‘नागकिन्नरी’ ही किशोर तरवडे या लेखकाची कादंबरी मराठीसाहित्याला फारशा परिचित नसलेल्या एका आगळ्यावेगळ्या विषयावरची आहे. ती समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी इत्यादी वंचित लैंगिक ओळखींची घुसमट तर मांडतेच; परंतु समाजातील, संस्कृतीतील विषमलिंगी चौकटीलाही छेदण्याचा प्रयत्न करते. मैत्री पब्लिकेशनतर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या कादंबरीला जमीर कांबळे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
‘नागकिन्नरी’ या किशोर तरवडेंच्या कादंबरीचं मनापासून स्वागत आहे. ही मला प्रामुख्यानं दोन कारणांसाठी महत्त्वाची वाटते. एक म्हणजे, ही समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी इत्यादी वंचित लैंगिक ओळखींच्या घुसमटीला तर मांडतेच; परंतु समाजातील, संस्कृतीतील विषमलिंगी चौकटीलाही छेदण्याचा प्रयत्न करते. समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी आणि इतर अनेक लैंगिक ओळख सांगणाऱ्या माणसांचे, समूहांचे, ते ‘नॉर्मल’ नाहीत, ‘विकृत’ आहेत, ‘एक आजार’ आहेत, असं संबोधून, जगभरात, शतकांपासून, शोषण होत आले आहे.
स्त्रियांचा वेश करणारे, स्त्रियांसारखे चालणारे, बोलणारे, वागणारे पुरुष किंवा पुरुषांचा वेश करणारे, पुरुषांसारखे चालणाऱ्या, बोलणाऱ्या, वागणाऱ्या स्त्रिया; स्वतःची ‘स्त्री’ म्हणून ओळख सांगणारे पुरुष किंवा ‘पुरुष’ म्हणून ओळख सांगणाऱ्या स्त्रिया; पुरुषांचे लैंगिक, भावनिक आकर्षण वाटणारे पुरुष किंवा स्त्रियांचे लैंगिक, भावनिक आकर्षण वाटणाऱ्या स्त्रिया; स्त्री आणि पुरुष अशा दोघांचे लैंगिक, भावनिक आकर्षण वाटणारे स्त्री-पुरुष आणि इतर अजून असंख्य माणसांना अगदी कायद्याच्या चौकटीतसुद्धा ‘अनैसर्गिक’ म्हणून गुन्हेगार ठरवले जात होते.
आणि याच समजुतीचे बळी म्हणून ‘एलजीबीटी’ इत्यादी व्यक्तींना आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हिंसेला, अत्याचाराला सामोरे जावे लागले होते आणि आजही जावे लागते. ही समज, हा द्वेष, ही हिंसा एकच निकष, एकच परिमाण मानत आली आहे की, ज्या लैंगिक संबंधातून प्रजजन घडते, तेच बरोबर आहे… प्रमाणाशी सुसंगत, ‘नॉर्मल’, नैसर्गिक आहे, त्यालाच सामाजिक मान्यता आहे आणि त्यालाच मानवी अधिकार आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हे परिमाण आपल्या समाजातील आणि संस्कृतीतील शतकांच्या जुन्या, पारंपरिक ‘लिंगभाव’ संस्थेने तयार केलेले परिमाण आहे. ही लिंगभाव संस्था आपले लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता ठरवते; आपली ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ या नावांची ओळख ठरवते; पुढे स्त्री-पुरुष म्हणून समाजातील, संस्कृतीतील, अर्थव्यवस्थेतील, कायद्यातील आपली सत्ता, आपले स्थानही ठरवते. आपली वेशभूषा, केशभूषा, आपले बोलणे, चालणे, वागणे ठरवते. आपल्याला कोणाबद्दल लैंगिक, भावनिक आकर्षण वाटले पाहिजे ते ठरवते आणि आपण कोणाशी लग्न करायचे, कोणासोबत कुटुंब निर्माण करायचे तेही ठरवते...
