‘नव्या युगाचे पाईक : विनय हर्डीकर ७५ अभिनंदन ग्रंथ’ - स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीतल्या, म्हणजे १९४७ ते १९६२ या वर्षांमध्ये जन्माला आलेल्यांनी केलेल्या केलेल्या उल्लेखनीय कामांचा दस्तऐवज!
ग्रंथनामा - झलक
राजीव बसर्गेकर
  • ‘नव्या युगाचे पाईक : विनय हर्डीकर ७५ अभिनंदन ग्रंथ’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 13 July 2025
  • ग्रंथनामा झलक विनय हर्डीकर Vinay Hardikar

सतत नव्या मोहिमांच्या शोधात असणारा एक उपक्रमशील कार्यकर्ता ही विनय हर्डीकरांची मुख्य ओळख. त्यांनी शिक्षण, पत्रकारिता, संपादन, राजकारण, सामाजिक आंदोलने, चळवळी या क्षेत्रांत प्रत्यक्ष काम केले. त्याचबरोबर साहित्य, प्रसारमाध्यमे, शास्त्रीय संगीत, चित्रपट याही क्षेत्रांचा व्यासंग केला. त्यालाच जोडून ट्रेकिंग, मोटर सायकलिंग हे छंद आणि शेक्सपियर, गुणवत्ता-संस्कृती याही क्षेत्रांत त्यांची उठबस होती. त्यामुळे त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांच्या पिढीतल्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींनी हर्डीकरांच्या पंचाहत्तरीनिमित्त स्वतःची वाटचाल सांगणारे लेख लिहावेत व त्याला ‘विनय हर्डीकर ७५ अभिनंदन ग्रंथ’ म्हणावे असे ठरवले; ते हे पुस्तक.

१९५०मध्ये भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना झाल्यावर विकासाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या. त्यातल्या शिक्षण, साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, गिरिभ्रमण इत्यादी क्षेत्रांमधल्या अनुभवी मंडळींचे लेख; तसेच सामाजिक चळवळी, आंदोलने, स्वयंसेवी क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, ऊर्जा, मूलभूत शास्त्रीय संशोधन, उद्योगांची उभारणी आणि व्यवस्थापन, भविष्यवेध, सामाजिक दस्तावेजीकरण अशाही क्षेत्रांत यशस्वी कामगिरी केलेल्यांच्या लेखांमधून गेल्या ५०-६० वर्षांचा एक महत्त्वाचा प्रामाणिक लेखा-जोखा या पुस्तकात वाचायला मिळेल. एवढा मोठा ग्रंथ तयार करूनही सत्ताकारण, प्रशासन, प्रसारमाध्यमे, सामाजिक न्यायासाठी चाललेली आंदोलने, कायदा आणि सुव्यवस्था, न्यायव्यवस्था, मनोरंजन अशी काही क्षेत्रे शिल्लक राहिली आहेतच. त्यामुळे ‘अशा प्रकारच्या पुस्तकाचा कदाचित हा पहिला भाग असेल’ असे प्रस्तुतकर्त्यानेच म्हटले आहे. 

‘नव्या युगाचे पाईक : विनय हर्डीकर ७५ अभिनंदन ग्रंथ’ या पुस्तकाला डॉ. राजीव बसर्गेकर यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

एक, अगदी नव्या प्रकारचा असा ग्रंथ आज अस्तित्वात आहे की नाही माहीत नाही - ग्रंथ सादर करत आहोत.

हरफनमौला, कृतिशील विचारवंत मित्र विनय हर्डीकरला २४ जून २०२४ला ७५ वर्षे पूर्ण झाली. २०२४-२५ या काळात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करावेत म्हणून एक संयोजन समिती तयार झाली. २३ जून २०२४ या दिवशी पं. समीर दुबळे आणि पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. २४ जून या दिवशी विनयच्या ‘एक्सप्रेस पुराण’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले व त्या निमित्ताने विनयची जाहीर मुलाखत झाली.

