तुम्ही उजवे असा वा डावे, ज्या वेळी तुम्हाला ‘मानवते’पेक्षा ‘राजकारण’ मोठं वाटू लागतं, तेव्हा तुम्हाला तुमच्या विचारसरणीची अफू चढली आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे!
पडघम - देशकारण
श्रीनिवास जोशी
  • (‘बखर १५’ऐवजी १४ असं वाचावं.) मणिपूरचा नकाशा, पॅलेस्टाईन-इस्रायल हल्ल्यातलं एक छायाचित्र आणि भारतीय क्रिकेट संघ
  • Thu , 30 November 2023
  • पडघम देशकारण पॅलेस्टाईन Palestine इस्रायल Israel मणिपूर Manipur मराठा आरक्षण Maratha Reservation क्रिकेट Cricket

२०२३मध्ये चार मोठ्या घटना घडल्या. मणिपूरमधील हिंसाचार, इस्राईल-हमास युद्ध, मराठा आरक्षण आणि पनौती प्रकरण. या प्रत्येक बाबतीत मोदीभक्तांच्या भूमिका वेगवेगळ्या होत्या. एकमेकांच्या विरोधात जाणाऱ्या होत्या. या बखरीमध्ये शिरोजीने भक्तांच्या या वैचारिक गोंधळावर नेमकं बोट ठेवलं आहे.

३ मे २०२३पासून भारताच्या मणिपूर राज्यात हिंसाचाराला सुरुवात झाली. या राज्यातील कुकी हा आदिवासी समुदाय आणि मैतेई हा समुदाय यांच्यात हा हिंसाचार घडला. कुकी धर्मानं ख्रिश्चन, तर मैतेई हिंदू. हा हिंसाचार सप्टेंबर महिना उजाडला, तरी सुरू राहिला. आज २२व्या शतकाचं २३वं साल सुरू आहे. आज १०० वर्षांनंतर या बखरीच्या वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण होईल की, इतके दिवस हिंसाचार सुरू असताना राज्य सरकार, सेना, पोलीस आणि मुख्यत्वेकरून केंद्र सरकार काय करत होतं? हिंसाचार एवढा काळ सुरू राहूच कसा शकतो?

हा हिंसाचार सरकारप्रणीत होता आणि पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यानं तो इतका काळ सुरू राहिला, असे आरोप तत्कालीन राजकीय विरोधक आणि मुख्यत्वेकरून यू-ट्यूबवरील स्वतःला नि:स्पृह म्हणवणाऱ्या अनेक पत्रकारांनी केले. खरं-खोटं जाणून घ्यायला आज कुठलाच मार्ग उपलब्ध नाही.

नाही म्हणायला सशस्त्र पोलिसांच्या घोळक्याबरोबर घोषणा देणारे अनेक लोक चालत आहेत, असे व्हिडिओ आजही यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. या व्हिडिओतील आवाजाची क्वालिटी खराब आहे. त्यामुळे हे लोक नक्की कुठल्या घोषणा देत आहेत, हे समजणं अवघड आहे. त्यात कुकी आणि मैतेई भाषा या तिबेटो-बर्मन भाषाकुलातील भाषा आहेत. शिरोजीचा व्यासंगाचा विस्तार अनेक भाषांमध्ये झाला होता, पण तिबेटो-बर्मन भाषाकुलात त्याला अतिशय कमी गती होती, हे त्यानेच आपल्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवले आहे. त्यामुळे शिरोजीसारख्या चाणाक्ष इतिहासकाराला हा हिंसाचार सरकारप्रणीत होता अथवा नाही, याविषयी कसलाही निष्कर्ष काढता आला नाही. तो सरकारच्या दबाबापुढे झुकणारा इतिहासकार नव्हता, परंतु पुराव्याशिवाय बोलणे त्याने अनुसरलेल्या इतिहासलेखनाच्या कठोर शिस्तीत बसणारे नव्हते. असो.

कुकी पहाडी भागात राहणारे आणि मैतेई पठारी प्रदेशात. आदिवासी लोकांचा पहाडी प्रदेश विस्तृत होता. मैतेई बहुसंख्य असले तरी विस्तारानं छोट्या असलेल्या प्रदेशात राहणारे. त्यांना आदिवासी प्रदेशात जमिनी विकत घेण्याचा अधिकार नव्हता. घटनेच्या कलम ३७१प्रमाणे एक कायदा १९६० साली केला गेला. या कायद्याप्रमाणे कुकींच्या जमिनी बाकी कुणाला विकत घेता येत नव्हत्या, परंतु आता वाढत्या लोकसंख्येमुळे मैतेई लोकांना विस्तार हवा होता. जिथं जिथं जगायला म्हणा, प्रगतीसाठी म्हणा, जागा कमी पडते, तिथं तिथं थोडं जरी खतपाणी घातलं गेलं, तरी हिंसेचं पीक बेमाप तयार होतं. असं खत मुद्दाम घातलं गेलं किंवा कसं, हे सिद्ध करणं अवघड आहे, पण ते घडलं, हेसुद्धा नाकारता येत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

त्याचे असं झालं की, आम्हीसुद्धा आदिवासी आहोत, असं जाहीर केलं जावं, अशा आशयाची ‘रिट पिटीशन’ मणिपूर उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. १४ एप्रिल रोजी न्यायालयाने आदेश दिला की, मैतेई लोकांना आदिवासींच्या यादीत समाविष्ट करून घेतलं जावं, अशी शिफारस मणिपूर सरकारने केंद्र सरकारला करावी.

न्यायालयाच्या या निर्णयानं कुकी समुदायात अस्वस्थता पसरली. त्याविरुद्ध मोर्चे सुरू झाले. त्यातून हिंसाचाराला सुरुवात झाली. चुराचांदपूर आणि विष्णुपूर या शहरांमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये भयंकर हिंसाचार सुरू झाला.

तीन मे रोजी चुराचांदपूर या शहराच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या एका मैतेई मुलीवर कुकी लोकांनी बलात्कार केला आणि तिची हत्या केली, अशी बातमी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केली गेली. त्यात त्या मुलीच्या शवाचं छायाचित्रसुद्धा होतं. खरं तर ही अफवा होती. पुढे अनेक वृत्तपत्रांनी शोध घेतला, तेव्हा ते छायाचित्र दिल्लीमधील होतं, असं सिद्ध झालं. या मुलीचा खून तिच्या आई-वडिलांनीच केला होता.

