अजूनकाही
‘मिरॅकल’ हा प्रा. डॉ. सुनील विभुते यांचा विज्ञानकथासंग्रह मानवी मन, भावना व विज्ञानातील शोध यांचा सुरेख संगम वा गोफ आहे. विज्ञानातील शोध व त्याचा मानवी आयुष्यात अंतर्भाव असा आशय या संग्रहात पाहायला मिळतो.
‘सर्जिकल स्ट्राईक’ ही पहिली कथा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आहे. वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात प्रचंड उलथापालथ झालेल्या दहा जणी सॉफ्टवेअर संगणक तज्ज्ञ आहेत. त्या सर्वांचे पती आणि मुले दहशतवादी हल्ल्यात मारली गेली आहेत. त्या सर्व जणींनी तंत्रज्ञानाचा वापर करून हिमालयातील दहशतवाद्यांचे अड्डे शोधले आहेत. आपल्या ज्ञानाचा वापर करून कुठलीही जीवित हानी होऊ न देता त्यांचा समूळ बीमोड त्यांनी कसा केला, याची ती कथा आहे.
या कथेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दहा नायिका कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब, बंगाल अशा भारतातील अनेक प्रांतातल्या आहेत. त्यातून भारतातील एकात्मता, भारतीयत्व याचे दर्शन घडते. वैयक्तिक दुःखाचे रूपांतर सामाजिक दुःखात होते. तंत्रज्ञान-विज्ञान सोपे करून मांडल्यामुळे समजण्यास सुकर होते.
दुसरी कथा वनस्पतीशास्त्रावर आधारित आहे. काही वनस्पती किती भयंकर असतात? त्यांचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो? माणसाचे राक्षसात रूपांतर होऊ शकते, तो नरभक्षक होऊ शकतो, या वास्तव ज्ञानावर आधारित आहे. पण हे सत्य सांगताना लेखकाने एक हळूवार प्रेमकथा फुलवली आहे.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
मायरा व शंतनु यांची प्रेमकथा, त्यांचा विरह, शंतनुचे दुःख व त्यामुळे झालेले त्याचे उद्ध्वस्त जीवन, यातून चुकून त्या वनस्पती रसाचे प्राशन की, ज्यामुळे तो राक्षसी रूप धारण करतो. तो अंतर्बाह्य बदलून जातो. कथेचा शेवट शंतनुच्या मरणाने होतो. ही कथा चटका लावून जाते.
परग्रहावरील मानवी जीवन व त्यांना माणसांविषयी असणारी इर्ष्या, पृथ्वी जिंकण्याची जिद्द, त्यांचे मानवापेक्षा पुढे गेलेले विज्ञान आणि त्यांनी पृथ्वी जिंकण्यासाठी केलेला आटापिटा ‘फॉलसोबो’ या कथेत येतो. माणसाचे मन व मेंदू यांचे परिवर्तन घडवण्याची ताकद विज्ञानात–तंत्रज्ञानात आहे, हे तत्त्व या कथेचा प्राण आहे. ‘कूटनीती’ने प्रतिस्पर्ध्याला चीत करणे, याचे उदाहरण म्हणजे ही कथा. पण प्रतिस्पर्धीही त्यांच्या वरचढ आहे. शास्त्रज्ञ, त्यांची बुद्धिमत्ता, ज्ञान, कौशल्य याचे अतिशय भयकंपित करणारे दर्शन ही कथा घडवते.
‘कार्डिओ’ कथेतून भारतीय परंपरेचे दर्शन घडते. ‘वैष्णवजन तो तेणे कहिए। पीर पराई जाने रे।’ हे तथ्य सत्यकथेत व्यक्त झाले आहे. कथेच्या आत्म्यानुसार लेखकाने महाभारतातील कर्णाच्या दानशूरतेचा आधार घेतला आहे. कर्णाने ज्याप्रमाणे कवचकुंडले गेल्यावर मृत्यू अटळ आहे, हे ठाऊक असूनदेखील ती इंद्ररूपी ब्राह्मणाला देऊन टाकली, त्याप्रमाणे कथेतील निवेदकाचे वडील आपले कृत्रिम हृदय एका गरीब व संसाराचा आधार असणाऱ्या स्त्रीला देऊन टाकतात आणि मरणाचा आनंदाने स्वीकार करतात.