२०२४-२५ या वर्षातही अनेक कार्यक्रम झाले. विनय आणि माझ्याबरोबर ट्रेकिंग करणाऱ्यांचा एक स्नेहमेळावा १९ जानेवारी २०२५ रोजी नवी मुंबईमध्ये झाला. विजय वडेरने (यूडीसीटी मित्र) त्या दिवशी सर्वांचा पाहुणचार केला. अनिल मोरे या आमच्या ट्रेकर मित्राचा लेख या संग्रहात आहेच.

९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी अनंत अभंग यांच्या पुढाकाराने, ‘भारताचे झपाट्याने होणारे शहरीकरण’ या विषयावर ‘विकेंद्रित शहरीकरण’ आणि ‘PMRDA’ अशा दोन सत्रांत परिसंवाद झाला. या विषयाशी संबंधित असलेला अनंत अभंग यांचा लेख या संग्रहात आहेच.

६ एप्रिल २०२५ या दिवशी राम कोल्हटकर यांनी ‘गायक कलाकाराची स्वतंत्र शैली कशी तयार होते?’ या विषयावर एका संगीत चर्चेचे आयोजन केले. पं. सत्यशील देशपांडे, पं. दिग्विजय वैद्य आणि प्रा. पूर्णिमा धुमाळे यांचा त्यात सहभाग होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

संयोजन समितीच्या सुरुवातीच्या एका बैठकीमध्ये एक खूप छान कल्पना निघाली, लपवायचं कशाला, विनयनेच काढली. जशी विनयला ७५ वर्षे पूर्ण झाली, तशीच या वर्षी भारतीय प्रजासत्ताकालाही ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीतल्या, म्हणजे १९४७ ते १९६२ या वर्षांमध्ये जन्माला आलेल्या आणि निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये (स्वतः निवडून किंवा त्या क्षेत्रात योगायोगाने पडल्यामुळे) मनापासून काम करून, ते क्षेत्र वाढतानाही पाहिले; त्या क्षेत्रामध्ये स्वत:चा ठसा उमटवणारे काम केले, अशा अनुभवी व्यक्तींना विनंती करून, त्या क्षेत्रातील प्रगती आणि त्या व्यक्तीने केलेले काम यावर आधारित त्यांचे लेख मिळवावेत आणि त्यांचा संग्रह प्रसिद्ध करावा, ही ती कल्पना.

खरं तर देशाच्या निरनिराळ्या प्रांतांमधील व्यक्तींकडून असे लेख मिळवावे अशी इच्छा होती, पण त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि काही मर्यादित भाषांमध्ये म्हणजे मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांमध्ये हे लेख असणे या मर्यादा होत्या.

काम करण्याची क्षेत्रे तर खूप, पण त्या क्षेत्रातील अशा लेख देणाऱ्या इतर राज्यांतील व्यक्ती सापडणे आणि त्यांनी लेख देण्याचे मान्य करणे, ही अवघड गोष्ट होती. काही क्षेत्रात फक्त सरकारी खात्यांमध्येच काम होते आणि त्यातील गोपनीयता किंवा त्याविषयी लिखाण करण्याची नाखुशी याही गोष्टी होत्याच. त्यामुळे ते आम्ही मिळवू शकलो नाही.

विनयचा विविध क्षेत्रांत संचार तर असतोच. साहित्य, संगीत, नाट्य, सिनेमा या क्षेत्रात त्याचे बरेच मित्र आहेत. त्यांना हक्काने विनंती करता येऊ शकत होती आणि बऱ्याच जणांनी ती मान्य करून लेखही लिहिले.

मी विनयचा ‘ज्ञान प्रबोधिनी प्रशाले’तील विद्यार्थी. १९६९पासून आम्ही कायम संपर्कात आहोत आणि अनेक गोष्टी एकत्र केल्या आहेत. ज्ञान प्रबोधिनीतील काम, गिरिभ्रमण, विनयच्या शोधपत्रकारितेतील भ्रमंतीमध्ये सहभाग, शेतकरी संघटना अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही एकत्र होतो. मी मुंबई विद्यापीठाच्या रसायनतंत्र विभागात शिकलो, संशोधन केलं आणि काही वर्षे अध्यापनही केलं. वसतिगृहात राहात होतो, विनय तिथे येत-जात असे. तेथेही आमचे खूप समानधर्मी मित्र होते.

