‘तत्त्वभान’ हे आधी वाचनाचे ‘निमंत्रण’ आणि मग चर्चेचे ‘निमंत्रण’ आहे, ‘आमंत्रण’ नाही. सर्व प्रकारच्या वाचकांसाठी हे ‘निमंत्रण’ आहे
ग्रंथनामा - झलक
श्रीनिवास हेमाडे
  • ‘तत्त्वभान’चे मुखपृष्ठ
  • Mon , 11 December 2023
  • ग्रंथनामा झलक तत्त्वभान Tattvabhan श्रीनिवास हेमाडे Shriniwas Hemade

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक श्रीनिवास हेमाडे यांचे ‘तत्त्वभान’ हे पुस्तक नुकतेच वर्णमुद्रा पब्लिशर्सतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेल्या ‘वाचक-निमंत्रणा’चा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

१.

प्रस्तुत ग्रंथाचे लेखन करणे आणि वाचन करणे, याचा अर्थ त्यातील आशय, विचार, कल्पना, संकल्पना आणि सूचित केले गेलेले अनेक विषय यावरील चर्चेत भाग घेणे होय. (हा संकेत अर्थात कोणत्याही ग्रंथाला लागू असतो.) ‘तत्त्वभान’चा लेखक म्हणून मी चर्चा सुरू केली आहे, विषय मांडला आहे. तथापि त्या विषयांचे, मुद्द्यांचे आणि एकुणातच ‘तत्त्वज्ञान’ या विषयाचे भान देणे, एवढाच या ग्रंथाचा हेतू आहे. त्या साऱ्यांची जी चर्चा तत्त्वज्ञान करते; म्हणजेच तत्त्ववेत्ते पिढ्यानुपिढ्या अविरतपणे अथकपणे करत आहे, आहेत आणि करत राहणार आहेत, त्या सिद्धान्तांवरील चर्चाच्या सखोल विवेचनात जाण्याचा या ग्रंथाचा हेतू नाही; ती या ग्रंथाची मर्यादा आहे.

मात्र तत्त्वज्ञानावर प्रभुत्व असणाऱ्यांनाच आजवर जे समजणे शक्य होते, त्यापैकी काहीची माहिती नवशिक्या तत्त्वज्ञान-प्रेमिकांना समजेल अशा रूपात मांडणे हा या ग्रंथाचा मर्यादित हेतू आहे. अर्थातच ज्यांच्याबद्दल अद्यापि गंभीर स्वरूपाच्या शंका आहेत, अशा प्रश्नांसंबंधीचा हटवादीपणा टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. सकारात्मक ‘वाद-संवाद’ मात्र स्वागतार्ह आहे. त्यात वाचकांनी सक्रिय सहभाग नोंदवणे, म्हणजे वितंड, दुराग्रह टाळून चर्चेत भाग घेणे आहे. त्यात वाचकांनी सक्रिय सहभाग नोंदवणे म्हणजे चर्चेत भाग घेणे आहे. हे चर्चेचे 'निमंत्रण' आहे, आमंत्रण नाही. ‘निमंत्रण’ व ‘आमंत्रण’ यात फरक आहे.

महर्षी पाणिनी त्यांच्या ‘अष्टाध्यायी’ या महाग्रंथात ‘वाक्’ची व्यावहारिक व्याख्या देतात. ‘वाक्’चा अर्थ होतो वाणी. महर्षीनी ‘वाक्’चा अर्थ किंवा उपयोग स्पष्ट करताना ‘आमंत्रण-निमंत्रण’मधील फरक सांगितला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

“विधि-निमन्त्रण-आमन्त्रण-अधीष्ट-सम्प्रश्न- प्रार्थनेषु लोट् च” (पाणिनी-सूत्र ३।३।१६१) या वाक्यातील १) विधी म्हणजे आज्ञा, २) आमंत्रण म्हणजे आग्रहाने येण्याची विनंती, ३) निमंत्रण म्हणजे 'तुम्ही कर्तव्यपालनासाठी या' अशी विनंती, ४) अधीष्ट म्हणजे धन अथवा वस्तूच्या  बदल्यात देण्याघेण्याविषयी आदरपूर्वक चौकशी करणे, ५) सम्प्रश्न म्हणजे एखादी कृती करावी की नाही, या संबंधीचा प्रश्न विचारणे आणि ६) प्रार्थना म्हणजे विनंती.

