तुकाराम समजणे म्हणजे जीवन जगण्याचा सोपा मार्ग समजणे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
सुनील क्षीरसागर 
  • डॉ. आ. ह. साळुंखे आणि ‘न सरे ऐसे तुकोबांचे दान’
  • Fri , 14 June 2019
  • ग्रंथनामा शिफारस डॉ. आ. ह. साळुंखे A. H. Salunkhe न सरे ऐसे तुकोबांचे दान Na Sare Aise Tukobanche Dan

प्राच्यविद्यापंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यानिमित्त १ व २ जून रोजी एसेम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने साळुंखे यांचा साहित्य अभिवादन आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. बहुजनांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे यासाठी आणि अनार्य संस्कृतीच्या महामानवाचे मोठेपण समाजासमोर आणण्यासाठी साळुंखे यांनी दिशादर्शक लिखाण केले आहे. त्यामुळे फाउंडेशनचे सुभाष वारे यांनी साळुंखे यांच्या ७५ पुस्तकांविषयी ७५ कार्यकर्त्यांकडून लेख लिहून घेतले. या ७५ कार्यकर्त्यांच्याच हस्ते २ जून रोजी साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. त्या ७५ लेखांपैकी तीन लेख ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होत आहेत. त्यातील हा दुसरा.

.............................................................................................................................................

जीवन जगण्याचे अत्यंत साधे, सोपे मार्ग आपल्याला महापुरुष आणि संतपरंपरेनं दिले आहेत. मात्र हे सुलभीकरण मूठभर मार्तंडांची दुकानदारी संपवेल म्हणून समाजासमोर येणार नाहीत किंवा गूढ तत्त्वज्ञान म्हणूनच कसं येईल आणि पुन्हा हे तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी त्या कथित मार्तंडांचीच गरज कशी लागेल, अशी व्यवस्था जाणीवपूर्वक निर्माण केली गेली. या व्यवस्थेला छेद देण्याचं काम ज्यांनी केलं, त्यात आ. ह. साळुंखे यांचं नाव घ्यावं लागेल.

संत तुकाराम हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक क्रांतिकारी पर्व. तुकाराम समजणं म्हणजे जीवन जगण्याचा सोपा मार्ग समजणं. ‘न सरे ऐसे ज्याचे दान, त्याचे कोण उपकार?’ असं स्वतः तुकारामांनीच सांगितलं होतं. त्याच तुकारामांनी आपल्या अभंगांमधून जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानाची जी शिदोरी दिली, ते ज्ञान जगणं सोपं करणारं आहे. म्हणूनच हे दान कधीच संपणारं नाही. आपल्या प्रत्येक अडचणीत, द्विधा मन:स्थितीत मार्ग दाखवणारं आहे. म्हणूनच ‘न सरे ऐसे ज्याचे दान’ या अभंगाचं कृतिशील अनुपालन म्हणून ‘न सरे ऐसे तुकोबांचे दान’ या पुस्तकाकडे पाहावं लागेल. साळुंखे यांच्या आकाशवाणी सातारा केंद्रावरील विवेचनाचा संग्रह असलेलं हे पुस्तक तुकारामांचा जीवनविषयक दृष्टिकोन स्पष्ट करणारं आहे. 

तुकाराम जगण्याकडे कसं पाहत होते आणि समाज तुकारामांना आदर्श का मानत  होता, हे सांगताना ‘स्वतः तुकारामांनीही तितकंच उत्कट प्रेम या लोकांवर केलं होतं’, हे सोप्या शब्दांत मांडण्यात आलं आहे. विद्रोही विचार मांडणाऱ्या कोणत्याही महापुरुषाला बदनाम करायचं, नकारात्मक रंगवायचं आणि ते जमलं नाही तर देवत्व बहाल करायचं, हा इथल्या व्यवस्थेचा आवडीचा खेळ. संत तुकारामदेखील त्याला अपवाद ठरले नाहीत.