मग लक्षात आलं, या ठिकाणी भेटलेल्या अनेक व्यक्तींनी खूप चांगलं योगदान केलं आहे आणि आत्मीयतेने लिहितीलसुद्धा. या सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि लेखही लिहिले.

भारताने स्वातंत्र्यानंतर खूप क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक काम केलेले आहे आणि शिवाय सांस्कृतिक वारसा टिकवून तो वाढवलाही आहे. शिक्षण, साहित्य, सर्व प्रकारच्या कला, संगीत, विकासकामांचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, शेतीचे नियोजन, व्यापार, अर्थशास्त्र आणि चळवळी याही क्षेत्रात खूप काही घडले आहे. शेअर बाजार उभा राहिला आहे, त्याची घोडदौड चालू आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये काही जणांनी स्वतःहून भाग घेऊन योगदान केले आहे. याचे प्रतिबिंब या लेखसंग्रहात उमटले आहे.

काही क्षेत्रांतली (उदाहरणार्थ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र) गोपनीयता, स्पर्धा, विक्रीप्रधान लिखाण अशा गोष्टींमुळे तसे लेखन करण्यात लेखकांना अडचणीसुद्धा होत्या. काही क्षेत्रांबद्दलचे लेख इच्छा असूनही मिळू शकले नाहीत.

असे असूनही, एक छान ‘सप्तरंग’ या लेखसंग्रहामध्ये तयार झालेला आहे. काही अतिशय व्यक्तिगत स्वरूपाचे वेगवेगळ्या क्षेत्रातील चिंतन आणि अनुभवसुद्धा प्रतिबिंबित झाले आहेत.

लिहिणाऱ्यांना भाषेचे स्वातंत्र्य दिले होतेच. आपण कोणत्या भाषेत लिहिलं, तर त्यात जास्त आशय येईल आणि ते लिखाण परिणामकारी ठरेल हे लेखकानेच ठरवले आहे. त्यामुळे मराठी मातृभाषा नसलेल्यांचे लेखही इथे आहेत.

जरी आम्ही विषय सुचवले, तरीही काही लेखकांना त्या विषयात न लिहिता वेगळ्या आणि मूलभूत विषयात लिहावे असे वाटले, तर तीही मुभा त्यांना होती.

काही निवडक गोष्टींचा उल्लेख करतो.

स्वातंत्र्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये सरकारी तसेच खासगी क्षेत्रांमध्ये अनेक प्रयोग झाले, नवे उपक्रम राबवण्यात आले, शिक्षणातून नेतृत्व संवर्धन, आखीव अभ्यासक्रमांच्या पलीकडे जाऊन वेगळे शिक्षण देणे असेही काम झाले. या सर्व कामांचे प्रतिबिंब वसंत काळपांडे, राजन हर्षे, पराग शहा आणि गिरीश बापट यांच्या लेखांतून उमटले आहे.

संगीत क्षेत्रामध्ये परंपरा लाभलेल्या, संगीतावर विचार केलेल्या आणि त्याचबरोबर संगीताची आराधना करणाऱ्या गायकांचे लेख या संग्रहात आहेत. अमरेंद्र धनेश्वर हे केवळ ग्वाल्हेर गायकीचे अभ्यास करणारे गायक नाहीत, तर मुंबईतील राजकीय घडामोडींचे सहभागी साक्षीदार होते याची प्रचीती त्यांच्या लेखात येते, आणि याबाबतीत लिहिण्याचे त्यांना स्वातंत्र्यही होतेच.