पाणिनींच्या ग्रंथावर जी भाष्ये लिहिली गेली, त्यातील ‘काशिकावृत्ती’ हा एक अर्थविवरण देणारा समीक्षाग्रंथ आहे. ‘काशिका’चा अर्थ होतो प्रकाशित करणारी ‘प्रकाशिका’ (उदा. दिवा, सूर्य), 'प्रकाशक' म्हणजे प्रकाशात आणतो तो. (‘काश्’ धातूला ‘प्र’ उपसर्ग जोडला जाऊनच ‘प्रकाश’ बनतो). ‘काशिकावृत्ती’नुसार “निमन्त्रणम् नियोगकरणम्, आमन्त्रणम् कामचारकरणम्” अर्थात ‘निमन्त्रण’ म्हणजे ‘येणे केलेच पाहिजे’ (ought).

नियोग म्हणजे आज्ञा, म्हणून ‘येणे’ करण्याची, येण्याची आज्ञा. आणि ‘आमन्त्रण’ म्हणजे तुमच्या इच्छेने करायचे (should) असले तर करा, नाही तर काही हरकत नाही. उदाहरणार्थ, रामायण-महाभारतातील राजे अशी ‘निमंत्रणे’ देत होते. ही आज्ञा नाही, पण बोलावणे आग्रहाचे आहे. (म्हणजे तुम्हाला ‘यंदा कर्तव्य आहे’फेम विवाह करण्याचे ‘कर्तव्य’ असेल, तर तुमचे ‘कर्तव्य’ म्हणून या नसेल तर सोडून द्या.) अर्थात राजाज्ञा बंधनकारक (obligatory) असते, जवळपास सक्तीची असते. पण निमन्त्रणम् म्हणजे येण्याची आज्ञा असली तरी ते पाळण्याची देखील सक्ती (mandatory) नाही. पण ‘मी चर्चेत सहभागी असावे. ते माझे कर्तव्य आहे’, अशी उत्कट इच्छा असेल तर आणि तरच (if and only if) ती पूर्ण करणे, हे बंधनकारक आहे. चर्चासत्र, परिसंवाद, प्रशिक्षणशिबिर, वर्ग इत्यादी ठिकाणी ‘निमंत्रण’ असते तर लग्न, बारसे, वाढदिवस इत्यादी ठिकाणी 'आमंत्रण' असते.

थोडक्यात ‘निमंत्रण’ नैतिकदृष्ट्या बंधनकारक असते, पण सक्तीचे नसते तर ‘आमंत्रण’ बंधनकारकही नसते आणि ‘सक्तीचे’ही नसते. संस्कृत वगळता इंग्लिशमध्ये किंवा अन्य भाषेत असा फरक आढळत नाही. Invitationमध्ये ही संदिग्धता आढळून येते.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

आज जिला ‘भाषा’ म्हटले जाते, तिलाच प्राचीन भारतीय साहित्य परंपरेत ‘वाक्’ म्हटले आहे. ‘वाक्’चे समानार्थी धातू आहेत ‘वाग्’/‘वाच्’. ‘वाक्’चा अर्थ बोलणे, भाषा वापरणे. ‘वाक्’पासून ‘वाक्य’, ‘वाग्’पासून वागीश्वरी, ‘वाच्’पासून ‘वाचन/वाचक’ शब्द बनतात. वाचन करतो तो वाचक. ‘आधी वाचन मग चर्चा’ (reading precedes discussing ). म्हणून वाचकाने ‘आधी वाचावे, मग बोलावे’.

म्हणूनच ‘तत्त्वभान’ हे आधी वाचनाचे निमंत्रण आणि मग चर्चेचे निमंत्रण आहे, आमंत्रण नाही. सर्व प्रकारच्या वाचकांसाठी हे ‘निमंत्रण’ आहे. ही चर्चा म्हणजे एक ‘विचार / वैचारिक मेळावा’, तत्त्वचिंतन (Symposium) आहे. सॉक्रेटिस, गिलेज देल्यूज आणि फेलिक्स गुतारी या तत्त्ववेत्त्यांच्या मते ‘तत्त्वचिंतन ही नेहमी मित्रांच्या साहाय्यानेच करण्याची कृती’ असते. तस्मात्, तुम्हा सर्व वाचक मित्रांना, प्रत्येकाला ‘तत्त्वभान’मध्ये चर्चेचे ‘निमंत्रण’ आहे.