‘फायर फ्लाय अॅक्शन’ ही कथा अत्यंत उत्कंठावर्धक आहे. तंत्रज्ञानातील सूक्ष्म शोध व त्यांच्या द्वारे शत्रूचा बीमोड हा कथेचा विषय आहे. येथेही पहिल्या कथेप्रमाणे कुणाल श्रीवास्तव या तरुण शास्त्रज्ञाचे आई-वडील बॉम्बस्फोटात मारले जातात. या अनुभवाने तो होरपळला जातो. मग तो आपला शोध सुरू करतो आणि अतिरेक्यांचा शोध घेता येईल, असे कृत्रिम काजवे तयार करतो. पुढे अतिरेक्यांचा तळ, त्यांची क्रूर करणी, भारतीयांबद्दलचा द्वेष, त्यांचे डावपेच इ. गोष्टी समजण्यासाठी मूळ कथाच वाचली पाहिजे. वातावरण निर्मितीसाठी केलेले वर्णन इतके तंतोतंत असते की, तो परिसर डोळ्यापुढे उभा राहतो. उदा. बसस्टँडवरील वातावरण, अतिरेक्यांचे तळ, झालेल्या चकमकी इ. सामान्य वाचकाला त्यातील तंत्रज्ञान कळेलच असे नाही, पण कथेचा रसास्वाद घेता येऊ शकतो.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
‘मिरॅकल’ ही कथा प्रेमाची ताकद दाखवणारी आहे. दोन प्रेमी जीव एका अपघातात जखमी होतात. त्यातील तरुणी सुमी अपघातात ठार होते. तरुण जबर जखमी होऊन मृत्यूच्या दारात असतो. डॉक्टरांची त्याला वाचवण्यासाठी पराकाष्ठा चाललेली असते. त्या तरुणाला सुमी येऊन धीर देते. सतत त्याच्याभोवती असते, त्याला आपल्या प्रेमाच्या आठवणी देते. जाणीव-नेणीवेच्या पातळीवर तो सतत हेलकावे खात असतो. नेणीवेत सुमी सतत सोबत असते. अर्धवट जाणीवेत आई-वडील, मित्रमंडळी यांचे बोलणे, प्रेम कळत असते. त्या बोलण्यातूनच त्याला सुमी आता जिवंत नाही, हे कळते व तो प्राण सोडतो. एक हळवी प्रेमकथा असून ती मनात रुंजी घालते.
शेवटची कथा ‘गुरूमहाराज’ ही तंत्रज्ञान, विनोद, माणुसकी, मानवीस्वभाव या वैशिष्ट्यांचे अनेक पदर उलगडणारी आहे. तिपण्णा, राचू व चंदव्वा असे तीन यंत्रमानव (रोबो) अनय पाटील तयार करतो आणि आई-वडिलांकडे पाठवून देतो. धनाजी पाटील व गोदाक्का हे दोघेच घरात, शेतीचा व्याप मोठा, एकूलता एक मुलगा अमेरिकेत. धनाजी पाटलांना आता हा व्याप आवरत नव्हता. अनयला हे माहीत असते, म्हणूनच तो हे तीन पाठवतो. शेतीतील सर्व कामे, दरोडेखोरांना चोप देऊन पाठवणे, साप मारणे अशी अचाट कामे हे रोबो करतात. त्यांचा ‘रिमोट कंट्रोल’ अनयच्या हातात असतो. कथेच्या शेवटी या रहस्याचा उलगडा होतो. आपली उत्सुकता शेवटपर्यंत ताणली जाते, हे या कथेचे यश!
थोडक्यात, या संग्रहातील सर्वच कथा मनोवेधक, उत्कंठा वाढवणाऱ्या आहेत. सर्वच कथांमध्ये ‘मानवता’ हा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. लेखकाला उर्दू, हिंदी, कानडी भाषेचा लहेजा चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे कथेतील पात्रे खरीखुरी वाटतात. लेखक प्रत्येक कथेत मानवी भावभावनांची हळूवार उकल करतात, म्हणून ती केवळ विज्ञानकथा राहत नाही, तर माणसाची कथा-व्यथा होऊन जाते.
‘मिरॅकल’ - सुनील विभुते
राजहंस प्रकाशन, पुणे\ पृष्ठे – १२० \ मूल्य - २०० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखिका प्रा. सौ. प्रमिला मा. देशमुख बार्शी (जि. सोलापूर)च्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.

Post Comment