आरोग्य क्षेत्रात, सामाजिक आरोग्यात काम करणे हे स्वतः ठरवून त्यात मोठे योगदान करणाऱ्या डॉ. अभय बंग, डॉ. संजय मेहेंदळे आणि डॉ. श्याम अष्टेकर यांचे लेख या संग्रहात आहेत.

प्रदीप आपटे - विनयचा एकेकाळचा विद्यार्थी - वाङ्मय आणि संगीताची अतिशय आवड आणि उच्च अभिरुची, कॉलेजमध्ये असताना डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी चळवळीत सहभाग, पुढे अर्थशास्त्रात संशोधन, डॉ. वि. म. दांडेकर यांचा विद्यार्थी आणि साहाय्यक, तसेच पुढे शरद जोशींच्याबरोबरसुद्धा वैचारिक संवाद केलेला. त्याचा अनुभवसिद्ध आणि चिंतनशील लेख या संग्रहात आहे.

आमचे मित्र सोपानराव कांचन हे उरळीकांचन या गावचे. घरची उसाची आणि द्राक्षाची शेती. शेतकी तंत्रज्ञानाचे उच्चशिक्षण घेतलेले. या पार्श्वभूमीतून आणि विचारातून जे काही आपण या शेतीत घालतो आहे, तेवढं काही निघत नाही किंवा कोणीतरी दुसराच ते काढून घेतो आहे, या जाणिवेतून त्यांचा शेतकरी संघटनेतील सहभाग, तसेच पुढे ‘महाग्रेप’ची उभारणी आणि वाढ यातील सहभाग यातून त्यांची तळमळ आणि त्यांचे प्रयत्न त्यांच्या लेखात व्यक्त झाले आहेत. भूषणा करंदीकर यांनी शेतीमालाची बाजारपेठ या विषयात सरकारी क्षेत्रात काम करून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोपानराव आणि भूषणा यांच्या संयुक्त लेखातून, एक महत्त्वाचे पण वेगळे जग वाचकांना दिसेल.

डॉ. गणेश देवी यांनी भाषा, आदिवासींची भाषा आणि संस्कृती यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये काम केले. मी ‘जनरल मोटर्स’मध्ये काम करत असताना बडोद्याला राहात होतो. विनयची आणि गणेश देवी यांची ओळख होती. मग एक दिवस आम्ही त्यांच्याबरोबर बडोदा, डभोई बोडेली असा प्रवास केला. याच मार्गाने पुढे छोटा उदयपूर लागते. आदिवासींचा भाग. प्रवासात आदिवासींची, त्यांच्या भाषेची, चालीरीतींची, अगदी तीर-कामठ्याच्या स्पर्धांची बरीच माहिती देवी सर सांगत होते. त्यांचा या संग्रहातील लेख हा अनुभवांच्या आधारे मूलभूत मुद्द्यांना स्पर्श करणारा आहे.

अमर हबीबने तर मराठवाडा विद्यार्थी आंदोलन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदालन, छात्र युवा संघर्ष वाहिनी, बोधगया आंदोलन, शेतकरी संघटना आणि आता किसान पुत्र आंदोलन अशा अनेक टप्प्यांमध्ये काम केले, अजूनही करतो. आणीबाणीमध्ये अमर स्थानबद्धही होता. त्याने पूर्वी लिहिलेला शेतकरी संघटनेवरचा लेख यामध्ये अंतर्भूत केला आहे. शेतकरी संघटनेचे वेगळेपण त्यात प्रतिबिंबित झाले आहे. असेच काही लेखकांना पूर्वी प्रसिद्ध झालेले लिखाण देऊन ते किंवा त्यावर आधारित संकलित लिखाण करण्याची मुभा दिली होती.