मी या साऱ्या प्रकल्पाला ‘पूर्वपीठिका’ (prolegomena) संबोधत आहे. या ग्रंथात चर्चिल्या गेलेल्या, सुचवल्या गेलेल्या एखाद्या कल्पनेचा, संकल्पनेचा अधिक खोलवर पाठपुरावा केला; किंबहुना ‘वाचकाला स्वतःला जाणवलेल्या’, त्याला ‘रुची’, ‘रस’ असलेल्या विषयाच्या चिंतनाला त्या वाचकाने प्रारंभ केला, तर या ‘पूर्वपीठिके’चा प्रवास ‘परिचया’ (introduction)कडे निश्चितच होईल. ही संधी प्रत्येक वाचकाला उपलब्ध आहे.

अमेरिकन तत्त्ववेत्ती विदुषी मेरी वॉरनॉक(१९२४-२०१९)च्या मते, ‘तत्त्वज्ञान हा असा खेळ आहे की ज्यात जगातील कोणत्याही माणसाला भाग घेता येतो’. ती पुढे म्हणते, ‘तत्त्वज्ञान हे अखंड शिवणीचे अपरिमेय वस्त्र आहे की ज्यात प्रत्येक व्यक्ती धागा विणणारी कबीर बनू शकते’. या ग्रंथाचे वाचन ही तत्त्वचिंतनाची पूर्वतयारी आहे. ती पूर्वतयारी करणे म्हणजे तत्त्वज्ञानाच्या चिंतन पद्धतीचा अवलंब करणे, वाचकाला मदतकारक ठरेल, अन्यथा त्याचे चिंतन केवळ ‘स्वैरकल्पनाधारीत तत्त्वचिंतन’ (speculative philosophy) होण्याचा धोका नाकारता येत नाही. तत्त्वज्ञानाच्या चिंतनपद्धतीचा अंगीकार करणे याचाच अर्थ तत्त्वचिंतनाच्या परिभाषेत विचार करणे.

मी या ग्रंथात जे काही लिहिले आहे, विवेचन केले आहे, अर्थ लावला आहे, त्यापलीकडे खूप काही आहे आणि मी त्याबाबतीत अज्ञानी आहे. मी लिहितो, बोलतो म्हणजेच मी काहीतरी म्हणतो! डच तत्त्वज्ञ बारुथ स्पिनोझा (१६३२- १६७७) म्हणतो, “What Paul says about Peter tells us more about Paul than about Peter” अर्थात “पीटरचे पॉलविषयीचे मत आपल्याला पॉलविषयी जेवढे सांगते त्यापेक्षा पीटरविषयी अधिक सांगते”. याचाच अर्थ असा की “कुणाविषयी काही बोलणे म्हणजे तुमच्याविषयी अधिक सांगणे” होय. त्यामुळे मी तत्त्वज्ञानविषयी अथवा तत्त्वभानविषयी जेवढे सांगतो आहे, त्यापेक्षा माझ्याविषयी अधिक सांगतो आहे आणि ते हे आहे की, मला जेवढे समजते, त्यापेक्षा मला न समजणाऱ्या अनेक गोष्टी मानवी जीवनात आहेत, ज्या मला समजत नाहीत.

२.

एखाद्या विषयाचे ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) करणे म्हणजे तत्त्वज्ञान निर्माण करणे असते. येथे ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) आणि ‘तत्त्वज्ञानात्मक विमर्श’ (Philosophical Reflection) यांत फरक करणे योग्य होईल.

‘विमर्श’ (Reflection) असा सुटा शब्द फारसा प्रचलित नाही, तो ‘विचारविमर्श’ असा जोडशब्दप्रयोग उपयोगात आणला जातो. Reflection म्हणजे प्रतिबिंब. कशाचे? कशात दिसते? तर आरशात दिसते. आरशासारख्या इतर वस्तूत पाण्यात, धातूच्या चकचकीत पत्र्यात दिसते. कोणाचे प्रतिबिंब दिसते? तर पाहणाऱ्याचे. किंवा प्रथमपुरुषी ‘माझे’, ‘आपले’ प्रतिबिंब दिसते. ‘मी’, ‘आपण’ जसे आहोत तसे दिसते.

