली होती.

अडीनडीला लागणारे पैसे कर्जाऊ घेण्यासाठी फक्त शोषक खाजगी सावकारच उपलब्ध असण्यापासून व्याजदर आणि परतफेडीच्या पारदर्शी नियमांवर आधारित सहकारी पतपेढीकडून कर्ज घेतले जात होते; त्याच्या जोडीला नवीन स्वरूपातील खाजगी सावकारी उदयाला येत होती; जॉबर, मुकादम जे स्वत:देखील कामगार होते, दुसऱ्या कामगारांना पैसे कर्जाऊ देत होते. त्याच वेळी समांतर पद्धतीने कर्जाकडे बघण्याचे नवीन ‘वित्तीय’ मूल्य रुजत होते- ‘जेवढी गरज तेवढेच कर्ज घ्यावे, कोणी देऊ करत आहे म्हणून कर्ज काढू नये, ज्या हेतूसाठी कर्ज काढले त्याच हेतूसाठी वापरावे, हप्ता चुकवायचा नाही.’

मातीचे किंवा अर्धे कच्चे रस्ते, बैलगाडी, लाल डब्याच्या एसटी बसमधून प्रवास करणारे आता ट्राम, रेल्वे, डांबरी रस्ते, बसेस अशा आधुनिक नागरी पायाभूत सुविधांचे वापरकर्ते बनू लागले होते; खेडेगावातील स्वतःच्या कौलारू, नाहीतर गवताने शाकारलेल्या बैठ्या घरांमधून दोन-तीन मजली जिना असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या इमारतीत कुटुंबे राहू लागली होती; घरात तेल, नाहीतर घासलेट जाळून उजेड करणारे आता आपल्या घरात एक विजेचे बटण दाबून उजेड करू लागले होते. नदीवरून, विहिरीतून पाणी शेंदणाऱ्या बायका पाइपमधून येणाऱ्या सामुदायिक नळातून पाणी भरू लागल्या होत्या, कोणी ‘लवकर आटप’ असे म्हणण्याची शक्यता नसणाऱ्या, उघड्यावर, शेतात परसाकडे जाणारे, फ्लश ओढून मैला वाहून नेणाऱ्या, सामाईक संडासाच्या बंद दरवाजामागे, बाहेर माणसे आपण शौचविधी उरकण्याची वाट बघत उभी आहेत याची जाण ठेवत, नैसर्गिक विधी करायला लागले होते.

मुले शेतकामासाठी किंवा मजुरीसाठी हाताशी येईपर्यंत, खेडेगावातील एक शिक्षकी सरकारी शाळा मुलांना नक्की काय शिकवतात हे माहीत नसणारे पालक, आता आपल्या पोटच्या मुलांना कसेही करून मॅट्रिक करून कॉलेजमध्ये पाठवायचे, ही स्वप्ने उराशी बाळगून, नव्या ऊर्जेसह जगू लागले होते.

आपण म्हणत आहोत ती आत्मकथनाची फ्रेम ती ही. ही तर सर्वांत आतली फ्रेम झाली. ही आतली फ्रेमदेखील अजून मोठ्या फ्रेममध्ये बसवलेली असते. ‘आऱ्या’च्या ताबडतोबीच्या फ्रेमच्या बाहेरदेखील फ्रेम होत्या. उदा. ‘आऱ्या’तील आत्मकथन ज्या काळात घडले, त्याआधीच्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजव्यवस्थारूपी महाकाय भांड्याचा अनेक शतके घट्ट बसलेला तळ ढवळून काढला होता. इतका की, कोकणातील दरीत वसलेल्या ‘सालपे’ गावातील पंदेरे आणि पंचक्रोशीतील अनेक कुटुंबांची मुळे हलवली गेली.

‘पारंपरिक गावकीची कामे सोडा, गाव सोडा आणि शहरांकडे जा,’ हा डॉ. आंबेडकरांचा वंचित समाजघटकांना संदेश होता. शांतारामच्या वडिलांच्या, दिवंगत श्री. बुधाजी पंदेरे यांच्या वर्गातील महार दोस्त बुधाजींना म्हणाले, ‘बुधाजी, मुंबईला चल. काहीतरी काम मिळेल.’ केवळ त्यामुळेच शांतारामचे बाबा आणि त्यांचे नातेवाईक मिळून या दोस्तांसोबत मुंबईत आले. (पान क्रमांक २९)

* * *

औद्योगिक भांडवलशाहीचे ‘कामगारकेंद्री’ विश्लेषण करणारे वैचारिक साहित्य हा एक पाय झाला. त्यात अपरिहार्यपणे एक अमूर्त मांडणी असते. या विषयाला कवेत घेणारा ‘मनुष्यकेंद्री’ लिखाणाचा आत्मचरित्रात्मक दुसरा पायदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. माणसे जित्याजागत्या माणसांच्या ‘स्टोरीज’शी अधिक ‘रिलेट’ होतात.

‘आऱ्या’मध्ये एक वाढत्या वयातील मुलगा, जो स्वतः कामगार नाहीये, जो बुद्धिमान आणि संवेदनशील आहे, ज्याला वाचनाची गोडी लागत आहे, ज्याला आधुनिक पुरोगामी विचारांचे पाणी लागत आहे, तो कामगार-कष्टकऱ्यांच्या, स्वत:च्या कुटुंबीयांच्या त्या काळातील जीवनाबद्दल, भवतालाबद्दल निरीक्षणे नोंदवत आहे. त्यामुळे या आत्मकथनाचे मोल वेगळे आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

आज पायाभूत सुविधांचा झगमगाट वाढलेला असला, माणसांचे आयुष्य ‘डिजिटल’ झाले असले, तरी ‘आऱ्या’च्या कालखंडातील मानवी आयुष्याचे गाभ्यातील प्रश्न अधिक बिकट आणि अधिक गुंतागुंतीचे बनले आहेत. एवढेच नाही, तर ‘सिस्टीम’ माणसांना जात्यात घालून घालून त्यांचे सर्वार्थाने ‘पीठ’ करत आहे. खरे तर पिठातील लहानातील लहान कण. अशा काळात ‘आऱ्या’मध्ये वर्णन केलेली माणसे कशी सामुदायिकपणे जगत, स्वत:तील भावनिक ओलावा जपत होती, याची माहिती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. अकॅडमिक-साहित्यिक हेतूने नाही. त्यातून जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळू शकते म्हणून.

कसे जगायचे यासाठी काही सूत्रे हातात येऊ शकतात म्हणून ‘आऱ्या’चा गुंता फक्त मागावरचा नाही. तो कामगार-कष्टकऱ्यांच्या आयुष्यातील गुंता आहे. आपण कितीही मन लावून, डोळ्यात तेल घालून आपल्या-आपल्या कुटुंबाच्या आयुष्याचे कापड विणायचा प्रयत्न केला, तरी क्लिष्ट प्रश्नांचा गुंता होतोच. तो सोडवायचा म्हटला तर टोक मिळता मिळत नाही. जीव घायकुतीला येतो. चाकू-कात्रीने जबरदस्ती नाही करता येत, कारण आपल्या आयुष्याचे ‘कापड’ फाटण्याची शक्यता असते. म्हणून मागावर कापड विणताना फक्त उभे आणि आडवे धागे एकमेकांत गुंतून त्याचा ‘आऱ्या’ होतो.

आयुष्याचे कापड विणताना जो ‘आऱ्या’ तयार होतो त्यात, उभे आडवे दोनच नाही तर अगणित धागे एकमेकांत गुंतत जातात. त्यातील अनेक अमूर्त सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रणालीच्या असंख्य स्पिंडल्स / चकत्यांमधून येऊन आपल्या आयुष्याच्या कापडात असंख्य ‘आऱ्यां’चा गुंता करून सोडतात.

‘आऱ्या’च्या कालखंडाच्या दस्तावेजीकरणाला ‘स्टॅण्ड अलोन’ महत्त्व आहेच, पण त्यातून आजच्या काळातील गुंता सोडवण्यासाठी किमान अंशत: दिशादिग्दर्शन होऊ शकेल, असे वाटते.

‘आऱ्या : मुंबई गिरणगाव, कामगार चाळी आणि जीवन आक्रोश अनुभवांचे अर्धशतक – १९६०-२०१०’ – शांताराम जनी\लक्ष्मी बुधाजी पंदेरे, लोकवाङ्मय गृह, मुंबई । पाने – २२० । मूल्य – ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......