या नंतर खऱ्या हिंसाचाराला सुरुवात झाली. अनेक कुकी महिलांना पकडून, नग्न करून, त्यांची धिंड काढली गेली, अशा बातम्या पुढे आल्या. दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढली गेली आहे आणि त्यांच्या शरीराशी अर्वाच्य चाळे केले जात आहेत, असा एक व्हिडिओ भारतात आणि जगभर सर्वत्र प्रसारित झाला. त्याचे जगभर पडसाद उमटले. त्यानंतर अनेक मैतेई स्त्रियांचीसुद्धा अशीच धिंड काढली गेली, असे दावे करण्यात आले.

याच सुमारास, ‘मणिपूर रायफल्स’ या मणिपूरच्या पोलीस विभागाचं शस्त्रागार दोनदा लुटलं गेलं आणि एके-47 रायफली, सब मशीनगन्स, मशीनगन्स अशी हजारो शस्त्रं लुटली गेली. काही बातम्यांनुसार सात लाख गोळ्यासुद्धा लुटल्या गेल्या.

नरेंद्र मोदी यांचं सरकार अत्यंत मजबूत, अत्यंत सामर्थ्यवान आणि सक्षम आहे, असे सर्वकाळ आणि सर्वत्र सांगितलं जात होतं. असं असूनही मणिपूरमध्ये पाच-सहा महिने हिंसाचार सुरू कसा राहू शकतो, स्त्रियांची नग्न करून धिंड कशी निघू शकते, काही हजार ऑटोमॅटिक रायफली चोरीला कशा जाऊ शकतात, असे प्रश्न उभे केले जाऊ लागले. ‘तुमचं सरकार एवढं मजबूत आहे, तर अशा घटना कशा घडल्या?’, असा प्रश्न विरोधी पक्ष विचारू लागले. ‘एक तर तुमचं सरकार तुम्ही सांगता तसं मजबूत नसणार’ किंवा ‘या सगळ्याला तुमच्या सरकारची गुप्त संमती असणार’, असं विरोधी पक्ष म्हणू लागले.

यावर भारतभर एकच राळ उडाली! त्यामुळे मोदीभक्तांची धांदल उडाली. मैतेई हिंदू आणि हिंदू सहिष्णू असल्याने कुकीच कसे हिंसाचारी आहेत, हे सांगितलं जाऊ लागलं. तसे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज फिरू लागले.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

शिरोजी हे सगळं पाहत होता. एवढा मोठा हिंसाचार झाला, परंतु भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांना मणिपूरला जावंसं वाटलं नाही, याचं शिरोजीला दुःख झालं होतं. अशा घटना घडतात, तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी घटनास्थळी जायला पाहिजे, वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, लोकांची दुभंगलेली मनं जुळवून आणली पाहिजेत. यातलं काहीच श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी केलं नाही. या गोष्टीचं शिरोजीला अतीव दुःख झालं होतं. त्याने तसं आपल्या रोजनिशीमध्ये लिहिलंही आहे.

कुठल्याही नकारात्मक घटनेच्या संदर्भात आपण दिसलो नाही पाहिजे, ही गोष्ट मोदीजी कटाक्षानं पाळतात, असा आरोप अनेक विरोधी पक्षांनी केला. शिरोजीने नेहमीची तटस्थता राखून, याबद्दल आपलं मत व्यक्त न करता विरोधी पक्ष असं असं बोलत आहेत, असं लिहून ठेवलं आहे. रोजनिशी ही अत्यंत खाजगी अशी गोष्ट असली, तरी तिथंही शिरोजी अत्यंत तटस्थ होता. पुराव्याशिवाय बोलायचं नाही, असा त्याचा दंडक होता.

एखादी घटना थोडीशी जरी नकारात्मक असेल मोदीजी, तर तिथं आपल्या छायाचित्रकारांच्या ताफ्यासह जात. अतिशय साधारण घटनासुद्धा अतिशय भव्य, दिव्य, उद्दात्त आणि उज्ज्वल कशी आहे, याचा डंका सर्व भारतभर वजवला जात असे. पण शेतकरी आंदोलन असो, कोविडने भरलेली हॉस्पिटल्सं असोत, नैसर्गिक आपत्ती असोत किंवा सामाजिक अस्वस्थता असो, मोदीजी तिथं क्वचितच जाताना दिसत.

मणिपूरच्या नृशंस घटना घडल्या, तिथं आपण गेलो, तर त्याच्या बातम्या होतील आणि आपण सत्तेवर असूनही अशा घटना घडल्या, हे ‘हायलाईट’ होईल, असं वाटून मोदीजी कितीही गंभीर घटना असेल, तर तिथं फिरकत नाहीत, असे आरोप त्यांचे विरोधक सातत्यानं करत.

घटना कितीही गंभीर असली तरी थोड्याच काळात ती घटना ‘पब्लिक मेमरी’ मधून निघून जाते, मग अशा नकारात्मक घटनेबरोबर स्वतःला निगडितच कशाला करा, असा त्यांचा विचार असतो, असं विरोधक बोलत. त्यांचं हे निरीक्षण शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवलं आहे.

२०२३चा नोव्हेंबर उजाडला आणि मणिपूर हळूहळू ‘पब्लिक मेमरी’मधून निघून जाऊ लागलं. परंतु गंमत अशी झाली की, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत महाराष्ट्रामध्ये ‘मराठा आरक्षण’ आंदोलन उभं राहिलं.

इथंही आरक्षणामुळे उभा राहिलेला मुद्दा होता. वाढती लोकसंख्या आणि कमी होत जाणाऱ्या नोकऱ्या, अशी स्थिती भारतात सर्वत्र तयार झाली होती. त्यामुळे आपल्यालाही आरक्षण मिळावे, अशी मागणी भारतभरातील उच्च-मध्यम स्तरातील जाती करत होत्या. यात गुजरातमधील पटेल, राजस्थान व हरयाणामधील गुज्जर, महाराष्ट्रातील मराठा आणि बहुतेक राज्यातील उच्च-मध्यम स्तरातील जातीचे लोक होते.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

प्रत्येक युगात एक तुका एका नव्या तंत्रावर स्वार होऊन पुढे येतो, त्याला ट्रोलही केलं जातं, पण तुका काही विस्मृतीत जात नाही!

पंढरीचे अभंग, विठ्ठलाची उराउरी भेट, तुकाराम आणि मी…

पंढरीचे अभंग, विठ्ठलाची उराउरी भेट, तुकाराम आणि मी… (उत्तरार्ध)

क्षुल्लक देवदेवतांचा व त्यांच्या पूजेचा निषेध करणाऱ्या तुकोबांना ‘पाखंडी’ म्हणता येईल काय?

ईदच्या दिवशी काय घडले! तुकोबांचे मशिदीत कीर्तन झाले!!

तुकाराम समजणे म्हणजे जीवन जगण्याचा सोपा मार्ग समजणे

.................................................................................................................................................................