प्रो. अनिरुद्ध पंडित यांनी transport phenomena तंत्रज्ञानाचा वापर केवळ उद्योग व्यवसायासाठी नाही, तर मूलभूत शास्त्रांचा वापर करून भोवतालच्या परिस्थितीची, पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी आणि अन्य समाज उपयोगी कामासाठी करणे याचा ध्यास असणारे लिखाण केले आहे. डॉ. नंदू करजगीकर हा माझा UDCTमधला मित्र. ‘रासायनिक प्रक्रिया अभियांत्रिकी’ या विषयात संशोधन करून पीएच.डी. मिळवलेला. पण पहिल्यापासूनच कॉम्प्युटरच्या साहाय्याने रासायनिक प्रक्रियेचे चित्रण – Simulation – करून त्याच्या साहाय्याने आपल्याला हवी तशी प्रक्रिया घडवणाऱ्या रासायनिक संयंत्रांची निर्मिती, या क्षेत्रात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतो. कॅनडामध्ये राहून कोरियातील LG कंपनीसाठी काम करतो. तथापि त्याने काहीतरी मूलभूत चिंतनविषयक लिहायचे ठरवले, तसे स्वातंत्र्य त्याला दिले आहे. रसायनतंत्र क्षेत्रात खनिज तेल उद्योगांबरोबरच, शेतीजन्य पदार्थांवर आधारित रसायन उद्योगांचेसुद्धा अनन्यसाधारण आणि चिरंजीवी महत्त्व आहे. प्राज उद्योग समूहाचे संस्थापक संचालक प्रमोद चौधरी यांच्या लेखात याचे छान प्रतिबिंब आहे.

स्वयंसेवी चळवळ हे स्वातंत्र्यानंतरच्या प्रगतीचे देशातील एक वैशिष्ट्य मानता येईल. या क्षेत्रातील दोन लेख या संग्रहात आहेत.

मूळच्या गुजरातच्या चेतना गाला, छात्रयुवा संघर्ष वाहिनीत काम करताना माणदेशातील म्हसवड भागातील विजय सिन्हा या कार्यकर्त्याशी त्यांचे मन जुळले आणि माणदेशातच राहून, महिला सक्षमीकरणाचे मोठे काम त्यांनी उभे केले.

बाळासाहेब कोळेकर हे असेच विनयमुळे संपर्कात आले आणि आमच्या ट्रेकिंग ग्रूपने, त्यांच्या सहकार्याने सहजासहजी करता येणार नाहीत असे ट्रेक्ससुद्धा केले. कोयना नगर, जंगली जयगड, वासोटा हा असाच एक ट्रेक. पहिला मुक्काम बाळासाहेब कोळेकर यांच्या गावाला डिचोलीला होता. आता अभयारण्य झाल्यामुळे हे गाव उठवण्यात आले आहे. सर्वकाळ बाळासाहेब आमच्याबरोबर होते. जंगलातील प्राण्यांबरोबरच, त्यांच्या माणसांचे सहजीवन ते फार मिश्किलपणे सांगत होते आणि त्यांनी उभे केलेले कामही दिसत होते. आता या भागातून अनेक गावे उठून गेली आहेत, पण त्यांचे लेखन हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

ट्रेकिंगचा उल्लेख केल्यावर मी विनयबरोबर आणि इतर मित्रांबरोबर पन्नास वर्षांहून जास्त केलेले गिरिभ्रमण मनात येते. साहस, शारीरिक कष्ट, स्वतःच्या कष्टांचे कौतुक या पलीकडे या छंदात खूप काही आहे, यावर आमचे मित्र अनिल मोरे यांनी पूर्वी लिहिलेला लेखही आम्ही या लेखसंग्रहात घेतला आहे.

आर्थिक घडामोडीत शेअर बाजाराचे वेगळे महत्त्व आहे आणि स्वातंत्र्यानंतर अलीकडच्या काळात खूपच वाढले आहे. माझा ज्ञान प्रबोधिनीतील वर्गमित्र, प्रबोधिनीचा युवक सचिव, नंतर प्रबोधिनीतील सहकाऱ्यांबरोबर ‘प्रबोध उद्योग’ उभा करण्यात व्यग्र असलेल्या मोहन गुजराथीने शेअर व्यवसायासंबंधीच्या कामात उडी घेतली आणि मोठे काम उभे केले. याचे छान शब्दांकन त्याच्या लेखात आले आहे.