हाच मूलार्थ गृहीत धरून ‘विचारविमर्श’ करताना संबंधित व्यक्तीची मते तिच्या विचारांत व्यक्त होताना दिसून येतात. व्यक्तीने विचार करून स्वतःची मते मांडणे म्हणजे ‘विचारविमर्श’ करणे, असे मानले जाते. काहीशा प्रौढ भाषेत मांडायचे तर. ती व्यक्ती स्वतःचे तत्त्वज्ञान मांडत असते. त्यात ती तिला हवा तसा बदलही करू शकते. ते तिचे ‘स्वतःचे तत्त्वज्ञान’ असते. ते खासगी असते. ते सार्वत्रिक होईलच, याची शाश्वती नसते. उदाहरणार्थ, ‘आपलं आपण कमवायचं, जगायचं, जीवनाला येईल तसं सामोरं जायचं, तक्रार करायची नाही-शांतपणे जगायचं’ किंवा ‘मला नाही असं जगायचं. मला माझ्या पद्धतीने जगायचंय. माझ्या पद्धतीने मी माझ्या जीवनाला आकार देणार!’ हे मत म्हणजे विचारविमर्श. साधारणतः अनुभवकथन, साहित्यातील आत्मचरित्रे किंवा चरित्रे विचारविमर्शात्मक असतात.

‘चिंतन’ (Contemplation) मात्र ‘विचारविमर्श’च्या नेमके उलट असते. किंवा ‘अधिक व्यापक व विस्तारीत असते’, असे म्हणणे योग्य राहील. ‘चिंतन’ व्यक्त करण्यात व्यक्ती तिचे मत मांडतेच, पण तिच्या पूर्वसुरींचे मतही विचारार्थ घेते, त्यांचे खंडन-मंडन करते, मग स्वतःचे नवे मत मांडते, त्या मताच्या समर्थनार्थ पुरावे देते. ती त्या ज्ञानाच्या विकासाचा पुढील टप्पा गाठू पाहते, किंबहुना ती व्यक्ती संपूर्णपणे नवेच ज्ञान निर्माण करते. कदाचित ते पूर्वसुरींच्या ज्ञानाशी जुळणारे असेल किंवा नसेलही; नसेल तर ते ज्ञान निखळपणे ‘नवे ज्ञान’ या अभिधानाला पात्र ठरते. हे ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) ज्ञान असते.

या ग्रंथात व्यक्त झालेल्या तत्त्ववेत्त्यांच्या कल्पना वाचकाला अनेक दिशांनी घेऊन जातात आणि जगाचे आकलन करवून घेण्याच्या अनंत पद्धतींकडे कसे जाता येईल, याचे ‘दर्शन’ घडवितात. या पद्धतींचे ‘दार्शनिक’ होणे, हाच ‘आपले माणूसपण’ टिकवण्याचा उत्तम मार्ग आहे. ज्या वाचकाला या दर्शनाची आत्मिक चाह आहे, त्याला या ग्रंथात व्यक्त झालेल्या कल्पना उपयोगी ठरतील, हे निःसंदिग्ध आणि निःसंशय आहे. ज्या चिंतन-विषयाची अद्यापि तात्त्विक अंगाने बांधणी झालेली नाही, ती करण्याचे महत्तम कार्य अशा चिंतनशील दर्शनिकांकडून होऊ शकेल.

‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ मांडणाऱ्या व्यक्तीचे, तत्त्ववेत्त्याचे, विचारवंताचे असतेच असते, ते त्याच्या नावानिशी जगाला परिचित होते. ते त्याचे योगदान असते. पण त्याच वेळी ते ज्ञान त्या तत्त्ववेत्त्याचे खासगी मालकीचे राहत नाही, तर ते ज्ञान ‘ज्ञानाच्या ज्या कोणत्या क्षेत्राविषयी असेल, त्या ज्ञानक्षेत्राच्या साठ्याचा भाग’ बनते. ते मांडणाऱ्या व्यक्तीला तिचे श्रेय (Credit) लाभते, पण ते तिच्या मालकीचे (patent) राहत नाही. ते ज्ञान मग विज्ञान बनेल अथवा तत्त्वज्ञान बनेल. एकूण ज्ञानाचा भाग होण्याचा दर्जा तिला लाभतो. ते विज्ञान बनले तरी मूलतः तत्त्वज्ञान बनते. कारण ते ‘ज्ञान’ असते, ते संबंधित विषयाची ‘तत्त्वे’ बनते. जसे की न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत, आईनस्टाईनचा सापेक्षता सिद्धान्त, कणाद ऋषीचा अणुवाद इत्यादी.

‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) एका अर्थाने ‘ध्यान’ (Meditation) असते. म्हणून महात्मा गौतम बुद्धाने, महात्मा महावीराने किंवा ज्ञानराय प्लेटोने केलेल्या तत्त्वचिंतनाला ‘ध्यान’ म्हटले आहे. ‘आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक’ किंवा ‘बुद्धिप्रामाण्यवादाचा जनक’ समजल्या जाणाऱ्या रेने देकार्तने त्याच्या मूलभूत ग्रंथाला ‘Meditations’ (The Meditations on First Philosophy मूळ फ्रेंच शीर्षक ‘Meditationes de prima philosophia’) असे नाव दिले. त्याचे मराठी किंवा भारतीय भाषांमधील भाषांतर ‘चिंतने’ असे केले जाते, ते याच दृष्टिकोनातून.

थोडक्यात, ‘तत्त्वज्ञानात्मक विमर्श’ (Philosophical Reflection) हे व्यक्तिनिष्ठ असते, त्याचे विज्ञान-तत्त्वज्ञान होईलच असे नाही. मात्र ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) वस्तुनिष्ठ असते, त्याचे स्वतंत्र विज्ञान-तत्त्वज्ञान होऊ शकते, किंबहुना होतेच होते, असे म्हणता येते.

‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) करणे म्हणजे काय करणे? तत्त्वज्ञान काही एका पद्धतीने (methodology) आणि काहीएका परिप्रेक्ष्यातून (Perspectives) विचार करते. आणि जे प्रश्न उपस्थित करते ते ‘मूळ प्रश्न’ असतात. ज्या प्रश्नाच्या नंतर त्या विषयासंबंधी अन्य दुसरा प्रश्न उपस्थित करता येत नाही, असा प्रश्न म्हणजे मूळ प्रश्न होय. समजा, कालांतराने तसा प्रश्न उपस्थित झालाच तर आधीचा मूळ प्रश्न हा मग ‘मूळ प्रश्न न राहता’ नंतर उपस्थित झालेला प्रश्न हा ‘मूळ प्रश्न’ बनतो. असे सतत घडत राहते... असे प्रश्न विचारत राहणे हेच तत्त्वज्ञानाचे काम असते. मूळ प्रश्न विचारणे आणि त्यांच्या उत्तरांचा शोध घेणे, त्याची पद्धती शोधणे आणि त्या परिप्रेक्ष्यातून विचार करणे, हे ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ प्रक्रियेचे साधारण स्वरूप असते.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

येथे एक गोष्ट अधोरेखित करतो की, ‘भारतीय, चिनी आणि ग्रीक या प्राचीन सभ्यतांचेच (Civilizations) विचार म्हणजे तत्त्वज्ञान’ असे आधुनिक काळात, साधारणपणे १९८०नंतरच्या काळात मानले जात आहे. त्यापूर्वी ‘तत्त्वज्ञान-युग’ प्राचीन काळात केवळ भारतवर्ष व ग्रीस या देशांमध्येच होते, असा समज होता. १९८०-९० नंतर या आकलनात सुधारणा झाली, त्यात चिनी तत्त्वज्ञानाची विधायक भर पडली. वस्तुतः ती भर खूप आधीच पडली होती. पण तिचे अधोरेखन १९८०नंतर विशेषत्वाने झाले. भारतीय, ग्रीक आणि चिनी सभ्यतांनी साहित्य, संगीत, कला, विज्ञान-तंत्रज्ञान आणि धर्म या रूपांत ‘मानवी संस्कृती’ (Cultures) निर्मिती केलीच; पण आपापल्या संस्कृतीचे अमूर्त आणि नियंत्रक सारतत्त्व ‘तत्त्वज्ञान’रूपात अचूकपणे शब्दबद्ध केले.

भारतीय तत्त्वज्ञान, चिनी तत्त्वज्ञान आणि ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांना जगाचे तात्त्विक अधिष्ठान मानले जाते. त्यामुळे या ग्रंथात (अर्थात मूळ लेखमालेत) दोन उणिवा जाणवतील. पहिली, भारतीय तत्त्वज्ञानाविषयी आणि दुसरी चिनी तत्त्वज्ञानाविषयी काहीच ऊहापोह केलेला नाही. जिथे आवश्यकता आहे त्यानुसार भारतीय दर्शन परंपरेचे उल्लेख, त्यातील काही आवश्यक त्या संदर्भाचे उपयोजन केलेले आहे तर चिनी तत्त्वज्ञानाचा एकही संदर्भ नाही. त्यांचा परामर्श घेणे, या ग्रंथाच्या बाहेरचे काम आहे.

विशेषतः भारतीय दर्शन-परंपरेचा परिचय ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यातही दोन उपगोष्टी आहेत. पहिली, भारतीय दर्शन-परंपरेचा भारतीयेतर लोकांना अर्थात जगाला झालेला परिचय आणि भारतीय दर्शन परंपरेचा खुद्द भारतीयांनाच होणारा परिचय. हे प्रदीर्घ संशोधनाचे विषय आहेत. भारतीय दर्शन-परंपरेचा भारतीय लोकांना होणारा परिचय ही एक स्वतंत्र विलापिकाच म्हणता येईल. दारा शिकोहने जगाला उपनिषदांचा परिचय करून देण्याचा महामार्ग निर्माण केला, पण वर्ण-जाती-लिंगभेद-आर्थिक व राजकीय विषमतेमुळे सामान्य भारतीयांनाच आपल्या वैचारिक धनाचे थेट आकलन होऊ शकले नाही. ते आक्रमकांच्या मार्फतच झाले. ब्रिटिश वसाहतवादामुळे सामान्य शिक्षणपद्धती रूढ झाल्यानंतरच तो मार्ग काहीसा किलकिला झाला.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

आपण लोकांना शुभेच्छा देतो, पण त्यांनी शुभ जीवन जगावे म्हणून काय करतो? याचा शोध घेता लक्षात आले की, काहीच करत नाही! मग त्यांना पोकळ शुभेच्छा देण्यात आपण कोणती नीती बाळगतो?

‘मैत्री’ची बाजारपेठ : मैत्री विकत घ्यावयाची असते... हा शुद्ध देव-घेवीचा व्यवहार आहे! 

सुशिक्षित, उच्च-सुशिक्षित स्त्रियांची भूमिका आता निश्चित होणे, हाच त्यांच्या मुक्तीचा मार्ग ठरणार आहे. सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त झाल्याशिवाय अस्सल अर्थाने स्त्री-मुक्ती साध्य होणार नाही!

..................................................................................................................................................................

वसाहतवादाने प्रथम ‘भारत हा जादूटोण्याचा, अंध:श्रद्धाळू धर्मग्रस्त, मागासलेला देश आहे’, अशी प्रतिमा निर्माण केली आणि स्वतःला आधुनिक, प्रगत, विज्ञानवादी, सुधारणावादी समजून भारताच्या उद्धारासाठी जणू परमपित्या प्रभूनेच धाडले आहे, असे समजून येथे राज्य केले.

इतिहास सांगतो की, धर्माने मानवी संस्कृतीत एकेकाळी खूप मोठे योगदान दिले आहे. पण धर्म व धर्मसंस्था शोषणाचे हत्यार बनले की, धर्म नेहमीच ‘संस्कृती व सभ्यता’ या दोन्हींचे डबके करण्याच्या प्रयत्नात असतो. जिथे धर्म प्रभावी होतो, तिथे मानवी प्रगती शून्यावर आल्याचे आढळेल. धर्म स्थिरता देतो, पण स्वातंत्र्य हिरावून घेतो आणि विज्ञान अस्थिरता देत नाही, तर गती देते आणि स्वातंत्र्य देते. धर्म स्थितप्रज्ञ (deductive) असतो तर विज्ञान नवप्रज्ञ (inductive) असते.

धर्म, धर्मसंस्था, ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म इत्यादी परतत्त्वांतून मुक्त होऊन केवळ वैज्ञानिक दृष्टीकोनातून जगताचा वेध घेण्याची प्रवृत्ती केवळ अतिप्राचीन ग्रीक विचारात आढळते, हे ग्रीक विचारांचे व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. या प्रवृत्तीचा उद्भव भारतात 'नासदीय सूक्तामधून व्यक्त होतो खरा. पण त्या उद्भवाने विज्ञानाला जन्म दिलेला नाही. चीनमध्ये तर ते काम झालेच नाही.

आजच्या एकविसाव्या शतकातही धर्म प्रभावी होण्याचा आणि जीवनाला गतकाळात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळेल. तालिबान, कर्मठ हिंदुत्ववाद ही त्याची उदाहरणे होत. दुर्दैवाने आजचे भारतीय सरकार आणि प्रशासन विज्ञानाची कास सोडून पुन्हा एकदा भारताला ‘हिंदू धर्मराष्ट्र’ घोषित करून गतकाळातील अवनत प्रतिमेला बांधू इच्छित आहेत, असे दिसते. या साऱ्याचा केवळ धावता आढावा घेणे हादेखील मोठा प्रकल्प आहे; आणि त्यावर खूप मोठे काम ‘तत्त्वज्ञानाच्या जागतिक चर्चाविश्वा’त जोमाने चालू आहे, ही आशादायक घटना आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

३.

या ग्रंथात व्यक्त झालेल्या तत्त्ववेत्त्यांच्या कल्पना वाचकाला अनेक दिशांनी घेऊन जातात आणि जगाचे आकलन करवून घेण्याच्या अनंत पद्धतींकडे कसे जाता येईल, याचे ‘दर्शन’ घडवितात. या पद्धतींचे ‘दार्शनिक’ होणे, हाच ‘आपले माणूसपण’ टिकवण्याचा उत्तम मार्ग आहे. ज्या वाचकाला या दर्शनाची आत्मिक चाह आहे, त्याला या ग्रंथात व्यक्त झालेल्या कल्पना उपयोगी ठरतील, हे निःसंदिग्ध आणि निःसंशय आहे. ज्या चिंतन-विषयाची अद्यापि तात्त्विक अंगाने बांधणी झालेली नाही, ती करण्याचे महत्तम कार्य अशा चिंतनशील दर्शनिकांकडून होऊ शकेल.

या ग्रंथाचे वाचन, मनन व चिंतन आणि मग चर्चा हे ‘तात्त्विक चिंतनाचे प्रशिक्षण’ आहे. तत्त्वचिंतक हाच विवेकमित्र असतो. या मैत्रीच्या निर्मितीसाठी दैवशरण अथवा नियतीशरण न होण्यात आणि विवेकमित्र होण्यातच मानवाची ‘तत्त्ववत्ता’ एकवटलेली आहे. त्यासाठीचे हे सहर्ष सविनय निमंत्रण!

मी या ग्रंथात जे काही लिहिले आहे, विवेचन केले आहे, अर्थ लावला आहे, त्यापलीकडे खूप काही आहे आणि मी त्याबाबतीत अज्ञानी आहे. मी लिहितो, बोलतो म्हणजेच मी काहीतरी म्हणतो! डच तत्त्वज्ञ बारुथ स्पिनोझा (१६३२- १६७७) म्हणतो, “What Paul says about Peter tells us more about Paul than about Peter” अर्थात “पीटरचे पॉलविषयीचे मत आपल्याला पॉलविषयी जेवढे सांगते त्यापेक्षा पीटरविषयी अधिक सांगते”. याचाच अर्थ असा की “कुणाविषयी काही बोलणे म्हणजे तुमच्याविषयी अधिक सांगणे” होय. त्यामुळे मी तत्त्वज्ञानविषयी अथवा तत्त्वभानविषयी जेवढे सांगतो आहे, त्यापेक्षा माझ्याविषयी अधिक सांगतो आहे आणि ते हे आहे की, मला जेवढे समजते, त्यापेक्षा मला न समजणाऱ्या अनेक गोष्टी मानवी जीवनात आहेत, ज्या मला समजत नाहीत. माझे ज्ञान, माझे अज्ञानच प्रगट करते आहे. हे भान राखूनच वाचकांनी पुढे जावे, हे बरे...

‘तत्त्वभान’ – श्रीनिवास हेमाडे

वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव | पाने – ३३४ | मूल्य – ६८० रुपये (हार्ड कव्हर)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......