थोडक्यात, ती आपल्याला एका नियमाचा गुलाम बनवते आणि तो नियम म्हणजे ‘प्रजनन’. आपली सगळी अर्थव्यवस्था कुटुंबसंस्थेवर अवलंबून असते आणि म्हणून केवळ विषमलिंगी संभोगातून प्रजनन शक्य असल्याकारणाने स्त्री-पुरुष यांच्यातील प्रेमाला, लग्नाला आणि कुटुंबालाच सामाजिक आणि सांस्कृतिक मान्यता मिळत आली आहे. लिंगभाव संस्थेच्या या विषमलिंगी नियमामुळेच समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी आणि इतर असंख्य प्रकारच्या लैंगिक वर्तनाला ‘अनैसर्गिक’ आणि ‘विकृत’ ठरवले गेले.
या शोषणाच्या आणि द्वेषाच्या विरोधात एलजीबीटी चळवळ उभी राहिली. विषमलिंगी नियम न मानणाऱ्या माणसांनी, समूहांनी ‘आम्हीसुद्धा नैसर्गिक, नॉर्मल आहोत, आम्ही कोणता आजार नाही, आम्हीही माणूसच आहोत आणि म्हणून आम्हालाही मानवी अधिकार मिळाले पाहिजेत!’ असे म्हणत ही चळवळ सुरू झाली… आधी विस्कळीत अवस्थेत, व्यक्ती म्हणून, नंतर हळूहळू एकत्र येत, एक समुदाय म्हणून.
या एकत्र येण्यातून हळूहळू समलिंगी पुरुष (gay), समलिंगी स्त्रिया (lesbian), उभयलिंगी स्त्री-पुरुष (bisexual), पारलिंगी (transgender/transsexual), द्विलिंगी (intersex), क्वियर (queer), अ-लिंगी व अ-लैंगिक (agender/asexual) इत्यादी अशा अनेक, समाजाच्या ‘विषमलैंगिकते’च्या (heterosexuality) परिमाणाच्या, नियमाच्या, साच्याच्या विरोधात उभ्या राहिलेल्या ओळखींना एका छताखाली आणत, ‘एलजीबीटीआयक्युए+’ (LGBTIQA+) अशा नावाने ओळखला जाणारा हा समुदाय तयार झाला. हे नाव आणि त्याच्या लढ्याचा इतिहास युरोपात सुरू झाला असला, तरी तो आज जगभरातील समलिंगी, उभयलिंगी, द्विलिंगी आणि पारलिंगी लोकांना याच नावाने एकत्र यायला प्रेरणा देतो.
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा :
‘ट्रान्सजेंडर इंडिया.कॉम’ : एक ‘आवाज’, एक ‘व्यासपीठ’, एक ‘चळवळ’, एक ‘मिशन’…
‘आम्ही हिजडे, आम्ही माणूस’ अर्थात तृतीयपंथीयांचे अनुभव
समलैंगिकता – मिथकं आणि सत्य; निमित्त कोलकात्याच्या शाळेतील घटना
..................................................................................................................................................................
विषमलिंगी नियम सांगणारे लिंगभाव राजकारण मुख्यप्रवाही संस्कृतीतून घडवले गेले. धर्म, साहित्य, कला, प्रसारमाध्यमं, संस्कृतीच्या अशा अनेक माध्यमांतून हा विषमलैंगिकतेचा नियम मांडला आणि ‘नॉर्मल’ म्हणून वाखाणला गेला आहे. उदाहरण म्हणून फक्त मराठी साहित्याचा इतिहास जरी पाहिला तर समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी किंवा विषमलिंगी नसलेल्या इतर लैंगिक ओळख सांगणारी पात्रे, नायक वा नायिका, हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या कथा, कविता, कादंबऱ्या आणि नाटकांमध्ये सापडतील.