रविमुकुल हे चित्रकार तर आहेतच, पण प्रदीर्घ काळ त्यांनी साहित्यकृतींच्या मुखपृष्ठ व आतील सजावटीसाठी भरीव काम केले आहे. या प्रवासाचा एक लेख या संग्रहात आहे.

उच्च तांत्रिक शिक्षण घेऊन उद्योगांमध्ये नोकरी करून भरीव कामगिरी केलेले खूप जण आहेतच, पण स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मूळ गावाजवळ अनेक अडचणींना सामोरे जाऊन स्वतःचा उद्योग उभा करणे हे एक मोठे आव्हानच असते. माझा UDCTमधला वर्गमित्र अविनाश देशमुख याने हा अनुभव शब्दांकित केला आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

सरोजवहिनी काशीकर यांचे वर्ध्यातले घर हे शेतकरी संघटनेत काम करताना माझे, विनयचे आणि अनेक कार्यकर्त्यांचे घरच होते. सरोजताई हिंदी भाषिक. त्यांचा रविभाऊ काशीकर, ‘अंकुर सीड्स’चे भागीदार, मालक यांच्याबरोबर प्रेमविवाह झालेला. रविभाऊ शेतकरी संघटनेचे एक आधारस्तंभ, त्यामुळे त्यांच्या घरी शरद जोशी आणि इतर सर्वांचे येणे-जाणे-राहणे होत होते. या सर्वांतून सुरुवात करून, सरोजवहिनींनी शेतकरी महिला आघाडी उभी करण्याचे, महिलांना कापूस आंदोलनात सहभागी करून घेण्याचे महत्त्वाचे काम तर केलेच, पण पुढे विधानसभा निवडणुकीत प्रभा राव यांना पराभूत करून त्या आमदार झाल्या आणि पुढे ‘शेतकरी संघटने’च्या एकमेव महिला अध्यक्षसुद्धा झाल्या. त्यांच्या प्रवासाचा लेख मिळणे, ही आमची मोठी प्राप्ती होती.

उच्चशिक्षण देशात आणि परदेशात घेऊन परदेशातच आपली कारकीर्द करणारे खूप जण असतात. माझा ‘ज्ञानप्रबोधिनी’तील वर्गमित्र विनय टेंबे याने अभियांत्रिकी पदवी मिळवल्यावर, नामवंत भारतीय कंपन्यांमध्ये काम तर केलेच, स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभा करण्याचेसुद्धा प्रयत्न केले आणि मग हा सर्व अनुभव पाठीशी घेऊन तो ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित झाला. तेथेसुद्धा त्याने आणि त्याच्या पत्नीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलीच, पण त्या समाजात, त्यांच्या चुका न काढता आणि न्यूनगंड न बाळगता ते त्या समाजात एकरूप झाले. त्यांच्या मुलाचे ऑस्ट्रेलियन मुलीशी लग्नही झाले. हा सर्व प्रवास त्याच्या लेखात आला आहे.

आम्ही दोघेही क्रिकेटवेडे आणि सुनील गावसकर आमचा हीरो. गावसकरने भारतीय क्रिकेटला दमदार आक्रमक चेहरा दिला. त्यामुळे सुनील गावसकरांच्या ‘सनी डेज’मधील दोन प्रकरणे या पुस्तकात आवर्जून घेतली.

सर्व लेख पाहिल्यावर असे जाणवून जाते, या सर्वांची उदारमतवादी विचारसरणी आणि उत्तम कास धरण्याची बांधीलकी त्यांच्या लेखांमध्ये प्रतिबिंबित झाली आहे. असेही वाटून जाते की, कदाचित या प्रकारच्या लेखसंग्रहाचा हा पहिला भाग असेल.

‘नव्या युगाचे पाईक : विनय हर्डीकर ७५ अभिनंदन ग्रंथ’ – प्रस्तुती – डॉ. राजीव बसर्गेकर 

देशमुख आणि कंपनी, पुणे | पाने – ४५२ (मोठा आकार) | मूल्य – ६०० रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......