तुकारामांचं व्यक्तिगत आयुष्य नकारात्मक रंगवलं गेलं, त्यांना पलायनवादी दाखवलं गेलं, या मनोवृत्तीचा समाचार घेत, तुकारामांच्याच अभंगाचा आधार घेत त्यांचं खरं रूप साळुंखे मांडतात. ‘त्यांचं (तुकारामांचं) संतत्व असहायतेतून निर्माण झालेलं नव्हतं. ते काही त्यांनी परिस्थितीच्या रेट्यापुढे झुकून पत्करलेलं नव्हतं. ती पलायनवादातून निर्माण झालेली नकारात्मक घटना नव्हती. ते त्यांनी स्वीकारलेल्या एका उत्कट जीवननिष्ठेचं भावात्मक फळ होतं. बुडणाऱ्या, रंजलेल्या-गांजलेल्या लोकांना धीर देणं, दिलासा देणं, त्यांच्या जीवनात आनंद फुलवणं, हीच ती जीवन निष्ठा होती’ असं तुकारामाच्या जीवननिष्ठेचं वर्णन साळुंखे यांनी केलं आहे.

‘उच्च निच काही नेणे हा भगवंत’ हा तुकारामांचा अभंग म्हणजे ‘ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग आणि अधिकार फक्त विशिष्ट लोकांनाच असतो, हा काही लोकांनी मांडलेला विचारही त्यांनी नाकारला. याबाबतीत जात वर्णच नव्हे तर, वय आणि लिंग हे भेदही त्यांना मान्य नव्हते’ असं जेव्हा साळुंखे मांडतात, त्यावेळी तुकारामांनी त्या काळात कशी क्रांतिकारी भूमिका घेतली, हे स्पष्ट होतं.

‘मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या अभंगातून मनाच्या प्रसन्नतेला महत्त्व देणारे तुकाराम, ‘साधूंनी बचनाग खाती तोळातोळा’ यातील ‘बचनाग’ म्हणजे जालीम विष. म्हणजे सरावानं जालीम विषदेखील पचवता येतं, हा ‘असाध्य ते साध्य’चा संदेश देणारे तुकाराम, ‘भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे’ या अभंगातून समोर येणारा तुकारामांचा  प्रयत्नवाद वाढवणारा वास्तववादी दृष्टिकोन, संसार करायचा पण त्यातच गुरफटून राहायचं नाही असं ‘सुखे करावा संसार, परी न सांडावे दोन्ही वार’ सांगणारे वास्तववादी तुकाराम, ‘जाऊनिया तीर्था काय तुवा केले? चर्म प्रक्षाळिले वरी वरी’ या शब्दांत कर्मनिष्ठा मांडणारे तुकाराम, अशी तुकारामांची वेगवेगळी रूपं आपणास या पुस्तकातून पाहायला मिळतात. 

तुकारामांनी अंधश्रद्धेवर केलेला प्रहार, मग तो ‘नवसे कन्यापुत्र होती, तरी का करणे लागे पती?’ हा अभंग असेल अथवा ‘देव्हारा बैसोनि हालविती सुपे, ऐसी पापी पापे लिंपताती’ हा अभंग, ‘ईश्वराच्या नावावर चालणारी अंधश्रद्धाही त्यांना सहन होत नव्हती’ हे साळुंखे यांनी केलेलं विवेचन डोळे उघडवणारं आहे.

‘तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बीबुडी करी आधी’ या अभंगात आशेचं बी बुडवून टाकलं पाहिजे हे सांगण्यासाठी ‘बीबुडी’ हा शब्दप्रयोग वापरणारे शब्दप्रभू तुकाराम समोर येतात. रुक्ष,  भावनाशून्य शहाणपणावर ‘आणिकां छळावया जालासी शहाणा’ असा प्रहार करणारे, ‘काही वेळा माणसं ग्रंथाच्या पाठांतरातच अडकून पडतात, अर्थाची फिकीरच करत नाहीत, अर्थाची उपेक्षा करून नुसतं पाठांतर करणं व्यर्थ आहे’ हे ‘घोडे काय थोडे वागविले ओझे? भावेविण तैसे पाठांतर’ या रूपकातून मांडणारे तुकाराम या पुस्तकातून समोर येतात. 

‘नका दंत कथा येथे सांगो कोणी, कोरडे ते मानी, बोल कोण?’ अर्थात पोकळ गप्पांपेक्षा अनुभवाला महत्त्व देण्याचा तुकारामांनी दिलेला संदेश सांगतानाच त्याचा आजच्या जगण्याशी कालसंगत धागा साळुंखे जोडतात. ‘आजचं विज्ञान सत्याचा शोध घेऊ पाहणाऱ्यांकडून याच अपेक्षा बाळगत असतं. त्यांनी त्याच कसोट्यांचं पालन केलं पाहिजे, ही त्यांची भूमिका असते.

दंतकथा, ऐकीव माहिती, परंपरा, ग्रंथप्रामाण्य, व्यक्तिप्रामाण्य अशा गोष्टींपेक्षा चिकित्सा, प्रयोग, स्वानुभव यासारख्या गोष्टींच्या आधारे सत्याच्या जवळ जाता येतं व सत्य जाणता येतं, ही विज्ञानाची संशोधनशैली आहे. तुकारामांना आधुनिक विज्ञानाचे असे सिद्धांत माहीत होते, असं मला मुळीच म्हणायचं नाही. तथापि ते आपल्या विवेकाच्या आधारे त्याच पद्धतीचा विचार करत होते, एवढं मात्र नक्की म्हणता येत, या शब्दांत साळुंखे विवेकवादी तुकाराम मांडतात. 

तुकारामांची अशी वेगवेगळी रूपं मांडताना तुकारामांनी गुरुशिष्य नात्यावर केलेलं भाष्य महत्त्वाचं आहे. ‘गुरुशिष्याचं चाकोरीतलं कृत्रिम नातं तुकारामांना मान्य नव्हतं. गुरूनं समवृत्तीनं आणि निरपेक्ष भावनेनं सर्वांना उपदेश करावा, हा विचार मांडताना तुकाराम म्हणतात ‘मेघवृष्टीने करावा उपदेश....’ मेघ जसा कसलाही भेदभाव न करता सर्वांसाठी जलाचा वर्षाव करतो, सर्वांची तहान भागवतो, तसंच गुरूचं वागणं हवं.

एखाद्यालाच जवळ करून त्याला शिष्य करायचं आणि इतरांना वाऱ्यावर सोडायचं असा दुजाभाव गुरूनं करता कामा नये. म्हणूनच मेघवृष्टीनं उपदेश करावा असं सांगून झाल्यावर तुकाराम लगेच म्हणतात ‘परी गुरुने न करावा शिष्य’. सगळ्या समाजाच्या कल्याणाची काळजी वाहणारानं फक्त एखाद्याला जवळ करून शिष्य बनवणं तुकारामांना मान्य नव्हतं. द्रोणानं अर्जुनाच्या बाजूनं आणि एकलव्याच्या विरोधात केलेला पक्षपात संवेदनशील मनावर जखमा करणारा होता. तुकाराम अशा पक्षपाताला मान्यता देणं कदापि शक्य नव्हतं. त्यांनी याच अर्थाचं आणखी एक सुरेख वचन एका अभंगात लिहिलं आहे. ते म्हणतात ‘मेघवृष्टी काही न विचारी ठाव, जैसा ज्याचा भाव त्यासी फळे’. 

या आणि अशा विविध अभंगांचं विवेचन करत तुकारामाची जीवननिष्ठा ते त्यांनी जीवन जगण्यासाठी दिलेलं ज्ञान, तत्त्वज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग म्हणूनच साळुंखे यांना महत्त्वाचा वाटतो. ज्याचं कोणत्याही क्षेत्रातील योगदान आयुष्यभर, अनेक पिढ्यांपर्यंत टिकत नाही, मध्येच संपून जातं, त्याचं कार्य समाजाला फार उपकृत करणारं नसतं. त्याचे काही फार मोठे उपकार नसतात. ज्यानं दिलेलं दान कधी संपत नाही, त्याचे खरे उपकार असतात.

तुकाराम आणि त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचं योगदान असंच न सरणारं आहे. म्हणूनच ‘न सरे ऐसे तुकोबांचे दान’ हे पुस्तक जगण्याची शिदोरी आहे. 

.............................................................................................................................................

डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......