एखाद्या साहित्यिक आविष्कारात त्यांचा उल्लेख सापडला, तरी त्यात या ओळखी ‘वेगळे’, ‘विचित्र’, ‘अश्लील’ म्हणून, कधी ‘विनोद’ म्हणून, कधी मानसिक ‘आजार’ म्हणून, कधी समाजाच्या घडीत न बसणारे गुन्हेगार म्हणून तर कधी ‘किळस’ म्हणून ही पात्रे मांडली गेली, असे दिसते. या ओळखी मराठी साहित्याच्या इतिहासात – काही अपवाद वगळता –‘सन्माननीय व्यक्ती’ म्हणून अदृश्यच राहिल्या आहेत.
विजय तेंडुलकरांच्या ‘मित्राची गोष्ट’ या नाटकाची (खल)नायिका अशाच स्वरूपातली. ती समलिंगी आहे, मात्र तिला ‘लेस्बियन’ नावाची स्वाभिमानी, समानतेसाठीची चळवळीतली ओळख नाहीय. तेंडुलकर समलिंगी-विरोधी (homophobic) होते का, हा प्रश्न इतका महत्त्वाचा नसून, त्यांचे नाटक ‘लेस्बियन’ या नावाच्या राजकीय आणि सांस्कृतिक ओळखीच्या अदृश्य अस्तित्वाची, सन्मानाची भाषा शोधणाऱ्या धडपडीची, घुसमटीची शोकांतिका आहे का, हा प्रश्न जास्त उचित राहील.
‘नागकिन्नरी’ ही कादंबरी पारलिंगी व्यक्तींच्या या ‘सांस्कृतिक अदृश्यते’ला एक चांगले प्रत्युत्तर देते, त्यांच्या ‘सांस्कृतिक घुसमटी’ला वाचा फोडते आणि एलजीबीटी इत्यादी समुदायाच्या ‘विद्रोही संस्कृती’चा एक सुंदर नमुना पेश करते. एका पारलिंगी स्त्रीला नायिका म्हणून दाखवून - तिच्या इच्छा, आकांक्षा, भावना, तिचे विचार, तिचा प्रेमासाठीचा शोध - ही कादंबरी तिला ‘वेगळी’, ‘विचित्र’ म्हणून नाही, तर तुमच्या-आमच्या सर्वांसारखीच एक ‘माणूस’ म्हणून समोर ठेवते. पारलिंगी व्यक्तींना ‘माणूस’ म्हणून अशी आदराची वागणूक देणारी ही कादंबरी मराठी साहित्यातील पितृसत्ताक, विषमलिंगी नियमाच्या चित्रणाच्या इतिहासाला जोरकसपणे छेद देते.
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा :
कलम ३७७ : सुखावलेलं इंद्रधनुष्य आणि त्यांच्यापुढील ७ आव्हानं!
‘समलैंगिकता’ पुरातन काळापासून आपल्या संस्कृतीत आहे!
स्नेल्स इन द रेन : गिळगिळीत गिल्टचा काव्यात्म अनुभव
त्यांची वेगळी ओळख आपण सन्मानानं जपायला हवी. (पूर्वार्ध)
त्यांची वेगळी ‘ओळख’ आपण सन्मानानं जपायला हवी! (उत्तरार्ध)
..................................................................................................................................................................
ही कादंबरी एक काल्पनिक कथा आहे. साहित्याचे ‘वास्तववादी’ विरुद्ध ‘काल्पनिक’ असे वर्गीकरण मला मान्य नाही. माझ्या मते साहित्य नेहमीच कल्पित असते. वास्तवावर आधारित असले तरी. मुळात जिथे भाषाच एक प्रतीकांचा, संकेतांचा संच असते, तिथे भाषेतून सादर केलेला कुठलाही आविष्कार हा सांकेतिक, प्रतीकात्मकच असू शकतो. म्हणून साहित्यातील कल्पनाविश्वाच्या मागचे सत्य शोधण्याचा आटापिटा करण्याऐवजी, माणसाच्या कल्पनाविलासाचे सत्य शोधणे, त्याचे मनोविश्लेषण करणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. त्याअर्थी या कादंबरीतील कल्पनाविश्वाला ‘अंधश्रद्धा’ किंवा ‘अवैज्ञानिक’ असे म्हणून सोडून देण्याऐवजी त्या कल्पनेच्या मुळाशी असलेले सत्य, त्याचे राजकारण समजून घेणे बौद्धिक पातळीवर जास्त योग्य राहील.
ही कादंबरी वाचताना मला सातत्याने एक आठवण होत राहिली, ती म्हणजे, समलिंगी आणि पारलिंगी व्यक्तींचे नाग-नागिणीच्या गोष्टींशी एक चमत्कारिक नाते असते. मी स्वतः पौगंडावस्थेत असताना, जेव्हा मला पुरुषांचे लैंगिक व भावनिक आकर्षण वाटू लागले, तेव्हा मी स्वतःला ‘स्त्री’ म्हणून पाहू लागलो होतो. माझ्या मनात ‘स्त्री’ म्हणून जो आदर्श आकार घेऊ लागला होता, तो माझी आई, बहीण किंवा आजूबाजूच्या स्त्रियांचा नाही, तर चक्क बॉलिवुड सिनेमांमधली प्रख्यात नटी श्रीदेवीचा होता.
तो तिच्या ‘नगीना’ नावाच्या सिनेमातील नागिणीच्या पात्रामुळे तयार झाला होता. मग मी स्वतःला ‘नगीना’तल्या श्रीदेवीसारखी ‘इच्छाधारी नागीण’ समजायचो. अनेक नातेवाईकांनी मला माझा हा किस्सा सांगितला आहे की, त्या काळी मी त्यांना ‘गप्प बस, मी इच्छाधारी नागीण आहे!’ असंही म्हणायचो. पुढे खूप वर्षांनंतर मला माझ्या अनेक समलिंगी आणि पारलिंगी मित्र-मैत्रिणींनी सांगितले की, त्यांनाही श्रीदेवी आवडायची आणि मुख्य म्हणजे त्यांनाही तिचा ‘नगीना’ सिनेमा आवडायचा आणि तेही स्वतःला तिच्या त्या चित्रपटातील नागिणीच्या भूमिकेत पाहायचे.
या त्या वेळच्या आमच्या कल्पनाविलासाला एक विनोद म्हणून सोडून देता येईल, पण त्याचे ‘पारलिंगी’ पातळीवर मनोविश्लेषण करावे, असे मला ही कादंबरी वाचताना पुन्हा प्रकर्षाने जाणवले. ते आपल्याला ‘लैंगिकता’ या विषयाच्या राजकारणाच्या मुळाशी खेळत असलेले सत्य समजायला मदत करेल, असे वाटते.
स्त्री-अभ्यास केंद्रात शिकत असताना मी पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य वाचायला सुरुवात केली. मी त्यांचा जातिव्यवस्थेचा स्त्रीवादी सिद्धान्त वाचला, तेव्हा खूप भारावून गेलो होतो. बाबासाहेब म्हणतात की, ‘जात’ स्त्रियांच्या लैंगिकतेचे नियंत्रण करून तयार होते. हा सिद्धान्त वाचताना माझं पूर्ण लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित झालं होतं, ते म्हणजे ‘लैंगिकतेचे नियंत्रण’. पुढे इतर साहित्य वाचनातून हेही लक्षात आले की, खरं तर केवळ जातव्यवस्थाच नाही, तर धर्म, वर्ग आणि राष्ट्र – अशा सर्वच व्यवस्थांचे निर्वहन लैंगिकतेच्या नियंत्रणातून होत असते. समाजातील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषमता दूर करण्यासाठी जो समतेचा विचार होतो, त्यामध्ये लिंगभाव राजकारणाचा अभ्यास तर होतोच, मात्र त्याला जोडून, स्त्रीवादी दृष्टीकोनातून लैंगिकतेचे राजकारण समजून घेणेही महत्त्वाचे आहे, असे माझ्या लक्षात आले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
स्त्री-पुरुष या लिंगभावी, तर ‘समलिंगी’, ‘उभयलिंगी’, ‘पारलिंगी’ इत्यादी लैंगिक ओळखी, सर्व आपल्या ‘लिंगावर’, किंबहुना ‘लिंग’ नावाच्या संकल्पनेवर आधारलेल्या आहेत. स्त्रीवादी सिद्धान्तन आजवर आपल्याला हे सिद्ध करून दाखवत राहिलं की, लिंगभाव राजकारण लिंगावर आधारित आहे.
या सिद्धान्तात ‘लिंग’ जैविक, नैसर्गिक असतं, तर ‘लिंगभाव’ एक सामाजिक, सांस्कृतिक रचित आहे हे गृहीतक मांडलं गेलं. कालांतराने स्त्रीवादी विचार – ‘लिंग’ ही गोष्टसुद्धा जैविक, नैसर्गिक नसून आधीपासूनच, विज्ञानाच्या भाषेतून मांडलेले, नंतरहून येऊ घातलेल्या लिंगभाव राजकारणातून प्रेरित, एक सामाजिक आणि सांस्कृतिक रचितच होते – थोडक्यात, ‘लिंग’ हा आधीपासूनच लिंगभाव होता, या विचारापर्यंत येऊन पोचला.
आपण निसर्गतः स्त्री किंवा पुरुष असतो, हा एक गैरसमज होता. आपला जन्म होतो तेव्हापासूनच, किंबहुना आपण भ्रूण असतो, तेव्हापासूनच आपल्यावर ‘स्त्री’ किंवा ‘पुरुष’ नावाचे सामाजिक आणि सांस्कृतिक रचित लादलेले असते. तसे नसते, तर स्त्रीभ्रूणहत्या झाल्या नसत्या. अशा तऱ्हेने स्त्रीवादी विचाराने आपल्याला आता ‘मुळात लिंग म्हणजे नेमके काय?’ या मूलगामी प्रश्नाकडे आणून ठेवले आहे.
आता हा केवळ विचारधारेचा, समाजशास्त्राचा ज्ञानशास्त्रीय प्रश्न उरला नाहीय, आता हा प्रश्न सत्संबंधी, सत्ताशास्त्रीय म्हणजेच आपल्या मूलभूत ‘असण्या’शी संबंधितसुद्धा आहे. तो मानसशास्त्रीय आणि तत्त्वज्ञानात्मकसुद्धा आहे.
‘लिंग’ या विषयाच्या मनोविश्लेषणात्मक चर्चेतील जाक लाकाँचा (Jacques Lacan) सिद्धान्त आपल्याला ‘नागकिन्नरी’ कादंबरीचे गर्भितार्थ उलगडून दाखवू शकेल. त्यानुसार आपलं ‘असणं’ आधीपासूनच ‘जन्म’ (देण्याची, घेण्याची लैंगिक इच्छा) आणि ‘मृत्यू’ (मरण्याची इच्छा) किंवा ‘सत्य’ आणि ‘प्रतीक’ (भाषा), ‘निसर्ग’ आणि ‘संस्कृती’ अशा दोन टोकांच्या द्वंद्वात अडकलेला असल्याकारणाने, त्याच्या मुळातच दुभंगलेले असते.
लाकाँ त्याला ‘castration’ असे नाव देतो. पारलिंगी स्त्रिया त्यांचे आधीचे ‘पुरुष’ ही व्याख्या ठरवणारे लिंग छाटतात, तेव्हा त्या प्रक्रियेलाही ‘castration’ म्हणतात. लाकाँ पुढे म्हणतो की, आपल्या या मूलभूत नकारात्मकतेला, दुभंगलेपणाला आपण भाषेच्या पातळीवर, संकेतांच्या मदतीने, कल्पनाविलासातून, संस्कृतीतून सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या लैंगिकतेची मूलभूत नकारात्मकता सांस्कृतिक रचितांच्या मदतीने, भाषेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण मुळातच हे दुभंगलेपण मूलभूत असल्यामुळे हा सांस्कृतिक, सामाजिक आटापिटा, हा मानवी संघर्ष अयशस्वीच राहतो. अयशस्वी म्हणण्यापेक्षा मानवी ‘असणं’, या दुभंगलेपणाच्या द्वंद्वात्मक संघर्षातूनच त्याचा आकार घेत राहतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/bfwI5
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
तर लैंगिकतेची मूलभूत नकारात्मकता ही पितृसत्ताक लैंगिक वर्गीकरणाने सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. ‘स्त्री-पुरुष’ हा समाजाच्या, संस्कृतीच्या, धर्माच्या आणि भांडवलशाहीच्या, वर्णव्यवस्थेच्या आणि जातीच्या, सर्वांच्या मुळाशी कार्यरत असलेला भेदभाव आहे, जो लैंगिक वर्गीकरणावर आधारलेला आहे. ते आपण मान्य करावं, स्वीकारावं आणि मुख्य म्हणजे आत्मसात करावं, म्हणून संस्कृती आपल्याला ‘लिंगभाव’ नावाची स्पर्धा देते आणि आपणही त्यात जिंकण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यातून आपलं मूलभूत दुभंगलेपण संपेल, अशी आशा आपल्याला वाटत असते.
लाकाँ लिंगाच्या या पितृसत्ताक स्पर्धेमध्ये जिंकल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाला ‘phallus’ म्हणजे शिस्न असे नाव देतो. पुरुषांच्या लिंगाला आपण ‘शिस्न’ म्हणतो, पण phallus आणि पुरुषाचे जननेन्द्रिय यांच्यात एक फरक आहे. तो म्हणजे phallus हा प्रतीकात्मक आहे आणि तो स्त्री-पुरुष दोघांचा काल्पनिक आदर्श आहे… जीवनात शाश्वत आनंद मिळवण्याचा. त्याला लाकाँ ‘jouissance’ म्हणतो.
या विश्लेषणाच्या दृष्टीकोनातून आपण सिमॉन दे बुवॉचे (Simon De Bovouir) “One is not born a woman, one becomes a woman.” हे वाक्य नव्याने असे समजू शकतो की, आपण सगळेच व्यक्ती म्हणून, आपले मूलभूत दुभंगलेपण दूर करण्यासाठी, शाश्वत आनंदासाठी, jouissanceसाठी ‘स्त्री’ वा ‘पुरुष’ बनतो, केवळ बनवले जात नाही, तर स्वतः बनतो.
आता याच ‘phallus’चे भारतीय संस्कृतीतले, मुख्यतः एलजीबीटी इत्यादी लोकांच्या कल्पनाविलासी विश्वातले प्रतीक म्हणजे ‘नाग’. ‘नगीना’ सिनेमात आपण पाहतो की, एका मोठ्या हवेलीची मालकीण तिच्या लहान मुलाला घेऊन शंकराच्या एका मोठ्या मंदिरात पूजा करत असते. त्यामध्ये एक नाग आणि नागीण असे ‘जोडपे’ राहत असते. नाग-नागीण ‘जोडपे’ ही कल्पना मानवी समाजातील लिंगभाव राजकारणाची उपज आहे.
पुढे नाग त्या मुलाचा जीव घेतो. मुलगा मरतो, नाग पळून जातो. मुलाला जिवंत करण्यासाठी एक मदारी येतो, मुलाच्या शरीरातलं विष काढून पुन्हा प्राशीत करायला त्या नागालाच बोलवावे लागेल. म्हणून तो मदारी पुंगी वाजवून त्याला वश करतो आणि बिळातून पुन्हा बाहेर बोलावतो. तो नागही ‘मोहित’ होऊन नाईलाजाने येतो आणि त्या मुलाच्या शरीरात पसरलेल्या विषाचे पुन्हा प्राशन करतो. मात्र त्यामुळे नाग स्वतः मरतो. थोडक्यात, तो त्याचा जीव देऊन त्या मुलाला पुन्हा जिवंत करतो.
आता हा मेलेला नाग, लाकाँ मांडतो तसा आधीपासून phallus नाही, कारण हा तर त्या नागिणीचा ‘नवरा’ आहे, म्हणजे हाही शेवटी नागविश्वातील ‘पुरुष’ नावाचे सामाजिक, सांस्कृतिक रचितच आहे. आणि ती नागीणसुद्धा ‘स्त्री’च आहे, म्हणून ती तिचा लिंगभाव आणि तिला देऊ केलेला ‘पत्नीधर्म’ पाळत, तिच्या नागाला वाचवण्यासाठी त्या मुलाच्या घरी येते, मात्र त्याच्या आईच्या डोळ्यातील अश्रू, तिचे पुत्रप्रेम, तिचे ‘मातृत्व’ पाहून ती तिचा निर्धार सोडून देते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
नागविश्वातून आलेल्या स्त्रीला, नागीणीला ही मानवी स्त्री तिच्या मातृत्वामुळे तिचा मूळ निर्धार सोडायला भाग पाडते. ज्या घडीला ती नागीण हा निर्धार सोडते, तेव्हा ती सिमॉन दे बुवॉ म्हणते, तशी मानवी ‘स्त्री’ बनते. तिच्या नागविश्वातल्या स्त्रीपेक्षा तिला ही मानवी स्त्री जास्त आकर्षक वाटते. ही नागीण इच्छाधारी असल्यामुळे, तिची ही मानवी स्त्री ‘माता’ बनण्याची प्रबळ इच्छा पूर्ण करण्यासाठी मानवी ‘स्त्री’ बनते. तो लहान मुलगा मोठा होण्याची वाट पाहत राहते, वर्षानुवर्षे त्याच मंदिरात गाणं गात भटकत राहते.
एके दिवशी तो मुलगा पुरुष बनून येतो, तिच्या प्रेमात पडतो, प्रेमाचं रूपांतर लग्नात होते… आणि अशा तऱ्हेने लिंगभावाची विषमलिंगी इच्छाही पूर्ण होते. तो मेलेला नाग कायम मृतच राहतो मृत्यूसारखा. हा मृत्यू त्या नागिणीने तिच्या आनंदासाठी, jouissanceसाठी घडवून आणला आहे. आता तो त्याच्या मृत अवस्थेतही या jouissanceची आठवण म्हणून जिवंत राहणार आहे. अशा तऱ्हेने आधीचा ‘पुरुष’ नाग आता phallus झाला आहे.
या कादंबरीची नायिकासुद्धा ‘स्त्री-पुरुष’ या सामाजिक, सांस्कृतिक रचितांच्या द्वंद्वात अडकली आहे. ते तिने समाजाने देऊ केलेल्या नियमाला झुगारून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. जन्माने ‘पुरुष’ म्हणून संबोधलेल्या शरीराला, त्यातील पुरुषी लिंगाला, शिस्नाला तिने छाटले आहे. तिने तिच्या मूलभूत असण्याच्या castrated अवस्थेला, समाजातील लिंगभाव राजकारणातून येणाऱ्या castration म्हणजे खच्चीकरणाला, स्वतः निर्णय घेऊन निवडलेल्या castrationमधून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आपले मूलभूत दुभंगलेपण कायम द्वंद्वात्मक राहणार असल्यामुळे तिच्या असण्याला पिछाडणारा ‘नाग’ कायम तिच्या आयुष्यात धुमाकूळ घालत राहणार.
नागाच्या या प्रभावामुळे आपली लैंगिकता आपल्याला कुठलेच नाते जगू देत नाही… लाकाँ म्हणतो तसे ‘There is no sexual relation’. लैंगिक नात्याच्या अशक्यतेला सोडवायला येते ते प्रेम, असे लाकाँ म्हणतो. ‘नागकिन्नरी’ या कादंबरीतल्या प्रेमकथेकडे अशीच एक शक्यता म्हणून पाहावे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment