‘गुरू : एका योगियाचे तुरीयातीत स्वप्न’ या कादंबरीत छोट्या आणि थोट्या लोकांचे सगळे छोटे आणि बाकीच्यांना थोटं बनवणारे खोटे कारनामे वाचताना आपल्यासह भोवतालच्या समाजाचा आरसा दिसत राहतो
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
नितीन साळुंखे
  • ‘गुरू : एका योगियाचे तुरीयातीत स्वप्न’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Mon , 01 September 2025
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक नीतीन कोत्तापल्ले Nitin Kottapalle गुरू Guroo

एखादी कादंबरी वाचल्यानंतर सर्वप्रथम आपण तिचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतो. प्रेम या विषयाला वाहिलेली, सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय इत्यादी इत्यादी. पण एखाद्या कादंबरीच्या रचनेचा मूळ गाभा वा पाया आध्यात्मिक असेल, त्यातून समाजातल्या उतरंडीबाबत (सामाजिक उतरंडीचे मूळ आर्थिक हितसंबंधांत दडलेले असते) ती काही भाष्य करत असेल, ते करताना सूक्ष्म उपरोधाचे कोरडे ओढत असेल आणि या साऱ्या वास्तवाबाबत एक ‘राजकीय विधान’ही करत असेल, तर अशा कादंबरीचं वर्णन कसं करावं?   

नितीन कोत्तापल्ले यांच्या ‘गुरू : एका योगियाचे तुरीयातीत स्वप्न’ या कादंबरीबाबत मला हा प्रश्न पडलेला आहे. तब्बल ६२० पानांची ही कादंबरी नऊ प्रकरणांतून आकार घेत पुढे सरकत राहते. या प्रकरणांची नावंसुद्धा अतिशय समर्पक आणि अर्थपूर्ण आहेत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे ‘तृष्णा’. त्याला साजेसा मजकूर या जवळपास दोनशे पानांच्या पहिल्या प्रकरणात आलेला आहे. आपल्यासह आपल्या भोवतालच्या मिळून बनलेल्या माणसांच्या समाजात दिसणारी तृष्णा कधीच मिटत, पूर्ण होत नाही; उलट ती पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल तशी वाढत राहते. आणि ती तृष्णा तरी किती प्रकारची आणि कशाकशाची! आर्थिक लाभांची तृष्णा, सामाजिक स्थानाची तृष्णा, राजकीय मतलबाची तृष्णा, अलीकडे नव्यानेच दिसायला लागलेली विकासाची तृष्णा… आणि ती पूर्ण करत असताना दुसऱ्याच्या तोंडाचा घास हिसकावून घ्यावा लागला तरी बेहत्तर किंवा उलट. कादंबरीच्या लयीला जराही धक्का न लावता ती अधोरेखित केली आहे.

कोत्तापल्ले यांची शैली अप्रतिम आहे. ‘तृष्णा’ या पहिल्याच प्रकरणात आपल्या भोवतालाच्या परिस्थितीचं वर्णन अशा प्रकारे केलं आहे की, या कादंबरीच्या नायकाची, रणजीतच्या मनातली हताशा, असहाय घुसमट आपल्या मनात प्रतिबिंबित होत आहे की, आपल्या मनातल्या हताशेचे प्रतिध्वनी आपण वाचतो आहोत असा प्रश्न पडावा. म्हणजे बिंब कोणते आणि प्रतिबिंब कोणते या प्रश्नाच्या भोवऱ्यात सापडून आपण गरगरत राहतो.  

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

शहरातल्या तथाकथित विकासामुळे, त्या विकासाच्या भयावह वेगामुळे संवेदनशील मनाच्या रणजीतची होणारी घुसमट प्रभावीपणे मांडली आहे. रणजीतचीच कशाला, संपूर्ण शहराची, शहरातल्या गर्दीने ओतप्रोत भरलेल्या आणि ओसंडणाऱ्या रस्त्यांचीही तीच अवस्था आहे. त्या रस्त्यांचं वर्णन एका ठिकाणी आलं आहे : “… पुढे जायचंय - जाता येत नाही. बाजूला व्हायचंय - होता येत नाही. धूर, धूळ नाकातून आत जाताहेत - नाक बंद करता येत नाही. कानात शिशाचा रस ओतला जातोय - कान बंद करता येत नाहीत. डोळ्यांमध्ये धूळ जातेय. चष्म्यांच्या काचांवर, गाड्यांच्या काचांवर, हेल्मेटच्या काचांवर धुळीचे थर जमतायत, पुसता येत नाहीत. त्याला इलाज नाही. गाडीताल्यांना एसी चालू असूनही गदमदतंय. दुचाकीस्वारांना सीट टोचतंय. बसवत नाही आता…”  

पण असं असलं तरीही शहरं आणि ग्रामीण भाग यांच्यातल्या विकासाच्या असमतोलामुळे शहरांकडे येणाऱ्या लोंढ्यांमुळे शहरांची सर्व दिशांना सर्वदूर अनियंत्रित वाढ होण्याची अपरिहार्यताही यात अधोरेखित केली आहे. हे होत असताना उपजावू जमिनी नष्ट होत जातात आणि आकाशभेदी इमारतींची जंगले उभी होत पुढे पुढे सरकत येत राहतात. त्या उपजावू जमिनींवर पिढ्यानपिढ्या अवलंबून असणारे गरीब लोक कसे जगतात, जगतात तरी का नष्टच होऊन जातात कुठेतरी, याचं कोणाला काही देणंघेणं नाही. अशी ही क्रूर रचना.

याचं मर्मभेदी वर्णन पुढे ‘काळ’ या सहाव्या प्रकरणात आलं आहे. हे प्रकरण वाचताना जॉर्ज ऑर्वेलच्या ‘नाइन्टीन एटी-फोर’ची फार तीव्रतेनं आठवण होते. प्रत्येक क्षेत्राच्या सपाटीकरणाचा आणि कॉर्पोरेटायझेशनचा सोस आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, याची झलक आत्ताही कुठेकुठे दिसतेच आहे थोडीफार. पण या प्रकरणात अधोरेखित होते ती मूळ जमीन मालकांची गुलामांमध्ये रूपांतरीत होण्याची प्रक्रिया.

या प्रकरणात एकेकाळी त्याच जमिनीचा असलेला मालक जो आता त्या कंपनीत नोकरीला आहे, तो रणजीतला माहिती देतो : “… ही जमीन. शेतजमीनच असते सर सगळी. आपण तयार करतो. त्यात पुष्कळ ठिकाणी उगाचच झाडं वाढलेली असतात. ती तोडावी लागतात. मग मुळासकट उपटावी लागतात. निरुपयोगी उंचवटे, छोटे डोंगर सपाट करावे लागतात. त्या मातीने त्यांच्या मधल्या घळया भराव्या लागतात. असं सगळं करून दगड-गोटे काढून सपाट केलेली जमीन शहर जसं पुढं सरकतं तशी आपण शहराला विकून टाकतो. ही उजवीकडे आपण जमीन खरेदी करतोय. तयार करतोय. आणि इकडून डावीकडून शहर पसरत येतंय. आपण जमीन विकून अजून पुढे जातो. दुसरी जमीन खरेदी करतो…”

संवेदनशील मनाच्या रणजीतला समाजानं हे असं निसर्गापासून आणखी आणखी दूर दूर जात राहणं असह्य होत चाललं आहे. त्याच वेळी याच समाजात रणजीतच्या भोवती, त्याच्या घरात, आजूबाजूला सर्वत्र या विकासाच्या गंगेत बुडी मारून जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी केवळ आतुर नव्हे, तर हपापलेले लोक भरलेले आहेत. मानसिकतेतला हा विरोधाभास अत्यंत परिणामकारकपणे मांडला आहे. 

रणजीतला त्याच्या समस्यांवर, मानसिक अवस्थेवर निसर्गोपचार केंद्रातले स्वामी, आश्रमातले गुरू उपाय सांगतील याची खात्री वाटते. त्यांना भेटण्याचा, त्यांच्याकडून उपदेश घेण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो. पण त्याचा प्रत्येक प्रयत्न फोल ठरतो. त्याला गुरूंची भेट काही केल्या मिळत नाही. त्याचं कारणही दिलं आहे : “स्वामींविषयी वदंताही भरपूर. कुणी म्हणे हे पूर्वी दरोडेखोरांच्या टोळीत होते. कुणीतरी माहिती द्यायचं की, ते जेलमधून फरार झालेले खुनी आहेत. एक अफवा अशीही होती की, ते पेशाने पूर्वी जिल्हाधिकारी होते. अचानक परमेश्वरी साक्षात्कार झाला आणि त्यांना वैराग्य प्राप्त झालं… अशा एक ना अनेक समाज-अपसमज, अफवा, वदंतांमुळे त्यांचं गूढ वाढलेलं होतं. आश्रमातही मोजक्याच लोकांना प्रवेश होता. येणाऱ्याला खरोखरच मार्गदर्शनाची गरज आहे असे स्वामीजींचे मत झाले, तरच काही अटी-शर्तींसह त्याला प्रवेश दिला जाई.” 

आजच्या समाजातलं पंचतारांकित आश्रम आणि गुरू यांचं वास्तव लेखकानं या निमित्तानं मांडलं आहे. तसं तर हे सगळंच सामाजिक वास्तव पहिल्या प्रकरणात खूप तीव्रतेनं मांडलं आहे. हे प्रकरण वाचताना ‘कोसला’तल्या सूक्ष्म उपरोधाची आठवण येते. समाजातलं दारिद्र्य आणि अभावाचं वर्णन करताना जे शब्द वापरले आहेत, त्यावरून जी. ए. कुलकर्णी आठवतात, पण हे साम्य इथेच संपतं. लोकांचे छोटे छोटे स्वार्थ, त्यातून ते वेगवेगळ्या ठिकाणी घेत असलेल्या वेगवेगळ्या भूमिका, त्या छोट्याशाच स्वार्थासाठीसुद्धा केलं जाणारं राजकारण, प्रसंगी देवळांचा आणि धर्माचा कोणाच्या छोट्याशाच व्यक्तिगत स्वार्थासाठी केला जाणारा अचूक वापर, छोट्या आणि थोट्या लोकांचे सगळे छोटे आणि बाकीच्यांना थोटं बनवणारे खोटे कारनामे हे सगळं वाचताना आपल्यासह आपल्या भोवतालच्या समाजाचा आरसा दिसत राहतो.

शहरातल्या मोकळ्या जमिनी तर केव्हाच इमारतींच्या खाली गायब झाल्या आहेत. मग विकासासाठीच जन्म घेतलेले बिल्डर्स जुन्या वाड्यांकडे वळले. ते पाडून तेथे नव्या इमारती उभ्या राहू लागल्या. आता पूर्वी याच बिल्डरांनी बांधलेल्या इमारती पुन्हा पाडून तेथे आणखी उंच इमारती बांधण्याचे खेळ सुरू झाले आहेत. या सगळ्यात बिल्डरला अडवावे आणि आपला फायदा करून घेता यावा, यासाठी काही मतलबी लोक देवळांचा आणि धार्मिक भावनांचा कसा गैरफायदा घेतात, हेही मुळातून वाचण्यासारखे आहे-

“… आणि एका रात्री पिंपळाभोवती पार बांधण्यात आला. कुणी बांधला, कधी बांधला, कळायला मार्ग नव्हता. डबर टाकून पक्कं बांधकाम केलेला चांगला मोठा गोल चबुतरा. त्यावर झाडाला अगदी टेकून एक मंदिरही. पार इतक्या वेगात बांधला गेला होता की बहुतेक येणारा जाणारांना तो पूर्वीपासून तिथेच आहे असं वाटू लागलं होतं. देवळासह...

… वाड्यातले एकेक रहिवासी आता वाद सोडून जायच्या तयारीत असताना वाड्यातील मंदिराचासुद्धा असाच त्याच एका रात्रीतून जीर्णोद्धार झाला. तो कधी झाला, कुणाच्या साक्षीनं झाला, हे तर वाड्यातल्या रहिवाशांनाच काय, प्रत्यक्ष त्या मंदिरातल्या देवालाही कळलं नाही. असं नवं मंदिर बांधलं गेलंय, देवस्थानाची माहिती देणारी पाटी बाहेर लावलीय, त्यावर देवस्थान कमिटीची नावं लिहिलीयत, लोकांना बसण्यासाठी चार पाच बाक टाकलेत, आणि त्या छोट्याशा मंदिरात साग्रसंगीत पूजाही झालीये असं लोकांना लक्षात आलं. हेही नेमकं कधी आणि कसं झालं, कुणी केलं, हे सांगणं केवळ अशक्य होतं…”        

याच प्रकरणात येते ती समाजाच्या ‘यशस्वी’ या साच्यात न बसणाऱ्या, त्यामुळे दुर्लक्षित असणाऱ्या, झाड तोडू नये म्हणून अखेरपर्यंत प्रयत्न करणाऱ्या आणि त्यातून त्याचे उपद्रवमूल्य लक्षात आल्यावर वापरल्या गेलेल्या निष्पाप रघूच्या मृत्यूपर्यंतची कहाणी. यातही छोट्या स्वार्थासाठीच्या कुरघोड्यांचे राजकारण आहेच. पण ते कुठे नसते? आणि त्यासाठी प्रत्यक्ष जीवनात तरी कोण किती दु:ख करतो? कोणाला किती खंत वाटते? तेवढा वेळ आणि संवेदनशीलता आहे तरी कोणाकडे? फार तर एकदा, ‘अरेरे !’ असं म्हणून पुढे जातो आपण सगळेच. पण तरीही काही वेळा मृत्यूंमध्येसुद्धा इव्हेन्ट असतो! त्या वेळा साजऱ्या करून त्यात सहभागी झाल्यावर पुढे काही क्षुद्र राजकीय स्वार्थ साधला जाईल अशी आशाही असते.

हे सगळंच अतोनात नकोसं झाल्यामुळे त्यावर गुरूच मार्ग काढतील या एकमेव अपेक्षेनं सतत त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि ते फोल ठरल्यावर आणखी हताश होत घुसमटत जाणाऱ्या रणजीतची मानसिकता आपल्यावरही उद्विग्नतेचं जड काळंभोर आवरण पसरत राहते.

अशा वेळीच ‘दु:ख’ या दुसऱ्या प्रकरणामध्ये प्रलयंकारी पाऊस येतो. त्याने सारं शहर तर थिजतंच. पण पावसातल्या सगळ्या घटनांच्या पाठीमागच्या अदृश्य रौद्र वास्तव रूपाच्या आकलनामुळे रणजीतही गोठून जातो. बोलायचं बंदच करतो. त्यावर उपाय म्हणून त्याचे घरातले त्याला आश्रमात दहा दिवसांच्या शिबिरासाठी पाठवतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘गंध’ या तिसऱ्या प्रकरणात आहे आश्रमातल्या दिनचर्येचं, तिथले लोक ते स्वामी किंवा गुरू यांना ज्या उंचीवर दाखवण्याचा प्रयत्न करतात त्याचं, त्या स्वामींच्या साधनेच्या निरनिराळ्या प्रकारांचं वर्णन. ते करताना सूक्ष्म उपरोधाचा एक सुंदरसा सूर लागला आहे. पण त्यापेक्षा सुंदर आणि वाचनीय झालं आहे ते हव्याहव्याशा वाटणाऱ्या, मायावी गंधाच्या, किणकिणत्या आवाजात हसणाऱ्या, रणजीतला पूर्ण ओळखणाऱ्या पण कितीही प्रयत्न केलां तरी रणजीत जिला अजिबातच ओळखू शकत नाहीय, अशा एका स्त्रीचं आणि त्या स्त्रीबरोबरच्या क्षणांचं लेखकानं केलेलं वर्णन-

“तुझ्या मनात नेमकं कशाचं एवढं दु:ख साचलं आहे हे तुला कोणी आश्रमातला बाबा नाही सांगू शकणार. ते चेतवलं गेलेलं स्फुल्लिंग आहे. दुःखाचं स्फुल्लिंग. खूप खोलवरचं अतितीव्र दु:ख. ज्याच्या तीव्रतेला सीमाच नाही असं दु:ख. खूप दुर्मिळ. त्याचा शोध घेण्यासाठी स्वतःच्या शोधात तुला बाहेर पडलं पाहिजे. त्यासाठी मी तुझ्या बरोबर येईन. या आश्रमातल्या दहा दिवसांपैकी अजून सहा दिवस बाकी आहेत. या सहा दिवसांत तू तो शोध घेण्याचा प्रयत्न कर. नाही जमत असं वाटलं तर शिबीर संपायच्या दिवशी इथे परत येऊ आणि आपापल्या घरी परत जाऊ, असं सांगून ती स्त्री, आसावरी रणजीतला शिबिरातून, आश्रमातून बाहेर काढते आणि सुरु होतो त्या दोघांचा प्रवास. शोधाचा प्रवास.”

त्या प्रवासाच्या सुरुवातीचं वर्णन केलं आहे ‘पाश’ या चौथ्या प्रकरणात. आसावरीच्या पुढाकारानं आणि साहाय्यानं त्या दोघांचा एकत्र सुरू झालेल्या त्याच्या स्वतःच्या शोधाचा प्रवास पुढे कोणती वळणं घेतो, त्या प्रवासात त्याला तिचा काही उपयोग होतो का, आणि त्या शोधाच्या प्रवासाची परिणती काय होते, हे पाहण्यासाठी ही कादंबरी मुळातूनच वाचली पाहिजे.

रणजीतला स्वतःच्या शोधाची सुरुवात करण्यासाठी या पुस्तकात आसावरीची मदत झाली आहे. शक्य आहे की आपल्या आयुष्यात आपल्याला अशी कोणी आसावरी भेटणार नाही. कारण त्या दु:खाचं स्फुल्लिंग आपल्या मनात चेतलेलं नाही, पण तरीही आपल्या स्वत:च्या शोधाची प्रेरणा ही कादंबरी आपल्याला नक्की देईल.

‘गुरू : एका योगियाचे तुरीयातीत स्वप्न’ - नितीन कोत्तापल्ले

सायन पब्लिकेशन्स प्रा. लि., पुणे | पाने : ६२० | मूल्य – ६०० रुपये.

.................................................................................................................................................................

नितीन साळुंखे

salunkheneetin@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......