मराठा ही जात, मराठा आणि कुणबी या उप-जातींमध्ये विभागली गेली होती. मराठा म्हणजे युद्ध करणारे आणि कुणबी म्हणजे शेती करणारे. यातील मराठा या जातीला आरक्षण नव्हतं, कुणबीला होततं. महाराष्ट्रात ३४६ ओबीसी जातींपैकी ८३ क्रमांकावर कुणबी प्रवर्ग आहे. त्यात लेवा पाटीदार, लेवा पाटील, लेवा कुणबी आणि कुणबी मराठा अशा उप-जातींचा समावेश होता. या सगळ्यांना ओबीसी वर्गासाठी असलेल्या आरक्षणात १३ टक्के आरक्षण होतं.

आता मराठा जातीतील सगळ्यांनीच आम्हाला ‘आम्ही मराठा कुणबी’ असल्याचं सर्टिफिकेट द्यावं आणि ओबीसी लोकांना असलेल्या आरक्षणात समाविष्ट करून घ्यावं, अशी मागणी सुरू केली. या व्यतिरिक्त मराठा जातीसाठी वेगळं आरक्षण द्यावं, अशीही मागणी होती.

महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची लोकसंख्या साधारणपणे ३० टक्के. त्या सगळ्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये आणलं, तर या प्रवर्गात समाविष्ट असलेल्या इतर जातीतील लोकांच्या संधी कमी होणार होत्या. त्यामुळे ओबीसी नेते आणि मराठा आरक्षणाचे समर्थक नेते यांच्यात बोलाचाल सुरू झाली.

श्रीमान नरेंद्र मोदी यांनी या प्रकारावरसुद्धा आपलं मत व्यक्त केलं नाही. मणिपूरचा एवढा तीव्र मुद्दा मागे पडला, तसा हासुद्धा मागे पडेल, असं मोदीजींना वाटत असावं, असं विरोधी पक्षनेते म्हणू लागले, असं शिरोजीनं आपल्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवलं आहे.

एवढं सगळं घडून येत असतानाच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम, या राज्यांतील राज्य सरकारांच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात येऊन ठाकल्या. या विषयाकडे मात्र श्रीमान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण लक्ष दिल्याचं दिसतं. आणि ते योग्यसुद्धा होतं. कुठला राजकारणी निवडणुकांकडे दुर्लक्ष करू शकेल?

एवढी सगळी खदखद सुरू असताना पांडेजींच्या ठेल्यावर चर्चा झडली नसती, तरच नवल! कर्नाटकातील ताबडतोड विजयानंतर भाजपविरोधक जोशात होते... आणि या वेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या निवडणुका ‘हिंदी बेल्ट’मध्ये होत्या, म्हणून भाजपसमर्थक जोशात होते.

शिरोजीने ही बखर खूप महिन्यांनी लिहिली. खरं तर कर्नाटकातील निवडणुकांनंतर त्याने काही लिहिलंच नव्हतं. मध्यंतरी मणिपूरमधील दर्दनाक घटना घडल्या, पण तरीही काही लिहिलं नाही. घटना घडली की, तिच्यावर तातडीनं लिहायला शिरोजी काही पत्रकार नव्हता. याचा अर्थ त्याला पत्रकारांविषयी अनादर होता असं नाही, उलट अतोनात आदर होता. आपला डेटा जमवण्यासाठी तो चांगल्या पत्रकारांवरच अवलंबून होता. परंतु आपण इतिहासकार आहोत, हे भान शिरोजीनं कधी आपल्याभोवती घडणाऱ्या घटनांच्या वादळातसुद्धा सोडलं नाही. घडलेल्या घटनांची जंत्री आणि माहिती कोणीही देईल, पण त्या घटनांविषयी आपला ‘दृष्टीकोन’ तयार झाल्याशिवाय शिरोजी काहीही लिहीत नसे. २०२३च्या शेवटी शेवटी शिरोजीने ही बखर लिहिली आहे.

आता प्रस्तावना जास्त न लांबवता ही बखर मी वाचकांच्या हाती ठेवत आहे.

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर.

.................................................................................................................................................................

शिरोजीची बखर - प्रकरण चौदावे

२०२३च्या मे महिन्यापासून मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई जमातींमध्ये हिंसाचार उसळला होता. स्त्रियांना नग्न करून त्यांची धिंड काढणं, त्यांचं अपहरण करताना त्यांच्या बापांची आणि भावांची हत्या त्यांच्याच डोळ्यासमोर करणं, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करणं, असे प्रकार झाले. कित्येक स्त्रियांच्या बलात्कारानंतर हत्याही झाल्याच्या बातम्या आल्या. याशिवाय अनेक घरं जाळली गेली. सुमारे ६० हजार लोक बेघर झाले. दीडशेच्या वर लोकांच्या हत्या झाल्या. हा सगळा उग्र प्रकार अनेक महिने चालला. मणिपूर हे राज्य उत्तर-पूर्वेत असल्याने, म्हणजे भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी नसल्याने या सगळ्या प्रकाराची म्हणावी तशी दखल भारतीय जनमानसानं घेतली, असं म्हणता येत नाही.

पांडेजींच्या ठेल्यावर भास्कर, समर हे मोदीविरोधक आणि अच्युत, अविनाश आणि नाना हे मोदीसमर्थक यांच्या अधूनमधून बैठका होत होत्या. मणिपूरवर चर्चा झाली पाहिजे, असं ठरत होतं, पण मुहूर्त लागत नव्हता. आता तोच विषय बोलायला जमायचं असं ठरलं होतं, पण अचानक नवंच वादळ सामोरं आलं. १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये क्रिकेट विश्वचषकासाठी सामना झाला. त्याला मोदी स्वतः हजर होते, परंतु भारत तो सामना हरला. मोदीजी स्वतः हजर राहणार असल्यामुळे त्यांच्या ‘किस्मती’चा फायदा भारताला होणार आणि भारत विश्वचषक जिंकणार, असा प्रचार ‘गोदी मीडिया’ आणि ‘मोदीभक्त’ करत होते. विश्वचषक जिंकला, तर त्याचं सारं श्रेय मोदीजींना द्यायचं, असा डाव आखला गेला आहे, हे यावरून विरोधकांच्या लक्षात आलं. त्यामुळे आता भारत हरल्यामुळे त्या पराभवाचं खापर मोदीविरोधकांनी मोदीजींवरच फोडलं. मोदींच्या ‘किस्मती’शिवाय भारत विश्वचषक जिंकू शकणार नाही, असं ‘गोदी मीडिया’ने बोलून ठेवलं होतं. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतंच कोलीत मिळालं. भारतभर मोदीसमर्थक आणि मोदीविरोधक यांच्यात भांडणं लागली. ठेल्यावर भास्कर आणि समर खुशीत बसले असताना नाना, अविनाश आणि अच्युत आले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अच्युत - अरे वा, खुशीत दिसताय! काय चर्चा चालली आहे?

भास्कर - मोदीजी हजर राहिले नसते, तर भारत वर्ल्ड कप जिंकला असता का, अशी चर्चा करतोय आम्ही.

अविनाश - (भडकून) त्याचा काय संबंध? खेळ हा खेळ असतो. जो त्या दिवशी चांगला खेळेल, तो जिंकणार.

भास्कर - आमचंही असंच मत होतं, पण ‘गोदी मीडिया’ने मुद्दा मांडला की, केवळ खेळाडूंच्या प्रतिभेवर आणि मेहनतीवर वर्ल्ड कप जिंकता येत नाही. त्यासाठी मोदीजींसारख्या ‘अवतारपुरुषा’ची ‘किस्मत’ टीमच्या मागे असावी लागते.

समर - (दुष्टपणे हसत) मला पटलं होतं ते.

पांडेजी - (चहा आणून ठेवत आणि हसत) सही हैं बात. लेकिन अब की बार मोदीजी की किस्मत ‘टीम इंडिया’ के कुछ काम नहीं आई.

अविनाश - तुम्हाला काय म्हणायचं आहे, हे माहीत आहे आम्हाला.

(मॅच सुरू असताना मध्येच मोदीजी स्टेडियममध्ये येऊन बसले. तेव्हा भारत आता हरणार, असे ट्वीट काही लोक करू लागले. अर्थात चेष्टने. पण मग भारत खरंच हरला, तेव्हा ‘मोदीजी हे पनौती आहेत आणि त्यामुळे भारत हरला’, अशा आशयाच्या ट्वीटचा पाऊस पडला. ‘पनौती’ हा शब्द ट्वीटरवर ट्रेंड होऊ लागला. पुढच्या दोन दिवसांत ‘पनौती, पनौती’ असा गजर भारतभर सुरू झाला. अविनाशच्या ‘तुम्हाला काय म्हणायचं आहे’ या वाक्याला हा संदर्भ होता.)

भास्कर - काय म्हणायचे आहे आम्हाला?

अविनाश - बघा आपल्या मनात डोकावून. तुमच्या काळ्या मनात ते काळे शब्द उठून दिसतील.

समर - काळ्यावर काळं कसं उठून दिसणार?

अविनाश - तू बडबड करू नकोस. तू शाळेत चित्रकलेत नापास व्हायचास.

समर - (हसत) आणि तू सायन्स-गणितात.

अविनाश - (चिडून) गप्प बस!

अच्युत - आपण विषय बदलायला नको. मोदीजींना ‘पनौती’ म्हणायला लागले आहेत, ते अतिशय घृणास्पद आहे.

भास्कर - (हसत) खरंच आहे!

भास्कर - बाय द वे, राहुल गांधींना ‘पप्पू’ म्हणणं कितपत योग्य होतं?

अविनाश - १०० टक्के योग्य!

समर - (हसत) आता ‘पनौती’ हे नाव पडल्यावर राहुल गांधी म्हणाले की, हे कर्म आहे. कर्मा इज व्हिजिटिंग मोदीजी!

अविनाश - कसलं कर्म?

भास्कर - तुम्ही राहुलला हजारो कोटी रुपयांची कॅम्पेन करून ‘पप्पू’ ठरवायचा प्रयत्न केलात, आता नियतीनं सूड घेतला.

अच्युत - कसला सूड घेतला?

भास्कर - एक घटना काय घडते आणि ‘पनौती’ हे नाव काय चिकटतं?

अविनाश - काही चिकटलं नाहिये नाव. मोदीजी भारताचे ‘भाग्यविधाता’ आहेत.

नाना - अवतार आहेत ते. ते नियती घडवतात. नियती त्यांचं काही बिघडवू शकत नाही.

अच्युत - पण एक गोष्ट खरी, मोदीजींना असं काही म्हटलं जाईल, असं वाटलं नव्हतं.

भास्कर - हो ना! फारच दुर्दैवी आहे हा प्रकार! देशाच्या पंतप्रधानाला असं म्हणणं वाईटच.

अविनाश - नुसतं तोंडदेखलं बोलू नकोस.

भास्कर – अरे, माझा खरंच विरोध आहे मोदीजींना असं काही म्हणायला.

अविनाश - तुझ्या चेहऱ्यावरून वाटत नाहिये तसं.

भास्कर - माझ्या चेहऱ्यावर हसू आहे, कारण मला ‘पनौती’ हे नाव पाडणाऱ्या लोकांचं हसू येतंय. किती उथळ असतात लोक!

समर - राहुल गांधी यांना ‘पप्पू’ म्हटलं गेलं, तेव्हा हेच लोक हसले होते.

अविनाश - तुला कशाचं हसू येतंय, हे चांगलं माहीत आहे मला!

भास्कर - कशाचं हसू येतंय मला?

अविनाश - विकृत आहेस तू.

समर – अरे, चिडतोस काय? लोक उथळच असतात.

भास्कर - राहुल गांधी ‘पप्पू’ आहेत, यावर नव्हता का विश्वास ठेवला त्यांनी?

अविनाश - तो आहेच ‘पप्पू’!

भास्कर - तू राहुल गांधींना अरे-तुरे का करतो आहेस?

अविनाश - तो ‘पप्पू’ आहे म्हणून.

भास्कर - नाना, तुम्ही सांगा, राहुल गांधी खासदार आहेत. त्यांना ‘अरे-तुरे’ करणं योग्य आहे का?

नाना - तो खासदार आहे, तेव्हा त्याला ‘अहो-जाहो’ करायला हवं.

अविनाश - क्या बात हैं नाना! मानलं तुम्हाला. खरे राजकारणी आहात तुम्ही!

(मोदीकालीन भारतात अशा स्वरूपाच्या आचरट बोलण्यालाच ‘राजकारण’ म्हणायची पद्धत पडली होती. - संपादक)

अच्युत - हे बरोबर नाही नाना!

अविनाश - काय चपराक दिलीय नाना तुम्ही या ‘लिब्रांडू’ लोकांना!

नाना (गालातल्या गालात हसत) राहुल गांधीला ‘अहो-जाहो’ करायला पाहिजे.

भास्कर - (हसत) ठीक आहे. नाना म्हणत आहेत ते योग्य आहे. अविनाश तू राहुल गांधींना आजपासून ‘अहो-जाहो’ कर.

अविनाश - घंटा!

समर - आता राहुल गांधींना ‘अरे तुरे’ करणं हा नानांचा अपमान ठरेल.

अच्युत - (हसत) गुड शॉट भास्कर!

अविनाश - (भयंकर संतापत) अच्युत तू आदरणीय नानांना भास्करने शॉट दिलाय, असं म्हणतो आहेस? तुला लाजबीज काही आहे की नाही?

अच्युत - (घाबरत) नानांना शॉट दिलाय असं म्हणायचं नव्हतं मला. नाना जे बोलले त्याला ‘गुड शॉट’ दिलाय, असं म्हणायचं होतं मला.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

अविनाश - तिकडं मोदीजी भारताचं ‘प्रेस्टीज’ वाढवत आहेत आणि तुम्ही काय बोलताय त्यांच्याबद्दल?

भास्कर - कुठं वाढवलं प्रेस्टीज त्यांनी?

अविनाश - मोदीजी हमास आणि इस्राइल युद्धात इस्राइलच्या बाजूने उभे राहिले आहेत. केवढी मोठी घटना आहे! आजवर भारताच्या कुठल्याच पंतप्रधानानं ही हिंमत दाखवली नव्हती.

(१९४८ साली इस्राइल स्थापन झाल्यापासून पॅलेस्टिनी मुसलमान आणि इस्राइलचे ज्यू, असा संघर्ष खदखदत होता. दोन्ही पक्षांत अधूनमधून युद्धे आणि छोटा-मोठा हिंसाचार सुमारे ७५ वर्षं होत राहिला होता. या युद्धात तटस्थ राहायचे आणि बाजू घ्यायचीच वेळ आली, तर पॅलेस्टाईनची बाजू मोघम शब्दांत घ्यायची, अशी भारताची रणनीती होती. कारण भारत खनिज तेलासाठी अरब देशांवर अवलंबून होता. अरब मुस्लिमांना दुखावणं देशहिताचं नव्हतं.)

भास्कर - अरे आपल्याला अरबांचं तेल हवं आहे.

अविनाश - मोदीजींनी खुल्लम खुल्ला इस्राइलची बाजू घेतली. याला म्हणतात ‘गट्स’. मोदीजी अवतार आहेत, असं आम्ही म्हणतो, ते उगीच नाही.

समर - पण मग नंतर दोन दिवसांनी आपण पॅलेस्टाईनची बाजू का घेतली?

अविनाश - कुठे घेतली?

भास्कर - (मोबाइलमध्ये लिंक उघडत) हे बघ ‘डेक्कन हेरल्ड’मध्ये बातमी आहे. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका मोदीजींच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे.

अविनाश - असं कसं असेल?

भास्कर - मोदीजींनी इस्राइलला पूर्ण पाठिंबा दिला आहे, पण परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय की, आमचा पॅलेस्टाईनच्या ध्येयधोरणांना पाठिंबा आहे आणि राहील, परंतु त्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा नाही.

पांडेजी - अरे बापरे, ये दो अलग भूमिकाएं हो गई! 

अविनाश - मोदीजी योग्य आहेत. इस्राईलला पाठिंबा देणं योग्यच आहे.

भास्कर – अरे, पण मोदीजींचे परराष्ट्र मंत्रालय वेगळंच बोलतंय.

पांडेजी - अगर राहुल प्रधानमंत्री होते और उनका मंत्रालय कुछ अलग बोल जाता, तो आप क्या कहते?

नाना - हम बोलते की, राहुल बेवकूफ हैं.

भास्कर - और अब आप क्या बोलोगे?

नाना - अब हम कहेंगे की, मंत्रालय बेवकूफ हैं.

अविनाश - काय शॉट मारलाय नाना तुम्ही.

(मोदीकालीन भारतात ‘लॉजिक’ सोडून आपल्याला सोयीचं बोलत राहणं, म्हणजेच हजरजबाबीपणा असा अनेकांचा समज झाला होता.)

समर - एक सांगा आपण खनिज तेलासाठी अरबांवर अवलंबून असताना, मोदीजी इस्राइलच्या बाजूला का उभे राहिले?

नाना - आता भारताचं ‘प्रेस्टीज’ खूप वाढलं आहे. मुसलमान देश आपल्याला घाबरून राहत आहेत, हे मोदीजींना चांगलं माहीत आहे. त्यामुळे बिनधास्त बोलतात मोदीजी.

भास्कर - पण मग नंतर परराष्ट्र मंत्रालय वेगळी भूमिका का मांडतंय?

नाना - तीच तर गंमत आहे. दुखावलेल्या मुस्लीम राष्ट्रांच्या जखमांवर कुणीतरी मलमपट्टी नको करायला?

अविनाश – गुड कॉप आणि बॅड कॉप पॉलिसी. एकानं मारायचं आणि एकानं चुचकारल्यासारखं करायचं!

नाना - जगाला दिसलं की, मोदीजी इस्राइलबरोबर उभे आहेत. आणि नंतर मुस्लीम राष्ट्रंसुद्धा खुश झाली.

भास्कर - मोदीजी विचार न करता बोलले आणि नंतर मुस्लीम राष्ट्रांचा राग बघून परराष्ट्र मंत्रालयाने भूमिका बदलली, असा अर्थ कुणी काढला, तर आपण काय करायचं?

अविनाश - (अत्यंत चिडत) तू गप्प बस! मूर्ख माणूस!

समर - अरे चिडतोस काय? उत्तर दे की!

अविनाश - उत्तर काय द्यायचं? मोदीजी मुसलमानांना कधी घाबरतील का? शक्य आहे का ते?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भास्कर - विरोधी पक्ष म्हणतायत की मोदीजी फक्त भक्तांना खुश करण्यासाठी बोलत असतात. त्यांना खुश करताना त्यांचा फक्त मतांकडे डोळा असतो. देशहित वगैरे गोष्टींचा विचारच ते करत नाहीत.

अविनाश - भक्तांना खुश करण्याचा प्रश्नच नाहिये. आम्ही आमची हृदयं त्यांना देऊन टाकली आहेत.

समर - भक्त सांभाळायचे म्हणजे खायचे काम नाही. रोज सकाळी उठल्या उठल्या त्यांना कसली ना कसली अफू द्यायला लागते.

भास्कर - कधी विश्वविजयाची, कधी विश्वगुरुत्वाची, कधी गेल्या ७० वर्षांत न झालेल्या प्रगतीची, कधी मुसलमानांना त्यांची जागा दाखवल्याची. (जोरात हसतो)

अविनाश - आपण आहोत विश्वगुरू! सगळं जग नम्र झालंय भारतापुढं. नतमस्तक झालंय!

समर - सगळं जग नतमस्तक झालंय, तर परराष्ट्र मंत्रालयाला सांभाळून का घ्यावं लागतंय मुस्लीम राष्ट्रांना?

अविनाश - तू गप्प बस. तुला काही कळत नाहिये.

अच्युत – खरं तर, एकाच विषयावर जगाच्या समोर दोन विरोधी ‘स्टेटमेंट’ देणं बरोबर नाहिये.

अविनाश - तू गप्प बस. 

(अच्युत मोदीभक्तांच्या गटातला असला, तरी हळूहळू तो प्रश्न विचारायला लागला होता. २०१४ साली भक्त बनलेले अनेक लोक आता प्रश्न विचारू लागले होते. त्यामुळे ‘मोदी-लहर’ ओसरायला लागली आहे, असे अनेक पत्रकार बोलू लागले होते.)

भास्कर - मला एक सांग अविनाश, मोदीजी इस्राइलबरोबर उभे आहेत ना नक्की? 

अविनाश - आहेतच! अगदी १०० टक्के उभे आहेत.

भास्कर - मग ‘युनायटेड नेशन्स’मध्ये तुम्ही इस्राइलच्या विरोधात मत का दिलंत?

अविनाश - कुठं दिलं? अजिबात दिलं नाही.

भास्कर - ही बघ ‘द हिंदू’मधली बातमी- ‘इंडिया वोटस अगेंस्ट इझरेली सेटलमेंट्स’. १२ नोव्हेंबरची बातमी आहे.

अविनाश - (बघत) फालतू आहे ‘द हिंदू’, बंद केला पाहिजे हा पेपर.

भास्कर - हे बघ ‘हिंदुस्तान टाइम्स’नेसुद्धा हीच बातमी दिली आहे. हा बघ, ‘द इकॉनॉमिक टाईम्स’! यानेसुद्धा तीच बातमी दिली आहे. ही बघ, ‘बिझनेस स्टॅन्डर्ड’मधली बातमी. ही बघ, ‘इंडिया टुडे’ मधली.

अच्युत - एवढी सगळी वर्तमानपत्रं खोट कसं बोलतील?

नाना - तुम्हाला कळणार नाही ते. आंतरराष्ट्रीय संबंध ही फार गुंतागुंतीची गोष्ट आहे.

अच्युत - काही गुंतागुंतीची गोष्ट नाही. एकदा तुम्ही म्हणता आम्ही इस्राइलला पाठिंबा देतोय आणि मग ‘युनायटेड नेशन्स’मध्ये त्यांच्याविरुद्ध मत देता.

समर - आणि म्हणता आम्ही ‘विश्वगुरू’!

अविनाश - आहोतच आपण ‘विश्वगुरू’.

भास्कर - एवढा आरडाओरडा करण्यापेक्षा मान्य कर ना की, मोदीजींनी इस्राइलला तुम्हा भक्तांना गंडवण्यापुरता पाठिंबा दिला आहे.

समर - अफूचा डोस!

नाना - हे बघा, तुम्हाला काही कळत नाहिये. तुम्ही त्या पुण्यात्म्यावर नाही नाही ते आरोप करू नका. प्रश्न हिंसाचाराचा आहे. हमासच्या आतंकवादाविरुद्ध उभं राहण्याचा आहे.

भास्कर - मग मोदीजींनी मणिपूरमधील हिंसाचाराचा निषेध का नाही केला?

नाना - केला आहे की!

भास्कर - कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, असं मोघम शब्दांत बोलले मोदीजी!

समर – तेसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आता केंद्राने काही केलं नाही, तर आम्हाला मणिपूर पोलिसांना आदेश द्यावे लागतील, असं म्हटल्यावर मोदीजी बोलले.

अविनाश - या सर्वोच्च न्यायालयाला मध्ये मध्ये बोलायला कुणी सांगितलं?

भास्कर - अरे ज्यांच्यावर बलात्कार झाले, त्या महिला गेल्या सर्वोच्च न्यायालयात. कित्येक केसेसमध्ये साधे एफआयआरसुद्धा दाखल केले गेले नव्हते.

नाना - मोदीजी म्हणाले आहेत, ना जे गुन्हेगार आहेत त्यांना कडक शिक्षा होतील म्हणून.

समर - पण सर्वोच्च न्यायालय म्हणतंय की, साधे एफआयआरसुद्धा दाखल होत नाहियेत. मग शोध कसा घेतला जाणार आणि आरोपी कसे सापडणार?

भास्कर - आणि आरोपी सापडले तरच केसेस चालणार आणि शिक्षा होणार ना? 

समर - साधा एफआयआर दाखल करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जायला लागतंय लोकांना आणि मोदीजी म्हणतायत की, आरोपींना शिक्षा होणार म्हणजे होणार.

भास्कर - बोलाचा भात आणि बोलाची कढी!

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

पांडेजी - किसीको सजा होना बहुत दूर की बात हैं. आप सिर्फ एक चीज बताइए नानाजी, राहुल गांधी मणिपूर गए वैसे मोदीजी क्यूं नही गए मणिपूर.

नाना - ती गोष्ट वेगळी आहे.

अविनाश - त्या राहुलला नाही काम आणि धाम. बोंबलत फिरत असतो. मोदीजी कामात असतात.

पांडेजी - ऐसा काहे कह रहें हो अविनाशजी. मणिपूर जाना मोदीजी का सिर्फ काम नहीं था, वो उनका परम कर्तव्य था.

नाना - (चिडून) आप मोदीजी को उनके कर्तव्य की जाण मत दे दो.

पांडेजी - कर्तव्य की जाण का मतलब?

समर - मोदीजी को उनका कर्तव्य क्या हैं, ये मत बताओ ऐसा कहना हैं आदरणीय नानाजीका.

भास्कर - जायला पाहिजे होतं मोदीजींनी मणिपूरला. लोकांना आधाराची गरज असते. लोक राहुलच्या गळ्यात पडून कसे रडले पाहिलं नाहीस का तू? किती आधार वाटला त्यांना.

अविनाश - तू गप्प बस. सगळं नाटक! ख्रिश्चन लोक सगळे. आधी काड्या करायच्या आणि मग मार खाल्ला की, गळ्यात पडून रडायचं.

(मोदीकालीन भारतात इतर धर्मातील लोक हे मानवेतर आहेत, अशीच भावना अनेक भक्तांच्या मनात तयार झाली होती. शिवाय, एखादी व्यक्ती इतर धर्मातील आहे, म्हणजेच ती दुष्ट, नाटकी आणि भारताच्या मुळावर आलेली आहे अशीही भावना भक्तांच्या मनात होती.)

समर - राहुल गांधी सगळ्यांना भेटले. कुकी, मैतेई आणि नागा अशा सगळ्या जातीजमातीच्या लोकांना भेटले. पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलं असं सगळ्यांना भेटले.

अविनाश - त्याला म्हणावं तू लहान मुलांनाच भेट फक्त, कारण तू ‘पप्पू’ आहेस.

(मोदीकालीन भारतात मानवता हे जीवनातील मध्यवर्ती मूल्य राहिलं नव्हतं. मानवता हा भक्तांच्या दृष्टीनं ‘ऑप्शनल सब्जेक्ट’ झाला होता. मानवतेच्या हितासाठी राजकारण केलं जात नव्हतं. राजकारणाच्या वेदीवर मानवतेचा बळी देऊन राजकीय स्वार्थ साधला जात होता आणि त्यालाच मुत्सद्दीपणा असं म्हटलं जाऊ लागलं होतं. - संपादक).

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भास्कर - मानवता टाळून तुम्ही राजकारण नाही करू शकत.

नाना - ते मानवता वगैरे ठीक आहे. आपण मुख्य प्रश्नाचा विचार करायला पाहिजे. मणिपूरमध्ये ५१ टक्के हिंदू लोक मणिपूरमधल्या फक्त १० टक्के जमिनीवर राहातायत आणि बाकीचे आदिवासी लोक ९० टक्के जमिनीवर राहातायत.

अविनाश - हिंदूना जागा नको जगायला? कशाला पाहिजे जमिनीचं आरक्षण तुम्हाला?

भास्कर - इस्राईलमधले ज्यू ९० टक्के जागेवर राहत आहेत आणि पॅलेस्टिनी लोक केवळ १० टक्के जागेवर राहत आहेत. पॅलेस्टिनी लोकांना जागा कमी पडते आहे आणि तरी तुम्ही इस्राईलला पाठिंबा देताय. तिथं मात्र १० टक्के जागेत राहणाऱ्या लोकांनी त्यांच्याकडे असलेल्या जागेतच राहावं, असं म्हणणं आहे तुमचं.

नाना - काय करणार, परिस्थितीच तशी आहे.

भास्कर - मग मणिपूरमध्ये १० टक्के जागेत राहणाऱ्या ५१ टक्के हिंदूंनी आहे, ती परिस्थिती का नाही स्वीकारायची?

नाना - हे बघा, जे लोक ‘मेजॉरिटी’मध्ये आहेत त्यांच्या काही गोष्टी तुम्ही ऐकल्या पाहिजेत. मग भले त्यात जे लोक ‘मायनॉरिटी’मध्ये आहेत त्यांच्यावर थोडा अन्याय झाला तरी हरकत नाही.

भास्कर - मग मराठा लोक बहुमतात आहेत ते आरक्षण मागत आहेत, त्यांना ते आरक्षण देऊन टाका, ते ‘मेजॉरिटी’मध्ये आहेत म्हणून.

अविनाश - तो नुसता मराठा आरक्षणाचा मुद्दा नाहिये. मराठा आरक्षण झालं की, गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचा मुद्दा पुढे येईल, हरयाणा- राजस्थान मध्ये गुज्जर आरक्षणाचा मुद्दा पुढे येईल. प्रत्येक राज्यात अशा मागण्या सुरू होतील.

भास्कर - होऊ द्या की. ते सगळे लोक मेजॉरिटीमध्ये आहेत.

अविनाश - काहीही बोलू नकोस.

भास्कर – अरे, हे मी नाही बोलत. नानाच म्हणतायत की, जे लोक ‘मेजॉरिटी’मध्ये आहेत, त्यांच्या काही गोष्टी तुम्ही ऐकल्या पाहिजेत म्हणून.

अविनाश - कुणाचेही असले लाड होणार नाहीत.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

प्रत्येक युगात एक तुका एका नव्या तंत्रावर स्वार होऊन पुढे येतो, त्याला ट्रोलही केलं जातं, पण तुका काही विस्मृतीत जात नाही!

पंढरीचे अभंग, विठ्ठलाची उराउरी भेट, तुकाराम आणि मी…

पंढरीचे अभंग, विठ्ठलाची उराउरी भेट, तुकाराम आणि मी… (उत्तरार्ध)

क्षुल्लक देवदेवतांचा व त्यांच्या पूजेचा निषेध करणाऱ्या तुकोबांना ‘पाखंडी’ म्हणता येईल काय?

ईदच्या दिवशी काय घडले! तुकोबांचे मशिदीत कीर्तन झाले!!

तुकाराम समजणे म्हणजे जीवन जगण्याचा सोपा मार्ग समजणे

.................................................................................................................................................................

अविनाश - जेव्हा धर्माची गोष्ट येते, तेव्हा ‘मेजॉरिटी’ महत्त्वाची.

समर - आणि जेव्हा जातींची गोष्ट येते तेव्हा ज्या ‘मायनॉरिटी’मधल्या जातींनी मेजॉरिटी जागा बळकावल्या आहेत त्या जाती महत्त्वाच्या का?

अविनाश - वाटेल ते बोलू नकोस. जातीयवादी कुठला.

भास्कर - आता आम्हीच जातीयवादी का?

नाना - तुम्ही मराठा लोकांना आरक्षण द्या असं कितीही म्हणाला, तरी सर्वोच्च न्यायालय म्हणेल तेच होणार आहे शेवटी.

भास्कर - हो का? हा अविनाश मघाशी म्हणत होता की महत्त्वाच्या गोष्टींमध्ये सुप्रीम कोर्टाने उगीच मधे मधे करू नये.

नाना - अविनाशचं म्हणणं असं होतं की कायदा आणि सुव्यवस्था ही सरकारची जबाबादारी आहे. त्यात सुप्रीम कोर्टानं बोलू नये.

भास्कर - पण सरकार कायद्याने वागतं आहे की नाही हे बघणं ही तर सुप्रीम कोर्टाची मुख्य जबाबदारी आहे.

नाना - तुम्ही विपर्यास करताय.

अविनाश - यांना विपर्यास करण्याशिवाय बाकी काही येतच नाही.

(मोदीकालीन भारतात भक्तांना चर्चेत निरुत्तर केले की तू विपर्यास करतो आहेस असं म्हणण्यायची पद्धत पडून गेली होती.)

भास्कर - कसलाही विपर्यास नाहिये. अगदी साधी गोष्ट आहे. मणिपूरमध्ये तुम्हाला मेजॉरिटी म्हणतेय तसे व्हायला हवे आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला मायनॉरिटी म्हणते तसे व्हायला हवे आहे. मणिपूरमध्ये ज्यांच्याकडे जमीन कमी आहे त्यांना जास्त जमीन द्यायला हवी आहे. इस्राइलमध्ये मात्र ज्यांना जमीन कमी पडते आहे त्यांनी आहे त्या जमिनीवर भागवले पाहिजे असे तुमचे मत आहे. मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कमी पडत असली तरी सुप्रीम कोर्टाने तुमच्या मते बोलायला नको आहे. मराठा आरक्षणाबाबत मात्र सगळ्यांनी सुप्रीम कोर्टाचे ऐकायला पाहिजे असे तुमचे मत आहे. थोडक्यात स्वार्थाशिवाय तुमच्याकडे कसलेही मूल्य नाही.

समर - अरे भास्कर, यांना स्वतःचा खरा स्वार्थ कळला असता तर हे लोक जरा व्यवस्थित वागले असते. पण यांच्याकडे तीनच मुद्दे आहेत. एक म्हणजे आम्हाला सत्ता द्या, दुसरे म्हणजे आरक्षण रद्द करा आणि तिसरे म्हणजे मुसलमान लोकांची गोची करून ठेवा!

भास्कर - आपल्या स्वार्थापेक्षा मूल्य जास्त महत्त्वाची असतात हे यांना कधी कळूच शकत नाही.

अविनाश - तुमच्या तत्त्वांमुळे आणि मूल्यामुळे देशाची फाळणी झाली आहे. तुम्ही बसा तत्त्व कुरवाळत आता १४ सालापासून लोकांनी देश समर्थ हातांमध्ये दिला आहे.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

भास्कर - येत्या तीन डिसेंबरला कळेल. पाचही राज्य जाणार आहेत तुमच्या हातून!

अविनाश - पैज?

भास्कर - कर्नाटकच्या वेळी एवढी मोठी पैज हरला होतास ना?

नाना - त्याच्या आधी किमान दहा वेळा हरला होता तुम्ही.

अविनाश - काय शॉट मारलाय नाना तुम्ही!

अच्युत - या वेळी छोटी पैज लावा. मलाही भाजपा चं खरं वाटत नाहिये या वेळी.

अविनाश - तू त्यांच्यातलाच बनला आहेस अच्युत.

अच्युत - मोठी पैज लावयची असेल तर तू लाव! गेल्यावेळी सगळे पैसे मला द्यायला लागले होते.

भास्कर - का?

अच्युत - अविनाश म्हणाला आपण हरलो आहे आपण पैजेची पार्टी द्यायला नको!

भास्कर - का?

अच्युत - तो म्हणाला की कर्नाटकाच्या मूर्ख जनतेने मोदीजींचा अपमान केला आहे. आता आपण मोदी-विरोधकांना पार्टी देऊन मोदीजींचा अजून अपमान करायला नको.

अविनाश - (भयंकर संतापत) आपल्यातल्या खाजगी गोष्टी बाहेर का काढतो आहेस?

अच्युत - हे बघ, या वेळी तू पैसे देणार असलास तरच आपण पैज लावू.

अविनाश - (दोन हजार रुपये त्याच्या अंगावर टाकत) हे घे पैसे.

अच्युत - (घेत) यातले एकच हजार मागच्या पार्टीचे. आणि एक हजार या वेळी पैज हरलो, तर अॅडव्हान्स.

भास्कर - काय लावायची पैज?

अविनाश - भाजपा सगळी राज्य जिंकणार आहे. पाच पैकी पाच. एक राज्य जरी काँग्रेसला मिळालं, तरी मी पार्टी देईन.

समर - काय पैज बोल! 

भास्कर - या वेळी पिझ्झा वगैरे नको. मोदीजी हरले, तर तुम्ही आम्हाला ‘शाही गुजराती थाळी’ द्यायची, नाहीतर आम्ही तुम्हाला ‘शाही मराठी थाळी’ देऊ.

समर - मोदीजी हरल्यावर ‘गुजराती थाळी’ खायला मजा येईल!

नाना - नाही जिंकणार तुम्ही पैज!

भास्कर - १०० टक्के जिंकणार आम्ही!

अविनाश - लागली पैज!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मोदीकालीन भारतात हे सगळे असे होते. मणिपूर वेदनांनी कळवळत होते, पण भक्त आणि त्यांचे विरोधक निवडणुकीच्या राजकारणात मग्न होते. शिरोजीने या बखरीमध्ये हा मुद्दा स्पष्टपणे मांडला नसला, तरी त्याने रोजनिशीमध्ये आपली ही व्यथा अतिशय कडक शब्दांत लिहून ठेवली आहे.

एवढी मोठी ‘ह्यूमन ट्रॅजडी’ घडली आणि तरीही दुःखाची एकही लहर भारतीय जनमानसात उमटलेली दिसत नव्हती. मन विदीर्ण करणारी घटना होती ही. १९१३ साली झालेल्या निर्भया प्रकरणात एका मुलीवर नृशंस अत्याचार केले गेले होते. त्यामुळे किती गदारोळ उठला होता!

माणूस म्हणून जन्माला आलेली जनावरे अत्याचार करतच राहणार. कुठलंच सरकार आपल्या प्रत्येक नागरिकाला संपूर्ण संरक्षण देऊ शकत नाही- काँग्रेसही नाही आणि भाजपही नाही. पण, निर्भयाच्या वेळी स्त्रीच्या संरक्षणासाठी गळे काढणारे भाजपासमर्थक अत्याचार झालेल्या मुली कुकी किंवा ख्रिश्चन आहेत, म्हणून मूग गिळून गप्प बसले होते. केंद्रात आणि मणिपूरमध्ये आपलं सरकार आहे, म्हणून गप्प बसले होते. मोदीविरोधकांनासुद्धा या अत्याचारांबद्दल रान उठवावंसं वाटलं नाही. मोदी सरकार जनतेमध्ये हळूहळू अप्रिय होत आहे, असा विचार करून ते आपल्या आनंदात मश्गूल होऊन बसले होते!

तुम्ही उजवे असा वा डावे, ज्या वेळी तुम्हाला ‘मानवते’पेक्षा ‘राजकारण’ मोठं वाटू लागतं, तेव्हा तुम्हाला तुमच्या ‘विचारसरणीची अफू’ चढली आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे, असं शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये ठळक अक्षरांत लिहून ठेवलं आहे.

२०२३मध्ये मणिपूर मध्ये घडलेल्या घटनांमुळे शिरोजी एक व्यक्ती म्हणून निराश झाला होता. परंतु, शिरोजीमधल्या इतिहासकाराला निराश होऊन चालणार नव्हते. तो विनोदाचा मुखवटा चढवून आपल्या बखरी लिहीत राहिला होता. जेव्हा एक व्यक्ती म्हणून त्याला आपले अश्रू अनावर होत होते तेव्हा तो रोजनिशीमध्ये आपल्या अश्रूंना वाट करून देत होता.

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा